Friday, March 24, 2017

कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही पण..... तीन वेगवेगळे अनुभव.

२००३ च्या जुलै महिन्यातली गोष्ट. महाविद्यालयाच्या उन्हाळी सुट्या संपवून मी, माझ्या पत्नी व एक वर्षाच्या छोट्या मुलीसह, नागपूरवरून मुंबईला निघालो होतो. गाडी नेहेमीचीच. विदर्भ एक्सप्रेस. मला वाटत महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू होते. विधानसभेचे पावसाळी, हिवाळी किंवा अर्थसंकल्पीय अधिवेशन असले की विदर्भ एक्सप्रेसला एक द्विस्तरीय वातानुकूल शयनयानाचा (मराठी भाषेत ए.सी. टू टायरचा) जादा डबा जोडला जातो. तसा तो यावेळीही होता.

आता विधानसभेच्या विदर्भ आणि खानदेशातल्या आमदारांना मुंबईत जायला सोय म्हणून हा डबा जोडला जातो हे ठीक आहे. पण तो फ़क्त विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यादिवशी आणि संपल्यादिवशी जोडला असता तर ठीक होत. रोज कशाला ? एव्हढ्या आमदारांना रोज आपल्या मतदारसंघात परत जायच असत ? मग विधीमंडळातल्या उपस्थितीच काय ? जाउद्यात. शाही लोकांसाठी असलेली ही लोकशाही व्यवस्था आपण स्वीकारलीय न ? मग असले प्रश्न विचारायचेच नाहीत. हो ना. उगाच फ़ट म्हणता विशेषाधिकारांचा भंग वगैरे व्हायचा या शाही लोकांचा.

बर यात प्रत्येक आमदार आपल्यासोबत आपल्या सोबत आपल्या एखाद्या स्वीय सहायकालाही नेऊ शकतो. त्या डब्याच्या आरक्षण तक्त्यावर (शुद्ध मराठीत रिझर्वेशन चार्टवर) "आमदार अमुक अमुक + १"अश्याच नोंदी असतात. त्यामुळे हे कळले. त्यातही पूर्व विदर्भातले भंडारा, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धेच्या काही भागातले आमदार मुंबईला सरळ विमानाने जाणे पसंत करतात. त्यामुळे त्यांच्या जागा जरी आरक्षित केलेल्या असल्या तरी रिकाम्याच असतात किंवा त्यांचे चेले चपाटे त्या जागांवर तो-यात (चहापेक्षा किटली गरम) प्रवास करीत असतात. पश्चिम विदर्भ आणि खानदेशातल्या आमदारांना मात्र नागपूरपर्य़ंत या आणि मग विमानाने जा हे परवडत नाही. (पैशाचा प्रश्न नाही हो. खुळे की काय ? चार्टर्ड विमानाने जायची आमची ताकद आहे, काय समजलेत ? तसही स्वतःच्या खिशाला तोशीस लावून कोण जात म्हणा ? पैसा पक्षाचा, नाहीतर चाहत्याचा, गेला बाजार कंत्राटदाराचाच असतो म्हणा.) परवडत नाही ते वेळेमुळे. अमरावती ते नागपूर, अकोला ते नागपूर असा रस्ता मार्गाने प्रवास करून मग मुंबईला जाण्यापेक्षा सरळ विदर्भने मुंबईला जाणे सोयीचे होते.

प्रवासात वेळ कसा घालवायचा हा प्रश्नच मला कधी पडला नाही. रेल्वे, बस कर्मचा-यांशी आपली पटकन गट्टी जमते. आपल्या या आगळ्यावेगळ्या छंदाबद्दल (बस आणि रेल्वे फ़ॅनिंगच्या) त्यांना सांगितले की ते सुद्धा यात सहभागी होतात. माहिती पुरवतात. या छंदाच्या जोरावर मला १९९१ मध्ये मनमाड ते भुसावळ हा महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये एंजिनातून प्रवास घडला आहे. (त्याविषयी सविस्तर ब्लॉग नंतर कधीतरी.) तसाच यावेळीही मी गाडीच्या दारात उभा राहून, सगळ्या डब्यांमधून फ़िरून येत, टीटीई काकांशी गप्पा मारीत येत होतो. आमच्या वातानुकूल द्विस्तरीय शयनयान डब्याशेजारीच हा आमदारांसाठीचा डबा लावलेला होता. दोन्ही डब्यांची संयुक्त जबाबदारी एका निवृत्तीला आलेल्या वृद्ध मुसलमान टीटीई काकांकडे होती. माणूस खरच गोड आणि नम्र स्वभावाचा होता. वयाने पिकून, खूप अनुभवांच गाठोड घेऊन जगाविषयी कसलीही किल्बीष न बाळगता जगणारा माणूस होता. 


