Saturday, October 31, 2020

दुकानांवरील पाट्यांची बदलत जाणारी संस्कृती.

 जुन्या काळी दुकानांच्या पाट्यांवर पत्ता पिनकोडसकट सगळे लिहीले असे.

उदाहरणार्थ :
"बापुजी बालाजी बुरडकर,
सर्व कंपन्यांच्या सर्व प्रकारच्या रंगांचे ठोक व किरकोळ विक्रेते,
मेन रोड, चंद्रपूर ४४२४०१"
पूर्वी एस. टी. बसने एखाद्या गावी जाताना मध्येच एखादी डुलकी लागली, की जाग आल्यानंतर कुठवर आलोय ? याचा अंदाज घ्यायला या पाट्या अतिशय उपयुक्त पडायच्या.
झोप उघडल्यावर रस्त्यावरची "अमुक अमुक टेलर्स, नागपूर रोड, भद्रावती" अशी पाटी किलकिल्या डोळ्यांनी वाचली "झोपा अजून. भांदकावरी त आलो बाप्पा. अजून अर्धा घंटा आहे चांद्यास" असे मनाशी बोलून माणसे उरलेल्या झोपेची थकबाकी गोळा करायला मोकळी व्हायचीत.
बाकी तो एस. टी. च्या खिडक्यांचा खडखडाट, एखाद्या बोल्ट निखळलेल्या अल्युमिनीयम पट्टीचा, एंजिनच्या व्हायब्रेशनमुळे बसबाॅडीवर होणारा लयबध्द आवाज मानवी झोपेच्या नैसर्गिक फ्रिक्वेन्सीशी खूपच पूरक असावा. एसी वगैरे कशाचीही गरज नसायची. नागपूरला स्टॅण्डवर तिकीट काढून बसमध्ये बसल्यावर पेंगणारी काही काही माणसे अगदी रहाटे काॅलनीच्या स्टाॅपपर्यंत पार झोपेत हरवलेली असायचीत.
पण आता नवीन दुकानांवरच्या फक्त नाव लिहीण्याच्या पध्दतीत गाडी कुठल्या गावात आलीय हे कळेनासे झालेय हो. आता एखाद्या गावात फक्त "केशव स्टोअर्स" ही पाटी वाचून काय बोध होणार ? मुळात हे किराण्याचे दुकान आहे ? की कपड्यांचे आहे ? हेच कळतच नाही तर इतर बोध कुठला व्हायचा ?
पूर्वीच्या सर्वमाहिती समावेशक पाट्यांवरून त्या त्या गावची संस्कृती ढोबळमानाने कळायला मदत व्हायची. आता या शब्दांच्या कंजुसीमुळे ती सोय नाहीशी झाली हो. शिवाय आजकाल प्रवासात कुठपर्यंत आलोय ? हे बघायला फोनमधल्या गुगल मॅप्सची मदत घ्यावी लागते ती निराळीच कटकट.
आणि आजकाल नवीन दुकानांमधे नक्की काय मिळतय याचा त्यांच्या पाटीवरून पत्ता लागत नाही. बरीच वर्षे Boutique वाचून आत स्रियांसाठीचे beauty parlour असावे अशी माझी प्रामाणिक समजूत होती. पण बुटिक म्हणजे स्त्रियांचे वेगवेगळ्या फॅशनचे कपडे मिळण्याचे दुकान ही नवीन माहितीची भर सुपत्नीने घातली आणि मी अवाकच झालो. मग स्वच्छ तसे लिहीत का नाही बोर्डवर ?
नवीन दुकानदारांचा स्पष्टपणाला विरोध असावा. नाहीतर "पब, रेस्टो लाऊंज" असे लिहीण्यापेक्षा स्वच्छ "विदेशी दारूचा गुत्ता आणि देशी हुक्क्याचा ठेका" असे लिहीले असते तरी चालले असते.
आणि नुसते Apparels लिहीलेल्या दुकानात मला काॅटन किंगची फुलपँट (हल्लीच्या भाषेत trousers) आणि एखाद्या अशाच ब्रँडची बनियान मिळेल की नाही ? याची खात्री नाही.
थोडक्यात काय ? काळ बदलला. माणसांच्या सवयी बदलल्यात. अनेक प्रसंगांमध्ये भेटीदाखल मिळणारी शर्टपिसेस, पँटपिसेस महालमधल्या जाने टेलर्स, मारवडकर टेलर्स मधून वर्षभर शिवून घेणारा कुणी एक राम आता Allan Solly, Parx च्या शोरूममध्ये जाऊन अंगानेटकी ट्राऊझर वगैरे विकत घेतो. नरसिंग टाॅकीज जवळचे नेहेमीचे साधे चपलांचे दुकान आता त्याच्या नजरेच्या टप्प्यातही नसते. कारण त्याची सँडल्स, शूज वगैरेंची खरेदी मॉल्समधल्या Woodlands, Dawood, BATA च्या चकचकीत शोरूम्समधूनच होते.
जवळपास पाऊण शतकापासून तसेच असलेले आणि महालमधली बरीच ऐतिहासिक धुळीची पुटे काऊंटरवर अभिमानाने बाळगणारे "मे. गोविंद दिनकर गोखले फर्म" आता गणेशपेठमधे माॅलसारखे सजलेले दिसले आणि नागपुरातल्या अनेकांचा त्यांच्या त्यांच्या बालपणाशी असलेला आणखी एक धागा उसवला.
असो, गिर्हाईकांचा दृष्टीकोन बदलला मग दुकानांचे सादरीकरण का बदलू नये ?
- आपला जुन्या दुकानांमधून माल घेणारा जुनाट गिर्हाईक आणि प्रवासात झोपेशी वैर असणारा जागरूक प्रवासी, राम प्रकाश किन्हीकर.

Friday, October 30, 2020

जशास तसे : मराठी मंडळी आणि दगड सिनेमे

 सोनीमॅक्स म्हणा किंवा इतर कुठलेही सिनेमांचे चॅनेल्स म्हणा. वर्षाच्या, दिवसाच्या कुठल्याही एका वेळेस त्यांच्यावर

"जय लव कुश : द पाॅवर ऑफ थ्री",
"खतरनाक खिलाडी"
"डॅशिंग सी एम: भारत"
"वेदलम "
किंवा तत्सम डब्ड (या शब्दातला शेवटला "ड" हा उर्वरित भारताप्रमाणे हलन्त उच्चारावा. सोलापूर जिल्ह्यातल्या उच्चारांप्रमाणे पूर्ण उच्चारलात तर भलता अर्थ निघेल हो.) सिनेमे सुरूच असतात.
365 x 24 x 7. दळण सुरूच.
यातल्या काहीकाही सिनेमांचा आणि फक्त जाहिराती दाखवणार्या चॅनेल्सचा माझ्या मनात फार गोंधळ होतो हो. एकदा असेच चॅनेल्स पुढे पुढे ढकलताना खाली चॅनेलच्या नावांमध्ये अचानक "सेट ऑफ थ्री" म्हणून वाचले. "अरे वा, हा एक नवीन सिनेमा कसा आहे ? म्हणून बघू तरी." असे मनाशीच बोलत ते चॅनेल लावले तर ती सेट ऑफ थ्री बेडशीटस आणि पोळ्या ठेवण्याच्या भांड्यांची (कॅसरोल्स) जाहिरात होती. नामसाधर्म्यामुळे इकडे आम्ही गंडलो ना.
बाकी ही पोळ्या ठेवण्याची भांडी आणि बेडशीटसची एकत्र जाहिरात करणार्या माणसाला पुण्यातल्या तुळशीबागेतल्या "आमचे येथे उत्तम दर्जाची काजू कतली आणि परकर मिळतील." या दुकानातून प्रेरणा मिळालेली असणार. अरे कुठल्या दोन गोष्टींची एकत्र जाहिरात करायची याचा काही विवेक ?
आता त्या बेडशीटस जुन्या काळच्या ढाक्याच्या मलमलीसारख्या (ढाक्याची मलमली साडी म्हणे काडेपेटीत वगैरे मावायची. खरेखोटे मुजीबुर आणि त्याची प्रजाच जाणे.) त्या पोळ्यांच्या भांड्यात ठेवायच्या आहेत ? की त्या बेडशीटसवर बसून त्या पोळ्यांच्या भांड्यातून पोळ्या खायच्यायत ? काही तरी तार्किक मेळ ?
यांच्या या आक्रमणाला जोरदार प्रत्युत्तर म्हणून
कलाईग्नार, जया, सन टीव्ही वर,
"मला घेऊन चला, पळवापळवी, अण्टीने वाजवली घंटी, हळद रूसली कुंकू हसल" आणि असलेच मराठीत मैलाचा दगड ठरणारे (यातला 'दगड' येवढाच शब्द खरा) सिनेमे डब करून सतत दाखवावेत असा अंमळ दुष्ट विचार माझ्या मनात नेहमी येतो.
जशास तसे वागायला आम्ही मराठी मंडळी कधी शिकणार , कुणास ठाऊक ?
— Tit for tat चे विचार करणारा आपला दुष्टखाष्ट मराठी माणूस, "रामभाऊ: द वॉरियर.



