Tuesday, July 11, 2017

संस्कृत सुभाषिते - ७

संस्कृत सुभाषितांमध्ये अन्योक्ति, चमत्कृति, अर्थान्तरन्यास, नीती असे अनेक प्रकार आढळतात. प्रत्येक प्रकाराचे एक छान असे वैशिष्ट्य आहे. आता अर्थान्तरन्यासाचेच उदाहरण घ्या ना. आपण सर्व आपापल्या लिखाणात, व्याख्यानांमध्ये गेला बाजार शालेय निबंधांमध्ये यातल्या एका चरणाचा वापर नक्की केलाय पण त्या चरणामागचे संपूर्ण सुभाषित जर आपल्याला कळले तर त्या सुभाषित्कर्त्याबद्दल आणि आपल्या शहाण्या पूर्वजाबद्द्ल आदर द्विगुणीतच काय पण शतगुणीत होतो.

आता हेच बघाना "अती सर्वत्र वर्ज्ययेत" या चरणाचा वापर आपण बराच केला असेल. पण त्यामागील तीन चरण आपणापैकी फ़क्त संस्कृतच्या अभ्यासकांनाच माहिती असतील.

" अतिदानाद बलिर्बद्धो ह्यतिमानात सुयोधनः
विनष्टो रावणो लौल्याद, अती सर्वत्र वर्ज्ययेत."

{अती दान केल्याने बळीराजा बांधला गेला. तरी शुक्राचार्यांनी सांगितले होते की आता बास. हा बटू वामन तुझा शत्रू आहे पण बळीराजा दान देण्याचे थांबला नाही. अती मानामुळे (अहंकारामुळे) दुर्योधनाचा नाश झाला. युधिष्ठीराप्रमाणे महाभारतकारही या ज्येष्ठ कौरवालाही त्याच्या ख-या नावानेच नेहेमी हाक मारतात. त्याचे खरे नाव सुयोधन. त्याच्या कृत्यांमुळे बिचारा "दुर्योधन" या नावास प्राप्त झाला. अती कामवासनेमुळे रावणाचा नाश झाला. तस्मात "अती सर्वत्र वर्ज्ययेत", अती करू नये अशी शिकवण या सुभाषितातून आपल्याला मिळालेली आहे. }

हे अर्थान्तरन्यासाचे एक उदाहरण. इतरही उदाहरणे म्हणजे "वचने किं दरिद्रता ?", "देवो दुर्बल घातक:" , योजकस्तत्र दुर्लभः",  "सर्वे गुणाः कांचनमाश्रयन्ते". 

या सर्व अर्थान्तरन्यासांचे संपूर्ण सुभाषित काय आहे याचा शोध लागतोय का बघा. नाहीतर इथे थोड्या प्रतीक्षेनंतर मी लिहीतोच आहे.

Friday, July 7, 2017

राजधानी, शताब्दी, जनशताब्दी, संपर्क क्रांती, गरीब रथ, दुरांतो, हमसफ़र, अंत्योदय, तेजस .............: प्रस्तावना


भारतीय रेल्वेच्या या विशाल कारभारात अनेक रेल्वे मंत्र्यांनी आपली बरी वाईट अशी छाप उमटवली. त्याच प्रयत्नात ब-याच रेल्वेमंत्र्यांनी आपापल्या स्वप्नातल्या गाड्या सुरू केल्यात. एक वेगळा ब्रॅण्ड या प्रत्येकाने तयार करण्याचा प्रयत्न केला. या लेखमालेचे शीर्षक वाचून तुम्हा सगळ्यांना त्याची कल्पना आली असेलच.

