Thursday, June 29, 2023

पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती.

 


आज सकाळी सकाळी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक श्री. विंदा करंदीकर यांची कविता आठवली.


पंढरपूरच्या वेशीबाहेर आहे एक छोटी शाळा

सर्व मुले आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा

खूप करतो दंगा मस्ती, खोड्या करण्यात आहे अट्टल

मास्तर म्हणतात "करणार काय ? न जाणो असेल विठ्ठल."


पांडुरंग हे सगळ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत. शैव आणि वैष्णव या दोन्हीही सांप्रदायांना सारखेच प्रिय. आपण मराठी माणसे आपल्या देवाशी इतके सख्य करतो की आपल्या मित्रासारखी त्याचीही चेष्टा आपण करतो. म्हणूनच विंदांना ही कविता सुचली असावी. या कवितेत पांडुरंगाच्या काळ्या रंगावरून त्याला चिडवण्यात विंदांची सख्यभक्तीच मला जास्त दिसली.


पंढरपूरला पांडुरंगाची जी मूर्ती आहे ती खरेतर काळ्या पाषाणाची आहे. पांडुरंग म्हणजे पांढरा रंग. "पांढरा" हा शब्दच मुळी पांडु या शब्दापासून आलेला आहे. त्या काळ्या रंगाच्या मूर्तीतून अत्यंत दिव्य अशा प्रकारची तेजस्वी प्रभा बाहेर पडत असल्याचे भक्तांना दिसत आलेली आहे. बरे ही अनुभूती फ़क्त संत मंडळी घेतात काय ? नाही. पांडुरंग हा सर्वसामान्य माणसाचा देव आहे. आपल्या वारकरी भक्तांसारखा भाजी भाकरीवर राजी असणारा हा देव आहे. त्यामुळे पांडुरंगाच्या मूर्तीतून चैतन्यमय असणारे हे तेज आपण सर्वसामान्यही सहज बघू शकतो. कधीतरी पंढरपूरला गेल्यावर सगळे व्यापताप विसरून. स्वतःचा देह, स्वतःला विसरून एकदा फ़क्त आपण विठ्ठलाकडे नीट डोळे भरून बघितले की त्या काळ्या विठ्ठलातून अत्यंत दिव्य अशा प्रकारची प्रभा, तेज बाहेर पडत असल्याचे आपल्यालाही दिसेल. आपण बाह्य जगात फ़ार गुंततो. तेच गुंतणे आपण देवासमोरही घेऊन जातो. मग दर्शन हा फ़क्त एक उपचार उरतो. दर्शन घेणे, आपल्या मागण्या मागणे आणि बाहेर पडणे यात आपल्या चित्तात त्याच्याविषयी काय आणि किती प्रेम उत्पन्न झाले ? या प्रश्नाचे उत्तर आपण शोधतच नाही. पण स्वानुभवावरून सांगतो की तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य प्रापंचिक माणसालाही ही दिव्य प्रभा अनुभवण्याचा हा अनुभव येणे फ़ार कठीण नाही.


"देवाच्या सख्यासाठी, पडो जिवलगांच्या तुटी" या स्थितीपर्यंत अगदी आपण नाही पोहोचलो तरी क्षणभर स्वतःला विसरून त्याच्या ’दर्शना’ साठी आपण आलोय ही भावना मनात स्थिरावली की आपोआप ती मूर्ती चैतन्यरूप होते आणि त्यातून एक दिव्य तेज, अलौकिक प्रभा बाहेर झळकत असल्याचा ज्ञानोबामाऊलींचा अनुभव आपणही घेऊ शकतो.


