Sunday, September 26, 2021

झिरो बेस्ड टाईम टेबल - २

यापूर्वीची प्रस्तावना इथे वाचा.

नागपूर ते पुणे या अत्यंत महत्वाच्या आणि प्रवाशांच्या वर्दळीच्या मार्गावर कोव्हिडपूर्वी कुठलेकुठले पर्याय उपलब्ध होते ते आपण बघूयात म्हणजे आता झिरो बेस्ड टाईम टेबलमध्ये रेल्वेला काय काय करता आले असते हे आपल्याला बघता येईल. 

१. गोंदिया - कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस. (खरेतर या नावाविषयी मला पहिल्यापासून आक्षेप आहे. तामिळनाडू एक्सप्रेस चेन्नई - नवी दिल्ली, केरळ एक्सप्रेस तिरूवनंतपुरम - नवी दिल्ली, तेलंगणा एक्सप्रेस हैद्राबाद - नवी दिल्ली तर मग महाराष्ट्र एक्सप्रेस मुंबई - नवी दिल्ली असायला हवी होती. पण महाराष्ट्रातल्या बोटचेप्या राजकीय नेत्यांमुळे ही गाडी महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात धावते आणि ते ही कुठल्याही प्राधान्याशिवाय. ब-याच ठिकाणी ही गाडी फ़ास्ट पॅसेंजरसारखीच धावते.)

२. हावडा - पुणे आझाद हिंद एक्सप्रेस. 

३. नागपूरवरून संध्याकाळी ६.३० च्या वेळेस निघणा-या नागपूर - पुणे एक्सप्रेस (आठवड्यातून ३ दिवस), नागपूर - पुणे गरीब रथ (आठवड्यातून ३ दिवस) आणि बिलासपूर - पुणे एक्सप्रेस (आठवड्यातला उरलेला दिवस).

४. अजनी - पुणे आणि नागपूर - पुणे अशा दोन वेगवेगळ्या दिवशी धावणा-या पण एकच रेक असणा-या दोन हमसफ़र एक्सप्रेस. या दोन्ही हमसफ़र एक्सप्रेस अत्यंत चुकीच्या वेळेवर नागपूर ते पुणे प्रवास करतात. नागपूर - पुणे हमसफ़र दुपारी ३ वाजता नागपूरवरून निघते तर अजनी - पुणे हमसफ़र संध्याकाळी ७.५० ला अजनीवरून निघते. 

५. अजनी - पुणे ए. सी. एक्सप्रेस (आठवड्यातून एकदा). ही गाडीही अत्यंत गैरसोयीच्या वेळी नागपूर ते पुणे हा प्रवास करते. संध्याकाळी ७.५० ला नागपूरवरून निघून दुस-या दिवशी ११ वाजता पुण्यात पोहोचणे ही ऑफ़िसवाल्यांसाठी अत्यंत गैरसोयीची वेळ आहे. या गाडीची कथा आणि भ्रमण अत्यंत रोचक आहे. नागपूर ते नवी दिल्ली ही दुरांतो देते म्हणून ममताबाई २०११ च्या बजेटनंतर लोकसभेत बोलल्यात. पण नागपूरच्या तत्कालीन खासदारांना विकासाशी काहीच देणेघेणे नसल्याने ही गाडी अस्तित्वात आली नाही. मग खूप आरडाओरडा झाल्यावर आठवड्यातून एक दिवस ही गाडी नागपूर ते अमृतसर सुरू झाली. ती पण दुरांतो नाही तर संपूर्ण ए. सी. कोचेस असलेली सुपर एक्सप्रेस. ही गाडी नागपूर - अमृतसर - नागपूर - पुणे - अमरावती - पुणे - नागपूर - अमृतसर हा प्रवास एका आठवड्याच्या आवर्तनाने करीत असते.

६. हावडा - पुणे दुरांतो. ही गाडीही नागपूरवरून रात्री ११ वाजता निघून दुस-या दिवशी दुपारी पुण्याला पोहोचते. म्हणजे ऑफ़िसवाल्यांना तशी गैरसोयीचीच. शिवाय हावड्यावरून येत असल्याने नागपूरकरांसाठी फ़ारसा कोटा नाही.

आता झिरो बेस्ड टाईम टेबलमध्ये काय करायला हवे होते हे बघूयात.

नागपूर किंवा एकूणच विदर्भातली तरूणाई पुण्याच्या आय. टी. उद्योगात फ़ार मोठ्या प्रमाणात आहे. या मुलामुलींना नागपूरवरून संध्याकाळी ५.३० किंवा ६.३० ला निघून दुस-या दिवशी सकाळी ८.३० ते ९.०० पर्यंत पुण्यात पोहोचून आपापल्या ऑफ़िसेसच्या सोयीच्या वेळेची गाडी हवी आहे. ती गाडी वातानुकुलीत असावी. गाडीच्या आत मोबाईल व लॅपटॉप चार्जर्स, वाय फ़ाय या आजच्या युगातल्या आवश्यक सेवा असाव्यात. आणि गाडीचे तिकीट खाजगी बसेसच्या तिकीटांशी स्पर्धात्मक (म्हणजे सध्याच्या दरानुसार साधारण १२०० ते १३०० रूपये) असावे. हमसफ़र चे रेक्स या कामासाठी अगदी आदर्श आहेत. 

२० कोचेसचा हमसफ़र रेक एकावेळी १६०० प्रवासी वाहून नेऊ शकतो. ही गाडी नागपूरवरून दररोज संध्याकाळी ५.४५ ला निघून साधारण १२ तासात कल्याणला पोहोचली. (विदर्भ एक्सप्रेस विदर्भात बहुतांशी ठिकाणी थांबा घेऊन नागपूर ते कल्याण हा प्रवास १२ तासांच्या आत आजही करते.) तर सकाळी ५.४५ ला कल्याण, ६.३० वाजता पनवेल, ७.३० वाजता कर्जत, ८.०० वाजता लोणावळा घेत घेत सकाळी ८.४५ च्या सुमारास चिंचवडला येऊ शकेल. पुण्यातली आय़. टी क्षेत्रातली मंडळी इथेच आपला प्रवास संपवून आपापल्या ऑफ़िसेसना जाऊ शकतील. इतर लेकुरवाळ्या मंडळींना घेऊन ही गाडी ९.१५ च्या आसपास पुणे स्टेशन गाठू शकेल.परतीच्या प्रवासातही पुण्यावरून दररोज संध्याकाळी ६.०० ला निघून नागपूरला दुस-या दिवशी सकाळी ९.३० पर्यंत ही गाडी येऊ शकेल.

