Sunday, February 28, 2021

साध्यच जेव्हा साधन बनते तेव्हा...

अनेक योगी, सत्पुरूष अनंत जन्मे त्या भगवंताची निस्वार्थ, निस्पृह भक्ती करीत असतानाही तो भगवंत त्यांना दर्शन देत नाही, अशी अनेक उदाहरणे आपण वाचतो, ऐकतो आणि भाग्यवान असू तर अशा सदभक्तांचा सहवासही आपल्याला मिळतो.
मनात विचार येतो की हा त्या हजारो वर्षे तपश्चर्या, उपासना करणार्या योग्यांवर अन्याय नव्हे का ?
आणि एका मराठी गाण्यात याचे उत्तर सापडले.
"स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा."
त्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी केलेल्या हजारो वर्षांच्या तपाचीच एव्हढी आवड निर्माण होते की ते तप, ती उपासना संपून गेल्यावर होणार्या भगवंतप्राप्तीचा आनंद दुय्यम वाटायला लागतो.
श्रीगुरूचरित्राची पोथी संपत आल्यानंतर, ७ व्या दिवशीच्या पारायणात, महाराजांच्या शैलगमन यात्राप्रसंगाचे वर्णन वाचताना घशात आवंढा अडकतो. पोथी संपूच नये असे वाटत राहते.
श्रीगजाननविजय ग्रंथाचा १९ वा अध्याय वाचतानाही श्रीगजानन महाराजांनी त्यांचे शिष्य श्री. बाळाभाऊंना केलेला अध्यात्माचा उपदेश आणि त्यांचे देहविसर्जन वाचतानाही असेच अष्टभाव शरीरात दाटतात आणि तो ग्रंथ पुन्हा अविरत वाचत रहावा ही प्रबळ इच्छा होते.
मला वाटते की ग्रंथवाचनात इतके एकरूप होणे, अशा प्रकारे भावना उचंबळून येणेच या ग्रंथवाचनाची फलश्रुती आहे. यापलिकडे जे मिळेल ते सगळे लौकिक जगातले मिळेल पण आता जे मिळाले ते अलौकिक असे आहे.
साध्य साधण्यासाठी केलेल्या साधनाचीच एव्हढी भुरळ पडावी की साध्याकडे दुर्लक्ष व्हावे. पण नंतर लक्षात येते की साध्य तर तो भगवंत आहेच पण त्याहीपेक्षा जास्त तो साधनात आहे. आणि म्हणून हजारो वर्षांच्या, अनेक जन्मांच्या तपाच्या फळाची योगी सत्पुरूषांना आस उरत नाहीत. त्यांना साधनातच त्या साध्याची प्राप्ती झाली असते आणि अविरत साधनातच त्यांना भगवंताची प्राप्ती अविरत होत असते.
म्हणून श्री ब्रम्हचैतन्य महाराज आपल्या भक्तांसाठी जो उपदेश नेहमी करतात की "नाम हे साधन म्हणून इतक्या आत्मीयतेने करा की नाम हेच साध्य झाले पाहिजे. मला जन्मात जर काही साधायचे असेल तर ते नामच अशी भक्ताची दृढ भावना झाली पाहिजे." या वाक्याचा अर्थ कळतो.






अवधूत चिंतन श्रीगुरूदेव दत्त.

- आजचे स्वानुभवात्मक चिंतन : राम प्रकाश किन्हीकर (१७०२२०२१) 

Tuesday, February 23, 2021

Be a better person than you were yesterday.

 परवा आम्ही पती पत्नी प्रवासात असताना अचानक एक जुनी आठवण पत्नीने काढली. ती गोष्ट माझ्या पूर्ण विस्मृतीत गेलेली पाहून ती आश्चर्यचकित झाली. त्या प्रसंगात म्हणे माझा कुणीतरी एका नातेवाईकाने (तिच्या माहेरच्याच) अपमान वगैरे केला होता. माझ्याविषयी गैरसमज पेरण्याचा प्रयत्न केला होता. तिच्या आठवणीनुसार मला तेव्हा खूप राग वगैरे आला होता, त्यांच्या वागणुकीचे भरपूर वाईटही वाटले होते. आज जवळपास एका तपानंतर ती घटना मात्र मला आठवतही नव्हती.


हाच तो युरेका क्षण. स्वतःला अधिक जवळून ओळखण्याचा. नागपूरच्या कवी बोबडेंचे "ओळख पटली ज्यास स्वतःची, देव तयास मिळो न मिळो रे." हे वचन मला पक्के पटले आहे. त्यामुळे स्वतःला अधिकाधिक जाणण्याचा माझा कायम प्रयत्न असतो. यामुळे ब-याचदा माझ्या चुकाही ध्यानात येतात, बदलायला वाव मिळतो. दुसरा चुकत असेल तर "त्याचे काय चुकले ?" यापेक्षा "तो असा का वागला असेल ?" या कारणमीमांसेकडे माझे लक्ष जाते. मानवी स्वभावाच्या अपूर्णतेला स्वीकारून विविधरंगी दुनियेकडे मोकळेपणाने बघताना मौज आहे आणि हेच जीवनात कमवायचे आहे हे मला आतापर्यंतच्या अनुभवातून कळलेले आहे.


मनाला लागेल अशी एखादी वाईट घटना घडली, अपमान झाला, की ती घटना किती काळ लक्षात ठेवायची ? जितकी जास्त ती लक्षात ठेवून आपल्या मनात "आता माझी वेळ आली ना, की मी बघ कसा बदला घेतो" ही भावना आली की नुकसान आपलेच आहे हे पक्के लक्षात ठेवावे. अपमानाचा बदला घेण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहून एक दिवस संधी साधून त्या व्यक्तीचा अपमान करण्याने आपली किती चांगली वर्षे वाया गेलीत याचा ज्याचा त्याने विचार करायला हवा. घटना विसरून जावी, त्या व्यक्तीचे आपल्या जीवनात किती स्थान आहे ? त्या एखाद्या घटनेला आपल्या मोठ्ठ्या जीवनपटावर किती किंमत द्यायची ? त्या घटनेला वर्षानुवर्षे लक्षात ठेवून एखाद्या दिवशी उट्टे काढल्याने आपल्याला किती आणि कुठल्या स्वरूपाचा आनंद मिळणार ? हे ज्याचे त्याने ठरवले पाहिजे.


माझे M. Tech. च्या गुरूंनी एकदा सहज केलेला उपदेश माझ्या लक्षात आहे. ते म्हणाले, "राम, आपली स्पर्धा कायम आपल्याशीच असली पाहिजे. Daily check, whether I am a better person than I was yesterday. Even if there is some delta progress, you have won. These delta progresses daily, will make a great change in your overall persona."


मी त्यांच्याकडून M. Tech. मध्ये मिळवलेले ज्ञान कदाचित विसरलोही असेन पण हे वाक्य मात्र मी कायम लक्षात ठेवलेय आणि तसा वागण्याचा प्रयत्नही करतोय. याचेच फ़लित म्हणून माझी memory फ़क्त भूतकाळातल्या चांगल्याच स्मृतींनी भरलेली आहे. एखादी व्यक्ती जाणूनबुजून आणि विनाकारण त्रासदायक ठरत असेल तर तिला एका conviction ने जीवनातून दूर करायला शिकलोय आणि एकदा अशा दूर गेलेल्या व्यक्तीचा विचारही मनात ठेवायचा नाही हे सुद्धा हळूहळू जमत आलेय.


अचानक बालपणी शिकलेले एक संस्कृत सुभाषित आठवले.


अपमानं पुरस्कृत्य मानं कृत्वा च पृष्ठतः |

स्वकार्यमुद्धरेत् प्राज्ञः कार्यध्वंसो हि मूर्खता ||


(अपमान स्वीकारून, गर्व बाजूला ठेऊन, शहाण्या माणसाने आपल काम तडीस न्यावे. [मान अपमानाचा विचार करून] कामाचा नाश करणे हा मूर्खपणा आहे.)


शिकलो तर बालपणी. पण त्यानुसार वागण्या्चे प्रात्यक्षिक शिक्षण मात्र  जीवन नावाच्या शाळेतच मिळाले.


- सर्व कटू आणि गोड प्रसंगांना सामोरे जाणारा आणि त्याप्रमाणे वागणारा जीवनाच्या शाळेतला शहाणा विद्यार्थी, राम.

Friday, February 19, 2021

भक्तिऋण घेतले माझे, चरण गहाण आहेत तुझे.

 श्री तुकोबांचा परखड स्वभाव हा त्यांच्या सख्य भक्तिचा अत्युच्च आविष्कार आहे. त्यांची पांडुरंगाशी संभाषणे प्रत्येक भक्तिमार्गाने जाणा-याने आपल्या हृदयात कोरून ठेवावी अशीच आहेत.


तुकोबांनी किंवा इतरही संतमंडळींनी भक्ति केली ती केवळ भक्तिसाठीच. त्यात "मला देव दिसावा, मिळावा." हे सुद्धा प्रलोभन नव्हते. शुद्ध निस्वार्थ भक्ति. 


