Wednesday, June 22, 2022

माल - वाहक

 


MWQ 965
अकोला - पुणे हा जलद रूट गाजविणारी अकोला विभागातली १९८५ ची राणी.
आता नागपूर विभागात "माल - वाहक"
मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी निर्मित मूळ बस.
विभागीय कार्यशाळा, नागपूरने बसचे रूपांतर ट्रकमध्ये केले.

३७ वर्षांनंतरही अजून अविरत सेवा देणारा खराखुरा, सच्चा सेवक.


MWQ 965

TATA 1210
"माल - वाहक" i.e. Goods Carrier by MSRTC. Serving MSRTC for 37 long years.
Originally a bus built by MSRTC's Central Workshop Dapodi, Pune.
It must have been built in 1984-85. Served as a passenger bus in Akola division. It had ruled Akola Express Pune route for number of years.
After the end of its codal life as a bus, Nagpur divisional workshop converted it into a truck. At present it is used for MSRTC's departmental works i.e. carrying remoulded tyres, other goods to and fro departmental workshop at Ganeshpeth and central workshop at Hingna.

Tuesday, June 21, 2022

कोरडेपणाच्या झळा

एखाद्या वर्षी पर्ज्यन्यवृष्टी झालीच नाही तरी मागल्या अनेक वर्षात झालेल्या वृष्टींच्या संचितातून निभावून जाऊ शकत. एखाद्या वर्षीच्या अनावृष्टीत लगेच शंभर वर्षांच्या अनावृष्टीचा अनुभव आल्यासारखे माणसे वागीत नाहीत. मार्ग काढीत जातात, जगणे शोधीत जातात.

पण नातेसंबंधात, स्नेहसंबंधांमध्ये मात्र गेल्या १०-१२ वर्षात याच्या अगदी विपरीत वागणूक आपल्या सगळ्यांनाच अनुभवायला येतेय. मतलबापुरत्या नातेसंबंधाच्या कोरडेपणाची व्याप्ती इतकी वाढत चाललीय की एकेकाळी ज्या दोन व्यक्ती एकमेकांच्या सुखदुःखात मनःपूर्वक सहभागी होत्या त्यांनाही तो ओलावा, ते मार्दव आठवणीतून पूर्णपणे पुसल्यासारखे झाले आहे.
एकेकाळी माणसे जगण्यासाठी एकमेकांवर बर्यापैकी अवलंबून होती. समाजातल्या, नातेसंबंधातल्या लहानातल्या लहान व्यक्तीचीही प्रत्येकाच्या जीवनात निश्चित अशी भूमिका असे. त्यामुळे तो ओलावा होता. गेल्या २५ वर्षातल्या तंत्रज्ञानाच्या स्फोटामुळे माणसांचे एकमेकांवरचे अवलंबन कमी कमी होत होत आताशा ओलावा तितकासा राहिलेला नाही किंवा क्वचित संपूर्ण कोरडेपणाच उरलाय.
दुष्काळाची आणि कोरडेपणाची भीती नाही पण एकेकाळच्या वृष्टीच्या आठवणींवर विश्वास ठेऊन पुढेही वृष्टी होईल हा भरोसा गमावणे आणि कधीच ओल नव्हती इतकी तीव्र जाणीव होणारा नातेसंबंधांमधला कोरडेपणा भयावह आहे.
या सगळ्या गदारोळात कोरडेपणाच्या झळा जाणवतात त्या फक्त महत्प्रत्सायाने ही ओल घट्ट धरून ठेवणार्या जमिनीला आणि व्यक्तीला.
वास्तविक समर्थांच्या "लोकाचारे वर्तावे" या उक्तीला धरून ती व्यक्ती वागली तर सार्वत्रिक कोरडेपणाचा स्वीकार करून अशी संवेदनशील व्यक्तीही जगाच्या 'बँडवॅगन' मध्ये सामील होऊ शकते आणि वरवरचे, कृत्रिम, बेगडी नातेसंबंध निभावून नेऊ शकते. पण यात ज्या संवेदनशीलतेचा, ओलाव्याचा बळी जातो ती स्थिती मनुष्यमात्रांच्या भविष्यासाठी कायमस्वरूपी भयावह आहे.
किंबहुना अशा एखाद्या संवेदनशील व्यक्तीने सगळ्यांसारखेचच कोरडे होऊन वरवरचे, कृत्रिम, बेगडी नातेसंबंध जपत रहावेत हीच बाकी सगळ्या शेपूटतुटक्या कोल्ह्यांची अपेक्षा असते आणि तसे प्रयत्नही असतात.
बरोबर ना ?
- "As one writes more and more personal, it becomes more and more universal" या आंग्ल वचनांवर पुरेपूर विश्वास ठेवणारा, नातेसंबंधांमध्ये ओलावा जपून ठेवण्याची पराकाष्ठा करताना कोरडेपणाच्या झळा सहन करणारा, शेपूटशाबूत कोल्हा आणि मनमोकळा माणूस, रामशास्त्री किन्हईकर.

