Showing posts with label Mahakali Temple. Show all posts
Showing posts with label Mahakali Temple. Show all posts

Thursday, September 3, 2026

जन्मस्थानं न खलु विमलम

चंद्रपूर माझे जन्मस्थान. आजोळ चंद्रपूर. बालपणापासून माझ्या प्रेमाची सगळी माणसे चंद्रपुरात. परम पूजनीय बापुराव महाराजांच्या परिवारात सामील झाल्यावर परम पूजनीय मायबाई महाराजांच्या मुखातून परम पूजनीय महाराजांचे चंद्रपुरातले वास्तव्य आणि त्यांना चंद्रपूर विषयी वाटणारी आत्मीयता धन्य कानांनी ऐकली होती. 


"चंद्रपूर म्हणजे सत्पुरूषांचे माहेरघर" ही महाराजांची उक्ती मनोमन पटलीही होती.


कृष्णस्वरूप श्री हयग्रीव महाराज.


प.पू. हयग्रीव महाराज समाधी

योगायोगाने पत्नीही चंद्रपूरचीच लाभली. त्यामुळे चंद्रपूरच्या फ़ेर्‍या नियमीत व्हायला लागल्यात. 


चंद्रपूरची भेट म्हणजे ग्रामदैवत महाकाली, जागृत आणि उपेक्षित असलेले तीर्थक्षेत्र अंचलेश्वर, महाराजांचे कुलदैवत असलेली एकवीरा जगदंबा, कृष्णस्वरूप असलेले योगी परम पूजनीय हयग्रीव महाराज, परम पूजनीय निकालस महाराज आणि ज्यामुळे आमचा धार्मिक पिंड घडला ते आजोळी असलेले श्रीलक्ष्मीनृसिंहाचे जागृत देवस्थान यांचे दर्शन अत्यावश्यकच. या सगळ्या ठिकाणांना भेटी देऊन मनाला परम समाधान लाभते. 


चंद्रपुरात घडून येत असलेले बदल पाहून मन सुखावले. या शहराची स्वच्छतेकडे होणारी वाटचाल स्पृहणीय. त्याचबरोबर अंचलेश्वर देवस्थानाकडे होणारे दुर्लक्ष आणि परम पूजनीय हयग्रीव महाराजांच्या समाधीची उपेक्षित अवस्था पाहून मन खिन्न होत असते. भाविकांनी या ठिकाणांकडे आस्थेने लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे.




श्रीक्षेत्र अंचलेश्वर तटबंदी.



श्रीक्षेत्र अंचलेश्वर मंदीर परिसरातली पुरातन बावडी.






आई महाकाली जगदंबा भवानी

Wednesday, December 25, 2024

दिशाज्ञान

खरेतर माझा जन्म चंद्रपूरचा. माझे आजोळ तिथले. बालपणी आणि तारुण्यातही उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी या कालावधीत महीनो न महिने चंद्रपूरला मुक्काम झालेला आहे.

साहजिकच या प्रत्येक मुक्कामा मध्ये चंद्रपूरची ग्रामदेवता असलेल्या श्री महाकाली देवीचे दर्शन किमान एकदा किंवा काहीकाही मुक्कामात अनेकादाही व्हायचे. या हिशेबाने मी आई महाकालीला अक्षरशः शेकडो वेळा भेटलो असेल.



माझा अनुभव असा की आईच्या या अती प्राचीन मंदिरात दर्शनाच्या बारीत आपण उभे राहिलो की आपण दिशाज्ञान विसरतो.आपल्यावर एक प्रकारची भूलच पडते म्हणा ना. इतर वेळी माझे दिशाज्ञान अगदी पक्के असते. पण श्री महाकाली आईच्या मंदिरात इथे नेमका विसर पडतो.मंदिरातून बाहेर पडल्यावर जाणवते की आई पश्चिमाभिमुख आहे आणि आपण दर्शन घेताना पूर्वाभिमुख होऊन दर्शन घेतो. पण प्रत्यक्ष मंदिरात सगळ्या दिशा एक झाल्याचा जो अनुभव येतो तो केवळ अविश्वसनीय.
आपल्यापैकी कुणाला श्री महाकाली मंदिरात किंवा इतरत्र असा अनुभव आलाय का ?
- आईकडे जाताना खूप मागणी, गाऱ्हाणी घेऊन जाणारा पण तिच्या दर्शनाने होणाऱ्या आनंदामुळेच सगळी मागणी, गाऱ्हाणी विसरणारा, बालक वैभवीराम प्रकाश किन्हीकर.