Tuesday, September 29, 2020

पुणेकरांच्या जगावेगळेपणाचे अजून एक उदाहरण.

 १९८९ नंतर रस्त्यावरच्या सर्व स्वयंचलित गाड्यांची नंबरांची जुनी व्यवस्था बदलून भारतभर नवी व्यवस्था आणल्या गेली.

उदाहरणार्थ नागपूरचे MZV XXXX वगैरे बदलून नवीन नोंदणी होणार्या वाहनांना MH - 31/ XXXX असे नंबर दिल्या जाऊ लागलेत.
MH - 31 / 1 ते 9999 संपलेत.
मग MH - 31 / A XXXX पासून Z XXXX संपलेत.
मग आलेत MH - 31 /AA XXXX.
Parallely हीच व्यवस्था पुण्यातही तशीच सुरू होती.
फरक पडला तो AA 9999 नंबरनंतर महाराष्ट्रभर AB 0001 पासून नवी सिरीज सुरू झाली. आणि ती AZ 9999 पर्यंत चालली.
पुण्यात MH - 12 /AA 9999 नंतर MH - 12 / BA 0001 ही सिरीज सुरू झाली आणि ...FA...RA...QA...करीत करीत MH - 12 / ZA 9999 पर्यंत पोहोचली.
अशी सिरीज अवलंबणारी देशात फक्त दोन शहरे. पुणे आणि रायपूर.(तेव्हाचे MP - 23, आत्ताचे CG -04)
आहे की नाही, पुणेकरांचा स्वतंत्र विचार करणारा मेंदू ? अरे त्याची काही कदर कराल की नाही ?
- पुण्याच्या जवळजवळ प्रेमातच असलेला भावी पुणेकर, रामचंद्रपंत.
ता.कः पुलंनी लिहील्याप्रमाणे या साध्या गोष्टीचाही मी "जाज्वल्य" अभिमान बाळगतो.
सहीत चुकून "रामभाऊ" लिहीणार होतो, ते बदलून, पुणेकरांना शोभेलसे जरा भारदस्त नाव घेतलेय.
MH - 12 / FA XXXX,
MH - 12 / RA XXXX, MH -12 / QA XXXX
आणि MH - 12 / UA XXXX या नंबरांच्या एस. टी. गाड्या १९९० च्या दशकातच पाहिलेल्या एस. टी. प्रेमीचे हे निरीक्षण.

Monday, September 28, 2020

मला आवडणारा पुणेकरांचा गुण.

 पुणेकरांना जगभर कितीही कुणीही नावे ठेवलीत, तरी त्यांचा एक गुण मला खरोखर आवडतो.

पुणेकर व्यक्तिगतरित्या स्वतः अतिशय शिस्तशीर आहेतच. (वाहतुकीच्या बाबतीत सोडून. भारतातल्या बेशिस्त वाहतूक असणार्या शहरांमध्ये पुणे पहिल्या पाचात नंबर काढेल.) पण पुण्यात काम करणार्या व्यक्ति असोत किंवा संस्था असोत त्यांच्या कामकाजातही हा पुणेरी व्यवस्थितपणा आणि शिस्तशीरपणा हेच पुणेकर आणायला लावतातच.
आता आमच्या लाडक्या एस. टी. चेच उदाहरण घ्या ना.
स्वारगेटवरून पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रात जाणार्या गाड्या,
शिवाजीनगरवरून उत्तर आणि पूर्व महाराष्ट्रात जाणार्या गाड्या
आणि पुणे स्टेशन बस स्थानकातून मुंबईला जाणार्या गाड्या. गेली ५० वर्षे तरी (कदाचित जास्त ही असतील) ही शिस्त कायम आहे.
खुद्द एस. टी. च्या मुख्यालय असलेल्या मुंबईत, मुंबई सेंट्रलवरून आणि परळवरून सुटणार्या गाड्यांचे इतके काटेकोर नियोजन नसतेच.
नागपूरला तर एस. टी. च्या बाबतीत वैदर्भिय बेशिस्तीचा नमुनाच बघायला मिळतो. "चंद्रपूर - मोरभवन" असा बोर्ड असलेली गाडी मोरभवनला जाईल की गणेशपेठला जाईल हे कधीकधी खुद्द ड्रायव्हर साहेबांनाच माहिती नसते म्हणतात. मध्येच फोन आला तर मोरभवन बसला रहाटे काॅलनी चौकातून गणेशपेठकडे वळवताना बर्याचदा पाहिलेय.
औरंगाबाद म्हणजे मराठवाडी अघळपघळपणा आलाच. काहीकाही बसफेर्यांचे सिडको बसस्थानकापर्यंतच नियोजन केलय खरे,पण त्या सिडकोत थांबून कधीमधी मुख्य बसस्थानकापर्यंत येऊनही जातात.
नगर मात्र आतिथ्यशील. पुण्याकडे जाताना "माळीवाडा बस स्थानक" ही जरी सोय असली तरी पुण्याकडून परतताना मध्यवर्ती बस स्थानक आणि तारकपूर बस स्थानक दोन्हीकडे बस नेण्याचा आग्रह कायम असतोच.
नाशिक मात्र पुण्याच्या पावलावर पाऊल टाकून तयार होतेय. सीबीएस वरून कुठली बस जाणार ?, ठक्कर बस स्थानकावरून कुठली बस जाणार ? आणि महामार्ग बसस्थानकावरूनच कुठली बस "उडनछू" होणार ? याचे आराखडे (पुण्याइतके नसलेत तरी) बर्यापैकी पक्के आहेत.
तात्पर्य काय ? पुणेकरांचा शिस्तबध्दपणा संपर्कात येणार्या व्यक्तींसाठीच नव्हे तर संस्थांसाठीही infectious (लागट) आहे.
- मुंबईकर आणि नागपूरकर नागरिक झाल्यानंतर पुणेकर नागरिक होण्याची कसून तयारी करणारे प्रा. राम किन्हीकर.

Sunday, September 27, 2020

येलपाड्या and येलपाडी

 पाऊस बेताचा आणि मध्यम. इतका मध्यम की गाडीचे वायपर्स सगळ्यात कमी वेगावर चालवावेत तर काचेवर थेंब जमा होऊन धूसर दिसणार आणि मध्यम वेगात चालवावेत तर काचेवर वायपर्स विनाकारण घासले जाण्याचा irritating आवाज येणार.

