Wednesday, March 30, 2022

तुझी चिंता त्यासी सर्व आहे.

 तान्ही बाळे आपल्या आईच्या कुशीत किती आश्वस्त असतात, नाही ? ते मूल आपल्या जगातच दंग असते. आपल्या भरणपोषणाची आणि रक्षणाची सर्व काळजी आपली आई घेतेय हे त्याने अध्याहृतच धरलेले असते.

आपण भगवतीची उपासना करताना तितके आश्वस्त, तितके निश्चिन्त असतो का ? उपासना करीत असताना दरम्यान आपल्या सर्व भल्या बुऱ्याची काळजी आपली ही आई घेणार आहे ही भावना मनात स्थिर होते का ? चंडी कवच वाचत असताना ती भगवती आपल्या रक्षणासाठी सदैव सज्ज आहे ही आपली भावना दृढ होते का ? मला होणारे सर्व आधिभौतिक, आधिदैविक किंवा अध्यात्मिकही त्रास आपल्याला ज्या जगदंबेने स्वतःच्या हृदयाशी धरलेले आहे ती वाघिणीसारखी झडप घालून दूर करणारच याची आपल्याला खात्री आहे का ?
अर्गला कवच वाचताना आपण आपल्या आईकडे काही काही गोष्टींचा हट्ट करतोय आणि बालकाच्या नुसत्या चुळबुळी वरून त्याच्या मनाची अवस्था जाणून त्याचा हट्ट पुरवणाऱ्या प्रेमळ मातेप्रमाणेच आई भवानी आपला तो हट्ट ती पुरविणारच आहे अशी आपल्या मनाची धारणा होते का ?
आता दोनच दिवसांनी शुभकृत नामक नूतन संवत्सर सुरू होते आहे. या महिन्यात प्रतिपदेपासून श्रीराम नवरात्र आणि सोबतच आई भगवतीचे नवरात्रही सुरू होत असते. या संवत्सरात आपल्या उपासनेत हा जननी - बालक भाव आणूयात का ? आणि "सकळ जीवांचा करितो सांभाळ, तुज मोकलिल ऐसे नाही." या नाथ उक्तीचा अनुभव घेऊयात का ?
- अनंत जन्मांपासूनचा रेणुकादास आणि आताशा "किती भार घालू रघूनायकाला ?" या भावनेने चित्तात गलबलून जाणारा बालक, राम प्रकाश किन्हीकर

Monday, March 28, 2022

शाळा आणि पालक : एक चिंतन

करोनानंतर शाळा नियमित सुरू झाल्यात. सकाळी माझ्या कामावर जाण्याच्या वेळेत बहुतांशी शाळांच्या बसेस दिसतात आणि खूप दिवसांपासून मनात असलेली एक गोष्ट सर्वांसमोर विचारार्थ मांडण्याची इच्छा होते.