या गाडीमुळे नवी मुंबई - पनवेल - कल्याण - डोंबिवली येथे राहणा-या वैदर्भियांना एक नवी गाडी उपलब्ध होईल. नागपूरवरून नगर- दौंडला रेल्वेने जाणारे जे काही थोडे प्रवासी आहेत त्यांना महाराष्ट्र एक्सप्रेसचा पर्याय उपलब्ध राहीलच. आणि येवला - कोपरगाव - नगर वरून रेल्वेने कुणी पुण्याला जात असेल यावर माझा अजिबातच विश्वास नाही. तसा डेटा रेल्वेकडे उपलब्ध असेलच. त्यावरूनही हा निर्णय घेता येईल. मनमाड - दौंड या एकमार्गी आणि म्हणून वेळखाऊ मार्गापेक्षा कल्याण - पनवेल हा मार्ग रेल्वेच्या वेगाच्या दृष्टीने सोयीचा ठरेल. शिवाय पुण्याला जाताना इगतपुरीलाचा या गाडीच्या मागे एखादे जादा एंजिन लावले तर ते एंजिन कर्जतला घाट चढण्यासाठी बॅंकर्स लावण्याचा वेळ वाचवू शकेल. हे जादा एंजिन अप प्रवासात लोणावळ्याला काढून ठेवता येईल आणि परतीच्या (पुणे - नागपूर) प्रवासात लोणावळ्याला लावून इगतपुरीला काढता येईल. म्हणजे या प्रवासातही कसा-याला बॅंकर्स लावण्याचा वेळ वाचू शकेल. पुश - पुल पद्धतीमुळे गाडीचा वेग वाढेल आणि थांब्यांचा वेळ कमी झाल्यामुळे खोळंबाही टळेल. सध्या ही पद्धत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नवी दिल्ली जाणा-या २२२२१ / २२२२२ राजधानीसाठी अतिशय यशस्वीरित्या वापरली जातेय. 




सध्याच्या महाराष्ट्र एक्सप्रेसला मनमाड - कोपरगाव - येवला - बेलापूर - अहमदनगर मार्गाने दौंडपर्यंत नेता येईल. आणि दौंडनंतर पुणे - जेजुरी - नीरा मार्गे सातारा - कराड न करता सरळ कुर्डुवाडीला नेता येईल. एकेकाळी या गाडीला गोंदिया ते सोलापूर प्रवासासाठी एक शयनयान कोच लागायचा. पण या गाडीला २४ कोचेस लावून त्यातले १२ कोचेस कोल्हापूरला आणि १२ कोचेस सोलापूरला नेता येतील. आणि कोल्हापूरपर्यंतचा वेळ वाचवता येईल. अहमदनगर ते सातारा, दौंड ते निरा, जेजुरी जाणारे प्रवासी किती आहेत याचा अभ्यास करून हा निर्णय घेता येईल. 




आझाद हिंद , हावडा - पुणे दुरांतो या गाड्यांचे वेळापत्रक थोडे बदलून (हावड्यावरून सकाळी निघून नागपूरला रात्री आणि पुण्याला दुस-या दिवशी दुपारी नेण्यात आली तरी काही हरकत नाही.) नागपूर ते पुणे, अमरावती ते पुणे आणि बल्लारपूर ते पुणे या गाड्यांना पुण्यात पोहोचण्यासाठी महत्वाचा (सकाळी ७.३० ते ९.३०) वेळ मोकळा ठेवला जायला हवा.

सध्या अमरावती ते पुणे ही अकोला - पूर्णा - परभणी - लातूर रोड - लातूर - कुर्डुवाडी अशा लांबच्या मार्गाने जाणारी एक एक्सप्रेस गाडी आहे. तिला रद्द करून दररोज अकोला - भुसावळ - मनमाड - कोपरगाव - अहमदनगर - दौंड मार्गे पुण्याला जाणारी एक चांगली गाडी सुरू करता येईल. (अमरावती संध्याकाळी ६.०० वाजता आणि पुणे सकाळी ६.०० वाजता) तसेच सध्या काजीपेठ - पुणे अशी उगाचच काजीपेठपर्यंत वाढवलेली एक एक्सप्रेस सुरू आहे. बल्लारशाहलाच व्यवस्थित रेक मेंटेनन्सच्या सोयी करून ही गाडी बल्लारशाह - पुणे अशी करता येईल. (बल्लारशाह दुपारी ४.३० वाजता, पुणे दुस-या दिवशी सकाळी ८.३० वाजता)




या गाड्यांचे थांबे आणि जागांचे कोटा ठरवितानाही थोडासा कॉमन सेन्स वापरणे जरूर आहे. बल्लारशाह - पुणे गाडीला पूर्णपणे जनरल कोटा बल्लारशाह ते वर्धा पर्यंतच आणि वर्धेनंतरचे थांबेही मर्यादित. नागपूर ते पुणे हमसफ़रला जनरल कोटा चांदूररेल्वेपर्यंतच आणि वर्धा ते अमरावती पर्यंतचे थांबेही बल्लारशाह - पुणे गाडीशी वाटून घेतलेले. म्हणजे बल्लारशाह - पुणे गाडी जर वर्धेनंतर पुलगावला थांबणार असेल तर नागपूर - पुणे हमसफ़र गाडी पुलगावला न थांबता वर्धेवरून सरळ धामणगावला थांबायला हवी. मग बल्लारशाह - पुणे गाडीही पुलगावनंतर धामणगावला न थांबता सरळ चांदूर रेल्वेला थांबवायला हवी. तशीच मग नागपूर - पुणे हमसफ़रही धामणगावनंतर चांदूरचा थांबा टाळून सरळ बडने-याला न्यायला हवी.एकाच थांब्यावरून १५ - १५ मिनिटांच्या अंतराने १००० - १२०० किमी दूर जायला गाड्या उपलब्ध असण्याची सध्याची व्यवस्था मोडकळीस आणण्याची हिंमत रेल्वेने या पुनर्रचनेच्या निमित्तने दाखवायला हवी.