Monday, June 20, 2022

जीवन जगण्याची सोपी सूत्रे

 स्वतःच स्वतःवरच्या अपेक्षांचं वाढवलेलं ओझं बाळगणं हळूहळू कमी करत नेलं...

आणि
स्वतःला अनेक छोट्या मोठ्या गोष्टींसाठी अधूनमधून माफ करणं जमलं...
की
मज्जानी लाइफ.
("जीवन जगण्याची १०१ सोपी सूत्रे" या रामप्रकाशबाबू यांच्या आगामी पुस्तकातील एक सूत्र.)
- बालपणापासून खूप नैष्ठिक कर्मठपणे जगत आलेला, गांधीजांच्या विनोबांच्या सर्वोदयी विचारांनी अत्यंत भारावलेला, तरीही पुलंच्या "तुझे आहे तुजपाशी" मधल्या 'शाम' च्या मानसिकतेशी साधर्म्य असणारा साधाभोळा, राम.

Sunday, June 19, 2022

फार दिवसांनी झालेले बसफॅनिंग.




नागपूर जलद (रातराणी सेवा) सोलापूर.

नागपूरवरून निघण्याची वेळः १६.०० वाजता.
मार्गेः वर्धा-देवळी-कळंब-यवतमाळ-आर्णी-धनोडा- महागाव-उमरखेड-वारंगा फाटा- नांदेड-लोहा-चाकूर-अहमदपूर-शिरूर ताजबंद-लातूर-औसा-उजनी-तुळजापूर.
एकूण अंतरः ६०० किमी
एकूण वेळः १४ तास.
MH 40 / AQ 6451
मध्यवर्ती कार्यशाळा, हिंगणा, नागपूरने बांधलेली बस
TATA 1512 C
नाग. गणेशपेठ डेपो.
२ x २ आसनव्यवस्था. एकूण ४३ आसने + १ वाहक.
डोंगरगावजवळील इंधन पंपावर इंधन भरत असताना काढलेला फोटो.
६/६/२०२२.
दुपारी १६.४५ वाजता.
फोटोत मागून डोकावणारी बस.
नागपूर जलद गोंडपिपरी
मार्गेः जांब-वरोरा-भद्रावती-चंद्रपूर-बल्लारपूर-बामनी-कोठारी.
मूलतः एसीजीएल, गोवा ने बांधलेली निमआराम बस, मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर येथे पोलादी सांगाड्यात (mild steel body) पुनर्बांधणी केलेली बस.
नाग. वर्धमाननगर आगार.

Monday, June 13, 2022

गाॅगल: एक चिंतन

 गाॅगल (कृष्णोपनेत्रः पुलंचा शब्द) आमच्या डोळ्यांवर बर्याच उशीरा आला. ११ व्या वर्गात असताना घरापासून सी. पी. अँड बेरार रवीनगर शाळेपर्यंत बसने जाताना मध्ये अलंकार टाॅकीजवर आमीर खानच्या "कयामत से कयामत तक" सिनेमाचे भलेमोठे पोस्टर लागलेले दिसे. त्या पोस्टरवर अर्ध्यापेक्षा जास्त व्यापून राहिलेला आमीर खानचा गाॅगलधारी चेहेरा अजूनही माझ्या घट्ट आठवणीत आहे.

