Tuesday, February 12, 2019

लोकसभा निवडणूक अंदाज २०१९ : महाराष्ट्र - १ (खानदेश आणि विदर्भ)

पूर्ण महाराष्ट्रात या ना त्या निमित्ताने भ्रमण, काही काळ निवास झाल्याने पूर्ण महाराष्ट्राविषयी आपुलकी  आणि राजकीय अभ्यास आहे. मला आठवतय साधारणतः १९९१ च्या निकालापासून मी, माझा धाकटा भाऊ आणि माझे राजकीयदृष्ट्या जागरूक असे काही मित्र महाराष्ट्रातल्या ४८ ही जागांचे निकाल भाकित करीत असायचो. निकाल लागल्यानंतर आपली भाकिते किती चुकली, किती बरोबर या खेळात सगळ्यांनाच खूप मजा यायची. तर खालील आहेत माझे अंदाज महाराष्ट्रातल्या ४८ जागांच्या लोकसभा २०१९ च्या जागांचे.

तत्पूर्वी माझी राजकीय भूमिका.

१. सर्वसामान्य मध्यमवर्गाप्रमाणे मी पण थोड्या उजव्या विचारसरणीकडे झुकलेला परंपरागत भाजप समर्थक. मला आठवतय १९७८ साली पुलोद सरकार आल्यावर आमच्या घरी साखर वाटल्या गेली होती. १९८९ मध्ये विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान झाल्यावर आमच्या ज्येष्ठ मित्राने कराड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मेसमध्ये थाळीवादन करून चक्क पेढे वाटले होते. मला वाटत आमचा हा मध्यमवर्गीय मतदार पण थोडा स्वार्थी, थोडा भाबडा. सरकार बदलले की जादूची कांडी फ़िरेल असा वेडा आशावाद बाळगत मतदान करणारा किंवा गेल्या सरकारने निराशा केल्यावर नाराज होत "सगळे सारखे हो" म्हणत गळा काढत मतदानाविषयी उदासीन असणारा. (क्वचित आजकाल नोटा वापरणारा)

२. यंदा प्रियंका गाधींनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर काही अतिउत्साही लोक अस्वस्थ झालेत. हे मला पटले नाही. माझ्या पक्षासाठी मी काय कराव आणि काय करू नये हा माझा प्रश्न आहे या व्यक्तीस्वातंत्र्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. तसेच विरोधी पक्ष म्हणून राहुल गांधी, मल्लिकार्जून खडगे यांना जे बोलायचय ते बोलण्याचा अधिकार आहे. त्यांची खिल्ली न उडवता भाजपने आपली ५ वर्षातली कामे लोकांसमोर मांडावीत. लोकांच्या सामूहिक शहाणपणाला कमी लेखू नये.

३. महाराष्ट्रात बोलायचे झाले तर शिवसेना किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे स्वतंत्र पक्ष आहेत. त्यांना आपापला पक्ष वाढवण्याची पूर्ण मोकळीक आहे. हे दोन्ही पक्ष भाजपच्याच मनाप्रमाणे वागतील हा आग्रह अनाठायी आहे. संजय राऊतांनी चंद्राबाबुंना पाठिंबा दिला किंवा ममता बॅनर्जी सेना प्रमुखांना भेटल्यात तर त्यात गहजब करण्यासारख काही नाही. राज ठाकरेंच्या प्रत्येक बोच-या व्यंगचित्रावर आत्यंतिक टोकाची भूमिका घेणेही योग्य नाही. तो त्यांचा अभिव्यक्तीचा अधिकार आहे. लोक ठरवतील ना योग्य काय आणि अयोग्य काय ते. (२६ जानेवारीचे त्यांचे व्यंगचित्र मलाही मतदार म्हणून संताप आणणारे होते. मग त्याचा वचपा मी मतदानात काढेन ना. त्यावर ओव्हररिऍक्ट करून मूळ मुद्दा मी बाजुला टाकण्याचे पातक करणार नाही.)

चला तर २०१९ च्या निकालांविषयी अंदाज व्यक्त करूयात. हे अंदाज महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांची युती होणार नाही पण कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी होईल या गृहीतकावर आधारलेले आहेत. मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या निकालानंतर भाजप उगाचच बॅकफ़ूटवर गेलय हे माझे स्पष्ट मत आहे. छत्तीसगड हा एक धक्का होता हे कबूल आहे. पण राजस्थानात मोठा पराभव टळला हा एक विजयच आहे. आणि मध्यप्रदेशात मते जास्त मिळाली आहेत. "नोटा" मुळे सत्ता गेली हे स्वच्छ आहे. त्यामुळे त्या निकालांचा फ़ायदा शिवसेनेला देऊन त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढू देऊ नये. युती लोकसभेसाठीही नसावी या मताचा मी आहे.

