Saturday, September 5, 2020

खिंड, खोरे आणि मराठी भाषा वगैरे

 आजकाल प्रवासवर्णने वाचताना जाणवतय. "खिंड", "खोरे" हे शब्द मराठी पर्यटकांनी आणि पर्यटन लेखकांनी हद्दपारच केले आहेत.

आजकाल मराठी माणूस ’जोझिला पास’ बघतो, इंडस व्हॅली मधली संस्कृती बघतो. जोझिला खिंड, सिंधू नदीचे खोरे म्हणायला आपल्या मराठी पर्यटकांना प्रचंड ’डाऊनमार्केट’ वगैरे वाटतं.
आता 'बोगद्या'ला 'सुरंग' म्हटले ("अहो, रत्नागिरीला जाताना तो करबुड्याचा सुरंग किती मोठा आहे, नाही ?") की आपली मराठी घोडी अटकेपार पाणी पिल्याची पावती मिळालीच.
नशीब, अजूनही नेरूळकडून सीबीडी बेलापूरकडे जाताना ’बेलापूर पास'’ मधून जात नाही आमचा मराठी माणूस. तसही त्या खिंडीला, माझ्या १२ वर्षांच्या नवी मुंबईच्या वास्तव्यात, ’बेलापूरची खिंड’ म्हणताना, मी खूप कमी जणांना ऐकलय. आणि ती खिंड २००६ पर्यंत तरी होती. बांधकामांसाठी डोंगर पोखरून, पोखरून ती खिंड आता सपाट प्रदेश केलेला नसला म्हणजे मिळवली.
आणखी एकः आजकाल आपण कपाटात कपडे वगैरे ठेवत नाही. "वाॅर्डरोब" असतो ना त्यासाठी. 'कपाट' वगैरे म्हणणारे आपण कागदाचे 'कपटे'च जणू.
- मराठी भाषेसाठी सर्वच सोशल मेडियावर आणि प्रत्यक्ष आयुष्यात खिंड लढवणारा अभियांत्रिकीचा प्राध्यापक राम प्रकाश किन्हीकर.

No comments:

Post a Comment