Monday, July 23, 2012

कृष्णभूमीत ३ : आग्रा


कृष्णभूमीत १ : नागपूर ते नवी दिल्ली

कृष्णभूमीत २ : नवी दिल्लीत 


आग्रा म्हटल्यावर मला एकदम आमचा २००६ मधला अनुभव आठवला. असेच आम्ही सगळे वैष्णोदेवीला जाण्यासाठी नागपूर-दिल्ली प्रवास करत पहाटे ५.३० ला नवी दिल्लीला पोहोचलो होतो. दिल्ली ते जम्मू ही तिकीटे रात्री ९ वाजताच्या जम्मू मेल ची होती त्यामुळे दिवसभरात दिल्लीवरून आग्रा-मथुरा-वृंदावन होईल हा आमचा होरा होता पण त्या बेताचे दिल्लीकरांनी अक्षरशः बारा  वाजवलेत. दिल्लीच्या ठगांचा अनुभव आम्हाला आला.

नवी दिल्ली स्टेशनच्या बाहेरच आम्ही एक टेम्पो ट्रॆव्हलरवाला गाठला. त्याने साडेसहा हजार रुपयांत आम्हाला आग्रा, मथुरा आणि वृंदावन घडवण्याचे कबूल केले आणि आमच्या अंघोळी वगैरे साठी एखादं हॊटेल वगैरेची व्यवस्थापण त्याच पैशात करण्याचं कबूल केलं. त्याच्या या औदार्याने आम्ही भारावून गेलो पण नंतर त्यातली खरी गोम आम्हाला कळली.


साधारणतः सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आमची मिनी बस आली आणि पहाडगंजच्या गल्ल्यांमधून वाट काढत एका हॊटेल समोर उभी झाली. बाहेरून खूप छान दिसणारे हे हॊटेल आतमात्र एकदम गचाळ आणि घाणेरडे होते. पण आम्हाला फ़क्त आंघोळी उरकायच्या असल्याने आम्ही त्यावर फ़ार निषेध वगैरे न नोंदवता आंघोळी कशाबशा आणि पटकन उरकल्यात.

आंघोळी आटोपून बाहेर आलोत तो आमची बस दिसेना. ड्रायव्हर महाशयांना बरेच फ़ोन लावल्यावर त्याने आमची बस वाहतूक खोळंब्यात अडकल्याची सबब सांगितली आणि शेवटी साधारणतः ९ च्या सुमारास आमची आग्रा मथुरा दर्शनची बस आमच्या हॊटेल समोर आली.

दिल्लीवरून निघालो खरे पण बस बराच वेळ पूर्वेकडे जात राहिली. आमच्यापैकी सगळेच पहिल्यांदा दिल्लीत आलेले असल्याने फ़ारशी कुणाला रस्त्यांची माहिती नव्हती. पण आग्रा दिल्लीच्या दक्षिणेला आहे एव्हढा आमचा भूगोल पक्का होता. मग त्या ड्रायव्हरला विचारल्यावर त्यानेही आर्श्चयाचे नाटक करून बस पुन्हा उलट्या बाजुला वळवली. तो पर्यंत आम्ही नोईडाच्या हद्दीत आलेलो होतो. पुन्हा दिल्ली शहराची गर्दी अंगावर घेत आमची बस कशीबशी आग्रा रस्त्याला लागली. फ़रीदाबादला बसमध्ये डिझेल टाकेस्तोवर तब्बल साडेअकरा झाले होते.

बस दिल्लीच्या बाहेर पडली खरी पण चारपदरी रस्ता असूनही हे ड्रायव्हर महाशय मुंगीच्या गतीने एखाद्या ट्रकच्या मागे आमची बस लावून निवांत चालले होते. त्याला त्याबद्दल आम्ही विचारल्यावर या हायवेवर ओव्हरटेकींगला बंदी असल्याची थाप त्याने ठोकली. हळूहळू मार्गक्रमणा करत आम्ही मथुरेला आलोत तोवर दुपारचे अडीच वाजले होते.