अर्थात तेव्हा 'कयामत', 'मकसद' वगैरे ऊर्दू शब्दांशी फारसा परिचय झालेला नव्हता. पुलंच्याच भाषेत वर्णन करायचे झाले तर सकाळी साध्या वरणासोबत फोडणीचा भात आणि संध्याकाळी फोडणीच्या वरणासोबत साधा भात खाणार्या मध्यमवर्गीय संस्कृतीतले आम्ही. आमचे क्षितीज विस्तारले, जाणीवा समृध्द झाल्यात जेव्हा आम्ही अभियांत्रिकी शिक्षणासाठी घरापासून ११०० किमी दूर कराडला गेलो तेव्हा. नव्या संस्कृतीतले मित्र, नव्या ज्ञानाची भर, नवीन जाणीवा जगणे यात खरे जीवन जगलो.
बरे, १२ व्या वर्गात घरून शाळेत जायला लूना मिळाली खरी पण तेव्हा असे तोंडनाक गुंडाळून, गाॅगल घालून स्वतःला अती जपत जाणे हे फक्त अतिरेक्यांचे लक्षण होते. बहुतांशी गाडीवरून जाणारी मंडळी आजच्या युगात आहे तसा कसलाही जामानिमा न करता मोकळेपणाने, सुखाने गाड्या चालवीत असत. घरी परतल्यानंतर चेहेर्यावर जमलेली धूळ लक्स (किंवा हमाम) आणि पाण्याचे शिपकारे यांनी नाहीशी होत असे. चेहेर्यावर धूळ जमून त्याची ph बिघडू नये म्हणून चेहेरा विचित्र गुंडाळणे, केसांच्या निगेसाठी केसांनाही असे गुंडाळून वगैरे गाड्या चालविणे असे प्रकार तेव्हाच्या 'सुकांत चंद्रानना' करीत नसत. घरी आल्यानंतर केस विस्कटलेले दिसलेच तर एखादा कंगवा किंवा फणी (ही मिळते का हो आजकाल ?) केसांमधून फिरवून ते नीटनेटके केले जात. पुष्कळ वेळेला मला प्रश्न पडतो आजकाल इतकी चेहेर्याची, केसांची काळजी घेऊनही तरूण पिढीत अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण किंवा त्वचेचा पोत बिघडण्याचे प्रमाण वाढते का असावे ? आपण निसर्गापासून स्वतःला खूप तोडून घेतलेय का ?
तात्पर्य काय तर आम्ही चांगले कमावते होईपर्यंत गाॅगल ही तत्कालीन चैनीची वस्तू आमच्या डोळ्यांवर कधी चढलीच नाही. स्वतः कमवायला लागल्यानंतर अनेक गरजेच्याच वस्तू चैनीच्या वाटायला लागतात मग अशा खरोखर चैनीच्या वस्तूचे महत्व आम्हाला कुणी पटवून द्यावे ? आणि त्यांची खरेदी तरी कशी व्हावी ?
लग्नानंतर मात्र अर्धांगिनीच्या आग्रहाखातर एकदोन वेळा गाॅगल खरेदी झाली पण ते वापरण्याची सवय नसल्याने एकदोन वापरांनंतर पडून राहणे, कुठेतरी विसरून येणे हे प्रकार अपरिहार्यच आहेत. मग सुपत्नीनेही माझ्यामागे गाॅगल घालण्याचा हट्ट करण्याचा नाद सोडला. बाकी घराबाहेर पडताना, प्रवासाला जाताना आवर्जून गाॅगल घालणारे आणि तो वर्षानुवर्षे नीट जपून ठेवणारे लोक मला माध्यान्हवंदनीय आहेत. (गाॅगलचा खरा उपयोग माध्यान्हसमयीच की नाही ? म्हणून "प्रातःवंदनीय" सारखे "माध्यान्हवंदनीय". मराठी शब्दभांडारात तेवढीच माझी आपली इवलीशी भर.)
बाकी कोट घातलेला माणूस आणि गाॅगल घालणारी व्यक्ती एकूणच रूबाबदार दिसतात. व्यक्तीचे खांदे मुळातून कितीही पडलेले असलेत तरी कोटाच्या रूंद खांद्यांमधून ते उठावदारच दिसतात. कोट घातलेली व्यक्ती म्हणूनच आत्मविश्वासपूर्ण दिसते. तसेच मुळातले निस्तेज डोळे लपविण्याचे काम गाॅगलव्दारे होते आणि त्या चेहेर्याला एक वेगळीच झळाळी येते म्हणून गाॅगल घातलेली व्यक्ती उगाचच स्मार्ट वाटते. अर्थात ६० आणि ७० च्या दशकातल्या हिंदी सिनेमातल्या नायिका (आणि त्यांचे अंधानुकरण करणार्या काहीकाही मराठी नायिकाही) जेव्हा सव्वा चेहेरा व्यापणारा "अंगापेक्षा बोंगा" गाॅगल घालायच्यात तेव्हा त्या अत्यंत हास्यास्पद दिसायच्यात. त्यातच अगदी ९० च्या दशकातही गाॅगल कपाळाच्या पार टोकांवरून नेऊन केसांवर अडकवून ठेवण्याची एक बेंगरूळ फॅशन सिनेसृष्टीने रूढ करण्याचा प्रयत्न केला खरा पण तो फारसा यशस्वी झाला नाही. या खटाटोपात केसांना लावलेले तेल गाॅगलला चिकटून पुढच्या वेळी घातल्यानंतर समोरचे धूसर दिसणारे दृश्य पाहून स्वतःला मोतीबिंदू झालाय की काय अशी शंका येणे किंवा सर्वसामान्य माणसांच्या धावपळीच्या घडामोडींमध्ये तो गाॅगल निसटून पडण्याची भिती असणे या प्रमुख भीतींमुळे ती फॅशन जनसामान्यांमध्ये लोकप्रिय झाली नाही.



