Thursday, July 28, 2016

वाढदिवस : एक सोहळा

तसा माझा तिथीने वाढदिवस गुरूपौर्णिमेला येतो आणि आमच्या महाराजांकडे (प.पू. बापुराव महाराज आणि प.पू. मायबाई महाराज खातखेडकर, नागपूर) खूप आनंदात, खूप आशिर्वादांसह आणि सगळ्या आत्मीयांच्या आनंददायी सहवासात सहज साजरा होतो. तसा तो यावर्षीही साजरा झाला.


                                         वंदनीय श्री बाबाकाका आशिर्वाद्पर पुष्पगुच्छ देताना.

खरतर "आपण जगाच्या केंद्रस्थानी नाहीत" अशी रास्त समजूत असणा-या पीढीत आमचा जन्म झाला. त्यामुळे आपण कुणाच्यातरी कामी याव, कुणाला मदत करावी, एखाद्या कार्यात उत्साहाने भाग घ्यावा या सर्व घडामोडींमध्ये प्रचंड आनंदी असलेला मी मात्र माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आजकाल पार गोंधळून जातो, मिटून जातो. बर जगरहाटी नाकारून या दिवशी अज्ञातवासात जाण्याचा वगैरे विचारही येतो पण तेव्हढं धाडस नाही आणि पुन्हा समर्थांची "लोकाचारे वर्तावे" ही शिकवण आठवतेच. मग आतल्या आत संकोचत असताना चेहे-यावर उसने हसू घेऊन दिवसभर वावरावे लागते.

आमच्या बालपणी हा एक घरगुती सोहळा असायचा. आईने घरी ओवाळणे, त्यादिवशी घरी मार मिळणार नाही याची खात्री असल्याने जरा जादाच धीटपणा घरी करणे, नवीन कपडे वगैरे चैन वर्षातून फ़क्त वाढदिवस आणि दिवाळीच्याच वेळेला असल्याने नवीन कपड्यांचा तो वेगळा गंध, त्याची इस्त्री या सगळ्यांचच खूप अप्रूप असणे, गोडधोडसुद्धा वारंवार घरी होत नसल्याने या वाढदिवसाला घरी काय मेन्यू याची आतूरतेने वाट बघणे या सगळ्या हरवलेल्या गोष्टींच्या स्मरणरंजनात रमून जायला होत. शाळेत त्यादिवशी युनिफ़ॉर्म न घालता नवे कपडे घालून जाणे आणि मित्रमंडळींना गोळ्या चॉकलेटस वाटणे यात कोण आनंद वाटायचा ! 

आजकाल त्या आनंदाची जागा जरा संकोचाने घेतलीय. कार्यालयात सहका-यांनी, विद्यार्थ्यांनी केक्स आणणे, ते समारंभाने कापणे त्यानिमित्त एक छोटेखानी समारंभ होणे यात मला खरोखर अवघडल्यासारख होत. मी इतका "थोर" वगैरे कधी झालो ?  याची माझी मलाच चिंता वाटू लागते. आशिर्वाद देणारी मंडळी कमी झाली की वाढदिवसाची मजा तेव्हढी येत नाही हा माझा अनुभव. मग सुवर्णमहोत्सव, हीरक महोत्सव आणि सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यात मा्झे काय होईल याच्या कल्पनेनेच माझा थरकाप उडतो. (हो, गांधीजींप्रमाणेच मलाही १०० , १२५ नाही तरी ८०,  ८५ वर्षे जगण्याची जिजीविषा आहेच.जग बघायचे आहे. कामे करायची आहेच.)