रेल्वे असा विचार करून नवी आखणी करतेय की आपले १५० वर्षांपासूनचे जुनेच ctrl c + ctrl v चे धोरण पुढे सुरू ठेवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

- रेल्वेविषयी आणि प्रवाशांविषयीही कळकळ असलेला रेल्वेफॅन राम प्रकाश किन्हीकर


रेल्वेफॅनिंग आणि खाद्यभ्रमंती - १

सगळे खवय्ये रेलफॅन्स नसलेत तरी सगळे railfans खवय्ये असतातच. रेल्वेतल्या खवय्येगिरीच्या प्रत्येकाच्या एक एक कथा असतातच. पु ल म्हणतात त्याप्रमाणे मथुरेच्या आसपास "ब्डीय" म्हणजे रबडी विकणारा आहे हे ज्याला कळले त्याला रेल्वे भरपूरच घडली आहे असे समजावे. तसेच "ट्यँय सांड्या" म्हणजे Times Of India, "सालादू" म्हणजे मसाला दूध आणि "चॅग्रँम" म्हणजे चहा गरम या हाका समजायला रेल्वेत किंवा रेल्वेच्या फलाटावर भरपूर वेळ व्यतित व्हायला हवा. 

बालपणी रेल्वेने दूरवर जाण्याचे योग तसे विरळाच आलेत. धाकटी मावशी तत्कालीन मध्यप्रदेशात दुर्गला रहायची. काही सणवार उत्सवप्रसंगांनी ती मंडळी इकडे आलीत की आमची ती मावसभावंडे दुर्ग ते नागपूर या ६ - ७ तासांच्या प्रवासात (तेव्हा ६ - ७ लागायचेत हो. आजकाल सुपरफास्ट रेल्वेने चार ते साडेचार तासात जाता येते) त्यांनी केलेल्या खादाडीची वर्णने करायची आणि आमच्या तोंडाला पाणी सुटायचे. ते खात असलेला "कटलेट" हा पदार्थ केवळ रेल्वेच्या पँट्री कारमध्येच मिळतो अशी आमची बरीच वर्षे प्रामाणिक समजूत होती. कारण हाॅटेलिंगची घरून फारशी परवानगी नव्हती आणि घरची सगळी मंडळी मिळून आम्ही हाॅटेल्समध्ये गेल्यानंतर खाण्याचे पदार्थ मर्यादित. दोसा नाहीतर वडासांबार. क्वचित वेळा आमचे दादा (वडील) राईस प्लेट मागवायचेत. पण कटलेट कधीच नाहीत. कटलेट हा शाकाहारी पदार्थ आहे की मांसाहारी पदार्थ आहे याविषयी आमच्या जन्मदात्यांच्या मनातच गोंधळ असावा म्हणून हा पदार्थ हाॅटेल्समध्ये कधीच आमच्या टेबलावर आला नाही. 

त्याकाळी सेंट्रल ऍव्हेन्युवरच्या चंद्रलोक बिल्डींगसमोरच्या इमारतीत शिवराज नावाचे हाॅटेल होते. आमच्या दादांना तिथली राईसप्लेट फार आवडायची. राईसप्लेट मागवली की "दादा, आज आपण नुसता भातच खायचा का हो ?" असा भाबडा प्रश्न आम्ही दादांना किंवा आईला विचारायचो. दादा नुसते हसायचेत. पण राईसप्लेट पुढ्यात आली की आमचे प्रश्न विरून जात. दादांच्या हसण्याचा गूढार्थ कळत असे. पण रेल्वे प्रवासाचे फारसे योग न आल्याने रेल्वेत खाण्याचेही फारसे योग आले नाहीत. १९८९ मध्ये कराडला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यावर दरवेळी तो २५ तासांचा प्रवास करताना असे भरपूर योग यायला हवे होते. पण हाय रे, दुर्दैवा ! आमच्या महाराष्ट्र एक्सप्रेसला पँट्री कारच नव्हती. (अजूनही नाही.) नागपूर ते कराड जाताना आई अत्यंत मायेने दोन तीन जेवणांचा डबा देत असे. त्या मायेसमोर स्टेशनवरच्या पंचपक्वान्नांची किंमत अत्यंत तुच्छ होत असे. फारतर दुसर्‍या दिवशी सकाळी नीरा स्टेशनवर मिळणारी फळफळावळ आम्ही आवर्जून खात असू. 

महाराष्ट्र एक्सप्रेसही नीरा स्टेशनात तब्येतीने थांबत असे. नीरा स्टेशननंतर सातार्‍याकडे जाताना लोणंद, वाठार, आदर्की असा घाट लागत असे. जुन्या काळी कोळसा एंजिनांमध्ये पाणी भरण्यासाठी गाड्या तिथे भरपूर वेळ थांबत असत. एंजिनांमध्ये पाणी भरण्याची ती मोठी सोंड निरा स्टेशनात बरीच वर्षे होती. कोळसा एंजिने जाऊन डिझेल एंजिने आलीत तरी वेळापत्रकात फारसा बदल झालेला नव्हता. कराड ते नागपूर प्रवासात 'घरी परतायचय' या आनंदात भुकेची फारशी जाणीव नसायचीच. तरीही पुण्याला गाडी ४० मिनिटे थांबत असल्याने आमच्यातली काही धाडसी मंडळी पुणे स्टेशनवर गाडी आल्याआल्या पटकन बाहेर पडून स्टेशनबाहेरच्या हाॅटेल्समध्ये पोटपूजा आठोपून अगदी गाडी हलण्याच्या वेळेला परतायचीत. आमच्यात तेव्हढी हिंमत नसल्याने आम्ही स्टेशनवरच्या हातगाड्यांवर मिळणारे गारेढोण वडासांबार किंवा भल्या सकाळी केलेल्या आणि रात्री १० पर्यंत कुल्फीसारख्या थंड आणि कडक असलेल्या इडल्या पोटात ढकलून आमची केवळ क्षुधा शमवीत असू. 

