Wednesday, February 13, 2019

लोकसभा निवडणूक अंदाज २०१९ : महाराष्ट्र - २ (मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र)

या पूर्वील अंदाज इथे बघा : लोकसभा निवडणूक अंदाज २०१९ : महाराष्ट्र - १ (खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा)

विदर्भ आणि खान्देश या भाजपला कायम साथ देणा-या प्रांतांनंतर आपण आज वळूयात मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र या दोन प्रांतांच्या मूडकडे.



१५. हिंगोली :

हिंगोली मतदारसंघात २०१४ मध्ये कॉंग्रेसचे राजीव सातव फ़क्त दीड हजाराच्या मताने निवडून आले होते. "नोटा" ला जवळपास ३००० मते मिळाली होती हे लक्षणीय. मुंबई, कोकणानंतर शिवसेनेनी मराठवाड्यात आपला मतदार तयार केला होता. त्यामुळे हिंगोली लोकसभा युतीतर्फ़े शिवसेनेने लढवली होती. सुभाषराव वानखेडेंना हा चुटपुटता पराभव खूपच झोंबला असेल. यंदा मोठी गमतीची परिस्थिती आहे. युती नाही त्यामुळे भाजपची मते शिवसेनेकडे वळणार नाहीत. पण यंदा सातव ही लढायला इच्छुक नाहीत असे ऐकीवात आहे. भाजपने इथे चांगला उमेदवार दिला तर भाजपची सरशी इथे होऊ शकते. मराठा आरक्षण दिल्याचा सगळ्यात जास्त फ़ायदा भाजपला मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्रात होईल असे माझे आकलन आहे. यंदा इथला मतदार भाकर फ़िरवणार आणि देशाच्या कलाप्रमाणे भाजपला मतदान करणार.

माझे भाकित हिंगोली : भाजप.

१६. नांदेड :

२०१४ मधे नांदेड लोकसभा मतदासंघात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण जवळपास ८०,००० च्या मताधिक्याने निवडून आले होते. भाजपच्या डी. बी. पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या इतर निवडणुकांमधेही एखाद दोन अपवाद वगळता अशोकरावांनी आपला आणि कॉंग्रेसचा वरचष्मा नांदेड जिल्ह्यात कायम ठेवलाय. त्यामुळे पुन्हा नांदेड कॉंग्रेसच्या ताब्यात जाणार असे वाटतेय. प्रश्न असा आहे की अशोकराव २०१९ ला लोकसभा लढवायला इच्छुक आहेत का ? अशोकरावांऐवजी त्यांच्या पत्नी अमिता यांनी हा मतदारसंघ लढवला तर भाजप टक्कर चांगली देऊ शकेल. पण अंतिमतः कॉंग्रेसच जिंकेल असा अंदाज आहे.

माझे भाकित नांदेड : कॉंग्रेस.

१७. परभणी :

परभणी मतदारसंघातून २०१४ ला सेनेचे संजय जाधव राष्ट्रवादीच्या विजय भांबळेंवर १,२६,०००  च्या मताधिक्याने मात करून निवडून आलेले होते. यंदा युती नाही. भाजपकडे स्वतःचा उमेदवार निवडून आणण्याइतकी ताकद आणि पक्षाचे कॅडर नसले तरी सेनेचा उमेदवार पाडण्याइतके सामर्थ्य नक्कीच आहे. वर्षानुवर्षे मतदासंघ मित्रपक्षाला सुटण्याचे तोटे भाजपला इथे भोगावे लागताहेत. मतदारसंघात दुष्काळ आणि विकासाचा अभाव हे मुख्य मुद्दे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा इथे जोर आहे. त्यामुळे यावर्षी भाजप सेनेच्या पाडापाडीच्या राजकारणात ही जागा राष्ट्रवादी पटकावणार असा अंदाज आहे.

माझे भाकित परभणी : राष्ट्रवादी कॉंग्रेस.

१८. जालना :

जालना हा मतदासंघ भाजपच्या प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचा. आपल्या रांगड्या, परखड शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत. या शैलीचे त्यांना काही तोटे झाले असले तरी मतदारसंघात जनतेला हीच शैली जास्त भावते हे ते ओळखून आहेत. २०१४ ला त्यांनी कॉंग्रेसच्या विलास औताडेंचा दोन लाखावर मतांनी पराभव केला होता. मराठा आरक्षणाचा मुद्दा या मतदारसंघात महत्वाचा ठरेल आणि दानवेंना पुन्हा त्याचा फ़ायदा होईल अशीच चिन्हे आज तरी दिसताहेत.

माझे भाकित जालना : भाजप.

१९. औरंगाबाद :

२०१९ मधे मोठा उलटफ़ेर घडणार असेल तर तो औरंगाबाद मतदारसंघात घडेल असा माझा अंदाज आहे. ब-याच वर्षांपासून हा मतदारसंघ सेनेच्या ताब्यात आहे. सेनेचे चंद्रकांत खैरेंनी आपल्या राजकारणाच्या शैलीने पक्षाबाहेर आणि पक्षातही अनेक विरोधक निर्माण करून ठेवले आहेत आणि ते सगळे २०१९ च्या लोकसभेसाठी दबा धरून वाट बघताहेत. शिवाय गेली अनेक वर्षे औरंगाबाद महापालिकाही सेनेच्या ताब्यात आहे. औरंगाबाद शहराचा जेव्हढा विकास गेल्या दशकात व्हायला हवा होता तेव्हढा झाला नाही ही शहरवासियांची प्रबळ भावना आहे. या सगळ्या नाराजीचा फ़टका खैरे साहेबांना आणि शिवसेनेला बसेल असा अंदाज आहे. पण शिवसेनेवरच्या नाराजीचा फ़टका कॉंग्रेससाठी लाभ ठरेल अशी स्थिती नाही. भाजपने चांगला दमाचा उमेदवार दिला तर औरंगाबाद भाजपकडे येऊ शकते आणि मोठा उलटफ़ेर होऊ शकतो.

