रविवारची सुंदर संध्याकाळ.
दुपारचे तृप्त जेवण आणि वामकुक्षीनंतर प्रसन्न मनाने आपण टीव्ही समोर असतो.
टी व्ही वर "सरफरोश" सुरू असतो. आमीर खान आणि सोनाली बेंद्रेची कितीही वेळा बघितली तरी फ्रेशच वाटणार्या लव्ह स्टोरीला नुकतीच सुरूवात झालेली असते.
"खुलती झुल्फो ने सिखाई, मौसमों को शायरी" जगजीत सिंग गात असतो. बाहेर खोलीत सोफ्यावर बसून या प्रेमकथेत गुंतून गेलेल्या मला अचानक आठवतं, "अरे सौ. वैभवीचा आवडता गायक गातोय की."
आत स्वयंपाकघरात काम करणार्या गृहस्वामिनीला माझा आवाज जातो, "अगं येतेस का जरा बाहेर ?"
बाहेरचा अंदाज घेऊन आतून उत्तर येतं, "अरे आताच किराणा आणलाय, तो डब्ब्यांमध्ये भरून येते."
रोमँटिक मूड नावाचे तारूण्यात घेऊन जाणारे स्वप्न आणि घरातल्या सगळ्यांचे उदरभरण यांचा तोल साधता येण्याचा व्यवहार म्हणजेच संसार नावाची तारेवरची कसरत.
ही कसरत जमायला १५ - २० वर्षांची एकनिष्ठ साधना लागते. कधी फुलांच्या तर कधी काट्यांच्या ताटव्यांमधून मार्ग काढावा लागतो, एकमेकांचा हात न सोडता. लग्नवेदीवर सोबत चाललेली सप्तपदी ही तर केवळ झलक असते. संसारात वाटचाल करताना वाटेवर तप्तपदीच चालायची असते. फक्त कधी ते चटके तिने झेलून त्याला चटके जाणवू द्यायचे नसतात, कधी त्याने स्वतःच्या पायात बोचलेले काटे तिला रूतू द्यायचे नसतात तर कधी दोघांचेही पाय पोळत असताना हसरा चेहेरा ठेवत हे दुःख एकमेकांना जाणवू न देण्याची कसरत जमवावी लागते मग साध्य होते ही संसार नावाची तारेवरची कसरत.
होय ना मित्र मैत्रिणींनो ?
तुमचा काय अनुभव ? तुमचे काय म्हणणे ?
- साध्या प्रसंगात खूप काही तत्वज्ञान सुचणारा प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर.

No comments:
Post a Comment