आपण सर्वसामान्य संसारी जन मात्र संसारातल्या नश्वर गोष्टींच्या प्राप्तीसाठी परमेश्वराला अक्षरशः वेठीला धरतो. व्रते, उपोषणे, अनुष्ठाने सगळे काही संसारातल्या या ना त्या सुखाच्या प्राप्तीसाठी.


असे म्हणतात की परमेश्वर कुठल्याही भक्ताचे ऋण आपल्यावर बाळगत नाही. तुमच्या भक्तिचे फ़ळ तुम्हाला तो निश्चितच परत देतो. भक्ति खरी असेल तर तुम्ही मागितलेली वस्तू तुम्हाला मिळते. आपल्या लेकराने कितीही वेडावाकडा हट्ट केला तरी आई ज्याप्रमाणे तो पुरविण्यासाठी प्रयत्न करते तसा परमेश्वर आपले हट्ट पुरविण्यासाठी प्रयत्न करत असतो. आपल्या भक्तिऋणातून तो ताबडतोब उतराई होण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणजे बघा, रोज १५ मिनीटांचीच पूजा. पण त्यातही आपण "रूपं देही, जयं देही, यशो देही, व्दिषो जही" सारखे मोठ्ठे मागणे मागतो आणि ती जगन्माता ते मागणे भक्तावरील पुत्रप्रेमाने पूर्ण करतेही.


म्हणजे आपण या अध्यात्मिक बॅंकेत १ लाख रूपये भरून २ लाखाचा ओव्हरड्राफ़्ट घेतो. जो आपल्याला आपल्या पुढल्या जन्मात फ़ेडायचा असतो. पण श्री तुकोबांसारख्या संतमंडळींचे तसे नाही. ते या अध्यात्मिक बॅंकेत नुसते संचयच करीत असतात. आपल्या स्वार्थासाठी, लौकिक मागण्यांसाठी आपल्या अकाउंटचा चेक ते कधीच देत नाहीत. मग तो परमेश्वर यांचा कर्जदार होतो. संतांचे देवावर ऋण एव्हढे होते देवाला संतांकडे काहीतरी गहाण ठेवण्याची वेळ येते. म्हणजे या अध्यात्मिक बॅंकेत देव ऋणको आणि भक्त धनको होतो.


त्या भावनेतूनच श्री तुकोबा विठठलाला बजावताहेत, बा विठठला माझ्या भक्तीचे जे तू ऋण घेतले आहेस त्याच्या बदल्यात तू तुझे चरण माझ्या हृदयात गहाण म्हणून ठेवले आहेत. माझे भक्तिचे ऋण पहिल्यांदा परत कर आणि माझ्या हृदयात जे तुझे चरण गहाण आहेत ते सोडवून घेऊन जा.


भगवंत कधीतरी हे असले ऋण फ़ेडू शकेल का हो ? एकतर हे असले ऋण फ़ेडण्याची त्याची कधी इच्छाच होणार नाही. आणि तशी इच्छा झालीच, तरी तो आपल्या भक्ताची भक्ति कशी करू शकेल ? आणि भगवंताने आपल्या भक्ताची भक्ति केलीच तरी ती निष्काम भक्ति कशी होईल ? भक्ताने तर कुठल्याही मागण्यांविना भक्ति केलेली आहे. पण आता भगवंत आपल्यावरचे ऋण फ़ेडण्यासाठी आपल्या भक्ताची भक्ति करतो असा त्याचा अर्थ होईल ना ? मग भक्ताच्या निष्काम भक्तिच्या उत्तरात भगवंताची आपल्या भक्ताप्रती ही सकाम भक्तीच झाली, नाही का ? 


नाही, तसा त्या भगवंताने तसा एकदा प्रयत्न केला होता खरा. सर्वश्रेष्ठ असलेल्या व्दारकाधीशाने संत एकनाथांच्या घरी एक दोन नव्हे तब्बल १२ वर्षे पाणक्याचे, स्वयंपाक्याचे काम केले होते. पण तरीही तो संतांच्या ऋणातून मुक्त होऊ शकला नाही. तो पैठण मधून निघून गेल्यानंतर संत एकनाथांनी डोळ्यात पाणी आणून भगवंताचे खरे स्वरूप न ओळखता आल्याबद्दल, त्या भगवंताला कामाला लावल्याबद्दल प्रचंड शोक केला होता. तेव्हा भगवंताला "तुज मज नाही भेद, केला सहज विनोद" असे सांगून भक्ताची त्याच्या शोकातून मुक्तता करावी लागली होती. पण म्हणजे ऋणातून मुक्तता राहिली ती राहिलीच.