 
 
आमच्या गप्पा रंगल्यात. त्यांनीही त्यांच्या रेल्वेतल्या अनुभवाचा खजिना माझ्यासमोर खुला करायला सुरूवात केली होती. मध्ये मध्ये स्टेशन आले की ते आपल्या जागेवरून उठत आणि आपले कार्य तत्परतेने करून पुन्हा आमच्या गप्पांमध्ये सामील होत. मोठा मजेत प्रवास चालला होता.
धामणगाव स्टेशनवर एक अघटित प्रकार पहायला मिळाला. फ़लाटावर एक पांढरी ऍम्बॅसॅडर गाडी उभी. १९९४-९५ मधल्या माझ्या इथल्या वर्षभराच्या वास्तव्यात हा फ़लाट माझा जिगरी दोस्त झाला असल्याने मला याचा इंच न इंच माहिती होता. पण त्यावर अशी कार कुणीतरी आणू शकत हे मला नवीनच होत. फ़लाटावर गाडी लागल्यावर त्या कारमधून यवतमाळचे तत्कालीन आमदार उतरले आणि बरोबर शेजारीच आलेल्या (कार त्या हिशोबानेच फ़लाटावर लावली होती.) आमदारांच्या विशेष डब्ब्यात प्रवेशकर्ते झालेत. 
(अरे, आमदारांना किती त्रास होतो उन्हाचा आणि पायी १०० मीटर चालण्याचा हे तुम्हा सर्वसामान्य जनतेला काय कळणार ? नतद्रष्ट लेकाचे. तो सगळा त्रास कळायला आमदारच व्हावे लागेल. जावे त्या वंशा तेव्हा कळे. बाकी अशा खास लोकांना "आम" दार म्हणणे हा लोकशाहीचा अपमान नाही का ? हे सगळेच "खास" दार.)

थोडा वेळ गेला. दरम्यान अमरावती, मूर्तिजापूर, अकोला स्टेशने गेलीत. सगळ्या जागांवरून तिथल्या तिथल्या आमदारांचे प्रवेश गाडीत होत होते. टीटीई काकांची ड्यूटी भुसावळ पर्यंत होती. आमची जेवणे वगैरे आटोपून पुन्हा शतपावली करण्यासाठी म्हणून मी या डब्यातून त्या डब्यात फ़िरत होतो. आमच्याच डब्यात पुन्हा या टीटीई काकांच्या आसनापाशी कुठल्यातरी एक आमदारांचा एक स्वीय सहायक (शुद्ध मराठीत पी. ए.) त्या टीटीई काकांना काहीतरी विनंती करीत होता. मी थबकलो. त्यानंतरचा संवाद.

पी. ए. : साहेब आमच्या आमदारसाहेबांना ३५ नंबर (साईड लोअर) बर्थ मिळाला आहे. त्यांना तो नको आहे. दुसरा एखादा बर्थ असेल तर बघा ना. (ठीक आहे. एखाद्या वेळेला उंच माणसाला साईड बर्थमध्ये काहीतरी प्रश्न येऊ शकतात. बहुतेक मंडळी ही असली मागणी करताना आढळतात.)
टीटीई काका : (चार्टमध्ये बघून) बरं. ३३ किंवा ३४ नंबर घ्या. (मी सुद्धा चार्टमध्ये डोकावून पाहिले. आम्ही भोचक ना ! हे नंबर्स चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका आमदारांचे आणि त्यांच्या पी. ए. चे होते. त्या काकू नागपूरवरून बसायच्या होत्या पण अकोल्यापर्यंत न आल्याने बहुधा विमानाने गेल्या असतील असे समजून टीटीई काकांनी नवीन दोघांना दिलेत.)

माझी शतपावली सुरूच होती. मध्येच मी या आमदार विशेष डब्ब्यातही जाऊन आलो. सर्वपक्षीय आमदारांच्या मोठमोठ्याने गप्पा रंगल्या होत्या. रात्रीचे नऊ साडेनऊ वाजले होते. जेवणासोबत ए. सी. टू टायरमध्ये "दारूकाम" पण यथासांग सुरू होते. (रेल्वेत कुठल्याही दर्जातून प्रवास करताना मद्यपानास सक्त मनाई असते हो. अर्थात यांच्यासाठी नाही ह.)