या वेगाने आम्ही आग्र्याला पोहोच णार कधी आणि ताजमहाल बघणार कधी या शंका माझ्या आणि माझ्या मामेभावाच्या मनात डोकावायला लागल्या होत्या. आम्ही दोघांनीही "आग्रा बेत रद्द करून मथुरेलाच दर्शन घेऊन परतूया्त" असा प्रस्ताव मांडला पण आमच्या भाचेमंडळींना ताज बघायचे खूप आकर्षण होते आणि वेगाचा विचार न करता बसमधल्या इतर सर्वांनीच आमचा हा प्रस्ताव फ़ेटाळून लावला. आमचा पुढला प्रवासही हळूहळूच सुरू झाला.


आग्रा शहरात जवळपास पावणेचारच्या सुमारास शिरलो पण शहर मागे पडले आणि रस्त्यावर कानपूर च्या अंतराच्या पाट्या दिसायला लागल्या तेव्हा आम्ही चरकलोच आणि पुन्हा त्या ठगाने रस्ता चुकल्याचा बहाणा करून गाडी परत फ़िरवली. (आग्र्याला गाडी चालवत चाललाय आणि ताज कुठे आहे हे माहिती नाही अशा माणसाला काय बरे शिक्षा द्यावी हा विचार आमच्या मनात डोकावून गेला.) या सर्व गोंधळात ताजमहालाच्या पार्किंगमध्ये आम्ही गाडी लावली तेव्हा दुपारचे साडेचार वाजले होते. रात्री ९ वाजता पुरानी दिल्ली स्टेशनवरून आमची जम्मू मेल सुटणार या भीतीने आम्ही अक्षरशः १५ मिनिटांत ताज दर्शन उरकले.

कुणालाच ताज पाहिल्याचे समाधान नव्हते. या गोंधळात जवळ असलेल्या चिवड्या शिवाय सर्वांनी काहीही खाल्ले नव्हते. परतताना एखाद्या ढाब्यावर थांबून खाण्याएव्हढा वेळही नव्हता.

परतताना आम्ही ड्रायव्हरशेजारीच बसून त्याला फ़ास्ट चालवायला आग्रह करायला लागलोत. मग त्याने आपला खरा हेतू प्रगट केला. " अरे साब. चिंता काहे करते हो ? हम छोडेंगे आपको वैष्णोदेवीतक इसी बस में." वगैरे भलामण सुरू झाली. दोन तीन वेळा ऐकल्यावर मग मात्र मी माझ्या खिशातून रात्रीच्या जम्मू मेल ची थ्री टायर ए.सी. ची साडेसहा हजार रुपयांची तिकीटे काढलीत आणि त्याच्या हवाली करत म्हणालो की या तिकीटांमध्येच तुला जम्मूला सोडावे लागेल. मग त्याला जाणीव झाली आणि तोपर्यंत आम्ही त्याचे अर्धेच पैसे दिलेले होते त्यामुळे जर आम्ही जम्मू मेल पकडू शकलो नाही तर तिकीटांच्या रद्दीकरणाचा अधिभार आम्ही त्याच्या उरलेल्या पैशातून कापून घेऊ अशी अस्पष्ट सूचनापण त्याला आम्ही दिलेली होती.

कसेबसे दिल्ली हद्दीत आम्ही रात्री सव्वा आठला पोहोचलो. पुरानी दिल्ली स्टेशन म्हणजे चांदनी चौकाचा मीनाबाजार ओलांडून जायचे होते. त्या ड्रायव्हरने पुरानी दिल्ली स्टेशनही माहिती नसल्याचा बहाणा केला पण मग आम्हीच पुढाकार घेऊन रस्ता विचारत विचारत कसेबसे रात्री ८.५५ ला आम्ही स्टेशनावर आलोत. जम्मू मेल १ नंबर फ़लाटावर होती त्यामुळे जिना वगैरे चढावा लागला नाही म्हणून आम्हाला मिळाली. नाहीतर काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाही. पैशापरी पैसा गेला, जेवण झाल नाही, मथुरा नाही, वृंदावन नाही, ताजही नीट पहाता आला नाही या दिल्ली च्या ठगांमुळे. 

यावेळी मात्र व्यवस्थित नियोजन होते. नवी दिल्ली वरून सुटणा-या भारतातल्या सर्वात वेगवान गाडीने, भोपाळ शताब्दीने आम्ही आग्रा गाठण्याचे ठरविले.

दि. १०/०५/२०११.


सर्व प्रवासी छान गाडी  बघून आनंदात होते. 

