Sunday, January 5, 2020

१ जानेवारी : एक संकल्प दिवस.

नववर्षाचा पहिला दिवस हा खरेतर "जागतिक संकल्प दिवस" म्हणून जाहीर केला पाहिजे असे मला कायम वाटत आलेले आहे. (पण मग दुसरा दिवस हा "जागतिक संकल्प विसर्जन दिवस म्हणून जाहीर करावा लागतो की काय ? अशीही भीती आहे.) या दिवशी नववर्षाच्या उत्साहात बहुतांशी मंडळी वर्षभरासाठीचा काही ना काही संकल्प घेतात. तो एक दिवस, एक आठवडा, तीन महिने, सहा महिने टिकतो. काहीकाही निष्ठावान मंडळी तर हा संकल्प खरोखर वर्षभर टिकवतातही.



Wonderful morning captured during morning walk at NMIMS  in Shirpur Campus.

संकल्प किती दिवस टिकला या घटनेला महत्व नाही. मला मौज वाटते ती माणसांच्या पुन्हा पुन्हा हारूनही परिस्थितीवर मात करण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला. "गेल्या वर्षीचा संकल्प २ जानेवारीलाच मोडला पण या वर्षी किमान आठवडाभर तरी आपण तो टिकवून दाखवला. पुढल्या वर्षी महिनाभर टिकवू" किंवा " १ जानेवारीचा संकल्प लवकर मोडला. हरकत नाही. युवा दिवसाचा १२ जानेवारी) मुहूर्त आहे, तो हुकलाच तर गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे, तेव्हा सुरूवात करूयात." ही वृत्ती माणसांच्या जिगीषेला अक्षय्य मदत करीत असावी. माणसाच्या मनाला नित्यनूतन ठेवणारी आशा देणारा दिवस म्हणूनही नववर्ष आणि त्याचे संकल्प याचे महत्व मला वाटते. जुने मार्ग चुकले म्हणून एका जागी थकून न बसता चुकांपासून शिकून नवे मार्ग चोखाळण्याच्या वृत्तीलाच कदाचित परिपक्वता म्हणत असावेत.


Fresh morning at Pench dam.

मी माझ्या गेल्या काही वर्षायल्या नववर्ष संकल्पांची यादी पाहिली आणि माझे मलाच आश्चर्य वाटले. 
१. दररोज डायरी लिहीणे
२. दररोजचा खर्च लिहून काढणे व हिशेब ठेवणे.
३. दररोज व्यायाम करणे व शरीरसंपदा कमावणे

हे माझे शालेय व महाविद्यालयीन दशेतले संकल्प होते. गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर त्या संकल्पांमध्ये बदल झाला. उदाहरणार्थ "दररोज व्यायाम करून शरीरसंपदा कमावणे" या ऐवजी "दररोज फ़िरायला जाऊन वजन घटवणे" हा एक संकल्प दरवर्षी येत गेला. मी नियमिततेचा, शिस्तीचा खूप भोक्ता असल्याने दररोजच्या वेळापत्रकाची (झोपणे, उठणे, अंघोळ, अभ्यासादि कर्मे) नियमितता आणि काटेकोरपणा पाळणे हा एक संकल्प दरवर्षी असतोच. आजकाल काही वर्षात नियमितपणे ब्लॉग्ज लिहीणे हा सुद्धा संकल्प त्यात सामील झालाय.

विद्यार्थी दशेत नियमितता आणि शिस्त यांचे काटेकोर पालन असल्याने डायरी जवळपास ९ वर्षे नियमितपणे आणि रोज लिहील्या गेली. रोजचे खर्च ही महाविेद्यालयीन हॉस्टेल जीवनात ४ वर्षे नियमितपणे लिहीत होतो. पण सांसारिक जीवनात तुम्ही तुमचे एकट्याचे नसता. सडाफ़टिंग नसता. तुमच्या जोडीदारासोबत, अपत्यांसोबत जीवन आखून घेत, त्यांच्याही वेळापत्रकाचा विचार करीत आपले वेळापत्रक ठरते. मग तेव्हढा काटेकोरपणा अंमलात आणणे अवघड होऊन बसते.