बाकी गाॅगल वापरावेत ते तुंगभद्रेच्या दक्षिणभागात असलेल्या सिनेसृष्टीतील हिरोंनी. थलाईवा रजनीकांतला एकातरी सिनेमात गाॅगलशिवाय आणि त्याच्या गाॅगल घालण्याच्या विशिष्ट स्टाईलशिवाय बघितलेय काय ?
आताशा घरात आमच्या नव्या पिढीच्या समृध्द जाणीवांमुळे आणि आग्रहामुळे घरात मध्येमध्ये गाॅगलखरेदी होते. लाॅकडाऊनदरम्यान आॅनलाईन चष्मे मागवताना "दोन चष्म्यांवर एक गाॅगल फ्री" या योजनेत घरात एकदम चांगल्या कंपनीचा छान गाॅगल आला. घालून बघितला तर खरंच वेगळा वाटला हो. गाॅगल्समध्ये आजकाल उपयुक्त असे "पोलराॅइड" तंत्रज्ञान आलेय आणि त्याचे नक्की फायदे काय ? हे तो गाॅगल घालून बघितल्यावरच कळले हो. यातही म्हणे स्त्रियांनी वापरण्याचे आणि पुरूषांनी वापरण्याचे असा पंक्तीभेद आहेच.
एकूण काय ? "कुठला गाॅगल आपल्याला छान दिसतोय ?" या विचारापेक्षा "कुठल्या गाॅगलमधून आपल्याला छान दिसतेय ?" हा विचार मनात आला की आपली गाडी तारूण्याचा घाट ओलांडून आता पोक्तपणाच्या वळणावरून वृध्दाप्याच्या उताराकडे वाटचाल करायला तयार आहे असे लक्षात घ्यायला हवे आणि त्यानुसार योग्य तो गिअर टाकायला हवा.
- वागण्यातले बाल्य अजून जपून ठेवलेला, मनाने चिरतरूण, वृत्तीने पोक्त आणि विचारांनी वृध्द असलेला "अवस्थातीत" गणेशभक्त, राम प्रकाश किन्हीकर.

Sunday, June 5, 2022

एक नेहमीचा पण अगदी निराळ्या अनुभवाचा प्रवास.

