Friday, January 1, 2021

नववर्ष आणि कॅलेंडर्स.

 एकेकाळी नववर्षाची चाहूल लागली की कॅलेंडर्सची धूम सुरू व्हायची. मुख्य जोर असायचा तो नेहेमी संबंध येणा-या किराणा दुकानदार, टेलर्स आणि स्टेशनरी दुकानदारांवर. ही मंडळीही आपल्या प्रतिष्ठानाचे नाव खाली असलेली आणि वर देव देवतांची किंवा इतर देखाव्यांची छान चित्रे असलेली कॅलेंडर्स छापून घ्यायचीत. गुळगुळीत कागदांवर छापलेली छान छान चित्रे हे मुख्य आकर्षण असायचे. ज्या दुकानदारांची चित्रे अगदी सुस्पष्ट आणि सुंदर कागदांवर असायची त्यांची अभिरूची उच्च समजली जाई आणि त्यांच्याकडे पुढील वर्षभरासाठी गि-हाईकांची आत्मीयता वाढती राही. न मागता त्या दुकानाचे असे छान कॅलेंडर हक्काने मिळणे हा नेहेमीच्या गि-हाईकाच्या अस्मितेचा मामला असायचा.


त्याकाळी घरोघरी समोरच्या खोलीला (तिला "दिवाणखाना" वगैरे म्हणणे त्याकाळी फ़ारसे प्रचलित नव्हते. फ़ारतर "बैठकीची खोली" असे नामाभिधान प्राप्त होत असे.) खूप सा-या खुंट्यांवर आणि खिळ्यांवर छान छान कॅलेंडर्स लटकलेली असणे हे अगदी सर्वसामान्य दृश्य असायचे. त्यातल्या त्यात शहरातल्या एखाद्या प्रतिष्ठित दुकानाचे कॅलेंडर लटकलेले दिसणे म्हणजे त्या घरातल्या मंडळींचा अगदी मानबिंदू असे. मग ते कॅलेंडर आपल्याला मिळवून देण्याची गळ एखादी जवळची पाहुणे मंडळी घालीत असत आणि ती मागणी ब-याचदा पूर्णही होत असे.


वर्ष संपले की त्यातल्या काही छान फ़ोटोंची फ़्रेम करायला टाकली जायची. बहुधा शंकरजींच्या ध्यानस्थ मुद्रेतला, बाळवेषातील लोभसवाण्या दत्तद्गुरूंचा फ़ोटो अशा कॅलेंडर मधूनच फ़्रेम केला गेलेला असे. ही कॅलेंडर बनविणारी मंडळीही त्यात त्या कलाकाराचे किंवा प्रतिष्ठानाचे नाव अगदी अशा जागी टाकीत असत की फ़्रेम करताना ते नाव कापून पूर्ण चित्राची फ़्रेम बनविणे अशक्यच. मी बघितलेला खोडता न येणारा हा पहिला कॉपीराईट. त्यामुळे त्याकाळी ब-याच देवघरांमध्ये प्रभू रामचंद्रांच्या पायापाशी "केशव टेलर्स" बसलेले दिसायचे, दत्तगुरूंच्या त्रिशूळाच्या टोकाशी "मेसर्स गोविंद दिनकर गोखले ऍण्ड सन्स" चे अस्तित्व अभिन्नपणे जाणवायचे. अर्थात त्याकडे लक्ष आम्हासारख्या अति चिकित्सक मंडळींचेच जायचे. त्या घरच्या कुटुंबप्रमुखाला आणि इतर नित्य उपासकांना त्यात त्या त्या उपास्य देवतेच्या पलिकडे काही दिसत नसे.


