Wednesday, June 30, 2021

खाणा-याने खात जावे...

     ३० जून २००९.

बरोब्बर १२ वर्षांपूर्वीची गोष्ट.

Indo - US Collaboration of Engineering Education आयोजित "Effective Engineering Teaching" च्या एका कार्यशाळेसाठी म्हैसूरला होतो. Infosys campus मध्ये रहाण्याची जरी व्यवस्था होती तरी मी सहकुटुंब गेलेलो असल्याने म्हैसूर गावात आमचा मुक्काम होता. रोज मुक्कामाच्या ठिकाणाहून सकाळी निघून Infi च्या कॅम्पसपर्यंत जाणे आणि कार्यशाळा आटोपून संध्याकाळी परतणे हा दिनक्रम.

पहिल्याच दिवशी तिथल्या स्थानिक सहकार्यांशी गप्पाटप्पा रंगल्यात. माझे राहण्याचे ठिकाण कळल्यावर एकाने या हाॅटेलबाबतची "टिप" दिली. माझ्यासारख्या foodie माणसाला आणि काय हवं होतं ? (बाकी "खादाड" या मराठी विशेषणाला "Foodie" वगैरे इंग्रजी साज चढवला की ते विशेषण एकदम मिरवण्याजोगे वगैरे होते, नाही ?)

दुसर्याच दिवशी सकाळी ७ वाजता या हाॅटेलात प्रवेश केला. नागपूरच्या सदर भागातल्या "वीरास्वामी" पेक्षा अर्धी जागा. साधारण १०० चौरस फुटाच्या आसपासचा मामला. जेमतेम ३ टेबल्स, इतर ८ - १० ग्राहकांसाठी उभ्यानेच खाता यावे अशी भिंतीतल्या टेबलवजा फळ्यांची व्यवस्था. मी गेलो तेव्हा गर्दी नव्हती. टेबल, शेअरींगमध्ये का होईना, मिळाले. पण खाणे संपल्यावर बाहेर पडताना हाॅटेलमध्ये रांग लागलेली होती.




मेन्यू फार नाही. चित्रात दिसतोय तो "म्हैसूर मायलारी डोसाई" आणि "ओनियन उत्तपम". मागवल्यानंतर लगेच केळीच्या पानात हे दक्षिण भारतीय पूर्णान्न, पूर्णब्रम्ह पुढ्यात आले. आपल्या नेहमीच्या डोस्यापेक्षा जरा जाड डोसा आणि खोबर्याची अमर्यादित चटणी. सांभाराची गरजच नव्हती. एकेक घास अप्रतिम चवीचा. तोंडात आपोआप विरघळून पोटात जात होता. मेंदूत ती चव कायमसाठी नोंदल्या जात होती.

यावर तिथली "फिल्टर कापी" प्यायलो नसतो तर त्या संस्कृतीचा अपमान करण्याचे पातक घडले असते. एकच डोसाई आणि एक फिल्टर कापी पिऊन अंतरात्मा सकाळी सकाळी तृप्त करून बाहेर पडलो. कार्यशाळे दरम्यान Infi ने आम्हाला अगदी Apetizer, Salad, Soup, Main Course, Dessert असे Five course lunch उपलब्ध करून दिले होते पण ही चव तिथे नव्हती.

उगाच नाही महानायक बच्चन साहेब आणि जगसुंदरी ऐश्वर्या म्हैसूरला असले की इथे आवर्जून येतात.

अप्रतिम चव अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देणार्या त्या "कानडाऊ विठ्ठलू" चे खरोखर कौतुक.

- स्थानिक खाद्यपदार्थांचा कायमच चाहता आणि असल्या बल्लवाचार्यांचे (आणि अन्नपूर्णांचे)

"खाता खाता खाणार्यांने

बनवणार्यांचे हात घ्यावे"

या वृत्तीचा  विद्यार्थी 

Saturday, June 19, 2021

Lets celebrate small bundles of joys.

 तसेही नागपूर हे हिरवेगार शहर आहे. आणि त्यातही आमचे महाविद्यालय शहरापासून १५ किमी दूर, एका टेकडीवर आहे.