 २००१ चा गणेशोत्सव. मुंबईवरून लग्नानंतरच्या पहिल्यावहिल्या महालक्ष्म्यांच्या (ज्येष्ठा कनिष्ठा गौरी) सणासाठी नागपूरला आलेले आम्ही उभयता परत मुंबईसाठी निघालेलो होतो. नागपूर ते मुंबई प्रवास हा अक्षरशः शेकडो वेळा घडलेला असल्याने प्रवासात नाविन्य असे उरलेले नव्हते. तरीही एका रेल्वे फ़ॅनसाठी प्रत्येक प्रवास हा नवीन आणि उत्साहवर्धक असतो. तसाच मी सुद्धा हा प्रवास उत्साहाने अनुभवत होतो.

नागपूरवरून सकाळी निघणा-या आणि दिवसभर प्रवास करून मुंबईत पोहोचणा-या हावडा - मुंबई गीतांजली एक्सप्रेसचे आरक्षण होते. एकेकाळी गीतांजली एक्सप्रेस ही या मार्गावरची शान होती. मुंबईवरून निघाली की कल्याण - कसारा (घाट चढ्ण्यासाठी अधिक एंजिने लावण्यासाठीचा तांत्रिक थांबा) - इगतपुरी (घाट चढ्ल्यानंतर लावलेली अधिक एंजिने काढण्यासाठीचा तांत्रिक थांबा) - (नाशिक रोड, मनमाड इत्यादी मोठी स्थानके टाळून थेट)  भुसावळ - अकोला - बडनेरा - नागपूर - गोंदिया - दुर्ग - बिलासपूर - टाटानगर - हावडा अशी धाडधाड जाणारी ही गाडी होती. नंतर एंजिनांची शक्ती वाढत गेली. ह्या आणि इतरही गाड्यांची धाववेळ कमी करण्याऐवजी अधिकचे थांबे दिले गेलेत. 



आमचे आरक्षण शयनयान वर्गात होते. तिथे आम्ही प्रवेश केला पण अगदी समोरच्या बाकावरील मंडळींचे सकाळचे खाणे सुरू होते. आम्ही जरी पूर्ण शाकाहारी असलो तरी समोर बसून कुणी मांसाहार केला तरी आम्हाला किळस वगैरे कधीच वाटली नाही. पण आत्ताच्या क्षणी समोरच्या बाकावरच्या कुटुंबाचा ’माछेर झोल’ खाण्याचा प्रकार पाहून मात्र खरोखर किळस वाटून पोटात ढवळायला लागले होते. आदल्या दिवशी रात्री (कदाचित दुपारीही) घेतलेल्या जेवणाच्या डब्यात (तो ही ऍल्युमिनियमचा, कळकट्ट झालेला) भातात माश्यांचे कालवण. ते सुद्धा हाताचा पूर्ण पंजा त्यात घालून ओरपणे सुरू, त्या माश्याचा आणि भाताचा शिळा वास केवळ आमच्याच कंपार्टमेंटमध्ये नाही तर पूर्ण डब्यात पसरला होता. आमच्या कंपार्टमेंटजवळून जाणारी प्रत्येक व्यक्ती नाकाला रूमाल किंवा तत्सम काही लावूनच चाललेली होती. आणि कहर म्हणजे खाऊन झाल्यावर त्या डब्यात स्वतःजवळचे पिण्याचे पाणी टाकून त्या माणसाने तो डबा विसळला आणि ते पाणी स्वतःच्या बाकाखालीच टाकून दिले. किळसवाणेपणाचा कळस.

आता सौभाग्यवतींना मळमळायला लागले होते. मी डबा बदलून एसी डब्यात आरक्षण मिळतेय का हे बघण्यासाठी टीटीईंच्या मागे. सुदैवाने माझी धडपड यशस्वी झाली. गर्दीचा सिझन नसल्याने नागपूरवरून काही अंतर गेल्यावर लगेच आम्हाला ए एस -१ कोचमधील ५५ आणि ५६ ही आसने (शायिका) टीटीईंनी दिलीत.



