Tuesday, July 21, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २१ वामनावतार

श्रेष्ठ भगवदभक्त प्रह्लादाचा पुत्र विरोचन आणि त्याचा पुत्र बली हा मोठा पराक्रमी राजा होता. दैत्यकुळात जन्म झाला असला तरी आपल्या आजोबांच्या आणि वडिलांच्या संस्कारांमुळे ब्राह्मणांविषयी, यज्ञसागादि कर्मांविषयी त्याला अतिशय आदर होता. त्याच्या राज्यात तो आपल्या असुर प्रजाजनांसाठी नित्य यज्ञकर्मे, यागादि विधी करीत असे. अशा पद्धतीने जीवन जगता जगता तो इतका शक्तीशाली झाला की त्याने देवांवर स्वारी केली आणि इंद्राचे अमरावती नगर बळकावले. देवांना असुरांनी त्यांच्या स्थानावरून पदच्युत केले आणि ते स्वर्गाचे अनंत भोग उपभोगू लागलेत.


आपल्या पुत्रांना अशा प्रकारे पदच्युत होऊन दारोदार भटकावे लागत असल्याचे पाहून देवमाता अदिति दुःखीकष्टी झाली. तिचे पती कश्यप ऋषी आपल्या साधनेवरून परतल्यानंतर आपल्या पत्नीच्या उदासीचे कारण त्यांनी विचारले आणि अदितिने देवांच्या पराभवाचे व असुरांनी अमरावती बळकावल्याचे वृत्त आपल्या पतीला कळवले. कश्यप मुनींनी अदितिला पयोव्रत या साधनेचा उपदेश केला आणि देवमाता अदितिने मनात कुठलीही शंका न धरता ते व्रत आरंभिले.


पयोव्रताचे फ़ळ म्हणून प्रत्यक्ष भगवान विष्णू अदितिच्या उदरी आपल्या चतुर्भुज स्वरूपात संपूर्ण आयुधांसह प्रगट झाले आणि मातेच्या मनातला असुर पराभवाचा हेतू जाणून त्यांनी वामनाचे बटुरूप घेतले. बलिराजाकडे तेव्हा अनेक यज्ञ सतत सुरू असत. नर्मदेच्या तीरावर सुरू असलेल्या अशाच एका अश्वमेध यज्ञात बटु वामनरूपाने भगवान विष्णू प्रगट झालेत. असुर जरी असला तरी त्याचे सात्विक कर्म जाणून त्याच्या घरी भगवंतांना याचक म्हणून जावे लागते. किती गोड कल्पना !



तेव्हा ते बटुरूप वामन इतके सुंदर, लोभसवाणे आणि तेजस्वी दिसत होते की सगळे याज्ञिक. ऋत्विज आणि तिथे उपस्थित असलेले असुर सगळे अगदी मोहित झालेत. बलिराजाने बटुरूप वामनाचे पूजन केले आणि त्यांना दान देण्याचा संकल्प सोडला. तोपर्यंत दैत्यगुरू शुक्राचार्यांनी वामनरूपातील भगवान विष्णूंना ओळखले आणि आपल्या शिष्याला पदच्युत करण्यासाठी भगवान इथे आलेले आहेत हे जाणून बलिराजाला त्या बटुला दान न देण्याबाबत सांगितले. पण बलिराजाने त्यांना उत्तर दिले की एकदा मी त्या बटुला शब्द दिलाय आता जर मी तो शब्द मागे घेतला तर माझ्या कुळाला बट्टा लागेल. आता माझे जीवित संपले तरी चालेत पण मी त्या बटुला दान देणारच. दैत्यगुरू शुक्राचार्यांनी संतापून बलिराजाला "गुरूंची अवज्ञा केल्याने तुझी सर्व लक्ष्मी नष्ट होईल" असा शाप दिला आणि ते तिथून चालते झाले.


हा संवाद ऐकत असलेले भगवान विष्णू मात्र बलिराजावर, त्याच्या निश्चयीपणावर आणि ब्राह्मण, यज्ञकर्मे याबाबत असलेल्या त्याच्या प्रेमावर प्रसन्न झाले. बलिराजाने त्यांना दान देण्याचा संकल्प सोडल्यानंतर त्यांनी फ़क्त तीन पाऊले भूमीचे दान मागितले. बलिराजाला याचे फ़ार आश्चर्य वाटले. त्याने वामन भगवान यांना आणखीही काही मागण्याची विनंती केली. आपल्या मनात असेल तर मी या पृथ्वीतलावरील एखादे संपूर्ण द्वीप आपल्याला देऊ शकतो. माझे राज्य स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या त्रिखंडात आहे त्यातला एक संपूर्ण खंड तुम्ही मागितला तरी मी देईन अशी तयारी दर्शविली पण वामन भगवान आपल्या तीन पावलांच्या दानावर ठाम राहिलेत. याप्रसंगी बलिराजा आणि वामन भगवान यांचा संवाद श्रीमदभागवताच्या अष्टम स्कंधात मुळातूनच वाचण्यासारखा आहे. वामन भगवान बलिराजाला मनुष्यमात्रांच्या मनातल्या कधीही न संपणा-य़ा तृष्णेचा उपदेश करतात आणि ती तृष्णा ज्याची आहे तो तिन्ही लोकांचा स्वामी जरी बनला तरी आपल्या अंतरात्म्यातल्या तृष्णेमुळे मनातून कधीही सुखी होत नाही. कायम नवनवीन मिळवण्याची त्याची तहान कायम असते. याउलट प्रारब्धवशाने आपल्याला प्राप्त होत असलेल्या वस्तूंमध्ये तृप्त असलेला पुरूष हा जगाला जिंकल्यासारखाच समाधानी असतो हा उपदेश भगवान वामनांनी बलिराजाला केला. बलिराजा मनोमनी समजला. अत्यंत सात्विक बुद्धी जरी असली तरी नवनवीन गोष्टी मिळविण्याची तृष्णा आपल्याला कायम असमाधानी ठेवेल हा आत्मबोध त्याने करून घेतला.


त्यानंतर भगवान विष्णूंनी वामनरूपातून विराटरूप धारण करून एका पाऊलाने सगळी पृथ्वी, तर दुस-या पाऊलाने सगळे आकाश व्यापले. तिसरे पाऊल ठेवायला त्यांना जागाच मिळेना तेव्हा बलिराजाने आपले मस्तक त्यांच्यापुढे केले. बलिराजाचा हा दृढसंकल्प आणि सात्विकता पाहून भगवान प्रसन्न झालेत आणि त्यांनी बलिराजाला पाताळाचे राज्य दिले. या मन्वतरानंतर बलिराजा हाच जगाचा राजा म्हणून राज्य करणार असल्याचे वरदान सुद्धा बलिराजाला त्याने न मागता दिले.



वामनावतारात भगवंतांनी एका अतिशय सात्विक, शुद्ध राजाच्या मनातल्या तृष्णेची आणि त्यापासून कायम मिळत राहणा-या मनातल्या असंतोषाची त्याला जाणीव करून दिली आणि सरतेशेवटी त्याच्या मनात कायम संतोष राहील असा आशिर्वाद दिला. हा या कथेचा आपण सर्वांना आत्मबोध. आपण सात्विक बुद्धीचे आहोत पण आपल्या मनात अशी तृष्णा आहे का ? याचा विचार आपला आपण करायचा आहे आणि भगवान वामनांच्या उपदेशाप्रमाणे आपल्या मनाला बोध करून घ्यायचा आहे हाच या कथेचा प्रसाद.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध अष्टमी शके १९४८ दिनांक  २१ / ७ / २०२६


२१ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 




Monday, July 20, 2026

श्रीमदभागवत चिंतन - २० समुद्रमंथन

एकेकाळी सर्व देवांना दानवांनी पराजित आणि हतप्रभ करून टाकलेले होते. देवांचा प्रभाव जनमानसावर पडेना. त्यांची शक्ती अगदी क्षीण करून दानव या जगावर राज्य करू लागले.


देव म्हणजे त्यागी जीवन. दानव म्हणजे भोगी जीवन. देव म्हणजे स्वतःआधी इतरांचा विचार करणारे व्यक्ती. तर दानव म्हणजे फ़क्त स्वतः आणि स्वतःचाच विचार करणारी व्यक्ती. देव म्हणजे समष्टीच्या कल्याणाची इच्छा तर दानव म्हणजे फ़क्त स्वतःच्याच कल्याणाची इच्छा. देव म्हणजे समस्त सृष्टीच्या कल्याणाचा विचार तर दानव म्हणजे "खाओ, पिओ ऐश करो" हा विचार. या दोन विचारसरणींमधला संघर्ष फ़ार जुना आहे. बराच काळ देवांची विचारसरणी मान्य करून त्या पथावर चालणारा समाज असतो तर मधला काही काळ दानवांच्या आकर्षक मांडणीला भुलून, दानवांची विचारसरणी पटून, त्या विचारसरणीचे आकर्षण वाटून त्या मार्गाने जाणारा समाज अस्तित्वात येतो. हा देवांचा पराभव असतो. आणि हे दानवराज्य फ़ार काळासाठी पृथ्वीवर असणे हे समस्त पृथ्वीसाठी अत्यंत धोकादायक असते.


अशावेळी पराभूत झालेल्या देवांनी परमेश्वराची आराधना केली, त्यांची यथार्थ स्तुती केली. देवांचा सदहेतू जाणून प्रत्यक्ष भगवान प्रगट झालेत आणि त्यांनी देवांना कायम अपराजित राहण्यासाठी अमृतप्राशन करण्याचा सल्ला दिला. ते अमृत समुद्रमंथनातून मिळेल असा नुसता आशिर्वाद देऊन भगवान शांत राहिले नाहीत तर समुद्रमंथन करण्याचा सविस्तर विधीसुद्धा त्यांनी कथन केला आणि समुद्रमंथनादरम्यान कासवरूप घेऊन मेरुपर्वत स्वतःच्या पाठीवर तोलून मंथनादरम्यान तो समुद्रात बुडणार नाही याची तजवीज करण्याची ग्वाहीसुद्धा भगवंतांनी देवांना दिली. नियमानुसार वागून सुद्धा जर सुष्ट शक्तींचा पराभवच होणार असेल आणि जग संपणारच असेल तर जगाच्या पालनकर्त्या भगवंताला प्रसंगी त्या नियमांना मुरड घालून थोडा पक्षपात करून ते जग पुनर्स्थापित करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतील त्या कराव्याच लागतात.



प्रसन्न झालेल्या भगवंतांनी या समुद्रमंथनातून अमृत प्रगट होण्यापूर्वी विष प्रगट होईल याचीही पूर्वसूचना सर्व देवांना देऊन ठेवली होती. आणि घडलेही तसेच. अमृतमंथनात विष प्रगट झाले तेव्हा ते प्राशन करायला कुणीही तयार होईना. तेव्हा देवांनी सृष्टीचे आद्य दैवत शंकरांची मनोभावे प्रार्थना केली. हे विष जर मी प्राशन केले नाही तर पृथ्वीवरील सगळ्याच जीवांना अतिशय त्रास होईल या अत्यंत विशाल हेतूने भगवान शंकरांनी ते विष प्राशन केले आणि ते सृष्टीचे कायम उपकारकर्ता असे महा देव झालेत.


सरतेशेवटी ज्या अमृतासाठी हे मंथन सुरू झालेले होते ते अमृत सागरातून प्राप्त झाले. ते वाटण्यासाठी श्रीविष्णूंना मोहिनीरूप घेऊन सगळ्या दैत्यांना भुलवावे लागले. सत्य मार्गाचा कायम अवलंब करीत असलो तरी जर सत्य मार्गात कायमचा अडथळा असा दैत्य राज्याच्या दृष्टीने येणार असेल तर मग थोडे सत्य बाजूला सारून असत्य, कपट याचा वापर करून देवराज्य पृथ्वीवर आणले पाहिजे हा धडा आपल्याला प्रत्यक्ष भगवान श्रीविष्णूंनी दिला. साध्य होते देव राज्य पुन्हा स्थापित करण्याचे. त्या अतिशय उदात्त साध्यासाठी तत्वांना थोडी मुरड घालावी लागली तर तो आपदधर्म म्हणून ती तशी घातली पाहिजे हे "सत्यं परं धीमहि" असे प्रतिपादन करणा-या श्रीविष्णूंनी या प्रसंगाद्वारे सांगितले आहे.