थोडक्यात काय ? बेताचा ते मध्यम पाऊस.



पण एवढ्याही पावसात आपल्या गाडीचे नुसते हेडलाईटच नव्हे तर फाॅगलाइटसही लावून आणि सगळ्या बाजूचे इंडिकेटर्स लावून गाडी हाकणार्याला वैदर्भिय भाषेत
किंवा
बाईमाणूस असेल तर
"येलपाडी" असे म्हणतात.
- लहान लहान गोष्टींच्या खिलच्या पाडणारा वैदर्भीय रामभौ.

Saturday, September 26, 2020

बालपणापासून पाहिलेला आंतरराज्य मार्ग

 

आमच्या बालपणापासून आम्ही हा मार्ग बघत आलोय.
नागपूर जलद धर्मपुरी
मार्गे जांब, वरोरा, भद्रावती, चंद्रपूर, बल्लारपूर,राजुरा, आसिफ़ाबाद, मंचेरियल.
नागपूर - २ डेपो (सध्याचा गणेशपेठ डेपो) ची ही गाडी धर्मपुरीला मुक्कामी असते.
MH - 40 / N 8912
TATA 1512 C
मध्यवर्ती कार्यशाळा नागपूर (म.का.ना.) ने बांधलेली टाटा बस.
२ बाय २ आसनव्यवस्था, एकूण प्रवासी ४३ + १ वाहक



गंमत म्हणजे बालपणी नकाशात वाराणसी - कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर तामिळनाडूत धर्मापुरी नावाचे गाव बघितल्यावर आम्हाला आपली महाराष्ट्राची एस. टी. पार तामिळनाडूपर्यंत जाते याचा अभिमान वाटायचा. नंतर कळले की हे धर्मपुरी म्हणजे गोदावरीकाठचे आंध्र प्रदेशातले (सध्याच्या तेलंगणमधले) तीर्थस्थळ.
ही गाडी अगदी ४५ वर्षांपासून (मी बघत आलेला हा काळ) नागपूरवरून दुपारी १०.०० ला निघते आणि चंद्रपूरवरून नागपूरसाठी दुपारी १४.३० ला. दोन्हीही गाड्या (नागपूर - धर्मपुरी आणि धर्मपुरी - नागपूर) एकमेकींना चंद्रपूरला भेटत असत.
आमच्या बालपणी आजोळी, चंद्रपूरला, जाण्यासाठी आमची पसंती सकाळी ६.००, दुपारी १२.००, संध्याकाळी ६.०० किंवा रात्री १०.०० च्या बसेस ना असायची. चंद्रपूर डेपो आपल्या ताफ़्यातल्या सर्वोत्कृष्ट गाड्या या वेळांवर पाठवित असे. गाड्यांना पांढरा पट्टा असायचा. या गाड्या फ़क्त जांबचाच थांबा घ्यायच्या. भद्रावती, वरोरा चे प्रवासी या गाड्यात नसायचेच. ब-याच वेळा १ ते ५ ही आसने सोडलीत (* यासंबंधी टीप खाली परिशिष्टात लिहीलेली आहे.) तर सगळी गाडी पूर्ण आरक्षित असायची. गाडी फ़लाटावर लागल्यावर दार उघडताना कंडक्टर काकांचा "गाडी फ़ुल्ल रिझर्व आहे" हा आवाज ऐकताना, आपले रिझर्वेशन असेल तर अभिमान वाटायचा आणि रिझर्वेशन नसेल तर राग यायचा. मानवी स्वभाव, दुसरे काय ?
संध्याकाळी ६.०० ची आणि रात्री १०.०० ची नागपूर - चंद्रपूर बसेस गावात गांधी चौकापर्यंत जायच्यात. रात्री बेरात्री प्रवाशांना स्टॅण्डवरून गावात जायला रिक्षा किंवा अन्य साधने मिळतील न मिळतील म्हणून एस. टी. ने प्रवाशांच्या सेवेसाठी हे आपले नाव सार्थ केले होते.
नागपूर - धर्मपुरी ही १०.०० ची बस म्हणजे नागपूर - चंद्रपूर १२ वाजताची सुपर बस न मिळाल्यास करावी लागणारी एक तडजोड होती. नागपूर - २ डेपोही या आंतरराज्य महामार्गावर आपल्या फ़ार नवीन बसेस पाठवीत नसे. त्यामुळे १२ ची सुपर ३ तासात किंवा ३ तास १५ मिनिटांत चंद्रपूरला पोहोचायची पण ही १०.०० ची जलद ३ तास ४५ मिनिटे ते ४ तास वेळ घेत असे.
चंद्रपूरवरून परततानाही तेच. आमचा पसंतीक्रम सकाळी ६.०० (सुपर), दुपारी १२.०० (सुपर), दुपारी ३.००(सुपर) किंवा सकाळी ५.३०(जलद) असा असे. (** यासंबंधी टीप खाली परिशिष्टात लिहीलेली आहे.) संध्याकाळी चंद्रपूरवरून निघून रात्री नागपूरला फ़क्त झोपण्यापुरते जाणे आम्हाला आणि आमच्या चंद्रपूरमधल्या सगळ्या माया करणा-या व्यक्तींना मान्य नसे. "घरी जाऊन झोपायचेच आहे नं ? मग इथेच मुक्काम करा, गेले उद्या सहाच्या बसने." असा आग्रह नेहमी व्हायचा. त्यामुळे चंद्रपूरवरून निघायचे असेल तर शेवटली बस म्हणजे दुपारी ३.०० ची सुपर.