माझे भाकित औरंगाबाद : भाजप.

२०. बीड :

२०१४ मध्ये भाजपच्या गोपीनाथ मुंडेंनी राष्ट्रवादीच्या सुरेश धस यांचा १,३६,००० मतांनी पराभव केला होता. हा मुंडेसाहेबांनी बांधलेला मतदारसंघ. इथे भाजपचे संघटन मजबूत आहे. राष्ट्रवादीची ही चांगली ताकद इथे आहे. मुंडेसाहेबांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांच्या कन्येनी हा मतदारसंघ लढवला आणि जिंकला सुद्धा. पंकजाताईंचे या मतदारसंघासाठीचे काम हा मतदारसंघ पुन्हा भाजपच्याच पारड्यात घालेले असा अंदाज आहे.

माझे भाकित बीड : भाजप.

२१. उस्मानाबाद :

२०१४ मध्ये सेनेचे रवींद्र गायकवाड इथून निवडून गेले होते. राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते पदमसिंग पाटील यांचा त्यांनी २,३०,००० मतांनी पराभव केला होता. पण मधल्या काळात गायकवाड साहेब चुकीच्या कारणांमुळे चर्चेत राहिलेत. (एअर इंडियातले चप्पलमार प्रकरण) त्यामानाने मतदारसंघाच्या विकासाकडे दुर्लक्षच झाले. यंदा युती नसल्यामुळे भाजपची मते सेनेच्या विरोधात जाणार आणि पुन्हा राष्ट्रवादी विजयी होणार असा अंदाज आहे. या सीटसाठी पवारसाहेब आपला पूर्ण जोर लावणार हे नक्की. आणि ही जागा ना सेनेला, ना भाजपला जाता शेवटी राष्ट्रवादीलाच जाणार.

माझे भाकित उस्मानाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेस.

२२. लातूर :

लातूरमध्ये २०१४ ला भाजपच्या डॉ. सुनील गायकवाड यांनी कॉंग्रेसच्या दत्तात्रय बनसोडे यांचा २,४०,००० मतांनी पराभव केला होता. एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला गेलेला हा मतदारसंघ २०१४ नंतर मात्र सतत भाजपला साथ देत राहिलाय. विलासराव देशमुखांनंतर कॉंग्रेसमधे त्यांच्या तोडीचा नेता लातूरातून झाला नाही याचा फ़टका कॉंग्रेसला बसतोय. उलट भाजपमधे संभाजीराव निलंगेकरांनी इथे चांगलाच जम बसवलाय. इथे महापालिका, ग्रामपंचायती सगळीकडे भाजपचाच जोर आणि बोलबाला राहिलाय. त्यामुळे २०१९ मध्येही हा मतदारसंघ भाजपकडेच राहिल अशी खात्री आहे.

माझे भाकित लातूर : भाजप.

२३. सोलापूर :

२०१४ ला भाजपच्या शरद बनसोडेंनी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंचा दीड लाख मतांनी पराभव करून मोठ्ठा धक्का दिला होता. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेय पण त्याचा फ़ायदा कॉंग्रेसला किती मिळेल ? हा प्रश्नच आहे. वय लक्षात घेऊन स्वतः शिंदेसाहेब ही निवडणुक लढतील का ? हा ही मोठा प्रश्न आहे. भाजपने आपले अंतर्गत वाद मर्यादेत ठेवलेत तर ही जागा पुन्हा भाजपला मिळू शकेल. कॉंग्रेसचे पक्षसंघटन भाजपमधल्या अंतर्गत वाद आपल्या फ़ायद्यासाठी वापरू शकेल एव्हढे मजबूत नक्कीच नाही. त्यामुळे ही जाग २०१९ मध्येही भाजपच्याच पदरात जाईल असा अंदाज आहे.

माझे भाकित सोलापूर : भाजप.

२४. माढा :

खरतर माढा म्हणजे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला. पण गेल्या निवडणुकीत भाजपच्या मित्रपक्षाचे सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीची चांगलीच शिट्टी वाजवली होती. निवडणुकीदरम्यान मी सांगोल्यात होतो. तिथे परंपरागत शेकापच्या गडात, देवेंद्र फ़डणवीसांची जंगी सभा या डोळ्यांनी बघितलीय. शेवटपर्यंत सदाभाऊंचा जोर खूप वाढला होता. पण २३,००० च्या निसटत्या मताधिक्याने मोहिते पाटील विजयी झाले होते. 
२०१९ मध्ये राष्ट्रवादीमध्येच मोहिते पाटलांवर खूप नाराजी आहे आणि याचा अंदाज घेऊनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी माढातून स्वतः निवडणुकीला उतरण्याचा मनोदय जाहीर केलाय. भाजपला इथे चांगली संधी होती पण धनगर आरक्षणाविषयी झालेली दिरंगाई भाजपला इथे भोवेल असा अंदाज आहे. त्यामुळे यंदा शरद पवार उभे राहिले किंवा न राहिले तरी ही जागा राष्ट्रवादी पुन्हा घेणार असा अंदाज आहे.

