Friday, July 17, 2026

गेल्या अर्ध शतकात भारतीय रेल्वेने घेतलेली झेप.

 वर्धा - बल्लारशाह मेमू गाडीचे हे वेळापत्रक बघितले आणि डोळ्यातून टपटप अश्रूच वाहू लागले हो. मोबाईलवरची अक्षरे दिसेनाच. डोळे पुसून पुसून पुन्हा पुन्हा वाचले. अवघ्या २ तास १० मिनीटांत वर्धा ते चंद्रपूर ? कसं शक्य आहे ?



साधारण १९८३ - ८४ चा काळ असावा. चंद्रपूरच्या आजोळहून आम्ही आमच्या एका नातेवाईकांना भेटायला वर्धेला जाणार होतो. संध्याकाळी ६.०० वाजण्याच्या आसपास सुटणारी काजीपेठ - वर्धा पॅसेंजर गाडी. त्याकाळी  स्टेशनवर जा, तिकीटांच्या रांगेत उभे रहा, तिकीटे मिळवा, फलाटावर जा, फलाटावर नीट जागा पकडा असे खूप सव्यापसव्य असायचे. बरे, या प्रवासी मंडळीत माझे आजी, आजोबा ही ज्येष्ठ नागरिक मंडळी, एक तरूण मामा आणि बाकी आम्ही सगळी वय वर्षे १० ते १६ या वयोगटातली ७ - ८ नातवंडे. त्यामुळे सामानाचे डाग भरपूर होते. त्याकाळी वाटेत खाण्यापिण्याची आजच्याइतकी सार्वत्रिक उपलब्धता नव्हती त्यामुळे पाण्याच्या वाॅटरबॅग्ज, खाण्याचा डबा, त्याला लागणार्‍या accessories यामुळे सामानाचे भरपूर डाग झाले होते.

तेव्हाची वडिलधारी मंडळी जरा जास्तच काळजी घेत असत. त्यामुळे संध्याकाळी ६.०० च्या गाडीने जायचे म्हणून आजोळी दुपारी ४.०० वाजताच टांगे उभे राहिलेत.. "नारायणा, सांभाळून ने रे बाबा." किंवा "अंबामाय, पाहून घे गं बाई तूच." असे देवांना साकडे घालून आम्ही दुपारी ४.३० वाजताच चंद्रपूरच्या फलाटावर येऊन अक्षरशः बस्तान ठोकले.

तेव्हा वर्धेनंतर काजीपेठपर्यंत बहुतेक रेल्वेमार्ग एकेरी होता. त्यामुळे पुढून येणार्‍या रेल्वेगाड्यांना जागा देण्यासाठी मधल्या स्टेशनवर थांबून वाट बघणे त्याचबरोबर आपल्याच मार्गाने जाणार्‍या इतर जलद गाड्यांना पुढे जाऊ देण्यासाठी वाट बघत थांबणे या प्रक्रियेत पॅसेंजर गाड्यांचा बँड वाजायचा. आमचीही पॅसेंजर गाडी अर्धा तास उशिरा, एक तास उशिरा अशी घोषणा होत होत तब्बल ४ तास उशीरा रात्री १०.०० वाजता चंद्रपूरला आली.

गाडीतल्या गर्दीत आमचे सगळे वर्‍हाड घुसले आणि आहे तशा परिस्थितीत आम्ही आमच्यापुरती जागा करून घेत इकडेतिकडे विखुरलेले बसलोत. गाडी निघाली. पण पुन्हा तेच पहिले पाढे पंचावन्न. समोर येणार्‍या गाड्यांना साईड द्या, ओव्हरटेक करणार्‍या गाड्यांसाठी थांबून रहा या प्रकरणांमध्ये आम्ही वर्धेला दुसर्‍या दिवशी पहाटे ४.०० वाजता पोहोचलेलो होतो. पेंगुळलेले, झोपाळलेले, अंग आंबलेले अशा अवस्थेत. 

वर्धा ते चंद्रपूर हे अंतर फक्त ११९ किलोमिटर्स आहे हे सत्य आम्हाला फार उशीरा कळले. त्यादिवशी त्या मोठ्ठ्या प्रवासानंतर आमची समजूत म्हणजे वर्धा हे शहर मुंबई किंवा पुण्याच्या दोनतीन तासांवर आहे अशी झाली होती.

आता मला सांगा. जुन्या पॅसेंजरच्याच दर्जाची ही मेमू. मधल्या सगळ्या स्थानकांवर थांबून हाच प्रवास अवघ्या २ तास १० मिनीटांमध्ये करते म्हटल्यावर आम्हाला तो दिवस आठवून भरून येणार नाही तर काय होईल ?

- पॅसेंजर गाड्यांच्या जनरल कोचपासून ते राजधानी एक्सप्रेसच्या प्रथम वर्ग वातानुकूल वर्गातून भारतभर विविध प्रवास केलेला प्रवासी पक्षी, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 

No comments:

Post a Comment