हाच आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यानंतर चार हजार वर्षांनी देवाचे, धर्माच्या मार्गाने चालणारे मराठी राज्य प्रस्थापित केले आणि सकल भारतवर्षावर फ़ार फ़ार उपकार केलेत.


अमृताआधी विष येणार आहे. ते प्राशन करून पचवूनच पुढे गेलोत तर अमृत मिळणार आहे आणि जगाच्या कल्याणाकरिता व्यापक विचार करून, साध्य काय आणि साधन काय याचा विचार सदैव जागृत ठेऊन आपल्याला आपली कृती ठरवायची आहे हेच आपण या समुद्रमंथनातून शिकत जातो.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध सप्तमी शके १९४८ दिनांक  २० / ७ / २०२६


२० जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 



श्रीमदभागवत चिंतन - १९ गजेन्द्रमोक्ष आख्यान

सुंदर वृक्ष असलेली वने, फ़ळांची, फ़ुलांची सुंदर आणि सुवासिक झाडे असलेली आणि मनमोहक सरोवरे असलेली उपवने असलेले एक ठिकाण एका पर्वत पायथ्याशी होते. त्या वनात एक अत्यंत पराक्रमी आणि सुंदर असणारा हत्ती एखाद्या राजाप्रमाणे राज्य करीत होता. त्याला अनेक राण्या आणि पुत्र होते. तो हत्ती इतका पराक्रमी होता की नुसत्या त्याच्या चाहुलीनेच वनातल्या इतर क्रूर प्राण्यांची बोबडी वळायची आणि या क्रूर प्राण्यांचे भक्ष्य असलेले इतर प्राणी आपल्या कैवा-याच्या अशा वावरामुळे मनातून आनंदून जायचे. एकंदर मोठ्या मजेत आणि आनंदात तो गजेंद्र वनात राहत होता.


एकदा असाच तो गजेंद्र वनात आपल्या राण्यांसह विहार करीत असताना त्याला आणि त्याच्या कळपातल्या पिल्लांना आणि त्याच्या राण्यांना तहान लागली. तो गजेंद्र आपल्या राण्यांसह पाणी पिण्यासाठी एका छान सरोवरात उतरला. पाणी पिऊन झाल्यानंतर त्यांनी एकमेकांवर आपापल्या सोंडेनी पाणी उडवत जलक्रीडा करीत होते. तेव्हढ्यात पाण्यातल्या एका मगरीने त्याला पाण्यात त्रास झाल्यामुळे क्रोधित होऊन त्या जलक्रीडेच्या ठिकाणी येत त्या गजेंद्राचा पाय आपल्या जबड्यात पकडला.



सुरूवातीला गजेन्द्राने स्वतःचे संपूर्ण बळ एकवटून त्या मगरीच्या तावडीतून आपला पाय सोडविण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे पाण्यातले बळ त्या मगरीपेक्षा कमी पडत होते. त्याच्या कुटुंबियांनीही त्याला सोडविण्यासाठी आक्रोश सुरू केला पण काही केल्या त्याची त्या मगरीच्या जबड्यातून त्याची मुक्तता होईना. अखेर एक एक करून त्याचे कुटुंबिय त्याला सोडून पाण्याबाहेर जाऊन वनात परतू लागलेत आणि आता मात्र तो गजेंद्र एकटा पडला.


स्वतःच्या शरीरातली क्षीण होत चाललेली शक्ती, कुटुंबिय आणि मित्रांनी कठीण काळी सोडलेली साथ यामुळे मगरीच्या जबड्यात पाय सापडलेला तो गजेंद्र व्याकूळ होऊन भगवान श्रीहरींना आळवू लागला. त्यांची स्तुती करू लागला. संसारात वावरताना "जन सुखाचे सोबती, निर्वाणीचा श्रीपती" या उक्तीचे त्याला स्मरण झाले आणि त्याने भगवंतांची व्याकूळ आराधना सुरू केली.


भक्ताच्या अत्यंत व्याकूळ हाकेला ओ देणे हे तर भगवंताचे प्रमुख कार्य आहे. भगवान विष्णू त्यांच्या गरूडासह त्या सरोवराकाठी प्रगट झालेत आणि त्यांनी त्या मगरीचा जबडा फ़ाडून गजेंद्राची मुक्तता केली. याप्रसंगी आपल्याही आयुष्यातले आपले अनुभव आपण सर्वसामान्य जनांनी इथे लक्षात घ्यावेत. जीवन अतिशय उत्तम सुरू असताना आपल्याला भगवंताचे स्मरण होत नाही. आपण आपल्या कर्तृत्वाच्या अहंकारात, मित्रमंडळी, कुटुंबियांच्या भरोशावर जीवन पार पाडू हा विश्वास आपल्याला असतो. जेव्हा ही सगळी साधने अपुरी आहेत हे आपल्या ध्यानात येते तेव्हा निर्वाणीच्या क्षणी आपल्याला भगवंत आठवतो. पण तो इतका दयाळू की तो आपल्या सहाय्याला धावून येतोच.



द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळीसुद्धा तिने श्रीकृष्णाला त्याने तिच्या सहाय्याला यायला इतका उशीर का केल्याबद्दल विचारले तेव्हा श्रीकृष्णाने तिला हेच सांगितले. द्रौपदी, तू पहिल्यांदा आपल्या नव-यांना विनवणी केली आणि नंतर सभेमधल्या उपस्थित जाणत्या मंडळींना विनंती केली. सगळ्यात शेवटी तू मला विनवणी केलीस. तू विनवणी केल्यानंतर मी लगेच आलो. उशीर तुझ्याबाजूने झालाय. 


गोस्वामी तुलसीदासांनी सुद्धा आपल्या दोह्यात हेच प्रतिपादन केलेले आहे. 


दुखमे सुमिरन सब करें, 

सुखमें करे न कोई, 

सुखमे जो सुमिरन करे, 

दुख काहे को होई ?


तसे आपण सर्व संसारी मंडळी सुखाच्या क्षणांमध्येही भगवंताला न विसरता त्याचे नित्य स्मरण करीत राहिलो तर आपल्या या पृथ्वीतलावरच्या आयुष्यात दुःखाचे संकटांचे प्रसंग येणारच नाहीत. आणि आपल्या पूर्वकर्मामुळे असे प्रसंग जरी आलेच, तरी त्यात तो श्रीहरी आपल्या सोबत सदैव आहे ही आपली जाणीव जागृत राहून आपण धैर्याने त्या प्रसंगाला सामोरे जाऊ शकू.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध षष्ठी शके १९४८ दिनांक  १९ / ७ / २०२६


१९ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 



Sunday, July 19, 2026

मुसळधार पावसाच्या काही थरारक आठवणी

सध्या, माझा आवडता ऋतू, पावसाळा सुरू आहे. रात्रभर झोपेनंतर सकाळी उठल्यावर जर सूर्य उगवल्यानंतरही अंधारलेल्या वातावरणात, पावसाची रिपरिप कानी येत असली की 


"पाऊस कधीचा पडतो

झाडांची हलती पाने

हलकेच जाग मज आली

दुःखाच्या मंद सुरांने" 

ही ग्रेसची कविता आठवते.

 

बदल असलाच तर फक्त ग्रेसच्या "दुःखाच्या मंद सुरांने" ऐवजी "सुखाच्या मंद सुरांने" ही भावना असते. खरोखर असे झोपेतून जागे होताना पाऊसाची रिमझिम कानी पडणे यासारखे सुख नाही. सर्द, गार वातावरणात कामाचाही उत्साह वाढतो हा माझा अनुभव. दिवसाची अशा प्रकारे छान सुरूवात होते.


आजवर अगदी बालपणचे ३-४ सोडलेत तर चांगले ४० - ४५ पावसाळे नुसते बघितलेच नाहीत तर सजगतेने अनुभवलेले आहेत. प्रत्येक पावसाळा खूप छान. पण एकदोन भितीदायक पण अनुभव आहेत.

२६ जुलै २००५ च्या मुंबईच्या ढगफुटी पावसात (१००० + मिमी  पाऊस आणि तो सुध्दा एका दिवसात) सापडल्याचा अनुभव सव्वा तपानंतर आजही काटा आणतो. 


असाच एक चित्रमय अनुभव.


१८/०७/२०१३ : सांगोल्यावरून काॅलेजनंतर संध्याकाळी ५ वाजता आम्ही निघालोत. नागपूरला गुरूमहाराजांकडे श्रीगुरूपौर्णिमा उत्सवासाठी मी, सौ. वैभवी आणि चि. मृण्मयी आमच्या गाडीने निघालो. तत्पूर्वी गाडीने सांगोला ते नागपूर हा ७५० किमी प्रवास दोनवेळा केलेला असल्याने त्या आघाडीवर निर्धास्त होतो.


रात्री ९ वाजता लातूर गाठले. ४ तासात २२० किमी. लातूरला एक मोटेल शोधले. विश्रांती घ्यायला लागलो.


१९/०७/२०१३ : पहाटे ५ ला उठून पटकन आवरून ५.३० ला प्रस्थान ठेवले. वाटेत हायवेवरच अहमदपूरच्या एका छोट्याशा हाॅटेलमधे सकाळी ७.०० वाजता गरमागरम इडली सांबार आणि चहा घेतला. इतकी अप्रतिम इडली आणि चविष्ट सांबार अख्या दक्षिण भारताच्या प्रवासातही कुठेच चाखायला मिळाला नव्हता. आजही ती चव अगदी जिभेवर आहे.


पाऊस तसा सोबत होताच पण रिमझिम. दुपारी ११.३० च्या आसपास नांदेड जिल्हा सोडून विदर्भात प्रवेश केला तेव्हा विदर्भातल्या पावसाचे वैदर्भीय माणसासारखेच उखडेल आणि रौद्रभीषण स्वरूप दिसायला सुरूवात झाली.




"हा इदर्भाचा मानूस का नाय, सरका रायला त सरका रायते बाप्पू. आन येकडाव का याच टायक सरकल का नाय त मंग पुरती आत्तरपित्तर काढून ठ्येवते त्यो." हे वैदर्भीय माणसाचे आणि पावसाचेही स्वभाववर्णन.


वाटेत धनोडावरून जाताना श्रीक्षेत्र माहूरला जाऊन अर्ध्या तासात कुलदेवतेचे, रेणुकामायेचे, दर्शन घेऊयात ही कल्पना आली. गाडी त्यादिशेने घेतली.




वाटेत विदर्भ मराठवाड्याला विभागणार्‍या अरूणावती नदीवरील पूल लागला. इतकी दुथडी भरून वाहणारी नदी मी आजवर कधीच पाहिली नव्हती. माहूरवरून दर्शन घेऊन परतेपर्यंत तरी पुराचे पाणी पुलावर येऊ नये अशी प्रार्थना करीतच माहूरला गेलो. दर्शन घेतले. साधारण तासाभरातच त्याच रस्त्याने परतलो. सुदैवाने पूर पुलापर्यंत पोहोचला नव्हता.



त्या जोरदार मार्‍यातच, नागपूरच्या, घराच्या ओढीने सावधानतेने गाडी चालवत वर्धा गाठले. आता काय ? शेवटचा ७० - ७५ किमीचाच पल्ला. थोडे सैलावलो. पण खरी कसोटी इथेच होणार होती.