मी पहिल्यांदा तिरूपतीला गेलो होतो तेव्हा हा अनुभव मला तिथेही आला होता. तिथली बालाजीची मूर्तीही अशीच काळ्या पाषाणातली आहे. मी पहिल्यांदा तिथे जातोय म्हटल्यावर तिथे नेहेमी जाणा-या माझ्या एका मामेभावाने मला एक टीप दिली. तो म्हणाला, "राम, तू मुख्य सभामंडपात जाशील ना तेव्हा तिथे खूप गर्दी असते. बालाजीसमोर गेल्यानंतर तिथे डोळे भरून पाहीपर्यंत आपल्याला तिथली मंडळी थांबू देत नाहीत. तितका वेळच नसतो. तेव्हा तू मुख्य मंडपात प्रवेश करशील त्या क्षणापासून सरळ बालाजीकडे लक्ष ठेव. तिथे बालाजीकडे जाताना थोडा उतार आहे, त्यामुळे दूरून तुला दर्शन होत राहील. अगदी पुढे मूर्तीसमोर जाईपर्यंत दोन तीन मिनीटे तुला डोळेभरून दर्शन घेता येईल. इतर बहुतांशी मंडळी त्या मंडपात गेल्यानंतर सुरूवातीला तिथे असलेले सोने चांदी जड जवाहिरेच निरखत बसतात आणि बालाजीसमोर आल्यानंतर तिथे थांबू न दिल्याबद्दल, त्याचे डोळा भरून दर्शन न झाल्याबद्दल मंदिर व्यवस्थापनाला दोष देतात. ते सगळे वैभव आपल्याला प्रदक्षिणा करतानाही बघता येते. मुख्य मंडपात फ़क्त बालाजीच." 


मी त्याचा सल्ला ध्यानात ठेवला आणि अगदी तसेच केले. बालाजीची मूर्ती मला चांगली दोन तीन मिनीटे निरखून बघता आली. त्या मूर्तीतूनही अशीच दिव्य प्रभा बाहेर पडतानाचा हा जन्म धन्य करणारा अनुभव माझ्यासारख्या सर्वसामान्य प्रापंचिकाला आला. त्यानंतर मी दोन तीन वर्षातच पंढरपूरजवळ सांगोला येथे नोकरीनिमित्त गेलो. तिथे गेल्यावर काय ? पंढरपूर फ़क्त पंचवीस किलोमीटरवर. अगदी अर्ध्या तासात इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जाणे येणे व्हायचे. पांडुरंगाचे मनसोक्त दर्शन दरवेळी व्हायचे. दरवेळी माझ्या लक्षात आले की त्या मूर्तीतून बाहेर पडणारी प्रभा आपण बघू शकतोय. त्यासाठी स्वतःला, स्वतःचे इतर व्याप ताप विसरण्याची विशेष कवायत मला करावी लागत नाही. माझा हा मित्र एव्हढा दयाळू आहे की त्याच्यासमोर गेल्यावर तो आपसूकच माझ्या मनात इतर कुठलीही भावना राहू देतच नाही. फ़क्त तो आणि मी हेच दोघे या जगात उरलोत. आम्ही दोघे आणि त्याचा माझा शब्देवीण संवादू.


हा अनुभव तर आला. आता तो आणि मी ह्या दोन व्यकी नाहीतच, तो आणि मी एकच आहोत. "क्षेम देऊ गेले तव मी ची मी एकली." हा ज्ञानोबामाऊलींचा अद्वैतानंदाचा अनुभव आलेला नाही. तो अनुभव यावा असे विशेष मागणेही नाही. तसा अट्टाहासही नाही कारण त्याच्या माझ्या नात्यातले आजवरचे सगळे आनंदी अनुभव, त्यानेच, मी न मागता सुद्धा दिलेले आहेत. मग हा अनुभव सुद्धा तोच देईल. योग्य वेळी. या जन्मात, पुढच्या जन्मात, कदाचित आजही. तो जगन्नियंता आहे. त्यालाच हे सगळे ठाऊक आहे. भक्ताने कसलाही अट्टाहास न धरता फ़क्त त्याचे सान्निध्य अनुभवत रहावे याविणा दुसरा आनंद कुठलाच नाही हे आता मला कळलेले आहे.


॥ निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ॥


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर (आषाढी एकादशी, शोभन नाम संवत्सर, शके १९४५ ) 

Saturday, June 24, 2023

रेक शेअरींग : आता "वंदे भारत"चेही.

