Tuesday, June 20, 2023

साबुदाणा उसळ : आमच्या बालपणीची एक हरवलेली चव.

आज चाळीशी ओलांडलेली पन्नाशीच्या आसपास असणारी पिढी माझ्या या निरीक्षणाशी सहमत असेल.


आमच्या बालपणी आमची आई, मावश्या, माम्या या दर आठवड्यात कुठल्या ना कुठल्या वारी उपवास धरायच्याच. शेगावच्या गजानन महाराजांसाठी म्हणून गुरूवार तर बहुतेक घरी असायचाच. सकाळी जेवण करून घेऊन संध्याकाळी फराळाला उसळ असायची. (विदर्भाच्या हद्दीबाहेर जिला साबुदाण्याची खिचडी म्हणतात ती उसळ. किंबहुना ज्या जागेपासून तिला साबुदाण्याची खिचडी म्हणायला सुरूवात होते ती विदर्भाची हद्द हा आमचा पक्का खाद्यसांस्कृतिक भुगोल. किंबहुना उपवासाच्या दिवशी "खिचडी खाल्ली" असे म्हटल्यावर देखील ज्याचा उपवास मानसिकरित्या मोडल्या जातो तो खरा वैदर्भिय माणूस. हे आमच्या वैदर्भिय माणसांचे व्यवच्छेदक लक्षण. असो, मूळ मुद्दा तो नाही.)

त्याकाळी सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरांमध्ये ही उसळ करायला सरसकट वनस्पती तूप (डालडा) वापरले जाई. प्रत्येकाच्या वाट्याला ही उसळ थोडीथोडीच (वाटीभर वगैरे) यायची. "अरे, तिला उपास आहे, तिला खाऊ देत भरपूर. तुमचे लेको आताच जेवण झाले ना." वगैरे दटावणी घरातल्या वडिलधार्यांकडून मिळायची सुध्दा. पण खरं सांगतो त्या वाटीभर (द्रोणभर) उसळीची चव इतकी अप्रतिम असायची की ती उसळ संपूर्ण कढईभरही आपण खाऊ शकतो हा आमच्यातल्या सगळ्या बाळगोपाळांना आत्मविश्वास असे.

बाकी या उसळीची खरी चव म्हणजे पळसाच्या पानांच्या द्रोणातच (वैदर्भिय भाषेत 'डोन्या'तच) असे माझे स्पष्ट मत आहे.

आज मध्यमवर्गीय जीवन आपापल्या विद्यावैभवाच्या बळावर लक्ष्मीमाता प्रसन्न करुन घेऊन स्थिरावले आहे. उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत झालेले आहे. आता उसळीसाठी चांगले साजूक तूप वापरण्याची ऐपत मध्यमवर्गीय घरांमध्ये आलेली आहे. प्रत्येकाला त्याचे पोट आणि मन भरेस्तोवर अशा उसळी करता येतील इतपत ऐपत आणि मने विस्तारलेली आहेत. पण आज आमच्या बालपणची ती चव हरवली आहे हे माझे निरीक्षण आहे.

असे का व्हावे ? हा प्रश्न मला खूप वर्षांपासून पोखरत होता. त्या अनुषंगाने मला पडलले काही प्रश्न.

डालडा पूर्वीइतका चांगला येत नाही ?

चांगल्या साजूक तुपाला डालड्याची सर नाही ?

आजकाल शेंगदाणे आणि साबुदाणा पूर्वीसारखा मिळत नाही ? (तरी बरंय की आजकाल दुप्पट तिप्पट महाग सेंद्रिय शेंगदाणे आपण घरी आणू शकतोय.)

आजकालच्या हातांना आमच्या बालपणच्या आई, मावशी, मामींच्या हातची चव नाही ?

आजकाल सगळे भरपूर उपलब्ध असल्याने "राजाला दिवाळीचे काय कौतुक ?" असे आपल्या सगळ्यांचे झाले आहे ?

की वरील एकापेक्षा अधिक किंवा एकंदर सगळ्याच कारणांमुळे आजकाल उसळ पूर्वीसारखी बनत नाही ?

- "खानावळी बदलून पाहिल्या पण जीभ बदलणे शक्य नव्हते."
अशा माझ्या स्वानुभवात्मक ओळी आपल्या

"तेच ते नि तेच ते"

या कवितेत लिहीणार्या विंदा करंदीकरांचा जबरा फॅन,
खादाडखाऊ, लांडग्याचा भाऊ, वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

1 comment:

  1. खूप छान लिहिले आहे . माझे वय ५० आहे . त्यामुळे मी रिलेट करू शकतो

    ReplyDelete