श्रीमदभागवतात भगवंताच्या आणि काही श्रेष्ठ भगवतभक्तांच्या चरित्रांचे वर्णन आलेले आहे. तसा श्रीमदभागवत हा ग्रंथच माणसाच्या मनात वैराग्य उत्पन्न करणारा आहे. "तत्र ज्ञानविराग भक्तिसहितम, नैष्कर्म्यम आविष्कृतम" हे तर स्वतः श्रीमदभागवताचे चतुःश्लोकी भागवतातील वर्णन आहे. त्यातल्या कथा केवळ पुराणकथा नाहीत तर त्याचे नीट परिशीलन केले तर श्रोता, वक्त्यांच्या मनात तीव्र वैराग्य उत्पन्न करण्याची ताकद त्या कथांमध्ये आहे. त्यादृष्टीने श्रीमदभागवत हा एक प्रासादिक ग्रंथ आहे.
त्यात एकूण व्दादश स्कंध (खंड) आहेत. त्यातल्या दशमस्कंधात भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचे एकूण ९० अध्यायांमध्ये विस्तृत वर्णन केलेले आहे. ते दशमस्कंधचरित्र ऐकताना सदभक्तांची अवस्था अगदी भावविभोर होऊन जाते, भक्तांचे हृदय त्या परमात्म्याच्या लीलांच्या नुसत्या श्रवणाने भरून येते आणि म्हणूनच दशमस्कंधाला श्रीमदभागवताचे हृदय असे म्हटले जाते.
एकादश स्कंधात मात्र भगवंताने भक्ताबरोबर केलेली तत्वचर्चा आहे. त्यात ज्ञान आणि त्यातून प्राप्त होणारे वैराग्य आहे. एकादश स्कंधाची भाषा आणि त्यातला आशय कळायला कठीण आहे आणि म्हणूनच आपल्यासारखे सर्वसामान्य भक्त दशमस्कंधाचा अधिकाधिक आनंद घेताना दिसतात. श्रीमदभागवतकथेचे कलियुगातले बहुतांशी प्रवचनकारही दशमस्कंध सांगताना विशेष खुलतात आणि श्रोतृवर्गाच्या आनंदमहोत्सवात स्वतः बुडून जातात असे आपल्याला पहायला मिळते.
श्रीमदभगवतगीतेतही प्रत्यक्ष भगवंतांनी "ज्ञानाने मी प्राप्त होईन पण भक्तीने मी अधिक लवकर, कमी प्रयासाने प्राप्त होईन" असा उपदेश केलेला आहे. सर्वसामान्य भक्तांना भगवंताच्या लीलांचे नुसते श्रवण आणि कीर्तन यामुळे पाच हजार वर्षांनंतरही उचंबळून येते आणि म्हणूनच या भारतभूमीवर हे भक्तीचे बीज अगदी खोलवर रूजल्या गेले आहे असे मानले पाहिजे.
श्रीमदभागवतात तर खूप सा-या भगवतभक्तांच्या चरित्राचे वर्णन आलेले आहे. पण त्यात धृव, प्रह्लाद, सुदामा आणि श्रीशुकदेवजी यांच्या चरित्र वर्णनाला अधिक जास्त महत्व आहे. श्रीशुकदेवजी यांच्या चरित्राला तर इतके महत्व आहे की श्रीमदभागवताच्या संहितेत त्यांचा उल्लेख "श्रीशुकदेवजी" असाच आलाय. संहितेत फ़क्त भगवंतांचा उल्लेख "श्रीभगवान" असा आलाय आणि त्यांच्यानंतर श्री शुकदेवांचाच असा उल्लेख आलाय.
या चार चरित्रांनाच इतके महत्व का प्राप्त झालेय ? याचा अधिक खोलात जाऊन विचार करताना आपल्या लक्षात येईल की या चौघांचीही चरित्रे श्रीमदभागवताच्या मूळ हेतूशी अत्यंत पूरक आणि श्रीमदभागवताचे ब्रीद पोषक अशी आहेत. "ज्ञान विराग भक्तिसहितम, नैष्कर्म्यम आविष्कृतम" हे श्रीमदभागवताचे ब्रीदवाक्य आहे आणि तीच त्या ग्रंथाची फ़लश्रुतीही आहे. श्रीमदभागवत वाचायचे ते वैराग्य मनात यावे म्हणूनच. "विगतः रागः यस्मान सः विरागः" अशी वैराग्य शब्दाची फ़ोड होईल. या सृष्टीतल्या कुठल्याची चर आणि अचर गोष्टीत ज्याचे रमणे संपले तो विरागी पुरूष. एका भगवंतावाचून सृष्टीत दुसरे कुणीही नाही हे ज्याला जाणवले तो विरागी माणूस.
मग धृव, प्रह्लाद, सुदामा आणि श्रीशुकदेवजी यांच्या चरित्रात हे वैराग्य कसे आहे ? याचा आपण क्रमशः विचार करूयात.
- प्रा. राम प्रकाश किन्हीकर यांचे चिंतन (आश्विन शुद्ध व्दितीया, १८/१०/२०२०)
या लेखमालेला नावासकट किंवा कसेही भरपूर शेअर करावे ही नम्र विनंती. चांगले विचार भरपूर भगवतभक्तांपर्यंत पोहोचावेत आणि वैराग्याचा प्रसार व्हावा हा हेतू या लेखमालेमागे आहे. तसेही ही लेखमाला म्हणजे भगवान व्यासांच्या विचारांची माझ्या मेंदूने केलेली फ़क्त प्रोसेसिंग आहे. (व्यासोच्छिष्टम जगत सर्वम)
आणि तो मेंदू तरी "माझा आहे" असे मी का म्हणावे ? तोसुद्धा भगवंताच्या कृपाप्रसादानेच माझ्या देहात आलाय. त्यामुळे ही लेखमाला म्हणजे "त्वदीय वस्तू गोविंदम, तुभ्यमेव समर्पये" अशी माझ्या मनाची अवस्था झालेली आहे.
तुझेच देणे तुलाच अर्पण.
No comments:
Post a Comment