 


गाड्यांचे रेक्सचे शेअरींग भारतीय रेल्वेत फ़ार पूर्वीपासूनच सुरू झालेले होते. एखादी गाडी आपल्या गंतव्य स्थानावर पोहोचल्यानंतर खूप वेळ तशीच पडून राहत असेल तर त्या स्थानापासून दुसरीकडे जाण्या-या एखाद्या गाडीसाठी त्या गाडीचा रेक रेल्वे वापरते ही कल्पना जुनी आहे. उदाहरणार्थ मुंबईवरून नागपूरला येणारी सेवाग्राम एक्सप्रेस पहाटे नागपूरला येत असे आणि थेट रात्रीच परतीच्या प्रवासाला निघत असे. या गाडीची मूलभूत देखरेख जरी नागपूरला होत असली तरी त्यासाठी दिवसभर ही गाडी नागपूरच्या यार्डात पडून राहणे म्हणजे संसाधनांचा अपव्यय आहे हे रेल्वेच्या लक्षात आलेले होते आणि म्हणूनच पहाटे आलेली ही गाडी सकाळी लगेच नागपूर - कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणून जायची आणि संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास नागपूरला आलेली महाराष्ट्र एक्सप्रेस ही रात्री दहा वाजता सेवाग्राम एक्सप्रेस बनून जायची. आता महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदियापर्यंत वाढवली गेल्याने हे रेक शेअरींग थांबलेले आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, सह्याद्री एक्सप्रेस आणि महालक्ष्मी एक्सप्रेसचे नक्की रेक शेअरींग मी स्वतः तीन रात्री आणि तीन दिवस कराड स्टेशनात थांबून शोधून काढले होते त्या संशोधनाची कथा इथे.


भारतीय रेल्वे ने दोन तीन वर्षांपासून वंदे भारत म्हणून एक नवीनच रेल्वेगाडीची संकल्पना आणलेली आहे. विदेशातल्या चकाचक गाड्यांच्या धर्तीवरच्या चकाचक गाड्या, तशा सोयीसुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान यामुळे या गाड्या सर्वसामान्यांचे आकर्षण बनलेल्या आहेत. तिकीटदर जरी सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा असला तरी या विमानासारखी अंतर्गत रचना असलेल्या या गाड्यांनी कधी ना कधी प्रवास करायचा ही सुप्त इच्छा सर्वसामान्यांच्या मनात आहेच. या गाड्या सध्या तरी सर्व रचना आसनांची असलेल्याच आहेत. साधारण आठ ते नऊ तास प्रवासवेळ लागत असलेल्या ठिकाणांदरम्यान सध्या या गाड्या सुरू केलेल्या आहेत. या गाड्यांमध्ये शयन व्यवस्था असलेले कोचेस येणार आहेत आणि त्यानंतर एक हजार किमी किंवा त्यापेक्षा जास्त अंतरासाठी या गाड्या सुरू होतील ही हाकाटी गेली तीन वर्षे ऐकतो आहे पण अजून ते स्वप्न स्वप्नच राहिलेले आहे. 




म्हणूनच परवा एका न्यूज पोर्टलवर नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार ही बातमी वाचून ती बातमी वाचण्यासाठी ते न्यूज पोर्टल उघडले. आजकाल सगळ्याच न्यूज पोर्टल्सवर "जाणून घ्या ’या’ अभिनेत्रीने नाकारला ’हा’ चित्रपट" किंवा "या दोन स्टेशन्सदरम्यान सुरू होणार ’ही’ नवीन गाडी" असल्या आणि असल्याच उगाच सनसनाटी निर्माण करणा-या बातम्या असतात त्यामुळे त्या न्यूज पोर्टल्स उघडून बघण्याची हिंमतच होत नाही. पण यात सरळ सरळ "नागपूर ते पुणे" दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी निश्चित बातमी होती. बातमी वाचली आणि ही बातमी, त्या वार्ताहराचे बातमीबाबतचे विश्लेषण बरोबर असेल तर वंदे भारत या प्रतिष्ठेच्या गाड्यांचेही रेक शेअरींग रेल्वेने करायला सुरूवात केली आहे असे मानायला हरकत नाही.