Thursday, October 29, 2020

वाहन उद्योगातले १९८० च्या दशकातले आवश्यक बदल. टाटा, लेलॅण्ड आयशर स्वराज वगैरे.

 १९८० च्या दशकापर्यंत भारतात टाटा आणि अशोक लेलॅण्डच्या मोठ्या (१० चाकी, २ ऍक्सल्सच्या) ट्रक्सचीच चलती होती. कमी मालाच्या वाहतुकीसाठी छोट्या ट्रकची आवश्यकता असते वगैरे कुणाच्या गावीही नव्हते.

दिल्ली क्लॉथ ऍण्ड जनरल मिल्स (DCM) ने जपानी टोयोटा सोबत भागीदारी करून छोटे ट्रक्स उत्पादनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले आणि मग विविध जपानी मोटार कंपन्यांसोबत भागीदा-यांचा कालखंड सुरू झाला. स्वराज गृपने माझदा सोबत, आयशर गृपने मित्सुबिशी सोबत भागीदारी करून छोटे ट्रक्स भारतीय बाजारपेठेत बाजारपेठेत आणलेत आणि ते तंत्रज्ञान आत्मसात करून, भागीदारी संपुष्टात आली, तरी त्या ट्रक्सचे उत्पादन भारतीय रूपात सुरूच ठेवले.





त्याचा परिणाम असा झाला की हा असा पण segment बाजारात आहे याची जाणीव टाटा आणि अशोक लेलॅण्ड दोघांनाही झाली आणि मग टाटा ४०७, टाटा ७०९, टाटा ९०७ वगैरे छोटे ट्रक्स टाटाने आणलेत तर लेलॅण्डनेही इव्हेकोसोबत भागीदारी करीत छोटे ट्रक्स बाजारात उतरवलेत. आता अधिकाधिक सूक्ष्म बाजारपेठ ताब्यात घेण्यासाठी टाटा एस, लेलॅण्ड दोस्त वगैरे स्पर्धा सुरू झालीय. या स्पर्धेत आयशर, स्वराज, DCM कुठेच नाहीत. उलट आयशरने विस्तार करीत आता मोठे, २५ टनी, ४० टनी ट्रक्स बनविण्यात लक्ष घातलेय.
आज फ़क्त स्वराज गृप माझदा चे नाव लावतोय. आयशरने मित्सुबिशी चे नाव आपल्या उत्पादनांना देणे बंद केलेय. DCM टोयोटा चे नवीन ट्रक्स आताशा बाजारात येतच नाहीत. एखाद्या विदेशी कंपनीशी भागीदारी करून विदेशात चालणारी एखादी उपयुक्त कल्पना आपल्या देशाच्या भल्यासाठी आणण्याच्या काळाचे मात्र आम्ही साक्षीदार ठरलो, इतकेच.
- जपानी डोक्याचा, आपला रामोहिरो किनीसाकी

Wednesday, October 28, 2020

काही अति उपेक्षित वैदर्भिय फ़ळे आणि रानमेवा.

 ज्या फळाच्या आठोळीतून चारोळ्या मिळतात ती "चारं" (यातल्या "च" चा उच्चार "चूल" शब्दासारखा),

जांभळ्या पातळ आवरणाच्या आंबडगोड "एरोण्या"
आणि
गरीबांचे चिक्कू म्हणून ओळखले जाणारे "टेंभर" हे पदार्थ म्हणजे फक्त आग्नेय विदर्भाचीच मक्तेदारी आहे. (चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्ह्याचा वणी, घाटंजी तालुका आणि थोडा किनवट तालुका)
बाकी आजकालच्या जागतिकीकरणाच्या नादात खुद्द चंद्रपुरातही हे पदार्थ दिसत नाहीत.
- "आता पुढच्याखेपी चांद्याले गेलो का नाई, त गोलबजारात जाऊन पहाच लागते मले, का कोठ गेले हे टेंभरं न त्या एरोन्या ?
हे मले सैनच नाई होऊन राह्यलं" म्हणत
Be Vocal for Local साठी झटणारा तुमच्या सगळ्यांचा "चैतू" राम.

Tuesday, October 27, 2020

दीन दुःखी का कष्ट घटाऍ, भारत स्वर्ग बनेगा.

 अभियांत्रिकी क्षेत्रात गेल्या २५ वर्षांपासून अध्यापन करीत असताना दोन वर्षांपूर्वी अचानक एक विलक्षण बातमी वाचनात आली. डेन्मार्क आणि हॉलंड ही युरोपीय राष्ट्रे त्यांच्या दूध दुभत्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्या राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेत दूध दुभत्याच्या अर्थकारणाचा भाग २० %  आहे. तिथल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये याच व्यवसायाला लागणा-या यंत्रांच्या निर्मितेचे, आधुनिकीकरणाचे आणि तत्सम संशोधनाचे जास्तीत जास्त कार्य चालते. दूध दुभत्याच्या या व्यवस्थेला केंद्रीभूत मानूनच त्यांनी आपल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची आणि मनुष्यबळाची आखणी केलेली आहे. म्हणजे तिथला एखादा इंस्ट्रूमेंटेशन इंजिनीअर दुग्धव्यवसायाला लागणा-या इंस्ट्रूमेंटेसचीच आखणी, उभारणी आणि देखभालीचे शिक्षण घेईल. उगाचच शिकागो, तोक्यो, शांघाय मधल्या मोटार व्यवसायात काय नवनवीन इंस्ट्रूमेंटस लागतायत यावर तो आपली बुद्धी आणि वेळ खर्च करणार नाही आणि नासा मध्ये जाऊन अवकाश संशोधनासाठी लागणा-या इंस्ट्रूमेंटसची तो कल्पनाही करणार नाही. जी गोष्ट इंस्ट्रूमेंटेशन इंजिनीअरची तीच मेकॅनिकल इंजिनीअरची, तीच इलेक्टॉनिक्स इंजिनीअरची. सगळे आपापल्या क्षेत्रात संशोधन करतील पण त्याची उपयुक्तता देशाच्या विकासात योगदान देणा-या मुख्य व्यवसायाला असेल असेच एव्हढेच आणि इतपतच.