बाकी पुणे स्टेशन आणि वर्धा स्टेशनवर चहाचा काँट्रॅक्ट हा एका कुणालाच मिळत असावा अशी माझी खात्री आहे. दोन्हीकडे तीच सपक, पाणीदार फुळकवणी चव आणि तोच कोमट चहा. घरी कधी चहा बिघडला तर वेड्यावाकड्या झालेल्या माझ्या चेहेर्‍याकडे पाहून सौभाग्यवती विचारते, "खरंच का रे पुणे स्टेशन क्वालिटीचा झालाय का आजचा चहा ?" निम्नतम दर्जाचा benchmark म्हणजे वर्धा आणि पुणे स्टेशनचा चहा. धामणगाव स्टेशनवर छान चहा मिळायचा. तिथल्या माझ्या मुक्कामात अनेक रात्री आमच्या नाट्यचर्चा धामणगावच्या फलाटावर या चहाच्या साथीनेच रंगलेल्या आहेत. या चहाची कीर्ती ऐकून बर्‍याच सरळ जाणार्‍या (थ्रू) मालगाड्याही, सिग्नल हिरवा असतानाही, दोन मिनिटे धामणगावच्या अप थ्रू किंवा डाऊन थ्रू लाइनवर थांबायच्यात. असिस्टंट लोको पायलट धावपळीत खाली उतरून आपल्याजवळील थर्मास भरून चहा घेऊन घाईघाईतच एंजिनात परतायचे आणि गाडी पुन्हा हलायची. 

विदर्भ एक्सप्रेसने नागपूरकडे येताना रात्री कल्याण सोडल्यानंतर किंवा सेवाग्राम एक्सप्रेसने नागपूरकडे येताना संध्याकाळी इगतपुरी सोडल्यावर "व्हेज बिर्याणी" नावाचा जो प्रकार गाडीत विक्रीसाठी येतो तो म्हणजे, एकदोन उकडलेले बटाटे, दोनतीन अर्धवट उकडलेली फुलकोबी (फ्लाॅवर) आणि अजिबात न उकडलेल्या फरसबीचे बारीक तुकडे भातासोबत असलेला पदार्थ. मिठा - तिखटाची चव ज्याला लागली त्याने आपल्या स्टेशनवर ताबडतोब लाॅटरी विकत घ्यावी ,नक्की लागेल. 

१२ वर्षांच्या मुंबईच्या वास्तव्यात मुंबई - नागपूर हा प्रवास अक्षरशः शेकडो वेळा केलाय. पण एका जिन्नसचा शोध बर्‍याच उशीरा लागल्याची खंत मला कायम राहील. विदर्भने मुंबई सोडल्यानंतर एस - २ कोचमध्ये एका मोठ्या टोपलीत पारशी डेअरीची कुल्फी घेऊन एक विक्रेता चढतो. गोल गरगरीत आणि छोट्या ताटलीच्या व्यासाच्या आकाराच्या आणि एक इंच जाडीच्या या कुल्फ्या म्हणजे अप्रतिम चवीचा एक नमुना असतात. तो विक्रेता सोबत गोल कागदी प्लेटस आणि आईसक्रीम स्टीक्स घेऊन चढतो. (अर्ध्या तासानंतरही ती कुल्फी इतकी कडक असते की तुकडा पाडण्यासाठी ती तोडताना बहुतांशी त्या आईसक्रीम स्टीकचाच तुकडा पडतो.) एस - २, एस - १ हे डबे करून तो बी - ५, बी - ४, बी - ३ असा वातानुकुलीत डब्यांकडे आपली वाटचाल करतो. ज्या खवय्यांना ही गोष्ट माहिती आहे ते सगळे त्या विक्रेत्याला एस - २ किंवा एस - १ मध्येच जाऊन गाठतात आणि कल्याणनंतर टिटवाळा येईपर्यंतच त्याची टोपली रिकामी होते. बर्‍याच जणांची निराशाही होते. थोड्या लागून आलेल्या दुधाची ही कमी गोड आणि घट्ट कुल्फी अशी हातोहात संपते. पहिल्या वेळेला ते दूध असे लागून आलेले असणे मला अपघात वाटला होता पण नंतर जाणवले की तोच याचा USP आहे. अतिशय अप्रतिम चव. विदर्भ एक्सप्रेसने केलेल्या शेवटल्या १० - १५ प्रवासात आम्हाला हा शोध लागल्यानंतर आम्ही आमचा डबा सोडून ४ - ५ डबे दूर आतून चालत चालत जात ती कुल्फी एखाद्या ट्राॅफीसारखी हस्तगत करीत असू. 

कलकत्त्याकडे जाणार्‍या हावडा मेल आणि गीतांजलीच्या पँट्रीत मिळणार्‍या कटलेटससारखी कटलेटस संपूर्ण भारतात कुठेच मिळत नाहीत. बंगाल्यांना दूध फाडून पदार्थ बनविण्यात आणि कटलेटस बनविण्यात विशेष नैपुण्य आणि रूची असली पाहिजे. मुंबई ते मडगाव जाणार्‍या मांडवी एक्सप्रेसला सगळे रेलफॅन्स "फुडी एक्सप्रेस" म्हणून ओळखतात ते केवळ तिच्या स्वच्छ, सुंदर सर्वोत्कृष्ट पँट्रीमुळे, मेन्युतल्या वैविध्यामुळे आणि अप्रतिम चवीमुळे. राजधानी गाड्यांमध्येही इतका सर्वसमावेशक मेन्यु नसतो. 