या सर्व प्रयत्नांवर एक रेल्वे अभ्यासक आणि प्रेमी म्हणून काही लिहाव अशी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. आता ती क्रमशः पूर्ण करेन. राजधानी एक्सप्रेसपासून जरी या लेखमालेला सुरूवात करत असलो तरी राजधानी एक्सप्रेस सुरू होण्यापूर्वी त्यांच्या पूर्वसुरी डिलक्स एक्सप्रेस म्हणून ज्या गाड्या सुरू झालेल्या होत्या त्यांचा उल्लेख याठिकाणी करणे अत्यावश्यक ठरेल. दिल्लीवरून पूर्व, पश्चिम, आणि दक्षिण दिशेला आरामदायक प्रवासासाठी या गाड्या सुरू झाल्या असाव्यात. त्याकाळी क्रीम आणि लालसर गुलाबी छटेतली डिलक्स एक्सप्रेस नागपूरला बालपणी पाहिल्याचे आठवते. बहुधा आत्ताची दक्षिण एक्सप्रेस असावी. नंतरच्या कालावधीत त्या गाड्यांना पूर्वा एक्सप्रेस, पश्चिम एक्सप्रेस आणि दक्षिण एक्सप्रेस अशी नामे पडलीत आणि त्या गाड्यांचा विशेष दर्जा हळूहळू समाप्त होत गेला.

आरामदायक प्रवास म्हणण्याचे कारण म्हणजे त्याकाळी रेल्वेत उच्च वर्ग (वातानुकुलीत आणि प्रथम वर्ग) सोडला तर इतर वर्गांना बाकांना कुशन्स नसायचीत. लाकडी बाकांवर बसून या खंडप्राय देशात तासातासांचे प्रवास करावे लागत. शयनयान वर्गात बाकांना कुशन्स बसवण्याला कै. मधू दंडवते रेल्वेमंत्री असताना १९७९ मध्ये सुरूवात झाली. त्यांनीच वर्गविरहीत रेल्वेची संकल्पना अंमलात आणून ४ नोव्हेंवर १९७९ ला मुंबई - हावडा गीतांजली सुपर एक्सप्रेस ही पहिली वर्गविरहीत गाडी सुरू केली. अजूनही गीतांजली एक्सप्रेसला पहिल्या वर्गाचा डबा नाही. आज मूळ समाजवाद आणि त्याच्याशी संबंधित कल्पनाच कालबाह्य झालेल्या असल्याने गीतांजली ही वर्गविरहीत गाडी वाटत नाही पण रेल्वेच्या संदर्भात मूलभूत स्तरावर विचार करून निर्णय घेणारे मंत्री म्हणून मधू दंडवतेंच नाव भारतीय इतिहासात अमर असेल. तसेच मूलभूत विचार करणारे आत्ताचे रेल्वेमंत्री आहेत. मला वाटते सिंधुदुर्गाच्या मातीतच हा गुण असावा.या प्रत्येक ब्रॅण्ड विषयी मला वाटलेले विचार, त्यांचे प्रगतीचे टप्पे, सद्यस्थिती आणि होऊ शकत असणा-या सुधारणा याबद्दल क्रमश: इथे लिहीण्याचा प्रयत्न करेन. आपणा सर्वांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी आहेतच.

Tuesday, July 4, 2017

कथा नवमीच्या कांद्याची

गेल्या पाच वर्षात दक्षिण आणि उत्तर महाराष्ट्र फ़िरून कायमचे स्थायिक व्हायला यंदा नागपूरला आलो आणि पुन्हा छानपैकी कांदेनवमी साजरी केली. मधल्या काळात हा सण विसरूनच गेलो होतो. आषाढी नवमीला (एकादशीच्या दोन दिवस आधी) या मोसमातले कांदे खाऊन संपवायचे. त्यांचे विविध प्रकार करायचेत. कांद्याच्या चकल्या (खास त्यासाठी आमचे आजोबा, काकेआजोबा, काका, मावसोबा आपापल्या धर्मपत्न्यांना, लेकी सुनांना उन्हाळ्यातच थोड चकलीच पीठ खास ठेवून द्यायला लावायचेत.) कांद्याची भजी, कांदेभात, कांद्याची थालीपीठ, कांद्याच पिठल हे सगळे पदार्थ विदर्भात काही वर्षांपूर्वी तरी मोठ्या उत्साहात होत असत. अजूनही ग्रामीण विदर्भात होत असतील. शहरे मात्र सगळी आता "मेट्रोज" झाल्यामुळे तिथले खाद्यसंस्कार बदलणे अपरिहार्य आहे.