आपण सगळे अध्यात्माच्या मार्गावरील मंडळी आहोत. भगवंताला अशा प्रकारे आपला अंकित करण्याची मनिषा आपण बाळगूयात का ? 

"रूपं देहि, जयं देहि, यशो देहि, व्दिषो जहि" या मागण्यांपासूनचा आपला प्रवास "किती भार घालू रघूनायकाला, मजकारणे शीण होईल त्याला" या जाणीवेपर्यंत नेऊयात का ?


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर (रथसप्तमी, १९/०२/२०२१)




Monday, February 15, 2021

ऐन हेमंतात भर दुपारी.

 अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षक म्हणून काम करायला लागून मला यावर्षी २६ वर्षे झालीत.

दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालय, नवी मुंबई, रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर, NMIMS चे मुकेश पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, शिरपूर तर आत्ताच्या संत विन्सेंट पलोटी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर यांसारख्या अत्यंत सुस्थापित महाविद्यालयांतून विद्यादान केले;
तर मधल्या काळात ज्या महाविद्यालयांना / विद्यापीठांना विद्यार्थी गोळा करण्यासाठी गावोगावी हिंडावे लागते अशाही महाविद्यालयात त्याच आनंदाने विद्यादान केले.
काही काही महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी थेट त्यांच्या शाळेत भेटी द्यावा लागत, स्वतःच्या महाविद्यालयाचे थेट मार्केटिंग करावे लागे,
तर काही काही महाविद्यालयांतून थेट विद्यार्थ्यांमध्ये प्रचाराऐवजी शाळेतील व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांसाठी शिक्षणविषयक कार्यशाळा घेऊन आपल्या महाविद्यालयाचा छुपा प्रचार करावा लागे.
शेक्सपियरने Midsumner Nights' Dream लिहीले. तात्यासाहेब शिरवाडकरांनी त्याचे "ऐन वसंतात अर्ध्या रात्री" असे भाषांतरित नाटकही लिहीले. शेक्सपियरला वसंतातल्या मध्यरात्रींची एकूणच भुरळ पडल्याचे दिसले.
तशीच भुरळ मला सातपुड्यातल्या कुशीतली ही गावे घालतात.
भर पौष महिना, दुपारीसुध्दा बोचणारे थंड वारे, एकूणच सर्द वातावरण आणि अशा दुपारी कलत्या उन्हाचा उबदार आधार. वाहवा !
उपरोल्लेखित कार्यक्रमासाठी एका शनिवारी दुपारी, मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यातल्या सातपुड्याच्या कुशीतल्या एका निवांत, सुशेगाद गावातल्या शाळेत घेतलेल्या यशस्वी कार्यक्रमानंतर तिथल्या आळसावलेल्या उन्हाला कॅमेर्यात पकडण्याचा हा प्रयत्न.



शनिवारी सरत्या दुपारसारखा निवांतपणा,
हेमंतातल्या दुपारचे सुखकारक उन्ह
आणि
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात असलेला हवाहवासा सुशेगादपणा.
अशा ठिकाणी "पुन्हा या"असे निमंत्रण असायलाच पाहिजे असे नाही. आपले मनच त्या निवांतपणाला लोभवून तिथे वारंवार जायला चटावते. मग ४ वर्षांपूर्वी काढलेल्या या फोटोतून का होईना, आपण मनानेच तिथे जातो आणि तिथली शांतता तनमनात भरून घेतो, ती शांतता पुन्हा जगतो.
- निवांत, सुशेगाद, अमनपसंद, रामभाऊ शांतिवाले

Sunday, February 14, 2021

भगवंत पाठीराखा.

 "आम्ही एव्हढं देवाचं करतो पण देव आमची दरवेळी पाठराखण करतोच असे नाही." ही तक्रार सश्रध्द मंडळी करताना दिसतात. मनमोकळी मंडळी ही तक्रार उघड करतात आणि इतर मंडळी मनातल्या मनात करतात. पण तक्रार असते हे नक्की.

