Wednesday, August 31, 2022

देवाचिये द्वारी - ५३

 


कर्ममार्गे उपासना मार्ग I ज्ञानमार्ग सिद्धांत मार्ग I

योगमार्ग वैराग्यमार्ग I ऐकत जावे II

 

नवखंडे चौदा भुवने I अष्ट दिग्पाळांची स्थाने I

नाना वने उपवने गहने I कैसी ते ऐकावे II

 

गण गंधर्व विद्याधर I येक्ष किन्नर नारद तुंबर I

अष्ट नायका संगीत विचार I कैसा तो ऐकावा II

 

कैशा नवविधा भक्ती I कैशा चतुर्विधा मुक्ती I

कैसी पाविजे उत्तम गती I ऐसे हे ऐकावे II

 

ऐसे श्रवण सगुणाचे I अध्यात्मनिरूपण निर्गुणाचे I

विभक्ती सांडून भक्तीचे I मूळ शोधावे II

 

ऐसे हे अवघेचि ऐकावे I परंतु सार शोधून घ्यावे I

असार ते जाणोनि त्यागावे I या नाव श्रवण भक्ती II

 

 

ग्रंथराज श्रीमद दासबोधाच्या नवविधा भक्ती नावाच्या चौथ्या दशकाच्या श्रवणभक्ती नावाच्या पहिल्या समासात श्रीसमर्थ सर्वसामान्य मनुष्यांनी श्रवणभक्ती नेमकी कशी करावी हे सविस्तर सांगताहेत. नेमके काय ऐकावे आणि ऐकल्यानंतर त्यातले नेमके काय घ्यावे यावर श्रीसमर्थांचा विशेष कटाक्ष आहे हे जाणवते.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद शुद्ध चतुर्थी, गणेश चतुर्थी शके १९४४ , दिनांक ३१/०८/२०२२)


Tuesday, August 30, 2022

देवाचिये द्वारी - ५२

 


जयास वाटे सुखाचि असावे I तेणे रघुनाथ भजनी लागावे I

स्वजन सकलहि त्यागावे I दुःखमूळ जे II

 

विषयजनित जे जे सुख I तेथेचि होते परमदुःख I

पूर्वी गोड अंती शोक I नेमस्त आहे II

 

गळ गिळिता सुख वाटे I वोढून घेता घसा फ़ाटे I

का ते बापुडे मृग आपटे I चारा घेऊन पळता II

 

तैसी विषये सुखाची गोडी I गोड वाटे परी ते कुडी I

म्हणौनिया आवडी I रघुनाथी धरावी II

 

 

इंद्रियगम्य सुखाच्या अनुभवामागे जे जे प्राणी लागले त्यांची त्यांची अवस्था गळाला लागलेल्या माशासारखी होते म्हणून ऐंद्रियजन्य सुखामागे न धावता जे प्रभू श्रीराम हे अविनाशी तत्व आहे त्याची कांक्षा सर्वसामान्य मनुष्यमात्रांनी करावी हे कळकळीचे प्रतिपादन श्रीसमर्थ करताहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद शुद्ध तृतीया, हरितालिका, शके १९४४ , दिनांक ३०/०८/२०२२)


Monday, August 29, 2022

देवाचिये द्वारी - ५१


 

बहुतेक आवर्ती पडिले I प्राणी वाहातचि गेले I

जे हि भगवंतासी बोभाईले I भावार्थबळे II

 

देव आपण घालून उडी I तयासी नेले पैलथडी I

येर ते अभाविक बापुडी I वाहातचि गेली II

 

भगवंत भावाचा भुकेला I भावार्थ देखोन भुलला I

संकटी पावे भाविकाला I रक्षितसे II

 

सतत जनन आणि मरण या प्रवाहात सर्वसामान्य प्राणी वाहतच जातात पण मनातल्या शुद्ध भावाने जे भाविक भगवंताला आळवतात त्यांच्यासाठी भगवंत स्वतः त्या प्रवाहात उडी घालून त्या भाविकाला जन्म मरणाच्या फ़े-यातून मुक्त करतात. भगवंत हा केवळ भावाचा भुकेला आहे हे श्रीसमर्थ या वैराग्यनिरूपण नावाच्या समासात प्रतिपादन करताहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद शुद्ध द्वितीया, शके १९४४ , दिनांक २९/०८/२०२२)

Sunday, August 28, 2022

देवाचिये द्वारी - ५०

 


सरता संचिताचे शेष I नाही क्षणाचा अवकाश I

भरता न भरता निमिष्य I जाणे लागे II

 