२०१६ मध्ये तर कमालच झाली. उठल्या उठल्या आमच्या कन्यारत्नाने स्वहस्ते तयार केलेल्या भल्यामोठ्या शुभेच्छापत्राने आमचे बैठकीच्या खोलीत स्वागत केले. गेले ४,५ दिवस तरी हा उपक्रम माझ्या अगदी नकळत घरात सुरू होता तर. संकल्पना आमचे कन्यारत्न आणि त्यांना साथ त्यांच्या मातोश्रींची. आमचे कन्यारत्न नवीन पीढीतले असल्याने सरप्राइज गिफ़्ट, केक, पार्टी वगैरे शिवाय वाढदिवस साजरा होतो यावर तिचा विश्वासच नाही.सकाळी सकाळी फ़ेसबुकवर आमचे फ़ेसबुक मित्र आणि मुंबईतले प्रख्यात फ़लज्योतिषी धोंडोपंत आपटे यांची बुधाच्या रेवती नक्षत्रावरची पोस्ट वाचली आणि दिवसभर त्याची प्रचिती घेतली. फ़ेसबुकवर मित्र, आजी व माजी विद्यार्थी सुहृद आणि थोरामोठ्यांच्या शुभेच्छा, आशिर्वादांचा ओघ सुरू झालाच होता. त्या सगळ्यांचे वैयक्तिक आभार मानून, दूरध्वनीवरून शुभेच्छांचा स्वीकार करीत पूजेसाठी बसलो असताना डोअरबेल वाजली. सुपत्नीने दार उघडले तर शेवटच्या वर्षाला शिकणा-या विद्यार्थ्यांनी पाठविलेला केक घेऊन कुणीतरी दारात उभे. त्याचा स्वीकार झाला. वेळ नसल्याने त्याचा आस्वाद सायंकाळी घ्यायचे ठरले.

महाविद्यालयात नेहेमीप्रमाणे अध्यापन सुरू झाले. विद्यार्थ्यांनी "सर, आज तुमचा वाढदिवस आहे, तेव्हा आज काही शिकवू नका" वगैरे मागण्या केल्याच पण त्यांचा अंतस्थ हेतू ओळखून त्याला स्पष्ट नकार देत अध्यापनकार्याला प्रारंभ केला. दुपारी १२ च्या सुमारास जेवणासाठी घरी जाण्याच्या तयारीत असताना तृतीय वर्षाला शिकणा-या विद्यार्थ्यांनी कार्यालयातच घेराव घातला आणि दिवसातला दुसरा केक कापावा लागला. आपण केक कापत असताना सगळी मंडळी बाजूला उभे राहून सुरात, टाळ्या वगैरे वाजवत "हॅपी बर्थ डे टू यू" वगैरे म्हणत असली तर आपण नक्की काय करायच ? हा मला पडलेला सनातन प्रश्न आहे. मी प्रचंड अनकंफ़र्टेबल होऊन जातो. चेह-यावर उसने हास्य आणून आनंदी दिसण्याची कसरत इतर कुठल्याही प्रसंगी मला करावी लागत नाही. जेवणात पुरणपोळी आणि वैदर्भीय वडाभाताचा बेत होता. आडवा हात मारला. मंगळवारी दुपारी अध्यापन नसल्याचा पुरेपूर फ़ायदा घेतला. मंगळवारी दुपारी सर्व विभागप्रमुखांची अधिष्ठात्यांसोबत बैठक असते त्यामुळे सर्व विभागप्रमुखांना अध्यापन कार्यातून सुटका असते. बैठकीतही सगळ्या सहका-यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला आणि बैठकीअंती महाविद्यालयीन प्रथेप्रमाणे आमच्या महाविद्यालयीन निर्देशकांकडून शुभेच्छापत्र आणि पुष्पगुच्छाचाही स्वीकार झाला.परत विभागात परतलो तो विभागातल्या सहका-यांनी आणलेला केक कापावा लागला. दिवसातला तिसरा केक. या समारंभाला आमचे अधिष्ठाताही होते. एक छोटेखानी समारंभच तिथे झाला.

