Wednesday, March 10, 2021

देव बाजारचा भाजीपाला न्हाई रे.

 आजवरच्या अनेक उदाहरणांमधून एक स्पष्ट झालय की अनेक तपस्वी, योग्यांना अनंत वर्षांच्या तपस्येनंतरही हाती न सापडणारा परमेश्वर, (जगाच्या दृष्टीने) अशिक्षित गौळणींच्या अनन्य व भोळ्या भक्तीसाठी त्यांच्या तालावर अक्षरशः नाचतो.

वेदांनाही वर्णन करता न येणारा असा तो परमात्मा भक्ताने मनापासून आणि भावपूर्ण अवस्थेत मारलेल्या साध्या हाकेच्या भाकेत गुंतून पडतो.
सगळ्या संतांच्या शिकवणुकीचे एकच सार. भगवंताशी खरे वागा, त्याला मनापासून आळवा, आळवताना मनात त्याच्याविषयी भाव असू द्या.
"त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसि,
त्वमेव केवलं कर्तासि,
त्वमेव केवलं धर्तासि,
त्वमेव केवलं हर्तासि"

हे म्हणताना तो लंबोदर, वक्रतुंड, गजानन आत्ता या क्षणी आणि सदैव आपल्या पाठीशी आहे ही भावना दृढ झाली
की
नंतरच्या "ऋतं वच्मि, सत्यं वच्मि" या खरी धार येईल.
बाकी "आम्ही दीड मिनीटांत गणपत्यथर्वशीर्षाचे एक आवर्तन करतो" अशा फुशारक्या मारून या जगात कमीत कमी वेळात सहस्त्रावर्तन पार पाडण्याचा विक्रम तेवढा करता येईल
पण
"देव अशान भेटायचा न्हाई रे, देव बाजारचा भाजीपाला न्हाई रे." हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे वचनही तेवढेच खरे.
- "माता च पार्वती देवी, पिता देवो महेश्वरा, बांधवा शिवभक्ताश्च" हे मनापासून मानणारा लंबोदरानुज रामभाऊ.



Tuesday, March 9, 2021

एक जीत न मानी, एक हार न मानी

 बॉलीवूडचा शोमॅन राज कपूरच्या बहुतेक चित्रपटांमध्ये भगवान श्रीकृष्णावर एकतरी भावपूर्ण गाणे असतेच असते. त्यातले "राम तेरी गंगा मैली" सिनेमातले "एक राधा, एक मीरा" या गाण्याने तर माझे लक्ष विशेष वेधून घेतले होते. आता हा सिनेमा जेव्हा आला होता तेव्हा आम्ही पौगंडावस्थेत होतो. चित्रपटातल्या या गाण्यापेक्षा त्यातल्या नको त्या दृश्यांचीच चर्चा आम्हा मित्रमंडळीत होती. हे गाणे समजण्याइतकी अध्यात्मिक जाणीव त्या वयात नव्हती आणि घरी नुसते "राम तेरी गंगा मैली" हे नाव जरी काढले असते तरी "आचरट कार्ट्या" म्हणून मार मिळाला असता, ते वेगळेच. 


फ़ार वर्षांपूर्वी आलेल्या राज कपूरच्या एका मुलाखतीत असे वाचले होते की "मेरा नाम जोकर" ही त्याची स्वतःची अत्यंत आवडती कलाकृती होती पण लोकांना त्यातले शोकात्म काव्य कळलेच नाही आणि पिक्चर आपटला. तेव्हापासून त्याने लोकांना जे आवडते तसे (नट्यांचे शरीरप्रदर्शन वगैरे) द्यायला सुरूवात केली. "जाने कहा गये वो दिन" ते "हम तुम एक कमरेमे बंद हो" ही मला स्वतःला राज कपूरमधल्या शोमॅनची शोकांतिका वाटते. पण आता प्रौढावस्थेत एक राधा एक मीरा हे गाणे जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला राजकपूरमधला कृष्णभक्त दिसतो. त्या गो-यापान, लालबुंद देहात असणारा एक अवखळ गोप मला दिसतो. (स्वतःची शोमॅन प्रतिमा कायम रहावी म्हणून जो सिनेजगाच्या आवडीनिवडी जपत जपत स्वतःच अगतिक झालेला एक श्रद्धाळू.)


या गाण्यात राधा आणि मीरेच्या प्रभू श्रीकृष्णाविषयी भक्तीचे नेमके वर्णन "एक जीत न मानी, एक हार न मानी" या दोन ओळींमध्ये आलेले आहे. भगवान गोपाल कृष्ण हा मोठा अवखळ देव आहे. ज्याने त्याला जिंकले, त्याला तो जिंकल्याचा आनंद मानू देत नाही आणि जो त्याच्यासमोर हरला त्याला तो हार मानू देत नाही. हातात आला आला म्हणता म्हणता सुळकन निसटून जाणारा आणि आंधळ्या सूरदासांना प्रत्यक्ष दर्शन देणारा. पण भक्तही किती वस्ताद बघा. परमेश्वराला प्रत्यक्ष बघितल्यावर भक्ताची इतर सृष्टी बघण्याची इच्छाच उरलेली नाही. तो पुन्हा त्याच्याकडे आंधळेपण मागतो.


