Tuesday, August 31, 2021

व्योमातून उडताना, ओढीतसे मज घरटे

पूर्वी घरोघरी टी व्ही, टेपरेकाॅर्डर वगैरे नसत. १०- १२ घरांमागे एखाद्या घरी टेपरेकाॅर्डर / ग्रामोफोन / डिस्क (LP) प्लेयर असे.

तेव्हा त्या त्या घरांमधून विशिष्टच वेळेला विशिष्ट गाणी लावण्याचा त्या घरात दंडक असायचा असे माझे निरीक्षण आहे.
इतवारीतल्या आम्ही रहात असलेल्या कुहीकर वाड्यासमोर कापकरांचा एक वाडा होता. कापकरांकडल्या डिस्कप्लेयरवर रोज सकाळी बरोबर ८ वाजता "ॐ जय जगदीश हरे" ही आर्ती नित्यनियम असल्याप्रमाणे लागायचीच.
चंद्रपूरला आमच्या आजोळसमोर असलेल्या रघुनाथराव देवांच्या घरी रोज पहाटे पाचला एम एस सुब्बालक्ष्मी अम्मांचे "श्रीव्यंकटेश सुप्रभातम" लागायचेच. आजोळी गच्चीवर झोपलो असताना खूप वेळा पहाटे हे एका विशिष्ट लयीतले सूर ऐकतच आम्ही जागे होत असू.
आज प्रत्येकाच्या हातात असंख्य गाणी असलेले यंत्र (मोबाईल) आहे. नवीन नवीन मोबाईल असताना आपण त्यात आपल्या आवडीची भरपूर गाणी टाकूनही घेतो. विशिष्ट वेळी ही विशिष्ट गाणी ऐकून आपण स्वतःला आपल्या बालपणाशी जोडून घेण्याचा विचारही करतो. पण २ - ३ दिवसांनंतर आपला हा नित्यक्रम खंडीत होतो. मग वर्षानुवर्षे नित्यक्रमाने त्याच वेळी तीच गाणी / स्तोत्रे लावणार्या आपल्या पूर्वसूरींचे अपार कौतुक वाटते.
"Law of dimishing utility value" प्रत्ययाला येतो तो असा.
कुसुमाग्रज लिहूनच गेलेयत ना
"व्योमातून उडताना, ओढीतसे मज घरटे. आणि उबेत त्या घरट्याच्या क्षुद्र तेच मज गमते."
- नियमितपणाचा चाहता आणि गाण्यांचा दर्दी, इस्टमनकलर राम.

विविध पोशाख आणि आपली comfort level.

रेल्वेतून लांबचा प्रवास करताना काही काही प्रवासी मस्त बर्म्युडा, थ्री फोर्थ घालून प्रवास करताना बर्याचदा पाहिलेत. त्यांची ती ऐट पाहून आपणही कधीतरी अशीच बर्म्युडा, थ्री फोर्थ, सिक्स पाॅकेट थ्री फोर्थ वगैरे घालून प्रवास करावा अशी इच्छा प्रबळ होत असे.
पण सार्वजनिक वाहनांमधून असा तोकड्या कपड्यांमध्ये प्रवास कसा करायचा ? ही भीड कायम मनात असल्याने तसा योग कधी आलाच नाही.
पण स्वतःच्या गाडीने, विशेषतः उन्हाळ्यात, प्रवास करताना दोन तीन वेळा हा थ्री फोर्थ घालण्याचा प्रयोग करून पाहिलाही.
पण स्वतःला असे कपडे चांगले दिसत नाहीत (पुरावा म्हणून फोटो सोबत जोडलाय.) याचे ज्ञान झाल्याने हा प्रयोग नंतर फारवेळा केला नाही.