आषाढी एकादशीपासून जो चातुर्मास सुरू होतो त्यात कांदे, लसूण, वांगी इत्यादी पदार्थ ब-याच घरांमधून खाण्यासाठी वर्ज्य होतात. म्हणून मग मोसमातला शेवटचा कांदा, नवमीलाच खाऊन घ्यायचा हा या प्रथेमागचा उद्देश. मग "चातुर्मास कांदा आदि पदार्थ वर्ज्य का ?" या विषयावर आमच्या बालपणी आम्ही उगाचच हुच्च्पणाने घरातल्या वडीलधा-यांशी घातलेला वाद आठवला. तरूण वयात "वातूळ" शब्दाशी परिचय झालेला नसतो. वातविकार म्हणजे काय ? आणि हे विकार माणसाला काय "वात" आणतात हे जाणायला वयाची किमान चाळीशी तरी गाठावी लागते. मग एखाद्या वेळी पालेभाजी, वांग्याची भाजी नीट न पचल्यामुळे पोटात वात धरतो, कूलरसमोर रात्रभर झोप घेतल्यानंतर हाताची बोटे आखडतात. आणि मग वातूळ पदार्थ का खाऊ नयेत ? याच आपणच उपदेशन करायला लागतो.

मग आता चातुर्मास म्हणजे पावसाळ्याचे दिवस. पचनशक्ती नैसर्गिक रित्याच कमजोर झालेली असते त्यात पुन्हा वातूळ पदार्थ खाणे म्हणजे शरीर नामक यंत्रावर अत्याचार करणेच. म्हणून मग चातुर्मास कांदा लसूणादि वातूळ पदार्थ वर्ज्य. मग कांदेनवमीलाच घ्या सगळे हाणून.

पुन्हा मनात विकल्प आलाच की मग नवमीला का ? दशमीला का नाही ? व्रताचा आरंभ जर एकादशीपासून असेल तर मग मध्ये हे एक दिवसांचे बफ़र का ? मग हळूहळू आधुनिक विज्ञानाने उत्तर दिल की मानवी पचनसंस्था शाकाहारी पदार्थ पचवायला ३६ तासांपर्यंत वेळ घेत असते. मग नवमीला खाल्लेला कांदा पचन व्हायला एकादशी उजाडतेच. आपल्या पूर्वजांच्या वैज्ञानिक ज्ञानाबद्दल अभिमान वाटावा अशा अनेक गोष्टींमधली ही एक गोष्ट. कथा नवमीच्या कांद्याची.
Saturday, July 1, 2017

एका अनवट जागेचा प्रवास. Oh Darling, Yeh Hai India.

पवनी हे नागपूरपासून साधारण ८० किमी वर असलेले एक गाव. वैनगंगेच्या सतत प्रवाहाने पुनीत झालेले हे गाव. हल्ली गावाच्या थोड्या आधी गोसीखुर्द प्रकल्पाने वैनगंगेची संततधार जरी अडवली असली तरी वैनगंगा नदीला भरपूर पाणी असतेच. दत्त संप्रदायातील दत्तावतार परमहंस परिव्राजकाचार्य परम पूजनीय वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी याच ठिकाणी १९०९ मध्ये चातुर्मास वास्तव्य केले होते त्यामुळे समस्त दत्त भक्तांसाठी हे एक तीर्थक्षेत्रच आहे. 


वैदर्भीय अष्टविनायक क्षेत्रांपैकी पंचमुखी गणेशाचे मंदीरही पवनीलाच आहे. त्यामुळे गणेश उपासकांचेही पवनी हे आराध्यस्थान आहे. इतिहासकालीन ही नगरी वाकाटकांची राजधानी असल्याचे पुरावेही इतिहासकारांना सापडले आहेत. शहराच्या भोवताली असलेला तट तत्कालीन वैभवाची साक्ष देत शेकडो वर्षांपासून अजूनही उभा आहे.