हमरस्ता सोडून काॅलेजकडे जाण्यासाठी गाडीने टेकडी चढताना रस्त्याच्या आजुबाजूचे अनाघ्रात जंगल एकदम खूप सारा प्राणवायू हृदयात भरून टाकते आणि तिथूनच आमची आनंदवारी सुरू होते.
महाविद्यालयीन परिसरात तर अनेक प्रकारच्या फळझाडांचे आणि फुलझाडांचे स्नेहसंमेलनच आहे. आणि अर्थातच महाविद्यालराच्या शिरस्त्याप्रमाणे त्यातही शिस्त आणि सौंदर्यदृष्टी जोपासली गेलेली आहे. उगाच आपलं दिसले रोप की कर खड्डा आणि लाव झाड, असा मामलाच नाही. सगळे काही विचारपूर्वक आणि याबाबतचा पारंपारिक शहाणपणा लक्षात घेऊनच.
आमच्या गाड्यांचे पार्किंगही घनदाट वनराईत असते. जुन्या काळी राजे महाराजांच्या राजवाड्याबाहेर "उपवने" असायची असे वर्णन आपण पुराण कथांमध्ये वाचतो, ऐकतो. तशी अनेक "उपवने" आमच्या महाविद्यालयीन परिसरात आहेत. त्यातलेच एक "उपवन" आमच्या गाड्यांच्या पार्किंग साठी पण राखीव आहे.
आज महाविद्यालयीन वेळानंतर घरी जाण्यासाठी निघालो तर ज्या वृक्षाच्या सावलीत गाडी ठेवली होती त्या वृक्षाने आपल्या छोट्याछोट्या फुलांनी गाडीचा पुढला काच, बाॅनेट आणि छत सजवून टाकले होते. माझ्या हर्षाला पारावारच उरला नाही. लगेच फोटो काढलेत.




महाविद्यालयीन सहकार्यांनी "सर, आपकी गाडी तो आज दुल्हे की गाडी लग रही है." अशा compliments पण दिल्यात.
परतीच्या प्रवासात, मनात एकेक आठवणी हळूहळू येतात आणि कालौघात उडून विरत जातात ना, तसे वार्यामुळे "एकेक फूल लागले उडावया" असे रस्ताभर होत होते. एक नवाच अनुभव, वाहनचालनाचा आणि निसर्गाने दिलेल्या दानाच्या उपभोगाचा.
बर्याचदा आपण छोट्याछोट्या गोष्टी मनाला लावून घेतो, व्यथित होतो. त्यापेक्षा असे छोटेछोटे आनंद साजरे करून जास्तीत जास्त वेळ आपण आनंदी रहायला शिकलो तर ?
दुःख मनात ठेवण्याची खूप मोठी किंमत आपण कळत, नकळत मोजत असतो. आनंद हा तर फुकट असतो आणि त्याचवेळी तो अमूल्यही असतो. So lets celebrate these small packets of joys.
- उत्कृष्ट ड्रायव्हर आणि उमलता तत्ववेत्ता अशा मिश्रणाचा राम किन्हीकर.

Saturday, June 12, 2021

शिरा पुराण

 



आमच्या बालपणी शिरा बशीतूनच खाण्यासाठी पुढ्यात यायचा हो. स्टेनलेस स्टीलच्या ताटलीतून शिरा खाणे म्हणजे एखादा पदार्थ नुसताच पोटात ढकलल्यासारखा वाटतो.  म्हणूनच

१९९५  मध्ये मुंबईतल्या उडपी हाॅटेलमध्ये शिरा असा स्टेनलेस स्टीलच्या प्लेटमधून खाताना माझ्या अंगावर निळा एप्रन वगैरे आलाय की काय अशी माझी भावना सतत होत होती. बाकी उडपी हाॅटेलमधला "केशरी शिरा" म्हणजे जिलेबीचा रंग घातलेला शिरा. इतका केशरी रंग अस्स्सल केशर घालून शिर्‍याला आणायला त्या उडप्याला काश्मीरातून आठवड्याच्या आठवड्याला ट्रकभर केशर मागवावे लागेल आणि त्याचे दिवाळे निघेल.

साधारण बशीभर शिर्‍यात एखादा बेदाणा आणि अर्धाच काजूचा तुकडा त्याची लज्जत वाढवतात. बचकभर बेदाणे आणि भरपूर काजू म्हणजे अन्नू मलिकचा भरपूर वाद्यमेळ असलेला वाद्यवृंद. पोट भरेल पण मजा नाही.