                                      विभागातील सहकारी प्राध्यापक आणि अधिष्ठात्यांसह

 घरी परतलो. हातपाय धुवून पुन्हा नवे कपडे घातलेत. मग पत्नी आणि कन्यारत्नाने ओवाळले आणि दिवसातला चौथा केक कापावा लागला. बुधाच्या रेवती नक्षत्रावर बहुधा आज मी केक कापायला सुरूवात केली असावी याची खात्रीच पटली. 


  आजवर ४४ वर्षे जगलोय. आता मात्र एव्हढा वेळ बहुधा उपलब्ध नसणार. आजवर साजरे झाले तेव्हढे वाढदिवस आता साजरे होणार नाहीत. पदार्थ विज्ञानाच्या भाषेत हाफ़ लाइफ़ पिरेड पेक्षा जास्त काळ झालाय. काय कमावल आणि काय गमावल याच चिंतन करीत निद्रादेवीच्या राज्यात प्रवेशकर्ता झालो.

Tuesday, July 5, 2016

माझे वृत्तपत्रीय जीवन

काल माझ्या एका भाजप कार्यकर्ता मित्राचा "लोकमत" दैनिकाबद्दलचा निषेध लेख फ़ेसबुकवर वाचला आणि त्याच्या कॉमेंटस मध्ये एकाने "भाजप कार्यकर्ता असताना लोकमत सारखे दैनिक घरी येतेच कसे ? " म्हणून त्याला सुनावल्याचेही वाटले. हा विचार आम्हाला जवळचा वाटला. आमच्या घरी आजवर अनेक दैनिकांनी हजेरी लावली पण लोकमत ? नाही म्हणजे नाही. अगदी १ रूपयात अंक देवूनही, ५० रूपयांत वर्षभराची वर्गणी आणि सोबत गृहोपयोगी वस्तू भेट म्हणून देवू केली तरी आम्ही या आमिषांना बधलो नाही. लोकमत वाचला तो कटिंग सलून मध्ये. नागपुरात एकेकाळी सर्वाधिक खपाचे दैनिक म्हणून लोकमत प्रसिद्ध होते पण तो खप मुख्यतः व्यापारी प्रतिष्ठान, चहाच्या टप-या, हेअर कटिंग सलून यांच्यामुळे होता हे सगळ्यांनाच माहिती होते. घरी रोज लोकमत घेऊन वाचावा असे त्यात काहीही नव्हते आणि आजही आंतरजालावरसुद्धा वाचावा असे काहीही नाही.

माझ्या वडीलांना वाचनाची खूप आवड आणि त्यांनी ती आम्हा भावंडातही रूजवली. त्यामुळे रोजचा घरी नागपूर तरूण भारत येत असतानाच रविवारी मुद्दाम "मुंबई रविवार सकाळ" यायचा. १९७८-७९ च्या काळातला सकाळ. तेव्हा तो पवार कुटुंबियांच्या मालकीचा नव्हता आणि लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आदि दैनिकांच्या तोडीचा मानला जायचा.  नागपूर लोकसत्तेची आवृत्ती मला वाटत १९९६-९७ च्या आसपास (चूकभूल देणेघेणे) सुरू झाली आणि पहिल्या दिवशीपासून आमच्याकडे त्याला उदार आश्रय मिळाला तो थेट कुमार केतकरांच्या संपादकत्वाखाली लोकसत्तेने अग्रलेखातून बेफ़ाम आणि बेताल तारे तोडायला सुरूवात करेपर्यंत. कुमार केतकर दूर झाल्यानंतर पुन्हा आम्ही सुरू केला.

