Tuesday, September 22, 2026

गाडीतली प्ले लिस्ट, Gen X, Gen Z वगैरे

गाडीने लांबचे प्रवास करताना स्वतःच्या आवडीची प्ले लिस्ट ऐकत ऐकत जाणे यासारखा दुसरा आनंद नाही तुम्हाला सांगतो. बालपणापासूनच "मी कार घेतली तर..." या माझ्या स्वप्नात ही अशी आवडीची गाणी ऐकत जाण्याची फँटसी अपरिहार्यपणे आणि अविभाज्यपणे होतीच.


पण लेकरू आता मोठे झालेय. जेन झी. त्यांची प्रतिक्रिया असते की "बाबा, ही गाणी ऐकत प्रवास करताना अगदी ट्रकच्या केबिनमधून क्लीनर म्हणून प्रवास केल्यासारखा फील येतोय." लगेच वेडेवाकडे चेहरे करणे सुरू होते. ही प्लेलिस्ट लवकर संपावी अशी प्रार्थना देवाकडे सुरू होते.





पण बाप आखिर बाप होता है. ही साडेतीन तासांची प्लेलिस्ट संपेपर्यंत प्रवासच संपतो आणि मुक्कामाचे ठिकाण येते.


Gen X = 1 : Gen Z = 0




Monday, September 21, 2026

भाव तसा देव

18/09/2026

आज सकाळपासूनच (तसे तर काल संध्याकाळपासूनच) मनात अपार खिन्नता दाटून आली होती. तशी ती गेल्या ४ वर्षांपासून या दिवसांमध्ये मनात येतेच.

१९७७ पासून आमच्याकडे असलेल्या महालक्ष्म्यांच्या सणात, ज्येष्ठा कनिष्ठा गौरी व्रतात  गेली ४ वर्षे सुपत्नी नसल्याने खंड पडलाय. या दिवसांमध्ये मनात अपार उत्साह असायचा, कामे करण्याचा उरक असायचा, घरात दिवाळीपेक्षाही अधिक उत्साहाचे वातावरण असायचे.

पण पहिल्यांदा वडील गेलेत, मग आई आणि त्यानंतर लगेचच सुपत्नीही अचानक निवर्तली. या उत्सवाचा इतका मोठा उरक आणि तयारी बघता आम्हा बापलेकांकडून हे होणे शक्य नव्हते. गेली चार वर्षे या पारंपारिक व्रतात खंड पडलाय. पण अजूनही हे दिवस आलेत की जुन्या अनेक आठवणींचे मोहोळ भूतकाळातून उठते आणि वर्तमानात आपल्या मनाला चावून चावून त्याच्या चिंधड्या चिंधड्या करते. कालपासून अशाच विध्द, खिन्न मनाने मी वावरत होतो.

आज घरी स्वयंपाक सुध्दा करावासा वाटेना. मग घराजवळच असलेल्या आणि साधे, ताजे आणि शुध्द मराठी थाळी पोटभर देणार्‍या भोजनालयात जाऊन बसलो. तिथे कायम गर्दी असल्याने एकच टेबल अनेकविध जणांसह वाटून घ्यावे लागते.

मी जिथे बसलो त्याच टेबलवर माझ्या अगदी समोर एक माझ्यापेक्षा कमी वयाचा तरूण बसला होता. किडकिडीत शरीरयष्टीचा, खोल गेलेल्या डोळ्यांचा, साधेसे कपडे अंगावर असलेला. 

माझे ताट येईपर्यंत मी बाजूच्या काचेतून बाहेर रस्त्यावर नजर टाकत होतो. एक अॅक्टीव्हा त्या भोजनालयासमोर थांबली. सुरेख, सुंदर नवरा बायको आत आलेत. नवरा माझ्याशेजारी आणि अगदी नवर्‍यासमोर त्याची सुपत्नी बसून जेवणथाळीची वाट बघू लागलेत. दोघांचेही कपडे अगदी टापटिपीचे होते. त्या स्त्री च्या अंगाखांद्यावर भरपूर दागिनेही होते. एकंदर सुखवस्तू, संपन्न जोडपे होते.