मला स्वतःला धोतर - झब्बा हा पोशाख घालायला आवडतो. त्यामुळे चांगला carry पण करता येतो. पण बर्म्युडा टी शर्ट हा पोषाख मात्र आवडूनही नीट carry करता येतो असा आत्मविश्वास वाटत नाही. सार्वजनिक जीवनात हा पोशाख घालून वावरताना मी प्रचंड अवघडल्यासारखा होतो.
चला, हे स्वतःचं स्वतःला कळतय ही सुध्दा एक उपलब्धीच म्हणायची.
- धोतर उपरण्यात प्रचंड आत्मविश्वासाने वावरणारा, रामशास्त्री.

Monday, August 30, 2021

आपल्या व्यवस्थांचा inertia, Bloom's Taxonomy

 यंदाचे दहावी, बारावीचे निकाल खूप छान लागलेत. निकालानंतर इतक्या चांगल्या निकालाबद्दल एक चेष्टेचा, हेटाळणीचा सूर समाजमाध्यमांवर वाचायला मिळाला.

मित्रांनो, आपण एक लक्षात घेतले पाहिजे की ही परिस्थिती, अशा पध्दतीची परीक्षा, यावर्षीच्या परीक्षार्थींनी स्वतःहून मागून घेतलेली नव्हती. अशा अभूतपूर्व परिस्थितीला त्यांना आणि त्यांच्या पालकांना अनपेक्षितरित्या सामोरे जावे लागले होते. त्यामुळे सगळ्यांचे कौतुक आपण खुल्या दिलाने केलेच पाहिजे. त्यात कंजुषी नको.
एक शिक्षक म्हणून गेल्या दीड वर्षांपासुन सुरू झालेल्या या महामारीकडे आणि शिक्षण क्षेत्रातल्या तदनुषंगिक बदलांकडे डोळसपणे बघताना मला जाणवतय की यात नापास झालेली आहे ती आमची परीक्षाव्यवस्था आणि एकंदरीतच आपली शिक्षणव्यवस्था.
Online शिकवायचे आहे आणि online च परीक्षा घ्यायची आहे हे जर आपल्या व्यवस्थेला जर जून २०२० पासूनच माहिती होते तर त्यादृष्टीने विद्यार्थ्यांची क्षमता विकसित व्हावी, घोकंपट्टीकडे कल नको, विद्यार्थ्यांच्या आकलनाची परीक्षा घ्यावी असा अभ्यासक्रम आणि तशी परीक्षा घेण्याचे आपल्या विद्यापीठांना, शालेय बोर्डांना सुचलेच नाही. विद्यार्थी २०२१ ची परीक्षा घरूनच देणार आहेत आणि कितीही बंधने घातलीत तरीही त्यांना परीक्षेदरम्यान संदर्भासाठी सगळी साधने (पुस्तके, internet व इतर संदर्भ) उपलब्ध असतील हे आमच्या शिक्षणव्यवस्थेने वर्षभरापूर्वीच ओळखायला हवे होते. त्या अनुषंगाने शिक्षणतज्ञांमध्ये विचारमंथन घडवून तशा प्रकारचा अभ्यासक्रम आणि तशी परीक्षा यांचे नियोजन व्हायला हवे होते.
आताही आपल्या एकूणच शिक्षणपध्दतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची एक सुसंधी या महामारीने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. Blessings in disguise.
पाश्चात्य शिक्षणतज्ञ ब्लूमने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षमतेचे एक पिरॅमिड केलेय. खाली फोटो दिलाय. त्यात तळाशी आहे ती "लक्षात ठेवणे", "समजणे" ही क्षमता. आपली बहुतांश शालेय किंवा विद्यापिठीय शिक्षण व परीक्षाव्यवस्थाही याच दोन पातळींवर अडकून बसलेली आहे.



