Friday, July 1, 2016

मी आणि माझे मित्रमंडळ

 काल अचानक आमच्या सांगोला येथे घालवलेल्या दिवसांची आठवण एकादशीनिमित्त झाली. पंढरपूर अगदीच जवळ. फ़क्त २५ किमी. स्वतःच्या गाडीने तर अर्ध्या तासात मंदीरात पोहोचता यायचे. खूपवेळा खूप निरनिराळ्या कारणांसाठी पंढरपूरला जाणे व्हायचे. दरवेळी विठूमाउलीचे दर्शन व्हायचेच असे नाही. ब-याचदा व्हायचे. ब-याचदा मंदीर परिसराच्या आसपास असूनही दर्शन व्हायचे नाही.

आज जवळपास ५०० किमी दूरून त्याच्या दर्शनाची आस का लागलीय ? हा प्रश्न मनात आला. "आता पुढल्या वेळी पंढरपूरला गेलो ना की दर्शन नक्की घेऊयात हं." हा निश्चय करण्याचे कारण काय ? माझ्याच मनाचा धांडोळा घेत मी पुढे सरकलो आणि जाणवल. आजवर मी विठ्ठलाला एक मित्र म्हणूनच भेटत आलोय की. रोजच्या परिचयातला मित्र असला की त्याच्याकडे नेहेमी जाणेयेणे होते. सुखदुःखाच्या गप्पा होतात. (याठिकाणी केवळ आपल्याच सुखाची आणि दुःखाची विठ्ठलापाशी मांडणी व्हायची.) मुद्दाम विशेष असे काही जावे, बोलावे असे नसते. सहज भेटी गाठी व्हाव्यात तशा आमच्या भेटी मी सांगोल्यात असताना व्हायच्यात. एखाद्या वेळेला त्याच्या मंदीरासमोरून गेलो पण इतर कामांमुळे दर्शनभेट झाली नाही तरी मन खंतावत नसे.

"एखाद्या देवाचे दर्शन न घेता समोरून गेलो तर देव कोपतो"  या आमच्या भीतीच्या भावनेला आमच्या गुरू परम पूजनीय मायबाई महाराजांच्या डोळस अध्यात्माच्या शिकवणुकीमुळे पूर्णविराम मिळाला. त्यात जाणीवा आणखी सजग आणि टोकदार झाल्यात त्या श्री विवेकजी घळसासींच्या प्रवचनांनंतर. रोकडे अध्यात्म म्हणजे काय ? याचे अत्यंत वास्तववादी दर्शन त्यांच्या प्रवचनांमधून व्हायचे. 
मग देव कोपत नाही. कितीही अवकाशानंतर आपण त्याला भेटलो की त्याच्या आणि आपल्यातला हा धागा कमकुवत होत नाही हे पटले. मग त्याच्याकडून काम करवून घेण्यासाठी नवसांची लाच लावायचा प्रश्नच उरला नाही. आज आपल्याला त्याच्या दर्शनाची ओढ लागली आहे ती केवळ खूप दिवसात त्याला प्रत्यक्ष न पाहिल्यामुळे ह्याचीही जाणीव झाली.


आम्ही पर्वणीचे, खूप गर्दीचे दिवस दर्शनासाठी टाळतोच. नाही, दिनमाहात्म्य असतच. पण त्यादिवशी आपला मित्र निवांत भेटत नाही. कितीही जवळचा मित्र असला तरी मला सांगा, त्याच्या लग्नात त्याच्या मांडवात आपण त्याच्याशी " १० वीच्या वर्गात आपण पहिल्या बाकावर बसून, डेस्कमध्ये लपवून, पहिल्याच तासाला हळूच डबा कसा फ़स्त करायचो ? " या गोष्टी बोलू शकू का ? कदापिही नाही. त्याला निवांतपणा हवा. तसा निवांतपणा मला देवाला भेटताना लागतो. मागायचे काही नसते. केवळ डोळा भरून दर्शन, आपले सुखदुःख त्याला सांगणे आणि त्याचे वैभव आपण बघणे याला खरोखर निवांतपणा लागतो. कधीकधी तर त्याचे वैभव बघताना खरोखर डोळे भरून येतात. बडव्यांच्या जाचातला विठठल पाहून डोळे भरायचेत, शेगावला संस्थानातली अतिशय सुंदर दर्शन व्यवस्था आणि तिच्यामध्ये निरंतर उत्कृष्टता आणण्याचे तिथल्या सेवेकरांचे प्रयत्न पाहून डोळे भरून यायचे, शिर्डीला केवळ नवस बोलायला आणि फ़ेडायला जाणारी मंडळी पाहून साईबाबांना आपण सर्व किती स्वार्थी कामांसाठी त्रास देतो ? हे पाहून डोळे भरून यायचे. सुरूवातीला सुपत्नी बावरून जायची पण आता तिला सवय झालीय. आपल्या नव-याची काय अवस्था होतेय हे तिला आजकाल शब्देवीण कळायला लागलय पण आता सुकन्या मोठी झालीय. " आई, बाबा बघ, रडतोय मंदीरात " हे तिला समजावून सांगणे अवघड होते पण आताशा तिलाही हळूहळू कळतय.