आमच्या बालपणी नागपुरातली वृत्तपत्रसृष्टी " तरूण भारत, लोकमत, नागपूर पत्रिका " या मराठी दैनिकांपुरती मर्यादित होती. घरी संघ संस्कार आणि वातावरण असल्याने तरूण भारताला पर्याय नव्हताच. मधल्या काळात तरूण भारतची पण अवस्था सर्वच बाबतीत दयनीय झाली होती मग आम्हा तरूण तुर्कांचा टोमणेवजा राग सुरू व्हायचा पण घरातल्या ज्येष्ठांनी "अरे, आपणच त्यांना आता पाठिंबा द्यायला हवा. आपणच घेतला नाही तर कोण घेणार ?" म्हणत " तू तुझ्या आवडीचा पेपर घे पण तरूण भारत घरात कायम येणार." म्हणत मध्यम मार्गही काढला होता. नागपूर पत्रिका, लोकमतशी झालेल्या दीर्घकालीन वादामुळे बंद पडले. लोकमत तर आम्हा तरूणांनाही चालणारा नव्हता. मग तरूण भारतच. दि. भा. घुमरे, लक्षणराव जोशी, वामनराव तेलंग यांच्या सारखे व्यासंगी आणि साक्षेपी पत्रकार संपादक खरोखर महाराष्ट्राच्या वृत्तसृष्टीत बिनतोड आणि दर्जेदार होतेच.

नागपुरातून नवभारत हिंदीत बिनतोड होताच पण त्याची जागा ही पान टपरी, हेअर कटिंग सलून मध्येच. कुणी घरी नवभारत आणून त्याच्या अग्रलेखांची चर्चा केल्याचे मी कधी पाहिले नाही. हितवाद हे इंग्रजी दैनिक त्याकाळी उच्चभ्रू (उच्च मध्यमवर्ग) घरांमध्ये दिवाणखान्यात टीपॉयवर दिसे. आणि तिथेच दिसे. त्यामुळे हितवाद म्हणजे खूप जड असे काहीतरी असावे असा आमचा बालपणी समज झाला होता. इंग्रजीचे स्तोम तेव्हा एव्हढे वाढले नव्हते त्यामुळे आणि आमच्या घरी टीपॉय असण्याइतपत उच्च्भ्रूता नव्हती त्यामुळेही हितवाद कधी घरी आलाच नाही. आर्थिक उदारीकरणानंतर इंग्रजीचे स्तोम माजायला सुरूवात झाल्यानंतर हितवाद जरा हातपाय पसरू लागला होता पण हाय रे दुर्दैवा ! नागपुरात टाइम्स ऑफ़ इंडियाने प्रवेश केला आणि हितवादचे "मराठी अनुवादित इंग्रजी" पितळ उघडे पडले. आजही टाइम्स ऑफ़ इंडियाच्या अस्सल इंग्रजीसमोर हितवाद वाचणे म्हणजे बातमीकाराने इंग्रजी कपातून मराठी चहा पीत पीत ही बातमी लिहील्याचे तरूणाईला जाणवते.

मुंबईत नोकरीनिमित्त गेल्यानंतर मग रोज चंगळ सुरू झाली. मटा आणि लोकसत्ता दोन्हीही पेपर्स घरी येवू लागलेत. सोबत टाइम्स ऑफ़ इंडिया असायचाच. माझ्या इंग्रजी  लिहीण्या वाचण्याच अर्ध श्रेय माझ्या शालेय शिक्षकांना आणि उरलेले अर्धे टाइम्सला जात. सकाळने पण हातपाय पसरण्यासाठी कधी एक रूपयात अंक, कधी नाममात्र वर्गणीत वर्षभर पेपर आणि वरून भेटवस्तू वगैरे प्रलोभन नागपूर, औरंगाबाद, अकोला, अमरावतीत सुरू करून स्वतःचा जम बसवला आणि आजकाल "फ़ुकट मिळाल तर शेणही खाऊ" या वाढत्या मनोवृत्तीत त्याला आपले हातपाय पसरता आले. पण आमच्याकडे मात्र नवीन सकाळ आला नाही. आताशा त्याचा दर्जा छान आहे. आंतरजालीय आवृत्ती मी आवर्जून वाचतो. ढिंग ढांग तर अगदी आवर्जून. बाकी अग्रलेख वगैरे नाही. बातम्या कुठल्या वाचाव्यात आणि विश्लेषण कुणाचे वाचायचे याच्याबद्द्ल आमच्या कल्पना पक्क्या आहेत. बातम्या जरी इंडिया टीव्ही वर पाहिल्या तरी त्याचे विश्लेषण मात्र टाइम्स नाऊ वरच. त्यातही अर्णव गोस्वामी असेल तर दुधात साखरच.

लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स हे मुंबईतले माझे खात्रीचे साथीदार होते. पण कुमार केतकरांच्या गांधी घराण्याबद्दलच्या अतार्किक अग्रलेखांमुळे लोकसत्ताच नको या निष्कर्षाप्रत आम्ही पोचलो. त्यांची गच्छंती झाल्यानंतर पुन्हा सुरू केला ही बाब अलहिदा. गिरीश कुबेरांचीही काही मते पटत नाहीत पण या माणसाच्या आणि यापूर्वीच्या लोकसत्तेच्या संपादकांच्या (कुमार केतकरांची विद्वत्ता एका कुटुंबाला वाहिलेली होती आणि हे पचणारे नव्हते.) विद्वत्तेबाबत आदर होता आणि आहे. महाराष्ट्र टाइम्स भारतकुमार राउतांच्या संपादकत्वाखाली छान सुरू असताना अचानक काय अवदसा आठवली कुणास ठाउक ? कमरेखालचे विनोद, अनावृत्त किंवा अर्ध अनावृत्त मॉडेल्सचे फ़ोटोज त्यांनी छापायला सुरूवात केली आणि सर्वसामान्य मुंबईकर घरातले स्थान गमावले. आज मटा मुद्दाम घेऊन वाचावासा वाटत नाही.

बाकी संध्यानंद (शेवटला द ला पूर्ण म्हणायचा नाही असा सार्वत्रिक नियम आहे.), पुण्यनगरी वगैरे लोकलमध्ये सीएसटी ते कल्याण वेळ घालवण्यासाठी वाचनाचे साधन आहे, वर्तमानपत्रे नव्हेत याची पूर्ण खात्री अस्मादिकांना आहे. नवाकाळ बद्द्ल नागपुरात असताना खूप आकर्षण होते. निळूभाउ खाडिलकरांची निर्भीडता, खाडिलकर भगिनींबद्दल, त्यांच्या बुद्धीबळातील कौशल्याबद्दल वाचून असलेला आदर वगैरे वगैरे. मुंबईत आल्यानंतर नवाकाळ पाहून निराशा झाली. २००० मध्ये भारताने करनाम मल्लेश्वरीच्या रूपात ब-याच वर्षांनी ऑलिम्पीक्समध्ये वैयक्तिक पदक पटकावले. दुस-या दिवशी सगळ्या वृत्तपत्रात हे कौतूक १६ कॉलमी बातमीच्या रूपाने छापून आले होते पण गाडीत बसल्यावर (तेव्हा मी रोज कांजूर ते ठाणे हा रेल्वे प्रवास नोकरीनिमीत्त करीत असे.) समोरच्याने नवाकाळ उघडला आणि १६ कॉलमी मोठ्ठी बातमी "कुठल्यातरी गॅंगस्टरवर झालेल्या हल्ल्यानंतर तो कसा रस्तावर व्हिव्हळत होता " त्याची. त्यादिवशी सगळा आदर संपला. हे दैनिक फ़ुकटही दिले तरी वाचायचे नाही हा निश्चय झाला आणि आजवर पाळला गेला. आताशा त्याचावर नजर देखील जात नाही.