होता मृत्यूची आटाटी I कोणी न घालू सकती पाठी I

सर्वत्रांस कुटाकुटी I मागे पुढे होतसे II

 

मृत्यू न म्हणे हा भूपती I मृत्यू न म्हणे हा चक्रवर्ती I

मृत्यू न म्हणे हा करामती I कैवाड जाणे II

 

मृत्यू न म्हणे कार्यकारण I मृत्यू न म्हणे वर्णावर्ण I

मृत्यू न म्हणे हा ब्राह्मण I कर्मनिष्ठ II

 

एखाद्या जीवाचे या भूतलावरचे कार्य संपले की एक क्षणार्धही वेळ न लावता मृत्यू त्या जीवाला उचलून नेतो. अशावेळी कुणीही त्या जीवाला पाठीशी घालू शकत नाही. मृत्यूजवळ राजा, सम्राट सगळे सगळे अगदी समान असतात. तो त्या जीवाला नेताना वर्णाप्रमाणे, कर्माप्रमाणे भेदभाव करीत नाही, एखाद्याचे कुठले कार्य या पृथ्वीतलावर अपूर्ण राहिले हे जाणून त्या जीवाला जास्तीचा वेळ देत नाही.

 

ग्रंथराज श्रीमद दासबोधाच्या तिस-या दशकाच्या मृत्यूनिरूपण नावाच्या नवव्या समासात श्रीसमर्थ सर्वशक्तीमान मृत्यूचे सामर्थ्य आणि इहलौकिकाची देहापर्यंतच असलेली सीमा वर्णन करून सांगताहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद शुद्ध प्रतिपदा, शके १९४४ , दिनांक २८/०८/२०२२)


Saturday, August 27, 2022

पोळा

 दरवर्षी पोळा, तान्हा पोळा आला की बाहेर पाऊस असो किंवा नसो, मनात आठवणींचा पाऊस बरसू लागतो.

पोळ्याच्या दुसर्या दिवशी विदर्भात तान्हा पोळा असतो. बालगोपाल आपापले लाकडी बैल घेऊन त्यात खूप उत्साहाने सामील होत असतात. दरवर्षी या एकाच दिवशी हे लाकडी बैल माळ्यावरून अडगळीतून निघत असल्याने दरवर्षी त्यांची रंगरंगोटी अपरिहार्य असते. पोळ्याच्या एकदोन दिवस आधीपासून हे रंगरंगोटीचे काम सुरू होते. नागपुरातल्या महाल भागात या हंगामी व्यवसायासाठी खूप तात्पुरती दुकाने लागत असतात.
महाल भागात, कोतवालीजवळ आमच्या पितामहांनी १९५० मध्ये स्थापन केलेले एक बुक बाइंडिंगचे छोटेसे दुकान होते. त्या दुकानासमोरच्या अंदाजे २५ स्क्वेअर फूट जागेत आमचे तीर्थरूप दादा मला (साधारण वय वर्षे ९- १०) आणि माझ्या धाकट्या भावाला (साधारण वय वर्षे ६ - ७) घेऊन बैल रंगविण्याचे दुकान टाकीत असत.
खाली मोठे पोते अंथरलेले. त्यावर रंगविण्यासाठी आलेले लाकडी बैल. छोटा भाऊ त्यांना सबंध पांढर्या रंगात रंगवणार. ते वाळल्यावर त्यांना मी झूल, वेसण, शिंगे रंगवणार आणि ते वाळल्यानंतर मग आमचे दादा त्याच्यावर झुलीवरचे बारीक डिझाईन, त्यावरची सोनेरी वेलबुट्टी, बैलांचे बेगड, बैलांचे डोळे वगैरे बारीक रंगकाम त्यांच्या विलक्षण कौशल्याने करणार. त्यांची हस्तकला, रंगसंगतीची कलादृष्टी इतकी विलक्षण होती की काही तासांमध्येच त्यांची ख्याती पूर्ण बाजारात पसरत असे आणि आमच्या दुकानाभोवती खूप गर्दी होत असे. कधीकधी गर्दी इतकी वाढत असे की त्यातले काही बैल रंगकामासाठी आम्हाला आमच्या घरी घेऊन जाऊन रात्री रंगवावे लागत.
दोनतीन दिवस सकाळी ८.०० ते रात्री ८.०० असे अविरत काम केल्यानंतर आम्ही तान्ह्या पोळ्याच्या दुपारी ४ वाजता दुकान आटोपते घेऊन आमच्या घरच्या तान्ह्या पोळ्याच्या तयारीला लागत असू. त्याकाळचे २००, २५० रूपये नफा सहज होई. एवढा नफा पुढे येणार्या गणपती - महालक्ष्म्यांच्या खर्चाला पुरवठ्याला येई. घरच्या आर्थिक ओढाताणीला आपण काहीतरी उपयोगी पडू शकतो ही जाणीव आमच्या इवल्याइवल्या छात्या उगाचच रूंद करून जाई.
काल सहज महालात गेलो तेव्हा हे असे नंदीबैल विकणारा विक्रेता दिसला. मन ४० - ४२ वर्षे भूतकाळात गेले.
फोटो काढताना फोटो धूसर आलाय असे वाटले. फोन जुना झालाय, कॅमेरा क्वालिटी घसरलीय असे वाटून गेले पण घरी येऊन पुन्हा मोबाईल गॅलरीत फोटो पाहिल्यानंतर कळले की कॅमेरा धूसर नव्हता तर आपल्या वडीलांच्या आईच्या, आपल्यासाठी काढलेल्या, कष्टांच्या आठवणींनी डोळेच पाणावले होते आणि भूतकाळात गेलेले मन धूसर झाले होते.
- स्पष्ट आठवणींचा आणि जाणिवेचा, धूसर राम.