आळंदीला मी फ़ार फ़ार उशीरा म्हणजे २०१३ मध्ये पहिल्यांदा गेलो. (हा एक सुयोगच म्हणायचा.) अशाच एका अत्यंत शांत दिवशी आणि शांत वेळी ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनाचा योग आला. वयाच्या २१ व्या वर्षी सकल विश्वाची "माउली" होण्याचा मान मिळालेल्या त्या तरूणाचा जीवनपट, त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने सोसलेली दुःखे सगळ सगळ डोळ्यांसमोरून तरळून गेल आणि त्यांच्यात असलेल्या अपार कारूण्याचा एक कण मनाला स्पर्शून गेला. माझ्याही नकळत माझ्या डोळ्यांतून अश्रूधारा सुरू झाल्यात. थांबेचनात. संजीवन समाधीचा मी स्वतः डोळस अनुभव घेतला. देह ठेवल्यावर ८०० वर्षांनीही ती माउली जर माणसाच्या मनात परिवर्तन घडवून आणत असेल तर त्यापेक्षा इतर कुठला अनुभव श्रेष्ठ मानायचा ? माणसाच्या मनाचे चांगल्या वृत्तीकडे परिवर्तन ही आजही जगातली सगळ्यात कठीण बाब आहे.अगदी तसाच अनुभव माझ्या नुकत्याच झालेल्या त्र्यंबकेश्वर भेटीत आला. यापूर्वी दोनवेळा त्र्य़ंबकेश्वराचे दर्शन झाले होते पण ती धावती भेट होती. यावेळी जरा निवांतपणे भेट घेण्याच्या उद्देशानेच गेलो होतो. निवांत दर्शन झाले. कुशावर्त तीर्थावर जाणे आणि नंतर तिथली पाणीपुरी खाताना सहज निवृत्तीनाथ समाधी मंदीराची आठवण झाली. सुपत्नीचे पाय तिला भयंकर दुःख देत होते, सुकन्याही दिवसभराच्या प्रवासाने कंटाळली होती पण आम्ही अनामिक ओढीने संध्याकाळी त्र्यंबकेश्वरच्या गल्ल्यांमधून मार्ग काढीत श्री निवृत्तीनाथ समाधी मंदीरात पोहोचलो. 

सांजवेळ होती. तशीही कातर वेळ. वारक-यांचे कीर्तन सभामंडपात सुरू होते. आत गेलो आणि निवृत्तीनाथांचा जीवनपट डोळ्यांसमोरून सरकून गेला. चारही भावंडांमध्ये मोठे असलेले निवृत्तीनाथ. आईवडीलांच्या मृत्यूनंतर अकारण प्रौढत्व स्वीकारावे लागलेले. आईवडीलांच्या स्वदेहांताच्या प्रायश्चित्तानंतर तत्कालीन समाजाकडून पुन्हा अवहेलनाच स्वीकारावी लागताना या तरूणाची काय अवस्था झाली असेल ? हा नुस्ता विचार करून पुन्हा डोळ्यांना धारा लागल्यात. सगळ्या भावंडांचे मोठे भाऊ म्हणून त्यांना सांभाळताना, ज्ञानदेवांसारख्या अलौकिक व्यक्तीमत्वाच्या गुरूपदी असताना आणि आपल्या डोळ्यांसमोरच आपल्या नवतरूण भावंडांनी एकापाठोपाठ एक आपापले अवतारकार्य संपवताना बघून या व्यक्तीने काय सोसलय याची जाणीव झाली." ज्येष्ठांच्याही आधी, कनिष्ठांचे जाणे, केले नाराय़णे, उफ़राटे. नारायणे केले, ऐसे उफ़राटे, वळचणीचे पाणी, आढ्या आले. " हे सांगणा-या निवृतीनाथांची काय वेदना असेल ? याची कल्पनाही काळजाचा थरकाप उडवणारी होती. गर्दी अजिबात नव्हती त्यामुळे खूपवेळ त्यांच्याशी मूकसंवाद करीत बसलो. आपल्याही कुठल्यातरी पूर्वजाने त्यांना त्रास दिला असेल का ? दिला असो नसो पण त्यांची मनोमन माफ़ी मागून घेतली. कारूण्यमूर्तीच त्या. स्वतः देहात असतानाही कुणाविषयी द्वेषभावाचा त्यांच्यात लवलेश नव्हता मग आता ८०० वर्षानंतर कसा असेल ? पण मनुष्य स्वतःच्या मनोव्यापारातून आपल्या भगवंताचे रूप स्वतःच ठरवत असतो त्याप्रमाणे माझ्या कर्मांनुसार मी त्यांची, माझ्या समस्त पूर्वजांच्या वतीने माफ़ी मागून घेतली.

परतीच्या वाटेवर सुकन्येला ही निवृत्तीनाथांची कथा सांगितल्यावर तिचीही अवस्था कातर झाली. सुन्न अवस्थेत आम्ही निवासाकडे परतलोत. एक नवीन अनुभव. आत्मीय अनुभव.

पण एक जाणवले. आपल्यातले द्वैत अजून संपलेले नाही. "तो आपला मित्र आहे, माझी सगळी सुखदुःखे त्याला कळतात आणि त्याची सुखदुःखे आपण समजून घेऊ शकतो " इथपर्यंत आपण पोहोचलो हे ठीकच आहे पण संत एकनाथांना जसा श्रीखंड्याने " तुज मज नाही भेद, केला सहज विनोद " असे सांगून अद्वैताचा अनुभव दिला होता तसा यायला अजून वेळ आहे. या जन्मात, की पुढल्या कितीतरी जन्मांनंतर हे पण नक्की नाही. पण एक नक्की हा अनुभवसुद्धा त्याच्याच कृपेने आपल्याला प्राप्त होणार आहे. 
शत्रूंनाही तो पैलपार लावल्याशिवाय सोडत नाही मग त्याच्या मित्राला कसा सोडणार ? नाही का ?

1 comment:

  1. आल्हाददायक लिखाण..... मस्त वाटले वाचून....

    ReplyDelete