युती झाली तरी कार्यकर्ता पातळीवर ती कितपत रूचेल ? हा ही एक प्रश्नच आहे. बर सेनेचे खासदार निवडून आलेही तरी लोकसभेत भाजपलाच पाठिंबा देतील याची खात्री नाही. त्यापेक्षा युती नकोच ह्या सर्वसामान्य मतदाराच्या भूमिकेत मी आहे.


१. नंदुरबार :

२०१४ मध्ये भाजपच्या हीना गावीतांनी आपले आजोबा आणि बरेच वर्षे नंदुरबारचे खासदार असलेल्या कॉंग्रेसच्या माणिकराव गावितांचा पराभव करून खळबळ उडवून दिली होती. त्या दोघांना मिळालेल्या मतांमध्ये जवळपास १ लाखांवर अंतर होते. तिस-या क्रमांकावर असलेल्या बसप ला १२,०००, पण नोटा ला ("वरीलपैकी कुणीही नाही") २१,००० मते पडली होती. 

यंदा महाराष्ट्रातला कॉंग्रेसचा प्रचार नंदुरबारपासून प्रियंका गांधी करणार आहेत. हीना गावितांची कामगिरी फ़ारशी उजवी नाही आणि त्यात नंदुरबारच्या मतदारांची इंदिरा गांधींविषयीची निष्ठा बघता प्रियंकाचा प्रचार उपयुक्त ठरेल असे वाटतेय. नव्या दमाचा उमेदवार जर कॉंग्रेसने दिला तर हीना गावितांना निवडणूक जड जाईल. 

माझे भाकित नंदुरबार : कॉंग्रेस.

२. धुळे :

धुळ्यात २०१४ ला सधाचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे (भाजप) हे अमरीशभाईंसारख्या कॉंग्रेसच्या तगड्या उमेदवाराचा सव्वा लाख मतांनी पराभव करून निवडून आले होते. यावर्षीही ही जागा भाजप आणि डॉ. सुभाष भामरे राखतील यात शंका नाही. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकींनी याची चुणुक दाखवली आहेच. गिरीश महाजन हे फ़ुल्ल फ़ॉर्मात आहेत. ते आपले निवडणूक कौशल्य पणाला लावतीलच. सेनेचा इथे जोर आणि उपद्रवशक्ती दोन्ही नाही.

माझे भाकित धुळे : भाजप.

३. जळगाव :

२०१४ ला जळगावात भाजपचे ए. टी. नाना पाटील राष्ट्रवादीच्या अण्णासाहेब पाटील यांचा जवळपास पावणेचार लाखांनी पराभव करून निवडून आले होते. त्यानंतर जळगाव जिल्हा म्हणजे भाजप हे समीकरण दृढ झाले आहे. नगरपालिका, जिल्हा परिषदा या सगळ्यांमध्ये गिरीशभाऊ महाजनांची चुणुक दिसली आहे. इथे सेनेची ताकद आहे पण सेनेचा विरोध होऊनही पुन्हा भाजपच जळगाववर झेंडा काबीज करेल ही खात्री.

माझे भाकित जळगाव : भाजप.

४. रावेर :

इथे २०१४ ला भाजपच्या रक्षा खडसे आणि राष्ट्रवादीच्या मनीषदादा जैन यांच्यात सव्वातीन लाख मतांचे अंतर होते. यंदा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज आहेत. खरतर यापूर्वीच त्यांचा पक्षबांधणीचा अनुभव लक्षात घेऊन त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक व्हायला हवी होती. आता त्यांची नाराजी पक्ष कशी दूर करतो यावर बरेच अवलंबून आहे. तरीहीपण खडसेंची नाराजी जागा पक्षाच्या हातातून जाण्याइतकी भोवणार नाही याची काळजी घ्यायला गिरीशभाऊ आहेतच.

माझे भाकित रावेर : भाजप.




५. बुलढाणा :

२०१४ मध्ये बुलढाण्याची जागा युतीत शिवसेनेला सुटली होती. सेनेचे प्रतापराव जाधव राष्ट्रवादीच्या कृष्णराव इंगळेंचा दीड लाखांनी पराभव करून निवडून आले होते. यावेळी युती नाही त्यामुळे मतविभाजनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार निवडून येईल असा अंदाज आहे. अर्थात राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी मिळतेय ?  हे ही महत्वाचे आहे. इथे सेना थोड्या फ़रकाने दुस-या क्रमांकावर आणि भाजप तिस-या क्रमांकावर असेल. दुष्काळ निवारण्यात झालेली दिरंगाई इथे भाजपला भोवेल पण सेनेलाही तेव्हढीच भोवेल असा अंदाज आहे.