बाकी जगातील "सर्वाधिक चर्चिले जाणारे वृत्तपत्र" अशी ज्याची जाहिरात ते स्वतःच करतात त्याच्याविषयी चर्चा करावी असे काहीही नाही. (कारण आम्ही त्यांच्या जगात नाहीच. बाकी त्यांचे जग म्हणजे उत्तरेला दहिसर नाका, पूर्वेला मुलुंड चेकनाका, दक्षिणेला वडखळ नाका आणि पश्चिमेला कीर्ती कॉलेजचा समुद्र हे एव्हढेच आहे याची आम्हास खात्री आहे.)

Friday, July 1, 2016

मी आणि माझे मित्रमंडळ

 काल अचानक आमच्या सांगोला येथे घालवलेल्या दिवसांची आठवण एकादशीनिमित्त झाली. पंढरपूर अगदीच जवळ. फ़क्त २५ किमी. स्वतःच्या गाडीने तर अर्ध्या तासात मंदीरात पोहोचता यायचे. खूपवेळा खूप निरनिराळ्या कारणांसाठी पंढरपूरला जाणे व्हायचे. दरवेळी विठूमाउलीचे दर्शन व्हायचेच असे नाही. ब-याचदा व्हायचे. ब-याचदा मंदीर परिसराच्या आसपास असूनही दर्शन व्हायचे नाही.

आज जवळपास ५०० किमी दूरून त्याच्या दर्शनाची आस का लागलीय ? हा प्रश्न मनात आला. "आता पुढल्या वेळी पंढरपूरला गेलो ना की दर्शन नक्की घेऊयात हं." हा निश्चय करण्याचे कारण काय ? माझ्याच मनाचा धांडोळा घेत मी पुढे सरकलो आणि जाणवल. आजवर मी विठ्ठलाला एक मित्र म्हणूनच भेटत आलोय की. रोजच्या परिचयातला मित्र असला की त्याच्याकडे नेहेमी जाणेयेणे होते. सुखदुःखाच्या गप्पा होतात. (याठिकाणी केवळ आपल्याच सुखाची आणि दुःखाची विठ्ठलापाशी मांडणी व्हायची.) मुद्दाम विशेष असे काही जावे, बोलावे असे नसते. सहज भेटी गाठी व्हाव्यात तशा आमच्या भेटी मी सांगोल्यात असताना व्हायच्यात. एखाद्या वेळेला त्याच्या मंदीरासमोरून गेलो पण इतर कामांमुळे दर्शनभेट झाली नाही तरी मन खंतावत नसे.

"एखाद्या देवाचे दर्शन न घेता समोरून गेलो तर देव कोपतो"  या आमच्या भीतीच्या भावनेला आमच्या गुरू परम पूजनीय मायबाई महाराजांच्या डोळस अध्यात्माच्या शिकवणुकीमुळे पूर्णविराम मिळाला. त्यात जाणीवा आणखी सजग आणि टोकदार झाल्यात त्या श्री विवेकजी घळसासींच्या प्रवचनांनंतर. रोकडे अध्यात्म म्हणजे काय ? याचे अत्यंत वास्तववादी दर्शन त्यांच्या प्रवचनांमधून व्हायचे. 
मग देव कोपत नाही. कितीही अवकाशानंतर आपण त्याला भेटलो की त्याच्या आणि आपल्यातला हा धागा कमकुवत होत नाही हे पटले. मग त्याच्याकडून काम करवून घेण्यासाठी नवसांची लाच लावायचा प्रश्नच उरला नाही. आज आपल्याला त्याच्या दर्शनाची ओढ लागली आहे ती केवळ खूप दिवसात त्याला प्रत्यक्ष न पाहिल्यामुळे ह्याचीही जाणीव झाली.