खोलवर जाऊन विचार केला तर हे लक्षात येत की तुम्ही परमेश्वराचे भक्त आहात हे तुमच्या वागणुकीतून, वर्तणुकीतून सामान्य जगाच्या प्रत्ययास येते का ? की नुसते "देहके माला, तिलक और छाप" लावून आपण भगवत्भक्त म्हणून मिरवत आहोत ?
ब्रम्हचैतन्य महाराज म्हणतात , " तालमीत जाणारा आणि तालमीत न जाणारा यांच्या प्रकृतीत थोडा तरी फरक दिसायला हवा की नको ? तसे भगवत्भक्ताच्या वृत्तीत फरक पडलेला दिसायला हवा."
आपण या कसोटीला उतरतोय का ? हा प्रश्न प्रत्येक सश्रध्द माणसाने स्वतःला विचारला पाहिजे. खरच या कसोटीला आपण उतरत असू, आपल्या अकृत्रिम वागणुकीतून आपण भगवत्भक्त आहोत हे कळत असेल, आपले भगवंताशी अनुसंधान पक्के असेल तर आपली लाज भगवंताला असते.
अशा या खर्याखुर्या भगवत्भक्ताविषयी "अरे हे तर एव्हढे भगवत्भक्ति करतात तरीही यांची अवस्था अशी का ?" हा प्रश्न जगाने उपस्थित करणे म्हणजे भगवंताच्या महिमेवर लांछन असते आणि तो हे लांछन स्वतःला कधीही लावून घेत नाही. अशाप्रसंगी तो भक्ताभिमानी धाव घेतो आणि सदैव पाठीशी उभा राहून तळहाताच्या फोडासारखे जपतो हा अनुभव आहे.
हे होण्यासाठी आपण फक्त त्याच्या खर्या भक्तासारखे वागले पाहिजे. आपल्या वागणुकीवरून, वर्तणुकीवरून जग आपल्यालाच नव्हे तर आपल्या भगवंताला जोखत असते हे लक्षात घेऊन जगात वागत रहावे.
धर्मो रक्षति रक्षितः ( आपण धर्माचे रक्षण केले तर धर्म आपले रक्षण करील) सारखेच आपण भगवंताची लाज राखली तर तो आपली लाज राखेल.
भक्ताची दांभिक, कृत्रिम, वरवरची (non genuine) वागणूक भगवंताला लांछन आणणारी असते हे पक्के लक्षात ठेवावे.
- संसारात रमलेला पण गजेंद्राप्रमाणे त्या कुंजविहारीकडे दयेची याचना करणारा, एक कुंजर, राम किन्हीकर.

Saturday, February 13, 2021

लोहकंटकपादरक्षा




 ह्या चपला पाहून मला एकदम पुलंचा "लोहकंटकपादरक्षा" हा शब्द आठवला.

पुराणकाळी ऋषीमुनी तपासाठी वापरत. शरीराला क्लेश व्हावेत म्हणून.
आजकाल (अती) हेल्थ काॅन्शस मंडळी वापरतात. आजवर देहाला आवश्यक तेव्हढेही क्लेश दिले नाहीत म्हणून.
वक्त बदला तो नजरिया भी बदल गया.
- वेळेशी जुळवून घेणारा, ऋषीशिष्य राम.

Friday, February 12, 2021

मध्यवर्ती मध्य. Centrally Central (C. C.) zone of Indian Railways

 मध्य रेल्वेचे नागपूर आणि भुसावळ विभाग, दक्षिण मध्य रेल्वेचा नांदेड विभाग, दक्षिण पुर्व मध्य रेल्वेचा नागपूर विभाग आणि पश्चिम मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागाचा खांडवा - इटारसी - इंदूरचा भाग एकत्र जोडून रेल्वेने एक नवीन झोन तत्काळ तयार केला पाहिजे.

पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि माळव्याच्या रेल्वे विकासासाठी हा झोन अतिशय उपयुक्त ठरेल.
मध्यवर्ती म्हणून या झोनचे मुख्यालय अकोल्यात करता येईल. कुठूनही केवळ ६ - ७ तासात हे मुख्यालय गाठता येईल. प्रशासनिक व्यवस्था सुटसुटीत होईल.
या झोनला "मध्यवर्ती मध्य" "Centrally Central" (C. C.) हे नाव देता येईल.
नाव वाचूक ठसका बसेल खरा पण रेल्वेच्या झोन्सच्या नावाबाबत फारसे logic उपयोगाचे नसते.
पश्चिम मध्य रेल्वे झोन (मुख्यालय जबलपूर) हा झोन एकूणच मध्य रेल्वे झोनच्या संपूर्णतः पूर्वेला आहे. त्यातला एकही विभाग मध्य रेल्वेच्या पश्चिमेला नाही. पण नाव "पश्चिम मध्य रेल्वे ? " वा रे वा! त्यापेक्षा अकोल्याला "मध्यवर्ती मध्य" रेल्वे झोन हा तर्कदृष्ट्या खूपच बरा आहे.
- इंटर ला लाॅजिक विषय न घेताही लाॅजिक चांगले असलेला, सुटसुटीत रेल्वेफॅन, रामभाऊ मध्यवर्ते.