भारतात चाललेल्या सध्याच्या संशोधनाविषयी विचार केला तर असे एकत्रित स्वरूपाचे संशोधन शेती या भारताच्या मुख्य व्यवसायाविषयी का झाले नाही ? याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. अक्षरशः हजारो अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून दरवर्षी निघणा-या करोडो इंजिनीअर्सपैकी ०.१ % इंजिनीअर्सपण शेतीबाबत असे उपयुक्त संशोधन करीत असतील की नाही ? हा प्रश्नच आहे. बरे, संशोधनांची गरज नाही असे नाही आणि संशोधक मनोवृत्तीचे विद्यार्थी, शिक्षकही कमी आहेत असे नाही पण नेमके संशोधन कुठे आणि कसे व्हायला हवे यावर संवादच होत नाही. शेतीविषयक संशोधन हा कृषी विद्यापीठांचा भाग असल्याचे मानून इतर सर्व विद्यापीठांनी त्यातून अंग काढून घेतलेय आणि कृषी विद्यापीठांना आपल्या संशोधन विषयक गरजांसाठी इतर विद्यापीठांशी संपर्क साधता येत नाही. ही अशी कोंडी झालेली आहे. परिणामी दरवर्षी शेकडो पी. एच. डी. चे प्रबंध, हजारो एम. टेक. चे प्रबंध सादर होतात आणि सादरकर्त्याला पदवीच्या कागदांचे सुख प्रदान करून वाचनालयाच्या कोप-यात गुप्त होतात आणि तिथेच वर्षानुवर्षे धूळ खात राहतात.

साधे उदाहरण आहे. आज भारतभर वाहतूक व्यवसाय अत्यंत वाढलेला आहे. दोन ऍक्सल ट्रक्स जाऊन आजकाल सगळे १०, १४, १८ चाकांचे मल्टी ऍक्सल ट्रक्स दिसायला लागले आहेत. मोठमोठ्या राष्ट्रीय महामार्गांवर असे ट्रक्स दुरूस्ती, देखभालीसाठी थांबायला थोड्या थोड्या अंतरावर महामार्गाच्या बाजूलाच "Truck Lay Bye" उभारल्या गेलेले आहेत. अतिशय स्तुत्य रचना. सोबतच गेल्या काही वर्षांमध्ये सगळ्या प्रमुख शहरांमध्ये गल्लोगली पंक्चर दुरूस्ती, मोटारगाड्यांच्या चाकांची देखभाल यासाठी पूर्वीची श्रमाधारित दुकाने जाऊन स्वयंचलित यंत्रांवर चालणारी आणि पूर्वी काही तास लागणारे दुरूस्तीचे काम काही मिनीटांमध्ये करणारी दुकाने आलेली आहेत.




महामार्गाच्या बाजूला ट्रक थांबवून जुन्या श्रमाधारित पद्धतीने ट्रकची चा्के बदली करताना त्या ट्रकचे क्लीनर्स, ड्रायव्हर्स पाहिलेत की त्या बिचा-यांपर्यंत हे नवे औद्योगिकीकरण कधी पोहोचणार ? या विचाराने मन खिन्न होते. ट्रकची थांबलेली चाके म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचे मंदावलेले चाक हा सरळ हिशेब डोळ्यासमोर येतो. बरे त्या ट्रकसाठी ट्रकच्याच बॅटरीवर चालणारे, हवेच्या दाबाखाली (pneumatic) चाक बदलणारे, पंक्चर दुरूस्त करणारे असे छोटेखानी यंत्र बनविणे म्हणजे रॉकेट सायन्स नव्हे. अशी गरज ओळखून त्यादृष्टीने प्रयत्न करणारे मेंदू हवेत. बरे, असे संशोधन परदेशात झाले असल्यास त्याचा नेमका विध घेऊन आपल्या हवामानाला, इथल्या वापरणा-यांच्या संस्कृतीला उपयुक्त असे बदल त्यामध्ये करणे एव्हढाच भाग नवीन संशोधनाचा राहील. तो तरी आपण पुढाकार घेऊन केला तर या अनेक उपेक्षितांचे अज्ञात आशिर्वाद आपण घेऊच पण देशाची अर्थव्यवस्था गतिमान करण्यातही आपण सक्रिय राहू हा विचार आजच्या अभियंत्यांनी करण्याची गरज आहे. (या संकल्पनेवर पेटंट घेण्याचा माझा स्वतःचाच विचार होता पण आज ही संकल्पना आपल्या सगळ्यांसमोर मांडल्याने हा विषय आपणा सर्वांच्या मालकीचा झालेला आहे.)

आज भारतभर शेतकरी बंधूंसाठी आपण आपली बाजारपेठ खुली केलेली आहे. मग काटोलच्या एखाद्या संत्रा उत्पादक शेतक-याला, इंदूरच्या छोट्या व्यापा-याशी संपर्क साधून, आपली संत्री झाडावरून उतरवल्यावर लगेच दुस-या दिवशी इंदूरला बाजारपेठेत का पाठवता येऊ नये ? भारतीय रेल्वेवरून धावणा-या प्रत्येक एक्सप्रेस गाडीत पुढे आणि मागे गार्डाच्या डब्यासोबत एक चार टनी मालवाहू डबा असतो. मग चेन्नईवरून येणा-या आणि उज्जैनला जाणा-या गाडीत काटोल स्टेशनात "आज त्या मालवाहू डब्ब्यात किती जागा उपलब्ध आहे ?"  ही माहिती प्रवासी आरक्षणाच्या उपलब्धतेसारखी त्या शेतक-याला का उपलब्ध होऊ नये ? काटोल ते उज्जैन हा ८ तासांचा प्रवास करून ती ताजी संत्री त्या व्यापा-यापर्यंत १० तासात आणि उपभोक्त्यापर्यंत १५ तासांमध्ये का पोहोचू नयेत ? MBA च्या अभ्यासक्रमात शिकलेले Supply Chain Management या ठिकाणी अंमलात आणावे असे कुणालाच का वाटू नये ? की Supply Chain Management हे फ़क्त फ़्युचर गृप आणि ऍमेझोनमध्ये काम करणा-यांनीच वापरले पाहिजे असा दंडक सरकारने घालून दिलेला आहे ?



 
शेतक-यांची पोरेही MBA वगैरे करून फ़ुटकळ नोक-यांच्या मागे आपली शक्ती वाया घालवतात हे पाहून खरोखर चिंता वाटते. अरे कल्पवृक्ष तुमच्या दारी आहे रे. त्याच्याकडे काय मागायचे ? त्याची मशागत कशी करायची ? याचा विवेक बाळगा. मग तो कशी फ़ळे देतो ते बघा. समर्थांनी "घरी कामधेनू पुढे ताक मागे" असे जे वर्णन केलेले आहे ते आपलेच आहे हे ओळखा.

जबलपूरचे प्रसिद्ध कवी कै. श्री. लक्ष्मण ज हर्षे यांच्या "राम उसीने पाया" या गीतमालेच्या शेवटल्या ओळी आहेत

दीन दुःखी का कष्ट घटाऍ, सबको राम मिलेगा
उंच नीच मतभेद हटाऍ, भारत स्वर्ग बनेगा.

यात आपल्या आसपास वावरणा-या दीन दुःखितांचे कष्ट कमी करण्यासाठी माझे शिक्षण, माझे संशोधन आणि पर्यायाने माझे जीवन मी पणाला लावेन हा संकल्प भारतमातेच्या प्रत्येक सुपुत्राने घ्यायला काय हरकत आहे ? भारतवर्षासाठी हे चिंतन आणि त्याप्रमाणे आजपासूनच करायला लागूयात.

