गाड्यांचे रेक्सचे शेअरींग भारतीय रेल्वेत फ़ार पूर्वीपासूनच सुरू झालेले होते. एखादी गाडी आपल्या गंतव्य स्थानावर पोहोचल्यानंतर खूप वेळ तशीच पडून राहत असेल तर त्या स्थानापासून दुसरीकडे जाण्या-या एखाद्या गाडीसाठी त्या गाडीचा रेक रेल्वे वापरते ही कल्पना जुनी आहे. उदाहरणार्थ मुंबईवरून नागपूरला येणारी सेवाग्राम एक्सप्रेस पहाटे नागपूरला येत असे आणि थेट रात्रीच परतीच्या प्रवासाला निघत असे. या गाडीची मूलभूत देखरेख जरी नागपूरला होत असली तरी त्यासाठी दिवसभर ही गाडी नागपूरच्या यार्डात पडून राहणे म्हणजे संसाधनांचा अपव्यय आहे हे रेल्वेच्या लक्षात आलेले होते आणि म्हणूनच पहाटे आलेली ही गाडी सकाळी लगेच नागपूर - कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणून जायची आणि संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास नागपूरला आलेली महाराष्ट्र एक्सप्रेस ही रात्री दहा वाजता सेवाग्राम एक्सप्रेस बनून जायची. आता महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदियापर्यंत वाढवली गेल्याने हे रेक शेअरींग थांबलेले आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, सह्याद्री एक्सप्रेस आणि महालक्ष्मी एक्सप्रेसचे नक्की रेक शेअरींग मी स्वतः तीन रात्री आणि तीन दिवस कराड स्टेशनात थांबून शोधून काढले होते त्या संशोधनाची कथा इथे.
भारतीय रेल्वे ने दोन तीन वर्षांपासून वंदे भारत म्हणून एक नवीनच रेल्वेगाडीची संकल्पना आणलेली आहे. विदेशातल्या चकाचक गाड्यांच्या धर्तीवरच्या चकाचक गाड्या, तशा सोयीसुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान यामुळे या गाड्या सर्वसामान्यांचे आकर्षण बनलेल्या आहेत. तिकीटदर जरी सध्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा असला तरी या विमानासारखी अंतर्गत रचना असलेल्या या गाड्यांनी कधी ना कधी प्रवास करायचा ही सुप्त इच्छा सर्वसामान्यांच्या मनात आहेच. या गाड्या सध्या तरी सर्व रचना आसनांची असलेल्याच आहेत. साधारण आठ ते नऊ तास प्रवासवेळ लागत असलेल्या ठिकाणांदरम्यान सध्या या गाड्या सुरू केलेल्या आहेत. या गाड्यांमध्ये शयन व्यवस्था असलेले कोचेस येणार आहेत आणि त्यानंतर एक हजार किमी किंवा त्यापेक्षा जास्त अंतरासाठी या गाड्या सुरू होतील ही हाकाटी गेली तीन वर्षे ऐकतो आहे पण अजून ते स्वप्न स्वप्नच राहिलेले आहे.
म्हणूनच परवा एका न्यूज पोर्टलवर नागपूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार ही बातमी वाचून ती बातमी वाचण्यासाठी ते न्यूज पोर्टल उघडले. आजकाल सगळ्याच न्यूज पोर्टल्सवर "जाणून घ्या ’या’ अभिनेत्रीने नाकारला ’हा’ चित्रपट" किंवा "या दोन स्टेशन्सदरम्यान सुरू होणार ’ही’ नवीन गाडी" असल्या आणि असल्याच उगाच सनसनाटी निर्माण करणा-या बातम्या असतात त्यामुळे त्या न्यूज पोर्टल्स उघडून बघण्याची हिंमतच होत नाही. पण यात सरळ सरळ "नागपूर ते पुणे" दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी निश्चित बातमी होती. बातमी वाचली आणि ही बातमी, त्या वार्ताहराचे बातमीबाबतचे विश्लेषण बरोबर असेल तर वंदे भारत या प्रतिष्ठेच्या गाड्यांचेही रेक शेअरींग रेल्वेने करायला सुरूवात केली आहे असे मानायला हरकत नाही.