पण सीझनमध्ये कधी कधी तिचेही रिझर्वेशन मिळत नसे. अशा वेळी १४.३० ला निघणा-या या धर्मपुरी - नागपूर मध्ये हमखास जागा मिळायची.
असा हा आंतरराज्य मार्ग आणि त्याच्याशी संबंधित आठवणी. आठवणी या मधमाशांच्या मोहळासारख्या असतात नाही ? एक काढली तर असंख्य तुमच्यासमोर येऊन पिंगा घालत बसतात.
परिशिष्ट * :
आसन १ आणि २ महाराष्ट्र एस. टी. त आमदार खासदारांसाठी राखीव आहे. एकेकाळी तसे त्या आसनांच्या मागे लिहीलेले असायचे. ऐनवेळी कुणी आमदार खासदार आले नाहीत तर ही आसने सर्वसामान्य माणसांना उपलब्ध व्हायचीत.
आजवर केवळ शेकापच्या गणपतराव देशमुखांचा अपवाद वगळता मी कुठल्याही आमदार किंवा खासदाराला एस. टी. तून नियमित प्रवास करताना बघितलेले नाही. आणि आसन क्र. ३,४,५ ही पत्रकारांसाथी राखीव असायचीत. त्यामुळे त्यांचे आरक्षण द्यायचे नाहीत. ऐनवेळी येणा-या प्रवाशांना ही आसने उपलब्ध व्हायचीत.
परिशिष्ट ** :
सकाळी ५.३० ला निघणारी बस अगदी एवंगुणविशिष्ट असायची. साडेपाचची बस गाठायची म्हणजे पहाटे चारला उठून सगळी आन्हिके उरकावी लागायचीत. अगदी अंघोळ वगैरे सुद्धा. कारण नागपूरला सकाळी ९.०० ला पोहोचल्यानंतर वाड्यात नळ गेलेला असायचा. मग कसली अंघोळ आणि कसली आन्हिके ? स्वयंपाकापुरते आणि दिवसभर पिण्यापुरते घडाभर पाणीसुद्धा शेजारून मागून आणावे लागायचे.
पहाटे साधारण सव्वापाचच्या सुमारास चंद्रपूरला स्टॅण्डवर
पोहोचलो की साडेपाचची नागपूर, सहाची नागपूर आणि सहाची चंद्रपूर - शेगाव या तिन्ही गाड्या चंद्रपूर डेपोच्या प्रवेशद्वाराशी थांबलेल्या असायच्यात. त्यात "नेमकी नवी गाडी आज साडेपाचची देऊ देत" म्हणून आम्ही प्रार्थना करायचो पण ९९.९९ % वेळा ही प्रार्थना फ़लद्रूप व्हायची नाही. बाहेर अजूनही अंधार असल्याने आत सगळे दिवे लावलेली साडेपाचची जलद डेपोबाहेर यायची आणि फ़लाटावर लागायची.
त्याकाळी सुपर बसचे रिझर्वेशन करायचे असेल तर संपूर्ण प्रवासभाडे आणि १ रूपया रिझर्वेशन शुल्क असे आगाऊच भरावे लागे. (चंद्रपूर - नागपूर प्रवासभाडे १८.९० रूपये + १ रू आरक्षण शुल्क असे १९.९० रूपये प्रतिव्यक्ती भरावे लागे. हे शुल्क कमीतकमी १० वर्षे तरी तसेच होते.) पण जलद बसला फ़क्त १ रूपया रिझर्वेशन शुल्क भरून जागा आरक्षित करता येत असे. उरलेली रक्कम बसमध्ये वाहकाला द्यायची आणि तिकीट घ्यायचे अशी प्रथा होती. साडेपाचची बस अशीच १.०० रूपया आरक्षणाची होती.
ही साडेपाचची बस जरा लेकुरवाळ्या स्वभावाची असे. ही बस चंद्रपूरवरून निघाली की भद्रावती गावाआधी असलेल्या भद्रावतीच्या आयुध निर्माण वसाहतीत जायची. ही एकमेव बस या मार्गे जायची. मग तिथले प्रवासी घेऊन, भद्रावती शहरात असलेल्या बसस्टॅण्डवर जाणे, पुन्हा महामार्गावर परतणे, वरो-याला रेल्वे फ़ाटक ओलांडून गावात असलेल्या बसस्टॅण्डवर जाणे, पुन्हा फ़ाटक ओलांडून महामार्गावर येणे, या गदारोळात एकदा किंवा दोन्हीवेळा रेल्वेचे फ़ाटक बंद असले की खोळंबा सहन करणे या सगळ्या निवांतपणात सहाची सुपर भद्रावती आणि वरोरा थांबे न घेता पुढे निघून गेलेली असायची. जांब बसस्थानकात साडेपाचची बस शिरताना, सहाची बस वाकुल्या दाखवत निघायच्या तयारीत असायची. त्यामुळे आपण साडेपाचच्या बसमध्ये असलो की सहाच्या बसचा राग यायचा आणि सहाच्या बसमध्ये असलो की साडेपाचच्या बसची कीव यायची.
काय आहे की मूळ मजकुरात आठवणींनी कंसात ( ) गर्दी केली की मूळ मजकुराचा धागा कदाचित तुटण्याचा संभव असतो. म्हणून ही परिशिष्टे.
- आठवणींच्या जंजाळात हरवलेले, परिशिष्टांवर परिशिष्टे लिहीणारे, (पण तरीही शिष्ट नसलेले) बसगाड्यांचे डॉ. राम प्रकाश किन्हीकर.

