Friday, January 17, 2025

सायंकालिन उपासनेतले तात्विक विचार

दुकानातून अगदी पारखून, खूप सुवासिक म्हणून आणलेल्या, उदबत्तीचा सुवास आपल्याला फक्त त्या फोडलेल्या पुड्यातून लावलेल्या पहिल्या उदबत्तीपुरताच येतो. त्या पुड्यातल्या नंतरच्या उदबत्त्यांचाही तसाच सुवास येत असावा. पण आपले नाक त्या वासाला सरावल्याने आपल्याला जाणवत नाही.

तशीच एखाद्या खूप चविष्ट पदार्थाची चव पहिल्या घासापुरतीच. नंतरचे घास म्हणजे केवळ उदरम भरणम.
- सायंकालीन उपासनेत अनेक तात्विक विचार सुचणारे रामबुवा वेदांती.

बेळगाव: एक अनामिक ओढ असलेले गाव

 

"जिन लाहौर नही वेख्या वो जनम्याई नई" (ज्याने लाहोर बघितले नाही तो जन्मलाच नाही) असे म्हणतात खरे. स्वातंत्र्यपूर्वकाळात जन्मलेल्या पिढीला लाहोर शहराचे असे आकर्षण होते हे नक्की.
प्रभू श्रीरामपुत्र लव याच्या नावावरून लाहोर शहराचे नाव ठेवलेले आहे हे ऐकून तर या शहराविषयी एक निराळीच आत्मीयता निर्माण झाली. श्रीरामपुत्र कुशाच्या नावावरून आपल्या उत्तर प्रदेशातले कुशीनगर आहे. लक्ष्मणाचे (उत्तरेतला उल्लेख "लखन") लखनवा उर्फ लखनऊ ही शहरेही मनात विशेष स्थान निर्माण करून आहेत.
पण मला मात्र आस आहे ती बेळगाव बघण्याची. तिथली माती, तिथली थंड आल्हाददायक हवा, तिथले लोणी, तिथला गोड कुंदा आणि त्याहून गोड स्वभावाची तिथली माणसे हे सगळे याची देही याची डोळा मला अनुभवायचे आहे.
तसे २०१२ ला सांगलीवरून गोव्याला जाताना राजू शेट्टींच्या रस्ता रोकोच्या, जाळपोळीच्या (अव) कृपेमुळे आम्हाला मिरज - चिक्कोडी - निपाणी - बेळगाव मार्गाने गोव्यात प्रवेश घ्यावा लागला होता. तेव्हा रात्री ८ च्या सुमारास प्रवासात बेळगाव लागले खरे पण गोव्यात पोहोचण्याची त्वरा असल्याने बेळगाव "घडले" मात्र नाही.
फेसबुक, यू ट्यूब वर येणार्या ज्या ज्या व्हिडीओज, रील्समध्ये बेळगाव दाखवले आहे ते सगळे मी एका अनामिक आकर्षणापायी बघतो आणि ते शहर कसे असेल याचा मनातल्या मनात आराखडा तयार करतो. त्याला मनातल्या मनात अनुभवतो.
बेळगावात जाऊन तिथल्या अत्यंत थोर विभूती, गुरूमाय श्रीकलावतीदेवी यांच्या मठातही नतमस्तक होणे, जमल्यास तिथे वास्तव्य करणे हे ही माझ्या बकेट लिस्ट मध्ये आहेच.
पुलंच्या अंतु बर्व्याने जरी नातेवाईकांना "कोहीनूर" हिर्याबद्दल सांगून ठेवले होते तसे मी माझ्या मुलीला आणि नातेवाईकांना सांगून ठेवणार आहे.
"मी गेल्यानंतर पिंडाला कावळा नाही शिवला, तर "बेळगाव, बेळगाव" म्हणा. नक्की शिवेल." इतका माझा जीव अकारणच या शहरावर आहे.
- पुलंच्या रावसाहेबांसारखाच मराठी - कानडी असा अजिबात वाद न करता बेळगाव शहरावर आपल्या एखाद्या प्रेयसीवर करावे तसे मनोमन अव्यक्त प्रेम करणारा, एक अस्सल वैदर्भिय, नागपूरकर प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.
बाय द वे, पुल ज्या काॅलेजात शिकवायचे ते काॅलेज, ठळकवाडीचे त्यांचे घर आणि रावसाहेब हरिहरांचे "रिटझ" थिएटर अजूनही आहे का हो बेळगावात ?
त्ये त्येवडं सांगून सोडा की वो. काय त ते हाय काय ब्याळगावात ? (शेवटला "त" संपूर्ण उच्चारायचा हं. हलन्त नाही)

Wednesday, January 15, 2025

चहा: पिण्याचे एक शास्त्र असत ते

 सकाळी उठल्या उठल्या पहिला चहा.