आमच्या थाळ्या पुढ्यात आल्यात तोवर बाहेर एक क्रेटा येऊन थांबली आणि त्यातून अत्यंत साध्या, थोड्या मळलेल्या, चुरगळलेल्या कपड्यांतले, क्रेटातल्या प्रवाशांना विजोड वाटावे असे एक जोडपे उतरले. भोजनालय अगदी फुल्ल असल्याने ते दोघेही आमच्याच टेबलवर येऊन बसलेत. माझ्याशेजारच्या छान कपड्यातल्या पुरूषाशेजारी तो पुरूष आणि त्याच्या अगदी समोर त्याची ती बायको. आमचे टेबल आता पूर्णपणे भरले. सगळ्यांच्या थाळ्या पटकन आल्यात. हातातोंडाची लढाई लढत पटापट सगळ्यांचे भोजन सुरू झाले. भोजन नेहेमीप्रमाणेच साधे, ताजे आणि सुग्रास होते.

माझे भोजन आटोपले, सोबतच दोन्हीही जोडप्यांची भोजने आटोपली आम्ही हात धुवायला उठलोत सुध्दा, पण माझ्यासमोर बसलेल्या तरूणाच्या जेवणाचे मध्यंतर सुध्दा व्हायचे होते हे माझ्या लक्षात आले. जेवत असताना दुसर्‍याच्या ताटाकडे, खाण्याकडे मुद्दाम लक्ष देऊ नये असा एक सभ्यतेचा संकेत आहे पण मुद्दाम लक्ष न देतासुध्दा मला आपोआप जाणवले की समोरच्या तरूणाच्या शरीरयष्टीच्या मानाने त्याचे खाणे अवाढव्यच आहे.

हात तोंड धुवायला मी उठलो आणि आत्तापर्यंत माझ्या लक्षात न आलेली एक गोष्ट चटकन माझ्या दृष्टीस पडली आणि माझे डोळे पाणावले. त्या तरूणाचे उदर त्याच्या शरीरयष्टीच्या मानाने भलतेच लांब होते. मनाच्या अगदी खोल खोल आत जाणवले की अरे आपण ज्याच्या अथर्वशीर्षाची कायम सहस्रावर्तने करतो तो लंबोदर तर हाच. आपल्या कल्पनेतल्या रूपातच देवाने आपल्याला दर्शन द्यावे हा आपला अट्टाहासच आपल्याला अनेक अलौकिक अनुभवांपासून वंचित ठेवतो.

अंतर्मनात ही जाणीव झाल्यासरशी मी त्या दोन जोडप्यांकडे पुन्हा बघितले आणि जाणवले की अॅक्टीव्हावरून आलेले सुंदर कपड्यातले, दागदागिने घातलेले जोडपे म्हणजे ज्यांच्या सहस्रनामांचा उच्चार आपण रोज करतो ते भगवान विष्णु आणि पुत्र नसला तरी आपला अत्यंत लाडक्या असलेल्या लंबोदराच्या बाजूला बसून भोजन करणारी श्रीविष्णुंची सुपत्नी महालक्ष्मी आणि साध्या कपड्यातले पण क्रेटातून आलेले अत्यंत श्रीमंत जोडपे म्हणजे प्रत्यक्ष माता पार्वती आणि पिता श्रीशंकर. मनोमन नमस्कार केला. मनातली खिन्नता पार पळाली होती. वर्षानुवर्षे ज्यांची आराधना केली, ज्यांची सूक्ते गायली, सहस्रनामजप केलेत, अभिषेक केलेत, ज्यांना नैवेद्य दाखवून भोजनाचे निमंत्रण केले ती सगळी मंडळी आज माझ्या मनाच्या खिन्न अवस्थेत अगदी अनपेक्षितपणे माझ्या पंक्तीला जेवलेली होती. माझ्या मनातला भाव तसा होता. आणि भाव तसा देव यावर माझी पूर्ण श्रध्दा आहे.