आम्ही पर्वणीचे, खूप गर्दीचे दिवस दर्शनासाठी टाळतोच. नाही, दिनमाहात्म्य असतच. पण त्यादिवशी आपला मित्र निवांत भेटत नाही. कितीही जवळचा मित्र असला तरी मला सांगा, त्याच्या लग्नात त्याच्या मांडवात आपण त्याच्याशी " १० वीच्या वर्गात आपण पहिल्या बाकावर बसून, डेस्कमध्ये लपवून, पहिल्याच तासाला हळूच डबा कसा फ़स्त करायचो ? " या गोष्टी बोलू शकू का ? कदापिही नाही. त्याला निवांतपणा हवा. तसा निवांतपणा मला देवाला भेटताना लागतो. मागायचे काही नसते. केवळ डोळा भरून दर्शन, आपले सुखदुःख त्याला सांगणे आणि त्याचे वैभव आपण बघणे याला खरोखर निवांतपणा लागतो. कधीकधी तर त्याचे वैभव बघताना खरोखर डोळे भरून येतात. बडव्यांच्या जाचातला विठठल पाहून डोळे भरायचेत, शेगावला संस्थानातली अतिशय सुंदर दर्शन व्यवस्था आणि तिच्यामध्ये निरंतर उत्कृष्टता आणण्याचे तिथल्या सेवेकरांचे प्रयत्न पाहून डोळे भरून यायचे, शिर्डीला केवळ नवस बोलायला आणि फ़ेडायला जाणारी मंडळी पाहून साईबाबांना आपण सर्व किती स्वार्थी कामांसाठी त्रास देतो ? हे पाहून डोळे भरून यायचे. सुरूवातीला सुपत्नी बावरून जायची पण आता तिला सवय झालीय. आपल्या नव-याची काय अवस्था होतेय हे तिला आजकाल शब्देवीण कळायला लागलय पण आता सुकन्या मोठी झालीय. " आई, बाबा बघ, रडतोय मंदीरात " हे तिला समजावून सांगणे अवघड होते पण आताशा तिलाही हळूहळू कळतय.

आळंदीला मी फ़ार फ़ार उशीरा म्हणजे २०१३ मध्ये पहिल्यांदा गेलो. (हा एक सुयोगच म्हणायचा.) अशाच एका अत्यंत शांत दिवशी आणि शांत वेळी ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनाचा योग आला. वयाच्या २१ व्या वर्षी सकल विश्वाची "माउली" होण्याचा मान मिळालेल्या त्या तरूणाचा जीवनपट, त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने सोसलेली दुःखे सगळ सगळ डोळ्यांसमोरून तरळून गेल आणि त्यांच्यात असलेल्या अपार कारूण्याचा एक कण मनाला स्पर्शून गेला. माझ्याही नकळत माझ्या डोळ्यांतून अश्रूधारा सुरू झाल्यात. थांबेचनात. संजीवन समाधीचा मी स्वतः डोळस अनुभव घेतला. देह ठेवल्यावर ८०० वर्षांनीही ती माउली जर माणसाच्या मनात परिवर्तन घडवून आणत असेल तर त्यापेक्षा इतर कुठला अनुभव श्रेष्ठ मानायचा ? माणसाच्या मनाचे चांगल्या वृत्तीकडे परिवर्तन ही आजही जगातली सगळ्यात कठीण बाब आहे.अगदी तसाच अनुभव माझ्या नुकत्याच झालेल्या त्र्यंबकेश्वर भेटीत आला. यापूर्वी दोनवेळा त्र्य़ंबकेश्वराचे दर्शन झाले होते पण ती धावती भेट होती. यावेळी जरा निवांतपणे भेट घेण्याच्या उद्देशानेच गेलो होतो. निवांत दर्शन झाले. कुशावर्त तीर्थावर जाणे आणि नंतर तिथली पाणीपुरी खाताना सहज निवृत्तीनाथ समाधी मंदीराची आठवण झाली. सुपत्नीचे पाय तिला भयंकर दुःख देत होते, सुकन्याही दिवसभराच्या प्रवासाने कंटाळली होती पण आम्ही अनामिक ओढीने संध्याकाळी त्र्यंबकेश्वरच्या गल्ल्यांमधून मार्ग काढीत श्री निवृत्तीनाथ समाधी मंदीरात पोहोचलो. 