वर्तमानपत्र आल्यानंतर वर्तमानपत्र वाचताना सोबत चहाचा कप हवाच म्हणून आणखी एक चहा.


दूधवाल्याने सकाळी दूध दिल्यानंतर "नवीन"दूधाचा आणखी एक चहा. हे एक अवघड प्रकरण आहे. भलेही दूधवाल्याने दूध आदल्या दिवशीच काढून दुस-या दिवशी सकाळी आपल्याघरी विकायला आणलेले असो. 


शेजारचे काका सकाळी सकाळी वर्तमानपत्र वाचायला घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी एखादा कप चहा. सोबत आपलाही अर्धा कप.


एकेकाळी असा अगदी "चहाबाज" असलेला मी आता दिवसेंदिवस चहा न घेताही राहू शकतो. सकाळी चहा घेतला नाही तर लगोलग डोके दुखायला लागणारा मी आता चहाशिवाय दिवसेंदिवस तसाच कसा राहू शकतो ? याचे माझे मलाच आश्चर्य वाटते.

काॅफी आणि चहाची चव वेगवेगळी आहे इतकाच फरक मला या दोघांमध्ये जाणवतो. पण काॅफी पिल्यावर एक वेगळी किक बसणे किंवा काॅफी पिताना आपण काहीतरी उच्चभ्रूपणा करतोय असे मला कधीच वाटले नाही. आमच्या बालपणी नेस्कॅफे वगैरे येण्याआधी किराणा दुकानांमध्ये काॅफीच्या छोट्याछोट्या वड्या मिळायच्यात. बालपणी काॅफी प्यायलो ती त्या वड्यांचीच.

चहा / काॅफी पिल्यानंतर काही काळ झोप येत नाही हे माझ्याबाबतीत तरी १०० % असत्य आहे हे मी स्वानुभवावरून प्रतिपादन करू शकतो. कितीही कडक चहा किंवा काॅफी पिल्यानंतर पाचव्या मिनिटाला मी गाढ झोपेत असू शकतो आणि ड्रायव्हिंग दरम्यान जागे रहाण्याची निकड आलीच तर कुठलीही चहा काॅफी न घेता मी टक्क जागा राहू शकतो.

कितीही चिनीमातीच्या अगर तत्सम सुंदर पदार्थांच्या कपबशा आल्यात तरी अशा तांब्या / पितळी / कास्यांच्या पेल्यांमधून चहा / काॅफी घेण्याची मजा काही औरच आहे.




या खालोखाल मजा म्हणजे टपरीवर चहा ज्यातून देतात त्या काचेच्या पेल्यांमधून चहा / काॅफी पिण्याची.

सगळ्यात नकोसा प्रकार म्हणजे कागदी कप.

आजकाल कागदी पेल्यांचा आकार लहान होत होत केवळ पोलियो डोस इतकाच चहा मावेल असे कप आलेत. अरे चहा / काॅफी अशी गटकन पिऊन टाकण्याची चीजच नाही रे. ती आस्वाद घेत घेत, हळुहळू प्यायची चीज आहे. पहिले दोन तीन घोट तर खरी चव कळायलाच लागतात. मग आपण त्यावर आपले मत बनवू शकतो. चहा / काॅफी ही टेस्ट मॅच सारखी आरामात आस्वादली पाहिजे. छोट्याशा कागदी पेल्यातून गटकन चहा पिणे म्हणजे टी - २०. आस्वाद घेतो घेतो म्हणेपर्यंत संपलेली.

कितीही सोयीचे म्हटलेत तरी अशा कागदी कपांतून चहा / काॅफी पिणे म्हणजे केवळ "उदरभरण" होईल. चहा / काॅफी पिताना "यज्ञकर्मा" चा अनुभव हवा असल्यास या प्रकारच्या पेला वाटीला पर्याय नाही. त्यातही स्टेनलेस स्टीलचा पेला ही केवळ सोय झाली. काषाय रंगाचा, तसल्याच धातूचा पेला वाटी म्हणजेच खरी मजा.



- फक्त चहा / काॅफीतच आनंद मानणारा आणि त्याचा रास्त अभिमान बाळगणारा
"Teetotaller", प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Wednesday, January 8, 2025

चिंतनक्षण - ८

 

"साधना म्हणजे अनेक अडथळ्यांची सात्विक शर्यतच आहे." - डॉ. सुहास पेठे काका


एखाद्या मुमुक्षूने साधना करायची ठरवली आणि त्यादृष्टीने पावले टाकायला सुरूवात केली की आपल्या सगळ्यांचा अनुभव असा आहे की त्यात अनेक अडथळे येतात. त्यातल्या अडथळ्यांचा आपण अधिक सूक्ष्म विचार केला तर आपल्या लक्षात येईल की यातले जास्तीत जास्त अडथळे केवळ आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमुळेच आपल्या साधनेत येत असतात. त्या अडथळ्यांना कुठलीही बाह्य परिस्थिती जबाबदार नसते.