Thursday, February 11, 2021

 पु. ल. म्हणतात एखाद्या भैय्याला त्याने रबडी खाल्ल्यानंतर तुम्ही "बे दुणे किती ?" विचारा. त्याचे उत्तर तो कदाचित "पाँच" असे देईल पण उत्तर देताना त्याचा आविर्भाव असा असेल की अख्ख्या जगात गणित जणू त्यालाच कळलेले आहे.

उत्तरेत फिरताना किंवा उत्तरेतली मंडळी इथे आल्यानंतर त्यांच्याशी व्यवहार करताना आपल्या सगळ्यांनाही हा अनुभव नेहमी येतो.
प्रयागराजच्या रबडी सारखाच एक महत्वाचा पदार्थ. "गिलोरी"



याच्या रंग रूपानेच खवय्या आकर्षित होतो आणि तोंडात टाकल्यावर विरघळून जो मुखरस तयार होतो, त्यानंतर कुणी "सतरा साते किती ?" हा प्रश्न जरी विचारला तरी त्याचे उत्तर "एकशे सत्तावन्न" असे आत्मविश्वासाने देता येईल. फक्त उत्तर देताना आपल्या मुखकमलाचा जमिनीशी असलेला कोन किमान ४५ अंश ऊर्ध्व दिशेला असावा याची काळजी घ्यावी नाहीतर मुखरस कपड्यांवर पडून कपड्यांवर नवचित्रकलेचे एखादे प्रात्यक्षिक व्हायचे.
- पुल भक्त प्रा. रामभाऊ खादाडखाऊ पुरभैय्ये.

Wednesday, February 10, 2021

शब्दांचा वापर आणि संस्कृती

 खूप उलटसुलट खाद्यपदार्थ (उदाहरणार्थ कॅडबरी चाॅकलेटवर तेल तिखटमीठ लावलेल्या मुरमुर्यांनंतर, खाल्लेल्या पास्त्यावर, भातपोळीचा फोडणीचा कुस्करा आणि त्यावर संत्री) पोटात गेल्यावर

"पोटात काॅकटेल झालय"
आणि
"पोटात गोपालकाला झालाय"
या दोन वेगवेगळ्या प्रतिक्रियांवरून त्या व्यक्तिची आणि त्या व्यक्तिला घडवणार्या वातावरणाचीही संस्कृती कळते, नाही ?
- भावनांच्या अभिव्यक्तिबाबत, भाषेबाबत, भाषेच्या विविक्षित वापराबाबत खूपच जजमेंटल असलेला, मिलाॅर्ड राम

Tuesday, February 9, 2021

खरा तिळगुळ

 



याले म्हनते खरा "तिडगुड".

("काळे राळे, गोरे राळे, राळ्यात राळे मिसळले" हे वाक्य खणखणीतपणे आणि भराभर म्हणून दाखवू शकतो, बर का. वैदर्भिय बोलीवर प्रेम म्हणून हा "तिडगुड" शब्द)
उगाचच पावणेतीन ग्रॅम तिळांना, दीड ग्रॅम साखरेच्या पाकात घोळवून, वर सव्वा ग्रॅम गुळाचे लिंपण करून तयार झालेल्या (बहुतांशी दुकानांमध्येच. घरी तिळगुळ करणे जरा out fashioned, down market वगैरे आहे ना, म्हणून.) लिमलेटच्या आकाराच्या दातफोड गोळ्यांना "तिळगुळ" म्हणून खपवू नये.
आणि असे लाडू सुध्दा किमान ५० + असलेत तरच मजा. आईने दररोज नवनवीन डबे बदलत लपवून ठेवलेला तिळगूळ चोरून खाण्यात जी मजा आहे ती उजागरीने असे १० - १५ लाडू खाण्यात नाही.
- तिळगूळ खाऊन किंवा न खाताही गोडच बोलणारा आणि गोडच वागणारा रामचंद्रपंत.

Monday, February 8, 2021

समृद्धी आणि बदलती संस्कृती.