Friday, September 25, 2020

रेशनिंग आणि नासधूस

 १९७० च्या दशकाचा उत्तरार्ध आणि १९८० च्या दशकाचा पूर्वार्ध.

आसपासच्या शेजार्यांपैकी किंवा जवळच्या नातेवाईक कुटुंबांपैकी कुणी पूर्ण कुटुंबच्या कुटुंब महिना दीड महिना बाहेरगावी जाणार असल्याचे कळल्यावर पहिल्यांदा त्यांना त्यांचे रेशनकार्ड मागून घेणे आणि त्या महिन्याचे त्यांच्या रेशनकार्डवरील साखर आणि तेल घरी आणणे ही त्याकाळच्या (निम्न) मध्यमवर्गीय कुटुंबांची सहज रीत होती.
- एकीकडे धान्याचे, खाद्यतेलाचे, साखरेचे व इंधनतेलाचे रेशनिंग ही संस्कृती आणि आत्ताची ब्युफेमधली खाद्यान्नांची सर्रास नासधूस करण्याची संस्कृती जवळून बघितलेला राम प्रकाशराव किन्हीकर.



Thursday, September 24, 2020

वादविवाद: भारतीय प्रथा आणि त्यात घुसलेली विकृती

आजकाल सर्वच वृत्त वाहिन्यांवर वादविवादाचे एक विकृतच रूप बघायला मिळतेय. त्या कार्यक्रमाला हे लोक "वादविवाद" हे नाव तरी का देतात ? हेच मला कळत नाही. आपल्या वाहिनीवर तज्ञांना बोलवल्यानंतर त्यांना आपापसात झुंजवत ठेवणे किंवा त्यांना बोलूच न देता आपला मुद्दा रेटणे या गदारोळाला ही मंडळी "वादविवाद" म्हणतात याची अक्षरश: कीव कराविशी वाटते. आणि ही तथाकथित तज्ञ मंडळी तरी त्या अक्कलशून्य सूत्रधाराकडून स्वत:चा अपमान का करून घेतात ? हे सुद्धा न उलगडणारे कोडे आहे. एका तासासाठी ४००० - ५००० रूपये "मानधन" देऊन (खरेतर त्याला "अपमानधन" म्हणायला हवे.)  केवळ दोन तीन वाक्ये तुम्हाला बोलायला देऊन ही सूत्रधार मंडळी स्वत:चाच मुद्दा रेटत असतात. आणि तुम्ही त्यांना जरा्सा जरी विरोध केलात तरी तुमचा सार्वजनिक अपमान करायला ही मंडळी टपलेली असतात. या सर्व प्रकाराला "वादविवाद" म्हणणे तर सोडाच, वितंडवाद सुद्धा म्हणवत नाही.


भारतीय दर्शनानुसार वादविवाद असे होत नाहीत. मुळात वादविवाद कशाला ? याबाबत आम्हा भारतीयांची दृष्टी अगदी स्पष्ट आहे. "वादे वादे जायते तत्वबोध:" वादविवादांमधून एकाच गोष्टीचे विविध पैलू समजून घेऊन श्रोत्यांनी स्वत:ला तत्वाचा बोध करून घेणे, शहाणे होणे हे वादविवादाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आपल्या संसदीय प्रणालीतले वादविवाद बघा. वादविवादाची सुरूवात एक जण प्रस्ताव मांडून करतो. त्या प्रस्तावावर खंडन आणि मंडन दोन्ही प्रकारची विद्ववत्तापूर्ण चर्चा होते. (होय, संसदेत / राज्यांच्या विधीमंडळात, बहुतांशी विधेयकांवर अशा प्रकारची गांभीर्यपूर्ण चर्चा होत असते. किंबहुना एखाद्या पंतप्रधानांनी / मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या विश्वास प्रस्तावावर किंवा विरोधकांनी मांडलेल्या अविश्वास प्रस्तावावर सुद्धा अशीच चर्चा होत असते. केवळ प्रश्नोत्तर तासातला गदारोळ बघून आपण आपल्या विधीमंडळांविषयी मत कलुषित करू नये. शक्य असल्यास लोकसभा / राज्यसभा टीव्ही दुपारी संध्याकाळी बघावा.) आणि सरतेशेवटी ज्याने वादविवाद सुरू केलेला आहे त्याला पुन्हा बोलण्याची, आपल्या प्रस्तावाविरोधात मांडल्या गेलेल्या मुद्द्यांचे खंडन करण्याची संधी मिळते. (आठवा, १९९५ मध्ये, स्व. अटलजींच्या १३ दिवसीय सरकाराच्या समर्थनार्थ मांडल्या गेलेल्या विश्वास प्रस्तावावर समारोपाचे ते अटलजींचे भाषण. भारतीय संसदेत झालेल्या सर्वोत्कृष्ट भाषणांपैकी एक असेच त्याचे वर्णन करावे लागेल.) 


नागपूरला शाळेत शिकत असताना आणि कराडला अभियांत्रिकी महाविद्यालयात सुद्धा अनेक वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेतलाय. पार  जिल्हास्तरीय, विद्यापीठस्तरीय, राज्यस्तरीय बक्षीसेही मिळवलीत. सर्वत्र असेच शालीन, संसदीय वादविवाद. सध्याचे आपले गृहराज्यमंत्री असलेले श्री. सतेज पाटील आमच्या विद्यापीठाचे "विद्यापीठ प्रतिनिधी" होते. १९९३ मध्ये कोल्हापूरला डी वाय पाटील शैक्षणिक संकुल परिसरात झालेल्या विद्यापीठस्तरीय वादविवाद स्पर्धेत, संपूर्ण शिवाजी विद्यापीठातून आलेल्या महाविद्यालयीन प्रतिनिधींच्या साक्षीने, सतेज पाटलांसमोर, त्यांच्याच पक्षाविरूद्ध (त्यावेळी ते कॉंग्रेसचे होते) भूमिका वादविवादातून मांडून त्यांची दाद आणि प्रथम क्रमांकाचे बक्षीसही मिळवलेले होते. आज ही सहिष्णुता, तो मोकळेपणा कुठेच दिसत नाही.


कराडला प्रथम वर्षाला शिकत असताना सुधीर मुतालीकच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विद्यार्थी परिषदेतर्फ़े "विद्यार्थी संसद" आयोजित केलेली होती. त्या आयोजनात आम्ही हिरीरीने पुढे होतो. खूप शिकायला मिळाले आणि खूप मजेचाही अनुभव घेतला. मला आठवतेय सुधीर घळसासीच्या नेतृत्वाखालील सरकारवर आम्ही त्या संसदेत अविश्वास प्रस्ताव आणून तो संसदीय मार्गाने, वादविवाद वगैरे करून पारितही करून घेतलेला होता. सुधीर गोखलेचा बिनतोड युक्तीवाद आम्हा विरोधी पक्षांना त्याप्रसंगी कामी आला होता. (१९९० मधली ही अशी ’त्रि सुधीरधारा’ आमच्या कायमची लक्षात राहिल. प्रेरक / मार्गदर्शक - सुधीर मुतालिक, सरकारस्थापक - सुधीर घळसासी आणि सरकारविरोधक प्रमुख - सुधीर गोखले.) आमच्या दोस्त कंपू पैकी एकेकजण असा लखलखीत हिरा आहे. त्यामुळे आजकालचा बाजारूपणा, सवंगपणा चटकन नजरेतून उतरून जातो.


मधल्या काळात एका हिंदीभाषाबहुल महाविद्यालयात अध्यापन करताना एका वादविवाद स्पर्धेचे परीक्षकपद प्राप्त झाले होते. आजकालच्या ९० % विद्यार्थ्यांचे वाचन आणि बाहेरील जगाविषयीचे आकलन तोकडे पडते हे माहिती होते, त्याचा पुनर्प्रत्यय आला. विद्यार्थ्यांनी वादविवादासाठी आपली संसदीय पद्धत सोडून देऊन टी. व्ही. वरची वादविवाद पद्धत निवडली होती. जो जेव्हढा आक्रस्ताळेपणा करेल तेव्हढा त्याचा मुद्दा बरोबर अशीच स्पर्धकांची समजूत दिसली. प्रेक्षकांमधूनही अशाच आक्रस्ताळेपणाला टाळ्या, दाद मिळताना पाहिली आणि "यानंतर इथे कुठल्याच वादविवाद स्पर्धेत प्रेक्षक म्हणून सुद्धा यायचे नाही" असा मनाशी चंग बांधला आणि त्या ठिकाणी अध्यापन करत असेपर्यंत तो पाळलादेखील.


