Saturday, February 25, 2023

वज्र, इंद्र आणि गरीब रथ : महाराष्ट्र एस. टी. ने घ्यावयाचा बोध.

 आपली महाराष्ट्र एस टी कल्पक आणि नवनवीन प्रयोगांच्यात कमी पडते.

लालूप्रसाद यादवांनी भारतीय रेल्वेत "गरीब रथ" हा प्रयोग आणून क्रांति घडवून आणली. रेल्वेच्या एसी थ्री टायरपेक्षा कमी पण शयनयान वर्गापेक्षा जास्त भाडे घेणारी ही सेवा. जेवढ्या गरीब रथ गाड्या देशात सध्या सुरू आहेत त्या सगळ्या फायद्यात चालताहेत.
एस टी ने ही नवीन एम एस बस बांधणी करताना "गरीब रथ" बस बांधावी. 3 x 2 , नाॅन पुशबॅक, बैठक व्यवस्था (एकूण ५५ प्रवासी + १ वाहक केबिनमध्ये) असलेली एयर सस्पेंशन वातानुकूल बससेवा तालुक्याच्या गावांना जिल्ह्याच्या गावाला जोडणारी किंवा दोन आसपासच्या जिल्ह्यांना जोडणारी असावी. (फार लांब पल्ल्याची नसावी.)



तिकीट दर जलद बसपेक्षा १० % जास्त पण निम आरामपेक्षा कमी ठेवावा.
ज्या मार्गांवर खाजगीवाले लोकांना निम्न दर्जाचे समजून वातानुकूल सेवा टाकत नाहीत, त्या मार्गांवर ही सेवा तुफान चालेल. (उदाः हिंगणघाट - नागपूर, पांढरकवडा - नागपूर)
आजकाल सगळ्याच ऋतूंमध्ये वातानुकूल प्रवासाचा कल लोकांमध्ये वाढतोय. धुळीचा, बाहेरील आवाजाचा त्रास न होता शांत प्रवास हा प्रवाशांची पसंती बनलाय. अशावेळी पटकन हालचाल करून पुन्हा मार्केट कॅप्चर करणे एस. टी. ला शक्य आहे.
शेजारील तेलंगण आणि आंध्र राज्यात "वज्र" आणि "इंद्र" या ब्रँडनावाने हा वातानुकूल साध्या बसचा प्रयोग यशस्वी होताना दिसतोय. तामिळनाडूने ही साध्या वातानुकूल बसेसचा प्रयोग केलेला आहे.
आपल्या महामंडळाने बोध घ्यावा.
तुम्हाला काय वाटतय मित्रांनो ?

- बसफ़ॅन राम किन्हीकर

Saturday, February 11, 2023

छोट्या संस्काराची मोठी गोष्ट

महाविद्यालयीन जीवनात घरापासून 1100 किमी दूर कराडला आम्ही सगळे नागपूरकर गेलोत. पहिल्यांदाच नागपूरपासून, आईवडीलांपासून इतक्या दूर आम्ही बहुतेक मुले गेलेलो होतो. प्रथम वर्ष तर घरच्या वारंवार येणा-या आठवणीत आणि दरवेळी नागपूरवरून महाराष्ट्र एक्सप्रेसने कराडला जाताना 25 तासांच्या प्रवासातले पुण्यानंतरचे 5 तास "पुढल्या वेळी लांब सुटी कधी ?" आणि मग "नागपूर / विदर्भात कधी परतायचे ?" या मनाला आल्हाददायक चर्चेत जायचेच जायचे. "दिलको बलहाने के लिए गालिब, खयाल अच्छा है." या ओळींशी परिचय व्हायचा होता पण आम्ही तेच जगत होतो.


मग द्वितीय वर्षात थोड्या आणखी ओळखी झाल्यात. नाट्य, काव्य, कला, नकला, वक्तृत्व या क्षेत्रात मुशाफ़िरी करताना सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, पुणे, नगर ची अनेक मित्रमंडळी जोडलीत. विद्यार्थी परिषदेच्या कामानिमित्त सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे अगदी तालुका स्तरापर्यंत पिंजून काढलेत. युवक महोत्सव, विविध आंतरमहाविद्यालयीन, आंतरविद्यापिठीय स्पर्धांच्या निमित्ताने रात्री बेरात्री प्रवास घडलेत.आणि मग लक्षात आले की टिपीकल नागपूरकरांच्या / वैदर्भीय माणसांच्या धारणेनुसार जी "पुण्या - मुंबईची" म्हणून गणली गेलेली धुळे, रत्नागिरी, नगर, सातारा किंवा कोल्हापूरची मुले / मुली असतात ती पण अगदी आपल्यासारखीच असतात. आपण ज्या कुटुंबात वाढलो तशाच कुटुंबात वाढलेली, आपल्यावर झाले तसेच संस्कार झालेली, आपल्या अभ्यासाच्या सवयीसारखीच अभ्यासाची सवय असलेली, आपल्यासारखीच आजोळची ओढ असलेली, नातेसंबंधांबद्दल आस्था असलेली. 