- आदर्शवादी चिंतन करणारा, भाबडा वाटणारा पण आदर्शवादी चिंतनातूनच आदर्श जीवन निर्माण होण्याची वाट सापडेल यावर दृढ विश्वास असणारा भारतकुमार राम किन्हीकर.

एका सुंदर रांगोळीची आठवण

 दिवाळी २०१३. धनत्रयोदशीचा दिवस.

दिवाळी साजरी करायला आम्ही सहकुटुंब सांगोल्यावरून नागपूरला येत होतो.
सांगोल्यावरून निघायला थोडा उशीरच झाला होता. पहाटे ५.०० ला निघायचे ठरले होते पण कॅम्पस मधून निघता निघता तब्बल ७.०० वाजले.
७७५ किमी (मार्गे पंढरपूर - टेंभूर्णी - करमाळा - नगर - औरंगाबाद - जालना - सिंदखेडराजा - मेहकर - कारंजा (लाड) - अमरावती) जायचे म्हणजे जवळपास १६ ते १७ तास लागणार हा गेल्यावेळेचा हिशेब होता.
रात्री ८ किंवा ९ नंतर गाडी चालवायला मला अजिबातच आवडत नाही. मी बर्याचदा पहाटे उठून, अंघोळ वगैरे आन्हिके उरकून अगदी ३.३० ला ही गाडी चालवलेली आहे पण रात्रीच्या ड्रायव्हिंगचा खूप कंटाळा येतो.
रात्री ८ आणि पहाटे ३.३० चा अंधार जरी सारखाच असला तरी पहाटेच्या ड्रायव्हिंगला हळूहळू उजाडत जाणार्या प्रकाशाची आशावादी किनार असते. त्यात ड्रायव्हिंग करणे आनंददायी अनुभव असतो.
तेच रात्री ८ नंतर क्षणाक्षणाला गडदभीषण होत जाणार्या अंधाराची खिन्न किनार असते. ही वेळ सर्व सृष्टीच्या विसाव्याची. मग यावेळी निसर्गनियमाविरूध्द जाऊन आपली गाडी दामटावी असे वाटत नाही.
सांगोल्यावरून जवळपास ४८० किमी कापून संध्याकाळी मालेगाव (जहांगीर) ला आलो तेव्हा संध्याकाळचे ६ वाजत आले होते.
मग रात्री नागपूरला जाण्यापेक्षा जवळच वाशिमला मुक्काम करायचे ठरले. वाशिमला मुक्काम करूयात, उद्या सकाळी इथल्या ग्रामदैवत बालाजीचे दर्शन घेऊन पुढे नागपूरला जाऊयात हा बेत ठरला. वाशिमचे बालाजी मंदिर अतिशय प्रेक्षणीय आहे. गतकालीन विदर्भाचे वैभव त्यात दिसून येते.
वाशिममध्ये मुक्कामाच्या ठिकाणांचा शोध घेतला असता आमच्या कल्पनेपेक्षाही उत्कृष्ट अशा, हाॅटेल मणिप्रभाचा शोध लागला. (आज ते हाॅटेल तिथे आहे की नाही हे माहिती नाही पण ambience, maintenance, service आणि food quality मधे इतका चांगला दर्जा भल्याभल्या हाॅटेल्समधे मी बघितलेला नाही. त्याचा अगदी प्रामाणिक review सुध्दा मी tripadvisor वर टाकला.)
त्या हाॅटेलच्या स्वागत कक्षासमोरच काढलेल्या या सुंदर गालिचावजा रांगोळीचा हा फोटो.



दरवर्षी २३ ऑक्टोबरला फेसबुकवरून आमच्या तिथल्या वास्तव्याच्या आठवणी ताज्या होतात. दरवर्षी फक्त फोटो टाकतो. यावर्षी फोटोमागची संपूर्ण आठवण.
- एक कलासक्त, रसिक ड्रायव्हर बंधू, रामभाऊ मोटरवाले (फक्त दिवसा गाडी हाकणारा गडी)

Monday, October 26, 2020

MSRTC's Yashwanti service


 "Yashwanti" from Sangola depot.

"Yashwanti" is a brand name for midi buses operated by MSRTC on short rural routes. It stops at all smaller places for passenger traffic and has a good frequency. This was an experiment to counter the challenge posed by unauthorized passenger traffic by Matadors, Vikram rikshaws and other smaller vehicles plying illegally in rural Maharashtra.
Sangola - Pandharpur Yashwanti service.
Via Sangewadi - Khardi.
Route length 34 kms
MH - 07 / C 7882
Sangola depot, Solapur division.
TATA 712 Ex BS III model
Built by ACGL, Goa. Passed at Sindhudurg district RTO at Sawantwadi i.e. MH - 07.
MSRTC got this fleet of midi buses built by two agencies. ACGL Goa and Antony Panvel. Antony built buses has passing in Raigad district RTO i.e. MH - O6.
Photographed at Sangola bus stand.
07/05/2014. 08.14 hours.
Now, I think most of these buses have completed their codal life and are retired now from their service in MSRTC.

- Ram Kinhikar (Busfan)

Sunday, October 25, 2020

सलमान खान, श्रद्धा कपूर आणि त्यांच्या चाहत्यांचा एकत्रित बुध्द्यांक.

 अगदी "मैने प्यार किया" आणि "हम आपके है कौन ?" यशस्वी असल्याच्या दिवसांपासूनच मला सलमान खान या इसमाच्या (आणि खासकरून त्याच्या चाहत्यांच्या) एकंदर (एकत्रित) बुध्दीमत्तेविषयी दाट शंका होती. हळुहळू खात्री पटलीय.

पण त्या श्रध्दा कपूर नामक ठोकळी (ठोकळ्याच स्त्रीलिंग काय हो ? सशाचही स्त्रीलिंग कळल की सांगा बर.) बद्दल अगदी उलट झाल.
ते तिच "छम छम छम" गाण. (कुणाला आठवत का रे आता ते गाण ? तीन चार च वर्षे झालीय बघा.) गाडीतल्या FM वर मी ते पहिल्यांदा ऐकले तेव्हा त्या गाण्यात ती माधुरी दिक्षीत सारखी नजाकतीने नाचली असेल अशा अपेक्षेने व्हिडीओ पाहिला पण हाय रे दैवा...
एखाद्या फुटबाॅल सामन्याच्या तयारीसाठी जी लाथालाथी होते तसा नाच "छम छम छम" सारख्या सुमधूर गाण्यावर करताना पाहून श्रध्दा कपूरच्या एकंदर बुध्दीमत्तेबद्दल बद्दल अजिबात शंका उरली नाही.
"म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो" म्हणतात ना तस्से झालेय अगदी. आजकाल श्रध्दा कपूरच्या त्या लाथाळीचा हे बाॅलिवुडचे नाचे "बेंचमार्क" म्हणून वापर करताहेत. ती संतूरची जाहिरात पाहून तरी मला तसेच वाटतेय. यांना बेकरीत पावाची कणिक तुडवायला किंवा वायनरीत द्राक्षे तुडवायचे काम अगदी perfect जमेल असे वाटते.
अरे काय ते नाच ? काय त्या लाथाळ्या ? हॅट्ट. याच्यापेक्षा आमच्या नागपुरातली गध्यांची पोट्टीपाट्टीही प्रेक्षणीय लाथा झाडतात हो.
- संतूर न वापरताही गोरा गोरा पी....ट्ट दिसणारा, आणि वय लपविण्याची अजिबात आवश्यकता वाटत नसलेला, नागपूरकर राम.

Saturday, October 24, 2020

माझे शतक : यावर्षीच्या ब्लॉगपोस्टचे.

२००८ च्या डिसेंबरमध्ये हा ब्लॉगलेखनाचा प्रवास सुरू केला. सुरूवातीला वाचकांचा प्रतिसाद कमी होता आणि मी सुद्धा त्याबाबत फ़ारसा गंभीर नसावा.