रेल्वे नागपूर ते सिकंदराबाद तसेच सिकंदराबाद ते पुणे अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार असल्याची दाट शक्यता आहे. या दोन्हीही गाड्या मध्य रेल्वेच्या असण्याची शक्यता खूप जास्त आहे. नागपूरवरून सकाळी सहाच्या आसपास निघून साडेसहा तासात (साधारण दुपारी साडेबाराच्या वेळेला) ही वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबाद येथे पोहोचण्याची शक्यता आहे. तशीच पुण्यावरून सध्याच्या शताब्दीच्या वेळेला सकाळी साडेपाच, सहाला निघून आठ तासांनी दुपारी दीड ते दोनच्या सुमाराला ही वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबादला पोहोचण्याची वेळ शक्य आहे.


मग नागपूर - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबादला दोन तीन तास थांबवून परत नागपूरकडे सोडण्यापेक्षा आणि पुणे - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस परत दुपारी अडीच -तीन वाजता सिकंदराबादवरून पुण्याकडे परत पाठवण्यापेक्षा (ही गाडी आठ तासांनी रात्री अकरा वाजता पुण्याला पोहोचेल.) नागपूर - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला सिकंदराबादला पंधरा मिनीटेच थांबवून लगेच दुपारी एक वाजेपर्यंत पुण्याकडे रवाना करायची म्हणजे ती पुण्याला रात्री नऊ वाजेपर्यंत पोहोचू शकेल. आणि पुण्यावरून दुपारी दोन वाजता सिकंदराबादला येणारी पुणे - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस तशीच दुपारी अडीच वाजता नागपूरकडे सोडून नागपूरलाही ती रात्री नऊ वाजेपर्यंत पोहोचावी हा प्रयत्न मध्य रेल्वेचा असेल तर ती अत्यंत स्तुत्य बाब ठरेल.


फ़क्त नागपूर ते पुणे,  भुसावळ - मनमाड - कोपरगाव - नगर - दौंड मार्गे थेट अंतर 885 किमी पडते. पण सेवाग्राम - चंद्रपूर - बल्लारशाह - काझीपेठ - सिकंदराबाद - वाडी - सोलापूर - दौंड मार्गे हेच अंतर 1173 किमी पडते. जवळपास 288 किमी जास्त. पण जर वंदे भारत एक्सप्रेसने हा प्रवास साडेचौदा ते पंधरा तासात आणि आरामदायक होणार असेल तर या गाडीला चांगला प्रतिसाद लाभेल असे वाटते. फ़क्त या गाडीच्या तिकीटांच्या बाबतीत तर्कशुद्ध विचार करून तिकीट थोडे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात ठेवायला हवे. "उत्तम सुखसुविधा हव्या असतील तर थोडे जास्त पैसे मोजावेच लागतील." हा विचार बरोबर असला तरीही थोडे थोडे करता करता फ़ार जास्त पैसे करून या सुखसुविधा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर नेऊन ठेवून "तुमची लेको या असल्या गाड्यांमध्ये बसण्याची लायकीच नाही." असे सर्वसामान्य जनतेला अप्रत्यक्ष हिणवणेही योग्य नाही हे सुद्धा नियोजनकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.


- भारतभर चालणा-या विविध गाड्यांचे रेक शेअरींग अत्यंत आवडीने आणि आनंदाने अभ्यासणारा, एक सर्वसामान्य रेल्वेफ़ॅन, राम.   



Tuesday, June 20, 2023

साबुदाणा उसळ : आमच्या बालपणीची एक हरवलेली चव.

आज चाळीशी ओलांडलेली पन्नाशीच्या आसपास असणारी पिढी माझ्या या निरीक्षणाशी सहमत असेल.


आमच्या बालपणी आमची आई, मावश्या, माम्या या दर आठवड्यात कुठल्या ना कुठल्या वारी उपवास धरायच्याच. शेगावच्या गजानन महाराजांसाठी म्हणून गुरूवार तर बहुतेक घरी असायचाच. सकाळी जेवण करून घेऊन संध्याकाळी फराळाला उसळ असायची. (विदर्भाच्या हद्दीबाहेर जिला साबुदाण्याची खिचडी म्हणतात ती उसळ. किंबहुना ज्या जागेपासून तिला साबुदाण्याची खिचडी म्हणायला सुरूवात होते ती विदर्भाची हद्द हा आमचा पक्का खाद्यसांस्कृतिक भुगोल. किंबहुना उपवासाच्या दिवशी "खिचडी खाल्ली" असे म्हटल्यावर देखील ज्याचा उपवास मानसिकरित्या मोडल्या जातो तो खरा वैदर्भिय माणूस. हे आमच्या वैदर्भिय माणसांचे व्यवच्छेदक लक्षण. असो, मूळ मुद्दा तो नाही.)

