तुमच्या आमच्यासारख्यांच्या घरात बदाम, अक्रोड, किसमिस, काजू आदि सुकामेवा आपण नियमितपणे आणत असतोच.
पण पिस्ता हे त्या सुकामेव्याचेच भावंड आपल्याला फारसे प्रिय नाही. कुणी सवयीने दर महिन्याच्या किराण्यात पिस्ता आणत असल्याचे उदाहरण विरळा.
आमच्या बालपणी पिस्ता हे नाव आम्ही केवळ पिस्ता कुल्फी आणि पिस्ता आईसक्रीम पुरतेच ऐकले होते. खूप वर्षांनी खरा पिस्ता पाहिला आणि दोन गैरसमज दूर होऊन खालील शहाणपण आले.
१. पिस्ता गडद हिरव्या रंगाचा नसतो. केवळ हिरव्या / पोपटी रंगातली एक छटा त्यात असते. ती सुध्दा अगदी १० %. त्यामुळे पिस्ता कुल्फी आणि पिस्ता आईसक्रीममधे जो रंग असतो तो कृत्रिमच असतो.
२. पिस्त्याची किंमत लक्षात घेता १ लीटर आईसक्रीममध्ये १० ग्रॅम जरी पिस्ता या कंपन्या घालत असल्यात तरी भरून पावलो म्हणायचे.
पण हा सुकामेवा बिचारा दर महिन्याच्या किराण्यात एवढा दुर्लक्षित का ? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळालेच नाही. लोक खजूर आणतात, अंजीर आणतात पण मोठ्या हौसेने पिस्ता खरेदी करणारी मंडळी फारशी दिसत नाहीत हो.
बर, संध्याकाळच्या अपेयपानाशी याचा संबंध असल्याने हा दुर्लक्षित आहे म्हणावे तर याचाच सख्खा भाऊ काजू हा त्या अपेयपान करणार्यांचा अधिक कट्टर सोबती आहे. (आणि याचा दूरचा गरीब चुलत घराण्यातला शेंगदाणा सुध्दा). पण तरीही महिन्या दोन महिन्याला "खिरीत टाकायला, लाडवांना लावायला" म्हणून काजू घरी येतातच आणि शेंगदाणे तर स्वयंपाकघराचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे अपेयपानाचा पिस्त्याच्या बहिष्काराशी संबंध नसावा.
तसेही संध्याकाळीच नव्हे तर कुठल्याही वेळी अवेळी होणारे अपेयपान आजकाल आपण (दुर्दैवाने) स्वीकारले आहेच. नव्हे त्यात आपण धन्यता मानू लागलोय. हे अपेयपान न करणारा, मागास, बूर्झ्वा आणि मैत्रीस नालायक ठरतोय, असो. तो वेगळा विषय आहे.
पिस्त्याच्याच, बिचार्याच्या नशीबी अशी उपेक्षा का यावी ? हा मला छळणारा प्रश्न आहे. रंग आणि चवीतही बर्यापैकी निर्गुण निराकार असलेला बिचारा पिस्ता. याला चित्ताकर्षक रंग नाही की जिभेवर ठेवल्याठेवल्या जाणवेल अशी चवही नाही.
पिस्त्याचे पुरण भरलेल्या मिठायांचे वर्णन ३० वर्षांपूर्वी साहित्यातून वाचले होते. आता ते पिस्त्याचे पुरण कुणी हौसेने करत असेल असे वाटत नाही.
थोडक्यात काय ? वपु काळे म्हणतात त्याप्रमाणे लोक तुमची दखल दोन प्रकारे घेतात.
अ) तुमच्याकडे लोकांवर भरपूर उपकार करण्याची ताकद हवी.
किंवा
आ) तुमच्याकडे लोकांना भरपूर उपद्रव देण्याची तरी ताकद हवी.
बिचार्या पिस्त्याकडे उपद्रवाची ताकद तर खचितच नाही. (परमेश्वराने निर्माण केलेल्या कुठल्याही नैसर्गिक वस्तूत ही उगाचच उपद्रवाची प्रवृत्ती नाही.) आणि त्याचे नक्की उपकार काय आहेत हे अजून मानवांना पूर्णपणे कळलेले नाहीत.
त्यामुळे पिस्ता हा मध्यमवर्गियांसारखाच उपेक्षित राहणार हे उघड आहे.
- बालपणी आजोळी, चंद्रपूरला, चारोळ्यांचे पुरण खाल्लेला आणि म्हातारपणी पिस्त्यांचे पुरण खाण्याची मनिषा बाळगणारा,
कुठल्याही चवीचे आईसक्रीम सारखेच प्रिय असलेला
"श्रीमंत रामचंद्रपंत"
पण मध्यमवर्गीय राम.
No comments:
Post a Comment