Thursday, October 8, 2020

सांगोल्याचा आठवडी बाजार आणि नागर संस्कृतीतले आम्ही

 सांगोला येथे असताना दर रविवारी भरणार्या आठवडी बाजारात जाऊन भाजी आणणे हा माझ्या आनंदाचा गाभा असे. आसपासच्या गावातील शेतकर्यांनी आणलेली अतिशय ताजी रसरशीत आणि अप्रतिम चविष्ट भाजी या बाजारातच मिळायची. बाजारात एक साधा फेरफटका मारला तरी मन प्रसन्न होत असे. या रविवारच्या बाजाराची शेतकर्यांपेक्षा आम्ही गिर्हाईकंच जास्त वाट बघत असायचो.

रविवार आला की सकाळी ९.३० च्या सुमारास सकाळची आन्हिके आटोपून, चहा फराळ करून, मी आणि आमच्या महाविद्यालयाचा प्राचार्य असलेला, माझा मित्र, डाॅ. सतीश तानवडे, दोघेही बाजारहाटीसाठी भरपूर पिशव्या बकोटीला मारून (गाडीत टाकून) निघायचोत. गाडी बाजाराच्या पटांगणाजवळ पार्क करून दोघेही बाजारात प्रवेश करायचो.
साधारण दोन अडीच एकराच्या परिसरातल्या त्या पटांगणात हा आठवडी बाजार भरत असे. सुरूवातीलाच किराणा सामानाच्या गोण्या (गहू, तांदूळ, शेंगदाणे, साखर) भरून ठेवलेले तंबू, मग तंबूत किंवा उघड्यावर तागड्या लावून भाजी विकणारी अत्यंत प्रेमळ शेतकरी मंडळी.
या खरेदीत आम्ही दोघेही रमून जात असू. सगळ्यात शेवटच्या दुकानांमधे फळफळावळ मिळायची. खूप रास्त दरात चांगल्या प्रतीची फळे आम्ही सांगोल्यातच खाल्लीत.
बाजार संपवताना आमची पावले भल्यामोठ्या कढयांमधे तळल्या जाणार्या गाठी, गुडीशेव आणि भज्यांच्या तंबूकडे आपसूकच वळत असत. त्या तळणाचा वासच इतका खमंग असायचा की सकाळी घरी केलेला फराळ विसरत असू. त्या तंबूंसमोर आम्ही दोघेही, इतर गिर्हाइकांप्रमाणेच, उकीडवे बसून आमचा ऑर्डर देत असू. आणि तिथेच बसून कागदांमधे बांधून आलेल्या भज्यांचा फडशा पाडत असू. बहुतेक वेळा घरच्यांसाठीही ही भजी, तशाच कागदांमधे बांधून, नेत असू. अशावेळी सतीशही त्याची प्राचार्यपदाची झूल उतरवून ठेवत असे. समोरच्या भजीवाल्या मामांनाही, हा आपल्यासमोर उकीडवा बसून, गरम भज्यांवर ताव मारणारा माणूस, कुणी मोठ्ठा माणूस आहे हे माहिती व्हायचं काही कारणच नव्हतच. ते पण कधीमधी "घ्या की सायेब, अजून येक प्लेट. त्याला काय हुतय ?" असा आग्रह करीत असत.
असाच फेरफटका मारीत असताना एका शेतकर्याची दिसलेली ही बुलेट. शेतात पिकवलेली भाजी दर रविवारी बाजारात आणून टाकायला सोयीचे म्हणून गाडीला दोन्ही बाजूला रचना करून घेतलेली होती. सोबतच शेतात कीटकनाशके, तणनाशके आदींच्या फवारणीसाठीही त्याने व्यवस्था करून घेतलेली होती. त्या तरूणाचे कौतुक वाटले. त्याच्यासाठी ही बुलेट नुसतीच "शान की सवारी" नसून "काम की सवारी" ही असेल.



नवनव्या शेतीच्या तंत्रांशी जुळवून, शेतीविषयी शासनाच्या नवीन योजनांचा डोळसपणे अभ्यास करून, त्या योजनेत स्वतःसाठी काय फायदा होतोय हे जाणून घेण्याचे प्रयत्न करून, प्रगतीशी स्वतःला जोडून घेण्यार्या शेतकर्यांचे प्रमाण पश्चिम महाराष्ट्रात फार आहे. पाऊसपाणी नाही, जमिनीचा पोत हवा तेवढा चांगला नाही म्हणून रडत न बसता जिद्दीने मेहेनत करून विकासाची गंगा आपल्या घराकडे वळवणार्या या शेतकर्यांना सलाम.

- कधीकाळी शेतकरी होण्याची इच्छा असलेला पण कायम नागर संस्कृतीत असलेला राम किन्हीकर.

No comments:

Post a Comment