नागपूरला यापूर्वीच्या वास्तव्यात पवनीला ब-याचदा जाणे व्हायचे. मुख्य हेतू दर्शन हाच असे. तसेच आताही नागपूरला परत आल्यावर दोनतीनदा जाणे झालेच. आता आता माझ्या लक्षात आले की नागपूर - नागभीड या नॅरोगेज रेल्वेमार्गाची सोबत आता काही दिवसच आहे. जंगलातून जाणा-या आणि नितांत रमणीय प्रदेश दाखवणा-या या मार्गाला लवकरच बंद करून रूंदीकरणाचे काम सुरू होणार.  

 रूंदीकरणामुळे फ़ायदे कितीही असलेत तरी आमच्यासारखे रेल्वेफ़ॅन्स मात्र हळहळतात. मुंबईतून ट्राम बंद झाल्यानंतर "साला, ती धा नंबरची ट्राम तरी ठेवायला हवी होती" या कळवळ्यामागची अस्सल मुंबईकराची भावना आम्ही रेल्वेफ़ॅन्स ओळखू शकतो. "ती नागपूर - नागभीड तरी नॅरोगेजच ठेवायला हवी होती" असे उदगार दोनतीन रेल्वेफ़ॅन्स जमले की निघतात.

या मार्गावरचे पवनी जवळचे पवनी रोड हे हॉल्ट स्टेशन. दरवेळी निलज फ़ाट्यावरून पवनी कडे जाताना याच्याकडे लक्ष जायचे पण आता वियोगाच्या कातरतेने यावेळी इथे थांबायचे ठरले. "जरा विसावू या वळणावर" म्हणत पवनीवरून परतताना आम्ही गाडी या अगदी चिमुकल्या स्टेशनच्या छोट्याश्या प्रांगणात उभी केलीच.इतक्या चिमुकल्या स्टेशनाचा थाट वेगळाच. प्रथमदर्शनी ह्या स्टेशनाने मला खिशात टाकले. पुढल्या वेळी कधीतरी डब्बा पार्टीसाठी इथे येऊयात ही सूचना माझ्याकडून आपसूकच निघाली. (पण लगेचच "हॅ.. स्टेशनावर काय डब्बा पार्टी करायची ?" हा प्रस्ताव विरोधी पक्षाने मांडून माझा २ विरूद्ध १ असा जंगी पराभव केला. पण मी पण सत्याग्रह करून एक दिवस पिकनिकसाठी इथे येवून डब्बा इथेच खाण्याचा माझा निर्धार मनात पक्का केला.)

 पुल इथे आले नसावेत नाहीतर "काही अप्स काही डाऊन्स" मध्ये याचा नक्की समावेश झाला असता. इतका चिमुकला फ़लाट की त्याने "प्लॅटफ़ॉर्म" म्हटल्यावर लाजावे असा.


अनंतात विरून जाणारे चिमुकले रेल्वे रूळ. इतक्या निवांत स्टेशनावर आपणही अंतर्मुख होऊन जातो. अशा वेळी शांततेत आणि चिंतनात किती वेळ जातो याचा पताच लागत नाही.चिमुकली गाडी, तिचे चिमुकले एंजिन. पण भारतीय रेल्वेचे कामकाज चोख. मोठमोठ्या स्टेशन्सवर "एंजिन थांबा" अशा पाट्या असतात त्याला हे चिमुकले स्टेशनही अपवाद नाही. पुढे दिसतोय तो नागपूर - निलज - पवनी रस्ता. थांब्यावरून प्रवासीही कमीच असणार. त्यांना थांबायला हा चिमुकला प्रवासी निवारा आणि तिकीट खिडकी. दिवसभरात ४ गाड्या जाणा-या, ४ येणा-या. प्रवासभाडीही १० रूपयांपासून २५ रूपयांपर्यंत. भारत अशाच अनंत तुकड्यांचा एक विस्तीर्ण कोलाज आहे. त्या सर्व तुकड्यांना जोडण्यात भारतीय रेल्वे १६० वर्षांपासून आपला हातभार लावते आहे.