देवाचिये द्वारी - ४९

 


गर्भी म्हणे सोहं सोहं I बाहेरी पडता म्हणे कोहं I

ऐसा कष्टी जाहला बहु I गर्भवासी II

 

दुःखा वरपडा होता जाला I थोरा कष्टी बाहेर आला I

सवेंच कष्ट विसरला I गर्भवासाचे II

 

सुंन्याकार जाली वृत्ती I काही आठवेना चित्ती I

अज्ञाने पडली भ्रांति I तेणे सुखचि मानिले II

 

देह विकार पावले I सुखदुःखे झळंबले I

असो ऐसे गुंडाळले I मायाजाळी II

 

प्रत्येक जीव गर्भात असेपर्यंत त्याला स्वतःच्या स्वरूपाचे, स्वतःच्या आणि परमेश्वराच्या एकरूपतेचे ज्ञान असते. "सोहम" (मीच तो) हा त्याचा विचार आणि उदगार असतो. पण एकदा आईच्या गर्भातून तो जीव बाहेरच्या जगात आला की त्यावर जगाचा परिणाम होऊन तो आपले मूळ स्वरूप विसरून जातो आणि "कोहम" (कोण बरे मी ?) या भ्रांतीत पडतो. गर्भावस्थेतला पूर्ण जीव या जगात आल्यानंतर अपूर्णत्व पावतो. त्याला पूर्वजन्मीचे ज्ञान, या जन्माचे प्रयोजन काहीही आठवत नाही. या जगाला, या जगातल्या देहस्वरूपी अज्ञानालाच तो सुख मानतो आणि काम क्रोधादि विकारांनी गुंडाळले की या माया चक्रात अडकून जातो.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण अमावास्या, पोळा, शके १९४४ , दिनांक २७/०८/२०२२)


Friday, August 26, 2022

मातृदिन

 १९७७ सालाचा ऑगस्ट महिना असावा. शाळेचा आत्यंतिक कंटाळा असणारा एक मुलगा पहिल्या वर्गातून त्याच्या वर्गशिक्षिका बाईंची नजर चुकवून मध्येच पळाला आणि शाळेबाहेर थांबून घरी जाण्यासाठी रिक्षा शोधू लागला. शाळेतून अशाप्रकारे पळण्याचा हा त्याचा काही पहिला अनुभव नव्हता. त्यापूर्वीही घराजवळच्या बालकमंदिरात त्याला घालण्याचे दोन तीन प्रयत्न त्याने हाणून पाडले होते. बालकमंदिरात त्याला सोडून त्याची आई परत फिरली की तो बालकमंदिरातल्या बाईंच्या आणि घरी परतणाऱ्या आईच्याही नकळत घरापर्यंत परतत असे. फक्त त्यांच्या तत्कालीन वाड्यासमोर एक सांडपाण्याची नाली होती ती ओलांडणे त्याला शक्य होत नसे. तिथे पोहोचून तो आईला आवाज देत असे. असे प्रकार दोनतीन वेळा झाले त्यामुळे त्याला बालकमंदिरात पाठविण्याचा नाद त्याच्या पालकांनी सोडून दिला.