गेल्या २ - ३ वर्षांपासून मी करीत असलेला आणि पूर्णपणे अंमलात न आलेला एक संकल्प आहे. "नेहमी प्रसन्न बुद्धी कशी ठेवावी" यावर हार्वर्ड विद्यापीठात Shaun Achor नावाच्या तरूणाचे एक संशोधन वाचनात आले. कुठल्याही शारिरीक आणि मानसीक समस्येवर मात करण्यासाठी प्रसन्न बुद्धी अत्यंत आवश्यक आहे असा निष्कर्ष त्याने त्याच्या मोठ्ठ्या संशोधनाअंती काढला. "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे ते कारण" हे तुकोबा माऊली ने ४०० वर्षांपूर्वीच त्यांच्या लोकसंग्रहातून आणि निरीक्षणांमधून सांगून ठेवलेले होते ते आठवले. बर हा Shaun Achor नुसते निदान करून भागत नाही तर मन प्रसन्न करण्याच्या छोट्या छोट्या शारिरीक आणि मानसिक कवायतीही सांगतो.

a)  तुम्हाला कृतज्ञता वाटली अशा ३ गोष्टी त्याने रोज लिहून काढा. (भलेही ती डायरी, तो कागद तुम्ही कुणाला दाखवू नका. ही कसरत तुम्हाला तुमच्या प्रसन्न मनासाठी करायची आहे हे लक्षात असू द्यात.) 
b) तुमच्या परिवारासाठी , मित्रमंडळींसाठी त्यांना काहीतरी छान वाटेल असा एखादा संदेश रोज द्या.
c)  किमान १० मिनीटे तरी व्यायाम करा. (हा व्यायाम आपल्या सकारात्मक मनोवृत्तीसाठी, प्रसन्न बुद्धीसाठी बर का ? शरीरासाठी डॉक्टर मंडळी सांगतात तसा किमान ४५ मिनीटे, आठवड्यातून किमान ५ दिवस करण्याचा व्यायाम निराळा.)
d) तुमच्या कार्यालयीन वेळेत मध्येच वेळ काढून फ़क्त २ मिनीटांसाठी ध्यान करा / श्वासावर लक्ष केंद्रीत करा.
e) झोपण्यापूर्वी दिवसभराच्या घटनांचे चिंतन करून त्यात घडलेल्या एखाद्या महत्वपूर्ण घटनेवर तुमच्या डायरीत दोन मिनीटांमध्ये लेखन करा.

किती सोप्या आणि छान कवायती आहेत नाही ह्या ? पालन करू शकता येणा-या. 


Sunrise captured at FTC Campus Sangola. Solapur district.

गेल्या २ - ३ वर्षांपासून मी प्रयत्न करतोय. दरवर्षी संकल्प पालना्च्या दिवसांमध्ये थोडी थोडी वाढ्ही होतेय. या वर्षी वर्षभर पालन करण्याचा संकल्प आहे. माझ्या सर्व मित्र मंडळींनीही हा प्रयोग करून पहायला हरकत नाही.

या वर्षी माझ्या ब्लॉगच्या नावाला जागत जास्तीत जास्त ब्लॉग्ज हे रेल्वे आणि बसेसच्या छंदांवर लिहायचे हा सुद्धा एक संकल्प केलाय. रेल्वे आणि बस या माझ्या लाडक्या छंदासाठी गेल्या अनेक वर्षांमध्ये पुरेसा वेळ देता आलेला नाही याची खंतही मनात आहे. यावर्षी ही खंत दूर करण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करण्याचाही माझा संकल्प आहे.

मग "तथास्तू" म्हणायला तुम्ही सगळे आहात ना माझ्याबरोबर ?



Saturday, January 4, 2020

विद्यार्थी तुर्क शिक्षक अर्क : एक अनुभव.

१९९२ जानेवारी.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड. विद्युत अभियांत्रिकी विभागाची इमारत. (व्हाईट हाऊस या नावाने ही इमारत ओळखली जायची.)
निमित्तःभावगीत स्पर्धा.
(आमच्या महाविद्यालयात भावगीत स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, उस्फूर्त वक्तृत्व स्पर्धा वर्षभर मोठ्या संख्येने होत असत. त्याला सहभाग आणि श्रोत्यांचा प्रतिसादही उत्तम लाभत असे. एकंदर आमच्या पिंडांच्या सांस्कृतिक जडणघडणीसाठी, वाढीसाठी पोषक वातावरण होते.)

भावगीत स्पर्धेत प्रेक्षक श्रोते म्हणून आम्हा मित्रमंडळींचा गट एकत्र बसलेला होता. सगळ्यांचेच कान चांगले तयार असल्याने वर्ज्य स्वराचा अंदाज वगैरे गोष्टी लक्षात यायच्यात. एकमेकांशी व्हेवलेंग्थ अगदी उत्तम असल्याने नुसत्या कटाक्षानेच संवादाची, हशा पिकवण्याची मजा आमच्या संपूर्ण मित्रमंडळाला येत असे. आडातच नसताना पोहर्‍यात खोटी गायकी दाखवण्याच्या प्रयत्नांची आम्ही सगळे येथेच्छ टिंगलटवाळीही करत असू.