नागपूरला एका चांगल्या शिक्षण संस्थेच्या ६ शाखा आहेत. एक उत्तर नागपुरात, एक पूर्व नागपुरात, एक दक्षिण नागपुरात, एक नैऋत्य नागपुरात, एक शाखा अगदी मध्यवर्ती भागात तर आणखी एक शाखा नागपूरच्या पश्चिमेस ४० किमी अंतरावर असलेल्या एका गावात. मी नैऋत्य नागपुरात राहतो. तिथली मुले मला नागपूरबाहेरच्या किंवा थेट उत्तर नागपुरातल्या शाळेच्या बसने तिथे तिथे जाताना दिसतात. असेच चित्र पूर्व नागपुरात राहणार्या माझ्या बहिणीच्या मुलांबद्दल दिसते. त्यांना घराजवळ १ किमी अंतरावरच्या त्याच संस्थेच्या शाळेत प्रवेश मिळालेला नाही तर १० किमी दूर दक्षिण नागपुरातल्या त्याच संस्थेच्या शाखेत प्रवेश मिळालाय.
७ -८ वर्षांची कच्चीबच्ची आपला खेळण्याचा, अभ्यासाचा अमूल्य असा दोन अडीच तासांचा वेळ, अशा नाहक प्रवासात का घालवतात ? या भावनेने त्यांच्याविषयी अपार कारूण्य दाटून येते. एकाच संस्थेच्या ६ शाखांमधल्या शाळांच्या दर्जात काय फरक असणार ? मग पालक मंडळी त्याच संस्थेच्या विशिष्ट शाखेतच प्रवेश मिळायला हवा हा हट्टाग्रह का धरतात ? आणि ईश्वरचिठ्ठीद्वारे सोडत काढून प्रवेशनिश्चिती करणारी संस्थासुध्दा, शाळेच्या एखाद्या शाखेपासून विशिष्ट परिघात राहणार्या मुलांचे प्रवेश त्याच शाखेत करण्याचा आग्रह का धरीत नाही ? ही न उलगडणारी कोडी.
आपण बालपणातले नक्की काय गमावतोय ? हे त्या बालकांना आज कळत नसेल पण त्यांच्या पालकांनाही कळत नसेल तर ही शोकांतिका आहे. कळत असूनही एकाच संस्थेच्या एखाद्या विशिष्ट शाखेच्या दर्जाविषयी भ्रामक कल्पना करून घेत "माझ्या पाल्याला याच शाखेत पाठवायचे / पाठवायचे नाही." असा हट्ट करणारे पालक किती मोठा अपराध करतायत हे त्यांना कळायला हवे.
शाळेच्या एकाच कुठल्यातरी शाखेचे सगळेच विद्यार्थी आय आय टी त जातात आणि इतर शाखेतला एकही जात नाही ही किती भ्रामक कल्पना आहे ? हे पालकांना कधीच कळणारच नाही का ?
- २७ वर्षे शिक्षणक्षेत्रात काम केल्यावर प्राथमिक शिक्षणातच आमूलाग्र बदल घडवून आणणे अत्यंत जरूरीचे आहे या ठाम जाणिवेचा, राममास्तर.

Sunday, March 27, 2022

एक कधीही न बाळगलेली महत्वाकांक्षा

 आयुष्यात अनेक महत्वाकांक्षा बाळगल्यात, बाळगतो आहे आणि बाळगत राहणार आहे. उदाहरणार्थ अगदी बालपणी थोडे प्रवास वगैरे कळायला लागल्यावर एस टी बसचा किंवा रेल्वेचा चालक किंवा वाहक / गार्ड होण्याची महत्वाकांक्षा होती. थोडे मोठे झाल्यावर महत्वाकांक्षा बदलल्यात.

पण आज सहज चिंतन करताना लक्षात आले की पुरुषांच्या सलून मध्ये काही काही केशकर्तन नमुन्याचे फोटोज लटकवलेले असतात, (तुम्हाला यातली कुठली स्टाईल करायची आहे ? या गर्भित प्रश्नासह. काही काही शौकीन अगदी त्यातलीच एखादी स्टाईल हवी असा हट्ट धरतात आणि त्या कारागिराला भंडावून सोडतात. केशकर्तन झाल्यानंतर त्या कारागिराला या अँगल ने आरसा धरायला लाव, त्या अँगल ने आरसा धरायला लाव असे अनंत उद्योग करून आपल्या जीवाचे समाधान करायला लावतात.) त्यात आपला असा फोटो यावा असे मज पामराला या जन्मात कधीही वाटलेले नाही.
एकतर स्टाईल वगैरे करावी एव्हढे केसच कधी डोईवर नसायचेत. आणि जी स्टाईल एका दिवसात खराब होईल तिच्यासाठी एव्हढा वेळ घालवणे आम्हाला मुळी नामंजूर होते. एकदा आपली डोई त्या कारागिरांच्या हातात दिली की "बारीक" एव्हढा शब्द उच्चारून आपली हनुवटी आपल्याच बरगडी च्या पहिल्या हाडाच्या आसपास खुपसणे आणि त्या कारागिरांचे आपल्या डोईवरचे कार्य संपेपर्यंत सलूनमध्ये सुरू असलेली १९८० - १९९० च्या दशकातली कुमार सानू, उदीत नारायणची गाणी ऐकत गपचूप बसणे हे कार्य आम्ही अगदी नेमस्तपणे करीत आलेलो आहे.
बाकी या बाबतीत आमचे अर्धांग भाग्यवान. लग्नापूर्वी तिच्या (आणि तिच्या धाकट्या भगिनीमंडळांचे ) असे हेअर स्टाईल चे फोटो काढून त्यांच्या त्यांच्या "पार्लर " वाल्या आपापल्या पार्लर्स मध्ये लावायच्यात ही बातमी मला तिनेच सांगितली. हे ऐकून त्यांच्याबद्दल आदर वाढला.
आज मात्र आमच्या त्या कारागीर मित्राच्या कामगिरीवर आम्ही फारच खूष झालेलो होतो. आता दरवेळी अशीच स्टाईल करावी या विचाराने उचल खाल्ली आणि पुढच्या वेळेला आम्हाला आणि त्या कारागिरालाही संदर्भ म्हणून घरी परतल्या परतल्या हे असले फोटो काढून ठेवायला कन्येला सांगितले.



