Friday, October 23, 2020

काही श्रेष्ठ भागवत (प्रल्हाद)

 प्रल्हादाचेही चरित्र आपणा सगळ्यांना ढोबळमानाने माहिती आहेच. अत्यंत पापी, पराक्रमी आणि सूडाने पेटलेल्या अशा पित्याच्या पोटी जन्म झाला. जन्मापूर्वी आईच्या गर्भात असताना देवर्षि नारदांनी आईला केलेला भगवत्भक्तीचा उपदेश प्रल्हादाने ऐकला आणि तो त्याच्यावर दृढ संस्कार झाला. 

श्रीमदभागवतात देवर्षि नारदांचे ज्या ज्या प्रसंगात प्राकट्य झालेले आहे ते ते सर्व प्रसंग सुखांतिकेत बदललेले आहेत. येनेकेन प्रकारेण प्रसंगांना सुखद वळण देण्याचे आणि भगवंताच्या मनासारखे घडवून आणण्याचे देवर्षिंचे कार्य खरोखर नतमस्तक करणारे आहे. आज कलियुगात आपण देवर्षिंना न जाणता त्यांना काही शेलक्या विशेषणांनी संबोधतो, ते किती चूक आहे हे आपल्याला कळेल. आणि आपणा सर्व सामान्य माणसांचे आयुष्य़ सुखकर होण्यासाठी जी विभूती कायम झटली तिचा उल्लेख हा कायम आदरार्थीच व्हायला हवा. कमीत कमी आपण भगवत्भक्तांनी तरी तो आदरार्थीच करायला हवा.

देवर्षिंचे संस्कार दृढ असल्याने पित्याच्या शत्रूचे गुणगान करणारा प्रल्हाद हा पित्याला सतत खुपू लागला. विविध आमिषे दाखवून, धाकदपटशा करून पित्याने त्याचे मन वळवण्याचा, त्याला भगवत्भक्तीपासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण प्रल्हाद बधला नाही. गुरूवचनांवर दृढ विश्वास ठेवून इतर कुठल्याही भौतिक आमिषांना न बधणारा, किंवा प्राणांतिक प्रसंगांना त्याच दृढ विश्वासाने सामोरे जाणारा प्रल्हाद हा आजच्या तरूणांसाठी आदर्श व्हायला हवा. आपल्या बालपणी आपल्या सगळ्यांवरच खूप चांगले संस्कार झालेले असतात पण मोठे झाल्यावर आपल्याला अकारण त्या संस्कारांची लाज वाटते. किंबहुना चांगल्या संस्कारांची लाज वाटणे म्हणजेच मोठेपण येणे अशी आपण आपली समजूत करून घेतलेली आहे. आपल्या सगळ्यांसाठी गर्भावस्थेतले चांगले संस्कार आयुष्यभर आणि प्राणापेक्षाही जास्त जपणारा हा दैत्यकुळात जन्म झालेला प्रल्हाद आदर्श व्हायला हवाय.

प्रल्हादाचा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे अभय. श्रीमदभगवतगीतेत दैवी गुणसंपत्ती वर्णन करताना भगवंतांनी उल्लेख केलेला पहिला दैवी गुण म्हणजे अभय. "अभयम सत्व संशुद्धी:, ज्ञान योग व्यवस्थिती:" यात पहिल्यांदा येणारा गुण अभय. भक्त निर्भय नसेल तर त्याच्यात इतर गुण येणारच नाहीत आणि आलेच तर ते समाजासाठी प्रदर्शित करण्याचे त्याला भय वाटेल. आज आपल्यातल्या किती भगवत्भक्तांना अभय होऊन त्यांचे दैवी गुण समाजासमोर मांडावेसे वाटतात ? की समाजाच्या तामसी रेट्यामुळे आपणच झाकोळले जाऊन आपले चांगले गुण आपण समाजापासून लपवून ठेवतो आहोत ? आणि समाजातल्या नवीन पिढीसमोर चांगले काय आणि वाईट काय ? याचा नीरक्षीरविवेक आपण आपल्या वागणुकीतून ठेवला नाही तर त्यांना, जे आज तामस वातावरण त्यांच्या डोळ्यांसमोर जाणीवपूर्वक ठेवण्यात येतय, तेच आदर्श वाटणार ना ? भगवत्भक्तांनी निर्भय होऊन चांगल्याला चांगले म्हणून प्रसार करणे आणि वाईटाचा विरोध करणे हे आपले आजचे कर्तव्य नाही का ?