राधेने श्रीकृष्णाला जिंकले तरी ती शहाणी असल्याने तिने गर्व केला नाही. भगवंताला आपण ओळखले तरी ती ओळख सगळ्यांसमोर दाखवायची नसते. भगवंत माझ्या मुठीत आला आहे हे दाखवून जगाकडून वाहवा मिळवण्याची अपेक्षा असलेल्यांना तो भगवंत दाद लागू देत नाही. "मी कृष्णाला पकडले. त्याला चांगली बांधतेच." या समजुतीत असलेल्या यशोदेला, प्रत्यक्ष त्याच्या स्वतःला आईला, त्याने दरवेळी दोन बोटे दोरी कमी पाडून रडकुंडीस आणले होते. नंतर तिने "बांधू दे ना रे, कृष्णा." अशी विनवणी केल्यानंतर स्वतःला बद्ध करून घेतले होते. सर्व जगाला बद्धावस्थेतून मुक्त करण्यासाठी ज्याने जन्म घेतला तो स्वतः इतक्या लवकर बद्ध कसा बरे होईल. त्यासाठी काही तरी पुण्याई, काही नियम लागतीलच ना. राधेला हे माहिती होते. म्हणून तिला मिळालेल्या श्रीकृष्णाचा तिने कधीही गर्व केला नाही आणि त्यामुळेच तो भगवंत युगानुयुगे कायम तिच्यासोबतच आहे. आपल्या स्वतःच्या नावालाही त्या भगवंताने आपल्या राधेचेच नाव जोडून घेतले आहे. "राधेकृष्ण". व्रजभूमीत तर भगवंताचेच एक नाव "राधे" असेच आहे. दोन व्यक्ती एकमेकांना भेटल्यात की अभिवादनाप्रित्यर्थ "राधे राधे" असाच जयघोष होतो.





मीरेनेही भगवंताच्या प्राप्तीत अनंत अडथळे आलेत तरी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. अगदी स्वतःच्या प्राणाशी गाठ पडली तरी तिने भगवंताचा ध्यास मीरेने सोडला नाही. आईवडीलांसमोर, समाजासमोर ती हरली नाही. शेवटी तिच्या जिद्दीसमोर भगवंताने हार मानली. जगाने दिलेला विषाचा प्याला त्याने स्वतः प्राशन केला आणि मीरेला आपल्याइतकेच अमर केले. म्हणजेच एक जीत न मानी, एक हार न मानी लेकिन दोनोने शाम को पाया.


अनेक जन्मांच्या तपश्चर्येत अनंत योगी, ऋषीमुनी त्या भगवंताच्या प्राप्तीची वाट बघत असतात. या जन्मात नाही तर त्या जन्मात, या युगात नाही तर त्या युगात जे योगी जे ऋषी त्या परमेश्वराच्या प्राप्तीची चिकाटी धरतात त्यांनाच त्या सावळ्या परब्रम्हाची प्राप्ती होत असते.


आपल्यासारखे सर्वसामान्य साधक काय करतात ? महाभारत युद्धातलीच गोष्ट आहे. आपणा सगळ्यांच्या परिचयाची. दुर्योधनाने परमेश्वराची नारायणी सेना मागून घेतली पण शहाण्या अर्जुनाने प्रत्यक्ष परमेश्वरालाच मागून घेतले होते. 


कल्पना करा, आजच्या युगातही तुम्हाला कुणीतरी पर्याय देतोय की बाबारे एकतर माझ्या कार्यासाठी तू स्वतः शरीराने माझ्याकडे काही दिवस ये आणि माझ्यासोबत राहून माझ्या घरचे कार्य पार पाडून दे नाहीतर मला पैशांची थोडी मदत तरी कर. जर ही मदत करण्याजोगे पैसे तुम्ही पुढल्या काही क्षणात कमावू शकता येव्हढी ही रक्कम छोटी असेल तर तुम्ही पैशानेच मदतीचा पर्याय शोधाल ना ? स्वतः जाणारच नाही. अगदी तसेच परमेश्वराचे आहे. तो सगळ्यांना आपल्या मायेतले थोडे थोडे देत असतो. क्वचितच सगळी च्या सगळी मायाही एखाद्या भाग्यवंताला देतो. पण स्वतःला तो भगवंत फ़ार थोड्या भक्तांसाठी उपलब्ध करून देतो.


म्हणून सर्व सदभक्तांनी फ़क्त त्या भगवंताच्या प्राप्तीचाच ध्यास धरावा. या प्रवासात त्या भगवंताकडून आपल्याला भरकटवण्यासाठी अनेक माया (कामरूपी, पैसारूपी, स्तुतीरूपी अशा) अनंतरूपाने आपल्याला प्राप्त होतील पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून, त्यांना पुरेपूर ओळखून, आपण फ़क्त त्या भगवंताच्याच प्राप्तीचा ध्यास घेतला पाहिजे. त्याला जिंकू शकलो तर जिंकण्याचा गर्व नको आणि तो मिळेपर्यंत आपण हरलो हे मानायला नको. कारण तो ज्या दोन भक्तांना भेटला त्यांची अवस्था 


एक जीत न मानी 

एक हार न मानी 

अशीच होती. 


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर (विजया एकादशीचे चिंतन, ०९/०३/२०२१)