माझे भाकित माढा : राष्ट्रवादी कॉंग्रेस.

२५. सांगली :

परंपरागत कॉंग्रेसकडे असलेला हा लोकसभा मतदासंघ. वसंतदादांची पुण्याई कॉंग्रेसला अगदी २०१४ पर्यंत पुरली. पण २०१४ मधल्या नव मतदारांनी दादांना पाहिले नसल्याने त्यांनी भाजपच्या पारड्यात मत टाकले आणि भाजपचे संजयकाका पाटील कॉंग्रेसच्या प्रतीक पाटलांवर २,३९,००० मते जास्त घेऊन विजयी झालेत. त्यानंतर भाजपने इथे चांगलाच जोर दाखवलाय. महापालिका जिंकून इथला मूड दाखवलाय. त्यात पुन्हा चंद्रकांतदादा इथे स्वतः जातीने लक्ष देऊन असतातच. त्यामुळे २०१९ मध्येही हा मतदारसंघ भाजपच्याच पारड्यात जाणार यात शंका नाही. सेनेचा इथे जोर कधी नव्हताच त्यामुळे सेना इथे दगाफ़टका करेल तरी चिंता नाही.

माझे भाकित सांगली : भाजप.

२६. सातारा :

सातारा मतदारसंघात २०१४ मधे छत्रपती उदयनराजे भोसले ४,५०,००० च्या मताधिक्याने विजयी झाले होते. या मतदारसंघात राजे ज्या पक्षात असतात तो किंवा राजेंचा आशिर्वाद ज्या उमेदवाराला असतो तो उमेदवार विजयी होतो हा इतिहास आहे. यंदाही त्यात फ़ारसा फ़रक पडेल असे वाटत नाही. गेल्या वेळी इथे भाजपने किंवा सेनेने उमेदवारही दिला नव्हता. या वेळी भाजप सेनेने उमेदवार दिला तरी राजे किमान ३,५०,००० च्या मताधिक्याने विजयी होतील. राष्ट्रवादीविषयी राजे कितीही परखड बोललेत तरी राष्ट्रवादी इथून राजेंनाच उमेदवारी देणार आणि ते निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

माझे भाकित सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस.


२७. कोल्हापूर :

कोल्हापूर मतदारसंघ हा स्वातंत्र्योत्तर काळापासून कॉंग्रेसी विचारसरणीचाच राहिलेला आहे. कॉंग्रेस एकसंघ असताना पवार गट आणि पक्षश्रेष्ठींचा गट यांच्या साठमारीत कुठला तरी एक गट इथे सेनेची साथ द्यायचा. तसा इथे सेनेचा स्वतःचा जोर नाही. तसाच भाजपचेही पक्ष संघटन मजबूत नाही. पण गेल्या दोन तीन वर्षात चंद्रकांतदादांनी गंभीरपणे पक्ष बांधणीला सुरूवात केलीय. त्याची फ़ळे येत्या लोकसभेत इथे दिसतील असा अंदाज आहे. 
गेल्यावेळी राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांनी सेनेच्या संजय मंडलीकांवर २७,००० मतांनी निसटता विजय मिळवला होता. भाजपने कॉंग्रेसमधल्या नाराज उमेदवारांवर भिस्त ठेवून त्यांना आयात न करता आपला नवा दमाचा उमेदवार दिला तर फ़ासे नक्की भाजपच्या बाजूने पडतील असा अंदाज आहे. कोल्हापूरकर विकासाच्या बाजुने मतदान करतीलच. चंद्रकांतदादांची भूमिका इथे महत्वाची ठरेल आणि त्यांचा कस इथेच लागेल असा अंदाज आहे.

माझे भाकित कोल्हापूर : भाजप.

२८. हातकणंगले :

साखर उत्पादक श्रीमंत शेतक-यांचा हा मतदारसंघ. या मतदारसंघातून गेल्यावेळी राजू शेट्टी हे त्यांच्या स्वतःच्या करिष्म्यावर कॉंग्रेसच्या कलाप्पाण्णा आवाडेंचा पावणेदोन लाख मतांनी पराभव करून निवडून आले होते. शरद जोशींनंतर शेतक-यांच्या प्रश्नांची कळकळ असणारा हा नेता अशी त्यांनी ख्याती कमाविली होती. पण राजू शेट्टी भाजपवर नाराज होऊन भाजपची साथ सोडून निघून गेलेत त्यामुळे यंदा भाजप त्यांच्या विरोधात लढणार हे नक्की आहे. राजू शेट्टींनीही त्यांच्या राजकारणाने अनेक जवळच्या सहका-यांना दुखावलेले आहे. राष्ट्रवादी या निवडणुकीत त्यांना मदत करेल पण कार्यकर्ते किती मनापासून काम करतील ही शंका आहे. आणि सध्या राजू शेट्टींचे कॉंग्रेस, राष्ट्रवादीशीही म्हणावे तितके जमत नाही अशा बातम्या येताहेत.
हा सगळ्या साठमारीत भाजपला इथे चांगली संधी आहे. इथल्या मतदारांना सत्ताधारी पक्षाचा खासदार लाभूनही सत्तेचे फ़ायदे उपभोगायला मिळालेले नाहीत. त्यामुळे भाजपने इथे वजनदार उमेदवार दिला तर राजू शेट्टींवरच्या नाराजीचा फ़ायदा कॉंग्रेसला न मिळता भाजपला मिळेल.

