Friday, November 4, 2022

देवाचिये द्वारी - ११८

 


विठ्ठल सोयरा सज्जन सांगातीं I विठ्ठल हा चित्ती बैसलासे II


विठ्ठलें हे अंग व्यापिली हे काया I विठ्ठल हे छाया माझी मज II


बैसला विठ्ठल जिव्हेंचिया माथा I न वदे अन्यथा आन दुजे II


सकळ इंद्रियां मन हे प्रधान I तेंही करी ध्यान विठोबाचे II


तुका म्हणे या हो विठ्ठलासी आतां I न यें विसंबतां माझे मज II



श्रीतुकोबांना विठ्ठल परमात्म्याची इतकी ओढ लागलेली आहे की आता ते त्यांचे त्यांनाही अनावर झाले आहेत. विठ्ठलाने भेट द्यावी आणि आपल्या मनात कायमचे रहावे अशी आळवणी श्रीतुकोबा त्या विठ्ठलाला करताहेत.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध एकादशी / प्रबोधिनी एकादशी शके १९४४ , दिनांक ४/११/२०२२)


आषाढी एकादशी शके १९४४ दिनांक १० जुलै २०२२ रोजी लिहायला सुरूवात केलेले हे सदर आज श्रीसदगुरूंच्या आणि सकल संतांच्या कृपेने पूर्णत्वास जात आहे याचा मला विशेष आनंद होतो आहे. हे सदर लिहीताना प्रत्येक अभंगातून, ओवीतून मला जी अनुभूती झाली ती मी सहज सरळपणे आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मुळात मी फ़ार विद्वान, अभ्यासक वगैरे नाहीच त्यामुळे फ़ारसे विद्वत्तापूर्ण विवेचन लिहावे हा हेतू नव्हताच. ब-याच वेळा असे जाणवले की अरे संतांनी स्वतःच इतक्या सोप्या भाषेत, सर्वांना समजेल असे दृष्टांत देऊन अध्यात्म आपल्यासाठी अत्यंत सोपा करून मांडलेला आहे त्यात आपण आपल्या विवेचनाची काय अधिक भर घालावी ?


माझ्या जीवनाला एक शिस्त लागावी, चातुर्मास हा लिखाणाचा संकल्प पूर्ण व्हावा ही त्या पांडुरंगाचीच इच्छा होती हे मी मनापासून मानतो आणि आपली तात्पुरती रजा घेतो. 


सध्या तरी नववर्षापासून एक असाच वेगळा लिखाण संकल्प घेण्याचे योजिले आहे. तर नववर्षात नवोन्मेषाने, नव्या लेखनासह भेटूच.


- आपण सर्वांचा प्रेमांकित, राम. 



Thursday, November 3, 2022

देवाचिये द्वारी - ११७

 


सकळांच्या पाया माझी विनवणी  I मस्तक चरणीं ठेवीतसे II


अहो वक्ते श्रोते सकळही जन I बरें पारखून बांधा गाठी II


फ़ोडिले भांडार धन्याचा हा माल I मी तंव हमाल भारवाही II


तुका म्हणे चाली झाली चहूं देशीं I उतरला कसीं खरा माल II

सर्व मनुष्यमात्रांनी ब-या वाईटाची पारख करून खरे अध्यात्म आपल्या आचरणात आणले पाहिजे असे श्रीतुकोबांना कळकळीने वाटते. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध दशमी शके १९४४ , दिनांक ३/११/२०२२)


Wednesday, November 2, 2022

देवाचिये द्वारी - ११६

 


आशाबद्ध वक्ता I धाक श्रोतियाच्या चित्ता II


गातो तेही नाही ठावे I तोंड वासी काही द्यावे II


झाले लोभाचे मांजर I पोट भरे दारोदार II


वाया गेले ते भजन I उभयतां लोभी मन II


बहिरें मुके एके ठायीं I तैसें झालें तयां दोहीं II


माप आणि गोणी I तुका म्हणे रिती दोन्ही II


धन आणि मानाविषयी आशाबद्ध असलेला वक्ता आणि हा आता आपल्याला  काही मागणार तर नाही या भितीने घाबरलेले श्रोते म्हणजे मुक्याने परमार्थ सांगितला आणि बहि-याने तो ऐकला असे श्रीतुकोबांचे प्रतिपादन आहे. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध नवमी शके १९४४ , दिनांक २/११/२०२२)


Tuesday, November 1, 2022

देवाचिये द्वारी - ११५

 


मुखी बोले ब्रह्मज्ञान I मनी धन आणि मान II


ऐसियाची करिता सेवा I काय सुख होय जीवा II


पोटासाठी संत I झाले कलीत बहुत II


विरळा ऐसा कोणी I तुका त्यासि लोटांगणी II


कलियुगात आपल्या मनात धन आणि मानाविषयी लालसा बाळगून संतत्वाचे सोंग आणणा-यांची मांदियाळी झालेली आहे हे श्रीतुकोबांनी फ़ार वर्षांपूर्वी ओळखले होते. जो कुणी विरळा मनुष्य़मात्र असा नसेल त्याला मी प्रणाम करतो असे श्रीतुकोबा म्हणताहेत. 


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध अष्टमी शके १९४४ , दिनांक १/११/२०२२)