वाॅशबेसिनवर चूळ भरल्यानंतर हात तोंड पुसायला खिशातला रूमाल काढला खरा पण हाता तोंडाच्या ओलाव्यापेक्षा तो माझ्या डोळ्यांमधून वाहणार्‍या अश्रूंच्या ओलाव्यानेच जास्त भिजला. 

झाले, संपलेच ना आता इथले काम. मनुष्यजन्माला येऊन आता काय मिळवायचे राहिलेय इथे ? आपण आजवर करीत असलेल्या अनुष्ठानांची, व्रतांची, उपोषणांची सांगता आज झाली. आपण भरून पावलोत.

- "भाव तसा देव" यावर दृढ विश्वास असलेला आणि देव कुठल्याही रूपात आपली अनुभूती मनुष्यमात्रांना देऊ शकतो याचा अनुभव घेतलेला एक कृतकृत्य जीव, राम. 



Friday, September 18, 2026

महालक्ष्म्या (ज्येष्ठा कनिष्ठा गौरी) पूजन २०२०

* ज्येष्ठा कनिष्ठा गौरींनी आगमनाआधी पाहिलेली तन, मन आणि धनाची परीक्षा. मर्यादित संसाधनांची उपलब्धता.

* आजच्या दिवशीचा नेमका मुहूर्त साधून स्वयंपाक व इतर सेवा पुरवणार्‍यांनी वाढवलेले अव्वाच्या सव्वा दर.

* "मारे 'शेफ, शेफ' म्हणून मिरवत असतोस ना, मग दाखव आता तुझी शेफगिरी" हा गौराई कडून आलेला आणि हृदयाला जाणवलेला संदेश.

* "चला, आता या परीक्षेला बसून उत्तीर्ण होऊनच दाखवू" हे स्वीकारलेले आव्हान.

* सहधर्मचारिणीच्या साथीने पहाटे पासूनच अक्षरशः कंबर कसून (उत्तरीय कंबरेला बांधून) स्वयंपाकघरात केलेला प्रवेश.




* आपल्या आईला आज आपल्याकडूनच ही सेवा करून घ्यायची आहे या जाणीवेने आलेला अमाप उत्साह.

* पती पत्नींच्या सहा, साडेसहा तासांच्या मेहेनतीनंतर तयार झालेला प्रसाद.





* प्रसाद ग्रहण करणार्‍या अभ्यागतांनी त्यावर उत्तम अभिप्राय नोंदवल्यानंतर, डोळ्यांच्या कडांशी दडवलेले अश्रू.

।। सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा।। 

Thursday, September 17, 2026

महालक्ष्म्यांचा (ज्येष्ठा कनिष्ठा गौरी) सण आणि पाहुणवेडे आम्ही

आम्ही सगळेच पाहुणवेडे आहोत. बालपणापासूनच घरी आमचे दादामामा, मामी किंवा इतर मावशी, काका काकूमंडळी येणार असली की आमचा दसरा दिवाळीच सुरू व्हायची. या मंडळींबरोबर "नागपूर बससेवेचा गाईड" या नात्याने नागपूरात मनसोक्त भटकता यायचे. खूप निरनिराळ्या आप्त, संबंधी मंडळींची गाठभेट व्हायची. शाळा, क्लासेस बुडविण्याची आॅफिशियल परवानगी घरून असायची. मग काय ? आनंदा नाही तोटा.

महालक्ष्म्या घरी असताना मला अगदी तसेच वाटायला लागते. आपले कोणी तरी ज्येष्ठ, प्रेमळ नातेवाईक आपल्या घरी त्यांच्या मुलाबाळांसह मुक्कामाला आलेले आहेत. त्यांच्यासाठी काय करू ? आणि काय नको ? अशी मनाची लहान मुलासारखी अवस्था होऊन जाते.