घर छान कौलारू, छोटेसे, टुमदार. एकंदर सुखी.
घरमालकाकडे थोडी समृध्दी आली.
पक्के घर बांधण्याचे ठरले. घरावर मजला चढवण्याचेही ठरले.
कंत्राटदार अगदीच असंस्कृत. नव्या पिढीचा. भावनांचा ओलावा अजिबात नसलेला.
जुने घर एका दिवसात जमीनदोस्त झाले. त्याच जागेवर नव्या घराची उभारणी आणि विस्तार होऊ लागला.
मुळात घर उभारणीचे पुरेसे ज्ञानच नव्हते. (घर जमीनदोस्त करायला फारसे ज्ञान लागत नाही. आडदांड आडमुठेपणा आणि मस्तवाल वृत्ती पुरते.)
मग मजल्यावर मजले चढवताना घराच्या ढाच्यामध्येच अशी विकृती निर्माण होते. जुने घर कसे का असेना १०० - १२५ वर्षे टिकले तरी होते. हे घर तर अशा ठिसूळ बांधकामामुळे पुढल्या २५ वर्षातच स्वतःहून पडेल हे सांगायला कुणी स्थापत्य अभियंताच असायला पाहिजे असे नाही.



वैदर्भिय संस्कृतीचेही तेच झालेय. एकेकाळची उदार सर्वसमावेशक संस्कृतीचे भग्नावशेष उरलेत. आणि नवी म्हणून जी संस्कृती उदयाला येतेय ती या घरासारखीच ठिसूळ ढाच्यावर उभारलेली आहे.
एकेकाळी "उद्या घरी जेवायला आला नाहीस ना, तर तू आहे आणि मी आहे. मंग पायजो बाबू." असे प्रेमळ संवाद कानावर पडायचेत.
घरी आलेले पाहुणे जायला निघालेत की ते जाऊ नयेत म्हणून त्यांच्या सामानाची, चपलाबुटांची लपवालपवी व्हायची, पाहुण्यांची प्रवासाची आरक्षणे ऐनवेळी रद्द करण्यात यजमानांना केवढातरी आनंद व्हायचा. आणि ते सुध्दा यजमान व पाहुणे दोघांचीही सांपत्तिक परिस्थिती सामान्य असताना.
आज सर्वत्र समृध्दी असताना " या मग केव्हातरी आमचे नवीन घर बघायला." अशी निमंत्रणे कानावर पडतात
किंवा
"अहो घरी कशाला हवे सासूबाईंचे सहस्त्रचंद्रदर्शन ? एवढ्या पाहुण्यांचे कोण करत बसणार ? सुटसुटीत हाॅटेल बुक करा, तिथेच करू. खर्च होईल पण घरी धिंगाणा तर टळेल."
असे संवाद याच विदर्भाच्या कानाकोपर्यातून ऐकायला येऊ लागलेत
आणि
"मनुष्य सांपत्तिक प्रतिकूलतेने खचत असेल कदाचित पण सांपत्तिक अनुकूलतेने जमीनदोस्तच होतो" हे माझे गृहीतक पक्के होत जाते.

- विदर्भातली एकेकाळची आतिथ्यशीलता हळूहळू लयाला जाऊन तोंडदेखलेपणा, मानभावीपणा उदयाला येतोय हे बघून अस्वस्थ झालेला वैदर्भिय रामभाऊ. 

Sunday, February 7, 2021

ॐ नमो भगवते वासुदेवाय : नरकांतकम

 नारायणम निराकारम

नरवीरम नरोत्तमम

नृसिंहम नागनाथम च

तं वंदे नरकांतकम

II ॐ नमो भगवते वासुदेवाय II


नरक म्हणजे काय ? आपल्या संस्कृतीत, पुराणांमध्ये देहविसर्जनानंतर प्राप्त होणा-या नरकाचे वर्णन आहे. आपल्या इहलोकीच्या कर्मांमुळे परलोकी प्राप्त होणा-या नरकात या जीवाला अनेक देहयातना सोसाव्या लागतात हे खरेच आहे. पण इहलोकीच नरकयातना भोगणे म्हनजे काय ? तर आपल्या मनासारखे न होणे या मनाला होणा-या नरकयातनाच आहेत.


आयुष्यभर अधिकार गाजवलेल्या एखाद्या उच्चपदस्थ अधिका-याची त्याच्या निवृत्तीनंतर त्याच्याच घरात पोते-यासारखी अवस्था होते आणि उरलेले आयुष्य अक्षरशः कंठावे लागते या नरकयातनाच.


नवागत सुनेचा मानसिक छळ केलेल्या सासूला तिच्या वृद्धपणी सुनेच्याच अधिकारात रहावे लागणे आणि तिच्या मर्जीने जगावे लागणे या नरक यातनाच. ती सून चांगले वागत असली तर या यातना दुप्पट होतात बर का. वारंवार तिला दिलेली आपलीच जुनी वागणूक आठवून स्वतःला जी लाज वाटत राहते या नरक यातनाच.