आणि प्रल्हादाचा सगळ्यात मोठ्ठा गुण म्हणजे गुरूवचनांवरचा विश्वास. चर आणि अचर सृष्टीतही तोच एक परमात्मा भरून राहिला आहे हा दृढ विश्वास त्याच्या मनात होता आणि त्या विश्वासाच्या योगानेच भगवंताला स्तंभासारख्या जड वस्तूतही स्वतःचे अस्तित्व दाखवावे लागले. श्रीगजानन विजय ग्रंथात संतकवी दासगणू महाराजांनी म्हटल्याप्रमाणे "प्रल्हाद भक्त करण्या खरा, स्तंभी प्रकटलास जगदोद्धारा" असे रूप भक्ताभिमानी भगवंतांनी घेतले खरे पण तत्पूर्वी भगवंतांनी प्रल्हादाची खूप परीक्षा पाहिली. भगवंत, सदगुरू  परीक्षा तरी कशी पाहतात ? एक उर्दू कवी म्हणतो,

मुझे जो कराना था पथ पार

बिठाए उसपर भूत पिशाच्च

रचाए उसमे गहरे गर्न

और फ़िर करने आया जांच.

ज्या भक्ताचा सदगुरूवचनांवर दृढ विश्वास असेल तेच यातून तरून त्याच्याजवळ पोहोचतात. 

"तत्र ज्ञान विराग भक्तिसहितम, नैष्कर्म्यम आविष्कृतम" या श्रीमदभागवताचेच वर्णन केलेल्या गुणांपैकी प्रखर भक्ती हा एक गुण अंगी असलेला भक्त प्रल्हाद. आणि त्याची प्रखर भक्ती इतकी की भगवान नृसिंहाचे प्रगट झालेले उग्र रूप पाहून सगळ्या देवगणांना, इतकेच काय प्रत्यक्ष विष्णुपत्नी असलेल्या लक्ष्मीमातेलाही त्यांच्याजवळ जाण्याचे भय वाटले तेव्हा हा लहानसा बालक प्रल्हादच निर्भयपणे जाऊन त्यांच्या मांडीवर बसला आणि त्याने त्यांची स्तुती गाऊन त्यांना प्रसन्न केले. श्रीमदभागवतात भक्त प्रल्हादाने गायलेली भगवान नृसिंहाची स्तुती मुळातूनच वाचण्यासारखी आहे.




निर्भय होऊन, गुरूवचनांवर दृढ विश्वास ठेऊन केलेल्या साध्यासोप्या भक्तीने भगवंताला प्रगट व्हायला लावणा-या भक्त प्रल्हादाचा आदर्श आज कलियुगातही आपण ठेवायला काय हरकत आहे हो ?  त्याच्यासाठी भगवंत प्रगट झाले, माझ्यासाठीही होतीलच की. फ़क्त कलियुगात त्यांचे चर्मचक्षूंनी दर्शन होईल की अंतःचक्षूंना ते जाणवतील आणि माझे जीवन दैवी करून टाकतील याचा अनुभव प्रत्येकाने आपापल्या साधनेने आणि भक्तीने घ्यायचा आहे.

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर यांचे चिंतन (आश्विन शुद्ध सप्तमी, २३/१०/२०२०)

या लेखमालेला नावासकट किंवा कसेही भरपूर शेअर करावे ही नम्र विनंती. चांगले विचार भरपूर भगवतभक्तांपर्यंत पोहोचावेत आणि वैराग्याचा प्रसार व्हावा हा हेतू या लेखमालेमागे आहे. तसेही ही लेखमाला म्हणजे भगवान व्यासांच्या विचारांचे माझ्या मेंदूने केलेले फ़क्त प्रोसेसिंग आहे. (व्यासोच्छिष्टम जगत सर्वम) 

आणि तो मेंदू तरी "माझा आहे" असे मी का म्हणावे ? तोसुद्धा भगवंताच्या कृपाप्रसादानेच माझ्या देहात आलाय. त्यामुळे ही लेखमाला म्हणजे "त्वदीय वस्तू गोविंदम, तुभ्यमेव समर्पये" अशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे.

तुझेच देणे तुलाच अर्पण.


1 comment:

  1. श्रीराम!! उत्तम चिंतन.

    ReplyDelete