Monday, July 20, 2026

श्रीमदभागवत चिंतन - १९ गजेन्द्रमोक्ष आख्यान

सुंदर वृक्ष असलेली वने, फ़ळांची, फ़ुलांची सुंदर आणि सुवासिक झाडे असलेली आणि मनमोहक सरोवरे असलेली उपवने असलेले एक ठिकाण एका पर्वत पायथ्याशी होते. त्या वनात एक अत्यंत पराक्रमी आणि सुंदर असणारा हत्ती एखाद्या राजाप्रमाणे राज्य करीत होता. त्याला अनेक राण्या आणि पुत्र होते. तो हत्ती इतका पराक्रमी होता की नुसत्या त्याच्या चाहुलीनेच वनातल्या इतर क्रूर प्राण्यांची बोबडी वळायची आणि या क्रूर प्राण्यांचे भक्ष्य असलेले इतर प्राणी आपल्या कैवा-याच्या अशा वावरामुळे मनातून आनंदून जायचे. एकंदर मोठ्या मजेत आणि आनंदात तो गजेंद्र वनात राहत होता.


एकदा असाच तो गजेंद्र वनात आपल्या राण्यांसह विहार करीत असताना त्याला आणि त्याच्या कळपातल्या पिल्लांना आणि त्याच्या राण्यांना तहान लागली. तो गजेंद्र आपल्या राण्यांसह पाणी पिण्यासाठी एका छान सरोवरात उतरला. पाणी पिऊन झाल्यानंतर त्यांनी एकमेकांवर आपापल्या सोंडेनी पाणी उडवत जलक्रीडा करीत होते. तेव्हढ्यात पाण्यातल्या एका मगरीने त्याला पाण्यात त्रास झाल्यामुळे क्रोधित होऊन त्या जलक्रीडेच्या ठिकाणी येत त्या गजेंद्राचा पाय आपल्या जबड्यात पकडला.



सुरूवातीला गजेन्द्राने स्वतःचे संपूर्ण बळ एकवटून त्या मगरीच्या तावडीतून आपला पाय सोडविण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे पाण्यातले बळ त्या मगरीपेक्षा कमी पडत होते. त्याच्या कुटुंबियांनीही त्याला सोडविण्यासाठी आक्रोश सुरू केला पण काही केल्या त्याची त्या मगरीच्या जबड्यातून त्याची मुक्तता होईना. अखेर एक एक करून त्याचे कुटुंबिय त्याला सोडून पाण्याबाहेर जाऊन वनात परतू लागलेत आणि आता मात्र तो गजेंद्र एकटा पडला.


स्वतःच्या शरीरातली क्षीण होत चाललेली शक्ती, कुटुंबिय आणि मित्रांनी कठीण काळी सोडलेली साथ यामुळे मगरीच्या जबड्यात पाय सापडलेला तो गजेंद्र व्याकूळ होऊन भगवान श्रीहरींना आळवू लागला. त्यांची स्तुती करू लागला. संसारात वावरताना "जन सुखाचे सोबती, निर्वाणीचा श्रीपती" या उक्तीचे त्याला स्मरण झाले आणि त्याने भगवंतांची व्याकूळ आराधना सुरू केली.


भक्ताच्या अत्यंत व्याकूळ हाकेला ओ देणे हे तर भगवंताचे प्रमुख कार्य आहे. भगवान विष्णू त्यांच्या गरूडासह त्या सरोवराकाठी प्रगट झालेत आणि त्यांनी त्या मगरीचा जबडा फ़ाडून गजेंद्राची मुक्तता केली. याप्रसंगी आपल्याही आयुष्यातले आपले अनुभव आपण सर्वसामान्य जनांनी इथे लक्षात घ्यावेत. जीवन अतिशय उत्तम सुरू असताना आपल्याला भगवंताचे स्मरण होत नाही. आपण आपल्या कर्तृत्वाच्या अहंकारात, मित्रमंडळी, कुटुंबियांच्या भरोशावर जीवन पार पाडू हा विश्वास आपल्याला असतो. जेव्हा ही सगळी साधने अपुरी आहेत हे आपल्या ध्यानात येते तेव्हा निर्वाणीच्या क्षणी आपल्याला भगवंत आठवतो. पण तो इतका दयाळू की तो आपल्या सहाय्याला धावून येतोच.



द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळीसुद्धा तिने श्रीकृष्णाला त्याने तिच्या सहाय्याला यायला इतका उशीर का केल्याबद्दल विचारले तेव्हा श्रीकृष्णाने तिला हेच सांगितले. द्रौपदी, तू पहिल्यांदा आपल्या नव-यांना विनवणी केली आणि नंतर सभेमधल्या उपस्थित जाणत्या मंडळींना विनंती केली. सगळ्यात शेवटी तू मला विनवणी केलीस. तू विनवणी केल्यानंतर मी लगेच आलो. उशीर तुझ्याबाजूने झालाय. 


गोस्वामी तुलसीदासांनी सुद्धा आपल्या दोह्यात हेच प्रतिपादन केलेले आहे. 


दुखमे सुमिरन सब करें, 

सुखमें करे न कोई, 

सुखमे जो सुमिरन करे, 

दुख काहे को होई ?


तसे आपण सर्व संसारी मंडळी सुखाच्या क्षणांमध्येही भगवंताला न विसरता त्याचे नित्य स्मरण करीत राहिलो तर आपल्या या पृथ्वीतलावरच्या आयुष्यात दुःखाचे संकटांचे प्रसंग येणारच नाहीत. आणि आपल्या पूर्वकर्मामुळे असे प्रसंग जरी आलेच, तरी त्यात तो श्रीहरी आपल्या सोबत सदैव आहे ही आपली जाणीव जागृत राहून आपण धैर्याने त्या प्रसंगाला सामोरे जाऊ शकू.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध षष्ठी शके १९४८ दिनांक  १९ / ७ / २०२६


१९ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 



No comments:

Post a Comment