माझे भाकित हातकणंगले : भाजप.



पुढील भाग ३.  : पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र
पुढील भाग ४.  : मुंबई आणि कोकण








Tuesday, February 12, 2019

लोकसभा निवडणूक अंदाज २०१९ : महाराष्ट्र - १ (खानदेश आणि विदर्भ)

पूर्ण महाराष्ट्रात या ना त्या निमित्ताने भ्रमण, काही काळ निवास झाल्याने पूर्ण महाराष्ट्राविषयी आपुलकी  आणि राजकीय अभ्यास आहे. मला आठवतय साधारणतः १९९१ च्या निकालापासून मी, माझा धाकटा भाऊ आणि माझे राजकीयदृष्ट्या जागरूक असे काही मित्र महाराष्ट्रातल्या ४८ ही जागांचे निकाल भाकित करीत असायचो. निकाल लागल्यानंतर आपली भाकिते किती चुकली, किती बरोबर या खेळात सगळ्यांनाच खूप मजा यायची. तर खालील आहेत माझे अंदाज महाराष्ट्रातल्या ४८ जागांच्या लोकसभा २०१९ च्या जागांचे.

तत्पूर्वी माझी राजकीय भूमिका.

१. सर्वसामान्य मध्यमवर्गाप्रमाणे मी पण थोड्या उजव्या विचारसरणीकडे झुकलेला परंपरागत भाजप समर्थक. मला आठवतय १९७८ साली पुलोद सरकार आल्यावर आमच्या घरी साखर वाटल्या गेली होती. १९८९ मध्ये विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाल्यावर आमच्या ज्येष्ठ मित्राने कराड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेसमध्ये थाळीवादन करून चक्क पेढे वाटले होते. मला वाटत आमचा हा मध्यमवर्गीय मतदार पण थोडा स्वार्थी, थोडा भाबडा. सरकार बदलले की जादूची कांडी फ़िरेल असा वेडा आशावाद बाळगत मतदान करणारा किंवा गेल्या सरकारने निराशा केल्यावर नाराज होत "सगळे सारखे हो" म्हणत गळा काढत मतदानाविषयी उदासीन असणारा. (क्वचित आजकाल नोटा वापरणारा)

२. यंदा प्रियंका गाधींनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर काही अतिउत्साही लोक अस्वस्थ झालेत. हे मला पटले नाही. माझ्या पक्षासाठी मी काय कराव आणि काय करू नये हा माझा प्रश्न आहे या व्यक्तीस्वातंत्र्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. तसेच विरोधी पक्ष म्हणून राहुल गांधी, मल्लिकार्जून खडगे यांना जे बोलायचय ते बोलण्याचा अधिकार आहे. त्यांची खिल्ली न उडवता भाजपने आपली ५ वर्षातली कामे लोकांसमोर मांडावीत. लोकांच्या सामूहिक शहाणपणाला कमी लेखू नये.

३. महाराष्ट्रात बोलायचे झाले तर शिवसेना किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे स्वतंत्र पक्ष आहेत. त्यांना आपापला पक्ष वाढवण्याची पूर्ण मोकळीक आहे. हे दोन्ही पक्ष भाजपच्याच मनाप्रमाणे वागतील हा आग्रह अनाठायी आहे. संजय राऊतांनी चंद्राबाबुंना पाठिंबा दिला किंवा ममता बॅनर्जी सेना प्रमुखांना भेटल्यात तर त्यात गहजब करण्यासारख काही नाही. राज ठाकरेंच्या प्रत्येक बोच-या व्यंगचित्रावर आत्यंतिक टोकाची भूमिका घेणेही योग्य नाही. तो त्यांचा अभिव्यक्तीचा अधिकार आहे. लोक ठरवतील ना योग्य काय आणि अयोग्य काय ते. (२६ जानेवारीचे त्यांचे व्यंगचित्र मलाही मतदार म्हणून संताप आणणारे होते. मग त्याचा वचपा मी मतदानात काढेन ना. त्यावर ओव्हररिऍक्ट करून मूळ मुद्दा मी बाजुला टाकण्याचे पातक करणार नाही.)

चला तर २०१९ च्या निकालांविषयी अंदाज व्यक्त करूयात. हे अंदाज महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांची युती होणार नाही पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी होईल या गृहीतकावर आधारलेले आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या निकालानंतर भाजप उगाचच बॅकफ़ूटवर गेलय हे माझे स्पष्ट मत आहे. छत्तीसगड हा एक धक्का होता हे कबूल आहे. पण राजस्थानात मोठा पराभव टळला हा एक विजयच आहे. आणि मध्यप्रदेशात मते जास्त मिळाली आहेत. "नोटा" मुळे सत्ता गेली हे स्वच्छ आहे. त्यामुळे त्या निकालांचा फ़ायदा शिवसेनेला देऊन त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढू देऊ नये. युती लोकसभेसाठीही नसावी या मताचा मी आहे.