तसा तो मुलगा बालपणापासूनच चंट , चुणचुणीत, चुरूचुरू बोलणारा. फक्त शाळेचा त्याला भयंकर कंटाळा. त्यामध्ये अभ्यासाच्या कंटाळ्यापेक्षाही शाळेच्या वेळात आपल्या अत्यंत लाडक्या आईचा होणारा विरह हेच मुख्य कारण असावे कारण नंतर समज आल्यानंतर त्याने शाळेत पहिला नंबर कधीच सोडला नव्हता. त्याच्या चुणचुणीतपणावर विश्वास ठेवूनच त्याच्या आईवडिलांनी वयाच्या सहाव्या वर्षी नागपूर ते चंद्रपूर हा आजोळचा प्रवास संध्याकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत एस टी बसमध्ये अगदी एकट्याने करण्याइतपत त्याच्यावर विश्वास टाकला होता.
पण आता मात्र तो शाळेतून पळाला होता आणि त्याने घरी येण्यासाठी एक सायकल रिक्षाही ठरवली. रिक्षात बसून मोठ्या ऐटीत घरी जात असताना रिक्षावाल्याने त्याला विचारले असावे, " बाबू, कामून पळत गा ? अन कोठीसा जाच हाय तुले ? " त्यान पत्ता वगैरे व्यवस्थित सांगितला आणि म्हणाला , "काका, मला शाळा आवडत नाही. मी पायीपायी सुद्धा घरी जाऊ शकतो पण मध्ये तो सेंट्रल एव्हेन्यू रस्ता आहे ना तिथे खूप ट्रक बस वगैरे वेगाने येत जात असतात. मला तिथे काही अपघात झाला आणि समजा मी मेलो तर माझी आई माझ्यासाठी घरी अन्नपाणी घेणार नाही आणि ती पण आपला प्राण देईल. म्हणून तुमच्या रिक्षात मी येतोय.
इसवी सन १९८९. ऑगस्ट. हाच मुलगा १२ वीनंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ११०० किमी दूर असलेल्या गावी निघाला होता. त्यावेळी त्याच्या जाण्याच्या दोन दिवसांपासून त्याच्या आईच्या डोळ्यातले पाणी खळता खळत नव्हते. त्यानेही "आपण आता मोठे झालोत. छे ,आता असे रडणे आपल्याला शोभणार नाही" म्हणून सावरलेला बांध शेवटी त्याच्या प्रवासाच्या दिवशी फुटला होता. प्रवासाला निघण्यापूर्वी मायलेक एकमेकांच्या गळ्यात पडून रडले होते. तिला मुलगी नव्हती त्यामुळे मुलीच्या लग्नानंतर तिच्या पाठवणीचा समारंभ तिने असा जगून घेतला असावा.
तिच्या विरहाची कल्पनाही सहन न होणारा आणि स्वतःच्या जाण्यानंतर ती पण प्राण त्यागेल तर कसे होईल ? म्हणत कासावीस होणारा मुलगा मोठा झाला. आज ती जाऊन ४ महिने झालेत तरी तो मात्र अजूनही जिवंतच आहे. त्याचे स्मशानवैराग्य महिना, सव्वा महिना टिकले पण आता त्याच्यासकट सगळ्यांची जगरहाटी पूर्वीसारखीच सुरू झाली. "कुणाचेच आईवडील आयुष्याला पुरत नाहीत." "नैनं छिन्दन्ति शस्त्राणि" हे सगळं माहिती असलेला, क्वचित आपल्या प्रवचनांमधून तसा उपदेश करणारा तो मुलगा मात्र आजही आपली १९७७ मधली निरागसता, प्रेम शोधतो आहे आणि "आपण मोठे होऊन नेमके काय कमावले ? आणि काय गमावले ? याचा हिशेब मांडतो आहे.
- प्रेमाच्या बाबतीत कायम बेहिशेबी पण कृतज्ञ असलेला, भावनाप्रधान हृदयाचा आणि कायम बालक राहण्याची आकांक्षा बाळगणारा गृहस्थ, राम प्रकाश किन्हीकर.