माझे भाकित बुलढाणा : राष्ट्रवादी कॉंग्रेस.

६. अकोला :

अकोला मतदारसंघात गेल्या काही निवडणुकांपासून भाजप मतविभाजनाच्या जोरावर निवडून येत आहे. २०१४ मधेही भाजपच्या संजय धोत्रेंना ४,५०,००० तर कॉंग्रेसच्या हिदायतुल्ला पटेलांना २,५०,००० आणि भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांना २,३०,००० मते पडली होते. हेच चित्र २००९ मध्येही होते. यंदा महाआघाडीत ही जागा भारिपला सोडली (तशा हालचाली सुरू झालेल्या आहेत.) तर प्रकाश आंबेडकर निवडून येऊ शकतात. इथली टोकाची जातीय समीकरणे यावर्षी भाऊसाहेब धोत्रेंना भारी पडणार असे चित्र आहे.

माझे भाकित अकोला : भारिप बहुजन महासंघ.

७. अमरावती :

अमरावती हा मतदारसंघही युतीत सेनेला सुटलेला होता. २०१४ मधे सेनेचे आनंदराव अडसूळ सव्वा लाखांच्या मताधिक्याने निवडून आलेत खरे पण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवख्या नवनीत राणा बाईंनी अडसूळांना घाम फ़ोडला होता. स्वत: नरेंद्र मोदींना अडसूळांसाठी अमरावतीत सभा घ्यावी लागली होती. राजेंद्र गवईंना मिळालेली ५०,००० मते आणि बसप ला मिळालेली ९७,००० मते दुर्लक्षून चालणार नाही. यंदा युती नाही. भाजपची मते अडसूळांना मिळणार नाहीत. याउलट महाआघाडीने राजेंद्र गवईंसारख्या तगड्या उमेदवाराला उमेदवारी देऊन उतरवले तर ही जागा नक्की आघाडीकडे जाईल. 

माझे भाकित अमरावती : राष्ट्रवादी कॉंग्रेस.

८. वर्धा :

वर्धेत यंदा मोठी मजेदार परिस्थिती आहे. गेल्या निवडणुकीत भाजपच्या रामदासजी तडस यांनी कॉंग्रेसच्या ज्या सागर मेघेंचा पराभव केला होता तेच आता भाजपमधे आलेले आहेत आणि वर्धा मतदारसंघावर भाजपच्या वतीने दावा करताहेत. दत्ताजी मेघेंपासून मेघेंचे स्वतःचे वर्धा मतदारसंघात मतदार आहेत. पण रामदास तडस समर्थकांनी जातीचा पत्ता खेळायला सुरूवात केली आहे. आता भाजप श्रेष्ठी हा अंतर्गत वाद कसा हाताळतायत यावर अवलंबून आहे. बसप ला गेल्यावेळी मिळालेली लाखभर मतेही दुर्लक्षण्याजोगी नाहीत. पण तरीही हा मतदारसंघ भाजपच राखेल अशी अंदाज आहे.

माझे भाकित वर्धा : भाजप.

९. रामटेक :

रामटेक मतदारसंघ हा युतीत सेनेच्या वाट्याला येत होता. २०१४ मध्ये सेनेचे कृपाल तुमाने हे कॉंग्रेसच्या मुकूल वासनिकांसारख्या तगड्या उमेदवाराचा दीड लाखाने पराभव करून विजयी झाले होते. बसपनेही लक्षणीय अशी ९५,००० मते मिळवली होती. यंदा युती नाही. रामटेक मतदारसंघात शेजारच्या नागपूर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचे फ़ायदे पोहोचले आहेत. त्यामुळे भाजपने विचारपूर्वक उमेदवार दिला तर ही जागा सेनेच्या ताब्यातून जाईल. सेना तिस-या किंवा चौथ्या क्रमांकावर फ़ेकली जाईल.

माझे भाकित रामटेक : भाजप.

१०. नागपूर :

नितीन गडकरींनी जो कामांचा झंझावात नागपूरमध्ये उभा केलाय त्यामुळे २०१४ इतकेच (२,५८,०००) मताधिक्य मिळवून ते विजयी होतील हे भाकित वर्तवणे फ़ार सोपी गोष्ट आहे. तशात नागपूर कॉंग्रेसमधे अंतर्गत भांडणे इतक्या टोकाची आहेत की कॉंग्रेसची स्वतःच्या हक्काची पूर्ण मतेही त्यांच्या अधिकृत उमेदवाराला मिळतील की नाही हे ही सांगता येत नाही.

माझे भाकित नागपूर : भाजप.


