रेणु ऋषींची कन्या रेणुका हिचा विवाह श्रेष्ठ तपस्वी मुनी जमदग्नी यांच्याशी झाला आणि या पवित्र दंपतींना अनेक पुत्र झालेत त्यातला सगळ्यात कनिष्ठ पुत्र म्हणजे भगवान परशूराम. पृथ्वीतलावरील हैहय नावाच्या क्रूर वंशाचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी स्वतः हा अंशावतार धारण केलेला होता.
समाजात त्यावेळी चातुर्वर्ण व्यवस्था अस्तित्वात होती. समाजाला बौद्धिक दिशा दाखवणा-या व्यक्ती ब्राह्मण नावाने ओळखल्या जायच्यात, समाजचे रक्षण करणा-या व्यक्ती क्षत्रिय नावाने ओळखल्या जायच्यात. व्यापार उदीम करून समाजाच्या आणि राष्ट्राच्या संपत्तीत वाढ करणा-या व्यक्ती या वैश्य म्हणून संबोधल्या जायच्यात तर समाजाची सेवा करणा-या व्यक्ती या शुद्र म्हणून संबोधल्या जायच्यात. आजच्या भाषेत सांगायचे झाले तर आजची service industry. त्या काळी प्रत्येकाला त्याच्या त्याच्या कर्मानुसार हा वर्ण प्राप्त करण्याचा आणि इतर वर्णात जाऊ शकण्याचा अधिकार होता. नंतरच्या काळात ही वर्णव्यवस्था जन्माधारित होत गेली आणि म्हणून टीकेचा विषय झाली.
क्षत्रियांनी राष्ट्राचे, समाजाचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य होते पण हैहय वंशातले क्षत्रिय राजे या कर्तव्याला विसरून विषयलोलूप आणि तमोगुणी झालेले होते. त्यांनी आपल्या माहिष्मती नगरात अगदी हाहाकार उडवून दिलेला होता. त्याच नगरीचा राजा सहस्रार्जून याने भगवान दत्तात्रेयांची अतिशय कठोर उपासना करून त्यांना सहस्रबाहू मागून घेतले होते आणि ते वरदान मिळाल्यानंतर तो अधिकच उद्दामपणे वागू लागला.
एकदा तो सहस्रार्जून राजा जमदग्नी ऋषींच्या आश्रमात काही कारणाने आला. ऋषींनी त्याचे स्वागत केले. आश्रमवासी ऋषींचे ते विलक्षण वैभव पाहून राजा मनात अस्वस्थ झाला. त्याने ऋषींना त्या वैभवाचे रहस्य विचारले तेव्हा ऋषींनी मोठ्या निर्मळ मनाने आपल्या आश्रमात असलेल्या कामधेनूविषयी त्यांना सांगितले. सहस्रार्जुनाने ती कामधेनू जमदग्नींकडे मागितली. तो देवाचा प्रसाद असल्याचे सांगून जमदग्नींनी राजाला कामधेनू देण्यास नकार दिला तेव्हा सहस्रार्जुनाने आपल्या बळाचा वापर करून ती कामधेनू बांधून आपल्या माहिष्मती नगरीत नेली.
परशूराम आश्रमात परतल्यानंतर त्याला हा वृत्तांत समजताच त्याने माहिष्मती नगरीवर चाल करून गेला. याप्रसंगी त्याचे आणि सहस्रार्जुनाचे तुंबळ युद्ध झाले तेव्हा त्याने अतुल पराक्रम गाजवून त्या जुलमी, विषयांध राजाचा वध केला. त्या देवप्रसादरूप असलेल्या कामधेनूला सोडविले व पुन्हा तिला तो जमद्ग्नी ॠषींच्या आश्रमात घेऊन आला.
आश्रमात परतताच आपले पिता जमदग्नी ऋषींना त्याने सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा त्यांनी परशूरामाला ब्राह्मण धर्मातल्या क्षमेविषयी सांगितले. राजाचा वध करणे योग्य नाही आणि त्यामुळे लागलेले पाप दूर करायला परशूरामाला तपश्चर्येला जाण्यास सांगितले. पित्याच्या आज्ञेनुसार परशूराम तपश्चर्येसाठी गेलेत.
इकडे सहस्रार्जुनाच्या युद्धातून पळून गेलेल्या मुलांनी पुन्हा एकदा जमदग्नी ऋषींच्या आश्रमावर हल्ला केला. तपाला बसलेल्या जमदग्नी ॠषींची त्यांनी हत्या केली. परशूरामाची आई रेणुका हिने याप्रसंगी मोठा विलाप केला आणि आर्त स्वराने परशूरामांना पाचारण केले. आईची आर्त हाक ऐकून प्रखर मातृपितृभक्त असलेले परशूराम आश्रमात परतले तेव्हा तिथली परिस्थिती त्यांच्या आईने त्यांना कथन केली. संतापून परशूरामांनी तिथले एक परशू उचलले आणि त्वरित माहिष्मती नगरीत जाऊन सहस्रार्जुनाच्या पुत्रांचा वध केला. त्यांच्या मुंडक्यांची रास त्यांनी रचली आणि आपल्या पित्याच्या हत्येचा बदला घेतला. त्यांचे पिता जमदग्नी ऋषींना स्मृतीरूप संकल्पाने त्याने पुनर्जीवित केले. याप्रसंगी त्यांचे पिता जमदग्नी ॠषी आणि माता रेणुका यांच्या आशिर्वादाने ते नवीन मन्वंतरात सप्तर्षींमधले एक झालेत आणि त्यांनी सप्त चिरंजीवांपैकी एक होण्याचा वर मिळाला.
ज्ञानमार्गाने जाणा-यांनी केवळ ज्ञानाचीच उपासना करून भागणार नाही तर आपण उपासना करीत असलेले सात्विक आणि विमल ज्ञान रक्षिले जावे म्हणून स्वतः बलाची उपासना करणे आवश्यक आहे हा या कथेचा बोध. "लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या" हा उपदेश स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या कथेलाच आदर्श मानून तर ठेवला नसेल ना ? अतिशय उदात्त, उत्तम असलेया आपल्या संस्कृतीरक्षणासाठी वेळप्रसंगी आपल्याजवळ शापाचे हत्यार पाहिजे पण शराचे (बाणांचे) ही हत्यार सज्ज असले पाहिजे हा संदेश भगवान परशूरामांनी आपल्याला दिला. शापादपि, शरादपि.
॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध दशमी शके १९४८ दिनांक २४ / ७ / २०२६
२४ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६
No comments:
Post a Comment