देवाचिये द्वारी - ४८

 


पोटी घालिता दिव्यान्न I काही विष्ठा काही वमन I

भागिरथीचे घेता जीवन I त्याची होये लघुशंका II

 

एवं मळ मूत्र आणि वमन I हेचि देहाचे जीवन I

येणेचि देह वाढे जाण I यदर्थी संशय नाही II

 

निर्मळपणे काढू जाता I तरी देह पडेल तत्वता I

एवं देहाची विवशता I ऐसी असे II

  

ग्रंथराज श्रीमत दासबोधाच्या तिस-या दशकाच्या पहिल्या समासात जन्मदुःखनिरूपण हाच प्रतिपाद्य विषय असल्याने श्रीसमर्थ हा देहाचे विवशपण आपल्यासमोर मांडताहेत. कितीही उत्तम खाल्ले, प्यायले तरी त्याचे रूपांतर मळ, मूत्र आणि वमनासारख्या त्याज्य गोष्टींमध्येच होते. ह्या त्याज्य गोष्टी शरीरात इतक्या ठाण मांडून बसलेल्या आहेत की त्यांना आपल्या या शरीरातून पूर्णपणे विसर्जन करणे शक्यच नाही.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण कृष्ण चतुर्दशी, शके १९४४ , दिनांक २६/०८/२०२२)


Thursday, August 25, 2022

देवाचिये द्वारी - ४७

 


जन्म दुःखाचा अंकुर I जन्म शोकाचा सागर I

जन्म भयाचा डोंगर I चळेना ऐसा II

 

जन्म कुविद्येचे फ़ळ I जन्म लोभाचे कमळ I

जन्म भ्रांतीचे पडळ I ज्ञानहीन II

 

जन्म जीवाचे मीपण I जन्म अहंतेचा गुण I

जन्म हेचि विस्मरण I ईश्वराचे II

 

आपण सगळे जण जन्माचा आनंद आणि मृत्यूचे दुःख करतो पण श्रीसमर्थांसारख्या विरक्त, विरागी पुरूषाने प्रत्येक जन्म हेच नवनवे कर्माचे आणि कर्मानुलेपनाचे आणि त्याद्वारे होत राहणा-या वारंवार जन्ममरणाच्या दुःखाचे कारण आहे हे प्रतिपादन करून जन्म कसा आहे याचे सविस्तर विवरण केलेले आहे. या जन्मात येऊन जर ईश्वराचे विस्मरण झाले, आपल्या मीपणाचेच, देहाचेच जर चिंतन झाले तर त्या मनुष्याचा जन्म हेच एक मोठे दुःख आहे हे श्रीसमर्थांना येथे सांगावयाचे आहे. 

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण कृष्ण त्रयोदशी, शके १९४४ , दिनांक २५/०८/२०२२)


Wednesday, August 24, 2022

देवाचिये द्वारी - ४६

 


विरक्ते अभ्यास करावा I विरक्ते साक्षेप धरावा I

विरक्ते वक्तृत्वे उभारावा I मोडला परमार्थ II

 

विरक्ते विमळ ज्ञान बोलावे I विरक्ते वैराग्य स्तवीत जावे I

विरक्ते निश्चयाचे करावे I समाधान II

 

विरक्ते उपाधी करावी I आणि उदास वृत्ती न संडावी I

दुराशा जडो नेदावी I कोणयेक विषयी II

 

 ग्रंथराज श्रीमत दासबोधाच्या दुस-या दशकाच्या विरक्तलक्षण नावाच्या नवव्या समासात श्रीसमर्थ समाजातल्या विरक्त पुरूषाचे लक्षण निवेदन करत आहेत. जो विरक्त आहे त्याने आपल्या अभ्यासाने, वक्तृत्वाने समाजात मोडल्या गेलेले परमार्थाचे वर्चस्व प्रस्थापित करावे. विरक्त पुरूषाने समाजाला शुद्ध ज्ञानाचा उपदेश करावा, वैराग्याचा प्रसार करावा आणि कुठल्याही लौकिक वस्तूविषयी स्वतः तर दुराशा धरूच नये पण समाजालाही त्यापासून विन्मुख करावे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण कृष्ण द्वादशी, शके १९४४ , दिनांक २४/०८/२०२२)


Tuesday, August 23, 2022

देवाचिये द्वारी - ४५

 


विरक्ते विवेके असावे I विरक्ते अध्यात्म वाढवावे I

विरक्ते धारिष्ट धरावे I दमन विषई II

 

विरक्ते राखावे साधन I विरक्ते लावावे भजन I

विरक्ते विशेष ब्रम्हज्ञान I प्रगटवावे II

 

विरक्ते भक्ती वाढवावी I विरक्ते शांति दाखवावी I

विरक्ते येत्ने करावी I विरक्ती आपुली  II

 

