Tuesday, August 9, 2022

महाराष्ट्रातले रखडलेले रेल्वे प्रकल्प आणि सर्वसामान्य जनतेला पडलेले काही प्रश्न. - 5 (कोकण)

 यापूर्वीचे लेखांक इथे वाचा. 


महाराष्ट्रातले रखडलेले रेल्वे प्रकल्प आणि सर्वसामान्य जनतेला पडलेले काही प्रश्न. - 1 (विदर्भ)


महाराष्ट्रातले रखडलेले रेल्वे प्रकल्प आणि सर्वसामान्य जनतेला पडलेले काही प्रश्न. - 2 (मराठवाडा)





कोकणासारख्या निसर्गरम्य भागात पर्यटन आणि त्याच्यासह इत्तर बाबींचा विकास व्हावा आणि मुंबई ते मंगळुरू अंतर किमान १००० किलोमीटरने कमी व्हावे म्हणून कोकणप्रेमी रेल्वेमंत्री मधू दण्डवते यांनी कोकण रेल्वेची कल्पना मांडली आणि १९७७ ते १९८० पर्यंत जनता पक्ष सरकारच्या काळात ते रेल्वेमंत्री असताना प्रामाणिक प्रयत्नही केलेत. पण जनता पक्ष सरकार अल्पजीवी ठरले आणि हा प्रस्ताव थंड्या बस्त्यात गेला. 



१९९६ मधल्या वाजपेयी सरकारात रेल्वेमंत्री झालेल्या जॉर्ज फ़र्नांडिस यांनी मात्र हा प्रकल्प नेटाने पुढे न्यायचा ठरविला. दिवा ते रोहा मार्गे पनवेल हा मार्ग आधीपासूनच मध्ये रेल्वेकडे होता. या मार्गावर दिवा - रोहा ही पॅसेंजर गाडी आणि काही मालगाड्या यांची वाहतूक होत असे. शोले चित्रपटात दाखविलेला मालगाडीचा सीन, प्यार तो होना ही था या चित्रपटात दाखविलेला काजोल आणि अजय देवगणचा रेल्वेप्रवास हे दोन्ही पनवेल - उरण मार्गावरचे. त्याशिवाय दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे आणि इतर अनेक सिनेमात दिसलेली स्थानके ही दिवा - पनवेल मार्गावरचीच आहेत. मुंबईपासून इतक्या जवळ, शूटिंगसाठी इतके रिकामे असलेले रेल्वे स्टेशन फ़िल्लमवाल्यांना भावले नसते तरच नवल होते.



 
२६ जुलै १९९८ रोजी रोहा ते मंगळूर या ७६१ किमी रेल्वेमार्गाचे उदघाटन व लोकार्पण झाले. तोपर्यंत ८० च्या दशकात केरळातून शोरनूर मार्गे मंगळूर पर्यंत रेल्वेमार्ग येऊन पोहोचला होता आणि रोह्यापासून दासगावपर्यंत रेल्वेमार्ग आलेला होता. हजरत निझामुद्दीन ते मंगळूर मंगला एक्सप्रेस ही त्याकाळी इटारसी - नागपूर - वारंगल - विजयवाडा - इरोड - कोईंबतूर - शोरनूर - असे वळसा घालून मंगळूरपर्यंत पोहोचायची तर मुंबई - थिरूवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस ही पुणे - वाडी - गुंतकल - गुत्ती - रेणीगुंठा - इरोड - कोईंबतूर - शोरनूर असा वळसा घालायची. साधे मुंबईवरून गोव्याला रेल्वेने जायचे असेल तर पुणे - मिरज - बेळगाव - लोंडा - दूधसागर - मडगाव - वास्को द गामा असे जावे लागे. आता हा नवा मार्ग सर्वांना सोयीचा ठरणार होता. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी मराठी जनांनी विशेषतः कोकणी माणसांनी खूप पाठपुरावा केला होता, खूप स्वप्ने पाहिली होती.



 
या मार्गावरचा रेल्वेमार्ग हा १६० किमी प्रतितास या वेगाने प्रवास करण्याजोगा राहील अशी घोषणा झाली होती आणि त्यादृष्टीने WDP 4 या डिझेल एंजिनाच्या गाडीसह काही चाचण्याही १९९७ मध्ये केल्या गेल्याचे स्मरते. भारतातला अत्याधुनिक असा पहिला खडीविरहीत रेल्वेमार्ग (ballast less track)  हा असेल अशी घोषणाही या निमित्ताने केली गेली होती. करबुडे चा ६.५० किमी चा आशियातला दुसरा नंबरचा बोगदा, पानवलचा ९४ मी (कुतूबमिनार फ़क्त ७३ मीटर उंचीचा आहे) उंचीचा दरीवरील पूल ही सगळी या प्रकल्पाची एकमेवाद्वितीय वैशिष्ट्ये कोकणी माणसाचा ऊर अभिमानाने भरून टाकत होती.
 
