Showing posts with label New Year. Show all posts
Showing posts with label New Year. Show all posts

Friday, January 1, 2021

नववर्ष आणि कॅलेंडर्स.

 एकेकाळी नववर्षाची चाहूल लागली की कॅलेंडर्सची धूम सुरू व्हायची. मुख्य जोर असायचा तो नेहेमी संबंध येणा-या किराणा दुकानदार, टेलर्स आणि स्टेशनरी दुकानदारांवर. ही मंडळीही आपल्या प्रतिष्ठानाचे नाव खाली असलेली आणि वर देव देवतांची किंवा इतर देखाव्यांची छान चित्रे असलेली कॅलेंडर्स छापून घ्यायचीत. गुळगुळीत कागदांवर छापलेली छान छान चित्रे हे मुख्य आकर्षण असायचे. ज्या दुकानदारांची चित्रे अगदी सुस्पष्ट आणि सुंदर कागदांवर असायची त्यांची अभिरूची उच्च समजली जाई आणि त्यांच्याकडे पुढील वर्षभरासाठी गि-हाईकांची आत्मीयता वाढती राही. न मागता त्या दुकानाचे असे छान कॅलेंडर हक्काने मिळणे हा नेहेमीच्या गि-हाईकाच्या अस्मितेचा मामला असायचा.


त्याकाळी घरोघरी समोरच्या खोलीला (तिला "दिवाणखाना" वगैरे म्हणणे त्याकाळी फ़ारसे प्रचलित नव्हते. फ़ारतर "बैठकीची खोली" असे नामाभिधान प्राप्त होत असे.) खूप सा-या खुंट्यांवर आणि खिळ्यांवर छान छान कॅलेंडर्स लटकलेली असणे हे अगदी सर्वसामान्य दृश्य असायचे. त्यातल्या त्यात शहरातल्या एखाद्या प्रतिष्ठित दुकानाचे कॅलेंडर लटकलेले दिसणे म्हणजे त्या घरातल्या मंडळींचा अगदी मानबिंदू असे. मग ते कॅलेंडर आपल्याला मिळवून देण्याची गळ एखादी जवळची पाहुणे मंडळी घालीत असत आणि ती मागणी ब-याचदा पूर्णही होत असे.


वर्ष संपले की त्यातल्या काही छान फ़ोटोंची फ़्रेम करायला टाकली जायची. बहुधा शंकरजींच्या ध्यानस्थ मुद्रेतला, बाळवेषातील लोभसवाण्या दत्तद्गुरूंचा फ़ोटो अशा कॅलेंडर मधूनच फ़्रेम केला गेलेला असे. ही कॅलेंडर बनविणारी मंडळीही त्यात त्या कलाकाराचे किंवा प्रतिष्ठानाचे नाव अगदी अशा जागी टाकीत असत की फ़्रेम करताना ते नाव कापून पूर्ण चित्राची फ़्रेम बनविणे अशक्यच. मी बघितलेला खोडता न येणारा हा पहिला कॉपीराईट. त्यामुळे त्याकाळी ब-याच देवघरांमध्ये प्रभू रामचंद्रांच्या पायापाशी "केशव टेलर्स" बसलेले दिसायचे, दत्तगुरूंच्या त्रिशूळाच्या टोकाशी "मेसर्स गोविंद दिनकर गोखले ऍण्ड सन्स" चे अस्तित्व अभिन्नपणे जाणवायचे. अर्थात त्याकडे लक्ष आम्हासारख्या अति चिकित्सक मंडळींचेच जायचे. त्या घरच्या कुटुंबप्रमुखाला आणि इतर नित्य उपासकांना त्यात त्या त्या उपास्य देवतेच्या पलिकडे काही दिसत नसे.


हळूहळू समोरच्या खोलीचा "दिवाणखाना" नंतर "ड्रॉईंग रूम" आणि आताशा 2 BHK मधला "हॉल" झाला आणि समोरच्या खोलीत खुंट्या, खिळे वगैरे असणे मागासलेपणाचे समजले जायला लागले. घरात एकुलते एक असे "भविष्य मेन्यु आरोग्य ज्ञान, उपयुक्त साहित्य प्रत्येक पान" असलेले कालनिर्णय समोरच्या खोलीत न असता स्वयंपाकघरात विराजमान व्हायला लागले. पण हळूहळू टीव्हीवर रोजचे भगरे गुरूजींचे भविष्य, यूट्यूबवर विविध मेन्यू, व्हॉटसऍप नामक उच्छादावर रोज आरोग्याविषयीची उलटसुलट माहिती आणि मोबाईलवरच असलेले रोजचे पंचांग त्यामुळे कालनिर्णयचीही उपयुक्तता कमी व्हायला लागली. तरीही गतकाळाच्या जिव्हाळ्यामुळे किमान मराठी घरांमध्ये तरी कालनिर्णय आपले स्थान टिकवून आहे.