युती झाली तरी कार्यकर्ता पातळीवर ती कितपत रूचेल ? हा ही एक प्रश्नच आहे. बर सेनेचे खासदार निवडून आलेही तरी लोकसभेत भाजपलाच पाठिंबा देतील याची खात्री नाही. त्यापेक्षा युती नकोच ह्या सर्वसामान्य मतदाराच्या भूमिकेत मी आहे.


१. नंदुरबार :

२०१४ मध्ये भाजपच्या हीना गावीतांनी आपले आजोबा आणि बरेच वर्षे नंदुरबारचे खासदार असलेल्या कॉंग्रेसच्या माणिकराव गावितांचा पराभव करून खळबळ उडवून दिली होती. त्या दोघांना मिळालेल्या मतांमध्ये जवळपास १ लाखांवर अंतर होते. तिस-या क्रमांकावर असलेल्या बसप ला १२,०००, पण नोटा ला ("वरीलपैकी कुणीही नाही") २१,००० मते पडली होती. 

यंदा महाराष्ट्रातला कॉंग्रेसचा प्रचार नंदुरबारपासून प्रियंका गांधी करणार आहेत. हीना गावितांची कामगिरी फ़ारशी उजवी नाही आणि त्यात नंदुरबारच्या मतदारांची इंदिरा गांधींविषयीची निष्ठा बघता प्रियंकाचा प्रचार उपयुक्त ठरेल असे वाटतेय. नव्या दमाचा उमेदवार जर कॉंग्रेसने दिला तर हीना गावितांना निवडणूक जड जाईल. 

माझे भाकित नंदुरबार : कॉंग्रेस.

२. धुळे :

धुळ्यात २०१४ ला सधाचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे (भाजप) हे अमरीशभाईंसारख्या कॉंग्रेसच्या तगड्या उमेदवाराचा सव्वा लाख मतांनी पराभव करून निवडून आले होते. यावर्षीही ही जागा भाजप आणि डॉ. सुभाष भामरे राखतील यात शंका नाही. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकींनी याची चुणुक दाखवली आहेच. गिरीश महाजन हे फ़ुल्ल फ़ॉर्मात आहेत. ते आपले निवडणूक कौशल्य पणाला लावतीलच. सेनेचा इथे जोर आणि उपद्रवशक्ती दोन्ही नाही.

माझे भाकित धुळे : भाजप.

३. जळगाव :

२०१४ ला जळगावात भाजपचे ए. टी. नाना पाटील राष्ट्रवादीच्या अण्णासाहेब पाटील यांचा जवळपास पावणेचार लाखांनी पराभव करून निवडून आले होते. त्यानंतर जळगाव जिल्हा म्हणजे भाजप हे समीकरण दृढ झाले आहे. नगरपालिका, जिल्हा परिषदा या सगळ्यांमध्ये गिरीशभाऊ महाजनांची चुणुक दिसली आहे. इथे सेनेची ताकद आहे पण सेनेचा विरोध होऊनही पुन्हा भाजपच जळगाववर झेंडा काबीज करेल ही खात्री.

माझे भाकित जळगाव : भाजप.

४. रावेर :

इथे २०१४ ला भाजपच्या रक्षा खडसे आणि राष्ट्रवादीच्या मनीषदादा जैन यांच्यात सव्वातीन लाख मतांचे अंतर होते. यंदा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज आहेत. खरतर यापूर्वीच त्यांचा पक्षबांधणीचा अनुभव लक्षात घेऊन त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक व्हायला हवी होती. आता त्यांची नाराजी पक्ष कशी दूर करतो यावर बरेच अवलंबून आहे. तरीहीपण खडसेंची नाराजी जागा पक्षाच्या हातातून जाण्याइतकी भोवणार नाही याची काळजी घ्यायला गिरीशभाऊ आहेतच.

माझे भाकित रावेर : भाजप.




५. बुलढाणा :

२०१४ मध्ये बुलढाण्याची जागा युतीत शिवसेनेला सुटली होती. सेनेचे प्रतापराव जाधव राष्ट्रवादीच्या कृष्णराव इंगळेंचा दीड लाखांनी पराभव करून निवडून आले होते. यावेळी युती नाही त्यामुळे मतविभाजनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येईल असा अंदाज आहे. अर्थात राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी मिळतेय ?  हे ही महत्वाचे आहे. इथे सेना थोड्या फ़रकाने दुस-या क्रमांकावर आणि भाजप तिस-या क्रमांकावर असेल. दुष्काळ निवारण्यात झालेली दिरंगाई इथे भाजपला भोवेल पण सेनेलाही तेव्हढीच भोवेल असा अंदाज आहे.

माझे भाकित बुलढाणा : राष्ट्रवादी कॉंग्रेस.

६. अकोला :

अकोला मतदारसंघात गेल्या काही निवडणुकांपासून भाजप मतविभाजनाच्या जोरावर निवडून येत आहे. २०१४ मधेही भाजपच्या संजय धोत्रेंना ४,५०,००० तर कॉंग्रेसच्या हिदायतुल्ला पटेलांना २,५०,००० आणि भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांना २,३०,००० मते पडली होते. हेच चित्र २००९ मध्येही होते. यंदा महाआघाडीत ही जागा भारिपला सोडली (तशा हालचाली सुरू झालेल्या आहेत.) तर प्रकाश आंबेडकर निवडून येऊ शकतात. इथली टोकाची जातीय समीकरणे यावर्षी भाऊसाहेब धोत्रेंना भारी पडणार असे चित्र आहे.