बाकी आम्ही एकदा चेन्नई ते नागपूर या प्रवासात राजधानी एक्सप्रेसच्या प्रथम वर्गाच्या आदरातिथ्याचा अनुभव घेतलाय. चेन्नईवरून निघाल्यानिघाल्या चाॅकलेटस, गाडी गुमीडपुंडीपर्यंत येते न येते तोच थर्मासभरून चहा आणि दुसरा थर्मासभरून दूध व सोबत बाऊलभरून काॅर्नफ्लेक्स, सुलुरूपेटा येईपर्यंत उपमा, ब्रेड, कटलेटस असा पोटभर नाश्ता आणि सोबत पुन्हा चहा. ओंगोल नेल्लोरपर्यंत थ्री कोर्स लंच आणि विजयवाड्याला जेवण संपवून वामकुक्षीची वेळ साधायला जातो न जातो तोच केबिनच्या दारावर टकटक आणि आमच्यासाठी आईसक्रीम आणल्याची वर्दी घेऊन रेल्वेतला सेवक उभा. वारंगलपर्यंत वामकुक्षी, लाॅबीमध्ये फेर्‍या वगैरे मार्गाने खाल्लेले अन्न जिरवण्याच्या प्रयत्नात असताना वारंगलनंतर "हाय टी" म्हणून चहा, समोसा, शेव, बिस्कीटे तयार. संध्याकाळी बल्लारशावरून निघाल्यानंतर वरोर्‍याला पुन्हा सकाळइतकेच जेवण. "बरे झाले, आपले तिकीट नागपूरपर्यंतच आहे. भोपाळ किंवा झाशीपर्यंत असते तर एवढे खाल्यानंतर आपण पार आडवेच झालो असतो आणि स्ट्रेचरवरूनच आपल्याला बाहेर काढावे लागले असते" या भावनेने व आमची तत्पर सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांना मनापासून धन्यवाद देत आम्ही नागपूरच्या फलाटावर पाय ठेवला होता. रेल्वे आणि खानपान सेवेच्या अशा अनंत आठवणी आहेत. विस्तारभयास्तव हा भाग इथेच थांबवतो. 






पुढचा भाग लगेचच आपल्या सेवेत सादर करेन. (क्रमशः)

 - सर्व रेल्वेफॅन्ससारखाच खादाड रेल्वेफॅन, राम प्रकाश किन्हीकर.

Monday, September 20, 2021

जनन मरण भय हरण करी परी

 {Disclaimer: नास्तिक, पुनर्जन्मावर, कर्मसिध्दांतावर विश्वास नसणार्यांनी मला माफ करावे. पोस्ट तुमच्यासाठी नाही रे बाबांनो.

संतकवी दासगणूंनी श्रीगजाननविजय ग्रंथात लिहील्याप्रमाणे
"ब्रम्हज्ञान सांगणे त्याला, ज्यासी अनुताप पूर्ण झाला,
उगीच तर्कटी वात्रटाला,
स्फोट त्याचा करू नये."
या सिध्दांतावर पहिल्यापासून चालतोय. तुमचे चार्वाक तत्वज्ञान (Eat drink and be merry, ऋणम कृत्वा घृतम पिबेत वगैरे) तुमच्याजवळ सुरक्षित असू द्यात.}
घरी बाप्पा आले की त्या दहा दिवसात,
शारदीय नवरात्रातल्या नऊ दिवसात आणि
चैत्र नवरात्रातल्या नऊ दिवसात घरच्या सायंकालीन नित्योपासनेनंतर भजनाची पाच पदे म्हणायची असा आम्ही दंडक घातला आणि गेल्या ३ वर्षांपासून तो पाळल्याही जातोय. कधी कुणी अभ्यागत / अतिथी सोबत असले तर असले नाहीतर आम्ही तिघेही मोठ्या आनंदाने ही भजनसेवा परमेश्वरासमोर सादर करतोच.
आमच्या गुरूमहाराजांकडे गेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त काळाहून दर गुरूवारी भजनाची अखंडित परंपरा आहे त्यामुळे अक्षरशः शेकडो भजने उपलब्ध आहेत. त्यातली बहुतांशी पाठही झालेली आहेत.
आज त्यातल्याच एका भजनाच्या ओळीवर मनात चिंतन सुरू झाले. ती ओळ होती,
"जनन मरण भय हरण करी परी, चरणी शरण दृढ केशव किंकर"
आपल्या सर्वांनाच या जीवनात मरणभय असतेच. मृत्यु कधी येईल ? कुठे येईल ? कसा येईल ? या भितीतच आपण जगत असतो पण इथे संतांना जननभय असल्याचे जाणवते.
खोलवर विचार केला तर हे जननभय मृत्युभयापेक्षा जास्त भीषण आहे असे आपल्या लक्षात येईल. ८४ लक्ष योनींमधून फिरून आल्यानंतर आज आपल्याला मानवजन्म प्राप्त झालाय, उत्तम संस्कारमय घरात जन्म झालाय, कुटुंब, मित्रमैत्रिणी, सखेसोबती उत्तम मिळालेत पण हे सगळे पुढल्या जन्मी असेच मिळेल ? याची खात्री काय ? या जन्मातल्या चांगल्या वाईट कर्मांचा भार पुढल्या जन्मी वहावा लागला आणि पुढला जन्म सध्यापेक्षाही चांगला किंवा वाईट मिळाला तरी पुढल्या जन्मी बुध्दी सात्विक, ईश्वरपरायणच असेल याची खात्री ती काय ?
संतांना वाटणारी ती ही "जननभीती" म्हणूनच संतांनी या जन्मानंतरच "पांडुरंगा, तुझ्या चरणांशी अक्षय्य जागा दे." अशी एकच मागणी केलीय.
आपण पुराणांकडे पाहिले तर राक्षसांना कायम मरणभीती आहे. म्हणून मरणापासून वाचण्यासाठी त्यांनी विविध देवांकडून मृत्यु टाळण्यासंबंधी विविध वर मागून घेतलेले आढळतात.
तर संतांना, याच्या अगदी उलट, पुढल्या जन्माचीच भीती. म्हणून या जन्मातच त्यांनी परिपूर्णता गाठून अक्षय्य भगवंताचाच कायमचा आश्रय घेतलेला दिसतो. "पुनरपि संसारा येणे नाही" ही संतांची भूमिका.
भजनांमधले साधे साधे शब्दही चिंतनीय असतात आणि शांत चित्ताने त्यात डोकावलोत तर त्यांच्या गर्भातला अर्थही आपल्याला कळतो याचे प्रत्यंतर.
- राम प्रकाश किन्हीकर

Sunday, September 19, 2021

Application of Finite Element Method to reduce stress level of family members.