आपल्या संस्कृतीतली ही उच्च आणि उदात्त वादविवाद प्रथा सोडून, सार्वजनिक नळांवरच्या भांडणांना लाजवेल अशा प्रकारांना आपण सर्वच भारतीय "वादविवाद" म्हणत चाललोय, याहून दुर्दैव ते अजून काय असेल ? आपलीच संस्कृती आपल्याच हाताने मातीमोल करणारे आमच्यासारखे नतद्र्ष्ट आम्हीच.


- म्हणूनच अर्णब गोस्वामीने मांडलेले मुद्दे कितीही बरोबर असले तरी त्याच्या एकंदर मांडणीमुळे त्याचे पटत नसलेला, वादविवादपटू, राम प्रकाश किन्हीकर. 

(आता अर्णबच पटत नाही म्हटल्यावर इतर सगळे चिल्ले पिल्ले आवड्ण्याचा प्रश्नच उदभवत नाही. एन डी टी व्ही, एबीपी माझा वगैरेंचा ’नॉट’ पणा फ़ेसबुक वगैरे तून वाचायला मिळतो. मुद्दाम लावून ती चॅनेल्स बघावीत एव्हढा वेळ, रूची आणि उत्साह नसतो.)




Wednesday, September 23, 2020

नागपुरी, सोलापुरी, बोलीभाषा, संस्कृती

 शेंगदाणे तेलाला "फल्लीचे तेल" आणि राॅकेलला "मातीचे तेल" म्हणणे हे वैदर्भिय मराठीचे व्यवच्छेदक लक्षण आहे.

सोलापूर जिल्ह्यात मात्र शेंगदाण्याला एक मात्रा जास्त लागून त्यांचे "शेंगादाणे" होतात. म्हणूनच की काय सोलापुरी शेंगदाण्यांची चटणी जगात अप्रतिम अशी होते.
- सोलापुरी धपाटे आणि शेंगादाणे चटणीचा निस्सीम प्रेमी पण पक्का वैदर्भी रामभाऊ घासलेटे.

Tuesday, September 22, 2020

जागो ग्राहक जागो.

 आजचा छोटासा पण महत्वपूर्ण विजय.

डिश टीव्ही ने गेल्या ३ महिन्यांपासून नवीनच प्रकार सुरू केलाय. मी कधीही न मागितलेल्या value added services माझ्या पॅकमधे टाकून देतात आणि त्याचे ५० ते १०० रूपये माझ्या रिचार्जमधून परस्पर वजा करतात.
दर महिन्याचा रिचार्ज करताना ही बाब लक्षात आली की मी ती चॅनेल्स काढून टाकण्याचा प्रयत्न करतो पण ती चॅनेल्स या लोकांनी नेमकी लाॅक्ड इन केलेली असतात.
मग
१. त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रात फोन करा.
२. खूप वेळानंतर उपलब्ध होणार्या त्यांच्या माणसाशी संपर्क करा.
३. त्याला विनंती करून ती चॅनेल्स काढून टाकण्याची विनंती करा.
यावेळी माझ्या लक्षात आल की भलेही विनंती केल्यावर त्यांनी ती चॅनेल्स काढून टाकलीत तरी ते पैसे परत मिळत नाहीत किंवा दुसर्या कुठल्या पॅकमधे अॅडजस्ट पण होत नाहीत.
या महिन्यात तर त्यांनी कहरच केला. माझ्यासारख्या मराठी माणसाच्या पॅकमधे (अर्थातच मी कधीही मागितलेले नसताना) कोरियन नाटकांचे चॅनेल सुरु करून त्याचे १०० ₹ लावून टाकले.
आज त्यांच्या ग्राहक सेवा केंद्रातूनही अत्यंत उध्दट आणि उडवाउडवीची उत्तरे मिळालीत. त्यांच्या site वर online complaint पण काहीतरी फालतू कारणांनी दाखल करून घेईनात.
मग आपली सटकली. consumerhelpline.gov.in वर सविस्तर तक्रार केली.
नंतरच्या अर्ध्या तासात डिशच्या लोकांचे दोन फोन्स आले. तासाभरापूर्वी जी सिस्टीम "करोनामुळे बंद" (त्यांनी सांगितलेले कारण) होती, ती एकदम धावू लागली. तक्रारीचे निवारण एक्सप्रेस वेगाने झाले.

Monday, September 21, 2020

"यथा काष्ठंच काष्ठंच, समेयातां महादधौ..."


 

दोन व्यक्ती. 'क्ष' आणि 'य'. (असे लिहीले की त्या प्रबंधाला शास्त्रीय असा 'फील' वगैरे येतो म्हणे. खरेखोटे डाॅक्टरच जाणो. हे डाॅक्टर साहित्यातले हो. वैद्यकातल्या डाॅक्टरांना कुठला एवढा वेळ ? 'क्ष' आणि 'य' ओळखण्याएवढा, असो)