आमच्या कोचमधील ४९ ते ५६ या बे मधील ५५ आणि ५६ हे साईड लोअर आणि साईड अप्पर बर्थस होते. एका रेल्वेफ़ॅनला दिवसभरच्या प्रवासासाठी एक खिडकीची जागा आणि पाय लांब करून पडायचे असले तरी खिडकीचाच बर्थ ह्यापेक्षा अजून काय हवे असते. आम्ही उभयता संसारातल्या सुखदुःखांबद्दल गप्पा टप्पांमध्ये दंग होतो. आम्ही आजुबाजूला नजर टाकली. गर्दीचे दिवस नसल्याने आमचा कोच बराच रिकामा होता. आमच्या ८ जणांच्या बे मध्ये ४९ नंबरच्या बर्थवर एक असामी पांघरूण घेऊन झोपलेली होती. त्याच्या वरच्या ५० आणि ५१ नंबरच्या बर्थसवर कुणीही प्रवासी नव्हते. त्यामुळे चांगला दिवस उजाडला तरी स्वारी निवांत झोपलेली होती. रेल्वेने दिलेले पांढरेशुभ्र अंथरूण आणि त्यावर पांढरीशुभ्र चादर अगदी डोक्यापर्यंत ओढून ही असामी झोपलेली होती. असेल कुणी थकलेला / ली बिचारा / री म्हणून आम्ही थोडे दुर्लक्षच केले. त्याच्या समोर ५२ नंबरवर एकच प्रवासी होता. तो पण आमच्यासारखाच नागपूरवरून बसलेला होता. 

गाडी तुफ़ान निघाली. बडनेरा स्टेशनला एक दोघे आमच्या कोचमध्ये आलेत. अकोल्याला शेजारच्या बे मध्ये एक कुटुंब त्यांच्या छोट्याशा राजकन्येसह आलेत. माझी गट्टी छोट्या मुलांशी फ़ार लवकर जमते त्यामुळे मी माझ्या या छोट्या मैत्रिणीशी गट्टी जमविली आणि तिच्याशी खेळत बसलो. सौभाग्यवती जेवणानंतर ५६ नंबरच्या बर्थवर झोपायला गेलेल्या होत्या. गाडीत दुपारच्या झोपेत हरवलेले प्रवासी आणि एसीच्या एंजिनाच्या घरघरीचा आवाज एव्हढीच जिवंतपणीची खूण होती.

दुपार टळत आलेली होती. गाडी मनमाड स्टेशनात उभ्या असलेल्या प्रवाशांना धूळ चारत नाशिककडे धावत होती. पॅन्ट्री कारमधल्या पोरांची चहा कॉफ़ी घेऊन हाकारे देत हालचाल सुरू झालेली होती. कोचमधल्या सगळ्यांचीच दुपारची झोप वगैरे आटोपत आलेली होती. आणि आम्हाला आणि आमच्या आजुबाजूच्या बे मधल्या सगळ्यांना एक भयंकर जाणीव जवळपास एकाच वेळेस झाली...

... आमच्यी बे मध्ये ४९ नंबरवर झोपलेल्या व्यक्तीने गेल्या १० तासात कुठलीच हालचाल केलेली नव्हती. भुकेची जाणीव नाही, तहानेची नाही एव्हढेच काय तर लघुशंकेसारख्या शरीरधर्माची पण त्या व्यक्तीला सकाळपासून गरजच वाटलेली नव्हती. हे जरा वेगळे होते. किंबहुना गाडीतल्या कुणीही त्या व्यक्तीला जिवंत हालचाल करताना बघितलेले नव्हते. हळूहळू आमच्या बे मध्ये कोचमधल्या सगळ्यांची गर्दी सुरू झाली. बेडरोल आणून दिणा-या कोच अटेंडंटने सांगितले की हा माणूस पहाटे पहाटे दुर्गला गाडीत बसला आणि बेडरोल मिळताच झोपून गेला. अगदी डोक्यावरून पांघरूण घेऊन. त्यानंतर कुणीही त्याला जिवंत पाहिले नव्हते. पांढरी चादर डोक्यापर्यंत ओढून झोपलेला त्याचा देह आता तिन्हीसांजेला पांढ-या चादरीत ठेवलेल्या मृतदेहासारखा भासायला लागला होता.