तसे त्यादिवशीही आम्ही चांगल्या गाण्यांचा आनंद घ्यायला आणि बेसूर गाण्यांना पाडायला बसलेलो होतो. आमच्या शेजारीच महाविद्यालयाचे, विद्युत विभागातले ज्येष्ठ व अतिशय विद्यार्थीप्रिय प्राध्यापक येऊन बसलेले होते. विद्यार्थीवर्ग खाली मांडी घालून आणि प्राध्यापकवर्ग खुर्च्यांवर अशी एकंदर बैठकव्यवस्था.
सकाळी ९ च्या सुमारास कार्यक्रम सुरू झाला. सुरूवातीला एक मुलगी (आमच्या मैत्रिणींपैकीच) आली आणि तिने पं. हृदयनाथांनी लतादीदींच्या आवाजात संगीतबध्द केलेले "ये रे घना" नीट म्हटले.
मधे एकदोन मुलांची गाणी झालीत पुन्हा एक मुलगी आली आणि तिने पुन्हा "ये रे घना"च म्हटले.
मध्ये पुन्हा दोन तीन मुलांची गाणी झालीत आणि तिसर्‍या मुलीने पुन्हा "ये रे घना" सुरू केल्यावर...
"अरे, आज लेडीज हाॅस्टेलच्या टाकीत पाणी सोडले नाही का रे ?" अशी जोरात पृच्छा ऐकू आली. आम्ही चमकून पाहिले तर ते प्राध्यापक कुणातरी शिक्षकेतर कर्मचार्‍याला विचारत होते. आम्हाला कळेना.
मग हळूच आमच्याकडे वळून सर म्हणालेत, "अरे बहुतेक लेडीज हाॅस्टेलला आज पाणीच आल नाही म्हणून या सगळ्याजणी 'घना' कडून न्हायला आल्यात"
ज्या ज्या विद्यार्थ्यांनी ही काॅमेंट ऐकली ते सगळे विद्यार्थी सरांसोबत हास्यकल्लोळात बुडून गेलेत. आपल्या वरताण आपले शिक्षक आहेत ही जाणीव आम्हाला सुखावणारी होती.


त्या गाणार्‍या विद्यार्थिनीला काहीच न कळून, तिला मात्र विद्यार्थ्यांच्या त्या कोपर्‍यात बसलेल्या गटाचा आणि हसणार्‍या सरांचाही खूप राग आला असणार. तिचा चेहेराच तसे भाव प्रकट करीत होता.

Friday, January 3, 2020

निरोपक्षण: एका कवितेची गोष्ट

कराडला असताना कराडचे चिमुकले स्टेशन हे माझ्यासारख्या रेल्वेवेड्यासाठी विरंगुळ्याचे ठिकाण नसले तरच नवल होते. सुट्टीच्या दिवशी, परीक्षे आधीच्या अभ्यासाच्या सुट्टीत (Preparation Leave) मध्ये मी आपली अभ्यासाची पुस्तके पाठीशी बांधून, हॉस्टेलमधल्या एखाद्या मित्राची सायकल घेऊन कराड स्टेशनची वाट धरीत असे. कराड स्टेशनच्या सातारा बाजूच्या आऊटर सिग्नलला खाली एक छान चौथरा होता. तिथे मी माझे अभ्यासाचे बस्तान बसवीत असे. आजुबाजूला अजिबात लोकवस्ती नव्हती. नुसती उसाची शेते. मी चक्क पुस्तकेच्या पुस्तके घडाघडा वाचीत असे. बालपणापासून अशीच अभ्यासाची, पाठांतराची सवय होती. हॉस्टेलला असे घडाघडा पाठांतर इतरांच्या अभ्यासात अडथळा आणणारे नक्की असणार हे मी जाणून होतो.

अशा आडजागी अभ्यासाला बसण्याचा आणखीही एक मोठ्ठा फ़ायदा होता तो म्हणजे येणा-या जाणा-या गाड्यांच्या वेळेवर स्टेशनवर जाऊन ती गाडी बघता यायची, नोंदी घ्यायच्या यायच्या. (अशाच एका नोंदीची कथा या ब्लॉगमध्ये आलेली आहे.)