विजय अण्णाच्या किंगफ़िशरच्या कॅलेंडर्सविषयी आम्ही फ़क्ते ऐकले आहे. आमच्या परिचयाच्या कुणाकडेही हे कॅलेंडर असलेले आम्ही बघितले नाही. आणि घरी नुसते किंगफ़िशर कॅलेंडरचे नाव जरी काढले असते तरी "वात्रट कारट्या" म्हणून कानाखाली जाळ निघाला असता असे कर्मठ वातावरण. आता अण्णाही इंग्लंडला परागंदा झाल्यामुळे त्याचे कॅलेंडर बंद पडल्याचे ऐकले आहे. अर्थात त्या कॅलेंडरचे कधीही दर्शन न झाल्याने आणि विजय अण्णाला आजवर कशाही प्रसंगी एकही रूपया न दिल्यामुळे त्याच्याशी आपले कसलेही सोयरसुतूक नाही ही भावना पक्की आहे.


गतवर्षी आमच्या एस. टी. फ़ॅन्स ग्रूपचे अधिवेशन झाले आणि त्यात खूप अभिनव कल्पनेचे एस. टी. चे कॅलेंडर आम्हा सर्व सहभागींना मिळाले. वर्षभर ते कॅलेंडर मोठ्या अभिमानाने आमच्या दिवाणखान्याची शोभा वाढवित होते. 





आमच्या बालपणी "कॅलेंडर छापणे" हा वाक्प्रचार घरात नव्या बाळाच्या आगमनाची तयारी करणे या थोड्या वेगळ्या अर्थाने वापरला जाई. "अरे त्याच्या घरी काय ? दर दोन वर्षांनी नवीन कॅलेंडर." म्हणजे त्या एखाद्याच्या घरी दर दोन वर्षांनी पाळणा हलतो या अर्थाचे वाक्य असे. किती गंमत नाही ! हल्ली हा वाक्प्रचार कुणी फ़ारसा वापरताना दिसत नाही. अहो, बरोबर आहे. एक किंवा दोन कॅलेंडर्सपेक्षा (दोन्ही अर्थाने) घरात जास्त कॅलेंडर्स ठेवणे हे मागसलेपणाचे लक्षण नाही का ? हल्ली एकही कॅलेंडर्स न ठेवण्याची पद्धतही खूप प्रचलित होतेय असे ऐकतोय. पुढील काळाचे भान, जाण आणि विचार नसल्यावर कॅलेंडर्स नकोशी वाटणारच, त्यात नवल नाही.

 

असो, वर्षे बदललीत, कॅलेंडर्स बदलत गेलीत, कॅलेंडर्सची एकूण संस्कृती बदलत गेली. बदलली नाही ती नववर्षात मागील सर्व गोष्टींवर बोळा फ़िरवून नव्या जोमाने सुरूवात करण्याची मनुष्यमात्रांची विजिगिषू वृत्ती.


- १९७२ चे कॅलेंडर, कुमार राम प्रकाश किन्हीकर.


Sunday, January 5, 2020

१ जानेवारी : एक संकल्प दिवस.

नववर्षाचा पहिला दिवस हा खरेतर "जागतिक संकल्प दिवस" म्हणून जाहीर केला पाहिजे असे मला कायम वाटत आलेले आहे. (पण मग दुसरा दिवस हा "जागतिक संकल्प विसर्जन दिवस म्हणून जाहीर करावा लागतो की काय ? अशीही भीती आहे.) या दिवशी नववर्षाच्या उत्साहात बहुतांशी मंडळी वर्षभरासाठीचा काही ना काही संकल्प घेतात. तो एक दिवस, एक आठवडा, तीन महिने, सहा महिने टिकतो. काहीकाही निष्ठावान मंडळी तर हा संकल्प खरोखर वर्षभर टिकवतातही.



Wonderful morning captured during morning walk at NMIMS  in Shirpur Campus.