पण प्रकल्प पूर्ण झाला आणि भारतीय रेल्वेचे मराठी माणसाविषयीचे "प्रेम" पुन्हा दिसू लागले. या प्रकल्पाला लागलेला खर्च वसूल करण्यासाठी या मार्गावरील प्रत्यक्ष अंतराला ४० % अधिक करून त्यावर तिकीटे आकारल्या जाऊ लागली. म्हणजे १०० किमी प्रवास अंतरासाठी १४० किमी चे भाडे भरावे लागू लागले. त्याचेही काही नाही, मराठी माणसाने आपल्या स्वप्नपूर्तीच्या आनंदात हा अधिकचा भार सहनही केला असता पण या मार्गावरच्या गाड्या तर कोकणात थांबायला हव्यात ना ? चिपळूण, रत्नागिरी आणि कणकवली ही स्थानके सोडलीत तर नेत्रावती, मत्स्यगंधा, मंगला या गाड्या कुठेच थांबेनात. कोकणी माणसाचे नाव घेऊन तटवर्ती कर्नाटक आणि केरळ इथल्या रहिवाश्यांची मुंबई गाठण्याची सोय बघितली गेली. मुंबई - मडगाव जनशताब्दी ही तरी कोकणी माणसाच्या हक्काची गाडी असायला हवी होती पण तिचेही गाणे तेच. ठाणे - पनवेल - चिपळूण - रत्नागिरी - कुडाळ - कणकवली हेच थांबे.
 
दादर - रत्नागिरी (आता दादर - सावंतवाडी) पॅसेंजर सोडली तर कोकणी माणसाच्या कैवाराची एकही गाडी या मार्गावर नव्हती. एका गाडीत किती जणांची सोय बघणार ? आता कोकण कन्या आणि मांडवी एक्सप्रेस ही तशा लेकुरवाळ्या गाड्या आहेत पण इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या अपेक्षांना त्या कशा आणि कुठवर पु-या पडणार ?



 
या ७५० किमीच्या रेल्वेमार्गावर निसर्गानेही अन्याय केलाय. कोकणातला हलका, मऊ असा जांभ्या दगड, दर पावसाळ्यात ढासळणा-या दरडी, त्यामुळे बंद होणारा रेल्वेमार्ग. बरे एकदा एकाठिकाणी दरड कोसळली की अन्य मार्गांचा वापर करण्याचे सुखही नाही कारण रोह्यानंतर या मार्गावरचे पुढचे जंक्शन आहे मडगाव. म्हणजे अगदी गोव्याकडून मुंबईकडे येणा-या गाडीला महाडजवळ गोरेगावपाशी जरी या  मार्गावर काही प्रसंग ओढवला तरी पुन्हा मागे मडगावपर्यंत नेऊन लोंडा - बेळगाव - मिरज - पुणे मार्गे मुंबईला आणावे लागेल. एव्हढे सव्यापसव्य करण्यापेक्षा ती गाडी तिथेच रद्द करणे रेल्वेला सोयीचे होते. चिपळूण - कराड, कुडाळ - कोल्हापूर असे नवे रेल्वेमार्ग बांधले जायला हवेत, नवी जंक्शन्स निर्माण व्हायला हवीत.
 
आताशा कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व्हायला लागलेय. या दुपदरीकरणाचा वेग वाढायला हवा आणि स्थानिकांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मुख्यालयातून निर्णय घ्यायला हवेत. आंब्यांच्या मौसमात कोकणचा हापूस देशभर लवकरात लवकर पोहोचेल अशी खात्रीशीर व्यवस्था अंमलात यायला हवीय. कोकणातून महाराष्ट्राच्या इतर भागात (विशेषतः विदर्भात) जाणा-या जास्त गाड्या सुरू व्हायला हव्यात तरच इथल्या पर्यटनाला अधिक चालना मिळेल आणि कोकण रेल्वेचे खरे सुख कोकणी माणसाला प्राप्त होईल असे वाटते.

                                                           - महाराष्ट्राभिमानी रेल्वे प्रेमी, प्रा. राम प्रकाश किन्हीकर. 

No comments:

Post a Comment