 घरी कुठलेही कुळाचाराचे सण असलेत की गृहस्वामिनीला पॅनिक व्हायला होतं. हा सण पार पाडेपर्यंत त्या सगळ्या अगदी सज्ज अवस्थेतच असतात, रोज दिसणार्या याच स्त्रिया, पण या ८ - १० दिवसात अगदी वेगळ्याच होऊन जातात. माझ्या आईच्याही बाबतीत मला हाच अनुभव आहे आणि गेल्या १५ वर्षांपासून (आमच्याकडे कुळाचाराच्या महालक्ष्म्या आल्यानंतर) माझ्या सौभाग्यवतीचेही असे पॅनिक होणे बघतोय.

उत्सव पार पडेपर्यंत, तो कसा पार पडेल ? सगळे नीट होईल की नाही ? या प्रचंड काळजीत घरातल्या कर्त्या स्त्रिया असतात आणि उत्सव आटोपला की एकदम ताणलेल्या रबराचा ताण सुटून सरळ झाल्यासारखे त्या ताणाच्या एकदम सुटण्यामुळे स्वतःची तब्येत बिघडवून घेतात.
अनेक वर्षांपासून या घटनेचा मी केवळ मूक साक्षीदार आहे. पण २०१९ मधे मला यावर उपाय सुचला.
मुलांना Finite Element Methods शिकवताना Discretization (एखाद्या कामाचे जमेल तेवढ्या छोट्या गोष्टींमध्ये तुकडे करणे) ही पहिली स्टेप आपण शिकवलेली असते. त्याच प्रक्रियेचा आपण अवलंब करायला घेतो. अर्थात हा अवलंब करण्याआधी कुळाचाराची, त्याच्या तयारीची सगळी प्रक्रिया आतून समजून घ्यावी लागते नाहीतर कोरडेपणाने ही प्रक्रिया राबवली जाईल आणि त्या कार्याचा आत्माच हरवला जाईल.
या प्रक्रियेचा अवलंब करून, सुपत्नीला पॅनिक न होण्याचा धीर देत देत, आपण तिला मदत करू लागतो. एकापाठोपाठ एक कामे पध्दतशीरपणे आणि लीलया हातावेगळी होऊ लागतात. सुपत्नींची stress level आटोक्यात आल्याची लक्षणे दिसायला लागतात.
...आणि कळस तर तेव्हा होतो जेव्हा उत्सव आटोपल्यानंतर "यावर्षी उत्सव कसा पार पडला हे कळलंच नाही रे." अशी दाद गृहस्वामिनीकडून येते. आणि एका थेअरीला प्रॅक्टीकलमध्ये बदलून कुठे तरी उपयोगी पडल्याचे आत्मिक समाधान आपल्याला लाभते.
- कुठल्याही थेअरीला उपयुक्त प्रॅक्टीकलमध्ये बदलण्यासाठी आग्रही असलेला पंतोजी, रामशास्त्री.



भक्ताचे मनोव्यापार आणि भगवंताची रूपे

 मनापासून प्रार्थना करून बोलावल्यानंतर भगवतीच्या आगमनाच्या दिवशीचा त्यांच्या चेहेर्यांवरचा आनंद.




प्राणप्रतिष्ठापूर्वक षोडशोपचार पूजा करून, पंचदश संस्कारांप्रीत्यर्थ ॐ कार जपून केलेल्या पूजनानंतर आणि नैवेद्य निवेदन केल्यानंतरची आई जगदंबेच्या चेहेर्यावर आलेली तृप्ती.



विसर्जनाच्या दिवशी "यांतु देवगणाः सर्वे....पुनरागमनायच" म्हणताना आपल्या घशात आवंढा आलेला असतो त्यावेळी आलेले जगज्जननीच्या चेहेर्यावरचे व्याकुळ भाव.



भक्ताच्या मनोव्यापारांशी भगवंताची अशी नाळ जुळलेली असणे हेच आपल्या सण वारांचे खरे फलित.
मग महालक्ष्म्यांच्या या तीन दिवसांमध्ये १२५ चौरस फुटांच्या, मातीच्या भिंती आणि शेणाने सारवावे लागणार्या flooring वर अत्यंत चणचणीच्या आर्थिक परिस्थितीत आपल्या आईवडीलांनी अतिशय आनंदाने साजर्या केलेल्या महालक्ष्म्या आठवतात. उपाशीपोटी फुलोरा करायचा असल्याने सकाळची शाळा करून संध्याकाळपर्यंत उपाशी राहून फुलोरा करून पहिल्या वर्षी महालक्ष्म्या मांडण्याचे कार्य सुकर करून देणारी आपली दिवंगत आत्या आठवते. दरवेळी नैवेद्य प्रसाद करताना त्या त्या गोष्टींशी जुळलेल्या आठवणी दाटतात आणि दिवंगत आजी, आजोबा, वडीलांची आठवण येते.
श्रध्दापूर्वक स्मरण फक्त श्राध्दाच्याच दिवशी करायचे असते असे कुठाय ? अशा सणावारांमधूनही ते घडते आणि मग महालक्ष्मी आपल्या आईच्या रूपात दिसू लागते, तिची बाळं हे आपलेच सवंगडी वाटू लागतात आणि माहेरवाशिणीला निरोप देताना मन जड होऊन जातं.
कन्यारत्नाच्या लग्नाला अजून अर्धे तप तरी वेळ आहे पण तोपर्यंत माहेरवाशिण कन्येची पाठवणी करण्याचा प्रसंग या उत्सवांमधूनच अनुभवायचा असतो.
ताई, पुन्हा लवकर परतून ये बाई.
- श्रुतीस्मृती पुराणोक्त पूजेइतकाच भावपूर्ण आळवणीवर विश्वास असणारा एक व्याकुळ भक्त, राम प्रकाश किन्हीकर.