त्याकाळी सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरांमध्ये ही उसळ करायला सरसकट वनस्पती तूप (डालडा) वापरले जाई. प्रत्येकाच्या वाट्याला ही उसळ थोडीथोडीच (वाटीभर वगैरे) यायची. "अरे, तिला उपास आहे, तिला खाऊ देत भरपूर. तुमचे लेको आताच जेवण झाले ना." वगैरे दटावणी घरातल्या वडिलधार्यांकडून मिळायची सुध्दा. पण खरं सांगतो त्या वाटीभर (द्रोणभर) उसळीची चव इतकी अप्रतिम असायची की ती उसळ संपूर्ण कढईभरही आपण खाऊ शकतो हा आमच्यातल्या सगळ्या बाळगोपाळांना आत्मविश्वास असे.

बाकी या उसळीची खरी चव म्हणजे पळसाच्या पानांच्या द्रोणातच (वैदर्भिय भाषेत 'डोन्या'तच) असे माझे स्पष्ट मत आहे.

आज मध्यमवर्गीय जीवन आपापल्या विद्यावैभवाच्या बळावर लक्ष्मीमाता प्रसन्न करुन घेऊन स्थिरावले आहे. उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत झालेले आहे. आता उसळीसाठी चांगले साजूक तूप वापरण्याची ऐपत मध्यमवर्गीय घरांमध्ये आलेली आहे. प्रत्येकाला त्याचे पोट आणि मन भरेस्तोवर अशा उसळी करता येतील इतपत ऐपत आणि मने विस्तारलेली आहेत. पण आज आमच्या बालपणची ती चव हरवली आहे हे माझे निरीक्षण आहे.

असे का व्हावे ? हा प्रश्न मला खूप वर्षांपासून पोखरत होता. त्या अनुषंगाने मला पडलले काही प्रश्न.

डालडा पूर्वीइतका चांगला येत नाही ?

चांगल्या साजूक तुपाला डालड्याची सर नाही ?

आजकाल शेंगदाणे आणि साबुदाणा पूर्वीसारखा मिळत नाही ? (तरी बरंय की आजकाल दुप्पट तिप्पट महाग सेंद्रिय शेंगदाणे आपण घरी आणू शकतोय.)

आजकालच्या हातांना आमच्या बालपणच्या आई, मावशी, मामींच्या हातची चव नाही ?

आजकाल सगळे भरपूर उपलब्ध असल्याने "राजाला दिवाळीचे काय कौतुक ?" असे आपल्या सगळ्यांचे झाले आहे ?

की वरील एकापेक्षा अधिक किंवा एकंदर सगळ्याच कारणांमुळे आजकाल उसळ पूर्वीसारखी बनत नाही ?

- "खानावळी बदलून पाहिल्या पण जीभ बदलणे शक्य नव्हते."
अशा माझ्या स्वानुभवात्मक ओळी आपल्या

"तेच ते नि तेच ते"

या कवितेत लिहीणार्या विंदा करंदीकरांचा जबरा फॅन,
खादाडखाऊ, लांडग्याचा भाऊ, वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