आपल्या आईवडीलांचा त्याग करून पत्नीसोबत राजाराणीचा संसार स्थापन केलेल्या तरूणाची त्याच्या वृद्धपणी त्याच्या मुलांनी वृद्धाश्रमात केलेली रवानगी या मनाला होणा-या नरकयातनाच.


भगवंत या नरकयातनांमधून सोडवतो. या सर्व नरकांचा अंत करतो म्हणून तो "नरकांतक" या नावाने ओळखला जातो.


परमेश्वर नरकयातनांमधून सोडवतो म्हणजे ज्या कर्मांमुळे असा शारिरीक किंवा मानसिक नरक प्राप्त होईल ती कर्मे करण्यापासून तो परमेश्वर आपल्या बुद्धीला परावृत्त करतो. 


ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे वचन आहे "भगवंत आपल्या भक्तांना सुख समृद्धी वगैरे देतो. पण आपल्या खास भक्तांना तो भगवंताविषयी प्रेम देतो." 


तसेच परमेश्वर आपल्या भक्तांना नरकयातनांमधून सोडवतो पण आपल्या अगदी खास भक्तांना तो हा नरक आहे, हा स्वर्ग आहे अशी दुजाभावाची भावनाच तो नष्ट करून टाकतो. समबुद्धी देतो. सदा सर्वदा, सगळ्या परिस्थितीत, आनंदी राहण्याची वृत्ती देतो.


ही खरी नरकांतक वृत्ती. नरकाचे अस्तित्वच मनातून नाहीसे झाले तर तो नरक प्रत्ययाला कधीही येणार नाही.


- भगवंताच्या सर्वज्ञपणावर निरातिशय विश्वास ठेऊन, कुठल्याही लौकिक अभिलाषेविना भगवंताची उपासना करणारा बालक राम.



Saturday, February 6, 2021

ॐ नमो भगवते वासुदेवाय : गोमतीप्रियम

 गोविंदम गोकुलानंदम

गोपालम गोपीवल्लभम

गोवर्धनोध्दरम वीरम

तम वंदे गोमतीप्रियम
II ॐ नमो भगवते वासुदेवाय II

एखादी व्यक्ति अगदी "गौ" आदमी असल्याचे आपण व्यवहारात ऐकतो. सज्जन, नाकासमोर चालणार्या सरळमार्गी माणसासाठी हे विशेषण वापरले जाते.
गो मती - ज्याची मती गाई सारखी (गो वंशा सारखी) आहे असा / अशी. गोवंशा सारखी म्हणजे निष्पाप, इतर जगाविषयी स्वच्छ अशी. मग अशा व्यक्तिचा निभाव आजच्या जगात लागावा कसा ?
त्यांच्यासाठीच हे भगवंताचे आश्वासन आहे. भगवंताचे एक विशेषण "गोमतीप्रिय" असे आहे. अशा सरळमार्गी, निष्कपटी व्यक्ति भगवंतांच्या प्रिय असतात.
जगात वावरताना पदोपदी आपल्या सरळ, साध्या निष्कपटी वृत्तीमुळे आपली पिछेहाट होत असल्याचे अनुभव सज्जनांना वारंवार येत असतात. त्या सज्जनांनी भगवंताच्या या विशेषणाकडे लक्ष देऊन त्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा. आपला पाठीराखा भगवंत नेहमी आहेच हा दृढ विश्वास ठेऊन आपल्या सरळमार्गी तत्वाचा अवलंब करीत राहणे हेच साधन.
आपण त्या भगवंताच्या "गोमतीप्रिय" नामावर दृढ विश्वास ठेऊन वागतो का ? हा प्रश्न प्रत्येक भगवदभक्ताने स्वतःला विचारायचा आहे आणि त्याचे प्रामाणिक उत्तर स्वतःच शोधायचे आहे.
आणि त्यापूर्वीच्या श्लोकात आलेल्या "गो" शब्दाचा अर्थ मानवी ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये असा घेत वाचा म्हणजे नवीन अनुभूती येईल. (उदा.गोपाल म्हणजे आपल्या भक्तांच्या इंद्रियांचे पालन करणारा)
- नेहमी सरळमार्गी वागण्याचा प्रयत्न करणारा बालक राम.
ता.क. सध्या रोज महाविद्यालयात जाताना आणि येताना, गाडीत, पं जसराजजींनी गायलेले ॐ नमो भगवते वासुदेवाय ऐकतोय. गाडीत एकटाच असल्याने त्यातल्या शब्दांचे मनन , चिंतन घडतेय. ते हळूहळू आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मनोदय आहे.