माझे भाकित अकोला : भारिप बहुजन महासंघ.

७. अमरावती :

अमरावती हा मतदारसंघही युतीत सेनेला सुटलेला होता. २०१४ मधे सेनेचे आनंदराव अडसूळ सव्वा लाखांच्या मताधिक्याने निवडून आलेत खरे पण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवख्या नवनीत राणा बाईंनी अडसूळांना घाम फ़ोडला होता. स्वत: नरेंद्र मोदींना अडसूळांसाठी अमरावतीत सभा घ्यावी लागली होती. राजेंद्र गवईंना मिळालेली ५०,००० मते आणि बसप ला मिळालेली ९७,००० मते दुर्लक्षून चालणार नाही. यंदा युती नाही. भाजपची मते अडसूळांना मिळणार नाहीत. याउलट महाआघाडीने राजेंद्र गवईंसारख्या तगड्या उमेदवाराला उमेदवारी देऊन उतरवले तर ही जागा नक्की आघाडीकडे जाईल. 

माझे भाकित अमरावती : राष्ट्रवादी कॉंग्रेस.

८. वर्धा :

वर्धेत यंदा मोठी मजेदार परिस्थिती आहे. गेल्या निवडणुकीत भाजपच्या रामदासजी तडस यांनी कॉंग्रेसच्या ज्या सागर मेघेंचा पराभव केला होता तेच आता भाजपमधे आलेले आहेत आणि वर्धा मतदारसंघावर भाजपच्या वतीने दावा करताहेत. दत्ताजी मेघेंपासून मेघेंचे स्वतःचे वर्धा मतदारसंघात मतदार आहेत. पण रामदास तडस समर्थकांनी जातीचा पत्ता खेळायला सुरूवात केली आहे. आता भाजप श्रेष्ठी हा अंतर्गत वाद कसा हाताळतायत यावर अवलंबून आहे. बसप ला गेल्यावेळी मिळालेली लाखभर मतेही दुर्लक्षण्याजोगी नाहीत. पण तरीही हा मतदारसंघ भाजपच राखेल अशी अंदाज आहे.

माझे भाकित वर्धा : भाजप.

९. रामटेक :

रामटेक मतदारसंघ हा युतीत सेनेच्या वाट्याला येत होता. २०१४ मध्ये सेनेचे कृपाल तुमाने हे कॉंग्रेसच्या मुकूल वासनिकांसारख्या तगड्या उमेदवाराचा दीड लाखाने पराभव करून विजयी झाले होते. बसपनेही लक्षणीय अशी ९५,००० मते मिळवली होती. यंदा युती नाही. रामटेक मतदारसंघात शेजारच्या नागपूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे फ़ायदे पोहोचले आहेत. त्यामुळे भाजपने विचारपूर्वक उमेदवार दिला तर ही जागा सेनेच्या ताब्यातून जाईल. सेना तिस-या किंवा चौथ्या क्रमांकावर फ़ेकली जाईल.

माझे भाकित रामटेक : भाजप.

१०. नागपूर :

नितीन गडकरींनी जो कामांचा झंझावात नागपूरमध्ये उभा केलाय त्यामुळे २०१४ इतकेच (२,५८,०००) मताधिक्य मिळवून ते विजयी होतील हे भाकित वर्तवणे फ़ार सोपी गोष्ट आहे. तशात नागपूर कॉंग्रेसमधे अंतर्गत भांडणे इतक्या टोकाची आहेत की कॉंग्रेसची स्वतःच्या हक्काची पूर्ण मतेही त्यांच्या अधिकृत उमेदवाराला मिळतील की नाही हे ही सांगता येत नाही.

माझे भाकित नागपूर : भाजप.


११. भंडारा - गोंदिया :

इथे वर्धेच्या अगदी उलट परिस्थिती आहे. २०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या प्रफ़ुल्ल पटेलांसारख्या हेवीवेट नेत्याला पराभूत करून भाजपच्या नानाभाऊ पटोलेंनी हा मतदारसंघ जिंकला होता. पण मधल्या काळात भाजपवर नाराज होऊन नानाभाऊंनी पक्ष सोडला आणि ते कॉंग्रेसमधे स्वगृही परतले. नंतरच्या पोटनिवडणुकीत त्यांनी जोरात प्रचार करून राष्ट्रवादीच्या मधुकरराव कुकडेंना विजय मिळवून दिला होता. पण २०१९ च्या निवडणुकीत ही जागा कॉंग्रेसला सुटणार का ? हा प्रश्न आहे. आणि भाजपने जर चांगला नव्या दमाचा (परिणय फ़ुकेंसारखा) उमेदवार दिला तर या मतदारसंघातले भाजपचे मजबूत पक्ष संघटन भाजपला विजय मिळवून द्यायला उपयुक्त ठरेल असा अंदाज आहे. निवडणूक अटीतटीची होईल पण भाजप जिंकेल.

माझे भाकित भंडारा - गोंदिया : भाजप.

