Friday, July 17, 2026

श्रीमदभागवत चिंतन - १६ जडभरताची कथा

आपल्या भारतभूमीवर महाराजा भरत हे अतिशय मोठे सम्राट होऊन गेलेत. त्यांचे जीवन सगळ्यांना अतिशय आदर्श असे जीवन होते. अतिशय न्यायाने आणि भगवंताला स्मरून अनेक वर्षे राज्य केल्यानंतर त्यांनी अत्यंत निवृत्त मनाने वानप्रस्थाश्रम स्वीकारला. आणि आपल्या आयुष्याचा उरलेला कालावधी ते वनात आनंदाने आणि ईश्वरचिंतनात अगदी आदर्श पुरूषाप्रमाणे घालवू लागलेत.

योगायोगाने वनात त्यांना आपल्या आईपासून जन्मतःच दुर्दैवाने दुरावलेले एक हरिण बालक सापडले. राजा भरताच्या मनात त्या बालकाविषयी अपार करूणा उत्पन्न झाली आणि त्या आईविना बालकाचा ते आईच्या ममतेने सांभाळ करू लागले. त्या हरिण बालकाने त्यांना इतका हळूहळू इतका लळा लावला की त्याच्याशिवाय राजा भरतांचे अगदी पान हलेना. त्यांच्या सगळ्या जीवनक्रियांमध्ये ते हरिण बालक एक अविभाज्य घटक म्हणून राहिले. इतके की या पृथ्वीतलावरील हा देह सोडताना महाराजा भरतांना त्या हरिण बालकाचीच अपार चिंता लागून राहिलेली होती. आपल्याशिवाय त्या बालकाचे कसे होईल ? कोणी त्याला खाऊपिऊ तरी घालतील की नाही या अपार चिंतेतच महाराजा भरतांनी इहलोक सोडला.

आयुष्यभर परमेश्वर भक्तीत अत्यंत आदर्शवत जीवन जगणा-या राजा भरताला आपल्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी त्या हरिणबालकाची चिंता लागून राहिली होती त्यामुळे त्यांना मुक्ती न मिळता पुढला जन्म हा हरिण बालकाचाच मिळाला. पण श्रीमदभगवतगीतेत श्रीभगवंतांनी वर्णन केल्याप्रमाणे "शुचिनाम श्रीमताम गेहे, योगभ्रष्टोभिजायते" या न्यायानुसार त्यांना मागील जन्माच्या आपल्या कर्मांची स्मृती त्या हरिण जन्मातही कायम होती आणि त्या जन्मात महाराजा भरतांना आपल्या अगदी थोडक्यात हुकलेल्या मुक्तीचा खूप पश्चाताप झाला. अगदी हाताशी आलेली मुक्ती केवळ वात्सल्यभावनेने या जगातल्या गोष्टींमध्ये अडकून पडल्यामुळे हुकली याची त्यांना त्या हरिणजन्मातही खूप खंत वाटे. त्या पशू जन्मातही त्यांनी विवेक जागृत ठेऊन या संसारातल्या गोष्टींमधून रूची काढून घेत आपला देह ठेवला. 

राजा भरत महाराजांना पुढला जन्म हा एका अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणापोटी झाला. या जन्मापासूनच त्यांचा नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय अशाश्वत काय हा विवेक जागृत असल्याने ते या पृथ्वीतलावरील कुठल्याही गोष्टींबाबत अजिबात आसक्ती न बाळगता जगाच्या दृष्टीने मंदबुद्धी, पिशाच्चवत आणि जड असे जीवन जगू लागले. जीवनातल्या सगळ्याच कर्मांविषयी त्यांची आसक्ती नष्ट झाली होती म्हणून ते असे पिशासारखे जीवन जगू लागले. त्यात काही कालावधीने त्यांच्या मात्यापित्यांचे निधन झाले आणि त्यांची सावत्र भावंडे त्यांना अत्यंत हेटाळणीपूर्वक वागणूक देऊ लागलीत. एका जमातला हा सार्वभौम सम्राट आता इतरांच्या सांगण्यावरून माती गोटे उचलणे, रथ ओढणे यासारखी कामे करू लागला. अर्थात भरत महाराजांना त्या कर्माचा विषाद किंवा आनंद कधीही झाला नाही. मुक्तीच्या मार्गात गेल्या जन्मात आलेला अगदी थोडासा अडथळा आपल्या या जन्मांना आणि आता प्राप्त कर्मांना कारणीभूत ठरला आहे हे सत्य त्यांनी जाणले होते म्हणून या जडभरताच्या जन्मात ते अत्यंत निर्विकार मनाने आपली इथली कर्मे पार पाडत होते. इतर जनांना ते मूढ आणि जड भासत असले तरी ते अंतरंगी अत्यंत तीव्र वैराग्य साधून मागील जन्मांमध्ये हुकलेला आपला मुक्तीचा क्षण साधण्यासाठी या जगातल्या शाश्वत अशा भगवंताच्या नामाच्या, आराधनेच्या आश्रयाने जगत होते.



