Wednesday, January 5, 2011

काही गंमतीशीर आणि वर्णनीय प्रवास क्र.१

१३/२/१९९२.
य़शवंतराव चव्हाण नाट्यगृह, कराड. रात्री चे साडेबारा वाजताहेत. आमची "अर्थ-अनर्थ" एकांकिका संपतेय. एकांकिकेच्याच चर्चा, गप्पा रंगलेल्या आहेत. मध्येच कुणीतरी मित्र आठवण करून देतो की राम्या लेका तुला उद्या सकाळी लवकर उठून नागपूर ला जायचय ना? मग पळत पळत होस्टेल गाठतोय आणि रात्री दीड च्या आसपास झोपतोय. पार्टनर ला सकाळी ६ ला उठवण्याची आठवण कम तंबी.

१४/२/१९९२.
सकाळचे ७ वाजलेत. चिंच्या (पार्टनर) गाढ झोपलाय. मी उठतोय आणि घड्याळात पाहून सरळ अंगात शर्ट पॆण्ट चढवून तयार. दात घासायला, अंघोळी बिंघोळी साठी वेळच नाहीये. एव्ह्ढेच काय तर भांग पाडायला सुद्धा वेळ नाही. सकाळी सव्वा नऊ वाजताची गोवा-दिल्ली ए़क्सप्रेस सातारा स्टेशनावरून पकडायची आहे. कराड ते सातारा कमीत कमी १ तास व सातारा ते सातारा स्टेशन अर्धा तास. हॊस्टेल वरुन कराड बस स्टॆण्ड पर्यंत १५ मिनिटे. सातारा ते नागपूर टिकीट पण काढायचेय. टेन्शन... टेन्शन..... टेन्शन.......
कराड बस स्टॆण्ड. सकाळचे सव्वा सात. नेहमी असतो तसा बस निवडत वगॆरॆ बसायला वेळ नाही. पहिली बस आलीय.इस्लामपूर जलद पुणे.
MH-12 /F 2898.

म.का.दा. न.टा. ६१७, १९९०-९१.
TATA 1510,
चेसिस नंबर ५२४७१०,
सां. इस्लामपूर आगार. ३*२, एकूण ५५ आसने. माझा आसन क्र. १.
बस लगेच निघतेय. फ़क्त उंब्रज ला थांबून सातारा ला सकाळी साडे आठ ला पोहोचतेय. पंचावन किलोमीटर सव्वा तासात. Average speed ४४ किमी प्रतितास. Thats OK.
माझ मलाच हसायला येतय. किती घाईत निघालोय!
सातारा बस स्थानकावर रिक्शा शी हुज्जत घालत शेवटी थोड्या चढ्या भावानेच सातारा स्टेशन गाठ्तोय. नऊ वाजायला आलेत. तिकीट खिडकी वर फ़ार रांग नसावी ही माझी इच्छा.
अजिबात गर्दी नाही. कारण गाडी चक्क १ तास लेट आहे. सुट्केचा निश्वाःस टाकत तिकीट काढून प्लॆट्फ़ॊर्म वर पोहोचतोय. टुमदार छोटेसे सातारा स्टेशन.
छोटीताई (माझी मोठी मामेबहीण) च्या लग्नाला चंद्रपूर ला जायचय. सगळ्यांच आग्रहाच निमंत्रण. जायला हवच आहे. पण एकांकिका स्पर्धा होत्याच आणि त्यात एन्ट्री फ़ार आधीच गेली होती म्हणून मग ही पळापळ. नागपूर ला थेट जायला महाराष्ट्र एक्सप्रेस आहे पण ती उशीरा पोहोचेल म्हणून हा वेगळाच प्रवास.
सकाळचे साडे दहा वाजताहेत. कोरेगाव कडल्या दिशेला सिग्नल पडलाय. वळणावर दूरवर धूर दिसतोय. एंजिनाच धूड लांबच लांब गाडीला घेऊन १ नंबर प्लॆटफॊर्म वर येतय.२७०१ डाऊन मिरज ह.निझामुद्दीन गोवा सुपर एक्सप्रेस.
(त्या वेळी मिरज ते वास्को द गामा हा मार्ग मीटर गेज होता. २७०१/२७०२ फक्त मिरज पर्यंतच जायची व मिरज पासूनच सुटायची. मिरजेच्या पुढे हीच गाडी मीटर गेज ने वास्को द गामा पर्यंत जायची. पुणे कोल्हापूर रेल्वे मार्गावर धावलेली ही पहिली सुपरफास्ट गाडी. तिच बरच कौतिक आम्हाला होत. आणि गाडी होतिच तशी कवतिक करण्यासारखी. मिरजे वरुन थेट सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर,मनमाड, भुसावळ करीत दिल्ली ला जायची.)
(या गाडी च्या आकर्षणाचा आणखी एक भाग म्हणजे आमची नेहेमीची महाराष्ट्र एक्सप्रेस जाताना आणी येतानाच्या प्रवासातही मनमाड ते पुणे हा प्रवास किट्ट काळोखात करायची. त्यामुळे आमच्या नागपूर ते कराड या प्रवासात अहमदनगर, दौंड ही स्टेशन्स लागतात ही खबर आमच्या काही दोस्तांना २ वर्षांनंतर लागली. २७०१/२७०२ हा प्रवास दिवसा ढवळ्या करायची त्यामुळे हा भाग कधी नव्हे तो बघायला मिळायचा.)
एन्जिन क्र. : 17148 , WDM 2, C.R. Diesesl Shed इटारसी,
Manufactured by: Diesesl Locomotive Works, Varanasi, in May 1969.