आता ही हेअर स्टाईल सुद्धा मला शोभत नाही हे मला ठाऊक आहे पण

"जातीच्या सुंदरांना काहीही शोभते" असे म्हणतात. तसेच ज्याच्या डोईवर पुरेसे केसच नाहीत त्याला कुठलीच हेअर स्टाईल करणे (आणि ती शोभणे) शक्यच नाही हे सत्य लक्षात आले हे ही नसे थोडके.
- एकदाचे संपूर्ण टक्कल पडले तरच आपली हेअर स्टाईल अगदी पूर्णत्वास जाईल या अगदी मनापासून असलेल्या मताचा, राम किन्हीकर.

काश्मीर फाइल्स , कराडच्या आठवणी

कराडला शिकत असताना मी वर्षभरात किमान ५०० पत्रे तरी पाठवायचो. (प्रत्येक पाठविलेल्या पत्राचा हिशेबही आहे.) मलाही दिवसाला सरासरी १ याप्रमाणे सगळ्या नातेवाईक, मित्र मंडळींची पत्रे यायची. होमसिक असलेल्या हाॅस्टेलरसाठी ही पत्रे खूप मोठा आधार होती. त्यातली बरीच नातेवाईक मंडळी अशी आहेत की त्यांनी त्यांच्या आयुष्यातले एकमेव असे पत्र मला लिहीले असेल.