संकल्प किती दिवस टिकला या घटनेला महत्व नाही. मला मौज वाटते ती माणसांच्या पुन्हा पुन्हा हारूनही परिस्थितीवर मात करण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला. "गेल्या वर्षीचा संकल्प २ जानेवारीलाच मोडला पण या वर्षी किमान आठवडाभर तरी आपण तो टिकवून दाखवला. पुढल्या वर्षी महिनाभर टिकवू" किंवा " १ जानेवारीचा संकल्प लवकर मोडला. हरकत नाही. युवा दिवसाचा १२ जानेवारी) मुहूर्त आहे, तो हुकलाच तर गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे, तेव्हा सुरूवात करूयात." ही वृत्ती माणसांच्या जिगीषेला अक्षय्य मदत करीत असावी. माणसाच्या मनाला नित्यनूतन ठेवणारी आशा देणारा दिवस म्हणूनही नववर्ष आणि त्याचे संकल्प याचे महत्व मला वाटते. जुने मार्ग चुकले म्हणून एका जागी थकून न बसता चुकांपासून शिकून नवे मार्ग चोखाळण्याच्या वृत्तीलाच कदाचित परिपक्वता म्हणत असावेत.


Fresh morning at Pench dam.

मी माझ्या गेल्या काही वर्षायल्या नववर्ष संकल्पांची यादी पाहिली आणि माझे मलाच आश्चर्य वाटले. 
१. दररोज डायरी लिहीणे
२. दररोजचा खर्च लिहून काढणे व हिशेब ठेवणे.
३. दररोज व्यायाम करणे व शरीरसंपदा कमावणे

हे माझे शालेय व महाविद्यालयीन दशेतले संकल्प होते. गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर त्या संकल्पांमध्ये बदल झाला. उदाहरणार्थ "दररोज व्यायाम करून शरीरसंपदा कमावणे" या ऐवजी "दररोज फ़िरायला जाऊन वजन घटवणे" हा एक संकल्प दरवर्षी येत गेला. मी नियमिततेचा, शिस्तीचा खूप भोक्ता असल्याने दररोजच्या वेळापत्रकाची (झोपणे, उठणे, अंघोळ, अभ्यासादि कर्मे) नियमितता आणि काटेकोरपणा पाळणे हा एक संकल्प दरवर्षी असतोच. आजकाल काही वर्षात नियमितपणे ब्लॉग्ज लिहीणे हा सुद्धा संकल्प त्यात सामील झालाय.

विद्यार्थी दशेत नियमितता आणि शिस्त यांचे काटेकोर पालन असल्याने डायरी जवळपास ९ वर्षे नियमितपणे आणि रोज लिहील्या गेली. रोजचे खर्च ही महाविेद्यालयीन हॉस्टेल जीवनात ४ वर्षे नियमितपणे लिहीत होतो. पण सांसारिक जीवनात तुम्ही तुमचे एकट्याचे नसता. सडाफ़टिंग नसता. तुमच्या जोडीदारासोबत, अपत्यांसोबत जीवन आखून घेत, त्यांच्याही वेळापत्रकाचा विचार करीत आपले वेळापत्रक ठरते. मग तेव्हढा काटेकोरपणा अंमलात आणणे अवघड होऊन बसते.

गेल्या २ - ३ वर्षांपासून मी करीत असलेला आणि पूर्णपणे अंमलात न आलेला एक संकल्प आहे. "नेहमी प्रसन्न बुद्धी कशी ठेवावी" यावर हार्वर्ड विद्यापीठात Shaun Achor नावाच्या तरूणाचे एक संशोधन वाचनात आले. कुठल्याही शारिरीक आणि मानसीक समस्येवर मात करण्यासाठी प्रसन्न बुद्धी अत्यंत आवश्यक आहे असा निष्कर्ष त्याने त्याच्या मोठ्ठ्या संशोधनाअंती काढला. "मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धींचे ते कारण" हे तुकोबा माऊली ने ४०० वर्षांपूर्वीच त्यांच्या लोकसंग्रहातून आणि निरीक्षणांमधून सांगून ठेवलेले होते ते आठवले. बर हा Shaun Achor नुसते निदान करून भागत नाही तर मन प्रसन्न करण्याच्या छोट्या छोट्या शारिरीक आणि मानसिक कवायतीही सांगतो.

a)  तुम्हाला कृतज्ञता वाटली अशा ३ गोष्टी त्याने रोज लिहून काढा. (भलेही ती डायरी, तो कागद तुम्ही कुणाला दाखवू नका. ही कसरत तुम्हाला तुमच्या प्रसन्न मनासाठी करायची आहे हे लक्षात असू द्यात.) 
b) तुमच्या परिवारासाठी , मित्रमंडळींसाठी त्यांना काहीतरी छान वाटेल असा एखादा संदेश रोज द्या.
c)  किमान १० मिनीटे तरी व्यायाम करा. (हा व्यायाम आपल्या सकारात्मक मनोवृत्तीसाठी, प्रसन्न बुद्धीसाठी बर का ? शरीरासाठी डॉक्टर मंडळी सांगतात तसा किमान ४५ मिनीटे, आठवड्यातून किमान ५ दिवस करण्याचा व्यायाम निराळा.)
d) तुमच्या कार्यालयीन वेळेत मध्येच वेळ काढून फ़क्त २ मिनीटांसाठी ध्यान करा / श्वासावर लक्ष केंद्रीत करा.
e) झोपण्यापूर्वी दिवसभराच्या घटनांचे चिंतन करून त्यात घडलेल्या एखाद्या महत्वपूर्ण घटनेवर तुमच्या डायरीत दोन मिनीटांमध्ये लेखन करा.