गाडी ची पोझिशन खालील प्रमाणे:
एस-४, एस-१, एस-२, एस-३, ए-१, ए-२, एफ़-१, एस-५, एस-६ ,एस-७, एस-८, जनरल, जनरल, जनरल + रेल्वे डाक सेवा, जनरल, गार्डाचा डबा व ब्रेक व्हॆन. (एकूण १६ डबे).
(त्यावेळी ही गाडी आपला रेक ७०२१/७०२२ हैद्राबाद-ह.निझामुद्दीन दक्षीण एक्सप्रेस शी शेअर करायची. त्यामुळे ए.सी. कोचेस च्या आधी चे एस-१ ते एस-४ कोचेस ह.निझामुद्दीन -विशाखापट्टणम लिंक एक्सप्रेस चे व उरलेला रेक ह.निझामुद्दीन-हैद्राबाद असा असायचा. गाडी च्या बोर्डांवरही असेच ड्युएल मार्किंग असायचे. एकाच बोर्डावर वर हैद्राबाद-ह.निझामुद्दीन किंवा ह.निझामुद्दीन -विशाखापट्टणम आणि खाली मिरज ह.निझामुद्दीन असे मार्किंग असायचे.)
मी आपला एस-२ मध्ये गेलो. गर्दी अजिबातच नव्हती. थोड्या वेळाने टी.टी.इ. आला की रिझर्वेशन चार्ज भरायचा आणि आरामात या डब्यातून प्रवास करायचा हा माझा मनसूबा होता. (तेव्हा स्लीपर हा वेगळा वर्ग नव्हता. सेकण्ड क्लास चे तिकीट घेऊन रिझर्वेशन चार्ज भरुन स्लीपर मध्ये बसता यायचे.)
कोच नं. 6712, द.म., एस-२ कोच, त्रिस्तरीय शयनयान.
Manufactured by: Rail Coach Factory, Kapoorthala,
Shell No. : WGSCN 352,
Date: September 1990.
एकूण आसने व शायिका: ७२.
त्यामानाने हा नवीन च कोच होता. महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आम्हाला १९७० च्या दशकातले जुने पुराणे कोचेस मिळायचेत.
गाडी लगेचच हलली. सातार वरून बसणारे आम्ही हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेच पासिंजर होतो. गाडीतही गर्दी नाहीच.
मजेत प्रवास सुरु झाला. काल रात्री च्या एकांकिके ची धुंदी होतीच. मस्त वातावरण. ढगाळ वातावरण होते. ट्रेन प्रवासात माझी सुखाची व्याख्या अशी साधी सोपी आहे की गाडी जरा रिकामी असावी, समोर कुणी सहप्रवासी जागा अड्वून नसावा, आपल्याला साइड लोअर बर्थ मिळाला असावा, मस्त पैकी पाय पसरून बसता यावे, वाटलच तर लवंडता यावे, ड्रायव्हर जरा जोसात असावा आणि मोठी मोठी स्टेशन न घेता गाडी तुफ़ान धावावी. हा सगळा योग आज जुळून आला होता.
गाडी आदर्की वाठार च्या घाटांतून धावतेय. उशीर झाल्यामुळे जरा मेक अप करण्यासाठी वेगही आहे आणि आता पुढचा थांबा पुणे. जरी सिंगल लाईन असली तरी या गाडीला थांबवणार नाहीत हा अनुभव. उलट ह्या गाडी साठी इतर गाड्या थांबवल्याचा आमचा अनुभव. आता एक तास गाडी लेट धावतेय पण सहज हा वेळ भरून काढेल. भुसावळ स्टेशन वरून पुढे दादर-नागपूर जर मिळालीच तर ठीकच नाहीतर तिच्या मागची अहमदाबाद-हावडा तर नककी मिळेलच.
अपेक्षेप्रमाणे घोरपडी साडे बारा च्या सुमारास आलय पण इथे मात्र गाडी जरा जास्तच वेळ थांबतेय. अर्धा तास झाला तरी हलण्याची चिन्हे नाहीत. बाजुलाच पुण्याच डिझेल शेड. त्यात डिझेल इंजिनांची ये जा चाललीय पण आता पुढल्या प्रवासाचे वेध आणी काळजी लागलीय.
आता ढगाळ वातावरण जास्तच जाणवू लागलेय.पाऊस कधीही सुरू होइल ही अवस्था.थोडी चौकशी केल्यावर कळतय की काल मुंबई ला फ़ार पाऊस झालाय. गाड्या सगळ्या अडकल्यात. पुणे स्टेशन वर प्लॆट्फ़ॊर्म च रिकामा नाही. इथे वाट बघत बसण्याशिवाय पर्याय नाहीय.
पेन्ट्री कार वाल्या पोरांची वाट बघणे सुरू आहे. भुकेची जाणीव तीव्रतेने होतेय. काही तरी पोटात ढकलून पुन्हा गाडी हलण्याची वाट सगळेच बघत आहेत. सगळ्यांच्या काळजी युक्त चर्चा वगैरे वगैरे.

अखेर दुपारी अडीच वाजता गाडी हलतेय.हळू हळू पुण्यात आलीय. प्लॆट्फ़ॊर्म ५ वर गाडी घेतलीय. नॊर्मली २ नं किंवा ३ नं च्या प्लॆट्फ़ॊर्म वर ही गाडी घेतात. आज प्लॆट्फ़ॊर्म मिळाला हे ही नसे थोडके.
पुणे स्टेशन वरही चांगला तासभर मुक्काम होतोय. पण इथे आजुबाजूला खुप नवनवीन गाड्या. वेळापत्रक कोलमडल्यामुळे ज्या गाड्या नेहेमी दिसत नाहीत त्या दिसताहेत.वेळ कसा गेला कळत नाहीय.
साडेतीन ला एंजीन उलट बाजूला लावून गाडी हललीय. पुन्हा वेग. पण आता भुसावळ वरुन पुढे जायला कुठली गाडी मिळणार याची चिंता.
दौंड येइ पर्यंत संध्याकाळ चे सव्वा पाच वाजलेत. दौंड ला पुन्हा एंजीन उलट बाजूला लावण्याची कसरत सुरू झालीय आणि एवढ्या वेळात मला लागलेला शोध म्हणजे बाजूचाच एस-३ हा नवीन डबा आहे आणि तो जास्त रिकामा आहे. लगेचच त्या डब्यात मी शिफ़्ट झालोय.
कोच नं. 8399, द.पू. एस-३ कोच, त्रिस्तरीय शयनयान.
Manufactured by Rail Coach Factory, Kapoorthala,
Shell No. WGSCN 1104,
Date: September 1991
एकूण आसने व शायिका: ७२.
दौंड वरून गाडी संध्याकाळी पावणे सहा ला हललीय आता मात्र सगळा बॆकलॊग भरुन काढण्यासाठीच जणू ड्रायव्हर काकांनी जोसात हाणलीय.सगळ्यात तीव्र जाणीव होतेय ती झोपेची.माझ्या नकळत मी डुलक्या घेता घेता कधी झोपी गेलोय ते मलाच कळत नाही. नाटकाच्या तालमींची जागरण, प्रत्यक्ष नाटकाच्या दिवशी रात्री उशीरा पर्यंत झालेला प्रयोग यामुळे अपुरी झोप आता ओसंडून वाहतेय.वैदर्भिय भाषेत सांगायच तर झोप अंगाच्या बाहेर झालीय.
जाग आल्यावर जाणीव की गाडी कुठल्या तरी मोठ्या स्टेशनावर थांबलीय. हळू हळू कळतय की हे तर मनमाड स्टेशन. पूर्ण पणे जाग आलेली नसतानाही मी भराभर आवरासावर करतोय. काय करायच? कुठे जातोय? काहीच कळत नसतानाही मी प्लॆट्फ़ॊर्म वर उतरलोय आणी भराभर जिना चढून ओव्हरब्रिज वर पोहोचतोय.