'क्ष' आणि 'य' या जीवनप्रवासात काही काळ एकमेकांसोबत घालवतात. एकमेकांसाठी शारिरीक, मानसिक, आर्थिक झीज वगैरे सोसतात. मोठाच आनंद असतो.
अचानक काही अनामिक कारणांनी 'क्ष' आणि 'य' चे प्रवाह वेगवेगळे होतात. पण त्यात 'क्ष' हा कधीकाळी एकत्र प्रवास केल्याच्या खुणा आठवत अट्टाहास करीत राहिला, एकमेकांसाठी सोसलेल्या झीजेचे आठव करीत राहिला. 'क्ष' जड झाला. त्याच्या प्रवाहातून फेकल्या गेला. काठावर रूतला, क्वचित नवपालवीने रूजून आला.
नवी पालवी,
नवी पानझड,
नवे मरण,
नवे लाकूडपण,
नव्या प्रवाहातले नवे वाहणे,
पुन्हा नव्या 'प'ला भेटणे, दुरावणे, कुढणे,
नवे जडत्व,
नवा काठ.
तोच प्रवास पुन्हा पुन्हा . ८४ लक्ष वेळा.
त्यामानाने 'य' मोकळ्या मनाने प्रवाहासोबत पुढे गेला. आपण 'क्ष' साठी खाल्लेल्या खस्ता वगैरे म्हणजे मागील ८३,९९,९९९ मधले काही ऋण द्यायचे बाकी होते. ते आता दिले असे त्याने मानले. तो मस्त वाहत राहिला. हलका होऊन, मनमोकळा होऊन.
अंतिमतः सागराला मिळाला, सहज. अट्टाहास न करता. पुन्हा कधीच प्रवाहात न येण्यासाठी.
आपणा सगळ्यांना 'य' व्हायचय की नाही ? ८४ लक्षांचा प्रवास टाळायचाय की नाही ? मग हलके व्हा. जे घडले ते ऋण अनुबंध होते. आता फिटलेय. त्यावर फार आठव करीत जड होऊन मिरवण्यात (आणि नंतर भिरभिरण्यात) काहीही अर्थ नसतो.
- कर्माचा सिध्दांत (part 2) लिहीण्याची मनिषा असलेले रामभाई किन्ही(ठ)क्कर.
- हा स्फुटलेख नावाशिवाय किंवा स्वतःच्या नावाने शेअर करणार्याला ८४ लक्ष गुणिले ८४ लक्ष इतके वेळा प्रवाह सुटणार नाही. "पुनरपि मरणम, पुनरपि जननम.."ची भीषणता लक्षात राहू द्या रे ब्वाॅ.
हां, आता "तोच खेळ पुन्हा पुन्हा" आवडत असेल तर प्रश्नच खुंटला.
{"नेहमीच विनोदी, हलकंफुलकं का लिहीतोस रे ? जरा कधीतरी वैचारिक वगैरे लिहीत जा." सांगणार्या दोस्तकंपूच्या आग्रहावरून ही खास पोस्ट.}

Sunday, September 20, 2020

साबण, TFM (Total Fatty Matter) ,गेंड्याची कातडी वगैरे

 काहीकाही साबणांच्या वेष्टनाला जेवढा सुवास येतो त्याच्या फक्त १/१०० खुद्द त्या साबणाला आला असता तर ?

काहीकाही साबण इतके दगड असतात की एखाद्याला फेकून मारला तर मरणापूर्वी तो पाणी सुध्दा मागणार नाही. मग त्यातले TFM ७२ % असो नाहीतर ७६ % असो.
मग आपण एक दिवस तावातावात घरी निर्णय घेतो की यापुढे असला दगड साबण घरी कधीही आणायचा नाही.
पण पुढल्या २ - ३ महिन्यातच तोच साबण फक्त वेष्टण बदलून, वेष्टनांवरचा सुगंध बदलून आणि क्वचित नावही बदलून बाजारात येतो. त्या मोहक पॅकिंगला, नव्या सुगंधाला आपण नव्याने भुलतो. आणि तो साबण घरी आणतो. त्याचेही वेष्टन फोडल्यानंतरच आपल्याला आपली फसवणूक कळते.
४०० वर्षांपूर्वी आमच्या चोखोबांनी सांगून ठेवलेय
" का रे भुललासि वरलिया रंगा ?"
पण आपण आहोत की त्यांचा उपदेश वारंवार ऐकूनही पुन्हा पुन्हा भुलतो.
- वारंवार दगडासारखे साबण वापरूनही गेंड्याची कातडी न कमावू शकलेले भुलाई भुलोजी पुत्र रामभाऊ.

Thursday, September 17, 2020

काही काही एवंगुणविशिष्ट प्रथा.

 तुमच्यापैकी किती जणांना "मी केलेले खूप मोठ्ठे काम नेहेमी नेहेमी कवडीमोल होतेय. माझ्या एव्हढ्या प्रामाणिकपणे केलेल्या कामाची कुणी साधी दखलही घेत नाही. जगातला सर्वात दुर्लक्षित असामी मी एकटाच आहे." असे फ़ीलिंग येतेय ? बहुतेक सगळ्यांनाचा, नं ? थांबा. खालील उदाहरण लक्षात घ्या मग तुम्हाला तसे वाटणार नाही. 


कुठल्याही महाराष्ट्रीय लग्नाचा अविभाज्य भाग म्हणजे मंगलाष्टके. लग्नात वरमाला, वधूमाला अर्पण करायला उभे असलेल्या वधू, वरांच्या मनात लग्न या संस्थेविषयी पवित्र विचार उत्पन्न व्हावेत आणि त्यांना शुभाशिर्वाद मिळावेत म्हणून मंगल सुविचारांचे अष्टक (आठ कडव्यांचे शार्दूलविक्रिडीत वृत्तात लिहीलेले गीत) म्हणून मंगलाष्टक म्हणायचे असते. अशी प्रथा आहे. साधारण ३० - ३५ वर्षांपासून एक नवीन प्रथा यात आलेली आहे. लग्ने ठरली की नियोजित वधूकडील, नाहीतर नियोजित वराकडील (हौशी असतील तर दोन्हीकडील) मंडळी एखाद्या मंगलाष्टके करणा-या कवी / गीतकाराला गाठतात. त्याच्याकडून मंगलाष्टके आली की ती ए - ६ आकाराच्या रंगीबेरंगी कागदांवर रंगीत शाईने छापून लग्नात ती लग्नवेळी उपस्थित 

व-हाड्यांमधे वाटतात. लग्न हा विधी वधूवरांसाठी तसा रंगीबेरंगी असतोच. इतरांसाठी ही रंगांची उधळण व्हावी म्हणून रंगीबेरंगी कागदांची युक्ती असावी.



प्रातिनिेधिक चित्र. मजकुराशी संबंध असेलच असे सांगता येणार नाही.

या मंगलाष्टक नामक काव्यात मोठ्या खुबीने वधू वरांच्या आई वडीलांचे, प्रत्यक्ष वधूवरांचे, त्यांच्या आजीआजोबांचे नाव गुंफ़लेले असते. ही मंगलाष्टके सगळ्यांना वाटण्यामागचा उदात्त हेतू हाच की बोहोल्यावरच्या भटजींची पहिली एक दोन "गंगा सिंधू सरस्वती च यमुना..." किंवा तत्सम एक दोन कडवी म्हणून झालीत; (या प्रसंगी काहीकाही भटजींनाही आपली सुप्त गायनी कळा दाखवण्याची लहर हमखास येते. मग समस्त व-हाड्यांना या "थोडक्यात हुकलेल्या भीमण्णांची" गायकी ऐकावीच लागते, तो एक निराळाच मुद्दा आहे, असो.) की सगळ्या व-हाडी मंडळींनी या समूहगायनात सामील व्हावे आणि वधूवरांना सुरेल, संगीतमय आशिर्वाद मिळावेत. 