सांजवेळ होती. तशीही कातर वेळ. वारक-यांचे कीर्तन सभामंडपात सुरू होते. आत गेलो आणि निवृत्तीनाथांचा जीवनपट डोळ्यांसमोरून सरकून गेला. चारही भावंडांमध्ये मोठे असलेले निवृत्तीनाथ. आईवडीलांच्या मृत्यूनंतर अकारण प्रौढत्व स्वीकारावे लागलेले. आईवडीलांच्या स्वदेहांताच्या प्रायश्चित्तानंतर तत्कालीन समाजाकडून पुन्हा अवहेलनाच स्वीकारावी लागताना या तरूणाची काय अवस्था झाली असेल ? हा नुस्ता विचार करून पुन्हा डोळ्यांना धारा लागल्यात. सगळ्या भावंडांचे मोठे भाऊ म्हणून त्यांना सांभाळताना, ज्ञानदेवांसारख्या अलौकिक व्यक्तीमत्वाच्या गुरूपदी असताना आणि आपल्या डोळ्यांसमोरच आपल्या नवतरूण भावंडांनी एकापाठोपाठ एक आपापले अवतारकार्य संपवताना बघून या व्यक्तीने काय सोसलय याची जाणीव झाली." ज्येष्ठांच्याही आधी, कनिष्ठांचे जाणे, केले नाराय़णे, उफ़राटे. नारायणे केले, ऐसे उफ़राटे, वळचणीचे पाणी, आढ्या आले. " हे सांगणा-या निवृतीनाथांची काय वेदना असेल ? याची कल्पनाही काळजाचा थरकाप उडवणारी होती. गर्दी अजिबात नव्हती त्यामुळे खूपवेळ त्यांच्याशी मूकसंवाद करीत बसलो. आपल्याही कुठल्यातरी पूर्वजाने त्यांना त्रास दिला असेल का ? दिला असो नसो पण त्यांची मनोमन माफ़ी मागून घेतली. कारूण्यमूर्तीच त्या. स्वतः देहात असतानाही कुणाविषयी द्वेषभावाचा त्यांच्यात लवलेश नव्हता मग आता ८०० वर्षानंतर कसा असेल ? पण मनुष्य स्वतःच्या मनोव्यापारातून आपल्या भगवंताचे रूप स्वतःच ठरवत असतो त्याप्रमाणे माझ्या कर्मांनुसार मी त्यांची, माझ्या समस्त पूर्वजांच्या वतीने माफ़ी मागून घेतली.

परतीच्या वाटेवर सुकन्येला ही निवृत्तीनाथांची कथा सांगितल्यावर तिचीही अवस्था कातर झाली. सुन्न अवस्थेत आम्ही निवासाकडे परतलोत. एक नवीन अनुभव. आत्मीय अनुभव.

पण एक जाणवले. आपल्यातले द्वैत अजून संपलेले नाही. "तो आपला मित्र आहे, माझी सगळी सुखदुःखे त्याला कळतात आणि त्याची सुखदुःखे आपण समजून घेऊ शकतो " इथपर्यंत आपण पोहोचलो हे ठीकच आहे पण संत एकनाथांना जसा श्रीखंड्याने " तुज मज नाही भेद, केला सहज विनोद " असे सांगून अद्वैताचा अनुभव दिला होता तसा यायला अजून वेळ आहे. या जन्मात, की पुढल्या कितीतरी जन्मांनंतर हे पण नक्की नाही. पण एक नक्की हा अनुभवसुद्धा त्याच्याच कृपेने आपल्याला प्राप्त होणार आहे. 
शत्रूंनाही तो पैलपार लावल्याशिवाय सोडत नाही मग त्याच्या मित्राला कसा सोडणार ? नाही का ?