विरक्ते सदक्रिया प्रतिष्ठावी I विरक्ते निवृत्ती विस्तारावी I

विरक्ते नैराशता धरावी I सदृढ जिवेसी II

 ग्रंथराज श्रीमत दासबोधाच्या दुस-या दशकाच्या विरक्तलक्षण नावाच्या नवव्या समासात श्रीसमर्थ समाजातल्या विरक्त पुरूषाचे लक्षण निवेदन करत आहेत. जो विरक्त आहे त्याने विवेक धरून अध्यात्म वाढवावे, अध्यात्माचे जे साधन त्याला कळले ते समाजात वाढेल अशी कृती करावी, समाजाला भजनाकडे प्रवृत्त करावे, चांगल्या कर्माकडे समाजाचा कल वाढेल असे प्रयत्न करावेत आणि समाजमनाला शांतीचा दाखला आपल्या आचरणातून द्यावा. मनुष्यमात्रांच्या स्वाभाविक वृत्तीपाठीमागे न जाता त्याउलट भगवंताकडे जाण्याची निवृत्ती विरक्त मनुष्याने प्रतिपादन करावी अशी अपेक्षा श्रीसमर्थ विरक्तांकडून करत आहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण कृष्ण एकादशी, शके १९४४ , दिनांक २३/०८/२०२२)


Monday, August 22, 2022

देवाचिये द्वारी - ४४

 


परपीडेचे वाही दुःख I परसंतोषाचे सुख I

वैराग्य देखोन हरिख I मानी तो सत्वगुण II

 

परभूषणे भूषण I परदूषणे दूषण I

परदुःखे सिणे जाण I तो सत्वगुण II

 

सत्वगुणे भगवद्भक्ती I सत्वगुणे ज्ञानप्राप्ती I

सत्वगुणे सायोज्यमुक्ती I पाविजेते II

 

 

सत्वगुणी मनुष्य दुस-या जीवांना स्वतः दुंख देणे तर सोडूनच द्या पण दुस-या जीवांना इतर काही कारणांनी दुंख झाले तरी स्वतः दुखावतो, इतरांच्या सुखात स्वतः सुखावतो, एखाद्याचे वैराग्य पाहून त्याला मनोमन आनंद होतो. असा हा सत्वगुणी मनुष्य दुस-यांची स्तुती करण्यात आनंद मानतो आणि दुस-यांची निंदा करण्यात दूषण मानतो त्या मनुष्याला खरी ज्ञानप्राप्ती होऊन सायुज्यमुक्ती मिळते असे श्रीसमर्थ आपल्याला निवेदन करताहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण कृष्ण एकादशी, शके १९४४ , दिनांक २२/०८/२०२२)


Sunday, August 21, 2022

देवाचिये द्वारी - ४३

 


जयास अहंकार नसे I नैराशता विलसे I

जयापासी कृपा वसे I तो सत्वगुण II

 

सकळांसी नम्र बोले I मर्यादा धरून चाले I

सर्व जन तोषविले I तो सत्वगुण II

 

सकळ जनांसी आर्जव I नाही विरोधासी ठाव I

परोपकारी वेची जीव I तो सत्वगुण II

 

आपकार्याहून जीवी I परकार्य सिद्धी करावी I

मरोन कीर्ती उरवावी I तो सत्वगुण II

 

 

सगळ्यांशी आर्जवाने आणि नम्र बोलणारा, अहंकारी नसलेला, ज्याच्याजवळ नैराश्याचे विचार नाहीत असा सत्वगुणी मनुष्यमात्र अजातशत्रू नसला तरच नवल. आपल्या जीवनकार्याला आपल्या जीवनाहून श्रेष्ठ बनवावे म्हणजे आपले लौकिक जीवन संपल्यावरही आपली कीर्ती या जगात शिल्लक राहते (Larger Than Life) अशा पद्धतीच्या सात्विक जीवनाचे सर्वसामान्य मनुष्यांनी आचरण करावे ही श्रीसमर्थांची आंतरिक इच्छा आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण कृष्ण दशमी, शके १९४४ , दिनांक २१/०८/२०२२)


Saturday, August 20, 2022

देवाचिये द्वारी - ४२

 


जो परमार्थाचे मंडण I जो महंतांचे भूषण I

रजतमाचे निरसन I जयाचेनि II

 

जो परम सुखकारी I जो आनंदाची लहरी I

देऊनिया निवारी I जन्ममृत्यू II

 

जो अज्ञानाचा शेवट I जे पुण्याचे मूळ पीठ I

जयाचेनि सापडे वाट I परलोकाची II

 