रेल्वे नागपूर ते सिकंदराबाद तसेच सिकंदराबाद ते पुणे अशा दोन वंदे भारत एक्सप्रेस सुरू करणार असल्याची दाट शक्यता आहे. या दोन्हीही गाड्या मध्य रेल्वेच्या असण्याची शक्यता खूप जास्त आहे. नागपूरवरून सकाळी सहाच्या आसपास निघून साडेसहा तासात (साधारण दुपारी साडेबाराच्या वेळेला) ही वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबाद येथे पोहोचण्याची शक्यता आहे. तशीच पुण्यावरून सध्याच्या शताब्दीच्या वेळेला सकाळी साडेपाच, सहाला निघून आठ तासांनी दुपारी दीड ते दोनच्या सुमाराला ही वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबादला पोहोचण्याची वेळ शक्य आहे.
मग नागपूर - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबादला दोन तीन तास थांबवून परत नागपूरकडे सोडण्यापेक्षा आणि पुणे - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस परत दुपारी अडीच -तीन वाजता सिकंदराबादवरून पुण्याकडे परत पाठवण्यापेक्षा (ही गाडी आठ तासांनी रात्री अकरा वाजता पुण्याला पोहोचेल.) नागपूर - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला सिकंदराबादला पंधरा मिनीटेच थांबवून लगेच दुपारी एक वाजेपर्यंत पुण्याकडे रवाना करायची म्हणजे ती पुण्याला रात्री नऊ वाजेपर्यंत पोहोचू शकेल. आणि पुण्यावरून दुपारी दोन वाजता सिकंदराबादला येणारी पुणे - सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस तशीच दुपारी अडीच वाजता नागपूरकडे सोडून नागपूरलाही ती रात्री नऊ वाजेपर्यंत पोहोचावी हा प्रयत्न मध्य रेल्वेचा असेल तर ती अत्यंत स्तुत्य बाब ठरेल.
फ़क्त नागपूर ते पुणे, भुसावळ - मनमाड - कोपरगाव - नगर - दौंड मार्गे थेट अंतर 885 किमी पडते. पण सेवाग्राम - चंद्रपूर - बल्लारशाह - काझीपेठ - सिकंदराबाद - वाडी - सोलापूर - दौंड मार्गे हेच अंतर 1173 किमी पडते. जवळपास 288 किमी जास्त. पण जर वंदे भारत एक्सप्रेसने हा प्रवास साडेचौदा ते पंधरा तासात आणि आरामदायक होणार असेल तर या गाडीला चांगला प्रतिसाद लाभेल असे वाटते. फ़क्त या गाडीच्या तिकीटांच्या बाबतीत तर्कशुद्ध विचार करून तिकीट थोडे सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात ठेवायला हवे. "उत्तम सुखसुविधा हव्या असतील तर थोडे जास्त पैसे मोजावेच लागतील." हा विचार बरोबर असला तरीही थोडे थोडे करता करता फ़ार जास्त पैसे करून या सुखसुविधा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर नेऊन ठेवून "तुमची लेको या असल्या गाड्यांमध्ये बसण्याची लायकीच नाही." असे सर्वसामान्य जनतेला अप्रत्यक्ष हिणवणेही योग्य नाही हे सुद्धा नियोजनकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.
- भारतभर चालणा-या विविध गाड्यांचे रेक शेअरींग अत्यंत आवडीने आणि आनंदाने अभ्यासणारा, एक सर्वसामान्य रेल्वेफ़ॅन, राम.
अतिशय अभ्यासपूर्ण लेख.
ReplyDelete