 आपण एवढ्यातच एक नवीन सूक्त शिकलोय. ते त्यांना म्हणून दाखवूयात ? की परवा आपण एक नवीन भजन शिकलोय. तेच म्हणूयात ? मनाची अशी अवस्था. स्वतःला ३० वर्षे लहान करून टाकणारी.

जाणते झालो. जबाबदार्‍या अचानक अंगावर पडायला लागल्यात. पती झालो, बाप झालो. मुले मोठी व्हायला लागलीत. आजही अशा महालक्ष्मी आगमनाच्या दिवशी अचानक मुलांच्या वयाचे आपण आपल्यालाच दिसू लागतो. आपल्या वयाचे आपले वडील असतानाचा काळ जाणवू लागतो. अक्षरशः १२५ स्केअर फुटांच्या, मातीच्या भिंती  असलेल्या जुन्या घरात महालक्ष्म्या करताना त्यांची कल्पकता, त्यांचे कष्ट प्रकर्षाने जाणवतात.  बरे प्रसादासाठी निमंत्रित मंडळीही भरपूर. सगळी प्रेमाची मंडळी गैरसोयी सोसून, ऊनपाऊस झेलत सहभागी व्हायची. ते दिवसही प्रकर्षाने डोळ्यात दाटून येतात.

"आठवणी दाटून आलेल्या,

ओल्या पापण्यांत जपाव्यात.

आणि डोळ्यांतील पाण्यानेच,

आठवणींची पाने उलटावीत."

।। बारम्मा ।।

।। भाग्यदा लक्ष्मी बारम्मा ।।

- कृपाभिलाषी (शरीराने वाढलेला असला तरी मनाने अजूनही शालेय वयाचा असलेला) चि. राम प्रकाश किन्हीकर,

कुहीकर वाडा, पोथी गल्ली, इतवारी, नागपूर.

Sunday, September 13, 2026

मोदक : एक चिंतन

खरेतर मोदक या शब्दाचा अर्थच मुळात मोद (आनंद) तयार करणारा (मोद+क) आहे. त्यामुळे मोदकावर चिंतन काय करायचे ? हा माझ्यासमोर असलेला मोठा "क्रायसिस" होता तुम्हाला सांगतो. आमच्या देशस्थी पद्धतीप्रमाणे कमीतकमी अर्धा डझन मोदक खाल्ल्यानंतर मोदक या विषयावरच काय पण आपण आज काय जेवलोय याचे चिंतन करण्याइतपत सुद्धा आपला मेंदू सक्रिय नसतो. आपसूकच डोळे मिटू लागतात आणि आपण निद्रादेवीच्या राज्यात सामील होऊन जातो. दुपारची अशी फ़र्मास वामकुक्षी वगैरे झाली की उठल्यानंतर दुपारच्या चहाआधी पुन्हा एखाद दोन मोदक फ़स्त होतातच. त्यात कसले आलेय चिंतन ? पण दरवर्षी गणपती उत्सव जवळ आला की "मोदक उकडीचे की तळणीचे ?" या विषयावर फ़ेसबुक आणि इतर समाजमाध्यमांवर अनेक वाद झडतात, कारण दोन्हीही बाजूंकडून भांडी वाजो लागतात. तसे "भांडी वाजो लागली" हे युध्द आणि पाकक्रिया या दोहोंचे सामायिक लक्षण आहे. आणि आपल्यालाही असे चिंतन वगैरे करण्याची सुरसुरी वगैरे येते.


ही भांडणे इतक्या टोकाला जातात की तिस-या महायुद्धाचे कारण "मोदक: उकडीचे की तळणाचे ?" हे होऊ शकेल अशी भिती वाटू लागते.


उकडीच्या मोदकांचे "मोम्मोज" शी असलेले साधर्म्य लक्षात आणून देऊन, चीन, मंगोलिया, जपान, फिलीपाईन्स आदि पूर्वेकडच्या, अती पूर्वेकडच्या देशांचा पाठिंबा घ्यायला, दामले ओक लेले फडकें, त्या त्या राष्ट्रांना इ मेल लिहीण्याचा सपाटा लावतात.