वर्धा - नागपूर रस्त्याने केळझर सोडले आणि खडकी सेलडोह परिसरात इतका पाऊस लागला की गाडीतल्या गाडीत आम्हाला एकमेकांशी ओरडून बोलावे लागत होते. गाडीवर पावसाच्या मार्‍याचा अतीप्रचंड आवाज, हमरस्त्यावर पाटासारखे, प्रचंड वेगाने इतस्ततः वाहणारे पाणी काळजाची धडकी भरवणारे होते. 


इंग्रजीत खूप बदाबदा पावसाला "It is raining Cats and Dogs" असा वाक्प्रचार आहे पण हा पाऊस म्हणजे "It was raining Elephants and Rhinos" या वर्णनाचा होता. मार्गात आसर्‍याला थांबण्यालायक जागा नव्हती आणि गाडी एका जागी स्थिर थांबली असती याची खात्री नव्हती. पाण्याच्या प्रवाहात गाडी वाहत जाण्याची दाट शक्यता आम्हाला कुठे थांबू देत नव्हती.


हळूहळू आणि ड्रायव्हिंगचे सगळे कौशल्य पणाला लावून वर्धा ते नागपूर अंतर दोन तासात कापून घरी आलो. सुटकेचा निःश्वास सोडला. अत्यंत भीतीदायक आणि विचित्र पाऊस.



दुसर्‍या दिवशी (२०/०७/२०१३) सकाळी वर्तमानपत्र उघडले आणि सिंदीजवळ आदल्या दिवशी संध्याकाळी झालेल्या पावसाच्या मार्‍यात रेल्वेमार्गाचा भरावच वाहून गेल्याची बातमी वाचली आणि पुन्हा एकदा काळजाचा थरकाप उडाला.

काल आम्ही याच वेळेस त्याच जबरदस्त पावसाच्या पट्ट्यात सापडलो होतो. थांबलो असतो तर काय झाले असते ही कल्पनाही करवत नव्हती. गुरूमाऊलीचे, परमेश्वराचे आभार मानले.


गुरूपौर्णिमा उत्सव आटोपून परतताना मात्र एक वेगळीच मजा झाली. परतताना नागपूर - अमरावती - कारंजा (लाड) - मालेगाव (जहांगिर) - मेहेकर - देऊळगावराजा - जालना - अंबड - गेवराई - बीड - चौसाळा - मांजरसुंबा - कुंथलगिरी - येरमाळा - बार्शी - कुर्डुवाडी - पंढरपूर - सांगोला असा ८०० किमीचा मार्ग निवडला होता. एका दिवसात अंतर कापले गेले पाहिजे म्हणून नागपूरवरून पहाटे ४.३० ला च निघालो. वाटेत सतत पाऊस. सारखी आपली रिपरिप, रिपरिप. दिवसभर गाडीचे वायपर्स सुरू ठेवल्यामुळे तो आवाज संध्याकाळपर्यंत नकोसा वाटायला लागला होता. बरे, पाऊसही असा खट्याळ की वायपर्स बंद केलेत की असा वाढायचा की समोरचे दिसेनासे होईल. आणि वायपर्स सुरू केलेत की आपला रिमझिम, रिमझिम. वायपर्सची गरज नाही असे वाटणारा.


संध्याकाळी ७ च्या सुमारास जवळपास ७८० किमी अंतर कापून पंढरपूर - सांगोला रस्त्यावरील खर्डी गावी पोहोचलोत तर काय आश्चर्य ! सगळा परिसर कोरडाठाक. गेले वर्षभर इथे पाऊस नसल्यासारखा. खर्डी पासून सांगोल्यापर्यंत, २० किमीच्या पट्ट्यात,  पाण्याचा टिपुस नाही आणि गेल्या दोन तीन दिवसात पडल्याचा मागमूस नाही. 

संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस दमदार हजेरी लावत असताना हा भाग कोरडाच्या कोरडा. "पर्जन्यछायेचा प्रदेश" हे भुगोलाच्या पुस्तकात केवळ शिकलो होतो, त्यादिवशी अनुभवले.


- अनेक विद्यार्थ्यांचा गुरूजी असलो तरी सतत कसली ना कसली शिकवण देणा-या जीवनाला एक गुरू मानणारा वैभवीराम मास्तर.

Saturday, July 18, 2026

श्रीमदभागवत चिंतन - १८ प्रह्लाद चरित्र

आपला भाऊ हिरण्याक्ष याची हत्या भगवान विष्णूंनी केल्याचे ऐकताच सूडाने पेटलेला हिरण्यकश्यपू तप करू लागला आणि तपाचे फ़ळ म्हणून ब्रह्मदेवांकडून त्याने अमरत्वाचा वर मागितला. अमरत्व हे पृथ्वीतलावरील कुणालाही देणे अशक्य आहे हे त्याला ब्रह्मदेवांनी समजावून सांगताच त्याने बुद्धीचातुर्याने असा वर मागून घेतला की त्याला मारणे या पृथ्वीवरील कुणालाही अशक्यच व्हावे. आणि जवळपास अमरत्वच प्राप्त झालेला हिरण्यकश्यपू पृथ्वीतलावर धुमाकूळ घालू लागला. दैवी गुणांचा निषेध करून आसुरी गुण लोकांमध्ये रूजवू लागला. चांगल्या गोष्टींकडला सर्व जनतेचा कल हळूहळू कमी होऊ लागला आणि केवळ देह हा एव्हढाच खरा आणि देहाचे सुखे तेच परमसुख ही भावना आपल्या प्रजेमध्ये रूजवण्यात हिरण्यकश्यपू यशस्वी होऊ लागला.


अशावेळी भगवंताला काहीतरी लीला करावी लागते. या जगातले सगळे प्राणीमात्र योग्य जीवनक्रम चालवून, चांगल्या जीवन मार्गावरची श्रद्धा दृढ करून, देहसुख हे खरे सुख न मानता आपल्या देहापलिकडे विचार करून, आपले आत्मस्वरूप जाणण्याचा प्रयत्न करोत आणि ते आत्मस्वरूप जाणल्यावर तो आत्मा आणि परमात्मा यांचे अभेद्य त्यांच्या अनुभवास येवो अशी भगवंताची मनोमन इच्छा असते. त्यामुळे कुणी राजा अशा प्रकारे सृष्टीक्रमाविरूध वागून जर समाजरचना रसातळाला नेत असेल तर भगवंतांना लीला कराव्याच लागतात. त्यांनी हिरण्यकश्यपूच्या गर्भवती पत्नीला उपदेश करण्यासाठी सर्व लोकांमध्ये मुक्त संचार असलेल्या ब्रह्मर्षी नारदांची योजना केली. आणि दैवी आज्ञेने देवर्षींनी हिरण्यकश्यपूच्या पत्नीला सन्मार्गाचा उपदेश केला. अशाप्रकारे अत्यंत पापी, पराक्रमी आणि सूडाने पेटलेल्या अशा पित्याच्या, हिरण्यकश्यपूच्या प्रह्लादाने पोटी जन्म झाला. जन्मापूर्वी आईच्या गर्भात असताना देवर्षि नारदांनी आईला केलेला भगवत्भक्तीचा उपदेश प्रल्हादाने ऐकला आणि तो त्याच्यावर दृढ संस्कार झाला. 


श्रीमदभागवतात देवर्षी नारदांचे ज्या ज्या प्रसंगात प्राकट्य झालेले आहे ते ते सर्व प्रसंग सुखांतिकेत बदललेले आहेत. येनेकेन प्रकारेण प्रसंगांना सुखद वळण देण्याचे आणि भगवंताच्या मनासारखे घडवून आणण्याचे देवर्षींचे कार्य खरोखर नतमस्तक करणारे आहे. आज कलियुगात आपण देवर्षींना न जाणता त्यांना काही शेलक्या विशेषणांनी संबोधतो, ते किती चूक आहे हे आपल्याला कळेल. आणि आपणा सर्व सामान्य माणसांचे आयुष्य़ सुखकर होण्यासाठी जी विभूती कायम झटली तिचा उल्लेख हा कायम आदरार्थीच व्हायला हवा. कमीत कमी आपण भगवत्भक्तांनी तरी तो आदरार्थीच करायला हवा.



देवर्षींचे संस्कार दृढ असल्याने पित्याच्या शत्रूचे गुणगान करणारा प्रल्हाद हा पित्याला सतत खुपू लागला. विविध आमिषे दाखवून, धाकदपटशा करून पित्याने त्याचे मन वळवण्याचा, त्याला भगवत्भक्तीपासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण प्रल्हाद बधला नाही. गुरूवचनांवर दृढ विश्वास ठेवून इतर कुठल्याही भौतिक आमिषांना न बधणारा, किंवा प्राणांतिक प्रसंगांना त्याच दृढ विश्वासाने सामोरे जाणारा प्रल्हाद हा आजच्या तरूणांसाठी आदर्श व्हायला हवा. आपल्या बालपणी आपल्या सगळ्यांवरच खूप चांगले संस्कार झालेले असतात पण मोठे झाल्यावर आपल्याला अकारण त्या संस्कारांची लाज वाटते. किंबहुना चांगल्या संस्कारांची लाज वाटणे म्हणजेच मोठेपण येणे अशी आपण आपली समजूत करून घेतलेली आहे. आपल्या सगळ्यांसाठी गर्भावस्थेतले चांगले संस्कार आयुष्यभर आणि प्राणापेक्षाही जास्त जपणारा हा दैत्यकुळात जन्म झालेला प्रल्हाद आदर्श व्हायला हवाय.


प्रल्हादाचा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे अभय. श्रीमदभगवतगीतेत दैवी गुणसंपत्ती वर्णन करताना भगवंतांनी उल्लेख केलेला पहिला दैवी गुण म्हणजे अभय. "अभयम सत्व संशुद्धी:, ज्ञान योग व्यवस्थिती:" यात पहिल्यांदा येणारा गुण अभय. भक्त निर्भय नसेल तर त्याच्यात इतर गुण येणारच नाहीत आणि आलेच तर ते समाजासाठी प्रदर्शित करण्याचे त्याला भय वाटेल. आज आपल्यातल्या किती भगवत्भक्तांना अभय होऊन त्यांचे दैवी गुण समाजासमोर मांडावेसे वाटतात ? की समाजाच्या तामसी रेट्यामुळे आपणच झाकोळले जाऊन आपले चांगले गुण आपण समाजापासून लपवून ठेवतो आहोत ? आणि समाजातल्या नवीन पिढीसमोर चांगले काय आणि वाईट काय ? याचा नीरक्षीरविवेक आपण आपल्या वागणुकीतून ठेवला नाही तर त्यांना, जे आज तामस वातावरण त्यांच्या डोळ्यांसमोर जाणीवपूर्वक ठेवण्यात येतय, तेच आदर्श वाटणार ना ? भगवत्भक्तांनी निर्भय होऊन चांगल्याला चांगले म्हणून प्रसार करणे आणि वाईटाचा विरोध करणे हे आपले आजचे कर्तव्य नाही का ?


आणि प्रल्हादाचा सगळ्यात मोठ्ठा गुण म्हणजे गुरूवचनांवरचा विश्वास. चर आणि अचर सृष्टीतही तोच एक परमात्मा भरून राहिला आहे हा दृढ विश्वास त्याच्या मनात होता आणि त्या विश्वासाच्या योगानेच भगवंताला स्तंभासारख्या जड वस्तूतही स्वतःचे अस्तित्व दाखवावे लागले. श्रीगजानन विजय ग्रंथात संतकवी दासगणू महाराजांनी म्हटल्याप्रमाणे "प्रल्हाद भक्त करण्या खरा, स्तंभी प्रकटलास जगदोद्धारा" असे रूप भक्ताभिमानी भगवंतांनी घेतले खरे पण तत्पूर्वी भगवंतांनी प्रल्हादाची खूप परीक्षा पाहिली. 