तिथे पोहोचल्यावर ब्रेक जर्नी साठी टी.टी.इ. समोर तिकीट सादर केल्यावर तो सल्ला देतोय की काल मुंबईतही बराच पाऊस झाल्याने गाड्यांचा गोंधळच आहे. खूप गाड्या भुसावळ पर्यंतच आहेत. त्यामुळे तुम्ही गोवा-दिल्ली गाडीने भुसावळ पर्यंत जा तिथून तुम्हाला चांगला ऒप्शन मिळेल.मी परततोय न परततोय तोच गाडी हलतेय.थोडा धावूनच गाडी पकडावी लागतेय. तोच डबा. तोच बर्थ. आणि......
तिथे परतल्यावर लक्षात येतय की मघाशी उतरताना अर्धवट झोपेत आणि कसल्यातरी अनामिक घाईत मी माझी सूट्केस जी बर्थ ला बांधून ठेवली होती ती तशीच होती. गडबडीत ती घ्यायलाच मी विसरलो. मग हळूहळू झोप उडाली आणि विचार केला की मी नक्की काय घेऊन उतरलो होतो? लिटरली काहीच नाही. सूट्केस नाही. पाण्याची बॊटल नाही. फ़क्त चप्पल घालून मी उतरलो आणि वेड्या सारखा धावलो होतो.जर ही गाडी निघून गेल्यावर टी.टी.ई. भेटला असता तर काहीच खर नव्हत. स्वतःची एकाच वेळी खूप चीड येत होती आणि हसायलाही येत होत. असा कसा मी वागलो? कळण्याच्या पलिकडले होते. मग घड्याळाकडे लक्ष गेले. रात्रीचे सव्वा नऊ वाजले होते. झोप तर पुरती उडालेली होती. गाडी वेगात धावत होती. डिझेल एंजिन काढून आता इलेक्ट्रिक एंजिन लावलेले होते त्यामुळे आणि आता दुहेरी मार्ग होता त्यामुळेही.
रात्री साडे अकरा वाजता भुसावळ येतय. आता मात्र पूर्णपणे जागा होऊन सगळ्या वस्तुंसकट मी खाली उतरतोय.फ़लाटावर तुफ़ान गर्दी. सातारा ते भुसावळ ७२५ किमी अंतर १३ तासात. सरासरी वेग ५६ किमी प्रतितास. गाडीने बराच वेळ भरून काढलाय.
भुसावळ स्थानकात गोंधळाचे वातावरण. पुष्कळ गाड्या थांबलेल्या. बहुतांशी मुंबई कडे जायला तयार असलेल्या.हळूहळू एकेक गाडी मुंबई कडे रवाना होतेय. काही मुंबई कडून इटारसी कडे प्रस्थान करताहेत. नागपूर कडे एकही नाही. आता मात्र काळजी वाढलीय.
भुसावळ ला थोडस काहीतरी खाऊन वाट बघणे सुरू आहे. रात्री चे साडे बारा वाजताहेत.
अचानक घोषणा होतेय. २८५९ गीतांजली एक्सप्रेस तब्बल १३ तास उशीरा धावतेय. म्हणजे रात्री अडीच पर्यंत येइल. जीव भांड्यात पडलाय पण आता नवीनच काळजी.गाडीत जागा असणार का? बंगाली लोकांचा यापूर्वी चा जागा शेअर करण्याबाबतचा अनुभव फ़ार चांगला नाही. ते जागा द्यायला कमालीचे नाखुश असतात.
१५/२/१९९२