कुठल्याही हॉलीवूड सिनेमांमधे बघा. एखाद्या लग्नात, शाळेत, चर्चमधे एखादे गीत सुरू झाले की समस्त उपस्थित मंडळींना ते गीत नुसतेच पाठ असते असे नव्हे तर ते सुरावटींसकट त्यांच्या गळ्यात बसलेले असते हो. किती छान वाटत न त्यांचे ते समूहगान ऐकताना ?

पण आपण महाराष्ट्रीय नामक मंडळी काय ऐकतोय काय ? अहो, सा्धी मंत्रपुष्पांजली म्हणताना कुणी "आविक्ष्यतस्यकामप्रे...." पर्यंत पोहोचलेला असतो तर कुणी अजूनही "स्वस्ती साम्राज्यं..." पर्यंतच कसाबसा पोहोचलेला असतो. त्यात एकेकाच्या सुरांची विविधता ती काय वर्णावी ? कुणी मंद्र सप्तकात, अती मंद्र सप्तकात तर कुणी एकदम टीपेचा सूर लावलेला. सगळा कोलाहल आणि गलबला. एक सुरात गाणार कसे ? बरे नेमक्या मंगलाष्टकांच्या त्या शार्दूलविक्रीडीत वृत्ताची चाल आपण सातव्या, आठव्या वर्गात शिकलेलो असतो, त्यानंतर मराठी भाषेच्या शार्दूलाच्या विक्रीडीताशी आपण अजिबात संबंधीत नसतो त्यामुळे चालीबाबत सगळे चाचपडतच असतात. म्हणून बोहोल्याच्या आजुबाजूला उभी असलेली दोन्ही बाजूंकडील हौशी मंडळी वगळता कुणीही मंगलाष्टके म्हणण्यात आपला सूर सामील करीत नाहीत. (बरे ह्या हौशी मंडळींमधे उपवर मुलीच भरपूर असतात, हे माझे एक सामाजिक निरीक्षण. "कार्टे, त्या पिंकीच्या लग्नात जरा मंगलाष्ट्के म्हण. तिथे आमचे साहेब येणार आहेत. त्यांचा मुलगा / भाचा लग्नाचा आहे. तू लगेच डोळ्यात भरशील त्यांच्या." असे संवाद लग्नापूर्वी मी या कानांनी ऐकले आहेत हो.)

इतर व-हाडी मंडळी हातात तो रंगीबेरंगी कागद घेऊन, इकडे मंगलाष्टके सुरू असतानाच, "रामराव, कधी मिळणार आहेत हो सातव्या वेतन आयोगाचे ऍरीअर्स ?" किंवा "शामराव, काय झाल हो त्या तुकाराम मुंडेंच ?" या चर्चांमधे दंग असतात. तर समस्त स्त्री मंडळी , " ती देशपांडीण बघ, वधूपेक्षा हिचाच मेकप जास्त. शोभत नाही हो ह्या वयात." या आणि तत्सम चर्चांमधे दंग असतात. काहीकाही उद्दाम मंडळी तर त्या कागदाचा बोळा करून खिशात टाकतात, इतस्तत: फ़ेकतात. काही मंडळी त्या मंगलाष्टकांच्या कागदाचा मिळालेल्या अक्षता ठेवण्याचे पात्र म्हणून वापर करीत असतात. प्रत्येक वेळी बोहोल्यावरून "मंगलम" कानी पडले की आपली चर्चा थांबवून दोनचार अक्षता बोहोल्याच्या दिशेला उडवून आपले पवित्र कर्तव्य पार पाडतात. वधूवर तर आपल्याच तालात, आजुबाजूच्या मित्रमैत्रिणींच्या चिडवण्यात दंग असतात. वधूकडला किंवा वराकडला एखादा हौशी नातेवाईक तो मंगलाष्टकांचा कागद जपून ठेवतो किंवा लग्नात उपस्थित असलेल्यांपैकी एखाद्याच्या मुलाचे / मुलीचे लग्न ठरले असेल असा वरपिता / वधूपिता तो कागद आपल्या कार्यात त्या कवीला गाठायचेय म्हणून जपून ठेवतो. (या मंगलाष्टकांच्या कवींना याची कल्पना असतेच. म्हणून मंगलाष्टकांच्या शेवटी तो / ती आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर वगैरे छापून ठेवून आपली जाहिरात करण्याचा व्यावसायिक हक्क जपून ठेवतोच.)

लग्न लागते. सगळ्यांची धाव सुलग्न लावून वधूवरांना आशिर्वाद द्यायला किंवा ब्युफ़ेकडे असते. मांडवभर पडलेल्या कागदांकडे, कागदांच्या बोळ्यांकडे कुणाचेही लक्ष जात नाही. काहीकाही निसंतानी लहान पोट्टे (खास वैदर्भिय शब्द) एखाद्या बुकेमधली, हारामधली फ़ुले काढून त्यातल्या पाकळ्या काढून भिरकाव, वधूवरांच्या खुर्चीचा (उसवली असेल) तर फ़ोम काढून तुकडे काढून भिरकाव असले उपद्व्याप करीत असतात. (त्यांचे मायबाप मात्र मोठ्या कौतिकाने त्यांचे हे प्रताप बघत असतात, कधी काणाडोळाही करीत असतात.) त्यांच्या हातात जर हे कागद लागलेच तर त्या कागदांचेही तुकडे व्हायला वेळ लागत नाही. लग्न मांडवात सर्वत्र हे कागदाचे तुकडे विखुरलेले दिसत असतात. 

थोड्या वेळाने मांडव झाडणारी मंडळी येतात आणि इतर कच-यासोबत कवीच्या अनेक तासांच्या मेहेनतीचा कचरा टोपलीत जमा झालेला आपल्याला बघायला मिळतो. अनेक तासांची प्रचंड मेहेनत, कधीकधी यमक जुळवायला, छान कल्पना सुचायला जागवलेली रात्र याची मेहेनत अवघ्या दहा पंधरा मिनीटात अक्षरश: जमीनदोस्त होते. मला नेहेमी असे वाटते की लग्नात जर त्या कवीला निमंत्रण असेल तर त्याला हे सगळे बघून नेमके कसे वाटत असेल ? 