"तत्र ज्ञान विराग भक्तिसहितम, नैष्कर्म्यम आविष्कृतम" या श्रीमदभागवताचेच वर्णन केलेल्या गुणांपैकी प्रखर भक्ती हा एक गुण अंगी असलेला भक्त प्रल्हाद. आणि त्याची प्रखर भक्ती इतकी की भगवान नृसिंहाचे प्रगट झालेले उग्र रूप पाहून सगळ्या देवगणांना, इतकेच काय प्रत्यक्ष विष्णुपत्नी असलेल्या लक्ष्मीमातेलाही त्यांच्याजवळ जाण्याचे भय वाटले तेव्हा हा लहानसा बालक प्रल्हादच निर्भयपणे जाऊन त्यांच्या मांडीवर बसला आणि त्याने त्यांची स्तुती गाऊन त्यांना प्रसन्न केले. श्रीमदभागवतात भक्त प्रल्हादाने गायलेली भगवान नृसिंहाची स्तुती मुळातूनच वाचण्यासारखी आहे.



निर्भय होऊन, गुरूवचनांवर दृढ विश्वास ठेऊन केलेल्या साध्यासोप्या भक्तीने भगवंताला प्रगट व्हायला लावणा-या भक्त प्रल्हादाचा आदर्श आज कलियुगातही आपण ठेवायला काय हरकत आहे हो ?  त्याच्यासाठी भगवंत प्रगट झाले, माझ्यासाठीही होतीलच की. फ़क्त कलियुगात त्यांचे चर्मचक्षूंनी दर्शन होईल की अंतःचक्षूंना ते जाणवतील आणि माझे जीवन दैवी करून टाकतील याचा अनुभव प्रत्येकाने आपापल्या साधनेने आणि भक्तीने घ्यायचा आहे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध पंचमी शके १९४८ दिनांक  १८ / ७ / २०२६


१८ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Friday, July 17, 2026

गेल्या अर्ध शतकात भारतीय रेल्वेने घेतलेली झेप.

 वर्धा - बल्लारशाह मेमू गाडीचे हे वेळापत्रक बघितले आणि डोळ्यातून टपटप अश्रूच वाहू लागले हो. मोबाईलवरची अक्षरे दिसेनाच. डोळे पुसून पुसून पुन्हा पुन्हा वाचले. अवघ्या २ तास १० मिनीटांत वर्धा ते चंद्रपूर ? कसं शक्य आहे ?



साधारण १९८३ - ८४ चा काळ असावा. चंद्रपूरच्या आजोळहून आम्ही आमच्या एका नातेवाईकांना भेटायला वर्धेला जाणार होतो. संध्याकाळी ६.०० वाजण्याच्या आसपास सुटणारी काजीपेठ - वर्धा पॅसेंजर गाडी. त्याकाळी  स्टेशनवर जा, तिकीटांच्या रांगेत उभे रहा, तिकीटे मिळवा, फलाटावर जा, फलाटावर नीट जागा पकडा असे खूप सव्यापसव्य असायचे. बरे, या प्रवासी मंडळीत माझे आजी, आजोबा ही ज्येष्ठ नागरिक मंडळी, एक तरूण मामा आणि बाकी आम्ही सगळी वय वर्षे १० ते १६ या वयोगटातली ७ - ८ नातवंडे. त्यामुळे सामानाचे डाग भरपूर होते. त्याकाळी वाटेत खाण्यापिण्याची आजच्याइतकी सार्वत्रिक उपलब्धता नव्हती त्यामुळे पाण्याच्या वाॅटरबॅग्ज, खाण्याचा डबा, त्याला लागणार्‍या accessories यामुळे सामानाचे भरपूर डाग झाले होते.

तेव्हाची वडिलधारी मंडळी जरा जास्तच काळजी घेत असत. त्यामुळे संध्याकाळी ६.०० च्या गाडीने जायचे म्हणून आजोळी दुपारी ४.०० वाजताच टांगे उभे राहिलेत.. "नारायणा, सांभाळून ने रे बाबा." किंवा "अंबामाय, पाहून घे गं बाई तूच." असे देवांना साकडे घालून आम्ही दुपारी ४.३० वाजताच चंद्रपूरच्या फलाटावर येऊन अक्षरशः बस्तान ठोकले.

तेव्हा वर्धेनंतर काजीपेठपर्यंत बहुतेक रेल्वेमार्ग एकेरी होता. त्यामुळे पुढून येणार्‍या रेल्वेगाड्यांना जागा देण्यासाठी मधल्या स्टेशनवर थांबून वाट बघणे त्याचबरोबर आपल्याच मार्गाने जाणार्‍या इतर जलद गाड्यांना पुढे जाऊ देण्यासाठी वाट बघत थांबणे या प्रक्रियेत पॅसेंजर गाड्यांचा बँड वाजायचा. आमचीही पॅसेंजर गाडी अर्धा तास उशिरा, एक तास उशिरा अशी घोषणा होत होत तब्बल ४ तास उशीरा रात्री १०.०० वाजता चंद्रपूरला आली.

गाडीतल्या गर्दीत आमचे सगळे वर्‍हाड घुसले आणि आहे तशा परिस्थितीत आम्ही आमच्यापुरती जागा करून घेत इकडेतिकडे विखुरलेले बसलोत. गाडी निघाली. पण पुन्हा तेच पहिले पाढे पंचावन्न. समोर येणार्‍या गाड्यांना साईड द्या, ओव्हरटेक करणार्‍या गाड्यांसाठी थांबून रहा या प्रकरणांमध्ये आम्ही वर्धेला दुसर्‍या दिवशी पहाटे ४.०० वाजता पोहोचलेलो होतो. पेंगुळलेले, झोपाळलेले, अंग आंबलेले अशा अवस्थेत. 

वर्धा ते चंद्रपूर हे अंतर फक्त ११९ किलोमिटर्स आहे हे सत्य आम्हाला फार उशीरा कळले. त्यादिवशी त्या मोठ्ठ्या प्रवासानंतर आमची समजूत म्हणजे वर्धा हे शहर मुंबई किंवा पुण्याच्या दोनतीन तासांवर आहे अशी झाली होती.

आता मला सांगा. जुन्या पॅसेंजरच्याच दर्जाची ही मेमू. मधल्या सगळ्या स्थानकांवर थांबून हाच प्रवास अवघ्या २ तास १० मिनीटांमध्ये करते म्हटल्यावर आम्हाला तो दिवस आठवून भरून येणार नाही तर काय होईल ?

- पॅसेंजर गाड्यांच्या जनरल कोचपासून ते राजधानी एक्सप्रेसच्या प्रथम वर्ग वातानुकूल वर्गातून भारतभर विविध प्रवास केलेला प्रवासी पक्षी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 

श्रीमदभागवत चिंतन - १७ अजामिळोपाख्यान

मागे आपण बघितलेल्या जडभरताच्या कथेच्या समांतर किंवा अगदी विरूद्ध जाणारे हे अजामिळोपाख्यान. आयुष्यभर भगवतभक्ती केलेला जीव केवळ आयुष्याच्या अखेरच्या काही क्षणात वात्सल्यबुद्धीने का होईना एका जड जीवाच्या मायेत अडकतो आणि त्यासाठी अगदी हातातोंडाशी आलेला मुक्तीचा घास त्याला दुरावतो. त्यानंतर त्याला या पृथ्वीतलावर दोन अधिक जन्म घ्यावे लागतात ही जडभरताची कथा. पण अजामिळाची कथा याच्या अगदी विरूद्ध जाणारी आहे. तरीही दोन्हीही कथांचा संदेश आणि सारांश एकच आहे. म्हणून विरूद्ध भासणारी तरीही समांतर प्रवास करणारी ही दोन आख्याने.


अजामिळ नावाचा एक ब्राह्मण कुळात जन्माला आलेला जीव होता. ब्राह्मण कुळात जन्मला असला तरी तो शास्त्राने निषिद्ध असे वर्तन करून आपले व कुटूंबाचे पोट भरीत असे. चोरीमारी, जुगार, लूटपाट या त्याचा मुख्य व्यवसाय होता. जगणा-या अनेक जीवांना त्रास देत देत आपले जीवन जगत असताना ८८ वर्षात त्याने असंख्य पापे केलीत.


अजामिळाचे आपल्या धाकट्या पुत्रावर फ़ार प्रेम होते. त्याचे नाव नारायण. त्याच्यावर असलेल्या प्रेमामुळे तो अगदी नारायणमय झालेला होता. त्याच्या मुखात आणि मनात सतत धाकट्या मुलाचे, नारायणाचेच नाव असायचे. अजामिळाच्या मृत्यूसमयी त्याला यमदूतांचे भीषण दर्शन झाले आणि त्याच्या मुखातून जवळच खेळत असलेल्या आपल्या मुलाला "नारायणा" अशी आर्त हाक गेली. प्राणान्ताच्या समयाला अत्यंत आर्त भावनेने प्रभूंचे नाम मुखात आल्यामुळे तिथे विष्णूदूत धावून आलेत आणि अजामिळाला वैकुंठलोकी घेऊन जाण्याचे प्रयत्न करू लागलेत.



त्याला यमलोकी नेऊन त्याच्या जन्मभराच्या पापकर्मांबद्द्ल यमयातना देऊ इच्छिणारे यमदूत आणि त्याला वैकुंठलोकी घेऊन जाणारे विष्णूदूत यांचा बराच वाद त्याठिकाणी झाला. यमदूतांनी पापी जीवांच्या मृत्यूनंतरच्या गतीबाबत विष्णूदूतांना सांगितले. श्रीमदभागवताच्या षष्ठ स्कंधातील पहिल्या आणि दुस-या अध्यायात हा संवाद प्रत्येक जीवाने वाचण्यासारखा, ऐकण्यासारखा आणि मनन करण्यासारखा आहे. यमदूतांचे बोलणे श्रवण करून आपल्यासारख्या संसारलिप्त मनुष्यमात्रांमध्ये मनोमन बोध होऊन आपण आपसूकच पापकर्मे करण्यापासून वंचित राहतो. हा संवाद नुसता श्रवण केला तरी आपल्यासारख्या मनुष्यमात्रांची पापे नष्ट होतात ती अशी.


अंतिमतः विष्णूदूतांनी यमदूतांना उपदेश करून अंतिमसमयी कुठल्या का रूपाने होईना पण ज्या जीवच्या मुखात, स्मरणात भगवंताचे नाम आलेले आहे त्याला वैकुंठप्राप्तीच झाली पाहिजे अशी श्रीविष्णूंची आज्ञा यमदूतांना सांगून अत्यंत पापी असलेल्या अजामिळाला वैकुंठलोकाला नेले. श्रीशुकदेव महाराज राजा परिक्षितीला उपदेश करताना सांगतात की राजा अत्यंत पापी जीव जरी असला तरी त्याला केवळ भगवंताच्या नामाने, स्मरणाने, पश्चात्तापाने, प्रायश्चित्तमुळे, भगवंतावरील निःसीम भक्तीमुळे जेवढा वैकुंठलोक प्राप्त होऊ शकेल तेव्हढा इतर यज्ञ यागादि कर्मांमुळे होऊ शकणार नाही. भगवंताच्या नामाचे प्रेम आणि भक्तीच त्याला त्याच्या पापकर्मांपासून तारून नेईल. मात्र एकदा पश्चात्ताप झाल्यानंतर आणि त्याने भगवंताजवळ आपली पापे कबूल केल्यानंतर पुन्हा त्याने पापमार्गाकडे जाऊन उपयोग होणार नाही.