याच्या वरच्या पातळीवर म्हणजे शिकलेल्या एखाद्या कल्पनेला apply करता येणे, उपलब्ध असलेल्या विविध पर्यायांचे विश्लेषण करून, त्यांच्यात उजवे डावे करून, त्यांच्यातला सर्वोत्तम पर्याय निवडण्याची क्षमता आणि त्याच्या वर आहे ती म्हणजे एखादी गोष्ट, एखादी संकल्पना, एखादी व्यवस्था निर्माण करण्याची क्षमता विकसित होणे.
ही सर्वोच्च शिक्षण पातळी गाठणे हे आता आपल्या शिक्षण आणि परीक्षाव्यवस्थेचे उद्दिष्ट असायला हवेय. किमान विद्यापीठांचे तरी ? तरच आपण जागतिकीकरणात टिकू शकू, नवनिर्माण करू शकू. नोकरी शोधणार्यांइतकीच वाढ नोकर्या निर्माण करणार्यांमध्ये करू शकू.
पण आपल्या सगळ्या व्यवस्थांचा inertia च एवढा आहे की हे सगळे अंमलात आणेपर्यंत फार उशीर झालेला असेल, अनेक सुसंधी आपल्या एका संपूर्ण पिढीच्या हातून निसटून गेलेल्या असतील.
नव्या पिढीने या बदलांचा त्वरित स्वीकार व त्वरित अंमलबजावणी केली तरच तरणोपाय आहे. नाहीतर यावर्षी जसा आपण जुनाच syllabus जुन्याच पध्दतीने पण online शिकवण्याचा वेडेपणा केला, online पध्दतीने पारंपारिक परीक्षा घेण्याचा अती शहाणपणा आपण केलाय, तसाच वेडेपणा आपण गतानुगतिक होऊन पुढली अनेक वर्षे करत राहू यात शंकाच नाही. नंतर मग या व्यवस्थेचे बळी ठरलेल्या विद्यार्थ्यांना दोष लावू नका म्हणजे झाले.
- गेल्या २७ वर्षात शिक्षणक्षेत्रात झालेल्या बदलांचा डोळस साक्षीदार व अभ्यासक आणि एक तळमळीचा शिक्षक, प्रा. राम प्रकाश किन्हीकर.
(लेख जरूर शेअर करा पण लेखकाचे नाव कापण्याची अविद्या अवलंबू नका ही नम्र विनंती)

गटारी नाही, जिवती साजरी करूयात

 मला वाटतं "गटारी अमावास्या" म्हणणे आणि तशा प्रकारे साजरी करणे हे मुंबई ठाण्याच्या संस्कृतीचे विदर्भावरील सांस्कृतिक आक्रमणाचे लक्षण आहे.

आपल्या वैदर्भिय संस्कृतीत ही "जिवती अमावास्या" आहे. घराच्या दारांवर, देवघरावर जिवत्या चिकटवायला घरोघर सोनार मंडळी जायचीत. त्याकाळी फॅमिली डाॅक्टरांसारखी 'फॅमिली सोनार' मंडळीही असायचीत. आजकालचे "साठे" "पेठे" "गाडगीळ" या पेढ्या अशा जिवत्या चिकटवत नाहीत हे बरेच आहे. नाहीतर प्रत्येक जिवतीचे बजेट लाखभर रूपयांमध्ये गेले असते.




आपल्या घरातल्या लहान मुलांची काळजी घेणारी जिवती (किंवा जीवदानी) देवी, तिची पूजा आजच्या दिवशी विदर्भात होते. खूप घरी वडा पुरणाचा साग्रसंगीत स्वयंपाक होतो. (पुरण वाटताना पाट्या वरवंट्याला चिकटून उरलेल्या, लागलेल्या डाळी वाया जाऊ नये म्हणून आमटीचा कट रचून "कटाची आमटी" करणे हे वैदर्भिय ऐसपैसपणात बसत नाही बरं का.)
जिवतीच्या दिवशी फार काही धार्मिक अवडंबर न करता मनोभावाने जिवतीची पूजा करून कढी वडा पुरण दाळभाजी असा साग्रसंगीत स्वयंपाक करणे आणि मस्त दुपारची झोप काढणे ही आपली वैदर्भिय संस्कृती.
पण गेल्या २० वर्षात ३१ डिसेंबरसारखी रात्रीपर्यंत अभक्ष्यखान, अपेयपान करून श्रावण महिन्याचा "कोटा" एकाच दिवशी संपूर्ण करण्याची ही विकृती आपण मुंबई ठाण्यातून आयात केली आहे.
आपण विदर्भवादी, विदर्भप्रेमी असू तर "गटारी" नव्हे तर "जिवती" साजरी करूयात. आपल्या लेक्राबाक्रांच्या मंगल आयुष्याची कामना करत हा मंगल दिवस साजरा करूयात.
- संपूर्ण महाराष्ट्रात रहिवास असलेला पण अस्सल वैदर्भी वृत्तीचा प्रा. राम किन्हीकर.