साधनेला सुरूवात केल्यानंतर आपल्यात सात्विक गुणांची वृद्धी होऊ लागते. राजस आणि तामस गुण हळूहळू क्षीण व्हायला सुरूवात होते. आणि नेमका हाच क्षण स्वतःला सांभाळण्याचा असतो. आपल्या सात्विकतेचा सुद्धा अहंकार आपल्याला आपल्या साधनेच्या उद्दिष्टांपासून दूर नेऊ शकतो. आपण आता अध्यात्मात "बन चुके" झालोय, अध्यात्मात आपल्याला बरेच काही साध्य झालेय हा अहंकार आपल्याला हव्या त्या दिशेने प्रगती करू देत नाही हे सर्व साधकांनी कायमच लक्षात ठेवायला हवेय.


म्हणूनच साधनेला सुरूवात केल्यानंतर साधकाने स्वतःच्या मनाला विशेष रूपाने जागृत ठेवून कुठलही अहंकार आपल्या मनाला शिवू नये हा विचार ठेवला तरच त्यांच्या साधना मार्गात अडथळे येणार नाहीत आणि साधकांना त्यांचे अंतिम ध्येय गाठता येईल.



- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष शुद्ध नवमी शके १९४६ दिनांक ८ / १ / २०२५

Tuesday, January 7, 2025

चिंतनक्षण - ७

 

"कर्तृत्वाने हरला आणि ते माणसाला कळले म्हणजे भगवंताची कृपाच झाली म्हणायचे." - डॉ. सुहास पेठे काका


मनुष्य आपल्या कर्तृत्वावर फार विश्वास ठेवतो आणि माझ्या कर्तुत्वामुळेच माझ्या जीवनातल्या सगळ्या चांगल्या घटना घडत आहेत हे मानून चालतो. पण आपल्या लक्षात येईल की मनुष्य जीवनातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींचे अगदी ९९ % श्रेय जरी त्या मनुष्याच्या कर्तृत्वाला दिले तरी त्यात उरलेला १ % त्याच्यावर असलेल्या परमेश्वरी आधाराचा भाग असतो. यात कापूस आणि ठिणगीचा दृष्टांत चपखल बसतो. अगदी १०० किलो कापूस जरी असला तरी तो स्वतःहून पेट घेणार नाही. पण त्यावर एका अर्ध्या ग्राम वजनाची ठिणगी जरी पडली तरी तो धडाडून पेटेल. तसे मनुष्याच्या ढीगभर कर्तृत्वाला कणभर तरी परमेश्वर कृपा आधाराला असतेच. 


पण ज्याक्षणी अशी कर्तृत्वावान माणसे जीवनात पराभवाला सामोरे जातात तेव्हा त्यांना फार विषण्णता येते. आपले नक्की काय चुकले हेच त्यांना कळेनासे होते. आपले कर्तृत्व कुठे कमी पडले याचाच ते गांभीर्याने विचार करू लागतात. 


ज्याक्षणी अशा कर्तृत्ववान मनुष्याना आपले कर्तृत्व आणि त्याला हवी असलेली परमेश्वरी कृपेची जोड यातला दुवा लक्षात येतो त्याक्षणी ती सगळी माणसे परमेश्वरी अनुसंधानासह पुन्हा आपापले कर्तृत्व गाजवायला सिद्ध होतात आणो पुन्हा नवी झेप घेतात. नवी क्षितीजे धुंडाळण्यासाठी, नव्या आकांक्षांना साकार करण्यासाठी. 


ज्यांना फक्त आपलया कर्तृत्वावरच विश्वास ठेवायचा असतो, त्यांना मात्र नक्की काय चुकले हे काळातच नाही आणि पुढला मार्ग सापडत नाही. म्हणजे आपले कर्तृत्व सर्व काही घडवू शकत नाही हे ज्या माणसाला कळले त्याचा पुढील अभ्युदयाचा मार्ग मोकळा होतो. म्हणून अशा मनुष्यावर भगवंताची कृपाच झाली असे म्हणावे लागेल.  


- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष शुद्ध अष्टमी  शके १९४६ दिनांक ७/ १ / २०२५

चिंतनक्षण - ६

 

"प्रपंच मोडू नये व परमार्थ सोडू नये, हा आपला मध्यम मार्ग आहे. " - डॉ. सुहास पेठे काका


गृहस्थाश्रम हा सर्व आश्रमांना आधारभूत आहे हे जर खरे असले तरी त्यातच कायम गुरफटून राहणे हा काही ईश्वरप्राप्तीचा मार्ग नव्हे. "आधी प्रपंच करावा नेटका" हे जरी समर्थांनी सांगून ठेवले असले तरी त्यानंतर "मग साधी परमार्थ विवेका" हे सुद्धा त्यांनी सांगितलेच आहे. प्रपंच हा कितीही केला तरी पुरा होत नाही, त्यात खरे समाधान मिळत नाही हे मनुष्यमात्रांच्या आज ना उद्या नक्की अनुभवायला येतेच. पण तोवर उशीर होऊन गेलेला असतो. 


संसारातली आपली सगळी कर्तव्ये सोडून परमार्थात जाणे आणि साधू बनणे  हे सुद्धा सगळ्यांच्याच आवाक्यातले नाही आणि त्याचा आपल्या शास्त्रांनी निषेध सांगितला आहे. प्रपंचात रहात असताना परमार्थ विचार जागृत ठेवणे आणि आपली कर्तव्ये पार पाडत असताना भगवंत स्मरणात राहणे हे आपल्या शास्त्रांना मंजूर आहे किंबहुना अशा प्रकारच्या प्रपंचाला आपल्या शास्त्रांनी संन्यासाचे फळ सांगितलेले आहे. 


क्रिकेटमधले उदाहरण घेऊ यात. १ बाद २०० या धावसंख्येवर येऊन शतक झळकावणे आणि ५ बाद ६० या धावसंख्येवर येऊन आपल्या संघासाठी शतक झळकावणे यात श्रेयस्कर दुसरी परिस्थिती आहे. तसेच सर्वसंग परित्याग करून हिमालयात निघून जाणे आणि संन्यास घेणे ह्यात आणि संसारातल्या तापत्रयात राहून ईश्वराचे अनुसंधान ठेवणे यातही अधिक श्रेयस्कर दुसरी परिस्थिती आहे. म्हणूनच संसारात पूर्ण गुरफटून जाणे आणि सर्वसंग परित्याग करून केवळ परमार्थाच करीत रहाणे या दोन्ही टोकाच्या मार्गांपेक्षा संसारात राहून परमेश्वराचे अनुसंधान ठेवणे हा सर्व साधकांच्या आयुष्यातला मध्यम आणि श्रेयस्कर मार्ग आहे. 


- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष शुद्ध सप्तमी शके १९४६ दिनांक ६/ १ / २०२५

Sunday, January 5, 2025

चिंतनक्षण - ५

 



"भक्ताला परिस्थिती अनुकूल - प्रतिकूल नसते तर ती भगवंताकडे जायला फ़क्त उपयुक्त असते" - डॉ. सुहास पेठे काका


भक्ताची वृत्ती एकदा भगवंताकडे दृढपणे लागली की या जगातल्या अनुकूलतेची किंवा प्रतिकूलतेची त्याला तमा नसते. असलेल्या कसल्याही परिस्थितीचा वापर करून घेऊन भगवंताची भक्ती करायची, आहे ती परिस्थिती ही माझ्या भगवत्भक्तीत साह्यकारीच ठरणार आहे असा ख-या भक्ताचा दृष्टीकोन असतो.


याबाबत तीन संतांचे उदाहरण आहे. श्रीतुकोबांनी "बरे झाले देवा बाईल कर्कशा" अशा शब्दात आपल्या पत्नीचे वर्णन केले आणि अशी पत्नी दिली म्हणून देवा मी तुझ्याकडे लक्ष देऊ शकलो नाहीतर संसारातच गुरफ़टून गेलो असतो, तुझा विसर पडला असता असे वर्णन केले.


संत एकनाथ महाराजांना एकाने विचारले की महाराज तुमचा परमार्थ इतका चांगला, नेटका कसा झाला ? त्यांनी उत्तर दिले की माझी पत्नी अतिशय सात्विक आहे आणि माझ्या अध्यात्मसाधनेत तिची पूर्ण साथ मला आहे.


समर्थ रामदासांना हाच प्रश्न कुणीतरी विचारला असता तर त्यांनी उत्तर दिले असते की मला पत्नी नव्हतीच त्यामुळेच मी फ़क्त परमेश्वराकडे पूर्ण लक्ष देऊ शकलो.


म्हणजे परिस्थिती वेगवेगळी असली, अनुकूल - प्रतिकूल असली तरी ख-या भक्ताच्या, भगवंतप्राप्तीच्या ध्येयाआड ती येत नाही. उलट असलेल्या परिस्थितीचा आपल्या ध्येयप्राप्तीसाठी वापर कसा करून घ्यायचा हे भक्ताला माहिती असते.



- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष शुद्ध षष्ठी शके १९४६ दिनांक ५ / १ / २०२५