Saturday, March 26, 2022

मराठी दूरचित्रवाणी मालिका आणि आणखी एक पैलू .

 सिरीयल्स सुरू होतात तेव्हा नटनट्यांचे चेहेरे अगदी ताजेतवाने असतात.

पण दोन दोन, तीन तीन वर्षे रोजच्या रोज कण्हत कुथत (काड्या चहाड्या करण्याचे नवनवे प्रकार शोधत पुढे चालवलेल्या सिरीयल्समुळे) वेळी अवेळी असलेल्या शुटिंग शेड्युल्समुळे, जेवणाखाण्याच्या आणि झोपेच्या वेळा न सांभाळता आल्याने त्या कालानंतर अगदी सुजल्यासारखे दिसायला लागतात. डोळ्यांमध्ये थकवा दिसायला लागतो. डोळ्यांखालची काळी वर्तुळे लपवायला मेकप पुरत नाही.
मग दोनतीन वर्षांनंतर असे चेहेरे टी व्ही वरच्या नव्या मालिकेत कुणीही घेत नाही.
मला आश्चर्य वाटतं, ज्या भांडवलाच्या जोरावर आपल्याला ओळख, पैसा मिळतोय ते भांडवल असे उधळून लावायला ही मंडळी कशी काय तयारी दर्शवितात ? की तत्कालीन फायद्यापुढे दीर्घकालीन तोटा यांच्या लक्षातच येत नाही ?
चित्रपटांचे निराळे आहे. त्यांच्या शुटिंगचा कालावधी २ ते ३ महिनेच असतो. त्यादरम्यान झालेले अतिश्रम तेवढे दिसून येत नाहीत.
सध्या मातोश्री आजारी आहेत. सोबत हाॅस्पिटलमध्ये असताना बर्याच सिरीयल्स बघाव्या लागल्यात. काही महिन्यांपूर्वी त्यांचे प्रोमोज बघितले होते. त्यावेळेसची नट, नट्या आदि मंडळी आणि आत्ता बघितलेली तीच मंडळी यांच्यात स्पष्ट फरक दिसतोय.
जुन्या काळसारखे १३, २६ किंवा ३० च भागांची, सशक्त कथानकाची मालिका बनवून दर महिन्याला वेगवेगळ्या कथानकांच्या मालिका जर सादर केल्यात तर प्रेक्षक आजपेक्षा दसपट चांगला प्रतिसाद देतील हे न कळण्याइतपत मालिका निर्माते आणि दिग्दर्शक बधीर झालेत का ?
- गेल्या १० वर्षांपासून घराला सगळ्या मालिकांच्या प्रदूषणापासून मुक्त ठेवण्यात यश आलेला तरीही बाहेर हे प्रदूषण कधीमधी बघावे लागल्याने अस्वस्थ होणारा, विनय आपटे, विनायक चासकर, दिलीप प्रभावळकर प्रभृतींचा चाहता, रामूभैय्या नकलाकार.

No comments:

Post a Comment