आता नागपूरकडल्या कुणाचे आजोळ मध्यप्रदेश / छत्तीसगढ मध्ये असेल तर कोल्हापूरकडल्या कुणाचे तरी कर्नाटकमध्ये असेल. पण मूल्ये, ओढ, संस्कार अगदी एकसमान होते. माणूस म्हणून आम्ही तिथे घडलो आणि वाढलो, व्यापक झालोत, वैदर्भिय म्हणून आमचे व्यक्तित्व तिथे लोप पावले आणि महाराष्ट्रीय म्हणून आमचे व्यक्तित्व तिथे घडत गेले. खूप छान मित्र मैत्रिणी आम्ही तिथे जोडलेत. आज कराड सोडून मला 30 वर्षे झालीत तरी मोठ्या अभिमानाने मी सांगू शकतो की माझी किमान 25 तरी हक्काची घरे पश्चिम महाराष्ट्रात आहेत जिथे मी कधीही हक्काने जाऊन मुक्काम करू शकतो.


अंतिम वर्षाला असताना आम्ही दोघे तिघे आमच्या एका मैत्रिणीच्या घरी गेलो. अगदी अकृत्रिम जिव्हाळ्याने आमचे तिथे छान आगत स्वागत झाले. तिथे चहापाणी वगैरे घेऊन आम्ही पुढल्या प्रवासाला लागलो खरे पण प्रवासात चर्चा करताना आम्हाला एक गोष्ट जाणवली जी आम्ही आमच्या घरांमध्ये आजवर अनुभवली नव्हती. तिचे आई बाबा आम्हाला आणि स्वतःच्या अपत्यांनाही "बाळ" या संबोधनांनी संबोधत होते. "या हं बाळ, पुन्हा.", "बाळ, तुमचे मित्र आलेत बघा." वगैरे. आमच्या आयुष्यात आम्हाला कळायला लागल्यापासून आमच्या जन्मदात्यांनी "बाळ" हा शब्द आमच्यासाठी आम्हाला संबोधताना वापरलेला नव्हता. लाड केलेत, कौतुक केलं पण "बाळ ?" अं हं. यावर आमच्या चर्चेत आम्हा मित्रांचे एकमत झालेत. किती भारी वाटतय ना ? असेच आमचे सगळ्यांचे मत झाले. ती मैत्रीण आणि तिची भावंड याबाबतीत खूपच नशीबवान आहेत असा आमचा सूर त्यादिवशीच्या चर्चेत होता.


मला एकदम पुलंचे "पेस्तनकाका" आठवले. 


{"गा, गा ने डिकरा" पेस्तनकाकी मला म्हणाल्या. माझ्या डोक्यावरच्या पांढ-या केसांकडे पाहूनही मला "डिकरा" म्हणजे बाळ म्हणणा-या त्या म्हातारीचे मन मला मोडवेना हो. मी गायला सुरूवात केली."}



त्या घटनेचा माझ्या मनावर खोलवर संस्कार झाला असेल याची कल्पना मलाही नव्हती. त्यानंतर 7-8 वर्षांनी माझे लग्न झालेत. लग्नानंतर दीड दोन वर्षात आम्हाला कन्यारत्न प्राप्त झाले. ती मोठी झाल्यापासून तिच्या नावासमोर "बाळ" हे संबोधन मी कधी आणि कसे वापरू लागलो हे मलाही कळले नाही. माझी पत्नीही तिला याच पद्धतीने तिला संबोधू लागली. माझ्या कन्येला हे असे संबोधणे खूप आवडते हे ही आमच्या लक्षात आले. गेल्यावर्षी तिचे महाविद्यालयीन मित्र मैत्रिणी पहिल्यांदा घरी आलेले होते. त्यांना सगळ्यांना आणि त्यांच्यासमोर तिलाही आम्ही दोघे "बाळ" असे संबोधत होतो. दुस-या दिवशी तिने तिच्या मित्रमैत्रिणींनी केलेले आमचे कौतुक आम्हाला ऐकवले. ती म्हणाली, "आई, बाबा, सगळे म्हणत होते की तू किती लकी आहेस. तुला अजूनही तुझे आईबाबा "बाळा" या संबोधनाने हाक मारतात." 


