Showing posts with label Infosys Mysore. Show all posts
Showing posts with label Infosys Mysore. Show all posts

Monday, April 3, 2023

अभियांत्रिकी अध्यापन : एका शिक्षकाचा २८ वर्षांचा शिकवण्याचा आणि महत्वाचा म्हणजे स्वतः शिकण्याचा प्रवास.

आम्हा अभियांत्रिकी शिक्षकांना इतर विद्याशाखांमधील शिक्षकांसारखे शिक्षणशास्त्र स्नातक (B. Ed.) किंवा शिक्षणशास्त्र पारंगत (M. Ed.) या पदव्या मिळवण्याची अट नसते. तरीही आमच्यापैकी बहुतेक जण स्वतःला पूर्णपणे जोखूनच या क्षेत्रात आलेले असतात. आपल्याला इतरांना शिकवायला जमते ही भावना मनात पक्की झाली की आमच्यापैकी बहुतेक या क्षेत्रात स्वतःच्या आवडीनेच येतात. आणि एकदा शिक्षणक्षेत्रात आलेली ही मंडळी क्वचितच बाहेरच्या उद्योगक्षेत्रातल्या जास्त पगारांच्या प्रलोभनाला बळी पडून उद्योगक्षेत्राचा मार्ग निवडतात.


शिक्षणक्षेत्रात १४ वर्षे रमल्यावर २००९ मध्ये अचानकच Infosys आणि Indo - Us Collaboration for Engineering Education (IUCEE) यांच्या संयुक्त विद्यमाने Infosys च्या म्हैसूर कॅम्पस येथे तीन दिवसांचे एक शिबीर आयोजित केलेले होते. अमेरिकेतल्या North Carolina State University  चे Dr. Richard Felder आणि Dr. Ribecca Grant हे जोडपे तिथे आम्हाला Effective Engineering Teaching शिकवायला येणार होते. अभियांत्रिकी क्षेत्रात "शिकवायचे कसे ?" हे शिकण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. म्हैसूरमधले या शिबीरातले ३ दिवस एक शिक्षक म्हणून मला खूप समृद्ध करणारे ठरले. आज इतक्या वर्षांनीही त्या दोघांनी वर्गात शिकवताना दिलेल्या टिप्स आणि त्यांच्या नोटस मी जपून ठेवलेल्या आहेत आणि दरवर्षी त्यांचे मनन, चिंतन करून त्यातली कुठली पद्धत यावर्षी मुलांना शिकवताना वापरता येईल याचे नियोजनही मी करीत असतोच.


आमच्या कुटुंबाची ती म्हैसूर सहल आणि त्यातल्या शिबीरबाह्य गमतीजमती हा एका निराळ्या आणि विस्तृत लेखाचा विषय आहे. पण त्या शिबीरानंतर एक शिक्षक म्हणून मी खूप बदललो, समृद्ध झालो हे माझे मलाच जाणवले. 


त्यानंतर पुन्हा मध्ये १४ वर्षे गेलीत. २०२३ मध्ये IIT Madras च्या National Programme on Technology Enhanced Learning मधे Effective Engineering Teaching in Practice या चार आठवड्याच्या अभ्यासक्रमासाठी नोंदणी केली. दर आठवड्याला त्या त्या आठवड्यात शिकवलेल्या भागावर गृहपाठ सोडविणे आणि चार आठवड्याच्या अभ्यासक्रमानंतर तीन तासांची परीक्षा अशा दिव्यातून पार पाडून आम्ही त्यात प्रावीण्य (Elite Class) मिळवले. या प्रावीण्यापेक्षाही हा अभ्यासक्रम शिकताना जी मजा आली त्यात जास्त मजा आली. "Destination is important but the journey is to be enjoyed more." हे तत्व यावर्षी नव्याने अनुभवायला मिळाले.


- २८ वर्षे अध्यापन क्षेत्रात असूनही दररोज नवनवे शिकणारा एक जिज्ञासू विद्यार्थी, बालक राम प्रकाश किन्हीकर. 

 



Friday, September 30, 2022

म्हैसूर शहर बस सेवेची व्हाॅल्वोः एक मस्त अनुभव

 

म्हैसूर शहरात पहिल्यांदा २००९ मध्ये जाणे झाले. Indo - US Collaboration for Engineering Education व Infosys च्या संयुक्त पुढाकाराने Effective Engineering Teaching या विषयावर भारतभरच्या अभियांत्रिकी शिक्षकांची कार्यशाळा Infosys campus, Mysore येथे आयोजित करण्यात आलेली होती.


तशी सर्व सहभागी शिक्षकांची रहाण्याजेवणाची आलीशान व्यवस्था Infosys च्या म्हैसूर कॅम्पसमध्येच करण्यात आलेली होती पण मी माझा कुटुंबकबिला सोबत नेलेला असल्याने मी म्हैसूर शहरात मुक्काम केलेला होता.


रोज सकाळी रहाण्याच्या ठिकाणाहून इन्फोसिस कॅम्पसपर्यंत आणि संध्याकाळी कार्यशाळा आटोपली की परत असा प्रवास व्हायचा. म्हैसूर शहरातल्या अत्यंत कार्यक्षम अशा शहर बस सेवेचा या दरम्यान चांगला परिचय झाला.

शहरापासून २० - २५ किमी अंतरावर सगळ्याच आय टी कंपन्यांचे एकापेक्षा एक सुंदर कॅम्पस, तिथे रोज जाणारी आय टी क्षेत्रातली मंडळी, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन अत्यंत सोयीच्या वेळांवर धावणार्‍या या Volvo शहर बसेस. तिकीटदरसुध्दा अत्यंत माफक (१५ रूपये) होता. 