त्या काळी कराड हे एक चिमुकले स्टेशन होते.पु.लं. च्या "काही अप्स काही डाऊन्स" मध्ये वर्णन केल्याप्रमाणेच. दिवसा फ़क्त तीनच प्रवासी गाड्या जाणा-या, तीन येणा-या. मिरज - पुणे पॅसेंजर, कोल्हापूर - मुंबई कोयना एक्सप्रेस, नागपूर- कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस, कोल्हापूर - नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेस, मुंबई - कोल्हापूर कोयना एक्सप्रेस आणि पुणे - कोल्हापूर पॅसेंजर. बस्स. मालगाड्यांची वाहतूकही तुरळकच असायची.




सकाळी ८ वाजता मिरज - पुणे पॅसेंजरच्या वेळेला मी स्टेशनवर जात असे. पॅसेंजर पुण्याकडे गेली की स्टेशन्समोरच असलेल्या छोट्याशा हॉटेलमधे नाश्ता करून मी अभ्यासाला बसत असे. दुपारी ११ च्या सुमाराला कराड स्टेशनवर कोल्हापूरकडे जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस आणि मुंबईकडे जाणारी कोयना एक्सप्रेस यांचे क्रॉसिंग होत असे. त्यावेळी पुन्हा प्लॅटफ़ॉर्मवर जाऊन गाड्या बघून पुन्हा काहीतरी पोटात ढकलून मग मी थेट संध्याकाळी ४ पर्यंत अभ्यासात गर्क होत असे. मग नागपूरला जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस बघून घेऊन चहा वगैरे पिऊन मी परतीची वाट धरीत असे. तोपर्यंत अभ्यासही छान झालेला असायचा. माझ्या अभियांत्रिकीच्या अभ्यासाशी रेल्वे अशी अविभाज्यपणे जोडल्या गेलेली आहे.

असाच एक दिवस. मिरज - पुणे पॅसेंजर कराडच्या फ़लाटावर आलेली होती. उतरणारे प्रवासी एखाददुसरेच. चढणारे पण हातांच्या बोटांवर मोजण्याइतकेच. मला कुठेच जायचे नसल्याने मी आपला निवांत एका बाकड्यावर बसून गाडी बघत होतो. 



गाडी सुटण्याची तयारी पूर्ण झालेली होती. इतक्यात एक मुलगा आणि एक मुलगी धावतपळतच फ़लाटावर आलेत. गाडी सुटलेली नाही हे पाहून उसासा टाकण्याचीही उसंत न घेता ती मुलगी गाडीच्या एका ड्ब्यात बसली. दोघांनीही क्षणभरच का होईना, हातात हात धरले होते आणि गाडी हलली.

गाडीने पुरेसा वेग घेईपर्यंत तो मुलगा त्या मुलीचा हात हातात घेऊन फ़लाटावर चालत होता. शेवटी वाढत्या वेगाने त्यांची ताटातूट केलीच. हातातून हात सुटले. मग गाडी दिसेनाशी होईपर्यंत तो मुलगा तिकडे बघत हात हलवीत होता. मुलीचाही हात गाडीतून असाच हलत असणार. जड पावलांनी तो मुलगा परतला. एकमेकांशी बरेच बोलायचे होते पण "गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्रांचे देणे" अशीच त्या दोघांचीही अवस्था मला बसल्या बसल्या भारावून टाकणारी, स्तब्ध करणारी होती.

त्या दोघांचे नक्की नाते काय होते ? याची आत्ता २७ - २८ वर्षांनंतरही मला कल्पना नाही. प्रियकर - प्रेयसी असतील, कदाचित खूप छान मित्र असलेले भाऊ - बहीण ही असतील. पण त्या घटनेने एका चांगल्या कवितेला जन्म दिला. ही माझी मी केलेली एक अत्यंत आवडती कविता आहे.

निरोपक्षण

निरोपक्षणी शब्द मुके, ओल्या काजळकडा
वसंतबहरात सुना, माझ्या बकुळीचा तो सडा.

काही देणे काही घेणे, राहूनच गेले तसे
क्षमेचे याचनेचे भान त्या हलत्या हातास नसे.

भावनालाटेवर स्वार, गहिवर आणि उमाळा
चित्र सारे धूसर दिसते, भरून आला डोळा.

अलविदाच्या अश्रूंत कृतज्ञता गोठलेली
संदर्भ पुसता सारे, घटना मनी कोरलेली.

                                                   - राम प्रकाश किन्हीकर