इकडे तळणासाठी "तेल" लागत असल्याने आपण मध्यपूर्वेतील अरब राष्ट्रांचा पाठिंबा घ्यायला हवा अशी चर्चा देशपांडे, कुळकर्णी, पांडे यांच्यात होते. पण मुळातच बेशिस्त असल्याने कुणाच्या इ मेल वरून पत्र पाठवून पाठिंबा मागायचाय यावर एकमत झालेले नसते. आणि याच बेशिस्त पणामुळे महायुध्द व्हायचे टळते बहुतेक. Blessing in disguise.


पुढल्या गणेशोत्सवापर्यंत या विषयावर शांतता असते आणि गणेशोत्सव जवळ आला की पुन्हा युद्धाचे ढग जमू लागतातच. त्यात आमच्यासारखे काही जन्माने देशस्थ पण कर्माने आणि सवयींने कोकणस्थ असलेले लोक दोन्हीही प्रकारचे मोदक खायला मिळावेत म्हणून त्या आगीत तेल ओतत असतातच.


तर एकूण विषय काय ? मोदक खाल्ल्यानंतर पाच मिनीटांमध्ये झोप येणे आणि त्या झोपेचा परिणाम म्हणून आपलेही उदर आपल्या दैवतासारखे विशाल होणे आणि त्यात अधिकाधिक मोदक सामावले जाण्याची शक्ती येणे हेच या मोदक आख्यानाचे मोदकावरील वादांचे अंतिम फ़लित. मग ते मोदक उकडीचे असोत की तळणाचे असोत.


- खाद्यपदार्थोदभव युध्द तज्ञ (कशी वाटली मी मलाच दिलेली पदवी ?), उत्तमोत्तम शाकपाक प्रेमी, (थोडक्यात 'खादाडखाऊ') आणि आप्त मित्रांचा "मोदक" (मोद = आनंद निर्माण करणारा), रामभाऊ. 


(ही पोस्ट सुध्दा गणेशोत्सवाच्या काळात अनेक व्हॉटसअॅप गृप्सवर फिरणार, यात शंका नाही.)  

Tuesday, September 8, 2026

वेदमूर्ती ?

आजकाल स्वतःला "वेदमूर्ती" म्हणवून घेणाचे हे एक नवीनच फ़ॅड गुरूजींमधे सध्या आलेय.

श्रीगणपत्यथर्वशीर्ष, पुरूषसूक्त, श्रीसूक्त, एकादष्णी आणि पवमान येव्हढेच येत असले तरी स्वतःच स्वतःला "वेदमूर्ती" म्हणवून घ्यायचे. एकेका वेदाचे भेद किती आहेत ? शाखा किती आहेत ? याची साधी मोजणी सुध्दा येत नसलेल्या व्यक्ती "वेदमूर्ती" ?

श्रीगुरूचरित्र नियमीतपणे वाचणा-यांनी तरी त्यातल्या सव्विसाव्या अध्यायाचा अन्वयार्थ लक्षात घेऊन स्वतःला वेद कळतात असा दावा करू नये.

- अशावेळी नेमके पुल आठवणारा 

"चड्डी फाटली तर लेकाला टीप मारता येत नाही, नीट. आणि हा ठिगळ्या टेलर स्वतःला "प्रोफेसर" म्हणवून घेतो ? "

पुल भक्त, प्रा वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 

Monday, September 7, 2026

आनंदाने जगायचं नाकारणं यासारखा दुसरा शाप नाही

पु. ल. देशपांड्यांनी वर्णन केल्याप्रमाणे आम्ही म्हणजे रोज दुपारचा आणि (संध्याकाळचाही) ताकभात उरकून हातावरचे पाणी वाळायच्या आत निद्रादेवीच्या राज्यात सामील होणारे वीर.  पत्रिकेच्या सुखस्थानी गुरू असला की असली सुखे लाभतात असे म्हणतात.  टचवुड. ते जाऊ देत बापडे.