साधारणतः अर्ध्या तासाने पुन्हा तेच पी ए महाशय पुन्हा घाईघाईत टीटीईंपाशी आले. आमच्या गप्पा सुरूच होत्या.
पी. ए. : साहेब आत्ता त्या ३३ नंबरवर आमदार साहेबांनी उलटी केलीय हो. (ए.सी. टू टायरमधे असला प्रकार दुस-या कुणा सामान्य प्रवाशाने केला असता तर ? कल्पनाही करवत नाही ना ? दारू पचली नाही हे कारण असावे काय ? माझी भोचक शंका, अर्थात मनातल्या मनात.) दुसरा एखादा बर्थ पहा ना, प्लीज.
टीटीई काका : (वैतागून आणि पुन्हा चार्ट नीट पहात) नाही हो, कुठलाच नाही.
पी. ए. : (भोचकपणाने पुन्हा त्या चार्टमध्ये डोकावत आणि एका रिकाम्या जागेवर बोट ठेवत) हा द्या ना.
टीटीई काका : अहो तो १८ नंबर आहे. पुन्हा साईड अप्पर. चालेल का ?
पी. ए. : नको, साईडचा कुठलाच नको.
टीटीई काका : मेन मधला कुठलाच नाही हो. बघा तुम्हीच.

पी. ए. ने तो चार्ट हातात घेतला आणि एका जागेवर पुन्हा दावा ठोकला.
टीटीई काका : अहो हे जळगाव जिल्ह्यातले आमदार आहेत. त्यांची जागा आहे. गेल्या वेळी त्यांना हवी तशी जागा नव्हती म्हणून त्यांनी विदर्भ एक्सप्रेस भुसावळला रोखून धरली होती. ती जागा सोडून बोला आणि तसही ते आज येणार आहेत की नाहीत हे भुसावळ लाच कळेल. भुसावळला माझी ड्यूटी संपते. तुम्ही तिथल्या टीटीईला विचारा. आत्ता करा ना ऍडजस्ट.

पाच मिनीटांनी पुन्हा हे पी. ए. महाशय परतले ते टीटीईंना आमदारसाहेबांनी बोलावल्याचा निरोप सांगायला. मला आमच्या डब्ब्यात सोडून टीटीई काका पुढल्या डब्ब्यात गेले आणि साधारणतः पंधरा मिनीटांनी वैतागून परतले. तिथे त्यांना कारण नसताना बोलणी ऐकून घ्यावी लागली असणार हे नक्की होत. कारण एव्हढ्या वेळ सौजन्याने वागणा-या त्या वृद्धाचा तोल सुटला. त्यांनी तिथेच दोन चार सणसणीत शिव्या त्या सगळ्यांना हासडल्या. आणि म्हणाले, "XX इन सबको मेरी बददुआ है. अगले इलेक्शन मे इसमेसे एक भी चुनके नई आयेगा. बादमे इन XXकी स्लीपर क्लासमेभी जानेकी औकात नही है."

(तुम्ही विचार करून बघा. तुम्ही प्रवास करताना तुम्हाला बर्थ बदलून हवाय, तो मिळाला. तुम्ही गाडीत दारू पिण्यासाखे बेकायदेशीर आणि अनैतीक कृत्य करताय त्यावर तुमच्या धाकाने कुणी बोलत नाही. तुम्ही डब्ब्यात किळसवाणी उलटी केलीत आणि तुम्हाला पुन्हा आता बर्थ बदलून हवा आहे. तुम्ही पुन्हा दबाव टाकताय. तुमच्या माझा बाबतीत असा विचारही आपण करू शकत नाही न ? मात्र तुमच्या आमच्याच पैशातून प्रवास करणा-या आपल्या प्रतिनिधींसाठी हे नित्याचे आहे. हे त्यांचे विशेषाधिकार आहेत. इथे मला सगळी नावे माहिती आहेत. मुद्दाम नावे टाळलीत कारण यात सर्वपक्षीय आणि काही अपक्षीयही आहेत. "उडदामाजी काळेगोरे, काय निवडावे निवडणारे ?")

विशेष म्हणजे पुढल्याच वर्षी २००४ मध्ये निवडणुका झाल्यात. मी त्यात मोठ्या उत्सुकतेने मी विदर्भातल्या आमदारांची यादी पाहिली. त्या टीटीई ने चिडून शाप दिलेल्या आमदारांपैकी एकही नवीन विधीसभेत नव्हता. काहींची तिकीटे पक्षाने कापली तर काही निवडणुकीत पडले. आणि त्यातले बहुतांशी जण नंतरच्या २ निवडणुकांतही (२००९ आणि २०१४) निवडून येऊ शकले नाहीत. आता तर त्यांच्या त्यांच्या पक्षानेही त्यांना सायडिंगला टाकल्यासारखे केले आहे. कुणाच्या खिजगणतीतही नाहीत.