आय टी तल्या मुलांची, कर्मचार्‍यांची गरज लक्षात घेऊन कमीत कमी थांबे घेत जाणार्‍या या वातानुकूल व्हाॅल्वो बसेसमध्ये सगळे चार्जिंग पाॅइंटस सुरू अवस्थेत असायचेत. आय टी तली मंडळी प्रवासाचा अर्धा तास आपापले लॅपटाॅप्स उघडून आपापल्या कामात मग्न व्हायचीत. माझ्यासारखे प्रवासी पक्षी मात्र बसच्या मोठ्या खिडक्यांमधून शहर दर्शनात आणि इतर बसेस बघण्यामध्ये दंग व्हायचे.


त्यामानाने आपल्या महाराष्ट्रात बेस्ट, पीएमटी, नागपूर शहर बस, टीएमटी, एनएमएमटी यांचे कल्पनाशून्य नियोजन आणि शहर बस सेवेला "चराऊ कुरण" समजून जाणूनबुजून शहर बस सेवेचा उडवलेला बोर्‍या हा मनावर आघात करून गेला. कोल्हापूर मनपा बस सेवा आणि सोलापूर मनपा बस सेवा यांचा अनुभव त्यातल्या त्यात चांगला आहे पण मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई इथल्या बससेवांच्या गलथान कारभाराबाबत प्रत्येकी एक लेख पुरणार नाही इतकी वाईट परिस्थिती आहे.


आज इन्स्टाग्रामसाठी शोधताना हा फोटो सापडला आणि नव्या विचारांना, नव्या लेखांना चालना मिळाली.


- बुध्दिमान नियोजन असलेली सक्षम शहर बस सेवा शहरीकरणाच्या बर्‍याच काही दुष्परिणामांवर तोडगा ठरू शकेल असे मनापासून मानणारा सामान्य नागरिक, राम प्रकाश किन्हीकर. 




Wednesday, June 30, 2021

खाणा-याने खात जावे...

     ३० जून २००९.

बरोब्बर १२ वर्षांपूर्वीची गोष्ट.

Indo - US Collaboration of Engineering Education आयोजित "Effective Engineering Teaching" च्या एका कार्यशाळेसाठी म्हैसूरला होतो. Infosys campus मध्ये रहाण्याची जरी व्यवस्था होती तरी मी सहकुटुंब गेलेलो असल्याने म्हैसूर गावात आमचा मुक्काम होता. रोज मुक्कामाच्या ठिकाणाहून सकाळी निघून Infi च्या कॅम्पसपर्यंत जाणे आणि कार्यशाळा आटोपून संध्याकाळी परतणे हा दिनक्रम.

पहिल्याच दिवशी तिथल्या स्थानिक सहकार्‍यांशी गप्पाटप्पा रंगल्यात. माझे राहण्याचे ठिकाण कळल्यावर एकाने या हाॅटेलबाबतची "टिप" दिली. माझ्यासारख्या foodie माणसाला आणि काय हवं होतं ? (बाकी "खादाड" या मराठी विशेषणाला "Foodie" वगैरे इंग्रजी साज चढवला की ते विशेषण एकदम मिरवण्याजोगे वगैरे होते, नाही ?)

दुसर्‍याच दिवशी सकाळी ७ वाजता या हाॅटेलात प्रवेश केला. नागपूरच्या सदर भागातल्या "वीरास्वामी" पेक्षा अर्धी जागा. साधारण १०० चौरस फुटाच्या आसपासचा मामला. जेमतेम ३ टेबल्स, इतर ८ - १० ग्राहकांसाठी उभ्यानेच खाता यावे अशी भिंतीतल्या टेबलवजा फळ्यांची व्यवस्था. मी गेलो तेव्हा गर्दी नव्हती. टेबल, शेअरींगमध्ये का होईना, मिळाले. पण खाणे संपल्यावर बाहेर पडताना हाॅटेलमध्ये रांग लागलेली होती.




मेन्यू फार नाही. चित्रात दिसतोय तो "म्हैसूर मायलारी डोसाई" आणि "ओनियन उत्तपम". मागवल्यानंतर लगेच केळीच्या पानात हे दक्षिण भारतीय पूर्णान्न, पूर्णब्रम्ह पुढ्यात आले. आपल्या नेहमीच्या डोस्यापेक्षा जरा जाड डोसा आणि खोबर्‍याची अमर्यादित चटणी. सांभाराची गरजच नव्हती. एकेक घास अप्रतिम चवीचा. तोंडात आपोआप विरघळून पोटात जात होता. मेंदूत ती चव कायमसाठी नोंदल्या जात होती.

यावर तिथली "फिल्टर कापी" प्यायलो नसतो तर त्या संस्कृतीचा अपमान करण्याचे पातक घडले असते. एकच डोसाई आणि एक फिल्टर कापी पिऊन अंतरात्मा सकाळी सकाळी तृप्त करून बाहेर पडलो. कार्यशाळे दरम्यान Infi ने आम्हाला अगदी Apetizer, Salad, Soup, Main Course, Dessert असे Five course lunch उपलब्ध करून दिले होते पण ही चव तिथे नव्हती.

उगाच नाही महानायक बच्चन साहेब आणि जगसुंदरी ऐश्वर्या म्हैसूरला असले की इथे आवर्जून येतात.

अप्रतिम चव अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देणार्‍या त्या "कानडाऊ विठ्ठलू" चे खरोखर कौतुक.

- स्थानिक खाद्यपदार्थांचा कायमच चाहता आणि असल्या बल्लवाचार्यांचे (आणि अन्नपूर्णांचे)

"खाता खाता खाणार्‍यांने

बनवणार्‍यांचे हात घ्यावे"

या वृत्तीचा  विद्यार्थी