रोज कामधंद्यावर दुपारच्या वामकुक्षीची होणारी पंचाईत सुट्यांच्या दिवशी भरून काढण्याच्या दृष्टीने आमची कायम वाटचाल असते. कधीकधी दुपारी साधारण चांगल्या चार पाच  घटिका वामकुक्षी पार पाडल्यानंतर उठताना घड्याळाकडे बघून क्षणभर अपराधी वाटतही, नाही असे नाही.


पण लगेच पाडगावकरांची "खरं सांगतो यात काही पाप नाही.आनंदाने जगायचं नाकारणं यासारखा दुसरा शाप नाही" या ओळी आठवतात. आणि आपणच आपल्या मनाची समजूत घालतो. आणि या तात्पुरत्या अपराधगंडातून बाहेर येतो.


- खरेतर "आयत्यावेळी आपल्या समर्थनार्थ अगदी convincing अशी योग्य ती वाक्ये, योग्य त्या कवितांच्या ओळी सुचणे यासारखे खरे सुख नाही" असे मानणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 

Saturday, September 5, 2026

कालचे पालकत्व आणि आजचे पालकत्व : नक्की काय बरोबर ?

साधं LHS = RHS सांगितल्यावर जणू काही या कार्ट्याने 

e = mc(square) चा शोध लावल्यासारखे अत्यंत लाडात येऊन "ब्रेक ले ले यार पार्टनर" म्हणणारी आई,

आणि 

मुलगी डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या करकरून साधं आपलं डोळ्यांच्या अंतर्रचनेचा अभ्यास करत असताना "ब्रेक ले ले यार पार्टनर" म्हणणारे वडील

आमच्यावेळी का नव्हते हो ? आमच्याकाळी आम्हाला पुस्तकाच्या पहिल्या पानावरील प्रतिज्ञेपासून मधल्या सगळ्या पानांवरील धडे, त्यातल्या solved assignments (आणि त्यातले unsolved questions पण त्यांच्या उत्तरांसकट) ते शेवटल्या पानांवरच्या धड्यांपर्यंत जवळपास पाठ असूनसुध्दा (आणि आपला कार्टा असला एकपाठी आहे हे जन्मदात्यांना माहिती असूनसुध्दा), "मेल्या, परीक्षेआधी असा उंडारण्याऐवजी पुन्हा एकदा सगळे पुस्तकातले धडे वाचून काढलेत तर डोळे फुटणार आहेत का तुझे ?" अशी दटावणी आमच्या जन्मदात्यांकडून मिळायची.

पण त्यामुळेच आम्ही tough झालोत. छोट्याशा स्तुतीने हुरळून स्वतःविषयी अवास्तव कल्पना करून न घेता (आणि त्यामुळेच छोट्याशा अपयशाने खचून जाऊन स्वतःचे devaluation करून न घेता) Right Evaluation करायला शिकलोत.

जाहिरातवाले काय हो ? काय वाट्टेल ते सांगतात. पण नुसते LHS = RHS सांगितल्यावर गणितातली मोठ्ठी theory मांडल्याच्या पराक्रमाचे कौतुक करून तुम्ही पाल्याचे over evaluation करुन त्याच्याच पुढल्या आयुष्यात प्रश्न निर्माण करू शकता हे सुजाण पालकांना कळायला हवे.

- "जुने ते सोने" मानणारा आणि तरीही आधुनिक शिक्षणपध्दतीतून उत्तम गोष्टी घेऊन त्यांचे कसोशीने अवलंबन करत असणारा, आपला right evaluator, पंतोजी, रामशास्त्री किन्हीकर. 