मग आत्ताही तुमचा दावा आहे का की तुम्ही केलेली मेहेनत ह्यापेक्षा कमी वेळात जमीनदोस्त होते म्हणून ?

- खूप लग्नप्रसंगांमधे सहभागी झालेला नसला तरी ज्या लग्नप्रसंगांमधे सहभागी झालोय ते डोळसपणे आणि पूर्णपणे झोकून सहभागी झालेला व-हाडी, राम किन्हीकर


Wednesday, September 9, 2020

परंपरा: आधुनिकता आणि कट्टरपणा, एक प्रमेय.

 सणावारांचे, कुळाचारांचे दिवस आहेत.

या कुळाचाराच्या, सणावारांच्या प्रत्येक कुटुंबपरत्वे वेगवेगळ्या प्रथा अनुभवायला येतात. किंबहुना एकाच कुटुंबात हळूहळू बदलत जाणार्या प्रथाही अनुभवायला येतात.
सहज एक विचार डोक्यात आला.
प्रत्येक कुटुंब परंपरेत दर दहा वर्षांनी एखादी "सुधारक" विचारसरणीची व्यक्ती निर्णयप्रक्रियेवर प्रभाव टाकण्याच्या क्षमतेत येत असावी आणि पारंपारिक कुळाचाराची बंधने थोडी शिथील होत असावीत.
त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबात दर २५ वर्षांनी एखादी अत्यंत भाविक मंडळी निर्णयप्रक्रिया प्रभावित करण्याच्या क्षमतेत येत असावीत. आणि स्वतःचा अत्यंत भाविकपणा काही अधिकचे नियम बनून कुटुंबातल्या प्रथा, परंपरांचा भाग बनवित असावी.
१० वर्षांनी सुधारक आणि २५ वर्षांनी अत्यंत भाविक ही कालमर्यादा ५० वर्षांपूर्वी अगदी उलट असावी असा माझा अभ्यास.
आणि पुढल्या ५० वर्षांत हेच प्रमाण, (सुधारक : भाविक) ५ वर्षेः ५० वर्षे, असे व्यस्त असेल असा अंदाज आहे.
- "समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून भारतीय प्रथा, परंपरांचा तौलनिक, कालनिगडीत आणि बहुआयामी अभ्यास"
या लठ्ठ प्रबंधाचे,
(मानव्यशास्त्रीय अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले), लेखक
प्रा. राम प्रकाश किन्हीकर.



Tuesday, September 8, 2020

पंगत: एक लुप्त होत चाललेली परंपरा आणि त्यातल्या यजमानांचे मानसशास्त्र.

 जेवणाच्या पंक्ती तर आता हळूहळू नामशेष होत आहेत. सर्वत्र ब्युफे पध्दतच आपण अवलंबिली आहे.




पण पंक्तीच्या वेळेची एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते.
ज्याघरी पंगत आहे त्या यजमानाला अक्षरशः बहुअवधानी असणे अत्यंत गरजेचे असायचे.
१. स्वयंपाकघरात चालू असलेल्या स्वयंपाकाकडे एक नजर टाकून पाकसिध्दी कितपत झालीय याचा अदमास घेणे.
२. पंगतीत वाढत असताना नवख्या वाढप्यांकडून पंक्तीप्रपंच तर होत नाही ना ? यावर सूक्ष्म लक्ष ठेवणे. (फक्त आपल्या नवरोजींच्या, बबड्या, बबडीच्याच ताटांकडे लक्ष देत, फक्त त्यांनाच उत्तमोत्तम वाढणार्या आणि इतरांकडे सपशेल दुर्लक्ष करणार्या गृहिणी सनातन काळापासून आहेत, आणि राहणार.) यजमानाला त्यावर corrective action घ्यावी लागत असे. आणि ती पण कुणालाही न दुखावता.
३. पंक्तीतला संकोची पाहुणा कोण ? यावर नीट लक्ष ठेऊन वाढणार्या गृहिणीला
"वाढ ग वाढ. त्याला गरम पुरणपोळी वाढ." असा आग्रह करणे.
४. पंक्तीत आग्रह केला नाही तर दुखावला जाणारा "जावई character" कोण ? यावरही लक्ष ठेऊन, "वसंतराव, घ्या अजून या जिलब्या. अहो एव्हढ्याने काही होत नाही." म्हणत त्याच्या ताटात जिलेबीचे अर्धे ताट रिकामे करण्याची आज्ञा वाढणारीला करून त्याच्या पोटासोबत त्याचा अहंकार सुखावणे.
५. स्वतः पंक्तीत बसून जेवण करीत असताना एखादा पदार्थ आवडला असल्याची स्वयंपाकघराकडे मोठ्याने बोलून दाद देणे.
६. मधेच स्वयंपाकघराकडे बघून "अहो, वडाभातावर वाढायला फोडणीचे तेल (जवसाचे असेल तर स्वर्गच) आणि हिंगाचे पाणी आणा." अशी आज्ञा सोडणे.
७."स्वस्थ होऊ द्या मंडळी. काही घाई नाही कामधंद्याची, आॅफिसची." असे सर्व पंगतीला आश्वस्त करणे.
या आणि इतर अनेक अवधानांना सांभाळणे हे यजमानांचे व्यवच्छेदक लक्षण असे.



आता ब्युफेत तर फक्त पत्रिकेवर "स्वरूची भोज" असे लिहून वेळ टाकली की काम भागते. आग्रहाची, यजमान ब्युफेमधे हजर असण्याची वगैरे कसलीही अट नाही. सगळे कसे अगदी सुटसुटीत.
- अनेक पंक्तीत "जावई", "संकोची तरूण" आणि "यजमाना"ची भूमिका पार पाडलेले सदगृहस्थ राम प्रकाश किन्हीकर.
(हा सुध्दा लघुलेख मला काही दिवसांनी माझ्या नावाशिवाय खूपशा व्हाॅटसअॅप ग्रुपवर वाचायला मिळेल याची खात्री आहे. उसनी विद्वत्ता मिरवायला अनेक विद्वान चोर कायम तयार असतातच. पकडले जाण्याची भीती व्हाॅटसअॅपवर तुलनेने कमी ना, म्हणून.)