कराडला गेल्यावर पहिलाच मुक्काम तिथल्या संघ कार्यालयात झाला होता. आणि हाॅस्टेलला थोडे स्थिरस्थावर झाल्यावर समविचारी मित्रांसह विद्यार्थी परिषदेच्या कामात आम्ही गुंतलो होतो. १९९०, जानेवारी महिन्यापासूनच काश्मीरात काहीतरी गडबड सुरू असल्याची जाणीव झाली होती. आम्ही सगळेच धडपडे आणि बहुश्रुत तरूण होतो. वेगवेगळ्या माध्यमांमधून बातम्या वाचून "Reading between the lines" करत आम्ही ती भीषणता अनुभवत होतो. त्यातच काश्मीरातून विस्थापित झालेल्यांच्या अनुभवकथनाचा कार्यक्रम संघाशी संबंधित एका संस्थेने पुण्यात ठेवला होता. त्यांच्या मदतीसाठी सर्वसामान्यांना आवाहनही केले होते. आम्हाला आठवतय आम्ही कराडच्या चावडी चौकात या स्थलांतराच्या निषेधाचाही कार्यक्रम आयोजित केलेला होता. जोरदार घोषणाबाजी, फलकबाजी यांनी आम्ही सुधीर मुतालिकच्या नेतृत्वाखाली चावडी चौक दणाणून सोडला होता.
त्याकाळी आम्हा तरूणांना एखाद्या सद्यस्थितीबद्दल महत्वाच्या विषयावर अभ्यास करून बोलावे लागत असे. त्यासाठी कराडच्या नगर वाचनालयाचे सभासदत्व आम्ही घेतले होते (वार्षिक शुल्क रू. ३ फक्त) एखाद्या विषयावर ग्रंथालयात जाऊन, संदर्भ ग्रंथ चाळून, ताज्या बातम्यांचा अभ्यास करून आपले मत त्याठिकाणी मांडावे लागत असे. त्या भाषणानंतर श्रोत्यांसह प्रश्नोत्तरांचाही कार्यक्रम होत असे. ज्ञानात भर टाकणारा, सामाजिक दृष्ट्या सजग करणारा, व्यक्तिमत्व सर्वांगाने फुलविणारा हा तत्कालीन उपक्रम.
आज #TheKashmiriFiles बद्दल वाचताना, ऐकताना मनात कसलीच उत्सुकता का वाटत नाहीये ? याचा मनोमन धांडोळा घेतला असताना मला ही जुनी पत्रे सापडलीत आणि माझा मलाच उलगडा झाला. या सगळ्या अनुभवातून आम्ही तर १९९० मध्येच गेलोय. तेव्हाचा चटका ताजाच आहे. आता त्यावर हा नवा चटका बसतच नाहीये.
- संघ आणि अभाविप कार्यकर्ता, राम प्रकाश किन्हीकर.

Saturday, March 26, 2022

सर्व्हिस मोटार

आमच्या वडिलांकडून, घरातल्या इतर मोठ्यांकडून मला माझ्या जन्मापूर्वीचा चंद्रपूर - नागपूर प्रवासाचा इतिहास कळला तो साधारण असा.

१९६० च्या दशकात चंद्रपूर ते नागपूर मार्गावर "बालाजी सावकार" यांची "सर्व्हिस मोटार" चालत असे. ही बस चंद्रपूर ते नागपूर हा प्रवास मूल - सिंदेवाही - नागभीड - भिवापूर - उमरेड या जवळपास २०० किमी मार्गाने करीत असे. सध्याचा नागपूर - बुटीबोरी - जांब - वरोरा - भद्रावती - चंद्रपूर हा १५० किमी अंतराचा मार्ग साधारणतः १९७० च्या आसपास प्रचलित झाला असावा.



सर्व्हिस मोटारींची, त्यातल्या प्रवासांची वर्णने वडील मंडळींकडून आणि मराठी साहित्यातून वाचलेली आहेत. परवा आमच्या ग्रुपवर अशाच एका जुन्या खाजगी बसचा फोटो सापडला आणि ही सगळी वर्णने आठवलीत.
गेल्या ३० वर्षात नागपूर ते चंद्रपूर प्रवासाच्या बदलत गेल्या, विकसित होत गेलेल्या स्वरूपाचा आढावा इथे.
- "सर्विस मोटारीच्या टायमाला असला तरास नव्हता." या वाक्याचे आणि सबंध "म्हैस" कथेचे अक्षरशःसहस्र वेळा पारायण केलेला पुलप्रेमी, बसफॅन, राम.

मराठी दूरचित्रवाणी मालिका आणि आणखी एक पैलू .

 सिरीयल्स सुरू होतात तेव्हा नटनट्यांचे चेहेरे अगदी ताजेतवाने असतात.

