Sunday, March 27, 2022

एक कधीही न बाळगलेली महत्वाकांक्षा

 आयुष्यात अनेक महत्वाकांक्षा बाळगल्यात, बाळगतो आहे आणि बाळगत राहणार आहे. उदाहरणार्थ अगदी बालपणी थोडे प्रवास वगैरे कळायला लागल्यावर एस टी बसचा किंवा रेल्वेचा चालक किंवा वाहक / गार्ड होण्याची महत्वाकांक्षा होती. थोडे मोठे झाल्यावर महत्वाकांक्षा बदलल्यात.

पण आज सहज चिंतन करताना लक्षात आले की पुरुषांच्या सलून मध्ये काही काही केशकर्तन नमुन्याचे फोटोज लटकवलेले असतात, (तुम्हाला यातली कुठली स्टाईल करायची आहे ? या गर्भित प्रश्नासह. काही काही शौकीन अगदी त्यातलीच एखादी स्टाईल हवी असा हट्ट धरतात आणि त्या कारागिराला भंडावून सोडतात. केशकर्तन झाल्यानंतर त्या कारागिराला या अँगल ने आरसा धरायला लाव, त्या अँगल ने आरसा धरायला लाव असे अनंत उद्योग करून आपल्या जीवाचे समाधान करायला लावतात.) त्यात आपला असा फोटो यावा असे मज पामराला या जन्मात कधीही वाटलेले नाही.
एकतर स्टाईल वगैरे करावी एव्हढे केसच कधी डोईवर नसायचेत. आणि जी स्टाईल एका दिवसात खराब होईल तिच्यासाठी एव्हढा वेळ घालवणे आम्हाला मुळी नामंजूर होते. एकदा आपली डोई त्या कारागिरांच्या हातात दिली की "बारीक" एव्हढा शब्द उच्चारून आपली हनुवटी आपल्याच बरगडी च्या पहिल्या हाडाच्या आसपास खुपसणे आणि त्या कारागिरांचे आपल्या डोईवरचे कार्य संपेपर्यंत सलूनमध्ये सुरू असलेली १९८० - १९९० च्या दशकातली कुमार सानू, उदीत नारायणची गाणी ऐकत गपचूप बसणे हे कार्य आम्ही अगदी नेमस्तपणे करीत आलेलो आहे.
बाकी या बाबतीत आमचे अर्धांग भाग्यवान. लग्नापूर्वी तिच्या (आणि तिच्या धाकट्या भगिनीमंडळांचे ) असे हेअर स्टाईल चे फोटो काढून त्यांच्या त्यांच्या "पार्लर " वाल्या आपापल्या पार्लर्स मध्ये लावायच्यात ही बातमी मला तिनेच सांगितली. हे ऐकून त्यांच्याबद्दल आदर वाढला.
आज मात्र आमच्या त्या कारागीर मित्राच्या कामगिरीवर आम्ही फारच खूष झालेलो होतो. आता दरवेळी अशीच स्टाईल करावी या विचाराने उचल खाल्ली आणि पुढच्या वेळेला आम्हाला आणि त्या कारागिरालाही संदर्भ म्हणून घरी परतल्या परतल्या हे असले फोटो काढून ठेवायला कन्येला सांगितले.



आता ही हेअर स्टाईल सुद्धा मला शोभत नाही हे मला ठाऊक आहे पण

"जातीच्या सुंदरांना काहीही शोभते" असे म्हणतात. तसेच ज्याच्या डोईवर पुरेसे केसच नाहीत त्याला कुठलीच हेअर स्टाईल करणे (आणि ती शोभणे) शक्यच नाही हे सत्य लक्षात आले हे ही नसे थोडके.
- एकदाचे संपूर्ण टक्कल पडले तरच आपली हेअर स्टाईल अगदी पूर्णत्वास जाईल या अगदी मनापासून असलेल्या मताचा, राम किन्हीकर.

No comments:

Post a Comment