Sunday, August 29, 2021

पुणे आणि पुणेकर: एक वेगळेच चिंतन

 मी बघितलेय की विदर्भाच्या बाहेर पायही न ठेवलेली मंडळीच पुण्याला नाके मुरडतात.

असे म्हणतात की न्युयाॅर्कमध्ये जेवढे सिसिलीयन आहेत तेवढे खुद्द रोममध्ये नाहीत.
मुंबईत जेवढे भोजपुरी आहेत तेवढे खुद्द पाटण्यात नाहीत.
आणि
पुण्यात जेवढे वैदर्भिय आहेत तेवढे तर नागपूर आणि अमरावती मिळूनही नाहीत.
उद्या वेगळा विदर्भ झालाच तर कोथरूडला त्या राज्याचा दूरस्थ जिल्हा म्हणून समाविष्ट करावे लागेल, आहात कुठं ?
मला माझ्या नागपूरइतकेच पुण्याचेही कौतुक वाटते. तिथल्या हवेतच काहीतरी वेगळेपणा आणि freshness आहे. पुलंनी कितीही म्हटलं की पुणेकर व्हायला तुम्हाला विशेष मेहेनत करावी लागेल पण माझा अनुभव असा आहे की पुण्यात गेल्यावर पुणे शहर एखाद्याला इतकं स्वतःत सामावून घेतं की ती व्यक्ति पुणेकरच होऊन जाते.
फक्त हिंजवडी चा उच्चार "हिंजेवाडी" असा करू नये. एकवेळ तुम्ही "अहो, ती पानपतची लढाई म्हणतात ती पुण्यात कुठशी झाली हो ?" हा प्रमाद करू शकता पण "हिंजेवाडी" हा उल्लेख म्हणजे तुम्ही "गंगा किनारेवाले आणि ग्यानगंगा एक्सप्रेसने पुण्यात उतरलेले भैय्या" असेच पुणेकर मानतात आणि ते रास्तही आहे.
- जन्माने नागपूरकर, कर्मभूमीव्दारे मुंबईकर असलेले पण पुणेकरांच्या बुध्दीमत्तेविषयी, वेगळेपणाविषयी अपार आदर असलेले, रामशास्त्री किन्हीकर.
पुणेकरांवर लिहीलेले दोन लेख इथे आणि इथे
.

नागपूर शहराचे जगावेगळे वैशिष्ट्य

 नागपूर शहराचे आणखी एक जगावेगळे वैशिष्ट्य आहे.

