श्रीमद्-भागवतम् पुराणम् अमलम्
यद् वैष्णवानाम् प्रियम.
यस्मिन् पारमहंस्यम् एकम् अमलं
ज्ञानं परं गीयते।
श्रीमदभागवतातल्या फ़लश्रृतीतला हा श्लोक. श्रीमदभागवत पुराण हे अत्यंत अ मल आहे, शुद्ध आहे. यात कुठेही मानवी प्रपंचातल्या गोष्टींचा मळ लागलेला नाही. हे पुराण मनुष्यमात्रांनी प्राप्त करून घेणाजोग्या सर्वोत्तम गोष्टीची (परम अर्थ) वैराग्याचीच चर्चा मनुष्यांशी करतेय. हे श्रीमदभागवतपुराण आणि त्यात सांगितलेला जीवन जगण्याचा मार्ग हा भगवान विष्णूंच्या भक्तांना अत्यंत प्रिय आहे.
काय आहे या श्रीमदभागवत पुराणात ? या पुराणात परमहंस स्वरूपाचे, कधीही मलिन न होणारे फ़क्त ज्ञान गायल्या गेलेले आहे.
दूध आणि पाणी एकत्र मिसळून दिले असता एखादा हंस ज्याप्रमाणे आपल्या चोचीने त्यातले फ़क्त दूधच प्राशन करतो आणि पाणी तसेच ठेऊन देतो, तसेच या जगात जीवन जगत असताना व्यक्तीने या जगातल्या विविध विषयांमधून मनुष्य जीवनात शाश्वत काय आणि अशाश्वत काय याचा विवेक जागृत ठेवत अशाश्वत गोष्टींना टाळून फ़क्त शाश्वत गोष्टींचे सदैव सेवन करावे. असा विवेक कायम जागृत असलेल्या व्यक्तींना परमहंस असे म्हणतात. परम = सर्वोच्च दर्जाचा, हंस = ज्या प्राण्याला नीरक्षीर विवेक (पाणी आणि दूध यातला फ़रक) कळतो असा जो तो. आपण आपल्या जीवनात अशा अनेक सत्पुरूषांना बघतो ज्यांना जीवनाचे सत्य आणि असत्य यांचे पुरेपूर ज्ञान झालेले आहे आणि ते त्यांच्या रोजच्या आचरणातून आपल्याला दिसतेय. अशा सत्पुरूषाला आपण परमहंस असे नामाभिधान देतो. श्रीमदभागवत महापुराण सर्व मनुष्यमात्रांना अशा परमहंस स्वरूपाचे ज्ञान देते.
आणि म्हणूनच श्रीमदभागवत महापुराण श्रवण करत असताना त्यातल्या प्रत्येक कथेकडे केवळ कथा, इतिहास म्हणून न बघता, ही कथा, हा इतिहास आपल्याला मानवी जीवनाच्या परमहंस ज्ञानाचा कुठला उपदेश करतेय ? याचा विवेक सर्व श्रोत्यांनी सदैव जागृत ठेवायला हवा. मानवी मनाचा सखोल अभ्यास करून केवळ एका सप्ताहात, सात दिवसात मानवी मन भारून जाईल, त्या मनात खरे वैराग्य भरले जाईल या गोष्टीची तरतूद भगवान श्रीवेदव्यासांनी हे महापुराण रचताना केलेली आहे. आधुनिक मानसशास्त्रज्ञांनी आजच्या युगातील मानसशात्रीय तत्वे लावून त्यादृष्टीने हा ग्रंथ अभ्यासला पाहिजे असे मला कायम वाटत आलेले आहे.
प्रत्यक्ष भगवत्सखा असलेल्या अर्जुनाचा नातू आणि ज्याच्या जन्माच्या आधीपासून प्रत्यक्ष भगवंताने (ज्याचे अगदी त्याच्या मातेच्या गर्भात तो असताना) त्याचे रक्षण केलेले आहे असा राजा परिक्षिती (विष्णुरात) राज्य करीत असताना केवळ एका साधूने राजाकडे अजाणतेपणी, दुर्लक्ष केले म्हणून त्या साधूंचा अपमान करतो. त्या साधूंना तर त्या मानापमानाची पर्वा नसते, ते बिचारे आपल्या साधनेत, समाधीत असतात पण त्यांचा पुत्र शृंगी ऋषी हा आपल्या पित्याचा अपमान लक्षात आल्यानंतर संतप्त होतो आणि राजाला शाप देतो. सात दिवसात तक्षक दंश होऊन राजाचा मृत्यू होईल असा.
राजाला शापवाणीविषयी कळते, मुळातच चांगल्या मनाचा असल्याने आणि क्षणिक क्रोधामुळे आपला संयम गमावून बसलेल्या त्या विष्णुराताला (विष्णूंनी रक्षण केलेला = विष्णुरात) पश्चाताप होतो पण साधूंची शापवाणी खरी होणार असल्याने तो एकूणच आपल्या जीवनाचा साकल्याने विचार करू लागतो. आपल्या आईच्या गर्भात असताना प्रत्यक्ष ब्रह्मास्त्रापासून ज्याचे रक्षण प्रत्यक्ष भगवंतांनी केले तो राजा एका साधूच्या शापाने मृत्यू पावणार आहे या गोष्टीचे मनन आज आपण सगळ्यांनी केले पाहिजे, यातले मर्म आपण समजून घेतले पाहिजे.
आणि आता मृत्यूपंथावर निश्चितपणे असलेल्या राजाला उपदेश करण्यासाठी परमहंस रूपाचे मूर्तिमंत उदाहरण असलेले भगवान व्यासपुत्र श्रीशुकदेव राजाला ख-या ज्ञानाचा, एकूणच मानवी जीवांचे उद्दिष्ट काय ? जीवनात श्रेयस काय ? आणि प्रेयस काय ? या सगळ्या गोष्टींचा उपदेश करून त्याला मनाने मुक्त करायला या महापुराणाचा पुढले सात दिवस उपदेश करत आहेत. काय आहे या उपदेशरूपी ग्रंथात ?
तत्र ज्ञान-विराग-भक्ति-सहितम्
नैष्कर्म्यम् आविष्कृतम
तत शृण्वन् सु-पठान् विचारण-परो
भक्त्या विमुच्येन्नरः॥
फ़लश्रृतीतील या श्लोकाचा अर्थ आपण यापुढील लेखांकात अभ्यासूयात.
- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन"ज्येष्ठ वद्य द्वितीया शके १९४८ दिनांक २ / ७ / २०२६
२ जुलै २०२६
#सुरपाखरू
#३०दिवसात३०
#जुलै२०२६
No comments:
Post a Comment