आमच्या बे मधल्या जमलेल्या लोकांनी त्या व्यक्तीला "भाईसाब, ओ भाईसाब" अशा हाका सुरू केल्यात. भारताची राष्ट्रभाषा हिंदी नाही हे कुणीही कितीही कंठशोष करून सांगितले तरी अशा बिकट प्रसंगी भारतभर हिंदीचाच आश्रय घेतला जातो हे सत्य आहे. त्यात सुदूर केरळ आणि तामिळनाडूचाही अपवाद नाही. तो माणूस ढिम्म हलेना. मग जमलेल्या मंडळींचे त्याचा श्वास सुरू आहे का याचा अंदाज बांधणे सुरू झाले. अर्थात दुरूनच. त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोक्यावरची चादर दूर करून बघण्याचे कुणाचेही धैर्य नव्हते. ’पोलिसकेस’ या शब्दाचे भय जनमानसात किती खोल रुतून बसलेय याची आणखी एकदा प्रतिती आली. 

नाशिक स्टेशनवर टीटीईंना वर्दी मिळाली. पुन्हा त्या माणसाच्या नावाने हाकारे सुरू झालेत. पण उपयोग काहीच नाही. इगतपुरीला पोलिस येतील अशी वार्ता मिळाली. दुपारपर्यंत अज्ञानात सुख मानून त्या व्यक्तीसोबत बिनधोक प्रवास करणारे आम्ही आता मात्र शंका कुशंकांनी अस्वस्थ झालेलो होतो. आमचे बर्थस सोडून त्याच कोचमध्ये इतरत्र बसायला गेलेलो होतो. इगतपुरी येण्याची इतकी वाट आमच्यापैकी कुणीही त्यापूर्वी बघितलेली नसेल.

इगतपुरीला दोन तीन पोलिस कोचमध्ये शिरले. त्या व्यक्तीच्या डोक्यावरचे पांघरूण त्यांनी खसकन ओढले आणि त्याला हलवले. तसा तो माणूस जागा झाला. डोळे उघडताच इतकी गर्दी डोळ्यासमोर पाहून थोडा बावरला. भानावर यायला त्याला थोडा वेळच लागला आणि नंतर पोलिसांच्या प्रश्नांची सरबत्ती आणि कोचमधल्या गर्दीतले सल्ले, टोमणे, हशा यात तो आणखीनच बुजला. पोलिस निघून गेलेत. गाडी कसा-याचा घाट उतरू लागली आणि त्याने आपली हकीकत सुरू केली. 

तो कुणीतरी मुंबईच्या खाजगी कंपनीत मार्केटिंगमधला कर्मचारी होता. गेल्या सतत तीन रात्री त्याची झोप अपुरी आणि वेळीअवेळी करत असलेल्या प्रवासात साचलेली होती. त्याच्या प्रवासातला शेवट्ला टप्पा दुर्गे ते मुंबई असा होता. त्यात त्याने तो झोपेचा बॅकलॉग भरून काढण्याचे ठरविले आणि पहाटे दुर्गला गाडीत चढल्या चढल्या तो गाढ झोपी गेला. खरेतर त्याला स्वतःला इतके गाढ झोपायचे नव्हतेही. साधारण ८ - ९ तास झोपून भुकेच्या वेळी उठू असे त्याने ठरविले होते. पण साचलेल्या झोपेने आणि थकव्याने त्याच्या तहान भुकेवर आणि शरीरधर्मावरही मात केली होती. जशीजशी त्याच्यामुळे संपूर्ण कोचमध्ये उडालेल्या गोंधळाची त्याला जाणीव होत होती तसातसा तो अधिक ओशाळत चालला होता. आता त्याची झोप पूर्णपणे उडालेली होती. 

इकडे आम्ही मात्र त्याच्या या परिस्थितीची कीव करावी की हसावे की त्याच्यावर चिडावे की त्याच्याशी सहानुभूती दर्शवावी अशा व्दिधा, त्रिधा चतुर्विधा मनस्थितीत सापडलेलो होतो. पण एक मात्र नक्की इतक्या वर्षांनंतरही तो प्रवास आमच्या अगदी तपशीलवार स्मरणात राहिला. प्रवास नित्याचाच पण असा अनुभव मात्र एकमेकाव्दितीय.


- एक सजग रेल्वेफ़ॅन, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.