अजामिळ आणि जडभरत. वरवर अगदी विरूध्द वाटणारी दोन आख्याने. पण दोघांचेही सार एकच. शेवटल्या क्षणी नाम साधल्या गेले पाहिजे. शेवटल्या क्षणी जीव जर संसारातल्या कुठल्याही गोष्टीत अडकून राहील तर जडभरताप्रमाणे अनेक कष्टमय जन्म पुढे घ्यावे लागतील पण जर अजामिळासारखे नाम साधले तर मात्र विनासायास भगवंतप्राप्ती होईल. म्हणून अनेक संतांनी आपल्याला आयुष्यभर नाम साधण्याचा कायमच उपदेश केलेला आहे. तसा साधण्याचा आपण सगळेच प्रयत्न करूयात.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध तृतीया / चतुर्थी शके १९४८ दिनांक  १७ / ७ / २०२६


१७ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


श्रीमदभागवत चिंतन - १६ जडभरताची कथा

आपल्या भारतभूमीवर महाराजा भरत हे अतिशय मोठे सम्राट होऊन गेलेत. त्यांचे जीवन सगळ्यांना अतिशय आदर्श असे जीवन होते. अतिशय न्यायाने आणि भगवंताला स्मरून अनेक वर्षे राज्य केल्यानंतर त्यांनी अत्यंत निवृत्त मनाने वानप्रस्थाश्रम स्वीकारला. आणि आपल्या आयुष्याचा उरलेला कालावधी ते वनात आनंदाने आणि ईश्वरचिंतनात अगदी आदर्श पुरूषाप्रमाणे घालवू लागलेत.

योगायोगाने वनात त्यांना आपल्या आईपासून जन्मतःच दुर्दैवाने दुरावलेले एक हरिण बालक सापडले. राजा भरताच्या मनात त्या बालकाविषयी अपार करूणा उत्पन्न झाली आणि त्या आईविना बालकाचा ते आईच्या ममतेने सांभाळ करू लागले. त्या हरिण बालकाने त्यांना इतका हळूहळू इतका लळा लावला की त्याच्याशिवाय राजा भरतांचे अगदी पान हलेना. त्यांच्या सगळ्या जीवनक्रियांमध्ये ते हरिण बालक एक अविभाज्य घटक म्हणून राहिले. इतके की या पृथ्वीतलावरील हा देह सोडताना महाराजा भरतांना त्या हरिण बालकाचीच अपार चिंता लागून राहिलेली होती. आपल्याशिवाय त्या बालकाचे कसे होईल ? कोणी त्याला खाऊपिऊ तरी घालतील की नाही या अपार चिंतेतच महाराजा भरतांनी इहलोक सोडला.

आयुष्यभर परमेश्वर भक्तीत अत्यंत आदर्शवत जीवन जगणा-या राजा भरताला आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी त्या हरिणबालकाची चिंता लागून राहिली होती त्यामुळे त्यांना मुक्ती न मिळता पुढला जन्म हा हरिण बालकाचाच मिळाला. पण श्रीमदभगवतगीतेत श्रीभगवंतांनी वर्णन केल्याप्रमाणे "शुचिनाम श्रीमताम गेहे, योगभ्रष्टोभिजायते" या न्यायानुसार त्यांना मागील जन्माच्या आपल्या कर्मांची स्मृती त्या हरिण जन्मातही कायम होती आणि त्या जन्मात महाराजा भरतांना आपल्या अगदी थोडक्यात हुकलेल्या मुक्तीचा खूप पश्चाताप झाला. अगदी हाताशी आलेली मुक्ती केवळ वात्सल्यभावनेने या जगातल्या गोष्टींमध्ये अडकून पडल्यामुळे हुकली याची त्यांना त्या हरिणजन्मातही खूप खंत वाटे. त्या पशू जन्मातही त्यांनी विवेक जागृत ठेऊन या संसारातल्या गोष्टींमधून रूची काढून घेत आपला देह ठेवला. 

राजा भरत महाराजांना पुढला जन्म हा एका अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणापोटी झाला. या जन्मापासूनच त्यांचा नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय अशाश्वत काय हा विवेक जागृत असल्याने ते या पृथ्वीतलावरील कुठल्याही गोष्टींबाबत अजिबात आसक्ती न बाळगता जगाच्या दृष्टीने मंदबुद्धी, पिशाच्चवत आणि जड असे जीवन जगू लागले. जीवनातल्या सगळ्याच कर्मांविषयी त्यांची आसक्ती नष्ट झाली होती म्हणून ते असे पिशासारखे जीवन जगू लागले. त्यात काही कालावधीने त्यांच्या मात्यापित्यांचे निधन झाले आणि त्यांची सावत्र भावंडे त्यांना अत्यंत हेटाळणीपूर्वक वागणूक देऊ लागलीत. एका जमातला हा सार्वभौम सम्राट आता इतरांच्या सांगण्यावरून माती गोटे उचलणे, रथ ओढणे यासारखी कामे करू लागला. अर्थात भरत महाराजांना त्या कर्माचा विषाद किंवा आनंद कधीही झाला नाही. मुक्तीच्या मार्गात गेल्या जन्मात आलेला अगदी थोडासा अडथळा आपल्या या जन्मांना आणि आता प्राप्त कर्मांना कारणीभूत ठरला आहे हे सत्य त्यांनी जाणले होते म्हणून या जडभरताच्या जन्मात ते अत्यंत निर्विकार मनाने आपली इथली कर्मे पार पाडत होते. इतर जनांना ते मूढ आणि जड भासत असले तरी ते अंतरंगी अत्यंत तीव्र वैराग्य साधून मागील जन्मांमध्ये हुकलेला आपला मुक्तीचा क्षण साधण्यासाठी या जगातल्या शाश्वत अशा भगवंताच्या नामाच्या, आराधनेच्या आश्रयाने जगत होते.



असेच जीवन जगत असताना सिंधुसौवीर राज्याच्या राजाची पालखी वाहण्यासाठी त्यांना सगळ्यांनी भोई म्हणून जुंपले. भरत महाराज आपल्या ईश्वरचिंतनात सतत मग्न असल्याने त्यांच्याकडून त्या पालखी संचलनात काही चुका होऊ लागल्यात आणि पालखीवर स्वार राजाचा पारा चढला. तो राजा आपल्या राजमदामध्ये त्यांना टोमणे मारू लागला आणि त्यांचा अपमान करू लागला. तेव्हा त्या जडभरताने त्या राजाला या जगात नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय याचा परमहंस उपदेश केला. राजाला त्या जडभरताचा अधिकार कळला आणि त्याने पालखीतून उतरून त्या जडभरताचे पाय धरलेत. आणि अनेक जन्मांना कारणीभूत होणा-या मायेचा त्याग करून तो रहूगण राजा मोक्षपदापर्यंत गेला. श्रीमदभागवतसंहितेतल्या पंचम स्कंधातले दशम, एकादश, द्वादश आणि त्रयोदश अध्याय हे या दृष्टीने मुळापासूनच वाचण्याजोगे आहेत.



आपल्यापैकी खूप जणांचेही असे होते, नाही का ? आयुष्यभर अगदी आदर्श असे वर्तन, भगवंताच्या भक्तीत जीवन जगत असताना आयुष्याच्या शेवटी प्राणांताच्या समयाला एखाद्या कुठल्या तरी अत्यंत साधारण गोष्टीत आपला जीव अडकतो आणि ते कर्म पुरे करण्यासाठी जन्म मरणाच्या फ़े-यातून कायमच्या मुक्तीऐवजी पुन्हा पृथ्वीतलावर आपण जन्म घेतो. त्यातल्या काही भाग्यवान मनुष्यमात्रांनाच पूर्वजन्मीचे, त्यात घडलेल्या चुकांचे स्मरण उरते आणि त्या चुका ते नवीन जन्मात सुधारण्याचा प्रयत्न करीत असतात पण बहुतांशी मंडळी मुक्तीच्या अगदी जवळ असताना पुन्हा या जन्ममरणाच्या फ़े-यात सापडून पुढले अनेक जन्म या जन्म आणि मृत्यूच्या भोव-यात गटांगळ्या खात बसतात. संतांना मृत्यूच्या भयापेक्षा या जन्माचे अधिक भय असते म्हणून त्यांचे या पृथ्वीतलावरील जगणे अगदी आदर्श असते.

परमपूजनीय ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर आपल्या सर्वांना नामात इतके राहण्याचा उपदेश करतात की अंतकाळी सगळ्यात शेवटी आपल्यातून सुटणारी गोष्ट म्हणजे नाम असली पाहिजे असे ते अगदी कळकळीने प्रतिपादन करतात. शेवटल्या क्षणाला भगवंताचे नाम साधल्या गेले तर जन्मभर केलेल्या कर्मांचा नाश होऊन भगवत्प्राप्ती होते हे आपल्या संतांनी शात्रांनी आपल्याला सांगून ठेवलेले आहे. पण शेवटल्या क्षणाला नाम साधायचे असेल तर आयुष्यभर त्या नामाचा अभ्यास आणि ध्यास असला पाहिजे. आयुष्यभर आपल्या जीवनात फ़क्त नाम आणि नामच भरून रहायला मात्र हवे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध द्वितीया शके १९४८ दिनांक  १६ / ७ / २०२६


१६ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Wednesday, July 15, 2026

श्रीमदभागवत चिंतन - १५ पुरंजनोपाख्यान (भाग दुसरा)

मागील भागात आपण चिंतन केल्याप्रमाणे मी, माझी पत्नी, माझी मुलेबाळे यांनाच सर्वस्व मानणारा राजा पुरंजन, त्याची नऊ द्वारे असलेली सुंदर नगरी, त्याचे प्रजाजन, त्याच्यावर जरा नामक कालकन्येचा झालेला हल्ला आणि त्याला प्राप्त होणारा उद्वेग, शोक यांचे आपण आजच्या सर्वसामान्य सांसारिक जनांशी काही नाते आहे का ? याचा आज आपण आपल्या मनात शोध घेऊयात.

कालकन्या जरा आणि तिच्यासोबतचे ३६० गंधर्व व ३६० गंधर्वी ह्यांनी राजाच्या नगरीच्या नऊही द्वारांमधून केलेल्या हल्ल्याने राजा हतबल झाला. अत्यंत विषयासक्त असल्याने तो या हल्ल्यांचा प्रतिकार करू शकला नाही. तो हतप्रभ झालेला पाहून प्रजाजनांमध्ये त्याच्याविषयी अनादर वाढला. एव्हढेच नाही तर तर ज्या कन्या, पुत्र, पत्नींसाठी त्याने जीवनभर आटाआटी केली यांनाही तो नकोसा झाला. हे पाहून त्याला मनोमन अतीव दुःख झाले. अशातच त्याला मृत्यू आला. पण पत्नीकडून इतका अपमान, इतका अपेक्षाभंग  होऊनही मृत्यूसमयी त्याला "आता माझ्यानंतर माझ्या पत्नीचे कसे होईल ?" याचीच चिंता लागून राहिली होती. त्यामुळे यमपुरीतले विविध भोग भोगून झाल्यानंतर त्याला पुढला जन्म हा विदर्भराजाच्या सुंदर राजकन्येचा मिळाला.



यथावकाश त्या वैदर्भीचा मलयराज नावाच्या अत्यंत पराक्रमी तितक्याच सात्विक राजाशी विवाह झाला. त्या दंपतींना अनेक पराक्रमी कन्या आणि पुत्र प्राप्त झाले. एका कालावधीनंतर राजा अत्यंत संन्यस्त जीवन जगू लागला आणि त्याची पत्नी वैदर्भी त्याच्या सेवेत मग्न होऊन आपल्या कर्तव्यात आनंद मानू लागली. अशा प्रकारे वानप्रस्थाश्रमात जीवन व्यतीत करीत असताना राजा मलयध्वज हा कालवश झाला. राजपत्नी वैदर्भीने त्याच्या परलोकगमनाचा खूप शोक केला आणि त्याकाळच्या प्रथेप्रमाणे त्याच्या चितेसोबत ती सती जायला तयार झाली.