असेच जीवन जगत असताना सिंधुसौवीर राज्याच्या राजाची पालखी वाहण्यासाठी त्यांना सगळ्यांनी भोई म्हणून जुंपले. भरत महाराज आपल्या ईश्वरचिंतनात सतत मग्न असल्याने त्यांच्याकडून त्या पालखी संचलनात काही चुका होऊ लागल्यात आणि पालखीवर स्वार राजाचा पारा चढला. तो राजा आपल्या राजमदामध्ये त्यांना टोमणे मारू लागला आणि त्यांचा अपमान करू लागला. तेव्हा त्या जडभरताने त्या राजाला या जगात नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय, अशाश्वत काय याचा परमहंस उपदेश केला. राजाला त्या जडभरताचा अधिकार कळला आणि त्याने पालखीतून उतरून त्या जडभरताचे पाय धरलेत. आणि अनेक जन्मांना कारणीभूत होणा-या मायेचा त्याग करून तो रहूगण राजा मोक्षपदापर्यंत गेला. श्रीमदभागवतसंहितेतल्या पंचम स्कंधातले दशम, एकादश, द्वादश आणि त्रयोदश अध्याय हे या दृष्टीने मुळापासूनच वाचण्याजोगे आहेत.



आपल्यापैकी खूप जणांचेही असे होते, नाही का ? आयुष्यभर अगदी आदर्श असे वर्तन, भगवंताच्या भक्तीत जीवन जगत असताना आयुष्याच्या शेवटी प्राणांताच्या समयाला एखाद्या कुठल्या तरी अत्यंत साधारण गोष्टीत आपला जीव अडकतो आणि ते कर्म पुरे करण्यासाठी जन्म मरणाच्या फ़े-यातून कायमच्या मुक्तीऐवजी पुन्हा पृथ्वीतलावर आपण जन्म घेतो. त्यातल्या काही भाग्यवान मनुष्यमात्रांनाच पूर्वजन्मीचे, त्यात घडलेल्या चुकांचे स्मरण उरते आणि त्या चुका ते नवीन जन्मात सुधारण्याचा प्रयत्न करीत असतात पण बहुतांशी मंडळी मुक्तीच्या अगदी जवळ असताना पुन्हा या जन्ममरणाच्या फ़े-यात सापडून पुढले अनेक जन्म या जन्म आणि मृत्यूच्या भोव-यात गटांगळ्या खात बसतात. संतांना मृत्यूच्या भयापेक्षा या जन्माचे अधिक भय असते म्हणून त्यांचे या पृथ्वीतलावरील जगणे अगदी आदर्श असते.

परमपूजनीय ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर आपल्या सर्वांना नामात इतके राहण्याचा उपदेश करतात की अंतकाळी सगळ्यात शेवटी आपल्यातून सुटणारी गोष्ट म्हणजे नाम असली पाहिजे असे ते अगदी कळकळीने प्रतिपादन करतात. शेवटल्या क्षणाला भगवंताचे नाम साधल्या गेले तर जन्मभर केलेल्या कर्मांचा नाश होऊन भगवत्प्राप्ती होते हे आपल्या संतांनी शात्रांनी आपल्याला सांगून ठेवलेले आहे. पण शेवटल्या क्षणाला नाम साधायचे असेल तर आयुष्यभर त्या नामाचा अभ्यास आणि ध्यास असला पाहिजे. आयुष्यभर आपल्या जीवनात फ़क्त नाम आणि नामच भरून रहायला मात्र हवे.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ शुद्ध द्वितीया शके १९४८ दिनांक  १६ / ७ / २०२६


१६ जुलै २०२६


#सुरपाखरू 

#३०दिवसात३०

#जुलै२०२६ 


No comments:

Post a Comment