पण दोन दोन, तीन तीन वर्षे रोजच्या रोज कण्हत कुथत (काड्या चहाड्या करण्याचे नवनवे प्रकार शोधत पुढे चालवलेल्या सिरीयल्समुळे) वेळी अवेळी असलेल्या शुटिंग शेड्युल्समुळे, जेवणाखाण्याच्या आणि झोपेच्या वेळा न सांभाळता आल्याने त्या कालानंतर अगदी सुजल्यासारखे दिसायला लागतात. डोळ्यांमध्ये थकवा दिसायला लागतो. डोळ्यांखालची काळी वर्तुळे लपवायला मेकप पुरत नाही.
मग दोनतीन वर्षांनंतर असे चेहेरे टी व्ही वरच्या नव्या मालिकेत कुणीही घेत नाही.
मला आश्चर्य वाटतं, ज्या भांडवलाच्या जोरावर आपल्याला ओळख, पैसा मिळतोय ते भांडवल असे उधळून लावायला ही मंडळी कशी काय तयारी दर्शवितात ? की तत्कालीन फायद्यापुढे दीर्घकालीन तोटा यांच्या लक्षातच येत नाही ?
चित्रपटांचे निराळे आहे. त्यांच्या शुटिंगचा कालावधी २ ते ३ महिनेच असतो. त्यादरम्यान झालेले अतिश्रम तेवढे दिसून येत नाहीत.
सध्या मातोश्री आजारी आहेत. सोबत हाॅस्पिटलमध्ये असताना बर्याच सिरीयल्स बघाव्या लागल्यात. काही महिन्यांपूर्वी त्यांचे प्रोमोज बघितले होते. त्यावेळेसची नट, नट्या आदि मंडळी आणि आत्ता बघितलेली तीच मंडळी यांच्यात स्पष्ट फरक दिसतोय.
जुन्या काळसारखे १३, २६ किंवा ३० च भागांची, सशक्त कथानकाची मालिका बनवून दर महिन्याला वेगवेगळ्या कथानकांच्या मालिका जर सादर केल्यात तर प्रेक्षक आजपेक्षा दसपट चांगला प्रतिसाद देतील हे न कळण्याइतपत मालिका निर्माते आणि दिग्दर्शक बधीर झालेत का ?
- गेल्या १० वर्षांपासून घराला सगळ्या मालिकांच्या प्रदूषणापासून मुक्त ठेवण्यात यश आलेला तरीही बाहेर हे प्रदूषण कधीमधी बघावे लागल्याने अस्वस्थ होणारा, विनय आपटे, विनायक चासकर, दिलीप प्रभावळकर प्रभृतींचा चाहता, रामूभैय्या नकलाकार.

Friday, March 25, 2022

मराठी माणूस आणि व्यावसायिकता.

नागपूरात "विष्णुजी की रसोई" सुरू झाल्यानंतर वर्षात साधारणतः १० ते १२ वेळा या दराने आम्ही तिथे गेलो असू. वेगवेगळ्या निमित्ताने, वेगवेगळ्या गटांमध्ये, कधी नुसते कुटुंबियांसह. इथले सात्विक वातावरण आणि सात्विक अन्न हे मन मोहून टाकणारे आहे. केवळ उदरभरण न करता यज्ञकर्म पार पाडत असल्याची अनुभूती आपल्या घरानंतर विष्णुजी की रसोई, मालेगावचा " साई कार धाबा" (यावर मी एक लेख आणि ब्लाॅग लिहीलाय.) आणि देऊळगावराजा इथला "चैत्रबन धाबा" (यावर मी एक सविस्तर लेख लिहीणार आहे.) इथेच येते.


आजही आम्ही सात्विक भोजनाचा आनंद घेण्यासाठी "विष्णुजीं" कडे गेलो होतो. आमच्या दिनचर्येत रात्रीचे जेवण ७ ते ७.३० पर्यंत आटोपून घेतो. त्यापेक्षा अधिक उशीर झाला तर जेवण न करता आम्ही सगळे अगदी अल्पोपहारच घेतो.

आम्ही संध्याकाळी ७.३० ला तिथे पोहोचलो तेव्हा जेवणाची सिध्दता नुकतीच सुरू होती. आजकाल सगळीच मंडळी रात्री ८.३० ते ९.३० च्या दरम्यान जेवत असतात त्या अंदाजाने संध्याकाळी ७.३० च्या "विष्णुजीं"च्या तयारीत काही त्रुटी असणे स्वाभाविक होते. आम्हाला त्याचा अनुभव आल्यावर आम्ही सुरूवातीलाच त्याविषयी थोडी नाराजी तिथल्या व्यवस्थापक मंडळींकडे (बहुधा विष्णुजींचे धाकटे भाऊ) यांच्याकडे तोंडीच व्यक्त केली.