 याउलट प्रमाणात काजू बेदाणे प्रमाणात घातलेला शिरा म्हणजे तानपुरा, संवादिनी आणि तबल्याच्या संगतीने वसंतराव देशपांड्यांनी जमवलेली मैफिल. मन तृप्त होईलच होईल.

बरे, इतक्या एकाच बशीभर शिर्‍यावर खाणे आटोपावे. आणखी शिरा खाण्याची इच्छा असतानाच शिरा खाणे थांबवले म्हणजे पुढच्या वेळेची शिरा खाण्याची आस कायम असते. हा मनभरून खाण्याचा पदार्थ, पोटभरून नव्हे हे कायम लक्षात ठेवावे. "स्वप्नातल्या कळ्यांनो, उमलू नकाच केव्हा" या गाण्यातला भाव लक्षात ठेवावा आणि "विरहात चिंब भिजूनी, प्रीति फुलोनि यावी" असा विरह शिर्‍याचा आणि आपला झाला असेल तरच तो चविष्ट लागतो हे ही लक्षात ठेवावे. दर आठवड्यात एकदा शिरा खात असणे म्हणजे नुसते उदरभरण. एकूण पावसाळ्यात चारपाचदा आणि वर्षभरात आणखी चारपाचदा शिरा खाल्ला तरच ही प्रीत फुलून येते. (स्वतःकडल्या आणि इतरांकडल्या सत्यनारायणातला प्रसादाचा शिरा यात धरायचा नाही. ते वेगळे. हा शिरा म्हणजे हृदयस्थ आत्मनारायणाला खुश करण्यासाठी गृहलक्ष्मीने केलेला शिरा.)

रोजच्या खाण्यातल्या लोणच्याची (याठिकाणी लिंबाचे लोणचे सर्वोत्तम. मग इतरांचा क्रमांक) अनोखी चव अनुभवायची असेल तर लोणच्याची एखादीच फोड शिर्‍यासोबत बशीत असावी. सोबत दीड ते दोन मिलीलीटर त्याच लोणच्याचा खार. अशावेळी प्रत्यक्ष भगवंत जरी पुढे उभे राहिलेत तरी "देवा हा शिरा पहिल्यांदा संपवतो आणि मग मुक्तिविषयी वगैरे बोलू." अशी भक्ताची भावना झालीच पाहिजे.

शिरा कणकेचा श्रेष्ठ की रव्याचा या विषयांवरून गृहिणींचे एक मिनी महायुध्दही संभवू शकते. पण साखरेऐवजी गूळ घालून केलेल्या शिर्‍याला तोड नाही. ६ वर्षांपूर्वी मुंबई - आग्रा महामार्गावर मालेगावनजिकच्या साई कार ढाब्यावर एके दिवशी सकाळी नाश्त्यात खाल्लेल्या गुळाच्या शिर्‍याची चव नुसतीच माझ्या जिभेवर आहे असे नाही तर त्या चवीने आपले फुटप्रिंट थेट माझ्या मेंदूत तयार केलेले आहे. या जन्मात काय, पुढल्या कित्येक जन्मात ती अप्रतिम चव मी विसरू शकत नाही.

शिरा खाण्यासाठी चिनीमातीच्या बशीसोबत मात्र चकाकता, स्टेनलेस स्टीलचा चमचाच हवा. इतर वेळी उदरभरणासाठी पाच बोटांचा उपयोग कितीही उपयुक्त असला तरी त्या चमच्याची आणि बशीची सुंदर किणकिण कानावर पडली की शिरा पंचेंद्रिये तृप्त करून जातो. हो, नाहीतर कानांना त्याचा आस्वाद कसा मिळणार होता ना ?

आणि एक सांगू का. त्या चमचा आणि बशीच्या किणकिणीवरून आपल्या नारायणाला अजून अर्धी बशी शिरा दिला तर चालेल हे जिला ओळखता येत ना, ती खरी गृहलक्ष्मी. त्यांचा संसार रवा आणि साखरेसारखा एकजीव होऊन शिर्‍यासारखा खमंग झालाय हे ओळखावे.

- शिर्‍यातला गोड बेदाणा, राम किन्हीकर.

इतर लेखांसारखाच हा लेखही माझ्या नावाशिवाय (कधीकधी कुठल्यातरी भलत्याच उपटसुंभ नावाने) बर्‍याच व्हाॅटसॅप ग्रूप्समधून माझ्यापर्यंत येईल याची खात्री बाळगू का ?