सेंट्रल प्राॅव्हिन्स अॅण्ड बेरार (C P and Berar, मध्य प्रांत आणि वर्हाड) या ब्रिटीशकालीन राज्याची नागपूर राजधानी होती. १९५६ मध्ये नागपूर करारानुसार नागपूर आणि विदर्भ पहिल्यांदा मुंबई परगण्यात आणि नंतर १९६० मध्ये महाराष्ट्र राज्यात सामील झालेत.
पण मध्य प्रदेश परिवहन सेवेचा "नागपूर डेपो" आणि संलग्न बसस्थानक मात्र गेली ६१ वर्षे नागपुरातच आहे. असे उदाहरण देशात कुठेच नाही. हे म्हणजे आपल्या महाराष्ट्र एस. टी. चा कर्नाटकात बे. बेळगाव डेपो किंवा गुजरातेत ब. बडोदा डेपो असल्यासारखेच आहे. कुठलेही राज्य दुसर्या राज्य परिवहनला आपल्या राज्यात परिवहन सेवा चालवायला खूप अटी, शर्ती घालते. मग दुसर्या राज्यातल्या परिवहन सेवेचा डेपो, त्याला संलग्न असे बस स्थानक आणि एव्हढी जागा त्यांना देणे हे तर दुरापास्तच. पण आम्ही नागपूरकर उदार मनाचे आहोत म्हणून आजही तो डेपो, ते बसस्थानक नागपूरचे ग्रामदैवत असलेल्या टेकडीच्या गणपतीसमोर, अगदी मोक्याच्या जागी उभे आहे.
गेल्या २० वर्षात मध्यप्रदेश परिवहनची सेवा बंद पडली. तिचे हळूहळू खाजगीकरण झाले. आज त्या स्थानकावर मध्यप्रदेशात जाणार्या सगळ्या खाजगी गाड्यांचा अक्षरशः धिंगाणा असतो. कुठलाही टाईमटेबल नाही, कुठलीही शिस्त नाही, गाड्या कुठेही, कशाही उभ्या करायच्यात. काहीकाही धाडसी खाजगी बसवालेतर शेजारीच असलेल्या महाराष्ट्र एस. टी. च्या जागेतही गाड्या घुसवण्याची हिंमत करतात.





टेकडी गणपतीसमोरच सध्या महाराष्ट्र एस.टी. कडे असलेल्या या जागेत १९७९ पर्यंत महाराष्ट्र एस. टी. चे नागपूर मध्यवर्ती बस स्थानक होते. रेल्वे स्टेशनला अगदी लागूनच असलेले बस स्थानक. ६ प्लॅटफाॅर्म असलेले. टुमदार.
साधारण १९८० च्या सुमारास सध्याचे गणेशपेठ बसस्थानक बांधले गेले. तेव्हा २० प्लॅटफाॅर्मस असलेले नवेकोरे, चकचकीत बसस्टॅण्ड पाहून बालपणी आम्ही हरखून गेल्याचे स्मरते.
आणखी एक odd गोष्ट म्हणजे मध्यप्रदेश परिवहन सेवेची "नागपूर - इलाहाबाद" ही बससेवा. दुपारी ३.०० वाजता नागपूरवरून निघणारी ही "ढच्चर" बस आम्ही बरेच वर्षे बघितली. एकतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश जोडणारी ही बस मध्यप्रदेश परिवहनने का सुरू करावी ? हा प्रश्न आम्हाला छळत असे. हे म्हणजे महाराष्ट्र एस टी ने हैद्राबाद - रायपूर बससेवा सुरू करण्यासारखेच.
आणि त्यातल्यात्यात हे मध्यप्रदेश परिवहनवाले या ७५० किमी अंतरासाठी आणि जवळपास २० तासांचा प्रवास करणारी ही बस साध्या सीटस असलेली, सीटसना धड हेडरेस्टस नसणारी का पाठवतात ? हेही एक न उलगडणारे कोडे होते.
शेजारच्या राज्यातल्या डेपो व स्थानकासाठी जागा देऊन उदारतेची परिसीमा गाठणारे नागपूरकर आणि आपली परिवहन सेवा आपल्या शेजारील राज्यांमधल्या शहरांना थेट जोडणारी अशी पुरवणारे मध्यप्रदेश परिवहन महामंडळ. दोघेही धन्य.
- भारतभर वेगवेगळ्या परिवहन सेवांमध्ये भ्रमण केलेला बसप्रेमी राम किन्हीकर
(छायाचित्रे प्रातिनिधिक)
(ही छायाचित्रे २०१५ मधील मी केलेल्या मनमाड ते शिरपूर प्रवासातली आहेत.)

Zero Based Time Table - 1.