एका सामान्य माणसाच्या थोड्याशाच नाराजीवर भराभर सूत्रे हललीत आणि अक्षरशः दोन मिनिटांमध्ये "विष्णुजीं" च्या नावलौकिकाला साजेशी अशी सुव्यवस्था तिथे प्रस्थापित झाली होती. आमचे जेवण झाल्यानंतर निघताना मी त्या व्यवस्थापकांचे या बाबतीत आवर्जून आभारही मानलेत.

"मराठी माणूस व्यावसायिकतेत मागे पडतो.", "मराठी व्यावसायिक आत्ममग्न आणि ग्राहकविन्मुख आहेत." ही ओरड आपण नेहेमी ऐकतो पण विष्णु मनोहरांसारख्यांकडे बघितल्यावर याचा अगदी विपरीत अनुभव येतो. इतकी आतिथ्यशीलता पंजाबी, गुजराथी व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्येही अनुभवायला येत नाही.

माणसे उगाचच मोठी व्यावसायिक होत नाही.

अत्त्युच्च पदी असलेल्या व्यावसायिकाच्या अंगचे सदगुण,त्याची तत्वे त्या आस्थापनात काम करणार्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत झिरपून त्याप्रमाणे सगळ्यांचे आचरण घडते ते आस्थापन एकसंधपणे, एकदिलाने आणि एक एकक म्हणून काम करतेय हे निश्चित. त्यासाठी ग्राहकांच्या आशिर्वादाचे असे भरपूर पुण्य पाठीशी असावे लागते.
- एक सर्वसामान्य आणि तृप्त ग्राहक, राम भोजनभाऊ.

Tuesday, March 8, 2022

सकारात्मकतेचे चिंतन : अनुभवांच्या विजयखुणा

चेहेऱ्यावरची एक एक सुरकुती म्हणजे

झेललेल्या एका एका अपमानाची आठवण.

कपाळावरची एक एक आठी म्हणजे
झालेल्या अन्यायाची एक एक सल.
डोळ्याखालची तपकिरी, काळी वर्तुळे म्हणजे
आपल्या स्वप्नांची आपल्याच लोकांनी केलेली माती.
याशिवाय मनाचं झालेलं शेण, मनावर उठलेले ओरखडे हे सगळे मोजायचे किती ? आणि कशासाठी ?
पण मग लगेच
लक्षात येत की,
अरे या सगळ्या सुरकुत्या, आठ्या, वर्तुळांनीच तर आपल्या चेहेऱ्याला आत्मविश्वासाची झळाळी दिली आहे.
आपल्या मनाच्या झालेल्या शेणातूनच इतरांचे मन ओळखण्याचा आणि त्यानुसार मने राखण्याचा सुगंध आपल्यात उफाळून आलाय.
मनावर उठलेल्या ओरखड्यांनीच तर आपल्या मनाला पोलादासारखे कणखर पण लवचिक बनवलय.
प्रत्येक आघाताने काहीतरी दिलय, आपले व्यक्तित्व समृध्द केलेय.
चेहेऱ्यावरच्या या सगळ्या खुणाच तर आपल्या अनुभवांच्या विजयखुणा आहेत.
त्या सगळ्या आघातांचे तर आपण सदैव ऋणीच असायला हवे, नाही का ?
- राम प्रकाश किन्हीकर (सकारात्मकतेचे मुक्तछंद चिंतन, ०७०३२०२२)

Monday, March 7, 2022

नकलांचा वारसा

किन्हीकर घराण्यातला नकलांचा वारसा पुढे चालवताना.

स्थळः यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड.
फेब्रुवारी १९९०.



Sunday, March 6, 2022

साधेपणाचा संस्कार

 १९९२.