Thursday, September 3, 2026

जन्मस्थानं न खलु विमलम

चंद्रपूर माझे जन्मस्थान. आजोळ चंद्रपूर. बालपणापासून माझ्या प्रेमाची सगळी माणसे चंद्रपुरात. परम पूजनीय बापुराव महाराजांच्या परिवारात सामील झाल्यावर परम पूजनीय मायबाई महाराजांच्या मुखातून परम पूजनीय महाराजांचे चंद्रपुरातले वास्तव्य आणि त्यांना चंद्रपूर विषयी वाटणारी आत्मीयता धन्य कानांनी ऐकली होती. 


"चंद्रपूर म्हणजे सत्पुरूषांचे माहेरघर" ही महाराजांची उक्ती मनोमन पटलीही होती.


कृष्णस्वरूप श्री हयग्रीव महाराज.


प.पू. हयग्रीव महाराज समाधी

योगायोगाने पत्नीही चंद्रपूरचीच लाभली. त्यामुळे चंद्रपूरच्या फ़ेर्‍या नियमीत व्हायला लागल्यात. 


चंद्रपूरची भेट म्हणजे ग्रामदैवत महाकाली, जागृत आणि उपेक्षित असलेले तीर्थक्षेत्र अंचलेश्वर, महाराजांचे कुलदैवत असलेली एकवीरा जगदंबा, कृष्णस्वरूप असलेले योगी परम पूजनीय हयग्रीव महाराज, परम पूजनीय निकालस महाराज आणि ज्यामुळे आमचा धार्मिक पिंड घडला ते आजोळी असलेले श्रीलक्ष्मीनृसिंहाचे जागृत देवस्थान यांचे दर्शन अत्यावश्यकच. या सगळ्या ठिकाणांना भेटी देऊन मनाला परम समाधान लाभते. 


चंद्रपुरात घडून येत असलेले बदल पाहून मन सुखावले. या शहराची स्वच्छतेकडे होणारी वाटचाल स्पृहणीय. त्याचबरोबर अंचलेश्वर देवस्थानाकडे होणारे दुर्लक्ष आणि परम पूजनीय हयग्रीव महाराजांच्या समाधीची उपेक्षित अवस्था पाहून मन खिन्न होत असते. भाविकांनी या ठिकाणांकडे आस्थेने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे.




श्रीक्षेत्र अंचलेश्वर तटबंदी.



श्रीक्षेत्र अंचलेश्वर मंदीर परिसरातली पुरातन बावडी.






आई महाकाली जगदंबा भवानी

Wednesday, September 2, 2026

दहिहंडीचे बदलते स्वरूप आणि आपल्या सगळ्यांचीच परिस्थितीशरणता

पुण्यातल्या गणेशोत्सवातल्या ध्वनीप्रदूषणाबद्दल आणि त्या उत्सवाच्या एकंदरच बदलत चाललेल्या स्वरूपाबद्दल समस्त पुणेकरांनी आवाज उठवायला सुरूवात केलेली ही एक अतिशय चांगली बाब गेल्या आठवड्यात घडलेली आहे. मला वाटतं, सगळ्या मराठी माणसांनी दहिहंडीच्या बदलत चाललेल्या स्वरूपाबद्दल सुद्धा असाच आवाज उठवायला हवा. पण अनेक वर्षांपासून आपण दहिहंडीचे सध्याचे स्वरूप पाहत आल्याने आपण सर्वांनी हेच स्वरूप वास्तव म्हणून स्वीकारलेय की काय ? अशी शंका मला येते. किंवा सध्याचे दहिहंडीचे स्वरूप बरोबर नाही पण आपण काहीही करू शकत नाही अशी परिस्थितीशरणता आपल्यात आलेली आहे की काय ? अशीही शंका माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात येते.