किती सोप्या आणि छान कवायती आहेत नाही ह्या ? पालन करू शकता येणा-या. 


Sunrise captured at FTC Campus Sangola. Solapur district.

गेल्या २ - ३ वर्षांपासून मी प्रयत्न करतोय. दरवर्षी संकल्प पालना्च्या दिवसांमध्ये थोडी थोडी वाढ्ही होतेय. या वर्षी वर्षभर पालन करण्याचा संकल्प आहे. माझ्या सर्व मित्र मंडळींनीही हा प्रयोग करून पहायला हरकत नाही.

या वर्षी माझ्या ब्लॉगच्या नावाला जागत जास्तीत जास्त ब्लॉग्ज हे रेल्वे आणि बसेसच्या छंदांवर लिहायचे हा सुद्धा एक संकल्प केलाय. रेल्वे आणि बस या माझ्या लाडक्या छंदासाठी गेल्या अनेक वर्षांमध्ये पुरेसा वेळ देता आलेला नाही याची खंतही मनात आहे. यावर्षी ही खंत दूर करण्यासाठी मुद्दाम प्रयत्न करण्याचाही माझा संकल्प आहे.

मग "तथास्तू" म्हणायला तुम्ही सगळे आहात ना माझ्याबरोबर ?



Saturday, March 21, 2015

हिशेब गतवर्षीचा

नववर्षाच्या पूर्वसंध्येला काय काय कमावलं ? काय काय गमावलं ? याचा सहज हिशेब आज महाविद्यालयातून घरी परतताना करत होतो. (गाडीच्या प्रवासात मी माझा अगदी एकटा असतो त्यामुळे तुकोबांच्या उक्तीनुसार "आपुलाची (सं)वाद, आपणासी" अशी नेहेमी अवस्था होत असते. अनेक चांगल्या कल्पना, जीवनाविषयी विचार अशा छान एकांतातच आकाराला येतात.)

१. या संवत्सरात गमावलेल्या गोष्टींपेक्षा कमावलेल्या गोष्टींची यादी मोठी आहे.

२. गेल्या दोन तीन वर्षांपासून जीवनाला अगदी थेट भिडल्यामुळे जीवन नावाचा शिक्षक त्याचे धडे देतो आहे.

३. सगळेच धडे सुखद असतातच असे नाही पण त्यांना वैतागण्यापेक्षा त्यांनी काय शिकवलय हे यावर्षी बघायला शिकलो.

४. थोडा अलिप्तपणा धरून आपल्याच जीवनाकडे बघायला शिकलोय. (हा प्रवास साधारण २००९ च्या आसपास श्री. विवेकजी घळसासींच्या प्रवचनांनंतर सुरू झालाय तो आता फ़लदायक मुक्कामावर येतोय. हे मला वाटतं की एका चांगल्या प्रवचनकाराच, निरूपणकाराच खरं यश आहे. अंतरंगात बदल घडवता येणे हीच मोठी सिद्धी आहे. आणि त्यादृष्टीने विवेकजी सिद्धीप्राप्त आहेत.)

५. भौतिकदृष्ट्या वर्ष समाप्तीच्या आसपास एक समाधानाची जाणीव आहे. आपण वर्षांनुवर्षे जोपासलेल्या आणि वृद्धींगत करत आलेल्या गुणसमुच्चय्याची चांगली दखल कुठेतरी घेतली जातेय, आपला प्रामाणिकपणा हा एक अवगुण म्हणून न बघितला जाता त्याची किंमत होतेय, आपल्या आपापल्या कार्याप्रतीच्या निष्ठा या वेडेपणा म्हणून हिणवल्या जात नाहीत या सगळ्या गोष्टी खरोखर भौतिकदृष्ट्या सुखावणा-याच.

पुढील मन्मथनाम संवत्सरही मला आणि माझ्या सर्व मित्र, आप्तेष्टांना असेच सुखाचे, समाधानाचे आणि अभिवृद्धीचे जावो ही सदगुरूंकडे प्रार्थना आणि शुभेच्छा. (पहिल्यांदा मी मलाच शुभेच्छा दिल्यात कारण "अपना खुदका नाम लेकर कभी कभी खुदकोभी आवाज दे देनी चाहिये भाई.")