१२. गडचिरोली - चिमूर :

२०१४ मध्ये भाजपच्या अशोक नेतेंनी कॉंग्रेसच्या नामदेवराव उसेंडींचा २,३५,००० मतांनी पराभव केला होता. तसा हा मतदारसंघ परंपरागत कॉंग्रेसचा पण विकासासाठी लोकांनी भाजपला मतदान केले आणि त्याची फ़ळेही त्यांना चाखायला मिळाली आहेत. सेनेचा इथे जोर काही काही पट्ट्यांमध्ये आहे पण भाजपचा उमेदवार पाडण्याइतका नाही. त्यामुळे यंदाही भाजपच जिंकेल असा अंदाज आहे.

माझे भाकित गडचिरोली - चिमूर : भाजप.


१३. चंद्रपूर :

चंद्रपूर मतदारसंघाने २००४ पासून सतत भाजपला मदत केलीय. २०१४ च्या लोकसभेतही केंद्रीय मंत्री हंसराज अहीर २,२९,००० चे प्रचंड मताधिक्य घेऊन निवडून आले आहेत. नागपुरात जसा गडकरी आणि फ़डणवीसांनी विकासाचा झंझावात उभा केलेला आहे तसाच इथे हंसराज भैय्या आणि सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी झंझावात आणला आहे आणि त्याची पावतीही जनतेनी आणि पक्षाने त्यांना दिलीय. २०१९ मध्येही हंसराज अहीर यांना निवडणूक सोपी जाईल असा अंदाज आहे. सेनेचे अस्तित्व काही काही पट्ट्यात आहे पण भाजपला धोका पोहोचवण्याइतके नाही.

माझे भाकित चंद्रपूर : भाजप.

१४. यवतमाळ - वाशिम :

यवतमाळ - वाशिम मतदारसंघ फ़ार पूर्वीपासून सेनेच्या वाट्याला आहे. भावनाताई गवळींचे कामही चांगले आहे. गेल्यावेळी जवळपास ९३,००० च्या मताधिक्याने त्या कॉंग्रेसच्या शिवाजीराव मोघेंवर विजय मिळवत्या झाल्या होत्या. यंदा युती नसणार त्यामुळे भाजपची मते भावनाताईंना पडणार नाहीत. हा मतदारसंघ नेहेमी शिवसेनेला सुटत असल्याने तसेही या लोकसभा मतदारसंघात भाजपचे संघटन लक्षणीय नाही. भावनाताईंना जपावे लागेल संजयभाऊ राठोडांसारख्या स्वकीयांच्या असंतोषाला. सध्या या दोघांमधला वाद मातोश्रीच्या दरबारी गेलाय. तो जर व्यवस्थित निपटवला तर मग विदर्भातली ही एकमेव जागा सेनेच्या पदरी पडू शकते. सेनेचे संघटन इथे चांगले आहे. कॉंग्रेसमधे इथेही टोकाचे वाद आहेत आणि ते शमवण्याचे कुठलेही प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून होताना दिसत नाहीत. त्यामुळे भाजपची मदत नाही झाली तरी भावनाताई ही जागा राखणार असा अंदाज आहे.

माझे भाकित यवतमाळ - वाशिम : शिवसेना.


पुढील भाग २.  : मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र
पुढील भाग ३.  : पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र
पुढील भाग ४.  : मुंबई आणि कोकण







Tuesday, February 5, 2019

सिंहासन, वजीर आणि सरकारनामाच्या निमित्ताने.

केबलवाल्याच्या कृपेने परवा केबल बंद पडले. बराच काळ सुरू होईना. घरात सगळ्यांचा मूड तर मनोरंजनाचा होता. मग इतर उपलब्ध साधनांमधून मनोरंजन कसे करायचे ? याचा शोध सुरू झाला आणि सिंहासन सिनेमा पुन्हा घरात लागला.

१९७० च्या दशकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी घडल्यात त्यावर अरूण साधूंच्या लेखणीतून भाष्य करणा-या "सिंहासन" आणि "मुंबई दिनांक" या दोन कादंब-यांवर आधारित जब्बार पटेलांची ही कलाकृती.

१९७९ मध्ये ज्यावेळी हा पहिल्यांदा पडद्यावर आला तेव्हा राजकारण आणि सत्ताकारण एव्हढ्या गांभीर्याने आणि अनेकपदरीपणे समजून घेण्याचे वय नव्हते. साधारण १९९० च्या दशकात हा चित्रपट पाहिला आणि आवडला. चित्रपट पाहिल्यानंतर मूळ कादंबरी वाचावी अशी ओढ लागावी असे चित्रानुभव विरळाच.

कादंबरीशी ब-यापैकी प्रामाणिक असलेला चित्रपट म्हणजे सिंहासन आणि अलिकडल्या काळातले "शाळा" आणि "निशाणी डावा अंगठा".



सुंदर कथा, अरूण सरनाईक, श्रीराम लागू, रीमा लागू, सतीश दुभाषी, दत्ता भट, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, निळू फ़ुले, श्रीकांत मोघे, माधव वाटवे आणि अत्यंत छोट्या भूमिकेत नाना पाटेकर अशी अत्यंत तगडी स्टारकास्ट आणि त्याच्या तोडीस तोड जब्बार पटेलांची पटकथा आणि दिग्दर्शन. त्याकाळी हा चित्रपट हिट झाला की नाही कळले नाही पण हा चित्रपट बघताना आजही मजा येत होती. आजही सी.एम. आणि त्यांच्या आसपासची माणिकराव, दत्ताजी, विधानसभाध्यक्ष, दाभाडे ही सगळी मंडळी आजच्या राजकारणात अनुभवायला येतात. ४० वर्षांनंतरही आजच्या राजकारणाशी ह्या चित्रपटाचे धागे जुळतात हे या कथालेखकाचे आणि दिग्दर्शकाचे मोठ्ठे यश समजावे लागेल. कालातीत असलेली कलाकृती ती ही.