Wednesday, June 14, 2023

कृष्णोपनेत्र उर्फ़ गॉगल

गाॅगल (कृष्णोपनेत्रः पुलंचा शब्द) आमच्या डोळ्यांवर बर्‍याच उशीरा आला. ११ व्या वर्गात असताना घरापासून सी. पी. अँड बेरार रवीनगर शाळेपर्यंत बसने जाताना मध्ये अलंकार टाॅकीजवर आमीर खानच्या "कयामत से कयामत तक" सिनेमाचे भलेमोठे पोस्टर लागलेले दिसे. त्या पोस्टरवर अर्ध्यापेक्षा जास्त व्यापून राहिलेला आमीर खानचा गाॅगलधारी चेहेरा अजूनही माझ्या घट्ट आठवणीत आहे. अर्थात तेव्हा 'कयामत', 'मकसद' वगैरे ऊर्दू शब्दांशी फारसा परिचय झालेला नव्हता. पुलंच्याच भाषेत वर्णन करायचे झाले तर सकाळी साध्या वरणासोबत फोडणीचा भात आणि संध्याकाळी फोडणीच्या वरणासोबत साधा भात खाणार्‍या मध्यमवर्गीय संस्कृतीतले आम्ही. आमचे क्षितीज विस्तारले, जाणीवा समृध्द झाल्यात जेव्हा आम्ही अभियांत्रिकी शिक्षणासाठी घरापासून ११०० किमी दूर कराडला गेलो तेव्हा. नव्या संस्कृतीतले मित्र, नव्या ज्ञानाची भर, नवीन जाणीवा जगणे यात खरे जीवन जगलो.

 बरे, १२ व्या वर्गात घरून शाळेत जायला लूना मिळाली खरी पण तेव्हा असे तोंडनाक गुंडाळून, गाॅगल घालून स्वतःला अती जपत जाणे हे फक्त अतिरेक्यांचे लक्षण होते. बहुतांशी गाडीवरून जाणारी मंडळी आजच्या युगात आहे तसा कसलाही जामानिमा न करता मोकळेपणाने, सुखाने गाड्या चालवीत असत. घरी परतल्यानंतर चेहेर्‍यावर जमलेली धूळ लक्स (किंवा हमाम) आणि पाण्याचे शिपकारे यांनी नाहीशी होत असे. चेहेर्‍यावर धूळ जमून त्याची ph बिघडू नये म्हणून चेहेरा विचित्र गुंडाळणे, केसांच्या निगेसाठी केसांनाही असे गुंडाळून वगैरे गाड्या चालविणे असे प्रकार तेव्हाच्या 'सुकांत चंद्रानना' करीत नसत. घरी आल्यानंतर केस विस्कटलेले दिसलेच तर एखादा कंगवा किंवा फणी (ही मिळते का हो आजकाल ?) केसांमधून फिरवून ते नीटनेटके केले जात. पुष्कळ वेळेला मला प्रश्न पडतो आजकाल इतकी चेहेर्‍याची, केसांची काळजी घेऊनही तरूण पिढीत अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण किंवा त्वचेचा पोत बिघडण्याचे प्रमाण वाढते का असावे ? आपण निसर्गापासून स्वतःला खूप तोडून घेतलेय का ? तात्पर्य काय तर आम्ही चांगले कमावते होईपर्यंत गाॅगल ही तत्कालीन चैनीची वस्तू आमच्या डोळ्यांवर कधी चढलीच नाही. स्वतः कमवायला लागल्यानंतर अनेक गरजेच्याच वस्तू चैनीच्या वाटायला लागतात मग अशा खरोखर चैनीच्या वस्तूचे महत्व आम्हाला कुणी पटवून द्यावे ? आणि त्यांची खरेदी तरी कशी व्हावी ?