रात्री दीड ला गाडी येतेय.
२८५९ डाऊन मुंबई-हावडा गीतांजली सुपर एक्सप्रेस.
एन्जिन क्र. 21343 , C.R. भुसावळ
Manufactured by: Chittaranjan Locomotive Works


गाडी ची पोझिशन खालील प्रमाणे:
गार्डाचा डबा व ब्रेक व्हॆन, एस-१, एस-२, एस-३, एस-४, एस-५, एस-६, एस-७, पेन्ट्री कार, एस-८, एस-९, एस-१०, एस-११, एस-१२, ए-१, गार्डाचा डबा व ब्रेक व्हॆन. (एकूण १६ डबे).
आणी आनंदाची बाब म्हणजे गाडी चक्क रिकामी आहे. ही गाडी काल मुंबई पर्यन्त गेलीच नाही. पावसामुळे नाशिक वरूनच परत पाठवलीय. मी तर टुणकन उडीच मारतोय. एस-२ कोच चांगला दिसतोय. मी आत शिरलो.
कोच नं. 8076, द.पू .एस-२ कोच, त्रिस्तरीय शयनयान.
Manufactured by: Integral Coach Factory,Madras
Shell No. : BGSCN 3464,
Date: 23-3-1990.
एकूण आसने व शायिका: ७२.
हा डब्बा सुद्धा नवीन, छान आहे. नवीन डब्यांमध्ये बसण्यासाठी आम्ही किती व्याकुळ असतो ते महाराष्ट्र एक्सप्रेस मधून लांबवरचा प्रवास केल्याशिवाय कळणार कसे?
खुप वेळ थांबून गाडी पहाटे ३ वाजता निघतेय. आता मस्तपैकी ताणून द्यायचा विचार पक्का झालेला.अकोला व बडनेरा हे दोनच थांबे घेऊन गाडी बरोबर सहा तासांनी सकाळी नऊ वाजता नागपुरात प्रवेशते. ३९१ किमी सहा तासात.सरासरी खूपच चांगली. ६५ कि.मी.प्रतितास.
चला पोहोचलो एकदाचे. आता नागपूर ते चंद्रपूर प्रवास म्हणजे घर आंगण.
घरी पोहोचतोय तो घराला कुलूप. मी येणार असल्याच पत्र घरी मिळालेल दिसत नाही. मी येणार नाही अस समजून घरचे सगळे कालच चंद्रपूरला गेल्याचे शेजारांकडून कळले. त्यांचा थांबण्याचा, फ़्रेश वगैरे होण्याचा आग्रह टाळून मी चंद्रपूरच्या ओढीने नागपूर बस स्थानकात.
एव्हाना सकाळ्चे ११ वाजत आलेले. किती युगांपासून आपण प्रवास करतोय ! अशी मनःस्थिती झालेली. कालचा दिवसभर आंघोळ झालेली नाही. ११०० किमी चा प्रवास झालेला आणखी १५० किमी बाकी. पण आता तोच खूप जड वाटू लागलेला.
नागपूर स्थानकात बस उभीच आहे. जरा नवीनच आहे.
नागपूर सुपर राजुरा
MH-31/8570,