Sunday, September 12, 2021

अध्यात्म, बिगरी यत्ता आणि परीक्षा.

 


आजचा हा ब्रम्हचैतन्य विचार पाहिला आणि स्वतः त्या कसोटीवर उतरतोय की नाही हे तोलून पाहता आले.

विचार असा आहे,
"परमार्थातल्या माणसाने दैन्यवाणे असता कामा नये. पैसा असेल तर त्याने रोज श्रीखंड पुरी खावी. पण जर उद्या उपास घडला तर मात्र आजच्या पक्वान्नांची आठवण होता कामा नये."
गेले १५ दिवस काही छोट्याश्या तांत्रिक कारणामुळे कार बंद आहे. दरम्यान महाविद्यालयात UGC Autonomy committee ची visit असल्याने कामांची गडबड होती. शनिवार रविवारी सुध्दा कामांच्या धांदलीमुळे गाडी सर्व्हिसिंगला टाकणे झालेच नाही.
या दरम्यान १६ किमी दूर असलेल्या महाविद्यालयात दोन तीन दिवस दुचाकीने गेलो. पण त्याच मार्गावर "आपली बस" (नागपूर शहर बस) चांगल्या frequency ने आणि महत्वाचे म्हणजे दुचाकीपेक्षा जलद गतीने जाताना दिसल्यात. मग गेला आठवडाभर आपली बसने महाविद्यालयापर्यंतचा प्रवास बसने घडला. कधीकधी एखाद्या महाविद्यालयीन सहकार्याने बसची वाट बघताना आणि बसमधून उतरून महविद्यालयापर्यंत जाताना बघितले तर त्यांच्या आलिशान गाड्यांमधून लिफ्टही दिली.
बसमधून प्रवास करताना सहज मनाचा धांडोळा घेतला. आलिशान कारमधल्या गुबगुबीत सीटसवरून जाताना जेवढा आनंदी (किंवा जेवढा निराकार) होतो, तेवढाच आनंदी (किंवा तेवढाच निराकार) आपली बसच्या कुशन्स नसलेल्या फायबर सीटसवरून जातानाही होतो. मूळ उद्देश होता एका जागेवरून दुसर्या जागेवर वेळेत पोहोचणे. तो साध्य होण्याशी मतलब. मग त्यासाठी वेगवेगळे (वैधच हं) मार्ग अवलंबावे लागलेत तर त्या मार्गांमध्ये उजवे डावे कसे करावे ?
अध्यात्मात माणसाच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा होत असते ती अशी. ही व्यक्ती गेले वर्षभर दोन विविध फेसबुक ग्रुप्सवर "आजचा ब्रम्हचैतन्य विचार" प्रसारित करीत असते, स्वतःच्या व्हाॅटसॅप स्टेटसवरही तोच विचार असतो. मग ती व्यक्ती तो विचार जगतेय की नाही ? याबद्दल श्रीमहाराजांना, परमेश्वराला परीक्षा घ्यावीशी वाटली याच्यात दुःख कसले ? उलट आपली निवड या परीक्षेसाठी झाली याचाच अर्थ श्रीमहाराजांचे, परमेश्वराचे आपल्याकडे लक्ष आहे हा आनंदच आहे.
याप्रसंगी कबीरजी आठवतात,
"मुझे जो कराना था पथ पार,
बिठाएँ उसपर भूत पिशाच्च,
रचाएँ उसमें गहरे गर्न,
और फिर करने आया जाँच."
या जाँचच्या निमित्ताने तरी तो आपल्याला भेटेल की नाही ? अहो आपली सगळी धडपड यासाठीच आहे की नाही ? तो भेटावा यासाठी सगळा आटापिटा. ही गाडी, तो बंगला, हे शरीर, ही बुध्दी ही सगळी त्याच्या प्राप्तीची साधने. कुठल्याही कारणाने तो भेटला म्हणजे झाले. मग परीक्षक म्हणून भेटला तर कशाला घाबरावे ?
- शिक्षकदिनी एका सर्वशक्तिमान शिक्षक, परीक्षकाची वाट बघणारा एक आज्ञाधारक आणि अध्यात्मातल्या बिगरी (आजकालचे k.g. हो) यत्तेतला विद्यार्थी, कुमार राम प्रकाश किन्हीकर.

Saturday, September 11, 2021

ऋषीपंचमी, ऋषींची भाजी, देवधानाचे तांदुळ. एक स्मरणरंजन

 ऋषीपंचमी आली म्हणजे महाल नगारखान्यासमोरच्या बाजारात मिळणारी ऋषींची भाजी (बैलाच्या मेहेनतीशिवाय पिकलेली / पिकवलेली भाजी) आणि देवधानाचे तांदुळ आठवतातच.