तिची शोकाकूल अवस्था पाहून त्याठिकाणी एक ब्राह्मण आला आणि तिला उपदेश करू लागला. त्या ब्राह्मणाने वैदर्भीला तिचा मागील जन्म स्मरण करून दिला. एका हंसासारख्या विमल जीवाने नऊ द्वारे असलेल्या नगरीत कसा प्रवेश केला, तो त्या नगरीलाच आत्मस्वरूप समजून तो हंस कसा त्यात रमत गेला, त्यानंतर त्याच्यावर जरा नामक कालकन्येचा कसा हल्ला झाला आणि त्यात त्याचे नगर कसे भस्मसात झाले याचे स्मरण त्या ब्राह्मणाने वैदर्भीला दिले.


तो ब्राह्मण तिला म्हणाला "तू स्त्री नाहीस आणि गेल्याजन्मी होतास तसा पुरूषही नाही. आपण दोघेही हंस आहोत. मी ईश्वर आहे आणि तू जीवात्मा आहे. या जगात "मी स्त्री आहे, मी पुरूष आहे" असा भ्रम या परमहंस स्वरूप असलेल्या जीवाला केवळ ईश्वराच्या मायेने प्राप्त होतो. जो त्या मायेला भुलतो त्याला हा नऊ छिद्रे असलेला देह म्हणजेच स्वतःचे सर्वस्व वाटते. त्यात उपलब्ध असलेले सुखोपभोग घेणे हेच त्या जीवाला त्याचे परमकर्तव्य वाटते. त्या जीवावर वर्षातले ३६० गंधर्वरूपी दिवस आणि ३६० गंधर्वीरूपी रात्री निरंतर हल्ला करीत असतात. काळाची कन्या असलेल्या जरा म्हणजे म्हातारपण त्या जिवावर जबरदस्ती आक्रमण करीत असते. वास्तविक त्या जरेशी कुणीही स्वतःहून लग्न करायला बघत नाही, म्हातारपण कुणालाही आवडीने नको असते पण ती योग्य वेळी हल्ला करून त्या शरीराचा नाश करतेच. म्हणून आत्म्याने "मी म्हणजे शरीर" हा भ्रम सोडून देऊन स्वतःचे हंसस्वरूप जाणून या जगात वावरायला हवे."



त्या ब्राह्मणरूप परमात्म्याचा उपदेश ऐकून तो वैदर्भी नामक शोकाकूल जीव शांत झाला आणि परत त्या हंसरूपाला प्राप्त होऊन त्या ब्रह्मरूप हंसासोबत जीवरूप हंसरूपाने पुन्हा मानससरोवरात विहार करू लागला. जीव आणि ब्रह्म, जीवाचे देहाचे मायेत फ़सत जाणे आणि विचारहीन होऊन देहालाच आत्मस्वरूप समजणे यावर हे पुरंजनोपाख्यान आहे.



अगदी पहिल्याच लेखात चिंतन केल्याप्रमाणे प्रत्येक जीवाला त्याचे खरे परमात्मस्वरूप दाखवणे हे श्रीमदभागवताचे उद्दिष्ट आहे. राजा परिक्षितीला केलेला उपदेश हा तुमच्या माझ्यासारख्या संसारात, देहात बांधल्या गेलेल्या आणि देहालाच सर्वस्व मानणा-या सर्वसामान्य सांसारिकांसाठी आहे. याचे आपण सतत मनन करीत गेलोत तर या जीवनाशेवटी आपणही त्या निर्मळ हंसरूपाला प्राप्त होऊ ही श्रीमदभागवताची आपल्याला दिलेली ग्वाही आहे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥




- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध प्रतिपदा शके १९४८ दिनांक  १५ / ७ / २०२६


१५ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Tuesday, July 14, 2026

श्रीमदभागवत चिंतन - १४ पुरंजनोपाख्यान (भाग पहिला)

प्राचीन काळी पुरंजन नावाचा एक अतिशय पराक्रमी राजा होता. स्वतःला राहण्यासाठी आपल्या मनाजोगते नगर शोधत शोधत तो भटकत असताना त्याला नऊ द्वारांचे एक अतिशय सुंदर आणि रमणीय नगर दिसले. त्या नगरात वास करीत असलेली एक अतिशय सुंदर युवती आणि तिच्या सोबत असलेले अनेक नागरिक त्याच्या दृष्टीपथास पडले. त्या नगरीचे संरक्षण एक पाच फ़ण्या असलेल्या नागराज करीत होता. त्या नगरीचे एकूणच स्वरूप आणि रूपयौवनेचे मधुर भाषण याची भुरळ पडून राजा पुरंजन त्या नगरीतच राहू लागला.



राजा त्या नगरीच्या, त्या रूपयौवनेच्या भोगविलासांमध्येच रममाण झाला. दररोज वनात जाऊन मन मानेल तशी मृगया करणे, नगरीत परतल्यानंतर भोजनादि विलासांचे सेवन करणे आणि त्या राणीसोबत रतिक्रिडेत रममाण होणे हाच त्याचा जीवनक्रम बनला. याशिवाय त्याला काही सुचेनासे झाले. आपल्या अंगभूत पराक्रमाचे एकूण फ़लित म्हणजेच हे अनेक प्रकारचे भोगविलास प्राप्ती हे त्याच्या मनाने घेतले. तो या पृथ्वीतलावरील सर्व नवनवीन विलासांमध्ये अक्षरशः आकंठ बुडून त्यांचे सेवन करीत राहिला.

याच कालावधीत राजा पुरंजनाला अनेक कन्या आणि पुत्र प्राप्त झाले. त्यांचे त्याने विवाहादि संस्कार केलेत. आपले पुत्र, सुना, कन्या, जावई यांच्यामध्ये, त्यांच्या संसारांमध्ये, त्यांच्या कन्यापुत्रांच्या लाडाकोडात राजा पुरंजन मग्न झाला. त्याचे अर्धे आयुष्य असेच सरले.

चण्डवेग नावाचा एक गंधर्व आहे. त्याच्या अधीन असलेले ३६० गंधर्व आणि त्यांच्या पत्नी असलेल्या ३६० गंधर्वी आहेत. चण्डवेग गंधर्वराजाच्या आज्ञेनुसार हे गंधर्व आणि गंधर्वी या समस्त सृष्टीत सर्वत्र फ़िरून भोग आणि विलासात मग्न असलेली नगरे लुटण्याचे कार्य निरंतर करीत असता. त्यांना ही राजा पुरंजनाची नगरी दिसली आणि त्यांनी त्या नगरीला लुटण्यास प्रारंभ केला. त्या नगरीच्या रक्षणास असलेल्या सर्पाने तिचे रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला खरा पण चण्डवेग गंधर्वाच्या पार्षदांपुढे नगररक्षणाचे त्याचे प्रयत्न अपुरे पडत गेले.

याच दरम्यान प्रत्यक्ष काळाची जरा नामक कन्या आपल्या इच्छित वरासाठी सर्वत्र फ़िरत होती. पण तिचा कुणीही स्वीकार करीत नव्हते. प्रत्यक्ष देवर्षी नारदा्ंना सुद्धा तिने तिचा स्वीकार करण्याची गळ घातली पण नारदांनी तिला नकार दिला. तिने संतापून देवर्षी नारदांना एका जागी स्थिर न राहू शकण्याचा शाप दिला. त्यामुळे नारदांना कायम त्रैलोक्यामध्ये भ्रमण करणे आले. मनुष्यमात्रांचे कायम भले इच्छिणा-या देवर्षींनी त्या शापाचा वरासारखा उपयोग करून घेत कायम त्रैलोक्य भ्रमण करीत जागोजागी मनुष्यमात्रांना उपकारक अशा लीला केल्यात. आपल्याला प्राप्त झालेल्या प्रतिकूल परिस्थितीचा ज्ञानी लोक विषाद न मानता त्यातूनही अनुकूलता कशी शोधत त्यावर मात करतात याचे हे एक उदाहरण.



त्या कालकन्येला यवनराजाने असा वर दिला की जे नगर आणि त्यातले नगरवासी निरंतर भोग आणि विलासांमध्ये मग्न राहतील, त्यात तू आणि तुझा बंधू प्रज्वार हे दोघे घुसू शकाल आणि त्या नगरीचा सहज विध्वंस करू शकाल. तुम्ही दोघेहे त्या नगरीवर राज्य कराल आणि ती नगरी आपल्या पित्याला, काळाला, भेट देऊ शकाल. या प्राप्त वरानुसार ती कालकन्या, जरा आणि प्रज्वार नामक तिचा भाऊ हे राजा पुरंजनाच्या नगरीत घुसलेत आणि त्यांनी सर्व नगरीच्या नाशाला प्रारंभ केला. आपल्या डोळ्यासमोर आपल्या सर्व वैभवाचा असा नाश होत असलेला पाहून आधीच हतबल असलेला राजा पुरंजन अतिशय दुःखित झाला, शोकाकूल झाला.

मी, माझी पत्नी, माझी मुलेबाळे यांनाच सर्वस्व मानणारा राजा पुरंजन, त्याची नऊ द्वारे असलेली सुंदर नगरी, त्याचे प्रजाजन, त्याच्यावर जरा नामक कालकन्येचा झालेला हल्ला आणि त्याला प्राप्त होणारा उद्वेग, शोक यांचे आपण आजच्या सर्वसामान्य सांसारिक जनांशी काही नाते आहे का ? याचा आज आपण आपल्या मनात शोध घेऊयात का ? या कथेच्या उत्तरार्धात उद्या या गोष्टींचा उलगडा निश्चित होईल पण या गोष्टींचे प्रत्येक संसारी जीवाने अगदी अंतरातून मनन करणे आणि त्यांना तसे ते मनन घडवणे हेच श्रीमदभागताचे उद्दिष्ट आहे, हीच या कथेची फ़लशृती आहे, हा बोध प्रत्येक जीवाला होणे हाच श्रीमदभागवताचा प्रसाद आहे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥




- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ अमावास्या शके १९४८ दिनांक  १४ / ७ / २०२६


१४ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Monday, July 13, 2026

श्रीमदभागवत चिंतन - १३ दक्षप्रजापतींचा यज्ञ आणि सतीचा देहत्याग

ब्रह्माजींचे पुत्र दक्षप्रजापती आणि स्वायम्भुव मनु यांची कन्या प्रसूति यांचा विवाह झाला आणि त्यांना एकूण सोळा कन्यारत्ने प्राप्त झालीत. दक्षप्रजापतीने त्यातल्या तेरा कन्या धर्माला, एक अग्निला, एक पितृगणाला आणि सती नामक एक कन्या या संसाराचा संहार करणा-या आणि समस्त जीवांना जन्म मृत्यूच्या फ़े-यातून मुक्त करणा-या भगवान शंकराला दिली.



एकदा दक्षप्रजापतींनी एक यज्ञ केला. त्यात यजमान म्हणून ते स्वतः यज्ञस्थळी आल्यानंतर त्याठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व देव देवतांनी त्यांना आपापल्या आसनांवरून उठून आदराने वंदन केले.भगवान शंकर मात्र आत्मस्वरूपात मग्न असल्याने त्यांनी मात्र दक्षप्रजापतींना उठून वंदन केले जाही. ते आपल्या आसनावरच बसून राहिले. ते पाहून दक्षप्रजापतींचा क्रोध अनावर झाला. महादेव शंकरांनी से कृत्य मुद्दामच केले असा त्यांनी ग्रह करून घेतला आणि जमलेल्या सभेला उद्देशून ते महादेवांविषयी, त्यांच्या गणांविषयी वाईट साईट बोललेत. आत्मचिंतनात मग्न असल्याने महादेव शंकरांवर त्यांच्या बोलण्याचा काहीही परिणाम झाला नाही, किंबहुना त्यांनी आपल्या सासरेबुवांनी काढलेले अनुदार उदगार ऐकलेच नाहीत. ते आत्मानंदात मग्न होते.

हे बघितल्यानंतर दक्षप्रजापतींच्या रागाचा पारा अधिकच चढला. त्यांनी महादेवांना यज्ञाचे कुठलेच फ़ळ, कुठलाही हविर्भाग कधीच प्राप्त होऊ नये असा शाप दिला. वास्तविक सभेत जमलेली इतर थोर मंडळी दक्षप्रजापतींना असे न करण्याबाबत सांगत होती पण क्रोधात पूर्णपणे बुडाल्याने त्यांनी इतर जनांचे न ऐकता महादेवांना आणि त्यांच्या इतर गणांना हा शाप दिलाच.