पण फ़ेसबुक आल्यानंतर ब्लॉग्जना व्यापक प्रसिद्धी मिळायला लागली. आणि नागपूर सोडून सांगोला, शिरपूर इत्यादि महाराष्ट्राच्या इतर भागात गेल्यानंतर तिथल्या अनुभवांनी अनुभवविश्व संपन्न झाले आणि त्याचे प्रतिबिंब ब्लॉगलिखाणात उमटले. रेल्वे आणि बस फ़ॅनिंगविषयी लिहीण्यासाठी उघडलेल्या ह्या ब्लॉगचा वारू मग विषयांची बंधने न बाळगता चौफ़ेर उधळत अनेक विषयांवर आपली मते व्यक्त करू लागला.
२०२० मध्ये लॉकडाऊन आले. कार्यालयात वर्क फ़्रॉम होम सुरू झाले. जाण्यायेण्याचा वेळ वाचला. कामांचे दिवस आणि तास कमी झालेत. अनेक विषय जे मनात असायचे आणि इतर कार्यबाहुल्यामुळे मनातच विरून जायचेत ते विषय व्यक्त करायला वेळ मिळाला. आणि या वर्षी ब्लॉगपोस्टने शतक झळकवलेच.
आता उत्सुकता की या वर्षात १५० पोस्टसचा पल्ला गाठेन की नाही ? याची. २०२० वर्षातले ७९ दिवस बाकी आहेत. ७९ दिवसात ५० म्हणजे टारगेट achievable आहे खरे. आपणा सर्वांचा प्रतिसाद माझ्या ब्लॉगला लाभो ही प्रार्थना.
- प्रवासी पक्षी, राम.



Friday, October 23, 2020

काही श्रेष्ठ भागवत (प्रल्हाद)

 प्रल्हादाचेही चरित्र आपणा सगळ्यांना ढोबळमानाने माहिती आहेच. अत्यंत पापी, पराक्रमी आणि सूडाने पेटलेल्या अशा पित्याच्या पोटी जन्म झाला. जन्मापूर्वी आईच्या गर्भात असताना देवर्षि नारदांनी आईला केलेला भगवत्भक्तीचा उपदेश प्रल्हादाने ऐकला आणि तो त्याच्यावर दृढ संस्कार झाला. 

श्रीमदभागवतात देवर्षि नारदांचे ज्या ज्या प्रसंगात प्राकट्य झालेले आहे ते ते सर्व प्रसंग सुखांतिकेत बदललेले आहेत. येनेकेन प्रकारेण प्रसंगांना सुखद वळण देण्याचे आणि भगवंताच्या मनासारखे घडवून आणण्याचे देवर्षिंचे कार्य खरोखर नतमस्तक करणारे आहे. आज कलियुगात आपण देवर्षिंना न जाणता त्यांना काही शेलक्या विशेषणांनी संबोधतो, ते किती चूक आहे हे आपल्याला कळेल. आणि आपणा सर्व सामान्य माणसांचे आयुष्य़ सुखकर होण्यासाठी जी विभूती कायम झटली तिचा उल्लेख हा कायम आदरार्थीच व्हायला हवा. कमीत कमी आपण भगवत्भक्तांनी तरी तो आदरार्थीच करायला हवा.

देवर्षिंचे संस्कार दृढ असल्याने पित्याच्या शत्रूचे गुणगान करणारा प्रल्हाद हा पित्याला सतत खुपू लागला. विविध आमिषे दाखवून, धाकदपटशा करून पित्याने त्याचे मन वळवण्याचा, त्याला भगवत्भक्तीपासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण प्रल्हाद बधला नाही. गुरूवचनांवर दृढ विश्वास ठेवून इतर कुठल्याही भौतिक आमिषांना न बधणारा, किंवा प्राणांतिक प्रसंगांना त्याच दृढ विश्वासाने सामोरे जाणारा प्रल्हाद हा आजच्या तरूणांसाठी आदर्श व्हायला हवा. आपल्या बालपणी आपल्या सगळ्यांवरच खूप चांगले संस्कार झालेले असतात पण मोठे झाल्यावर आपल्याला अकारण त्या संस्कारांची लाज वाटते. किंबहुना चांगल्या संस्कारांची लाज वाटणे म्हणजेच मोठेपण येणे अशी आपण आपली समजूत करून घेतलेली आहे. आपल्या सगळ्यांसाठी गर्भावस्थेतले चांगले संस्कार आयुष्यभर आणि प्राणापेक्षाही जास्त जपणारा हा दैत्यकुळात जन्म झालेला प्रल्हाद आदर्श व्हायला हवाय.

प्रल्हादाचा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे अभय. श्रीमदभगवतगीतेत दैवी गुणसंपत्ती वर्णन करताना भगवंतांनी उल्लेख केलेला पहिला दैवी गुण म्हणजे अभय. "अभयम सत्व संशुद्धी:, ज्ञान योग व्यवस्थिती:" यात पहिल्यांदा येणारा गुण अभय. भक्त निर्भय नसेल तर त्याच्यात इतर गुण येणारच नाहीत आणि आलेच तर ते समाजासाठी प्रदर्शित करण्याचे त्याला भय वाटेल. आज आपल्यातल्या किती भगवत्भक्तांना अभय होऊन त्यांचे दैवी गुण समाजासमोर मांडावेसे वाटतात ? की समाजाच्या तामसी रेट्यामुळे आपणच झाकोळले जाऊन आपले चांगले गुण आपण समाजापासून लपवून ठेवतो आहोत ? आणि समाजातल्या नवीन पिढीसमोर चांगले काय आणि वाईट काय ? याचा नीरक्षीरविवेक आपण आपल्या वागणुकीतून ठेवला नाही तर त्यांना, जे आज तामस वातावरण त्यांच्या डोळ्यांसमोर जाणीवपूर्वक ठेवण्यात येतय, तेच आदर्श वाटणार ना ? भगवत्भक्तांनी निर्भय होऊन चांगल्याला चांगले म्हणून प्रसार करणे आणि वाईटाचा विरोध करणे हे आपले आजचे कर्तव्य नाही का ?

आणि प्रल्हादाचा सगळ्यात मोठ्ठा गुण म्हणजे गुरूवचनांवरचा विश्वास. चर आणि अचर सृष्टीतही तोच एक परमात्मा भरून राहिला आहे हा दृढ विश्वास त्याच्या मनात होता आणि त्या विश्वासाच्या योगानेच भगवंताला स्तंभासारख्या जड वस्तूतही स्वतःचे अस्तित्व दाखवावे लागले. श्रीगजानन विजय ग्रंथात संतकवी दासगणू महाराजांनी म्हटल्याप्रमाणे "प्रल्हाद भक्त करण्या खरा, स्तंभी प्रकटलास जगदोद्धारा" असे रूप भक्ताभिमानी भगवंतांनी घेतले खरे पण तत्पूर्वी भगवंतांनी प्रल्हादाची खूप परीक्षा पाहिली. भगवंत, सदगुरू  परीक्षा तरी कशी पाहतात ? एक उर्दू कवी म्हणतो,

मुझे जो कराना था पथ पार

बिठाए उसपर भूत पिशाच्च

रचाए उसमे गहरे गर्न

और फ़िर करने आया जांच.

ज्या भक्ताचा सदगुरूवचनांवर दृढ विश्वास असेल तेच यातून तरून त्याच्याजवळ पोहोचतात. 