तीस वर्षांनंतर अचानक एक वर्तुळ पूर्ण झाल्याची जाणीव झाली. हा सुंदर संस्कार किती वर्षांपूर्वी आणि किती अचानकपणे आपल्यावर झाला होता याची जाणीव झाली. मनात तिच्या आई वडीलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्यावर संस्कार सतत होत असतात. ते सगळे टिपून घ्यायला संवेदनशील मन आपल्याकडे हवं आणि त्याचबरोबर त्यातले चांगले तेव्हढे ठेऊन वाईट मनातून काढून टाकण्याची सदसदविवेकबुद्धी आपल्यात हवी.


- "बाळ" हे संबोधन स्वतःसाठी खूप आवडणारा, पण आता मातृ पितृ वियोगानंतर या जन्मात ते शक्य नाही याची दुःखद जाणीव असलेला पण आपल्याला जे सुख मिळाले नाही ते इतरांना तरी द्यावे या विचारांचा, बालकराम. 

Saturday, February 4, 2023

Project Based Learning, Participative Learning



या वर्षी मी माझा अत्यंत आवडीचा इलेक्टीव्ह विषय "शहरी वाहतूकीचे नियोजन" (Urban Transportation Planning) शिकवायला घेतलाय. नुसती थेअरी शिकून परीक्षेचा अभ्यास करण्यापेक्षा आपण शिकत असलेली थेअरी पायरी पायरीने अप्लाय करून आपण आपल्या नागपूर शहरासाठी अत्यंत उपयुक्त अशी जलद, परवडणारी आणि शाश्वत स्वरूपाची वाहतूक व्यवस्था विकसित करण्यासाठी प्रयत्न करू शकतो का ? हा प्रश्न मी पहिल्याच व्याख्यानात माझ्या विद्यार्थ्यांना विचारला. सगळ्यांनी ही कल्पना अगदी उचलून धरली. आणि मग शिकण्या शिकवण्याचे एक अगदी नवीनच पर्व सुरू झाले.



एखादी कल्पना मी थेअरीत समजावून सांगितली की त्याच्यावर सगळ्यांनी मिळून विचार करावा, अनेक अभिनव कल्पना मुलांकडूनच पुढे याव्यात, त्यावर साधक बाधक चर्चा, खंडन - मंडन प्रकारचा वादविवाद व्हावा आणि शेवटी या पयरीवर नक्की काय करायचे ? हे पक्के व्हावे असा आमचा शिकण्या शिकवण्याचा कार्यक्रम होतोय. मुलांच्या चर्चेदरम्यान वर्गात थोडा आवाज जास्त होतोय पण हा आवाज "गोंधळा"त बदलू नये यासाठी मुलेच काळजी घेतात. तेव्हढे ते सगळेच चाणाक्ष आहेत.


सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे नियोजन हे "वरून खाली" (Top to Bottom) असे न होता, प्रत्यक्ष शेवटच्या उपभोक्त्याचे मत, इच्छा आकांक्षा जाणून घेऊन केले तर आणि तरच ते उपयोगी आणि कार्यक्षम ठरेल असे माझे स्पष्ट मत आहे. त्यासाठी ही वर्गातली 69 मुले, त्यांच्या, त्यांच्या आसपास राहणा-या लोकांच्या इच्छा, अपेक्षा माझ्यासमोर मांडतील, त्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यांमधल्या कल्पना, त्यांचे नेमके विचार माझ्यासमोर ठेवतील आणि त्या गोष्टी लक्षात घेऊन एक अत्यंत कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आम्ही आमच्या नागपूर शहरासाठी निर्माण करू शकू असा मला विश्वास आहे. त्यासाठी जो काही वैज्ञानिक आधार, शास्त्रीय संकल्पना आणि तंत्रज्ञानाची जोड लागणार आहे ती मी वर्गात त्यांना देतोच आहे. पण त्यांच्या आणि माझ्या नेमक्या दिशेच्या प्रयत्नांनी आमचा हा उपक्रम यशस्वी होईल याची मला 100 % खात्री आहे.

- शिकण्यात - शिकवण्यात विद्यार्थी उपयोगी असे वेगवेगळे प्रयोग करू पाहणारा, त्यातून दरवर्षी स्वतःच नवीन अनुभव घेतघेत कायम तरूण राहणारा, शिक्षकी पेशात 28 वर्षे काढूनही दरवर्षी मागील वर्षीच्या नोटसवरून तसे आणि तसेच शिकवणे नाकारणारा, "बनचुके" न झालेला एक विद्यार्थी आणि शिक्षक, राम प्रकाश किन्हीकर.


 






#participative 



#learning 



#teachingandlearning 



#outcomes_based_education



#project_Based_Learning



#pbl