शिवगणांमधल्या नंदिकेश्वराला हा महादेवांचा अपमान सहन झाला नाही. त्याने दक्षप्रजापती आणि त्यांना अनुमोदन देणा-या सभेतल्या इतरांना उलट शाप दिला. प्रत्यक्ष जन्म आणि मृत्यूच्या फ़े-यातून सर्व जगताला मुक्त करणा-या महादेव शंकरांचा देहापलिकड्ला विचार ज्या जनांना समजत नाही ते जन देहातच अडकून बसोत, कर्मकांडांमध्येच त्यांचा जीव सदैव अडकला राहो. महादेव शंकरांचा मुक्तीचा त्यांना लाभ न होवो असा शाप नंदिकेश्वराने दक्षप्रजापतींना आणि त्यांना साथ देणा-या सभाजनांना दिला.

यावर भृगूंनी पुन्हा महादेव शंकरांना आणि त्यांच्या समस्त गणांना सदैव पाखंड मार्गाने जाण्याचा आणि नियत कर्म न करता अशौच अपवित्र मार्गातच सदैव राहण्याचा शाप दिला. यावेळेपर्यंत महादेव आपल्या भानावर आलेले होते. झालेला प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते खिन्न झालेत आणि आपल्या गणांसह ते यज्ञस्थळ सोडून आपल्या निवासस्थानी परतलेत.

आपल्याही आयुष्यात असे काही प्रसंग येतात. कधीकधी कुणाकडून तरी त्याच्याही नकळत एखादी चूक घडलेली असते पण त्याची मनोवस्था जाणून न घेता, त्या व्यक्तीने ती चूक जाणीवपूर्वक केलेली आहे असा आपला ग्रह होतो आणि आपण त्या व्यक्तीविषयी ग्रह करून घेतो, क्वचित त्याचा अपमानही करतो. शब्दाने शब्द, मुद्याने मुद्दा वाढत जातो आणि अगदी अकारण आत्मीय संबंध दुरावतात. आपल्याबरोबर झालेल्या वादविवादांमध्ये खरेच मुद्दे किती आणि आपल्या अहंकारांमुळे आपल्याला न कळलेली सत्यस्थिती किती याचे विश्लेषण आपण जर आपल्या मनाशी केले तर आपल्याला आपल्या अनेक भांडणामधला, वादांमधला फ़ोलपणा कळून येईल. आपले मन शुद्ध होईल, निर्मळ होईल. ही कथा ऐकण्याचा, मनन करण्याचा हाच प्रसाद आहे. तो आपल्या मनाला मिळतो.

त्या यज्ञानंतर ब्रह्माजींनी दक्षप्रजापतींना अधिक उच्चपद दिले आणि त्यांचा अहंकार वाढला. त्यांनी आणखीही दोन महायज्ञांचे आयोजन केले आणि महादेवांचा जाणीवपूर्वक अपमान करण्यासाठी फ़क्त त्यांना निमंत्रण न देता आपल्या इष्ट मित्रांना, सगळ्या देवांना आणि आपल्या इतर कन्या, जावयांना यज्ञासाठी बोलाविले. त्या यज्ञांची वार्ता ऐकून महादेवपत्नी सती आपल्या आईला, वडिलांना, इतर बहिणींना भेटण्यासाठी, त्यांचे कुशलवृत्त विचारण्यासाठी उत्सुक झाली आणि यज्ञाला उपस्थित राहण्यासाठी आपल्या पतींची, महादेवांची परवानगी मागू लागली. 

महादेव शंकरांनी आपल्या पत्नीची समजूत काढली. अगदी आप्त स्वकीय असले कुठली घरे जाण्यासाठी वर्ज्य करावीत यावर महादेव शंकरांचा आपल्या पत्नीला केलेला श्रीमदभागवतातील चतुर्थ स्कंधातला हा उपदेश समस्त दांपत्यांनी मुळापासून वाचण्यासारखा आणि कायम लक्षात ठेवण्यासारखा आहे. पण पतीच्या विवेक विचारपेक्षा त्याक्षणी सतीच्या मनातली आपल्या आईला, बहिणींना इतर आप्तजनांना भेटण्याची इच्छा प्रबल ठरली आणि ती आपल्या पित्याने आयोजित केलेल्या यज्ञस्थळी रवाना झाली. यावेळी अत्यंत नाईलाजाने महादेवांनी तिला परवानगी दिली. 

यज्ञस्थळी आल्यानंतर महादेवपत्नी, दक्षकन्या सतीने आपल्या आईची, बहिणींची प्रेमपूर्वक भेट घेतली. इथे त्या सगळ्यांना खरोखर खूप आनंद झाला होता पण पित्याने आयोजित केलेल्या यज्ञात आपल्या पतीच्या परोक्ष त्याचा जाणीवपूर्वक अपमान करीत हे कार्य संपन्न होत असल्याचे तिच्या लक्षात आले. किंबहुना आपल्या पतीचा जाणीवपूर्वक अपमान करण्यासाठीच या कार्याचे आयोजन करण्यात आल्याचेही तिच्या लक्षात आले. आपले पती महादेवांनी वारंवार न जाण्याविषयी विनंते करूनही आपण आपल्या पित्याकडील कार्यात आलोय या गोष्टीचा तिला पश्चात्ताप झाला आणि महातेजस्वी महासतीने त्या यज्ञस्थळीच आपल्या पित्याची व महादेवांच्या अपमानात त्यांना साथ देणा-या इतरांची अत्यंत कडक शब्दात निर्भत्सना केली. आपल्या पतीच्या सर्वसंसारातल्या समस्त जीवांच्या कल्याणाच्या रूपाची प्रशंसा केली आणि त्या पश्चात्तापातच आपला देहत्याग केला.

महासतीच्या देहत्यागानंतर सर्व घटनाक्रम जाणून महादेव शंकर अतिशय क्रुद्ध झालेत. त्यांचा पार्षद असलेल्या वीरभद्राकडून त्यांनी दक्षयज्ञाचा विध्वंस आरंभला आणि आपल्या पत्नीच्या वियोगात शोकसागरात बुडून गेलेत. त्यावेळी त्यांचा क्रोध शांत करण्यासाठी ब्रह्माजींनी आणि भगवान महाविष्णूंनी त्यांची, त्यांच्या कार्याची यथार्थ स्तुती केली आणि त्यांचे तांडव थांबवले. अन्यथा महादेव आपल्या क्रोधाग्नीत ही समस्त सृष्टी विनाशाकडे नेणार होते. तसे झाले नाही.

कर्ममार्गाने विधिवत आचरण करून,व्यवस्थितपणा ठेऊन भगवंतांची आराधना करणा-यांने केवळ बाह्य रूपाने एखाद्याला जोखू नये. बाह्यरूपाने एखाद्या वेळेला शास्त्र असंमत, मलिन असलेल्या एखाद्याच्या अंतरात मात्र अत्यंत शुद्ध भावना, पावित्र्य असू शकते याचा विचार करून, त्या व्यक्तीचा विश्वकल्याणाचा, भगवंताला प्राप्त करून घेण्याचा मार्ग मार्ग निराळा असला तरी तो समजून त्याचा आदर करीत आपण परस्परसंबंध जपले पाहिजेत हाच या कथेचा अन्वयार्थ. श्रीमदभागवत हे भगवान विष्णूंच्या लीलांचे वर्णन असले तरी समस्त शिवभक्तांसाठी अतिशय पूजनीय असा हा चतुर्थ खंड आणि त्यातले हे पहिले सात अध्याय. 



॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य चतुर्दशी शके १९४८ दिनांक  १३ / ७ / २०२६


१३ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Sunday, July 12, 2026

श्रीमदभागवत चिंतन - १२ कपिल गीता

प्रत्यक्ष भगवंतांच्या आज्ञेने स्वायम्भुव मनूची अत्यंत तेजस्वी आणि ज्ञानी कन्या, देवहुति हिचा विवाह कर्दम ऋषींशी झाला. कर्दम ऋषीही अत्यंत आदर्श जीवन जगत भगवंतांच्या चरणाचा कायम आश्रय इच्छिणारे होते. कर्दम ऋषी आणि देवहुति यांच्या दांपत्य जीवनाचे फ़ार सुंदर वर्णन श्रीमदभागवतात आलेले आहे. महादेव शंकरांची ज्याप्रमाणे मनोभावे सेवा पार्वतीने केली त्याप्रमाणे मनुकन्या देवहुति ने आपल्या पतिदेवांची सेवा केली. 

श्रीमदभागवत वर्णन करतय

विश्रम्भेण, आत्मशौचेन, गौरवेन, दमेन च

शुश्रूषया, सौहृदेन, वाचा मधुरयां च भोः ।

विसृज्य कामं दम्भं च द्वेषम, लोभम, अघम, मदम

अप्रमत्तोद्यता नित्यम तेजीयाम समतोषयत ॥

देवहुति ने कामवासना, लोभ, दंभ, द्वेष, पाप, मद इत्यादि गोष्टींना कटाक्षाने दूर ठेऊन पातिव्रत्य, गौरव, प्रेम, मधुरभाषण करून अत्यंत आत्मीयतेने आपल्या अत्यंत तेजस्वी जीवन जगत असलेल्या पतीदेवांची मनोभावे सेवा केली आणि त्यांच्याकडून नऊ कन्या प्राप्त करून घेतल्या. भगवंतांच्या आशिर्वादाने योग्यवेळी त्या कन्यांचे विवाह पृथ्वीसंचलन आणि नियमन करू शकण्याची शक्ती असलेल्या अत्यंत तेजस्वी अशा नऊ मुनीजनांशी झालेत.



यानंतर देवहुतिच्या सेवा आणि पातिव्रत्यावर प्रसन्न झालेल्या कर्दम ऋषींनी ति्च्या उदरी प्रत्यक्ष भगवंत कपिल रूपाने जन्म घेणार असल्याचा आशिर्वाद देवहुतिला दिला आणि अशा अत्यंत पवित्र, आदर्श दांपत्य जीवन जगणा-या दंपतींपोटी भगवान कपिल अवतीर्ण झालेत.

भगवंत आपल्या पत्नीच्या उदरी प्रगट झाले्ले आहेत हे कर्दम ऋषींनी जाणल्यानंतर त्यांनी त्या बालकाचे भगवंत स्वरूप जाणून त्यांची स्तुती केली आणि जन्म मृत्यूच्या फ़े-यातून कायम मुक्ती मिळण्याची भगवंतांना प्रार्थना केली. भगवान कपिलांनी त्यांची शुद्ध बुद्धीने आणि कर्माने केलेली प्रार्थना पाहून आपल्या पित्याला इच्छित वर प्रदान केला आणि त्यांना त्यांच्या सर्व कर्मबंधनांमधून मुक्ती देऊन जन्म मृत्यूच्या फ़े-यातून मुक्त केले.



माता देवहुतिने भगवान कपिलांचे विष्णुस्वरूप जाणून त्यांना प्रश्न केलेत. भगवान, मी म्हणजे शरीर या भावनेपासून मनुष्यमात्रांना मुक्ती कधी आणि कशी मिळेल ? हा देह धारण केल्यानंतर हा देह आणि त्याच्या अनेक लीला यापासून मी, आत्मा म्हणून वेगळा आहे हे ज्ञान मनुष्यमात्रांना कसे प्राप्त होईल ?