रजोगुण, तमोगुणाचे वर्णन केल्यानंतर श्रीसमर्थ दुस-या दशकाच्या सातव्या समासात सत्वगुणाचे महत्व निवेदन करताहेत. ज्याने रजोगुण आणि तमोगुणांचे निरसन होते, जो अत्यंत सुखकारक असून मनुष्यमात्राला ख-या आनंदाचा लाभ करून देतो आणि जन्म मरणाच्या फ़े-यातून मुक्त करवितो, जो पुण्याचे मूळ असून ज्यामुळे अज्ञानाचा नाश होऊन आपल्याला ख-या अध्यात्माची वाट सापडते असा हा सत्वगुण श्रीसमर्थ वर्णन करताहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण कृष्ण नवमी, शके १९४४ , दिनांक २०/०८/२०२२)


Friday, August 19, 2022

देवाचिये द्वारी - ४१

 


परपीडेचा संतोष I निष्ठुरपणाचा हव्यास I

संसाराचा नये त्रास I तो तमोगुण II

 

भांडण लावून द्यावे I स्वये कौतुक पहावे I

कुबुद्धी घेतली जीवे I तो तमोगुण II

 

नावडे भक्ती नावडे भाव I नावडे तीर्थ नावडे देव I

वेदशास्त्र न लगे सर्व I तो तमोगुण II

 

निष्ठुरपणाने दुस-यांना पीडा देण्यात, दुस-यांमध्ये भांडणे लावून स्वतः मजा पाहण्यात, ज्या कुबुद्धी, तमोगुणी व्यक्तींचे जीवन खर्च होते त्यांना देवाची भक्ती, तीर्थे, वेद आणि शास्त्रे याविषयी साहजिकच नावड असते असे श्रीसमर्थ आपल्याला सांगताहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण कृष्ण अष्टमी, गोकुळाष्टमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी, माऊली ज्ञानेश्वर महाराज जयंती  शके १९४४ , दिनांक १९/०८/२०२२)


Thursday, August 18, 2022

"हाल्टिंग बस"

 एखाद्या तालुक्याच्या ठिकाणाहून तालुक्यातल्याच एखाद्या छोट्या गावाला जाऊन रात्री तिथेच मुक्काम करणारी बस म्हणजे "हॉल्टिंग बस" आपल्या महाराष्ट्र एस टी ने ब-याच वर्षांपासून ही संकल्पना अंमलात आणलेली आहे. दिवसभर शहरात विविध कामांसाठी भटकून संध्याकाळी उशीरा शहरातली ती कामे आटोपून गावाकडे परत फ़िरणारे गावकरी या बसचे प्रवासी असत. मधल्या ब-याच गावांवरून जाणारा मार्ग घेत घेत ही बस रात्रीपर्यंत तालुक्यात एका टोकाला असलेल्या आपल्या गंतव्य स्थळी जात असे. बसच्या चालक आणि वाहकांच्या मुक्कामाची सोय एक तर ग्रामपंचायतीत होत असे. तिथे त्यांनी सोबत आणलेल्या शिदो-यांसोबत गावातल्या एखाद्या सज्जन सदगृहस्थाकडला एखादा विशेष पदार्थ काही सणा समारंभानिमित्त त्यांच्या ताटात सन्मानाने विराजमान असे. अशा गावातल्या यात्रा, जत्रेनिमित्त असलेल्या भंडा-यातही बसच्या चालक वाहकांचा सक्रिय सहभाग असे. त्यांच्या कर्तव्याचा गावात मान असे.


सकाळी सकाळी गावातल्या तालुक्याच्या गावात, शहरात सकाळची शाळा असणा-या विद्यार्थ्यांसाठी, रोजंदारीची कामे, बिगारी कामे करणे आणि इतरही कामांसाठी शहरात लवकर जाऊ इच्छिणा-या कामगारवर्गासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त असे.


