Tuesday, July 7, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ७ चतुःश्लोकी भागवत

चतुःश्लोकी भागवत हे श्रीमदभागवताचे बीज समजले जाते. सृष्टीकर्ता ब्रह्माजी जेव्हा आपल्या योगनिद्रेतून जागृत झाले आणि कमळात बसून सर्व जलमय जग अवलोकन करू लागलेत तेव्हा त्यांना वाटले की या जगात मीच एकटा भरून राहिलेलो आहे आणि या जगाचा उत्पत्ती, स्थिती आणि लयकर्ता मीच आहे. तेव्हा ते कमलदल ज्यांच्या नाभीतून उत्पन्न झालेले आहे अशा श्रीविष्णूंनी त्या कमलदलाचा देठ हलवून जाणीव करून दिली की ब्रह्माजी त्यांच्या नाभीकमलातून उत्पन्न झालेले आहेत आणि श्रीविष्णूंनी प्रदान केलेल्या ज्ञानातूनच ब्रह्माजींनी ही सृष्टीरचनेचा संकल्प सोडलेला आहे.


अत्यंत नम्रपणे आणि कृतज्ञतेने ब्रह्माजींनी श्रीविष्णूंची प्रार्थना केली आणि श्रीविष्णूंनी या विश्वाचे कारण असलेले चतुःश्लोकी भागवत ब्रह्माजींना दिले. ब्रह्माजींनी ते देवर्षी नारदांना दिले आणि नारदमुनींनी ते चतुःश्लोकी भागवत वेदव्यास मुनींनी दिले आणि या सृष्टीच्या कल्याणासाठी त्याचा विस्तार करायला सांगितला. श्रीमदभागवताचे १८००० श्लोक म्हणजे या चार श्लोकांचा विस्तारच होय. म्हणून हे चतुःश्लोकी भागवत जरी नुसते समजून म्हटले तरी संपूर्ण श्रीमदभागवत पाठ केल्याचे साफ़ल्य होते असे जाणकार सांगतात. फ़क्त ह्या चार श्लोकांचा भावार्थ आणि गूढार्थ लक्षात घेऊन आपण मनन केले पाहिजे.


भगवान विष्णू ब्रह्मांजींना विशद करत आहेत.  


अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत् सदसत्परम्।

पश्चादहं यदेतच्च यो वशिष्ट्येत सोऽस्म्यहम्।।


सृष्टीच्या प्रारंभी केवळ मीच होतो. माझ्याव्यतिरिक्त दुसरे कोणतेही स्थूल, सूक्ष्म किंवा त्यापलीकडील कारण नव्हते. आणि या सृष्टीचा प्रलय झाल्यावरही केवळ मीच शिल्लक राहीन आणि आता ही जी सृष्टी दिसत आहे, तिचा मूळ आधारही मीच आहे.

आजच्या युगात शास्त्रज्ञांनी या सृष्टीच्या निर्मितीचे कारण "बिग बॅंग थेअरी" दिलेली आहे. सृष्टीच्या उत्पत्तीप्रसंगी एक खूप मोठा स्फ़ोट झाला त्यातून हे विविध तारे, ग्रहमालिका, आकाशगंगा यांचे अफ़ाट विश्व निर्माण झाले आणि हे विश्व सतत विस्तार पावत आहे. यात मोठमोठी कृष्णविवरे सुद्धा निर्माण झालेली आहेत आहेत हे कायम विस्तार पावणारे विश्व एक दिवस संपूर्ण नष्ट होऊन पुन्हा एका अणूमध्ये सामावणार आहे अशी ती थेअरी आहे. आज आपण आपल्या ज्ञानाने केवळ आपल्या सूर्यमालेच्या शेवटापर्यंत पोहोचू शकलो आहे. आपल्या आकाशगंगेत असलेल्या असंख्य सूर्यमाला आणि अशा असंख्य आकाशगंगा असलेले हे विश्व. याचे उत्पत्तीकारण, स्थितीकारण आणि याच्या लयानंतर होणारी या विश्वाची स्थिती हे सगळे श्रीमदभागवतकारांनी जवळपास पाच हजार वर्षांपूर्वी विशद केलेले आहे.



यानंतर भगवान विष्णू समजावत आहेत.

ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि।

तद्विद्यादात्मनो मायां यथाभासो यथा तमः।। 

आत्मस्वरूपाशिवाय (परमेश्वराशिवाय) जे काही सत्य असल्यासारखे भासते आणि आत्म्यामध्ये जे अस्तित्वात नाही, ती माझी 'माया' आहे. उदाहरणार्थ, जशी एखादी अंधारात दिसणारी सावली किंवा आरशातील प्रतिबिंब सत्य नसून आभासमात्र असते, तशीच ही माया आहे.


आधुनिक विज्ञान सांगते की एकच वस्तू जगातल्या प्रत्येकाला त्याच्या त्याच्या दृष्टीकोनानुसार वेगवेगळी दिसू शकते, वेगवेगळी आभासाला येऊ शकते पण एकदा त्या वस्तूचा अनुभव आला तर मात्र त्या वस्तूचे यथार्थ ज्ञान प्रत्येकाला होऊ शकेल आणि ते मात्र सारखेच असेल. प्रत्येकाला एकच वस्तू वेगवेगळी दिसणे ही माया तर त्याची यथार्थ प्रतिती येणे हे ब्रह्म. श्रीमदभागवत प्रत्येक जीवाला या जगात ज्ञानाची प्रतिती घेण्यास उद्युक्त करतय. नुसते सांगोवांगी ज्ञान नाही, पुस्तकी ज्ञान नाही तर अनुभवातून, प्रयोगाअंती येणारे ज्ञान ही खरी प्रतिती.