अनेक वर्षांपासून मुंबई ठाण्यात चाललेल्या या अतिशय फालतू चालिरीतीचे खूळ हळूहळू, गेल्या दहा पंधरा वर्षात चाणाक्ष आणि संतुलित समजल्या जाणार्‍या वैदर्भिय जनतेच्या मनात भरवून देण्याची टूम इथल्याही काही काही दिखाऊ, शोबाज राजकारण्यांमधे येत चाललेली पाहून मी अस्वस्थ झालो होतो. याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे सुद्धा न ऐकता, "तो एक खेळ आहे" वगैरे भंकस युक्तिवाद करत, सोयीस्कर पळवाट काढून, सर्वपक्षीय राजकारण्यांनी ती दहिहंडी आपल्या बोकांडी मारलेलीच आहे. 


ती जास्तीत जास्त थरांची जीवघेणी स्पर्धा, त्यात ही असली जत्रा भरवून, आपला मोठेपणा दाखवण्यासाठी, भव्य मंच वगैरे उभारून, आपलीच तरूण मतदार मंडळी जखमी होताना, मरताना निर्विकारपणे पाहणारे, मध्ययुगीन राजे सरदारांच्या मानसिकतेचे आपले राजकारणी आणि कोट्यावधी रूपयांच्या लालसेला भुलून आपला आणि आपल्या सहकार्‍यांचा जीव पणाला लावणारी ती भुरटी दहीहंडी मंडळे. हे लोण विदर्भात कधीही नकोय.



विदर्भात गोकुळाष्टमी म्हणजे घरोघरी कान्होबाची मूर्ती आणून अष्टमीच्या रात्री तिची पूजा, रात्री भजन, मध्यरात्री श्रीकृष्णजन्माचा आनंदोत्सव आणि दुस-या दिवशी घरच्या आणि आसपासच्या बाळगोपाळांसाठी छोटीशी दहीहंडी असे स्वरूप असते. दुस-या दिवशी इष्टमित्र, सोयरे धायरे यांच्यासह भोजन करणे असा आनंदी उत्सव असतो.



दहीहंडी उत्सवाचा आत्मा हा असा फार निराळा आहे रे. हे बाजारू स्वरूप म्हणजे दहीहंडी नाही. श्रीमदभागवतात भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सामान्य कुटुंबातील सोबत्यांना, सवंगड्यांना दूध दुभत्याचा लाभ व्हावा, त्यांचीही शरीरे पुष्ट व्हावीत, त्यांना पुरेसे पोषण मिळावे म्हणून दहीदुभत्याच्या हंड्या फ़ोडल्या होत्या. आणि त्यातल्या मेव्याचे वाटप सगळ्यांना केले होते. वनात गुरे राखयाला जाताना श्रीमंत गरीब सगळ्यांनी एकत्र शिदोरी खाताना कुठलीही उच्च नीच भावना मनात सवंगड्यांपैकी कुणाच्याही मनात राहू नये, गरीबाला आपली शिदोरी सगळ्यांसोबत वाटून खाल्ल्याचे समाधान मिळावे म्हणून सगळ्यांच्या शिदोरीचा एकत्र गोपालकाला करून खाल्ला होता. ती भावना आजसुद्धा आपण रोजच्या व्यवहारात जोपासली तर आपल्या आपल्या सामाजिक वर्तुळात नकळतपणे किती समरसता आपोआप साधली जाईल याचा विचार आपण करायला हवा. तो खरा गोपालकाला, तो त्या श्रीकृष्णाचा संदेश. आज दहीहंडी साजरी करताना, गोपालकाला खाताना किती जणांना हे आठवते ?


बाय द वे, उंची वाढवण्यासाठी म्हणून ती क्रेनला बांधलेली दहीहंडी पाहून सूटबूट, गॉगल आणि मोजे घालून देवपूजेला बसणार्‍या बावळट माणसाला पाहिल्यासारख वाटत.

 

काहीही थेरं!


- दरवर्षी उत्सवात दहीहंडी फोडल्यावर त्या हंडीच्या आतले अस्सल सायीचे गोड दही मटकावणारा आणि दोन्ही मुठी भरून गोपालकाला खाणारा, पुराणकालीन कृष्णसखा, पैंदाराम.