Sunday, July 5, 2026

श्रीमदभागवत चिंतन - ५ तक्षकासमान संसारसर्प

कस्मै येन विभासितोऽयमतुलो 

ज्ञानप्रदीपः पुरा

तद्रूपेण च नारदाय मुनये 

कृष्णाय तद्रूपिणा ।


योगीन्द्राय तदात्मनाथ 

भगवद्राताय कारुण्यतत

तत शुद्धं विमलं विशोकम अमृतं 

सत्यं परं धीमहि ॥



श्रीमदभागवताच्या फ़लश्रृतीच्या श्लोकांमध्ये या श्रीमदभागवतरूपी ज्ञानगंगेचा प्रवास कसा झाला याचे वर्णन केलेले आहे. प्रत्यक्ष भगवंता कडून प्रगट झालेल्या या ज्ञानज्योतीने सृष्टीकर्ता ब्रह्माजींच्या हृदयात ज्ञानाचा दीप लावला. ब्रह्माजींनी ते ज्ञान देवर्षी नारदांना दिले त्यांनी ते कृष्ण द्वैपायन महर्षी वेदव्यासांना दिले आणि देवव्यासांनी ते ज्ञान आपला अत्यंत अधिकारी पुत्र असलेल्या श्रीशुकदेवांना दिले. श्रीशुकदेवजी महाराजांनी ते अत्यंत शुद्ध, विमल, शोकाचा नाश करणारे आणि अमृतमय ज्ञान विष्णुराताला (राजा परिक्षितीला) दिले.


राजा परिक्षितीला ’विष्णुरात’ हे नामाभिधान प्राप्त होण्यामागे त्याच्या जन्माची कथा कारणीभूत आहे. अर्जुनपुत्र अभिमन्यू महाभारत युद्धात चक्रव्यूहात मारला गेला तेव्हा त्याच्या पत्नीच्या, उत्तरेच्या गर्भात अभिमन्यूचा वंश वाढत होता. महाभारत युद्धाअखेरी कौरवांच्या पराभवाने संतप्त झालेल्या अश्वत्थाम्याने पांडवकुलाच्या समूळ नाशासाठी अविचाराने ब्रह्मास्त्र सोडले. त्यावेळी उत्तरेच्या गर्भातल्या बाळाला त्या ब्रह्मास्त्रामुळे इजा होऊ नये म्हणून प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने त्या गर्भात सूक्ष्म रूपाने जाऊन त्या बाळाचे रक्षण केले. परिक्षिती राजाला त्याच्या जन्मापूर्वीच प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन झाले होते. तो भगवंत आहे याचे ज्ञान मात्र त्याला तेव्हा नव्हते.



परिक्षिती राजाने या पृथ्वीतलावर जन्म घेतल्यानंतर अत्यंत उपकारबुद्धीने आपल्या रक्षणकर्त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. जगातल्या प्रत्येक व्यक्तीकडे "हा तर आपला रक्षणकर्ता नव्हता ना ?" असे त्याने परिक्षाबुद्धीने बघायला सुरूवात केली म्हणून त्याचे नाव ’परिक्षिती’ आणि प्रत्यक्ष भगवान विष्णुंनी त्याला रक्षण केलेला, या जगात राखलेला आहे म्हणून तो ’विष्णुरा्ख’ किंवा ’विष्णुरात’.


याआधीच्या लेखात विवेचन केल्याप्रमाणे या ग्रंथांवर, यातला उपदेशांवर आपण अत्यंत प्रगाढ असा दृढ विश्वास ठेवलाच पाहिजे कारण लोकोपकारासाठी, लोकांचे भले व्हावे या एकाच हेतूने या ग्रंथांची रचना आपल्या ऋषीमुनींनी केलेली होती. त्यात त्यांना वित्तेषणा, कामेषणा किंवा लोकेषणा तिळमात्रही नव्हती. हे सगळे आजच्या युगाचे गुणधर्म आहेत. त्यामुळे आपण सर्वसामान्य साधकांनी भाविकांनी अशा प्रकारे भगवंताच्या हृदयातून प्रगट होऊन परिक्षिती राजापर्यंत आलेल्या या ज्ञानगंगेत अक्षरशः बुडून जायला हवे कारण हेच ज्ञान आपल्याला आपल्या जीवनात तारून नेणार आहे याबाबत अजिबात शंका नाही. श्रीमदभागवतरूपी हे सत्य आपण अगदी उत्कटपणे आणि कायम आपल्या ध्येयपथावर मार्गदर्शक म्हणून ठेवावे.



यानंतर भगवंताकडे जी याचना केलेली आहे ती मोठी विलोभनीय आहे. आपल्या सारख्या सर्वसामान्य संसारी जनांनी ही प्रार्थना कायम आणि वारंवार करीत रहायला हवी. 


योगीन्द्राय नमस्तस्मै शुकाय ब्रह्मरूपिणे।

संसारसर्पदष्टं यो विष्णुरातममूमुचत्।।


योगीराज भगवान कृष्णाला आणि प्रत्यक्ष ब्रह्मरूप झालेल्या श्रीशुकदेवांना वंदन करून वेदव्यास प्रार्थना करतात की आपण तक्षकदंश होणा-या विष्णुराताला ज्याप्रमाणे तारले त्याचप्रमाणे या संसाररूपी सर्पाच्या दंशाने वेळोवेळी विव्हळ होणा-या मलासुद्धा तारावे.


काय गंमत आहे पहा. या संसारात आपल्या विषयांच्या तृष्णेमुळे आपल्याला कायम कायिक आणि मानसिक दुःखे भोगावी लागतात. तरीही सवयीने आपल्याला हा संसार हवाहवासा वाटतो. तक्षकाचा दंश राजा परिक्षितीला फ़क्त एकदाच होणार होता पण आपण सर्वांना हा संसारसर्प जवळजवळ रोजच दंश करीत असतो पण तरीही आपल्याला हा संसार हवाहवासा वाटतो, हा संसार सोडताना अपार दुःख होते. श्रीगजाननविजय ग्रंथात संतश्रेष्ठ श्रीगजानन महाराज भक्तांना उपदेश करताना म्हणतात त्याप्रमाणे 


पहा जगाची रीत कैसी । अवघेच इच्छिती संसारासी ।

सच्चिदानंद श्रीहरीसी । पहाण्या न कोणी तयार ॥


सर्वसामान्य सांसारिकांना हा संसारसर्पाचा दंश मोठा गोड आणि विलोभनीय वाटत असतो. पण ज्यांना श्रीमदभागवतातल्या शुद्ध आणि अमृतमय सत्याचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी तक्षकदंशासमान असलेल्या या संसारसर्पाच्या दंशापासून रक्षण करण्यासाठी भगवंताची प्रार्थना करावी. 


भगवंत अकारण करूणामयी असल्याने ते आपल्या हृदयातली खरी तळमळ ओळखून आपल्याला सहाय्य करतीलही पण त्यासाठी आपल्या हृदयात अत्यंत तळमळ असणे आवश्यक आहे. ती तळमळ कशी असावी ? याचेही उदाहरण श्रीमदभागवतकारांनी आपल्याला दिलेले आहे. त्याचा विचार आपण पुढील लेखात करू.



॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" ज्येष्ठ वद्य पंचमी शके १९४८ दिनांक ५  / ७ / २०२६


५ जुलै २०२६

#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६

No comments:

Post a Comment