काळ बदलला. गावाकडली माणसे गावाकडला मोकळेपणा सोडून शहरातल्या बकालपणात रहायला गेली. गावाकडून शहरात जाण्यायेण्याची रोजची धडपड आणि गरज संपली. एस टी तले चालक वाहक आपल्यासारखेच मानव आहेत. त्यांचे घरदार सोडून ते बिचारे जनतेच्या सेवेसाठी अशा मुक्कामाच्या बसमध्ये येऊन अडनिड्या गावात राहताहेत ही जाणीव संपली. "त्यात काय झालं ? त्यांचे कर्तव्यच आहे ते. त्यांना पगार मिळतोय त्या कामाचा." अशी थोडी कृतघ्न व्यवहारी जाणीव बहुतांशी गावक-यांच्या मनात डोकावू लागली. एस टी च्या चालक वाहकांना त्यांच्या घरून भर दुपारी करून दिलेला डबा रात्रीपर्यंत पापडासारख्या झालेल्या पोळ्या, थंड पडलेल्या कालवणासोबत कुस्करून रात्री बेरात्री त्या दोघांमध्येच खावा लागू लागला. गाडीतलाच बाकडा उचलून त्याचा बर्थ करून डासांच्या त्रासामध्ये अपुरी झोप घ्यावी लागू लागली. आपुलकी, दुस-याच्या दुःखाची, त्रासांची जाणीव फ़क्त शहरातच आटली असे नाही, गावाकडेही तेच चित्र दिसू लागले. अन्न विक्रय सुरू झाला. भगवंतांनी सांगितलेले कलियुगाचे एकेक लक्षण 5000 वर्षांनंतर प्रत्यक्षात दिसू लागले.


26 नोव्हेंबर, 2010 चा हा फ़ोटो. 

स्थळ : कारंजा (घाडगे) {तत्कालीन राष्ट्रीय महामार्ग 6 वरचे}

वेळ : सकाळी 6 वाजून 53 मिनीटे

कारंजा तालुक्यातल्या कुठल्यातरी खेड्यातून कारंज्याला येत असलेली ही हॉल्टिंग बस. गच्च भरलेली ही बस पाहून मन पुन्हा 70 आणि 80 च्या दशकात गेले. गाडीत बसलेल्या गावक-यांची उत्सुकता वाचून मनाला खरोखर आनंद झाला. 


MH - 31 / W 9863


व. वर्धा डेपो 


वर्धा विभागातल्या डेपोंची टिपीकल काळ्या ग्रिलभोवतीची पिवळी बॉर्डर. (भंडारा विभागतल्या बसेसना याच काळात हीच बॉर्डर पांढ-या रंगाची असे. दूरून बघून बस ओळखू येई.)


3 बाय 2 आसन व्यवस्था


एकूण 54 आसने


ड्रायव्हर केबिनमागे उलट असलेला लांब बाकडा असणारी ही शेवटची सिरीज. यानंतर MH - 31 / AP या सिरीजमध्ये 400 बसेसनंतर साधारण MH - 31 / AP 94XX  सिरीजमध्ये सगळी आसने एकाच दिशेची असणारी प्रोटोटाईप बस आली आणि हा लांब बाकडा नामशेष झाला.  


TATA 1512


एखादा फ़ोटो म्हणजे नुसता फ़ोटोच नसतो. त्यामागे आठवणींचा किती कल्लोळ असतो हे ज्याचे त्यालाच ठाऊक असते.


- एस. टी वर मनापासून प्रेम करणारा आणि तिच्या कर्मचा-यांबद्दल कायम कृतज्ञ असलेला भावनाकल्लोळी माणूस, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.


देवाचिये द्वारी - ४०

 


अंतरी धरूनी कपट I पराचे करी तळपट I

सदा मस्त सदा उद्धट I तो तमोगुण II

 

कळह व्हावा ऐसे वाटे I झोंबी घ्यावी ऐसे उठे I

अंतरी द्वेष प्रगटे I तो तमोगुण II

 

युद्ध देखावे ऐकावे I स्वये युद्धचि करावे I

मारावे की मरावे I तो तमोगुण II

 

रजोगुण निरूपणानंतर श्रीसमर्थ आपल्यासमोर तमोगुणाचे भीषण स्वरूप दाखवताहेत. अंतरी कपट धरून दुस-यांचे कायम वाईट व्हावे या मस्तीत, उद्धट्पणे जगणारा मनुष्यमात्र तमोगुणी. अशा मनुष्याला सतत कुणाचे तरी भांडण व्हावे, आपण मुद्दाम द्वेषभावनेने कुणाशी तरी भांडण उकरून काढावे, युद्ध व्हावे असे वाटत असते. (आजकालच्या समस्त वृत्तवाहिन्या डोळ्यांसमोर आल्यात ना ? आपल्या समाजात या वाहिन्या किती तमोगुण पसरवत आहेत याची जाणीव श्रीसमर्थांच्या या निरूपणावरून व्हावी.)

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण कृष्ण सप्तमी शके १९४४ , दिनांक १८/०८/२०२२)