आदल्या दिवशी गणेशचतुर्थीनिमित्त मोदकांवर आडवा हात आपण मारलेला असतो. मग दुसर्या दिवशी आपली आई, आजी, मावश्या यांना ऋषीपंचमीचा उपास असतो तेव्हा साध्याशाच गंजीत रटरटून शिजलेल्या देवधानाच्या तांदुळाच्या भाताचा तो विशिष्ट सुवास घरात घमघमत असतो. मी आजवर या तांदळाला कुकरमध्ये शिजवलेले बघितलेले नाही. तो कायम गंजातच शिजवतात.
आणि भातासोबत असते ते कवडीचे दही आणि सैंधव मीठ. सोबतच ही साधीशीच उकडलेली, सैंधव मीठ, मिरच्या वगैरे घालून केलेली मिश्र भाजी. आषाढी पौर्णिमेपासून सुरू होणार्या या संपूर्ण सणावारांच्या मौसमातल्या पुरणावरणाच्या आणि तळणाच्या साग्रसंगीत स्वयंपाकांवर ही ऋषीपंचमीची भाजी म्हणजे एक उत्तम उतारा असावा. कारण आपली आई, मावश्या, बायको, मेव्हण्या, मुली, भाच्या ही मंडळी या उतार्याने पुन्हा टणटणीत होतात आणि पार कार्तिक महिन्यापर्यंतच्या सणांसाठी उत्साहाने कंबर कसतात.
ऋषीपंचमीची भाजी हा अनंत वर्षांपासून स्त्रियांचाच विशेषाधिकार आहे, बरं का ! ऋषीपंचमीचा उपवास करणारा पुरूष मी अजून बघितलेला नाही. या १०० % आरक्षणाबद्दल अजूनपर्यंत कुणीही तक्रार वगैरे केलेली नाही. पण मग त्यातून पळवाटा काढत आमच्यासारखी लबाड मंडळी त्या देवधानाच्या तांदळाचा भात, दही आणि ती उकडलेली, साधीशीच पण तरीही अत्यंत चविष्ट लागणारी मिश्र भाजी मिळावी म्हणून घरातल्या कर्त्या स्त्रियांच्या मागेमागे घुटमळून आपली जिव्हातृप्ती करून घेत असतातच.
तर वर्षभरात एकदाच येणारी ही पर्वणी म्हणजे ऋषीपंचमीची भाजी. यावर्षी ही पर्वणी चुकवू नका रे भावाबहिणींनो.
- इसवीसन २००० मध्ये ऋषी होण्याचे जवळजवळ नक्की केलेला (पण मार्च २००० मध्ये लग्ननिश्चिती झाल्यानंतर संसारी गृहस्थ झालेला) एक वेषधारी, रामप्यारे प्रकाशात्मज.

Friday, September 10, 2021

भाषेचा लहेजा, संस्कृती , सैराट आणि फ़ॅंड्री

 प्रत्येक भागातल्या भाषेचा लहेजा पूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय त्या त्या भागातल्या माणसांविषयी, संस्कृतीविषयी गैरसमज करून घेऊ नयेत, हेच खरे.

१९८९ ते १९९३ कराडला होतो. तेव्हा आमच्या काॅलेजला असलेली सोलापूर - बार्शी - टेंभुर्णीची मित्रमंडळी सहज बोलताना - बोलावताना सुध्दा "ए ssss किन्हीकर, ये की लगा" अशी साद घालायची तेव्हा सुरूवातीला ही मुले त्या 'ए' नंतरच्या हेलामुळे उर्मट वाटायचीत. त्यांचा रागच यायचा.
पण २०१२ मध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्यात गेलो आणि त्या हेल काढून बोलण्यामागचा प्रेमळ भाव समजला. तिथल्या मुक्कामात आम्हीही ती बोलीभाषा आत्मसात केली.
तशी काहीशी भावना आत्ता माझी दिल्लीकरांविषयी आहे. ते हरियाणवी हेल, त्यातल्या टिपीकल शिव्या आणि बोलण्यात जाणवणारा shear arrogance. आजतरी हे वेगळं वाटतय खरं. कुणास ठाऊक पुढल्या आयुष्यात दिल्लीत, हरियाणा पंजाबात, काही महिने / वर्षे मुक्काम होईलही. मग तिथली संस्कृती, भाषा, लहेजा आदि समजून घेता येईल.
पण सांगोला - सोलापूरच्या भाषेचा एक उत्तम परिणाम असा झाला की आम्हाला सैराट सिनेमातले सगळे संवाद अगदी स्पष्ट कळले आणि त्यामुळे नागराजअण्णाच्या दिग्दर्शनातले बारकावे समजून घेता आलेत. सिनेमात दिसणारी करमाळा, जेऊर, उजनी ही स्थळे नेहमीच्या जाण्यायेण्याच्याच रस्त्यावरील. त्यामुळे सिनेमाविषयी आणखी आत्मीयता वाढली. हा सिनेमा 'आपल्या' मातीतला वाटू लागला.
बर्याच नागपूरकर किंवा वैदर्भिय मंडळींना त्या भाषेच्या लहेजा अभावी तो सिनेमा कळलाच नाही आणि म्हणून आवडला नाही.
सैराट बघितल्यानंतर दूरचित्रवाणीवर "फँड्री" पाहिला. पूर्वी हा सिनेमा दोनतीनदा कुठल्या ना कुठल्या चॅनेलवर बघायला मिळत होता पण आम्हाला त्याची महती न कळल्याने चॅनेल बदलल्या जात होते. पण नंतर बघितल्यावर मला सैराटपेक्षाही "फँड्री" जास्त आवडला. त्यातली कलात्मकता काळजाला भिडणारी आहे. दिग्दर्शक म्हणून नागराजअण्णा किती ग्रेट आहे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे "फँड्री"
आज हे आठवण्याचे कारण म्हणजे आमचा आवाज गेल्या दोनतीन दिवसांपासून टप्प्याटप्प्याने बसत चाललाय. आज श्रीगणेश मूर्ती घेऊन येताना बोलण्याचा प्रयत्न केला तर सुकन्या पटकन म्हणाली, "बाबा तुझा अगदी 'जब्या' झालाय." आवाज फुटत नसतानाही मी आणि तिची आई खो खो हसत सुटलो.
१२ गावचे पाणी पिऊन आल्याचा हा परिणाम. आपण आपलेच समृध्द होत जातो.
या १२ गावचे पाणी पाण्याच्या फुशारकीनंतर झालेल्या एका फजितीची कथा - नंतर कधीतरी.
- नागपुरातला जांबुवंत उर्फ जब्या, जितेंद्रकुमार चैत्रे.