स्थळः कराड
आमची, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची एक बैठक.
बैठकीत निमंत्रित म्हणून आमच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. जी. सी. मानकर सर आणि आमच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातले ज्येष्ठ प्राध्यापक डाॅ. जे. जी. मुळे सर.
बैठकीच्या शिरस्त्यानुसार बैठक सुरू होण्यापूर्वी सामील सदस्यांनी आपापला परिचय सर्वांना करून द्यायचा असतो. तसा तो एका शिस्तीत सुरू झाला.
मानकर सरांचा क्रमांक आल्यानंतर त्यांनी "मी जी सी मानकर, शिक्षक आहे." एव्हढाच परिचय दिला. एक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्राचार्य हा शासनाच्या राजशिष्टाचारानुसार बर्याच मोठ्या अधिकाराचा मानकरी असतो. शिवाय त्या पदाला सामाजिक प्रतिष्ठाही फार मोठी असते. मानकर सर एक प्रशासक म्हणून तर खूप मोठ्ठे होते पण एक माणूस म्हणूनही खूप खूप मोठ्ठे होते. (त्यांच्या अंतरंगातील साध्या निर्मळ माणसाचे आम्हाला झालेले दर्शन हा एका वेगळ्या लेखाचा विषय आहे.) पण त्या बैठकीत त्यांचा हा सहजसुलभ साधेपणाचा पैलू आम्हाला त्यांचे निराळेच दर्शन घडवून गेला.
त्यानंतर आमच्या मुळे सरांची स्वपरिचयाची वेळ होती. एक अत्यंत विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, एक उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक, कोयना भूकंपानंतर महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या समितीतले भूगर्भशास्त्रीय तज्ञ असा त्यांचा प्रोफाईल खूप जोरदार होता. (शासकीय सेवेनंतर सरांनी चिखली आणि औरंगाबादला खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्राचार्य पद भूषविलेले होते.) पण परिचय देताना त्यांनी "मी जयकुमार मुळे, शिक्षक आहे." अशीच स्वतःची ओळख करून दिली होती. १९९२ मध्ये शिक्षणक्षेत्रात पी. एच. डी. असणारी खूप कमी आणि खूप थोर माणसे होती. पण मुळे सरांनी स्वपरिचयादरम्यान डाॅक्टर असल्याबद्दलचा स्वतःचा उल्लेखही त्या बैठकीत कटाक्षाने टाळला होता.
बैठकीचे कामकाज पुढे सरकले. बैठकीचा इतर तपशील लक्षात नाही पण आमच्या या दोन शिक्षकांचा खूप मोठ्ठा साधेपणा आमच्या हृदयावर कायमचा कोरला गेला हे मात्र नक्की.
आज ३० वर्षांनंतर मी सुध्दा त्याच शिक्षकी पेशात एकापेक्षा एक स्वप्रौढी मिरवणारे, आडात आणि पोहर्यातही काहीच नसलेले नमुने अनुभवतोय. त्या पार्श्वभूमीवर आमच्या शिक्षकांचे मोठेपण अगदी आभाळाएवढे होते. ज्ञानोबामाऊलींच्या "चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन" या उक्तीची प्रतिती देणारे.
आजची एकूणच शिक्षणक्षेत्रातली अवस्था पाहिल्यानंतर अशी मंडळी आजकाल कुठे गेलीत ? या प्रश्नाचे उत्तर एका आंग्ल भाष्यकाराने दिले आहे.
"When short people tend to cast long shadows, Its time for sun to set."
- कितीही काळ लोटला तरी स्वतःवर झालेले उत्तम संस्कार न विसरणारा कृतज्ञ विद्यार्थी, कुमार राम प्रकाश किन्हीकर.