"तत्र ज्ञान विराग भक्तिसहितम, नैष्कर्म्यम आविष्कृतम" या श्रीमदभागवताचेच वर्णन केलेल्या गुणांपैकी प्रखर भक्ती हा एक गुण अंगी असलेला भक्त प्रल्हाद. आणि त्याची प्रखर भक्ती इतकी की भगवान नृसिंहाचे प्रगट झालेले उग्र रूप पाहून सगळ्या देवगणांना, इतकेच काय प्रत्यक्ष विष्णुपत्नी असलेल्या लक्ष्मीमातेलाही त्यांच्याजवळ जाण्याचे भय वाटले तेव्हा हा लहानसा बालक प्रल्हादच निर्भयपणे जाऊन त्यांच्या मांडीवर बसला आणि त्याने त्यांची स्तुती गाऊन त्यांना प्रसन्न केले. श्रीमदभागवतात भक्त प्रल्हादाने गायलेली भगवान नृसिंहाची स्तुती मुळातूनच वाचण्यासारखी आहे.




निर्भय होऊन, गुरूवचनांवर दृढ विश्वास ठेऊन केलेल्या साध्यासोप्या भक्तीने भगवंताला प्रगट व्हायला लावणा-या भक्त प्रल्हादाचा आदर्श आज कलियुगातही आपण ठेवायला काय हरकत आहे हो ?  त्याच्यासाठी भगवंत प्रगट झाले, माझ्यासाठीही होतीलच की. फ़क्त कलियुगात त्यांचे चर्मचक्षूंनी दर्शन होईल की अंतःचक्षूंना ते जाणवतील आणि माझे जीवन दैवी करून टाकतील याचा अनुभव प्रत्येकाने आपापल्या साधनेने आणि भक्तीने घ्यायचा आहे.

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर यांचे चिंतन (आश्विन शुद्ध सप्तमी, २३/१०/२०२०)

या लेखमालेला नावासकट किंवा कसेही भरपूर शेअर करावे ही नम्र विनंती. चांगले विचार भरपूर भगवतभक्तांपर्यंत पोहोचावेत आणि वैराग्याचा प्रसार व्हावा हा हेतू या लेखमालेमागे आहे. तसेही ही लेखमाला म्हणजे भगवान व्यासांच्या विचारांचे माझ्या मेंदूने केलेले फ़क्त प्रोसेसिंग आहे. (व्यासोच्छिष्टम जगत सर्वम) 

आणि तो मेंदू तरी "माझा आहे" असे मी का म्हणावे ? तोसुद्धा भगवंताच्या कृपाप्रसादानेच माझ्या देहात आलाय. त्यामुळे ही लेखमाला म्हणजे "त्वदीय वस्तू गोविंदम, तुभ्यमेव समर्पये" अशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे.

तुझेच देणे तुलाच अर्पण.


Monday, October 19, 2020

काही श्रेष्ठ भागवत (धृव)

 धृवबाळाचे चरित्र आपण सगळ्यांनीच आपापल्या बालपणी ऐकलेले आहे. उत्तानपाद राजा, त्याच्या दोन राण्या, सुरूचि आणि सुनीती. सुरूचि आवडती तर सुनीती नावडती. आणि मग धृवाचा पित्याच्या मांडीवर बसण्यावरून झालेला अपमान. त्याने वनात जाऊन देवर्षि नारदांच्या उपदेशानुसार केलेली तपश्चर्या आणि भगवंत त्याजवर प्रसन्न होऊन त्यांनी दिलेला वर आणि त्यामुळे धृवाला तारांगणात मिळालेले कायमचे आणि अढळ स्थान. 

पण श्रीमदभागवतात याहीपेक्षा अधिक धृवाचे चरित्र आलेले आहे. अवघ्या पाच वर्षांचा बालक अपमान सहन न होऊन वनात जायला निघाल्यावर देवर्षि नारदांनी त्याला पहिला उपदेश हा मान अपमानाच्या पुढे जाण्या-या अशा वैराग्याचा केलेला आहे. श्रीगजाननविजय ग्रंथात गजानन महाराजांनी जसा बाळाभाऊंना "अरे, जन्मे न कोणी, मरे न कोणी" या ओवीत जो वैराग्यपूर्ण उपदेश केलेला आहे, तसाच. पण तरीही धृवबाळाने त्यांचे म्हणणे ऐकले नाही तेव्हा भगवत्प्राप्तीसाठी "ओम नमो भगवते वासुदेवाय" या मंत्रपठणाचा उपदेश करून देवर्षि नारद तिथून निघून गेलेले आहेत.

धृवबाळाने पाच वर्षे तपश्चर्या करून भगवंतांना सगुण स्वरूपात प्राप्त करून घेतले आणि त्यांच्याकडून "अ च्युती" चा वरही प्राप्त केला पण नंतर त्याला वैराग्य प्राप्त झाले आणि देवर्षि नारदांचा पहिलाच उपदेश न ऐकल्याबद्दल पश्चात्ताप झाला. "ज्या भगवंताला अनेक योगी, मुनी, साधक हजारो वर्षांच्या तपश्चर्येनंतरही प्राप्त करू शकत नाहीत त्याला मी अल्पशा तपाने प्राप्त केले पण त्यानंतर जे मागितले ते कधी ना कधी नष्ट होणारे सुखच मागितले. शाश्वत स्वरूपाच्या त्याच्या पदकमलांशी अतूट नाते मागायला मी विसरलो." अशी धृवाची भावना झाली आणि तो विषण्ण झाला. भागवतकार सांगतात की या आत्मसाक्षात्कारानंतरच धृवाची खरी उन्नती सुरू झाली. तो वैराग्याने वागत राहिला आणि त्या वैराग्यानेच परम पदाला प्राप्त झाला. 



परम पूजनीय ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा एक दृष्टांत आहे. आई घराच्या कामात, व्यापात असली आणि तिचे मूल रडत असले की पहिल्यांदा ती मुला समोर खेळणी वगैरे टाकून त्याला रमविण्याचा प्रयत्न करते. तो जर त्या खेळण्यांमध्ये रमला तर ती पुन्हा आपले घरकाम आणि इतर व्याप सांभाळायला मोकळी होते. पण ते मूल खेळण्यांमध्ये न रमता जर "आईच हवी" म्हणून भोकाड पसरत राहिले तर त्याला कडेवर उचलून घेण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नसतो. तसेच भक्ताचे व्हायला हवे. भगवंत आपल्यामागील उपाधी टाळण्यासाठी भक्तांना या जगतातील अनेक सुखे प्रदान करतो, अनेक भौतिक खेळण्यांमध्ये त्याचे मन रमविण्याचा प्रयत्न करतो. पण भक्ताने या गोष्टींमध्ये न रमता जर भगवत्प्राप्तीचाच ध्यास घेतला तर भगवंताला आपले सान्निध्य भक्ताला द्यावेच लागते.  

म्हणूनच मनाच्या श्लोकांमध्येही समर्थांनी 

धुरू लेकरु बापुडे दैन्यवाणे। कृपा भाकितां दीधली भेटी जेणे ॥ 

चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी। नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ 

असे या भगवत्भक्ताचे वर्णन केलेले आहे.

प्रत्यक्ष भगवंताच्या दर्शनापेक्षाही मनातील वैराग्यानेच एखादा मनुष्यप्राणी श्रेष्ठपद प्राप्त करू शकतो या शिकवणुकीसाठी हे धृवचरित्र श्रीमदभगवतात आलेले आहे. "ज्ञान विराग भक्तिसहितम, नैष्कर्म्यम आविष्कृतम" हे श्रीमदभागवताचे ब्रीद खरे करणारा श्रेष्ठ भागवत धृवबाळ.

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर यांचे चिंतन (आश्विन शुद्ध तृतीया, १९/१०/२०२०)

या लेखमालेला नावासकट किंवा कसेही भरपूर शेअर करावे ही नम्र विनंती. चांगले विचार भरपूर भगवतभक्तांपर्यंत पोहोचावेत आणि वैराग्याचा प्रसार व्हावा हा हेतू या लेखमालेमागे आहे. तसेही ही लेखमाला म्हणजे भगवान व्यासांच्या विचारांची माझ्या मेंदूने केलेली फ़क्त प्रोसेसिंग आहे. (व्यासोच्छिष्टम जगत सर्वम) 

आणि तो मेंदू तरी "माझा आहे" असे मी का म्हणावे ? तोसुद्धा भगवंताच्या कृपाप्रसादानेच माझ्या देहात आलाय. त्यामुळे ही लेखमाला म्हणजे "त्वदीय वस्तू गोविंदम, तुभ्यमेव समर्पये" अशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे.

तुझेच देणे तुलाच अर्पण.



Sunday, October 18, 2020

काही श्रेष्ठ भागवत (लेखमाला)

 श्रीमदभागवतात भगवंताच्या आणि काही श्रेष्ठ भगवतभक्तांच्या चरित्रांचे वर्णन आलेले आहे. तसा श्रीमदभागवत हा ग्रंथच माणसाच्या मनात वैराग्य उत्पन्न करणारा आहे. "तत्र ज्ञानविराग भक्तिसहितम, नैष्कर्म्यम आविष्कृतम" हे तर स्वतः श्रीमदभागवताचे चतुःश्लोकी भागवतातील वर्णन आहे. त्यातल्या कथा केवळ पुराणकथा नाहीत तर त्याचे नीट परिशीलन केले तर श्रोता, वक्त्यांच्या मनात तीव्र वैराग्य उत्पन्न करण्याची ताकद त्या कथांमध्ये आहे. त्यादृष्टीने श्रीमदभागवत हा एक प्रासादिक ग्रंथ आहे. 

त्यात एकूण व्दादश स्कंध (खंड) आहेत. त्यातल्या दशमस्कंधात भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचे एकूण ९० अध्यायांमध्ये विस्तृत वर्णन केलेले आहे. ते दशमस्कंधचरित्र ऐकताना सदभक्तांची अवस्था अगदी भावविभोर होऊन जाते, भक्तांचे हृदय त्या परमात्म्याच्या लीलांच्या नुसत्या श्रवणाने भरून येते आणि म्हणूनच दशमस्कंधाला श्रीमदभागवताचे हृदय असे म्हटले जाते.

एकादश स्कंधात मात्र भगवंताने भक्ताबरोबर केलेली तत्वचर्चा आहे. त्यात ज्ञान आणि त्यातून प्राप्त होणारे वैराग्य आहे. एकादश स्कंधाची भाषा आणि त्यातला आशय कळायला कठीण आहे आणि म्हणूनच आपल्यासारखे सर्वसामान्य भक्त दशमस्कंधाचा अधिकाधिक आनंद घेताना दिसतात. श्रीमदभागवतकथेचे कलियुगातले बहुतांशी प्रवचनकारही दशमस्कंध सांगताना विशेष खुलतात आणि श्रोतृवर्गाच्या आनंदमहोत्सवात स्वतः बुडून जातात असे आपल्याला पहायला मिळते.





श्रीमदभगवतगीतेतही प्रत्यक्ष भगवंतांनी "ज्ञानाने मी प्राप्त होईन पण भक्तीने मी अधिक लवकर, कमी प्रयासाने प्राप्त होईन" असा उपदेश केलेला आहे. सर्वसामान्य भक्तांना भगवंताच्या लीलांचे नुसते श्रवण आणि कीर्तन यामुळे पाच हजार वर्षांनंतरही उचंबळून येते आणि म्हणूनच या भारतभूमीवर हे भक्तीचे बीज अगदी खोलवर रूजल्या गेले आहे असे मानले पाहिजे.


श्रीमदभागवतात तर खूप सा-या भगवतभक्तांच्या चरित्राचे वर्णन आलेले आहे. पण त्यात धृव, प्रह्लाद, सुदामा आणि श्रीशुकदेवजी यांच्या चरित्र वर्णनाला अधिक जास्त महत्व आहे. श्रीशुकदेवजी यांच्या चरित्राला तर इतके महत्व आहे की श्रीमदभागवताच्या संहितेत त्यांचा उल्लेख "श्रीशुकदेवजी" असाच आलाय. संहितेत फ़क्त भगवंतांचा उल्लेख "श्रीभगवान" असा आलाय आणि त्यांच्यानंतर श्री शुकदेवांचाच असा उल्लेख आलाय.


या चार चरित्रांनाच इतके महत्व का प्राप्त झालेय ? याचा अधिक खोलात जाऊन विचार करताना आपल्या लक्षात येईल की या चौघांचीही चरित्रे श्रीमदभागवताच्या मूळ हेतूशी अत्यंत पूरक आणि श्रीमदभागवताचे ब्रीद पोषक अशी आहेत. "ज्ञान विराग भक्तिसहितम, नैष्कर्म्यम आविष्कृतम" हे श्रीमदभागवताचे ब्रीदवाक्य आहे आणि तीच त्या ग्रंथाची फ़लश्रुतीही आहे. श्रीमदभागवत वाचायचे ते वैराग्य मनात यावे म्हणूनच. "विगतः रागः यस्मान सः विरागः" अशी वैराग्य शब्दाची फ़ोड होईल. या सृष्टीतल्या कुठल्याची चर आणि अचर गोष्टीत ज्याचे रमणे संपले तो विरागी पुरूष. एका भगवंतावाचून सृष्टीत दुसरे कुणीही नाही हे ज्याला जाणवले तो विरागी माणूस.


मग धृव, प्रह्लाद, सुदामा आणि श्रीशुकदेवजी यांच्या चरित्रात हे वैराग्य कसे आहे ? याचा आपण क्रमशः विचार करूयात.


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर यांचे चिंतन (आश्विन शुद्ध व्दितीया, १८/१०/२०२०)


या लेखमालेला नावासकट किंवा कसेही भरपूर शेअर करावे ही नम्र विनंती. चांगले विचार भरपूर भगवतभक्तांपर्यंत पोहोचावेत आणि वैराग्याचा प्रसार व्हावा हा हेतू या लेखमालेमागे आहे. तसेही ही लेखमाला म्हणजे भगवान व्यासांच्या विचारांची माझ्या मेंदूने केलेली फ़क्त प्रोसेसिंग आहे. (व्यासोच्छिष्टम जगत सर्वम) 

आणि तो मेंदू तरी "माझा आहे" असे मी का म्हणावे ? तोसुद्धा भगवंताच्या कृपाप्रसादानेच माझ्या देहात आलाय. त्यामुळे ही लेखमाला म्हणजे "त्वदीय वस्तू गोविंदम, तुभ्यमेव समर्पये" अशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे.

तुझेच देणे तुलाच अर्पण.


पिस्ता : एक उपेक्षित सुकामेवा आणि त्याचे पुरण, sorry पुराण.

 तुमच्या आमच्यासारख्यांच्या घरात बदाम, अक्रोड, किसमिस, काजू आदि सुकामेवा आपण नियमितपणे आणत असतोच.

पण पिस्ता हे त्या सुकामेव्याचेच भावंड आपल्याला फारसे प्रिय नाही. कुणी सवयीने दर महिन्याच्या किराण्यात पिस्ता आणत असल्याचे उदाहरण विरळा.
आमच्या बालपणी पिस्ता हे नाव आम्ही केवळ पिस्ता कुल्फी आणि पिस्ता आईसक्रीम पुरतेच ऐकले होते. खूप वर्षांनी खरा पिस्ता पाहिला आणि दोन गैरसमज दूर होऊन खालील शहाणपण आले.
१. पिस्ता गडद हिरव्या रंगाचा नसतो. केवळ हिरव्या / पोपटी रंगातली एक छटा त्यात असते. ती सुध्दा अगदी १० %. त्यामुळे पिस्ता कुल्फी आणि पिस्ता आईसक्रीममधे जो रंग असतो तो कृत्रिमच असतो.
२. पिस्त्याची किंमत लक्षात घेता १ लीटर आईसक्रीममध्ये १० ग्रॅम जरी पिस्ता या कंपन्या घालत असल्यात तरी भरून पावलो म्हणायचे.
पण हा सुकामेवा बिचारा दर महिन्याच्या किराण्यात एवढा दुर्लक्षित का ? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळालेच नाही. लोक खजूर आणतात, अंजीर आणतात पण मोठ्या हौसेने पिस्ता खरेदी करणारी मंडळी फारशी दिसत नाहीत हो.
बर, संध्याकाळच्या अपेयपानाशी याचा संबंध असल्याने हा दुर्लक्षित आहे म्हणावे तर याचाच सख्खा भाऊ काजू हा त्या अपेयपान करणार्यांचा अधिक कट्टर सोबती आहे. (आणि याचा दूरचा गरीब चुलत घराण्यातला शेंगदाणा सुध्दा). पण तरीही महिन्या दोन महिन्याला "खिरीत टाकायला, लाडवांना लावायला" म्हणून काजू घरी येतातच आणि शेंगदाणे तर स्वयंपाकघराचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे अपेयपानाचा पिस्त्याच्या बहिष्काराशी संबंध नसावा.
तसेही संध्याकाळीच नव्हे तर कुठल्याही वेळी अवेळी होणारे अपेयपान आजकाल आपण (दुर्दैवाने) स्वीकारले आहेच. नव्हे त्यात आपण धन्यता मानू लागलोय. हे अपेयपान न करणारा, मागास, बूर्झ्वा आणि मैत्रीस नालायक ठरतोय, असो. तो वेगळा विषय आहे.
पिस्त्याच्याच, बिचार्याच्या नशीबी अशी उपेक्षा का यावी ? हा मला छळणारा प्रश्न आहे. रंग आणि चवीतही बर्यापैकी निर्गुण निराकार असलेला बिचारा पिस्ता. याला चित्ताकर्षक रंग नाही की जिभेवर ठेवल्याठेवल्या जाणवेल अशी चवही नाही.
पिस्त्याचे पुरण भरलेल्या मिठायांचे वर्णन ३० वर्षांपूर्वी साहित्यातून वाचले होते. आता ते पिस्त्याचे पुरण कुणी हौसेने करत असेल असे वाटत नाही.
थोडक्यात काय ? वपु काळे म्हणतात त्याप्रमाणे लोक तुमची दखल दोन प्रकारे घेतात.
अ) तुमच्याकडे लोकांवर भरपूर उपकार करण्याची ताकद हवी.
किंवा
आ) तुमच्याकडे लोकांना भरपूर उपद्रव देण्याची तरी ताकद हवी.
बिचार्या पिस्त्याकडे उपद्रवाची ताकद तर खचितच नाही. (परमेश्वराने निर्माण केलेल्या कुठल्याही नैसर्गिक वस्तूत ही उगाचच उपद्रवाची प्रवृत्ती नाही.) आणि त्याचे नक्की उपकार काय आहेत हे अजून मानवांना पूर्णपणे कळलेले नाहीत.
त्यामुळे पिस्ता हा मध्यमवर्गियांसारखाच उपेक्षित राहणार हे उघड आहे.
- बालपणी आजोळी, चंद्रपूरला, चारोळ्यांचे पुरण खाल्लेला आणि म्हातारपणी पिस्त्यांचे पुरण खाण्याची मनिषा बाळगणारा,
कुठल्याही चवीचे आईसक्रीम सारखेच प्रिय असलेला
"श्रीमंत रामचंद्रपंत"
पण मध्यमवर्गीय राम.

Saturday, October 17, 2020

जयजय स्वसंवेद्या.

 परमेश्वराचे स्वरूप वर्णन करताना ज्ञानोबामाऊलीने पहिल्याच ओवीत "जयजय स्वसंवेद्या" ही संज्ञा वापरली आहे. जो भगवंत (जे परमतत्व) भक्तांना स्वतःच्या संवेदनांव्दारे ओळखू येईल असा आहे, तो स्वसंवेद्य. 

भगवंताला जाणण्याकरिता इतर कुठलाही मार्ग नाही. हा ज्याच्या त्याच्या स्वतःच्या अनुभवाचा आणि स्वतःच्या जाणिवेचा प्रश्न आहे. किती सोपी आहे नं भगवंताला जाणणे ?

पण आपण प्रांजळ विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हे सगळ्यात कठीण आहे. जगातल्या सगळ्या गोष्टींवर आपण आपला ताबा मिळवू शकतो पण आपले मन आपल्या ताब्यात येणे ही दुरापास्त गोष्ट आहे. आणि त्या मनाच्या संवेदनेनेच भगवंताला ओळखायचे आहे. मग आपल्यासारख्या साधकांची so near yet so far अशी अवस्था भगवंताबाबत झाली नाही तरच नवल.


महालक्ष्मी देवी, मुंबई.

याठिकाणी आपल्या सदगुरूंची भूमिका येते. आपल्याला भगवंत जाणून घेण्याच्या मार्गावर, आपले मार्गदर्शक म्हणून, आपले सदगुरू उभे असतात. त्यांनी ते तत्व जाणले असते. त्या तत्वाचा अनुभव घेतलेला असतो. आणि आपल्यालाही तो अनुभव मिळावा म्हणून त्यांची सगळी धडपड असते. बर हा बाह्य अनुभव असता तर त्यांनी आपल्यासाठी तो रेडीमेड आणून दिलाही असता पण हा अनुभव प्रत्येकाच्या अंतरात्म्याने घ्यायचा आहे. म्हणून खरे सदगुरू आपल्या भक्ताचे  मन, भक्ताचा अंतरात्मा, भगवंत जाणण्यायोग्य बनविण्यासाठी प्रयत्न करीत असतात.

भक्ताची एकदा पूर्ण श्रद्धा आपल्या सदगुरूंवर बसली आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गाने तो काटेकोरपणे चालायला लागला की एका क्षणी त्याला जी अनुभूती येते तो आपल्या अंतःकरणाचा थरकाप उडवणारी असते. आपण ज्या परब्रम्हाच्या, भगवंताच्या शोधात आजवर आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाने चाललो आहे, ते परब्रम्हतत्व म्हनजे दुसरे तिसरे कुणीही नसून आपले सदगुरूच आहेत. 

आणि याहूनही पुढल्या टप्प्याची उत्कट जाणीव म्हणजे, भक्त सदगुरूंचे स्वरूप जाणल्यानंतर स्वतःच सदगुरूरूप होतो. "विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, तुका बिघडला तुका विठ्ठलची झाला" ही तुकाराम महाराजांची अनुभूती याच पठडीतली आहे, नाही ?



माझे सदगुरूकुळ

तयार आहात सगळे ही अनुभूती घ्यायला ? फ़क्त ही अनुभूती अंतरात्म्याने घ्यायची आहे, बाह्यांगाने कुणाला कळणार नाही, दाखवताही येणार नाही. स्वसंवेद्य असा हा अनुभव प्रत्येकाने स्वतःच्याच अंतर्मनाने घ्यायचा आहे, अनुभवायचा आहे.

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर यांचे चिंतन, आश्विन शुद्ध प्रतिपदा, १७/१०/२०२०.

(कृपया लेखकाच्या नावासकट लेख शेअर करावा ही नम्र विनंती.)