११. भंडारा - गोंदिया :

इथे वर्धेच्या अगदी उलट परिस्थिती आहे. २०१४ मध्ये राष्ट्रवादीच्या प्रफ़ुल्ल पटेलांसारख्या हेवीवेट नेत्याला पराभूत करून भाजपच्या नानाभाऊ पटोलेंनी हा मतदारसंघ जिंकला होता. पण मधल्या काळात भाजपवर नाराज होऊन नानाभाऊंनी पक्ष सोडला आणि ते कॉंग्रेसमधे स्वगृही परतले. नंतरच्या पोटनिवडणुकीत त्यांनी जोरात प्रचार करून राष्ट्रवादीच्या मधुकरराव कुकडेंना विजय मिळवून दिला होता. पण २०१९ च्या निवडणुकीत ही जागा कॉंग्रेसला सुटणार का ? हा प्रश्न आहे. आणि भाजपने जर चांगला नव्या दमाचा (परिणय फ़ुकेंसारखा) उमेदवार दिला तर या मतदारसंघातले भाजपचे मजबूत पक्ष संघटन भाजपला विजय मिळवून द्यायला उपयुक्त ठरेल असा अंदाज आहे. निवडणूक अटीतटीची होईल पण भाजप जिंकेल.

माझे भाकित भंडारा - गोंदिया : भाजप.

१२. गडचिरोली - चिमूर :

२०१४ मध्ये भाजपच्या अशोक नेतेंनी कॉंग्रेसच्या नामदेवराव उसेंडींचा २,३५,००० मतांनी पराभव केला होता. तसा हा मतदारसंघ परंपरागत कॉंग्रेसचा पण विकासासाठी लोकांनी भाजपला मतदान केले आणि त्याची फ़ळेही त्यांना चाखायला मिळाली आहेत. सेनेचा इथे जोर काही काही पट्ट्यांमध्ये आहे पण भाजपचा उमेदवार पाडण्याइतका नाही. त्यामुळे यंदाही भाजपच जिंकेल असा अंदाज आहे.

माझे भाकित गडचिरोली - चिमूर : भाजप.


१३. चंद्रपूर :

चंद्रपूर मतदारसंघाने २००४ पासून सतत भाजपला मदत केलीय. २०१४ च्या लोकसभेतही केंद्रीय मंत्री हंसराज अहीर २,२९,००० चे प्रचंड मताधिक्य घेऊन निवडून आले आहेत. नागपुरात जसा गडकरी आणि फ़डणवीसांनी विकासाचा झंझावात उभा केलेला आहे तसाच इथे हंसराज भैय्या आणि सुधीरभाऊ मुनगंटीवारांनी झंझावात आणला आहे आणि त्याची पावतीही जनतेनी आणि पक्षाने त्यांना दिलीय. २०१९ मध्येही हंसराज अहीर यांना निवडणूक सोपी जाईल असा अंदाज आहे. सेनेचे अस्तित्व काही काही पट्ट्यात आहे पण भाजपला धोका पोहोचवण्याइतके नाही.

माझे भाकित चंद्रपूर : भाजप.

१४. यवतमाळ - वाशिम :

यवतमाळ - वाशिम मतदारसंघ फ़ार पूर्वीपासून सेनेच्या वाट्याला आहे. भावनाताई गवळींचे कामही चांगले आहे. गेल्यावेळी जवळपास ९३,००० च्या मताधिक्याने त्या कॉंग्रेसच्या शिवाजीराव मोघेंवर विजय मिळवत्या झाल्या होत्या. यंदा युती नसणार त्यामुळे भाजपची मते भावनाताईंना पडणार नाहीत. हा मतदारसंघ नेहेमी शिवसेनेला सुटत असल्याने तसेही या लोकसभा मतदारसंघात भाजपचे संघटन लक्षणीय नाही. भावनाताईंना जपावे लागेल संजयभाऊ राठोडांसारख्या स्वकीयांच्या असंतोषाला. सध्या या दोघांमधला वाद मातोश्रीच्या दरबारी गेलाय. तो जर व्यवस्थित निपटवला तर मग विदर्भातली ही एकमेव जागा सेनेच्या पदरी पडू शकते. सेनेचे संघटन इथे चांगले आहे. कॉंग्रेसमधे इथेही टोकाचे वाद आहेत आणि ते शमवण्याचे कुठलेही प्रयत्न पक्षश्रेष्ठींकडून होताना दिसत नाहीत. त्यामुळे भाजपची मदत नाही झाली तरी भावनाताई ही जागा राखणार असा अंदाज आहे.

माझे भाकित यवतमाळ - वाशिम : शिवसेना.


पुढील भाग २.  : मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र
पुढील भाग ३.  : पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र
पुढील भाग ४.  : मुंबई आणि कोकण







1 comment:

  1. सातार्यातुन उदयनराजे.

    ReplyDelete