गाडी बरोबर सकाळी सवा सहा वाजता सुटली. नवी दिल्ली ते आग्रा हे १९८ किमी अंतर ११८ मिनीटांत कापायला सज्ज झाली. काहीकाही प्रवास या गाडीने ताशी १५० किमी च्या वेगानेही केला.


आग्रा स्टेशनवर फ़क्त २ मिनीटे गाडी थांबली पण तेव्हढ्या वेळात ४८ प्रवासी आणि जवळपास १०० सामानांचे डाग उतरवण्यात आमच्या तरूणांचे व्यवस्थापकीय कौशल्य प्रगट झाले.आग्रा स्टेशनच्या बाहेर आम्हाला घ्यायला व आग्रा मथुरा वृंदावन दर्शन करवायला बस सज्ज होतीच. सगळे बसमध्ये बसलेत. शताब्दी एक्सप्रेस मध्ये चहा आणि नाश्ता झाला होताच.
आणि मग खेळण्यातल्या गिटारीचा वापर करून आंधळ्या भिका-यांच्या नकला सुरू झाल्यात. तरूण तुर्क आणि म्हातारे अर्क सगळेच हिरीरीने सामील झालेत.
दिल्लीतल्या काही सुंद-या आग्र्यातही आमच्या सोबत होत्याच. त्यांचे फ़ोटो काढण्याचा मोह मी कसा आवरू शकत होतो?आग्रा किल्ल्याचे भव्य आणि कलाकुसरदार प्रवेशद्वार.
आग्रा किल्ला : मोगलांची राजधानी. उत्तम जतन केलेला वारसा. रायगड असा का जतन केल्या गेला नाही ? ही खंत आम्हा सगळ्यांच्या मनात होती.
किल्ल्याच्या आतील कलाकुसरीचे नमुने.


चश्म-ए-शाही बगीचा.


दीवान-ए-खास.प्रकाशकिरणांना आरपार जाऊ देणारे खरे इराणी संगमरवर.

मुघलकालीन अप्रतिम कलाकुसर.शहाजहांन ला लाल किल्ल्यात त्याच्या अंतिम कैदेत असताना दिसणारा ताज.दीवान-ए-आम. याचे वैशिष्ट्य असे की दरबारातल्या कुठल्याही जागेवरून बादशाहाचे सिंहासन दिसू शकते. इतके खांब मध्ये असताना त्यांचा अडथळा होत नाही. याच ठिकाणी औरंगजेबाला शिवाजी महाराजांचे बाणेदार उत्तर ऐकावे लागले होते. शिवरायांच्या आठवणीने आम्ही सर्व नतमस्तक झालोत. 
ताजमहालाच्या पार्किंगमध्ये असलेली ही बंगाली बस. डुप्लीकेट व्होल्व्हो. चांगल्या ५८ आसनांची दाटीवाटीची व्यवस्था यात होती. दोन दारे. एक केबीनमधून आणि एक मध्येच.

ताजमहालाला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी कुठल्याही खाजगी गाड्या ताजपासून जवळपास १ कि.मी. दूर ठेवाव्या लागतात. आणि ताजपर्यंत जाण्यासाठी असल्या बॆटरीवर चालणा-या गाड्यांमधूनच जावे लागते.

ताजमहालाचे भव्य आणि सुंदर प्रवेशद्वार. ( The grand and beautiful entrance to Taj Mahal )

ताज : वेगवेगळ्या मूडस आणि ऎंगलने. ( The most photographed building in the world deserves the most photographs in my blog, too.)

२००६ मध्ये अपूर्ण राहिलेली इच्छा आज पूर्ण झाल्याच समाधान होतं. ताजची भव्यता मनात भरून होती. लोक इथे यायला इतके वेडे का होतात ? याच उत्तर आज मिळालं.
आमचा टूर ज्या आमच्या सी.इ.ओ. ने प्लान केला तो कौस्तुभ खातखेडकर. त्याची तरूण मुलांची संघबांधणी खरोखर अप्रतिम.


त्याच टीममधले आमच्या प्रवासात आपल्या विशेष टिप्पण्यांने रंगत आणणारे आमचे वैभव गोसावी.


ताजमधून काढलेला समोरच्या बागेचा फ़ोटो. असे फ़ोटो दुर्मिळ आहेत. सगळे बागेतून ताजचा फ़ोटो घेतात पण ती बाग पण अप्रतिम सुंदर आहे.