Saturday, February 11, 2023

छोट्या संस्काराची मोठी गोष्ट

महाविद्यालयीन जीवनात घरापासून 1100 किमी दूर कराडला आम्ही सगळे नागपूरकर गेलोत. पहिल्यांदाच नागपूरपासून, आईवडीलांपासून इतक्या दूर आम्ही बहुतेक मुले गेलेलो होतो. प्रथम वर्ष तर घरच्या वारंवार येणा-या आठवणीत आणि दरवेळी नागपूरवरून महाराष्ट्र एक्सप्रेसने कराडला जाताना 25 तासांच्या प्रवासातले पुण्यानंतरचे 5 तास "पुढल्या वेळी लांब सुटी कधी ?" आणि मग "नागपूर / विदर्भात कधी परतायचे ?" या मनाला आल्हाददायक चर्चेत जायचेच जायचे. "दिलको बलहाने के लिए गालिब, खयाल अच्छा है." या ओळींशी परिचय व्हायचा होता पण आम्ही तेच जगत होतो.


मग द्वितीय वर्षात थोड्या आणखी ओळखी झाल्यात. नाट्य, काव्य, कला, नकला, वक्तृत्व या क्षेत्रात मुशाफ़िरी करताना सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, पुणे, नगर ची अनेक मित्रमंडळी जोडलीत. विद्यार्थी परिषदेच्या कामानिमित्त सातारा, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे अगदी तालुका स्तरापर्यंत पिंजून काढलेत. युवक महोत्सव, विविध आंतरमहाविद्यालयीन, आंतरविद्यापिठीय स्पर्धांच्या निमित्ताने रात्री बेरात्री प्रवास घडलेत.आणि मग लक्षात आले की टिपीकल नागपूरकरांच्या / वैदर्भीय माणसांच्या धारणेनुसार जी "पुण्या - मुंबईची" म्हणून गणली गेलेली धुळे, रत्नागिरी, नगर, सातारा किंवा कोल्हापूरची मुले / मुली असतात ती पण अगदी आपल्यासारखीच असतात. आपण ज्या कुटुंबात वाढलो तशाच कुटुंबात वाढलेली, आपल्यावर झाले तसेच संस्कार झालेली, आपल्या अभ्यासाच्या सवयीसारखीच अभ्यासाची सवय असलेली, आपल्यासारखीच आजोळची ओढ असलेली, नातेसंबंधांबद्दल आस्था असलेली. 


आता नागपूरकडल्या कुणाचे आजोळ मध्यप्रदेश / छत्तीसगढ मध्ये असेल तर कोल्हापूरकडल्या कुणाचे तरी कर्नाटकमध्ये असेल. पण मूल्ये, ओढ, संस्कार अगदी एकसमान होते. माणूस म्हणून आम्ही तिथे घडलो आणि वाढलो, व्यापक झालोत, वैदर्भिय म्हणून आमचे व्यक्तित्व तिथे लोप पावले आणि महाराष्ट्रीय म्हणून आमचे व्यक्तित्व तिथे घडत गेले. खूप छान मित्र मैत्रिणी आम्ही तिथे जोडलेत. आज कराड सोडून मला 30 वर्षे झालीत तरी मोठ्या अभिमानाने मी सांगू शकतो की माझी किमान 25 तरी हक्काची घरे पश्चिम महाराष्ट्रात आहेत जिथे मी कधीही हक्काने जाऊन मुक्काम करू शकतो.


अंतिम वर्षाला असताना आम्ही दोघे तिघे आमच्या एका मैत्रिणीच्या घरी गेलो. अगदी अकृत्रिम जिव्हाळ्याने आमचे तिथे छान आगत स्वागत झाले. तिथे चहापाणी वगैरे घेऊन आम्ही पुढल्या प्रवासाला लागलो खरे पण प्रवासात चर्चा करताना आम्हाला एक गोष्ट जाणवली जी आम्ही आमच्या घरांमध्ये आजवर अनुभवली नव्हती. तिचे आई बाबा आम्हाला आणि स्वतःच्या अपत्यांनाही "बाळ" या संबोधनांनी संबोधत होते. "या हं बाळ, पुन्हा.", "बाळ, तुमचे मित्र आलेत बघा." वगैरे. आमच्या आयुष्यात आम्हाला कळायला लागल्यापासून आमच्या जन्मदात्यांनी "बाळ" हा शब्द आमच्यासाठी आम्हाला संबोधताना वापरलेला नव्हता. लाड केलेत, कौतुक केलं पण "बाळ ?" अं हं. यावर आमच्या चर्चेत आम्हा मित्रांचे एकमत झालेत. किती भारी वाटतय ना ? असेच आमचे सगळ्यांचे मत झाले. ती मैत्रीण आणि तिची भावंड याबाबतीत खूपच नशीबवान आहेत असा आमचा सूर त्यादिवशीच्या चर्चेत होता.


मला एकदम पुलंचे "पेस्तनकाका" आठवले. 


{"गा, गा ने डिकरा" पेस्तनकाकी मला म्हणाल्या. माझ्या डोक्यावरच्या पांढ-या केसांकडे पाहूनही मला "डिकरा" म्हणजे बाळ म्हणणा-या त्या म्हातारीचे मन मला मोडवेना हो. मी गायला सुरूवात केली."}



त्या घटनेचा माझ्या मनावर खोलवर संस्कार झाला असेल याची कल्पना मलाही नव्हती. त्यानंतर 7-8 वर्षांनी माझे लग्न झालेत. लग्नानंतर दीड दोन वर्षात आम्हाला कन्यारत्न प्राप्त झाले. ती मोठी झाल्यापासून तिच्या नावासमोर "बाळ" हे संबोधन मी कधी आणि कसे वापरू लागलो हे मलाही कळले नाही. माझी पत्नीही तिला याच पद्धतीने तिला संबोधू लागली. माझ्या कन्येला हे असे संबोधणे खूप आवडते हे ही आमच्या लक्षात आले. गेल्यावर्षी तिचे महाविद्यालयीन मित्र मैत्रिणी पहिल्यांदा घरी आलेले होते. त्यांना सगळ्यांना आणि त्यांच्यासमोर तिलाही आम्ही दोघे "बाळ" असे संबोधत होतो. दुस-या दिवशी तिने तिच्या मित्रमैत्रिणींनी केलेले आमचे कौतुक आम्हाला ऐकवले. ती म्हणाली, "आई, बाबा, सगळे म्हणत होते की तू किती लकी आहेस. तुला अजूनही तुझे आईबाबा "बाळा" या संबोधनाने हाक मारतात." 


तीस वर्षांनंतर अचानक एक वर्तुळ पूर्ण झाल्याची जाणीव झाली. हा सुंदर संस्कार किती वर्षांपूर्वी आणि किती अचानकपणे आपल्यावर झाला होता याची जाणीव झाली. मनात तिच्या आई वडीलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्यावर संस्कार सतत होत असतात. ते सगळे टिपून घ्यायला संवेदनशील मन आपल्याकडे हवं आणि त्याचबरोबर त्यातले चांगले तेव्हढे ठेऊन वाईट मनातून काढून टाकण्याची सदसदविवेकबुद्धी आपल्यात हवी.


- "बाळ" हे संबोधन स्वतःसाठी खूप आवडणारा, पण आता मातृ पितृ वियोगानंतर या जन्मात ते शक्य नाही याची दुःखद जाणीव असलेला पण आपल्याला जे सुख मिळाले नाही ते इतरांना तरी द्यावे या विचारांचा, बालकराम. 

No comments:

Post a Comment