जानेवारी २०१३. नागपूरला ३ - ४ दिवस एका समारंभासाठी राहून सांगोला मुक्कामी परतत होतो. नागपूर - अमरावती - कारंजा लाड - मालेगाव जहांगिर - मेहेकर - सिंदखेडराजा - जालना - छत्रपती संभाजीनगर - अहिल्यानगर - करमाळा - टेंभूर्णी - पंढरपूर - सांगोला असा साधारण ८०० किमी प्रवासाचा मार्ग होता.
भल्या पहाटे ४.३० ला नागपूरवरून प्रस्थान ठेवल्याने व वाटेत चहा, नाश्ता वगैरे गोष्टींसाठी वेळ न दवडता सलग ड्रायव्हिंग केल्याने दुपारी १.०० च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर ओलांडल्या गेले होते. ४५० किमी ८ तास ३० मिनीटांत. लांबचे प्रवास अंतर कापायचे तर मधले थांबे कमी आणि कमीत कमी वेळाचे घायचेत हा आमचा नेहमीचा दंडक. म्ह्णून मग सकाळी निघतानाच भरपूर चहा पिऊन, थर्मासभरून चहा आणि कागदी कप्स घेऊन, घरीच बनविलेल्या सॅंडविचेस, ब्रेड बटरसारखा कोरडा नाश्ता घेऊन (म्हणजे गाडी चालवताना ड्रायव्हरसाहेबांनाही त्या नाश्त्याचा आनंद घेता येईल असा) गाडीतच चालता चालता चहा नाश्ता उरकून सलग गाडी चालवायची असा शिरस्ता.
छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर मात्र सगळ्यांनाच भुकेची जाणीव झाली होती. आता अहिल्यानगर साधारण ३.०० पर्यंत आणि सांगोला संध्याकाळी ७.३० पर्यंत असे हिशोब डोक्यात आकार घेऊ लागले होते. जेवण्यासाठी एक तास जरी थांबलो तरी सांगोला रात्री ८.३० पर्यंत पोहोचणार होतो. ते चालण्यासारखे होते. अहिल्यानगर सोडल्यानंतर मात्र करमाळा, जेऊर शिवाय थांबून जेवण्यासारखी ठिकाणे नव्हती. करमाळा , जेऊर यायला संध्याकाळच झाली असती. मग अहिल्यानगरच्या आधीच जेवणाचा बेत पक्का झाला.
नेवासे फ़ाटा, घोडेगाव वगैरे गेल्यानंतर हायवेलगतच एक सुंदर ढाबा दिसला. अर्थात शुद्ध शाकाहारी. अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी, सुंदर संकल्पना आणि मस्त ambience चा.
थांबलो. झाडांच्या सावलीतच मस्त मांडी घालून, बैठक लावून निवांत जेवण केले. बेत साधासाच होता. झुणका - भाकरी, वांग्याचे मस्त भरीत आणि तोंडीलावणे म्हणून लगतच्याच शेतामधून तोडून आणून चुलीवरच भाजलेल्या मिरच्या आणि टोमॅटो. पंचेंद्रियांना तृप्त करणारा अनुभव घेतला. आणि नव्या उर्जेने उरलेला २५० किमीचा सांगोल्याकडचा मार्ग क्रमू लागलो.
पहिल्यापासून नियोजन नसले की कधीकधी अशा अनवट जागा एक वेगळाच अनुभव देऊन जातात, नाही ? या सगळ्या नवनव्या, नित्यनूतन अनुभवांचा स्वतःला शोध लागत जाणे म्हणजेच प्रवासाची खरी मजा. नुसते "क्ष" ठिकाणावरून "य" ठिकाणापर्यंत जाणे म्हणजे प्रवास नाही.
- स्वच्छंद आणि मनमौजी प्रवासी पक्षी, वैभवीवल्लभ राम.



No comments:
Post a Comment