यानंतर भगवान कपिलांनी आपल्या मातेला जो उपदेश केलेला आहे तो कपिलगीता म्हणून ओळखला जातो. भगवान कपिल आपल्या आईला सांगताहेत, "आई, मनुष्यांचे मनच त्यांच्या बंधनाला आणि मोक्षालाही कारण होत असते. मनुष्यांच्या मनांनी मी आणि माझा देह एव्हढ्या्पुरताच विचार केला तर त्यांचे मन काम क्रोध मद इत्यादि गोष्टींकडे जाऊन या सृष्टीवर बांधल्या जाते. त्यांना जन्म आणि मृत्यूच्या फ़े-यात हे मनच अडकवून ठेवते. तेच मन जर मनुष्य़मात्रांनी भगवंत, संत महापुरूष यांच्या शिकवणुकीत, त्यांच्या निरंतर सेवेत लावले तर ते या पृथ्वीतलावर सर्व कर्मबंधनांपासून त्या मनुष्याला मुक्ती प्राप्त करून देणारे ठरते."

"शांत, सरळ मनाचे, दयाळू, कुणालाही ताप न देणारे, सत्पुरूषांचा सन्मान करणारे माझे भक्त माझ्या चरित्राचे श्रवण आणि कीर्तन करीत राहिलेत तर त्यांना या संसारातला कुठलाही प्रसंग ताप किंवा दुःख देत नाही. अशा साधूपुरूषांचा संग जर इतरांनी केला तर त्यांच्याही मनांमध्ये त्या साधूपुरूषांची विरक्ति संक्रमित होईल आणि त्यांचीही मने हळूहळू मुक्त होऊ लागतील."

भगवान कपिल आपल्या आईला उपदेश करताना पुढे असे सांगतात, " आई, माझी खरी भक्ती करणारे सत्पुरूष केवळ माझ्यावरील प्रेमामुळे माझी भक्ती करीत असतात. आपण करीत असलेल्या भक्तीचे फ़ळ म्हणून आपल्याला मुक्ती मिळेल, भगवंताचे दर्शन मिळेल या अत्यंत सात्विक याचना सुद्धा त्यांचा मनाला शिवत नाहीत. अत्यंत निष्काम भक्ती ते करीत असतात आणि त्यामुळेच ते मला प्राप्त करून घेतात. एकदा मी त्या सत्पुरूषांना प्राप्त झालो की त्यांनी कधीही याचना न केलेली सगळी मुक्ती आदि सुखे मी त्यांना आपोआपच प्रदान करीत असतो. पण त्या सत्पुरूषांची त्याचावरही आसक्ती नसते."



आणि यानंतर भगवान कपिल यांनी आपल्या मातेला उपदेश करताना या संसारात असलेल्या मनुष्यमात्रांनी नक्की काय करावे आणि काय करू नये, आपल्या मनावर संयम ठेऊन भगवत्प्राप्तीकरिता नेमके काय करावे ? याचा अगदी व्यावहारिक उपदेश केलेला आहे. जो आज कलियुगात सुद्धा आपणा सर्वांना अत्यंत उदबोधक आहे आणि प्रत्यक्ष आचरणात आणण्याजोगा आहे. त्याप्रमाणे वर्तन ठेवल्यानंतर मनुष्यमात्रांना एका दिवसात या जन्म मृत्यूच्या फ़े-यातून मुक्ती मिळेल असे आश्वासन भगवान कपिल आपल्याला देत नाहीत. त्यांनी या अध्यायात सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करून आपल्या मनाला वळण लावल्यानंतर हळूहळू आपल्या मनात, वर्तनात बदल होऊन एकदिवस आपल्याला त्या सच्चिदानंदस्वरूप भगवंताची प्राप्ती नक्की होईल अशी ग्वाही मात्र भगवान कपिल देत आहेत. या जगातून. जन्म मरणांच्या अनंत फ़े-यांमधून मुक्ती मिळवू इच्छिणा-या आपल्यासारख्या समस्त सांसारिक जनांनी श्रीमदभागवताच्या तृतीय स्कंधातील अठ्ठाविसावा अध्याय हा मुळापासूनच वाचण्याजोगा आहे. तो अध्याय कायम वाचनात ठेऊन त्यात दिलेल्या मार्गाचे पालन सातत्याने करीत राहणे हीच कपिल गीतेची फ़लशृती आहे.

त्यानंतरच्या एकोणतीस, तीस, एकतीस आणि बत्तीसाव्या अध्यायात भगवान कपिलांनी मनुष्यमात्र त्यांच्या गर्भावस्थेपासून ते मृत्यूपश्चात आपल्या कर्मबंधनांमुळे कशा प्रकारची दुःखे भोगतात याचे भयंकर चित्र आपल्या आईला उपदेश करण्याच्या मिषाने आपल्या सर्वांसमोर ठेवलेले आहे. अगदी याच प्रकारचे वर्णन श्रीगुरूचरित्रातल्या एका अध्यायाय आलेले आहे. ते वर्णन नुसते ऐकले जरी तरी या संसाराच्या आणि त्यात वारंवार जन्म मृत्यूचे फ़ेरे घेण्यामुळे निर्माण होणा-या भयावह स्थितीची जाणीव मनाला होते आणि मनात वैराग्य उत्पन्न होते.

तृतीय स्कंधाच्या तेहेतीसाव्या अध्यायात आपण सर्व जीवांच्या वतीने माता देवहुतिने भगवान कपिलांचे आभार मानलेले आहेत, त्यांची स्तुती केलेली आहे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥




- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य त्रयोदशी शके १९४८ दिनांक  १२ / ७ / २०२६


१२ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


Saturday, July 11, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ११ वराह अवतार

भगवान विष्णूंचे द्वारपाल पार्षद जय आणि विजय. भगवंताच्या निकट राहून, अगदी स्वर्गात राहून तिथली सुखे उपभोगताना त्यांनी ब्रह्मकुमारांचा अपमान केला. खरेतर दुःखापेक्षा सुखी अवस्थेतच मनुष्याने आपल्या मनाला जपले पाहिजे. दुःखी मन कालांतराने सावरू शकते पण सुखी अवस्था मनाला उन्मादी स्वरूप देऊ शकते. जय आणि विजय या भगवंतांच्या पार्षदांकडून नेमका हाच अपराध घडला आणि त्याच्या परिणामी त्यांना पृथ्वीतलावर जन्म घेण्याचा आणि स्वर्गसुखांना पारखे होण्याचा शाप मिळाला. साधूंच्या अपमानामुळे तीन जन्म स्वर्गसुखापासून वंचित व्हावे लागले. ते तीन जन्म म्हणजे हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू, रावण आणि कुंभकर्ण व शिशुपाल आणि दंतवक्त्र. या तीनही जन्मात भगवंताने स्वतः अवतार घेऊन आपल्या पार्षदांना मोक्षप्राप्ती करून दिली.



हिरण्याक्ष अवतार या भूतलावर झाला आणि त्याने धुमाकूळ घालायला सुरूवात केली. पृथ्वी अगदी रसातळाला नेली. आपल्या खगोलशास्त्रीय निरीक्षणांनुसार आपल्या पृथ्वीतलावर हायड्रोजन आणि ऑक्सीजन पासून पाण्याची निर्मिती, त्यानंतर पाण्यातील विविध वनस्पती आणि प्राण्यांची निर्मिती, त्याअनुषंगाने जमिनीवर विविध जिवाणू, झाडे आणि त्यानंतर मानवी जीवनाची निर्मिती ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पृथ्वीच्या सूर्यापासून असलेल्या विशिष्ट अंतरामुळे, पृथ्वीच्या एका विशिष्ट अंशात कललेल्या आसामुळे आणि सूर्यमाला निर्माण झाल्यानंतर जे विविध वायूंचे गोळे सूर्याभोवती फ़िरता फ़िरता हळूहळू थंड होत ग्रह बनलेत त्यांच्या विशिष्ट परिवलन गतीमुळे आपल्या पृथ्वीवर मानवी जीवनासकट एकूणच जीवसृष्टीविषयी पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. तसे आपल्या या सूर्यमालेच्या इतर कुठल्याही ग्रहावर निर्माण होऊ शकत नाही. यात थोडाजरी बदल झाला तरी आपल्या पृथ्वीवरील एकूणच जीवसृष्तीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊन जीवसृष्टी लयाला जाऊ शकते.

हिरण्याक्ष हा अत्यंत बलवान आणि तामसी वृत्तीचा असल्याने त्याने आपल्याला ज्ञात असलेल्या आकाशगंगांच्याही पलिकडे कुठेतरी असलेल्या स्वर्ग नावाच्या निराळ्या प्रतलातून आपल्या सूर्यमालेत प्रवेश करीत हा समतोल बिघडवण्याचा प्रयत्न केला असावा. आपणच निर्माण केलेली ही सृष्टी अशी कुणीतरी तामसी वृत्तीने नाश करीत असेल तर ते सृष्टीनिर्मात्याला अजिबात आवडत नाही. त्यामुळे भगवंतांनी ब्रह्माजींच्या नाकपुड्यांमधून बाहेर येत वराह अवतार धारण केला.



या जीवसृष्टीला आधार ठरणा-या पृथ्वीच्याच गतीत, अक्षाच्या अंशात परिवर्तन करू पाहणा-या आणि इतकी सुंदर निर्मिती नष्ट करू पाहणा-या हिरण्याक्ष राक्षसाशी भगवंतांनी युद्ध केले आणि आपल्या दाढांमध्ये धरून रसातळाला जात असलेली पृथ्वी पुन्हा आपल्या ठिकाणी प्रस्थापित केली. पृथ्वीवरील त्यानंतर जीवन फ़ुलवायला मदत केली.

आपल्या या सृष्टीत सगळ्या जीवांचे काही ना काही महत्व आहे. अगदी लहानतल्या लहान, क्षुद्रातल्या क्षुद्र जीवांचीही या सृष्टीत काही कर्तव्ये आहेत, निश्चित असे प्रयोजन आहे. कुठल्याही जीवाला त्याच्या बाह्य रूपावरून, तो या पृथ्वीतलावर करीत असलेल्या कार्यावरून लहान किंवा मोठे, चांगले किंवा ओंगळ संबोधण्यापूर्वी त्या जीवाचे इथले कार्य आणि तो त्याच्या कार्यामुळे इथे करीत असलेले उपकार आपण सूज्ञजनांनी स्मरून त्याचा आदर करायला हवा हे तत्व आपल्याला शिकवण्यासाठीच भगवान विष्णूंनी आज आपल्याला छोटासा, दुर्लक्षणीय आणि सामान्य वाटत असलेल्या वराहाचा अवतार इथे घेतला.

आज आपल्यापैकी प्रत्येकानेच ही पृथ्वी तिच्यावरील जीवसृष्टीसकट पुन्हा एकदा रसातळाला नेण्याकरिता हिरण्याक्ष अवतार घेण्याचा चंग बांधला आहे की काय अशी अवस्था आहे. आज आपण फ़क्त मनुष्यांचाच, त्यांच्याच सुखांचा, त्यांच्याच सोयीपुरता विचार करतो आहोत. आपल्या कुठल्या कृतीमुळे या सृष्टीला, तिच्यावर आजवर पोसल्या गेलेल्या एकूणच जीवसृष्टीला धोका पोहोचू शकेल, ही पृथ्वी पूर्णपणे नष्ट होऊ शकेल याचा अगदी थोडा विचारही आपल्याला शिवत नाही. आपल्या सगळ्यांच्या जीवनकालात तर यातले काही होणार नाही मग आजच त्याची चिंता का करायची ? आज खाओ, पिओ, ऐश करो हाच चार्वाक विचारसरणीचा विचार आपल्या सगळ्यांना व्यापून उरलेला आहे. यादृष्टीने आपण या हिरण्याक्ष राक्षसाचे आणि भगवंतांनी घेतलेल्या वराह अवताराचे चिंतन करणे व आपल्यामुळे या जीवसृष्टीचा समतोल अजिबात बिघडू नये याची जाणीवपूर्वक काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. या कथेचे चिंतन नेमके हेच आहे.  


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥





- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य द्वादशी शके १९४८ दिनांक  ११ / ७ / २०२६


११ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६