 कोरोना महामारीच्या काळात साधारण मार्च २०२० ते जुलै २०२० पर्यंत भारतीय रेल्वेवरील सगळ्या प्रवासी गाड्यांची चाके, इतिहासात पहिल्यांदाच, ठप्प झालेली होती. जुलैनंतर जेव्हा गाड्या टप्प्याटप्प्याने वाढवायच्या ठरल्यात तेव्हा रेल्वे मंत्रालयाने Zero Based Time Table ने गाड्या चालवण्याची संकल्पना आणली. अनायासे कोरी पाटी मिळालेलीच आहे तर संपूर्ण नव्या नियोजनाने गाड्यांचे टाईमटेबल बनवूयात अशी संकल्पना त्यात होती.

पण आपण सर्वांनी एकूणच ctrl + c & ctrl + v हे कल्चर इतकं हाडीमासी खिळवून घेतलंय की आपल्यापैकी प्रत्येकजण आणि आपण सगळे एकत्र मिळून खूप काही मूलभूत विचार करू शकतो, खूप काही original देऊ शकतो असा विश्वासच आपण व्यक्ती आणि समष्टी मिळून गमावलाय.
मग झाले काय ? मूलभूत बदलांऐवजी एखाद्या गाडीचे फक्त दोनतीन थांबे रद्द केलेत (पण तरीही वेळात बचत काहीच नाही. मग थांबा रद्दीकरणाचा फायदा काय ?) आणि विशेष गाड्यांसाठीचा 0 हा आकडा गाडीच्या नंबर आधी लावला (पूर्वीची 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस 01040 झाली, पूर्वीची 12106 विदर्भ एक्सप्रेस आता 02106 झाली, वेळापत्रकात बदल नाहीच) की झाला यांचा zero based time table.



खरेतर गेल्या २५ वर्षांपासून भारतातल्या ९९ % स्टेशन्सवर काॅम्प्युटराईज्ड तिकीटे विकली जाताहेत. ह्या सगळ्या डेटा चे विश्लेषण करून खूप धोरणात्मक निर्णय घेता आले असते. मधल्या काळात गावगन्ना पुढार्यांच्या दबावाखाली पुष्कळ गाड्यांना भलभलते थांबे मिळाले असते ते या डेटाच्या आधारावर रद्द करता आले असते, किंवा त्यांचे पुनर्नियोजन करता आले असते, एखाद्या गावाची लोकसंख्या, त्यांचे इतर शहरांशी असलेले दळणवळण आणि भावी गरज इत्यादि लक्षात घेऊन भारतीय रेल्वेच्या प्रवासी गाड्या संचलनामध्ये खरोखर मूलभूत बदल घडवून आणता आला असता पण आपला आपण स्वतःच्याच क्षमतेवरचा अकारण अविश्वास आडवा आला आणि आपण crtl c + ctrl v मध्येच समाधान मानले ही दुर्दैवी बाब आहे.
अजूनही पूर्ण प्रवासी गाड्या सुरू झालेल्या नाहीत ही थोडी आशेची बाब आहे. म्हणूनच ही लेखमाला. वेळ मिळेल तसा तसा मला माहिती असलेल्या रेल्वेच्या बहुतांशी सेक्शन्सवर एकेक लेख लिहून सहज होऊ शकणारे बदल सुचवण्याचा माझा मानस आहे.
त्या लेखमालेचे प्रास्तिविक आज इथे सादर.
- रेल्वेविषयी आणि प्रवाशांविषयीही कळकळ असलेला रेल्वेफॅन राम प्रकाश किन्हीकर

Saturday, August 28, 2021

वाटल्या डाळीचा लाडू, चिरोटे उर्फ़ चिरवंट उर्फ़ पाकातल्या पु-या

परवाच्या नागपंचमीनिमित्त एक आठवण झाली. आमची दिवंगत आत्या पुरणाचे दिंड खूप छान करायची. तसेही "गोदावर्याः उत्तरे तीरे," देशस्थांकडे, नागपंचमीला हे दिंड करण्याचा कुळाचार असतोच. आता आत्या तर कालवश झाली. आणि आता हा पदार्थ आमच्या मुला नातवंडांना खायला मिळण्याची शक्यता खूप कमी झाली.