म.का.ना. न.टा. ३०४, १९९०-९१.
TATA 1510,
चं. राजुरा आगार. ३*२, एकूण ५५ आसने. माझा आसन क्र. ६.
चांगली साडे अकरा वाजता बस निघालीय. मी मात्र दोन दिवसांची अपुरी झोप डोळ्यात साठ्वून जागा राहण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय.नागपूर चंद्रपूर प्रवासात झोपायच म्हणजे काय? छे! काहीतरीच! पण झोप अनिवार झालेली आहे.
जाग येतेय तेव्हा बस जांब ला थांबलीय.खाली उतरण्याची इच्छा नाहीय. पण शरीर धर्माच्या सादेला ओ देण्यासाठी उतरतोय.
बस जांब वरुन निघता निघता पुन्हा झोपेच्या आधिन झालोय.बराच वेळ झालाय, बस चा आवाज येत नाहीय.थोडा थोडा जागा झालोय आणि कळतय की बस थांबलीय.थोडी जाणिव झालीय की घोडपेठ आलय.इथून चंद्रपूर फक्त २० किमी वर. दुपारचे दीड वाजताहेत. बस चा टायर पंक्चर झालाय.त्या दुरूस्ती साठी बस खोळंबलीय.कंडक्टर ला मदत करायला खाली उतरलेली इतर माणसे थोड्या कुचेष्टेने, थोड्या सहानुभूतीने, गंमत म्हणून बघताहेत.(हा कदाचित माझा भास ही असू शकेल).मी मात्र आता या प्रवासाला जाम वैतागलोय.कधी येणार चंद्रपूर? तिथे मंगल कार्यालयात जाण्याची तयारी सुरूही झाली असेल. इतक्या ऐनवेळेवर जाऊन मी काय करणार?(अर्थात आधी जाऊनही काय असे दिवे लावणार होतो म्हणा?) इ.इ. विचारमाला मनात सुरू झालेल्या आहेत.
तासाभरानंतर बस हललीय. चंद्रपूर ला पोहोचायला दुपारचे ३.१० झालेत. १५३ किमी ३ तास चाळीस मिनीटांत.
एकूण १२६० किमी प्रवास ३२ तासात. वैताग,वैताग,वैताग. पण चंद्रपूर आलय. आता आनंदी आनंद.
माझ्या सर्व प्रवासांमध्ये माझे काही आराखडे असतात. रेल्वे प्रवास जर ६० किमी प्रतितास किंवा जास्त वेगात झाला तर सुपर फास्ट. ५० किमी प्रतितास ते ६० किमी प्रतितास - जलद. आणि त्यापेक्षा हळू असेल तर ऒर्डिनरी.
बस प्रवासात जर ५० किमी प्रतितास किंवा जास्त वेगात झाला तर सुपर फास्ट. ४५ किमी प्रतितास ते ५० किमी प्रतितास - जलद. आणि त्यापेक्षा हळू असेल तर ऒर्डिनरी.

Photo courtesy: www.irfca.org

3 comments:

 1. Ram you are tooooooooooo great. I fascinated by the records you have. I am proud of you dear,
  Abhijit
  9619477474

  ReplyDelete
 2. TODAY ALONGWITH MR. KIRAN MENDOLE. WE DERIVE THE ACTUAL PLEASURE OF JOURNEY SPECIALLY IN S.T. BUS. KEEP WRITING SO THAT WE CAN ENCASH CHILDHOOD MEMORIES.

  Yours NANA
  (Nitin Deshkar)

  ReplyDelete
 3. Dear Ram, Got to know about your blog. It is very lively and brought back memories of our college days also. All the best and keep it up- Anand Deshmukh aka Chandu

  ReplyDelete