"कावळ्याचा शापाने गायी मरत नाहीत" हे जरी खरे असले तरी एका सत्शील माणसाच्या तळतळाटात काय ताकद असते याचा मी मनोमन अनुभव घेतला.

याच प्रवासात अगदी माझे सहप्रवासी असलेले आमदार बी. टी. देशमुख सरांचा सुसंकृत सहवास आणि प्रथम वर्ग वातानुकूल डब्ब्य़ातून प्रवास करणा-या खासदार जोगेंद्र कवाडे साहेबांची जगावेगळी माणुसकी याचे स्तिमीत करणारे दर्शन घडले.

मला आणि माझ्या कुटुंबाला ३२ आणि ३४ क्रमांकाचे बर्थस मिळाले होते. दोन्ही वरचे बर्थ. आमच्याच बे मध्ये बरोबर आमच्याच खाली ३१ आणि ३३ नंबरवर आमदार बी. टी. देशमुख सर आणि त्यांचे पी. ए. होते. प्रवास सुरू झाल्यापासून बी. टी. सरांचे फ़ायलीतून उद्याच्या विधीसभेच्या कामकाजाविषयी वाचन सुरू झाले. कुठलाही बडेजाव नाही आणि एक शांत, अभ्यासू व्यक्तीमत्व. कुठेही वचवच करणे नाही. आपण काही विशेष असल्याचा तोरा नाही. मधल्या काळात त्यांनी कामकाज आटोपून लोकप्रभेचा ताजा अंक वाचून काढला. बरोबर साडेआठच्या सुमारास पी. ए. ना आज्ञा झाली "चला जेवून घेवूयात." दोघांनी शांतपणे आपापले डबे काढलेत. जेवण झालीत आणि बरोबर नऊ वाजता दिवे मालवून दोघेही झोपी गेलेत. आमच्या सोबत माझी एक वर्षाची मुलगी असल्याने तिच्या शांत झोपेसाठी आम्हालाही शांतता हवीच होती. ती मिळाली.


 दुस-याच दिवशी मुंबईत विधानभवनावर रॉकेल विक्रेत्यांचा त्यांच्या काही मागण्यांसाठी विशाल मोर्चा निघणार होता. मोर्चाचे नेतृत्व खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे करणार होते. कवाडे सर प्रथम श्रेणी वातानुकुलीत डब्ब्य़ात प्रवास करीत होते. मोर्चेक-यांची तुफ़ान गर्दी. सगळे जनरल डबे या गर्दीने ओसंडून वाहत होते. सगळे कवाडे सरांचे कार्यकर्ते.

वर्धा स्टेशनवर कवाडे सर डब्ब्याबाहेर आल्यावर त्यांच्याभोवती कार्यकर्त्यांची गर्दी झाली. प्रथम श्रेणी वातानुकूल आणि जनरल डबा आजुबाजूलाच होता. त्यातच एका कार्यकर्त्याने त्यांना सांगितले, " भाऊ, ते बुढी (म्हातारी स्त्री) ऐकून नाही राहिली. येतेच म्हनते मुंबईले. आंगात ताप हाये तिच्या. तरीबी येऊनच राह्यली." मग थोडा वेळ त्या म्हाता-या स्त्री शी कार्यकर्त्यांनी चर्चा केली असावी पण अंगात ताप असतानाही मोर्च्यात सामील होण्यासाठी ती जिद्दी बाई अडून बसलेली असावी.

कवाडे सर त्या टीटीई शी काहीतरी बोलले. कार्यकर्त्यांना निरोप गेलेत. त्या म्हाता-या स्त्री ची रवानगी ए.सी. फ़र्स्ट क्लासमधे झाली. कवाडे सरांच्या जागेवर आणि कवाडे सर कार्यकर्त्यांच्या सोबत जनरलमधल्या बाकड्यावर. मुंबईपर्यंत. (ठाण्यापर्यंत तरी ते त्याच डब्ब्यात असलेले मी पाहिलेत.)


याला म्हणतात खरा लोकनेता. कुठेही जाहिरात नाही. खूप उपकार केल्याची भावना नाही. आपल्या कार्यकर्त्याला अडचणीत उपयोगी पडताना दाखवलेली माणुसकी. जी आज दुर्मीळ झालेली आहे. 
 
No comments:

Post a Comment