तसाच "वाटल्या डाळीचा लाडू" हा एक वैदर्भीय पदार्थ. पंचवीस वर्षांपूर्वी काही कॅटरर्स हा पदार्थ छोट्या छोट्या कार्यक्रमांसाठी (बारसे, डोहाळजेवणे वगैरे) करायचेतही. पण आता एकही जण करत नाही. ग्राहकांची आवडच रस अंगुरी, गुलाबजांब, रबडी जिलेबी, रसगुल्ला आणि चोमचोम पुरती मर्यादित झाली त्याला ते तरी काय करणार बिचारे. नाही म्हणायला विदर्भात विहीणींच्या पंगतीत पुरणपोळी, खवापोळी वगैरे पदार्थ अजून आपला आब टिकवून आहेत. बाकी ब्युफे मध्ये सगळे पंजाबी पदार्थांचे आक्रमण.
चार वर्षांपूर्वीचा नागपुरातलाच प्रसंग. श्रीमदभागवत सप्ताहात एका संध्याकाळी यजमानांनी आपल्या मराठी कॅटररला "पाकातल्या पुर्यांची" फर्माईश केली. त्यांना चिरोटे अपेक्षित होते पण त्यांनी "चिरोटे" शब्द वापरण्याऐवजी विदर्भातला प्रचलित शब्द वापरला. हे त्यांचे चुकलेच पण जेवताना सगळ्यांच्या पानात आलेला पदार्थ खरोखर "ग्रेट" होता.
त्या कॅटररने चक्क आपल्या साध्या पुर्या तळून पाकात टाकल्यात. जेवताना पुर्या ओल्यागच्च आणि गोड का लागत आहेत ? हा प्रश्न सगळ्या खवय्यांच्या मनात आल्यानंतर या फजितीचा खुद्द यजमनांनीच खुलासा केला.
तसंच आजकाल उन्हाळ्यात आंब्याच्या रसासोबत होणारा "फजिता" नावाचा पदार्थही आजकाल अतिदुर्मिळ होत चाललाय.
अजून कुठलेकुठले महाराष्ट्रीय / वैदर्भिय पदार्थ आहेत जे आपण तर चाखलेत पण आपल्या मुलांना / नातवंडांना अजिबातच बघायलाही मिळणार नाहीत ?
- खादाडखाऊ असलेला (पण लांडग्याचा भाऊ नसलेला) रामभाऊ.

Friday, August 27, 2021

मला जाणवलेले पांडुरंग आणि रुक्मिणी

आज पुत्रदा एकादशी. आमचे सांगोल्यातले दिवस आठवलेत. पंढरपूर फक्त २५ किमी होते. अर्ध्या तासात इथून तिथे पोहोचणे व्हायचे. अनेकदा विठूरायाचे आणि रूक्मिणीमातेचे मनसोक्त दर्शन व्हायचे.

पंढरपूरात रूक्मिणीमाता विठूरायापासून थोडी अलग आहे. विठूरायाच्या डावीकडल्या थोड्या मागल्या बाजूला. असं वाटतं की हे दोघे सोबत फिरायला निघाले आणि आपल्या पत्नीशी गप्पा मारता मारता अचानक भक्ताची आर्त हाक त्यांच्या कानावर आली. पत्नीला तसेच ठेऊन त्यांनी भराभर पावले उचलत भक्ताला गाठले. आणि भक्ताने वाट बघायला सांगितल्यावर हे राहिले आपले उभे कमरेवर हात ठेऊन. बिचार्या रूक्मिणीलाही तसेच कमरेवर हात ठेऊन आपल्या नवरोजींची वाट बघत उभे रहावे लागले. युगानुयुगे.
पांडुरंगाला मी अनंत वेळा बघितले. रूक्मिणीबाईंनाही तितक्याच वेळा. सत्ययुगातले आपले चतुर, ठकवणारे थोडे बनेल रूप टाकून देऊन भगवंत इथे भक्ताधीन झालेले आहेत. इथे भगवंतांच्या चेहेर्यावर अत्यंत भोळे, प्रेमळ, भक्तांविषयीच्या वात्सल्याचे, तो भवसागर कसा तरेल ? याविषयीच्या काळजीचे भाव आहेत. कारूण्य आहे.