हळूहळू समोरच्या खोलीचा "दिवाणखाना" नंतर "ड्रॉईंग रूम" आणि आताशा 2 BHK मधला "हॉल" झाला आणि समोरच्या खोलीत खुंट्या, खिळे वगैरे असणे मागासलेपणाचे समजले जायला लागले. घरात एकुलते एक असे "भविष्य मेन्यु आरोग्य ज्ञान, उपयुक्त साहित्य प्रत्येक पान" असलेले कालनिर्णय समोरच्या खोलीत न असता स्वयंपाकघरात विराजमान व्हायला लागले. पण हळूहळू टीव्हीवर रोजचे भगरे गुरूजींचे भविष्य, यूट्यूबवर विविध मेन्यू, व्हॉटसऍप नामक उच्छादावर रोज आरोग्याविषयीची उलटसुलट माहिती आणि मोबाईलवरच असलेले रोजचे पंचांग त्यामुळे कालनिर्णयचीही उपयुक्तता कमी व्हायला लागली. तरीही गतकाळाच्या जिव्हाळ्यामुळे किमान मराठी घरांमध्ये तरी कालनिर्णय आपले स्थान टिकवून आहे.


विजय अण्णाच्या किंगफ़िशरच्या कॅलेंडर्सविषयी आम्ही फ़क्ते ऐकले आहे. आमच्या परिचयाच्या कुणाकडेही हे कॅलेंडर असलेले आम्ही बघितले नाही. आणि घरी नुसते किंगफ़िशर कॅलेंडरचे नाव जरी काढले असते तरी "वात्रट कारट्या" म्हणून कानाखाली जाळ निघाला असता असे कर्मठ वातावरण. आता अण्णाही इंग्लंडला परागंदा झाल्यामुळे त्याचे कॅलेंडर बंद पडल्याचे ऐकले आहे. अर्थात त्या कॅलेंडरचे कधीही दर्शन न झाल्याने आणि विजय अण्णाला आजवर कशाही प्रसंगी एकही रूपया न दिल्यामुळे त्याच्याशी आपले कसलेही सोयरसुतूक नाही ही भावना पक्की आहे.


गतवर्षी आमच्या एस. टी. फ़ॅन्स ग्रूपचे अधिवेशन झाले आणि त्यात खूप अभिनव कल्पनेचे एस. टी. चे कॅलेंडर आम्हा सर्व सहभागींना मिळाले. वर्षभर ते कॅलेंडर मोठ्या अभिमानाने आमच्या दिवाणखान्याची शोभा वाढवित होते. 





आमच्या बालपणी "कॅलेंडर छापणे" हा वाक्प्रचार घरात नव्या बाळाच्या आगमनाची तयारी करणे या थोड्या वेगळ्या अर्थाने वापरला जाई. "अरे त्याच्या घरी काय ? दर दोन वर्षांनी नवीन कॅलेंडर." म्हणजे त्या एखाद्याच्या घरी दर दोन वर्षांनी पाळणा हलतो या अर्थाचे वाक्य असे. किती गंमत नाही ! हल्ली हा वाक्प्रचार कुणी फ़ारसा वापरताना दिसत नाही. अहो, बरोबर आहे. एक किंवा दोन कॅलेंडर्सपेक्षा (दोन्ही अर्थाने) घरात जास्त कॅलेंडर्स ठेवणे हे मागसलेपणाचे लक्षण नाही का ? हल्ली एकही कॅलेंडर्स न ठेवण्याची पद्धतही खूप प्रचलित होतेय असे ऐकतोय. पुढील काळाचे भान, जाण आणि विचार नसल्यावर कॅलेंडर्स नकोशी वाटणारच, त्यात नवल नाही.

 

असो, वर्षे बदललीत, कॅलेंडर्स बदलत गेलीत, कॅलेंडर्सची एकूण संस्कृती बदलत गेली. बदलली नाही ती नववर्षात मागील सर्व गोष्टींवर बोळा फ़िरवून नव्या जोमाने सुरूवात करण्याची मनुष्यमात्रांची विजिगिषू वृत्ती.


- १९७२ चे कॅलेंडर, कुमार राम प्रकाश किन्हीकर.


2 comments: