Saturday, October 17, 2020

जयजय स्वसंवेद्या.

 परमेश्वराचे स्वरूप वर्णन करताना ज्ञानोबामाऊलीने पहिल्याच ओवीत "जयजय स्वसंवेद्या" ही संज्ञा वापरली आहे. जो भगवंत (जे परमतत्व) भक्तांना स्वतःच्या संवेदनांव्दारे ओळखू येईल असा आहे, तो स्वसंवेद्य. 

भगवंताला जाणण्याकरिता इतर कुठलाही मार्ग नाही. हा ज्याच्या त्याच्या स्वतःच्या अनुभवाचा आणि स्वतःच्या जाणिवेचा प्रश्न आहे. किती सोपी आहे नं भगवंताला जाणणे ?

पण आपण प्रांजळ विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हे सगळ्यात कठीण आहे. जगातल्या सगळ्या गोष्टींवर आपण आपला ताबा मिळवू शकतो पण आपले मन आपल्या ताब्यात येणे ही दुरापास्त गोष्ट आहे. आणि त्या मनाच्या संवेदनेनेच भगवंताला ओळखायचे आहे. मग आपल्यासारख्या साधकांची so near yet so far अशी अवस्था भगवंताबाबत झाली नाही तरच नवल.


महालक्ष्मी देवी, मुंबई.

याठिकाणी आपल्या सदगुरूंची भूमिका येते. आपल्याला भगवंत जाणून घेण्याच्या मार्गावर, आपले मार्गदर्शक म्हणून, आपले सदगुरू उभे असतात. त्यांनी ते तत्व जाणले असते. त्या तत्वाचा अनुभव घेतलेला असतो. आणि आपल्यालाही तो अनुभव मिळावा म्हणून त्यांची सगळी धडपड असते. बर हा बाह्य अनुभव असता तर त्यांनी आपल्यासाठी तो रेडीमेड आणून दिलाही असता पण हा अनुभव प्रत्येकाच्या अंतरात्म्याने घ्यायचा आहे. म्हणून खरे सदगुरू आपल्या भक्ताचे  मन, भक्ताचा अंतरात्मा, भगवंत जाणण्यायोग्य बनविण्यासाठी प्रयत्न करीत असतात.

भक्ताची एकदा पूर्ण श्रद्धा आपल्या सदगुरूंवर बसली आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गाने तो काटेकोरपणे चालायला लागला की एका क्षणी त्याला जी अनुभूती येते तो आपल्या अंतःकरणाचा थरकाप उडवणारी असते. आपण ज्या परब्रम्हाच्या, भगवंताच्या शोधात आजवर आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाने चाललो आहे, ते परब्रम्हतत्व म्हनजे दुसरे तिसरे कुणीही नसून आपले सदगुरूच आहेत. 

आणि याहूनही पुढल्या टप्प्याची उत्कट जाणीव म्हणजे, भक्त सदगुरूंचे स्वरूप जाणल्यानंतर स्वतःच सदगुरूरूप होतो. "विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला, तुका बिघडला तुका विठ्ठलची झाला" ही तुकाराम महाराजांची अनुभूती याच पठडीतली आहे, नाही ?माझे सदगुरूकुळ

तयार आहात सगळे ही अनुभूती घ्यायला ? फ़क्त ही अनुभूती अंतरात्म्याने घ्यायची आहे, बाह्यांगाने कुणाला कळणार नाही, दाखवताही येणार नाही. स्वसंवेद्य असा हा अनुभव प्रत्येकाने स्वतःच्याच अंतर्मनाने घ्यायचा आहे, अनुभवायचा आहे.

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर यांचे चिंतन, आश्विन शुद्ध प्रतिपदा, १७/१०/२०२०.

(कृपया लेखकाच्या नावासकट लेख शेअर करावा ही नम्र विनंती.) 

No comments:

Post a Comment