आपले अध्यात्म आपल्याला कुठेही आंधळा विश्वास ठेवायला सांगत नाही. प्रयोग करा, प्रतिती घ्या आणि मग मात्र केवळ करंटेपणाने आलेल्या प्रतितीला नाकारू नका. ते खरे ज्ञान स्वीकारा हेच आपल्या सर्व अध्यात्माचे सार आहे.



भगवान विष्णू पुढे सांगतात


यथा महान्ति भूतानि भूतेषूच्चावचेष्वनु। 

प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्।।


ज्याप्रमाणे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत सर्व लहान-मोठ्या वस्तूंमध्ये बाहेरील बाजूस आणि आतील बाजूसही असतात, म्हणजेच ते जगात सर्वत्र व्यापून असतात, तरीही त्यांच्यामध्ये ते मिसळून राहत नाहीत. त्याचप्रमाणे मीही सर्व प्राणिमात्रांमध्ये व जगात असूनही अलिप्त (निर्गुण) राहतो.


परमेश्वर या जगाचे, सृष्टीचे कारण आहे पण तो म्हणजे ही सृष्टी नाही. ही संपूर्ण सृष्टी केवळ त्यानेच जरी व्यापलेली असली तरी परमेश्वर म्हणजे ही केवळ ही सृष्टीच नाही. या सृष्टीवरील पंचमहाभूते ही त्याचीच निर्मिती आणि रूपे असली तरी परमेश्वर या पंचमहाभूतांपेक्षा जास्त व्यापक आहे. आपल्या सूर्यमालेतल्या प्रत्येक ग्रहावर वेगवेगळे गुरूत्वाकर्षण आहे. जरी ते गुरूत्वाकर्षण त्या ग्रहावर आपल्याला आतून आणि बाहेरूनही प्रत्ययाला येत असले तरी पण तो संपूर्ण ग्रह म्हणजे फ़क्त ते गुरूत्वाकर्षण नव्हे. ते गुरूत्वाकर्षण त्या ग्रहाच्या गुणांचा एक भाग आहे. त्याप्रमाणेच या समस्त सृष्टीकर्त्या परमेश्वराची स्थिती आहे. त्याचे अनंत गुणांनी आपण वर्णन करू शकत असलो तरी ते गुण म्हणजेच तो नव्हे. तो त्या गुणांपेक्षासुद्धा खूप काही निराळा, गुणातीत आहे. त्या परमेश्वराच्या रूपाचे वर्णन करताना सर्व वेदांची, शृतींची, उपनिषदांची अवस्था "नेति नेति" (न इति, न इति = हा नव्हे, हा नव्हे) अशी झाली तिथे त्याचे यथार्थ स्वरूप जाणून घेण्यास माझ्यासकट सर्व मानव, दानव, देव, शास्त्रे, पुराणे, तर्क, न्याय, मीमांसा अपु-या ठरतात.


आणि या चौथ्या श्लोकात भगवान समजवतात

एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः।

अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा।। 


आत्मतत्त्व जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या साधकाने केवळ एवढेच जाणून घेतले पाहिजे की, जे सर्वकाळ (सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती आणि लयामध्ये) आणि सर्वत्र अन्वय (सगळीकडे असणारे) आणि व्यतिरेक (सगळ्यांपेक्षा वेगळे) रूपाने उपस्थित असते, तेच अंतिम सत्य आहे. 

आपण आपल्या आधुनिक विज्ञानामध्ये एखाद्या गोष्टीचा शोध लावण्यासाठी, एखादे प्रमेय सिद्ध करण्यासाठी ज्याप्रमाणे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष तर्क लावून, प्रयोग करून त्या गोष्टीचा शोध लावण्याचा, ते प्रमेय जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तसेच परमेश्वर प्राप्तीसाठी, त्याचे खरे स्वरूप जाणून घेण्यासाठी मनुष्यमात्रांनी त्याच्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अनुभूतीचा ध्यास घ्यायला हवा. आपल्या आयुष्यात केवळ परमेश्वर प्राप्तीसाठी विविध प्रयोग करून बघायला हवेत.



आज आपली धाव इंद्रियांना माहिती होणा-या, इंद्रियांद्वारे घेता येणा-या सुखांसाठी, त्यांच्या प्राप्तीसाठी असते. आपले अवघे आयुष्य अशा सुखांच्या शोधात खर्च होते आणि आयुष्याच्या अखेरी आपल्याला कळते की ज्याप्रमाणे ही सगळी इंद्रिये क्षणभंगूर आहेत तशी त्यापासून प्राप्त होणारी सुखे सुद्धा क्षनभंगूर आहेत. त्या इंद्रियांना प्राप्त होणा-या सुखापलिकडे जे शाश्वत सुख आहे ते म्हणजे परमेश्वरी रूपाची, त्याच्या प्राप्तीच्या शोधाची अनुभूती. त्या शोधात तो मिळेल, न मिळेल पण तो शोध, ते शोध घेण्याचे सुख हे इंद्रियगोचर सुखांपेक्षा खूप निराळे आहे आणि त्या परमेश्वरासारखेच अविनाशी व चिरकाल टिकणारे आहे. हे कळणे म्हणजेच श्रीमदभागवतातल्या या चतुःश्लोकी भागवताची अनुभूती येण्यासारखे आहे.



॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य सप्तमी / कालाष्टमी शके १९४८ दिनांक ७  / ७ / २०२६


७ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


No comments:

Post a Comment