तस पहायला गेल तर एका राजकारणपटासाठी गीते, संगीत इत्यादी गोष्टी दुय्यम ठरतात. पण साक्षात सुरेश भटांच्या कविता गीते म्हणून आणि त्यावर संगीतसाज चढवणारे हृदयनाथ मंगेशकरांसारखे जबरदस्त संगीतकार यामुळे ती बाजूही भक्कम झाली. "उष:काल होता होता", "मेंदीच्या पानावर" "मालवून टाक दीप" सारख्या सुंदर गझला योग्य त्या प्रसंगी चित्रपटात येतात. १९७०-८० च्या दशकातली मुंबई आणि तिच्यातले तत्कालीन समाजजीवन अभ्यासण्यासाठीही हा चित्रपट मैलाचा दगड ठरतो.

त्यानंतर राजकारणातील सत्तास्पर्धेवरचा आणखी एक चांगला चित्रपट १९९४ मध्ये आला. अशोक सराफ़, विक्रम गोखले आणि आश्विनी भावे चा "वजीर". उज्जवल ठेंगडी या एका चांगल्या लेखक दिग्दर्शकाच्या, १९८६-८७ महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत ८ पारितोषिकांनी गौरविलेल्या नाटकावर आधारित हा चित्रपट. श्रीधर फ़डकेंच संगीत. त्यातल आशाताईंनी गायलेल "सांज ये गोकुळी" गाण खूप श्रवणीय ठरल आणि गाजलही. घाणेरड्या सत्तास्पर्धेत मूल्य कशी पायदळी तुडवली जातात आणि सारासारविवेकबुद्धी कशी गहाण टाकावी लागते त्यावरचा हा चित्रपट.



नाटक या साहित्यप्रकाराच्या काही मर्यादा असतात. सगळ्या प्रकारच्या साहित्यात नाटक हा सगळ्यात कठीण साहित्य प्रकार गणल्या जातो तो या मर्यादांमुळेच. पण याच मर्यादा एखाद्या नाटकाचे बलस्थान ठरतात. "वजीर" नाटक त्या माध्यमात अत्यंत छान वाटल असणार. त्यातली प्रतिकात्मकता नाटक या माध्यमात एक बलस्थान ठरले असणार पण चित्रपटात कधीकधी प्रतिकात्मकता कथावस्तूला मारक ठरते. (शांतारामबापु, मला माफ़ करा. तुमच्या चित्रपटातली पराकोटीची प्रतिकात्मकता आमच्या पीढीला कधी पटलीच नाही. त्यावर "मु.पो.बोंबिलवाडी" या नाटकात मस्त प्रच्छन्न टीका केलेली आहे.) आणि म्हणूनच हा चित्रपट सिंहासन चित्रपटासारखा वारंवार बघावासा वाटत नाही. सार्वका्लीक कलाकृती ठरत नाही. अशोक सराफ़, विक्रम गोखलेंच्या तगड्या अभिनयाच्या टक्करीसाठी हा चित्रपट फ़क्त दोन तीनदाच पाहिल्याचे स्मरते. अशोक सराफ़चा एक दोन प्रसंगातला मुद्राभिनय अभिनयाच्या क्षेत्रात मैलाचा दगड ठरावा असाच.


त्यानंतर १९९८ मध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणावर आधारीत "सरकारनामा" हा चित्रपट आला. या चित्रपटातली पार्श्वभूमी १९९२-९३ मध्ये महाराष्ट्राने अनुभवलेल्या, राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची होती. ह्या चित्रपटालाही यशवंत दत्त, अजिंक्य देव, मिलींद गुणाजी, दिलीप प्रभावळकर, प्रतीक्षा लोणकर, सुकन्या कुळकर्णी, उपेंद्र लिमये, नंदू माधव, यतीन कार्येकर, शर्वरी जमेनीस अशी तगडी स्टारकास्ट लाभली होती. कथा पटकथा सुंदर बांधली होती. कुठेही सैल, विस्कळीत न होता पटकथा वेगवान रूपात सादर होऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवत होती. त्या काळी खूप आवडला होता हा चित्रपट. चारपाच दा बघितला होता. पण आज विचार करतोय की "हा चित्रपट कालातीत असा म्हणता येईल का ?" उत्तर ठामपणे "नाही" असे येतेय.


एखादी कलाकृती कालातीत का होते ? याचा विचार करता माझ्या लक्षात आले की ज्या कलाकृतीत मानवी नातेसंबंधांतल्या अनेक पदरांचा उलगडा करण्याचा, मागोवा घेण्याचा, धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, त्या सार्वकालीक ठरल्यात. नाहीतर ब-याच इतर कलाकृती तत्कालीन परिस्थितीत मान मिळवतात पण सार्वकालीकतेच शिखर गाठण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरतो. सिंहासन, वजीर आणि सरकारनामा हे तीनही चित्रपट त्या त्या काळात खूप आवडले होते पण सिंहासन जवळपास ४० वर्षांनीही जास्त भावतो हे त्या कलाकृतीचे सार्वकालीकतेचे प्रतीक आहे.