पण रूक्मिणीमातेचे इथले स्वरूप मात्र प्रेमळ पण करारी असे आहे.आपला नवरा असा आपल्या भक्तांच्या गराड्यात अडकलेला पाहून, आता त्याचे इतर संपूर्ण विश्वाकडे लक्षच नाही आणि विश्वाचा हा सगळा पसारा आपल्यालाच चालवायचा आहे या सांसारिक जबाबदारीतून रूक्मिणीमाता करारी झाल्या असाव्यात. त्या सुध्दा भक्तवत्सल आहेत पण आपल्याला आता आपल्या नवर्याची (तो भक्ताच्या वचनात अडकल्याने) जगन्नियंत्याची जबाबदारी पार पाडायची आहे हा भाव त्यांच्याकडे बघितल्यावर जाणवतो.
भगवंत हा खर्या भावाचा भुकेला असतो असे म्हणतात तसेच भगवंताला भक्त ज्या भावाने बघतो त्या भावातच तो दिसत जातो, हे ही तेव्हढेच खरे. माझ्यासारख्या, रोजच्या रामरगाड्यातून, धकाधकीच्या धबडग्यातून बाजूला राहून फक्त विद्यार्थ्यांमध्ये रमणार्या एका प्राध्यापकाला त्याचा देवही त्याच भावनेतून दिसला तर ते नैसर्गिकच नाही का ?
- पांडुरंगाच्या या लोभस रूपाचा एक भक्त, रामोबा किन्हीकर.
(आमच्या रखुमाईचा आणि आमचा या विषयावरचा एक जुनाच संवाद इथे.)

मारवा, पूरिया ते सोहनी

 "Course Objectives, Course Outcomes, Programme Educational Objectives, Programme Specific Objectives" वगैरे जडजड वातावरणात दिवसभर घालवून आपण घरी येतो. घरी आल्याआल्या एखादा नवा पदार्थ try करून बघण्यासाठी आपण आसुसलेले असतो. हातपाय धुवून स्वयंपाकघरात जाईपर्यंत स्वयंपाकघरात चहा करता करता सौ. ने यु ट्युबवर छान "सोहनी" लावलेला असतो. दिवसभरचे सगळे विसरून आपण पुन्हा संसारात रमतो.

आपलाही "सोहनी"च होतो नाही. दिवसभर "मारवा", "पूरिया" सारखे गंभीर आपण "सोहनी" सारखेच खेळकर, खट्याळ होऊन जातो. थाट, स्वर, वादी - संवादी तेच असलेत तरी वातावरणातल्या फ़रकामुळे आपण मोकळे होत जातो, नव्हे, मोकळे व्हावे लागतेच. घरी दारी जर "Course Objectives, Course Outcomes, Programme Educational Objectives, Programme Specific Objectives" वगैरेंचा धोषा आपण लावला तर रात्रीच्या दुस-या प्रहरात नटभैरव ऐकवल्यासारखे होईल. नाही, रात्रीही नटभैरव ऐकता येईल; पण सरत्या दुपारी ऐकलेल्या नटभैरवाची सर त्याला येणार नाही.
म्हणूनच घरी दारी, मित्रांमध्ये, जेवणावळींमध्ये, प्रवचनांमध्ये "मी, माझे महत्वपूर्ण काम, माझे ऑफ़िसातले स्थान" वगैरे गोष्टी मिरवणा-या आणि चर्चा करणा-या प्राण्यांविषयी आपल्या मनात केवळ भूतदया दाटते. अरे, भर दुपारी भैरवी आलापताय रे ! चूक नाही, पण ती वेळ त्यासाठी नाही रे.
-साध्या सरळपणात आणि सर्वसमावेशक जीवनात आनंद मानणारा आणि सर्वत्र बुरखा वावरून जगणा-या प्राण्यांविषयी "व्यंकटी सांडो" ही प्रार्थना करणारा, संगीतोपासक, रामबुवा किन्हीकरी.