 लग्नानंतर मात्र अर्धांगिनीच्या आग्रहाखातर एकदोन वेळा गाॅगल खरेदी झाली पण ते वापरण्याची सवय नसल्याने एकदोन वापरांनंतर पडून राहणे, कुठेतरी विसरून येणे हे प्रकार अपरिहार्यच आहेत. मग सुपत्नीनेही माझ्यामागे गाॅगल घालण्याचा हट्ट करण्याचा नाद सोडला. बाकी घराबाहेर पडताना, प्रवासाला जाताना आवर्जून गाॅगल घालणारे आणि तो वर्षानुवर्षे नीट जपून ठेवणारे लोक मला माध्यान्हवंदनीय आहेत. (गाॅगलचा खरा उपयोग माध्यान्हसमयीच की नाही ? म्हणून "प्रातःवंदनीय" सारखे "माध्यान्हवंदनीय". मराठी शब्दभांडारात तेवढीच माझी आपली इवलीशी भर.) बाकी कोट घातलेला माणूस आणि गाॅगल घालणारी व्यक्ती एकूणच रूबाबदार दिसतात. व्यक्तीचे खांदे मुळातून कितीही पडलेले असलेत तरी कोटाच्या रूंद खांद्यांमधून ते उठावदारच दिसतात. कोट घातलेली व्यक्ती म्हणूनच आत्मविश्वासपूर्ण दिसते. तसेच मुळातले निस्तेज डोळे लपविण्याचे काम गाॅगलव्दारे होते आणि त्या चेहेर्‍याला एक वेगळीच झळाळी येते म्हणून गाॅगल घातलेली व्यक्ती उगाचच स्मार्ट वाटते. अर्थात ६० आणि ७० च्या दशकातल्या हिंदी सिनेमातल्या नायिका (आणि त्यांचे अंधानुकरण करणार्‍या काहीकाही मराठी नायिकाही) जेव्हा सव्वा चेहेरा व्यापणारा "अंगापेक्षा बोंगा" गाॅगल घालायच्यात तेव्हा त्या अत्यंत हास्यास्पद दिसायच्यात. त्यातच अगदी ९० च्या दशकातही गाॅगल कपाळाच्या पार टोकांवरून नेऊन केसांवर अडकवून ठेवण्याची एक बेंगरूळ फॅशन सिनेसृष्टीने रूढ करण्याचा प्रयत्न केला खरा पण तो फारसा यशस्वी झाला नाही. या खटाटोपात केसांना लावलेले तेल गाॅगलला चिकटून पुढच्या वेळी घातल्यानंतर समोरचे धूसर दिसणारे दृश्य पाहून स्वतःला मोतीबिंदू झालाय की काय अशी शंका येणे किंवा सर्वसामान्य माणसांच्या धावपळीच्या घडामोडींमध्ये तो गाॅगल निसटून पडण्याची भिती असणे या प्रमुख भीतींमुळे ती फॅशन जनसामान्यांमध्ये लोकप्रिय झाली नाही.

बाकी गाॅगल वापरावेत ते तुंगभद्रेच्या दक्षिणभागात असलेल्या सिनेसृष्टीतील हिरोंनी. थलाईवा रजनीकांतला एकातरी सिनेमात गाॅगलशिवाय आणि त्याच्या गाॅगल घालण्याच्या विशिष्ट स्टाईलशिवाय बघितलेय काय ? आताशा घरात आमच्या नव्या पिढीच्या समृध्द जाणीवांमुळे आणि आग्रहामुळे घरात मध्येमध्ये गाॅगलखरेदी होते. लाॅकडाऊनदरम्यान आॅनलाईन चष्मे मागवताना "दोन चष्म्यांवर एक गाॅगल फ्री" या योजनेत घरात एकदम चांगल्या कंपनीचा छान गाॅगल आला. घालून बघितला तर खरंच वेगळा वाटला हो. गाॅगल्समध्ये आजकाल उपयुक्त असे "पोलराॅइड" तंत्रज्ञान आलेय आणि त्याचे नक्की फायदे काय ? हे तो गाॅगल घालून बघितल्यावरच कळले हो. यातही म्हणे स्त्रियांनी वापरण्याचे आणि पुरूषांनी वापरण्याचे असा पंक्तीभेद आहेच. एकूण काय ? "कुठला गाॅगल आपल्याला छान दिसतोय ?" या विचारापेक्षा "कुठल्या गाॅगलमधून आपल्याला छान दिसतेय ?" हा विचार मनात आला की आपली गाडी तारूण्याचा घाट ओलांडून आता पोक्तपणाच्या वळणावरून वृध्दाप्याच्या उताराकडे वाटचाल करायला तयार आहे असे लक्षात घ्यायला हवे आणि त्यानुसार योग्य तो गिअर टाकायला हवा.

 - वागण्यातले बाल्य अजून जपून ठेवलेला, मनाने चिरतरूण, वृत्तीने पोक्त आणि विचारांनी वृध्द असलेला "अवस्थातीत" गणेशभक्त, राम प्रकाश किन्हीकर.