Saturday, March 5, 2022

हळूहळू बाळसे धरणारी नागपूर मेट्रो

आज संध्याकाळी काही कामानिमित्त बर्डीवर जायचे होते. आजकाल शनिवार रविवारी नागपुरात बाहेर पडून गाडी चालवणे म्हणजे एक शिक्षाच वाटते. त्यातून बर्डीसारख्या गर्दीच्या ठिकाणी गाडी कुठे पार्क करावी ? हा एक वेगळाच प्रश्न. रस्त्यावरच वेडीवाकडी गाडी लावून स्वतः खरेदीसाठी बिनधास्त निघून जाण्याचा निर्लज्जपणा आमच्या अंगी बाणलेला नाही. अर्थात तो बाणावा ही इच्छाही नाही. बरे बर्डीवर जाणे खूप दिवसांपासून लांबणीवर टाकत आलेलो आहे. आता फ़ार लांबणीवर टाकणे जिवावर आलेले होते.

सकाळी सकाळी या समस्येचा विचार करताना सोपा उपाय सुचला. सुपत्नीला तो विचार सांगितला आणि चटकन तिलाही पटला.
संध्याकाळी महाविद्यालयातून घरी आलो. चहा घेतला. फ़्रेश झालो आणि आम्ही दोघे दुचाकीवर निघालो ते थेट जवळच्या जयप्रकाशनगर मेट्रो स्थानकावर. दुचाकी मेट्रो स्थानकात पार्क करून आम्हा दोघांचे जयप्रकाशनगर ते बर्डी जाण्यायेण्याचे प्रत्येकी १० रूपयांचे तिकीट काढले. (बर्डीवर दुचाकी पार्किंगसाठी १५ रूपये आणि चारचाकी पार्किंग साठी ५० रूपये मोजावे लागतात.) १० मिनीटांच्या आत मेट्रो आली आणि वातानुकुलीत गारेगार मेट्रोने रस्त्यावरच्या वाहतुकीची चिंता न करता आम्ही चक्क पुढल्या ३० मिनीटांत बर्डीवर होतो.





बर्डीवर चारचाकी पार्क करून आमच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी जेव्हढी पायपीट करावी लागते तेव्हढीच पायपीट मेट्रो स्टेशनपासून आमच्या नियोजित स्थळी जायला आम्हाला करावी लागली. अक्षरशः ४० व्या मिनीटाला आम्ही परतीच्या मेट्रोत होतो.
दीड तासात आम्ही आमच्या घरापासून बर्डीवर जाऊन विना चिंतेचे परतलो. गर्दीतून ड्रायव्हिंग करण्याचा ताण नाही, वाटेत होणा-या ट्रॅफ़िक जामची कटकट नाही, पार्किंग शोधण्याचा त्रास नाही. मस्त गारेगार आणि स्वस्तात मस्त जलद प्रवास. बस्स. यानंतर बर्डीवर जायला नेहेमी हाच मार्ग घ्यायचा हे आम्ही नक्की केले. आता तर नागपूर मेट्रोची ऍक्वा लाईन इतवारीपर्यंत सुरू होण्याची आम्ही मनापासून वाट बघतोय. एकदा ती झाली की इतवारी आणि महालच्या आमच्या वा-याही मेट्रोनेच करायच्यात हे आम्ही नक्की केले.
यापूर्वी मेट्रोची जॉय राइड आम्ही सहकुटुंब घेतली होती. अगदी खापरी ते बर्डी ते लोकमान्य नगर आणि परत अशी एकूण साडेतीन तास मेट्रो प्रवासाची मजा आम्ही लुटलेली होती. पण हा प्रवास उपयुक्त आहे आणि त्याची उपयुक्तता आपण वाढवली पाहिजे ही भावना आज दृढ झाली.
मेट्रो स्टेशन्स पासून आसपासच्या परिसरात पूरक सेवा म्हणून इलेक्ट्रीक रिक्षा / आपली बस सेवा अगदी रास्त दरात उपलब्ध झाल्यात (५ रूपये ते १० रूपये प्रतिमाणशी) तर मेट्रोला अधिक चांगली पसंती मिळू शकेल असे वाटले. एकंदर नागपूर मेट्रो हळूहळू बाळसे धरतेय हे पाहून मनस्वी आनंद झाला.
- एक उत्साही प्रवासी पक्षी रामूभैय्या नागपूरकर.